Sunday, October 14, 2018

माणदेशातले किल्ले (भाग - १) Vardhangad, Mahimangad, Bhushangad, Varugad, Shikhar Shingnapur, Gondavale, Offbeat Satara

Varugad Fort, Dist Satara

सातारा जिल्ह्याचे भौगोलीक दृष्ट्या दोन भाग पडतात. पश्चिमेकडचा भाग सुपिक, सधन, जंगल आणि डोंगररांगांनी नटलेला तर पूर्वेकडचा भाग म्हणजे दुष्काळी, वैराण, छोट्या छोट्या टेकड्या वजा डोंगररांगांचा. दोन्ही भागाचे स्वत:चे असे वेगळे सौंदर्य आहे. सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, सांगली जिल्ह्यातील आटपाडी, सांगोला, जत हे तालुके पूर्वीच्या माण देशात मोडतात. माण आणि गिरणा या इथल्या मुख्य नद्या पण हा पर्जन्य छायेचा प्रदेश असल्याने मुळातच पाऊस कमी, दुष्काळ तर पाचवीलाच पुजलेला आहे. माणदेशात फ़िरतांना नेहमी दिसणार दृष्य म्हणजे दूरवर पसरलेला सपाट प्रदेश, त्याला छेद देणार एखाद बाभळीच झाड. त्या मैदानात चरणारा शेळ्या- मेंढ्यांचा कळप त्याची राखण करणारा गडद रंगाचे मुंडासे बांधलेला धनगर आणि पार्श्वभूमीला एखादी टेकडी.....  ग. दि. माडगुळाकर आणि व्यंकटेश माडगुळकरांच्या साहित्यातून माणदेश आणि इथली माणस आपल्याला भेटलेली असतात. पण प्रत्यक्षात तिथे जाऊन त्याचा अनुभव घेण्यात खरी मजा आहे. विविध कारणाने विविध ऋतूंमध्ये मी या भागात फ़िरलो. इथल्या किल्ल्यांवर राहीलो. एका वर्षी तर आम्ही तिथे असतांना ऑक्टोबर महिन्यात एवढा पाऊस झाला की माणदेशातले नदी नाले दुथडी भरुन वाहायला लागले आणि ते आश्चर्य पाहाण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली पाहिली.    

 माणदेशातून जाणारी मुख्य डोंगररांग म्हणजे महादेव डोंगर रांग, शिखर शिंगणापूरचे मंदिर या डोंगर रांगेवर असल्याने ही डोंगररांग महादेव डोंगररांग या नावाने ओळखली जाते. या डोंगररांगेत उंचच उंच डोंगर आणि डोळे फ़िरवणार्‍या दर्‍या नाहीत. इथले उघडे बागडे डोंगरही आपले वेगळे सौंदर्य राखून आहेत. माणदेशातल्या या मुख्य डोंगररांगेपासून अलग झालेल्या डोंगरावर अनेक किल्ले विराजमान झालेले आहेत. आदिलशहाच्या काळात विजापूर या राजधानीपासून कोकणातल्या बंदरांपर्यंत जाणारा, विजापूर - पंढरपूर - सातारा - वाई - महाड असा व्यापारी मार्ग होता. तसेच फ़लटनकडे उतरणारा मोगराळे घाट या मार्गांचे रक्षण करण्यासाठी वर्धनगड, महिमानगड, वारुगड, भुषणगड इत्यादी किल्ल्याची योजना केली होती. शाहू महाराजांच्या काळात राजधानी सातार्‍याला हलवल्यामुळे या किल्ल्यांना महत्व आले होते.

मुंबई-पुण्याहून माण देशातील, माण, खटाव तालुक्यातील वर्धनगड, भूषणगड, महिमानगडगोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर, शनी शिंगणापूर, वारुगड ही ठिकाणे दोम दिवसात व्यवस्थित पाहाता येतात. सातारा मार्गे माणदेशात शिरल्यास नांदगिरी उर्फ़ कल्याणगड हा किल्लाही या बरोबर पाहाता येतो. दुसर्‍या दिवशी मुंबई पुण्याकडे फ़लटण मार्गे गेल्यास संतोषगड, फ़लटनचे राम मंदिर, जरबेश्वर मंदिर, राजवाडा आणि समाध्या पाहाता येतात. 
 
माणदेशातला पहिला किल्ला वर्धनगड. सातरा जिल्ह्यातून जाणार्‍या महादेव डोंगर रांगेवर, भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे त्यावर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे. सातारा - पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो. सातार्‍या पासून ३० किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे.

Vardhangad, Dist Satara

वर्धनगड
वर्धनगड छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ला आहे. अफजलखानाच्या वधानंतर छ्त्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड बांधला. १२ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर १६६१ शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते.  वर्धनगड गावाच्या बाहेर मुख्य रस्त्या लगत गडावरच्या दोन तोफ़ा आणून ठेवलेल्या आहेत. येथून पक्का रस्ता थेट किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. किल्ल्यावरील वर्धनीमातेच्या मंदिरात पंचक्रोशीतील लोकांचा राबता असतो. त्यामुळे किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे. साधारणपणे अर्ध्या तासात आपण गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. गडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. दरवाज्या पासून किल्ल्याची तटबंदी चालू होते, ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसर्‍या टोकाशी येऊन पोहोचते. ही तटबंदी आजही चांगल्या स्थितीत आहे. दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच एक ध्वजस्तंभ आहे. या ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे.


      दरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे. पुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. त्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणार्‍या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटे लागतात. टेकाडावर गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर आहे. वर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभार्‍यात सुंदर कासवाची मूर्ती कोरलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून खाली उतरावे. या वाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात. संपूर्ण गड फिरण्यास एक तास लागतो.

Mahadev Mandir, Vardhangad, Satara

Fortification of Vardhangad Fort , Satara

माण तालुक्यातला दुसरा किल्ला महिमानगड हा सातारा पंढरपूर रस्त्यावर असलेल्या महिमानगड गावात आहे. वर्धनगडापासून २२ किलोमीटरवर हा किल्ला आहे.

Mahimangad Fort , Dist Satar


महिमानगड

महिमानगड गावातून ठळक पायवाट गडावर गेलेली आहे. साधारणपणे अर्ध्या तासात आपण गडाच्या उध्वस्त प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश करतो. प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेल्या बुरुजांची रचना अशी केलेली आहे की, प्रवेशद्वाराजवळ येई पर्यंत आपल्याला ते दिसत नाही. प्रवेशद्वाराच्या चौकटीतच हत्तीचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या आजुबाजुला असणारी तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर ऊजव्या बाजूस समोरच हनुमानाचे देऊळ दिसते. त्याच्या समोरच बुरुजावर जाण्यासाठी केलेल्या पायर्‍या दिसतात.येथून संपूर्ण गडाची तटबंदी नजरेस पडते. थोडे पुढे गेल्यावर खालच्या बाजूस पाण्याचे सुंदर तलाव आहे, तलाव बर्‍यापैकी खोल आहे. या तलावाला बारामही पाणी असते. त्याच्याच बाजूला वाड्यांचे भग्नावशेष दिसतात. या बांधीव तलावाच्या बाजूला एक मोठा खड्डा आहे, तो साच पाण्याचा तलाव असावा. या दोन तलावांच्या मधून वाट गडाच्या ईशान्येस असलेल्या सोंडेकडे जाते. या सोंडेवर असलेल्या तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. या दरवाजातून पलिकडे गेल्यावर लांबवर पसरलेली सोंड दिसते. सोंडेच्या टोकाला एक बुरुज आहे. हे पाहून परत येतांना २ तलावांमधून न येता किल्ल्याच्या रस्त्याकडील तटबंदीच्या बाजूने यावे, येथे तलावाच्या वरच्या बाजूस एक पीराचे थडगे आहे. येथून प्रवेशद्वारापाशी येऊन प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस गेल्यावर तटबंदी व बुरुजांचे अवशेष पाहायला मिळतात. येथील तटबंदीवरुन खालचे महिमानगड गाव दिसते. गड फिरण्यास साधारण अर्धातास लागतो. किल्ल्यावरून वर्धनगड, ईशान्येकडे असणारा मोळ घाट असा सर्व परिसर दिसतो.
 
Mahimangad Fort, Dist Satara
महिमानगडा पासून ४० किलोमीटरवर भूषणगड किल्ला आहे.

Bhushangad, Dist Satara


भूषणगड

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात असलेला भूषणगडचा एकमेव डोंगर आपले दुरुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्‍यांनी गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. यात पिवळ्याजर्द कन्हेरीच्या फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे.

Fortification of Bhushangad Fort,Dist. Satara
देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दूसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला. .. १६७६ मध्ये शिवाजीराजांनी आदिलशहाकडून भूषणगडचा किल्ला जिंकून घेतला व त्याची फेरउभारणी केली. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ला जिंकून त्याचे नाव ‘‘इस्लामतारा’’ ठेवले. पेशवेकाळात हा गड पंतप्रतिनिधींच्या ताब्यात होता. .स १८४८ मध्ये इंग्रजांनी सातार्‍याचे राज्य खालसा केल्यावर भूषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.


भूषणगडवाडीतून पायर्‍यांची वाट गडावर जाते. गडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. हे प्रवेशद्वार पूर्वाभिमुख असून त्याची बांधणी ‘‘गोमुखी’’पध्दतीची आहे. प्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत. प्रवेशद्वारा समोरील वाट तटबंदीच्या बाजूने जाते, या मार्गावर आपल्याला एक खोल विहीर पाहायला मिळते. गडाची तटबंदी आजही सुस्थितीत असल्यामुळे त्यात जागोजागी आपल्याला जंग्या पाहायला मिळतात.

Entrance Gate of Bhushangad Fort

Water tank on Bhushangad Fort, Dist Satara
प्रवेशद्वारातून आत आल्यावर डावीकडील पायर्‍यांची वाट मोठ्या बुरुजाकडे जाते. या बुरुजाला तोफेसाठी झरोके आहेत. या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. बुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना, उजव्या हाताला भव्य बांधीव कुंड दिसते. या कुंडाजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे. या मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाई देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. या जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. येथून किल्ल्याची तटबंदी व बुरुज नजरेस पडतात. याशिवाय भूषणगडची तटबंदीच्या खालच्या अंगाला असलेली दक्षिणोत्तर पसरलेली लांब सोंड दिसते.तटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणाकरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो.
Fortification of Bhushangad

प्रवेशद्वारातून बाहेर पडून काही पायर्‍या उतरल्यावर डाव्याबाजूला एक रुंद मळलेली पायवाट दिसते. ही तटबंदी व बुरुजाखालुन जाणारी पायवाट भूयारी देवी मंदिराकडे जाते. वाटेत आपल्याला तटबंदीवरुन दिसणारी भूषणगड डोंगराची सोंड लागते. भूयारी देवीचे मंदिर भूयार बुजवून नविनच बनविण्यात आलेले आहे. भूषणगडची गडफेरी येथे पूर्ण होते; ती करण्यास १ तास लागतो.

Gondavalekar Maharaj Samadhi Mandir, Gondavale


शुकाचार्य (शुकाचारी) ते कोळदुर्ग हा माणदेशातील अप्लपरिचित ठिकाणावरचा ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा. 

गोंदवलेकर महाराज मंदिर, गोंदवले.

भूषणगडापासून ३५ किलोमीटरवर गोंदवले आहे. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या गावात गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर, थोरले राम मंदिर आनि धाकले राम मंदिर ही मम्दिरे पाहाण्यासारखी आहेत. थोरले राम मंदिरा समोर हनुमान मंदिर आहे . त्याच्या जवळ गजलक्ष्मीचे एक शिल्प आणि वीरगळ पाहायला मिळतात. गोंदवल्यातल्या अध्यात्मिक, शांत आणि पवित्र वातावरणचा अनुभव घेऊन आपल्या पुढच्या प्रवासाला निघायचे. गोंदवल्यापासून १७ किलोमीटरवर शिखर शिंगणापूर येथे प्राचिन स्वयंभू शिवमंदिर आहे. यावरुनच या डोंगररांगेला महादेव डोंगररांग म्हणतात. या डोंगररांगेत वारूगड, वर्धनगड, महिमानगड, कल्याणगड हे किल्ले आहेत. याच रांगेच्या एका फाट्यावर समुद्र सपाटी पासून १,०५० मी. उंचीवर शिखरशिंगणापूरचे प्राचिन मंदिर आहे.

Shikhar Shingnapur Temple


शिखर शिंगणापूर

पुराणातल्या कथेनुसार शिखर शिंगणापूर जवळ असलेल्या गुप्तलिंग या स्थानावर शंकर घोर तपश्चर्येला बसले होते. पार्वती भिल्लीणीच्या रुपात तेथे आली. तांडव नृत्य करून पार्वतीने शंकराची तपश्चर्या मोडली. तपश्चर्या भंग होताच भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटा तेथील शिळेवर आपटल्या. जटा आपटताच त्या शिळेतून पाण्याचा प्रवाह सुरु झाला. आजही गुप्तलिंगावर गोमुखातून पाण्याचा अविरत प्रवाह सुरु आहे. पार्वतीने शंकराची क्षमा मागितली. पार्वतीच्या याचनेने भगवान शंकर शांत झाले. गुप्तलिंगावर श्री शंभू महादेव आणि पार्वतीचे मिलन झाले. भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह चैत्र शुद्ध अष्टमीला श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे पार पडला.      आजही दरवर्षी शिखर शिंगणापूर येथे चैत्र शुध्द अष्टमीला शंकर पार्वती विवाह सोहळा अगदी साग्रसंगीत साजरा केला जातो. पंचमीला हळदीचा कार्यक्रम असतो. या लग्नासाठी एक भले मोठे ५५० फुट लांब पागोटे विणले जाते. विवाहाच्या दिवशी या पागोट्याचे एक टोक महादेवाच्या कळसाला तर दुसरे टोक अमृतेश्वराच्या देवळाच्या कळसाला बांधतात.

Entrance Gate of  Shikhar Shingnapur Temple.
इतिहासात डोकावल्यास देवगिरीच्या यादव घराण्यातील सिंघण राजाने हे गाव वसविले होते. त्यावरुन गावाचे पूर्वीचे नाव सिंघणापूर पडले असावे. पुढे या नावाचा अपभ्रंश होऊन आजचे शिंगणापूर नाव प्रचलित झाले असावेशिखर शिंगणापूर हे भोसले घराण्याचे कुलदैवत. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत असत. माण - खटाव हा पूर्वी पासून दुष्काळी प्रदेश होता. त्यामुळे शिखर शिंगणापूरला येणार्‍या भाविकांचे पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे होणारे हाल पाहून मालोजीराजांनी गावात मोठे तळे बांधले, त्यास पुष्करतिर्थ असे म्हणतात. आजही हा तलाव शिखर शिंगणापूरच्या टेकडीच्या पायथ्याशी पाहायला मिळतो. शिवाजी महाराजांनी या मंदिराची २ भव्य प्रवेशव्दारे बांधली. त्यातील पूर्वेकडील प्रवेशव्दार ६० फूट उंच असून त्यावर सापाचे सुंदर शिल्प कोरलेले आहे. दुसरे प्रवेशव्दार उत्तरेकडे असून ते ४० फूट उंच आहे. मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता झाल्यामुळे ही दोन्ही महाव्दारे पाहाण्यासाठी वाट वाकडी करून जावे लागते.

Smruti Mandir, Shikhar Shingnapur
Smruti Mandir, Shikhar Shingnapur

      ..१७३५ मध्ये शाहू महाराजांनी देऊळाचा जिर्णोध्दार केला. त्यावेळेच्या स्थापत्य शैलीवर मुस्लिम स्थापत्याचा प्रभाव होता, हे मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या छोट्या मंदिरांच्या कळसाच्या घुमटाकार आकारावरून सिध्द होते. त्याचवेळी शाहू महाराजांनी मंदिराच्या पश्चिमेला शहाजी महाराज, शिवाजी महाराज व संभाजी महाराज या तिघांची स्मारके (स्मृती मंदिरे) बांधली. आज ही स्मारके दुर्लक्षित व दुरावस्थेत असली तरी पाहाण्यासारखी आहेत. काळ्या पाषाणात बांधलेल्या या स्मारकामध्ये ३ शिव मंदिरे आहेत. मंदिरांच्या व्दारपट्टीवर गणपती कोरलेला आहे. मंदिरांसमोर तुलशी वृंदावन आहेत. मंदिराच्या डाव्या बाजूला कमानीयुक्त ओवर्‍या आहेत. .. १९७८ मध्ये शिखर शिंगणापूर मंदिराचा पुन्हा एकदा जिर्णोध्दार करण्यात आला. दक्षिणेतील रामस्वामी स्थापत्य तज्ञाकडून ६० फूटी शिखराची व मंदिराची डागडुजी करून आकर्षक रंग देण्यात आला आहे.

Carving on the pillar of Shikhar Shingnapur Temple

शिंगणापूर टेकडीवरील शिवमंदिराकडे जाताना शांतिलिंग स्वामींची समाधी व त्यापुढे खडकेश्वराचे मंदिर लागते. धवलगिरी किंवा स्वर्णाद्री म्हणून ओळखल्या जाणार्‍या शिखरावर शंकराचे मंदिर असून त्याच्या चारही बाजूला तटबंदी आहे. तटबंदीत चार दरवाजे आहेत. पायर्‍यांच्या मार्गाने चालत गेल्यास आपण जिजाऊ वेशीतून शेंडगे दरवाजा ओलांडून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचतो. रस्त्याने आल्यास आपण तटबंदीतील उपव्दारापाशी पोहोचतो. येथून मंदिरात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला दोन भव्य दिपमाळा दिसतात. त्याच्या बाजूला नगारखाना आहे.

Carving on the pillar of Shikhar Shingnapur Temple

काळ्या पाषाणात बांधलेले शंकराचे मंदिर हेमाडपंती पद्धतीचे आहे. मंदिराचे छत १८ दगडी खांबावरती तोललेले आहे. खांबांवरील चौकटीत शिकारीची, मैथूनाची व पौराणिक कथेतील प्रसंगांची शिल्प कोरलेली आहेत. त्यातील एका शिल्पात दोन शरीरे (धड) व एक डोकं असलेला प्राणी दाखवलेला आहे. त्याचे डोके एका बाजूने झाकल्यास बैल दिसतो, तर दुसर्‍या बाजूने झाकल्यास हत्ती दिसतो. मंदिरातील शिल्पकला वेळ काढून पाहाण्यासारखी आहे. दगडी खांबांच्या वरच्या टोकाला यक्ष कोरलेले आहेत. त्यांच्या खांद्यावर मंदिराचे छत तोललेले दाखवण्यात आले आहे. छताचा विस्तार बाहेरील खांबापासून 3 फूट बाहेर आहे. मंदिराच्या गाभार्‍या बाहेर डाव्या बाजूला गणपतीची मुर्ती आहे. गाभार्‍याच्या व्दारपट्टीवर मक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या गाभार्‍यात भगवान शंकराचे आणि दुसरे पार्वतीचे अशी दोन लिंग आहेत. गाभार्‍याच्या समोर जमिनीवर दगडात कोरलेले कासव आहे. त्याच्या पुढे ४ नंदी आहेत. त्यांना तांब्या - पितळेचे आवरण घातलेले आहे. मंदिरात पोर्तुगीज बनावटीच्या दोन घंटा असून त्यांच्यावर रोमन लिपीत अनुक्रमे १६७० व १७२० सालांचा उल्लेख आहे. मंदिराच्या आवारात बरीच लहान मंदीरे आहेत. त्यांच्या कळसाचा आकार घुमटाकार आहे. 


      मंदिराच्या पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे. यास "बळी महादेव" म्हणून देखील ओळखले जाते. मंदिराच्या दक्षिण दरवाज्यातून किंवा रस्त्याने अमृतेश्वर मंदिराकडे जाता येते. मंदिराचे गाभारा आणि सभा मंडप असे दोन भाग आहेत. मंडपाचे छत हे १६ कोरीव दगडी खांबांवर तोललेले आहे.




शिंगणापूरचे मंदिर पाहून झाल्यावर आपला आजच्या दिवसातला शेवटचा मुक्कामाचा किल्ला वारुगड किल्ला आहे. शिखर शिंगणापूर ते वारुगड अंतर २६ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या माचीवर वारुगड गाव वसलेले आहे. त्यामुळे गाडी थेट वारुगडाच्या माचीवर जातात. मुंबई-पुणे-फ़लटणहून वारुगडावर थेट एअसटीच्या बसेस आहेत.

Flower of Pomegranate

Pomegranate

वारुगडावरील मंदिरात राहाण्याचा योग दोनदा आला. एकदा राहिलो त्यादिवशी अमावास्या होती. आजूबाजूच्या गावातले लोक मंदिरात जमून अमावास्येच्या रात्री भजन गाऊन जागर करतात. त्यामुळे आमच्या झोपेचे मात्र बारा वाजले. वारुगड परिसरात उत्तम सिताफ़ळ आणि डाळींब होतात. एका हातात मावणार नाहीत एवढ्या आकाराची फ़ळ आम्ही गडावरुन विकत घेतली होती. 

Varugad, Dist Satara

वारुगड


वारुगड किल्ला माची व बालेकिल्ला या दोन भागात विभागलेला आहे. रस्त्याने किल्ल्यावर प्रवेश करण्यापूर्वी दुरुनच किल्ल्याची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. किल्ल्याची माची ही संपूर्ण तटबंदीवेष्टीत आहे. आजही ती बर्‍याच मोठ्या प्रमाणावर शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग हा या माचीतूनच पुढे जातो. या माचीत शिरण्यासाठी पूर्वी ५ दरवाजे होते. आता मात्र रस्त्याच्या उजव्या बाजूला एकच दरवाजा शिल्लक आहे. त्याच्या पुढे पाण्याचा छोटा तलाव आहे. रस्ता संपतो तिथे भैरोबाचे जीर्णोध्दारीत मंदिर आहे. मंदिर प्रशस्त असल्याने येथे राहण्याची सोय होऊ शकते. मंदिरा समोरच हातपंप व वस्ती आहे. मंदिराच्या मागे धर्मशाळा आहे, येथे राहण्याची सोय होते.
मंदिर पाहून पुढे गेल्यावर किल्ल्याचे फलटण कडील प्रवेशव्दार लागते. गिरवी जाधववाडी या मार्गे माचीत प्रवेश करणारी वाट याच दरवाजातून वर येते.

Balekilla, Varugad, Dist Satar
गिरवी जाधववाडीतून माचीवर येणारी पायवाट दरवाजातून पुढे गेल्यावर दोन भागात विभागते. डावीकडे जाणारा रस्ता माचीवरील घोडेवाडीकडे जातो, तर सरळ वर जाणारी वाट १५ मिनिटात बालेकिल्याच्या प्रवेशद्वारापाशी येऊन धडकते.( रस्त्याने किल्ल्यावर प्रवेश केल्यास डाव्या बाजूची पायवाट पाण्याच्या टाक्याच्या बाजूने बालेकिल्ल्यावर जाते.) बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी पाण्याचे सुंदर बांधीव टाक आहे. बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराची रचना गोमुखी पध्दतीची आहे. बालेकिल्ल्याची तटबंदी आजही शाबूत आहे. बालेकिल्ल्यावर पोहोचल्यावर समोरच एक सदरेची इमारत आहे. आज ती पूर्णपणे नव्याने बांधून काढलेली आहे. समोरच पाण्याचे टाके व एक विहीर आहे. विहीर बर्‍याच प्रमाणात बुजलेली आहे.किल्ल्यावरून आजूबाजूचा परिसर विस्तीर्ण प्रदेश नजरेस पडतो.

Water Tank on Varugad Fort, Dist Satara

वारुगडावर मुक्कामाची उत्तम सोय आहे. वारुगडावर मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोगराळे घाट उतरुन संतोषगड, फ़लटनचे राम मंदिर, जरबेश्वर मंदिर, राजवाडा आणि समाध्या पाहून मुंबईला जाता येते.

Water Tank on Varugad Fort, Dist Satara

 शुकाचार्य (शुकाचारी) ते कोळदुर्ग हा माणदेशातील अप्लपरिचित ठिकाणावरचा ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा. 





Thursday, September 20, 2018

बेळगांवच्या आसपासचे किल्ले . (Forts near Belgaum)



हडपीची विहिर, सडा किल्ला 

बेळगाव उर्फ वेणुग्राम हे शहर इसवीसनाच्या बाराव्या शतकात रट्ट सामराज्याच्या राजधानीचे शहर होते. त्यानंतर मध्ययुगापासून एक व्यापारी पेठ म्हणून बेळगाव प्रसिद्ध होते. गोवा, वेंगुर्ले इत्यादी बंदरात उतरणारा माल चोर्लेघाट, आंबोली घाट , खोकरल घाट इत्यादी घाटमार्गां व्दारे घाट माथ्यावरच्या बेळगांव या पेठेत येत असे. त्यामुळे हा व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी यामार्गावर वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले . व्यापारीमार्गावरील या  किल्ल्यांची साखळी थेट बंदरापासून ते बाजारपेठे पर्यंत होती. अग्वाद, तेरेखोल , यशवंतगड असे किनाऱ्यावरचे किंवा खाडीच्या मुखावरचे किल्ले जलमार्ग आणि बंदरे सुरक्षित ठेवत असत . त्यानंतर  घाटमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी मनोहर मनसंतोषगड , नारायणगड , महादेवगड , सडा इत्यादी किल्ले बांधले होते. घाटमाथ्यावर पोहोचल्यावर तेथील मार्ग सुरक्षित राखण्यासाठी महिपालगड , गंधर्वगड , कलानिधीगड, राजहंसगड इत्यादी किल्ले बांधले गेले. खुद्द बाजारपेठेचे रक्षण करण्यासाठी बेळगावचा किल्ला बांधला होता.व्यापारीमार्ग हा उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असल्यामुळे वेगवेगळ्या राजवटीत या किल्ल्यांची बांधणी , मजबूतीकरण झाले.   

विहिर, वल्लभगड
बेळगावच्या आसपासच्या किल्ल्यांच्या भटकंतीत आम्ही सध्याच्या बेळगाव जिल्ह्यातील ७ किल्ले दोन दिवसात पाहायचे ठरवले होते. सडा किल्ला, राजहंसगड (येल्लुरचा किल्ला), बेळगावचा किल्ला, काकती गड, होन्नुरगड, पाच्छापूर गड, वल्लभगड हे किल्ले पाहायचे असे नियोजन केले होते. बेळगाव जवळील महाराष्ट्रातील महिपालगड, गंधर्वगड, कलानिधीगड, सामनगड, रामतिर्थ, नेसरीचे स्मारक यापूर्वी पाहून पाहून झालेले होते. ते परत पाहायचे असल्यास अजुन एक दिवस हाताशी असणे आवश्यक होते. तो नसल्याने या न पाहीलेल्या किल्ल्यांवरच लक्ष केंद्रीत केले.

महाराष्ट्राच्या कानकोपर्‍यात भेटणारी लालपरी.

दरवेळी डोंबिवलीतून किल्ले पाहायला निघतो. यावेळी मालवणहून निघालो होतो. पहिला किल्ला होता सडा. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर हा किल्ला आहे. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे सडा किल्ल्याच्या महाराष्ट्राच्या बाजूच्या मांगेली गावातून एक कच्चा रस्ता झालेला आहे आणि त्या रस्त्याने गाडीने थेट सडा गावात जाता येते. त्यानुसार बांदा - दोडामार्ग मार्गे मांगेली घाटाने मांगेली गाव गाठले. या मार्गावर दोडामार्ग ते फ़णसवाडी या एसटीच्या बसेस दिवसातून तीन वेळा धावतात. मांगेलीचा धबधबा गोव्याच्या पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तेही शनिवार रविवार येथे भरपूर गर्दी असते. त्यामुळे इथे नाश्ता, चहा जेवण देणारी घरगुती हॉटेल्स उघडली आहेत. इथे पोहोचल्यावर कळले की, सडा गावाला जाणारा कच्चा रस्ता पावसाळ्यात ढासळलेला आहे. त्यामुळे गाडी सडाला जाऊ शकणार नाही. मग गाडी तिथेच ठेउन गावातल्या लोकांनी दाखवलेल्या पायवाटेने मांगेली गावा मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. थोडी उंची गाठल्यावर तिलारी धरण आणि आजूबाजूचा दाट जंगलाचा प्रदेश दिसायला लागला. अर्ध्या तासात सडा गावात पोहोचलो. सडागावातील सडेकर काकांनी किल्ला आणि परिसर दाखवायला आमच्या बरोबर यायचे मान्य केले. गाव जरी कर्नाटकात असले तरी सर्व गावकरी अस्खलित मालवणी बोलत होते. गावत पाचवी पर्यंत एक कानडी आणि एक मराठी शाळा आहे. पण शाळेत विद्यार्थी नसल्याने त्या बंद आहेत. सडा गावतील मुलेमुली आम्ही आलो त्या पायवाटेने रोज डोंगर चढून - उतरुन महारष्ट्रातील मांगेली गावात शाळेत जातात. तिथे दहावी पर्यंत शाळा आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांची मुले गोव्याला शाळेत जातात. बेळगावशी त्यांचा संबंध केवळ शासकीय कामासंबंधी येतो. बेळगावहून सडाला थेट एसटीची सेवाही नाही. अशा प्रकारे मनाने आणि बोलीभाषेने महाराष्ट्रात आणि केवळ शरीराने कर्नाटकात असलेल्या सडेकर काकांनी आम्हाला संपूर्ण किल्ला आत्मियतेने दाखवला.

1)  सडा किल्ला (Sada Fort)

सडा किल्ला

वाडा , सडा किल्ला

सडा किल्ला :- सडा गावाची वस्ती किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. या वस्तीत देसाईच्या घराजवळ एक सुंदर पायऱ्यांची विहीर आहे. गावतले लोक हडपीची विहिर म्हणून या विहिरीला ओळखतात. विहीर चावीच्या आकाराची असून दोन स्तरात आहे . १८ पायऱ्या उतरुन गेल्यावर आपण विहीरीच्या पहील्या टप्प्यावर पोहोचतो.  याठिकाणी विहिरीच्या भिंतीत ठरावीक अंतरावर ३ फूट उंचीचे कमान असलेले (एक माणूस बसू शकेल इतक्या उंचीचे) कोनाडे आहेत . या भागातून विहिरीला संपूर्ण फ़ेरी मारता येते . पुन्हा पायऱ्यावर येउन खाली उतरल्यावर कमान असलेला दरवाजा आहे . त्यातून पाण्यापर्यंत जाता येते. ही सुंदर विहिर पाहून गावातील विठ्ठल मंदिर गाठाले. मुक्कामास हे मंदिर योग्य आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर डाव्या बाजूची पायवाट राजवाड्याकडे जाते. या ठिकाणी एक पडका चौसोपी वाडा आहे. या वाड्यात पावणाई देवीचे ठाणे आहे. या वाड्याच्या बाजूला काही पडक्या वाड्यांचे अवशेष आहेत . वाडा पाहून पुढे गेल्यावर आपण होळीच्या माळावर पोहोचतो. याठिकाणी सडा गावातील लोक होळी पेटवतात. माळावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची पहिली तटबंदी लागते. तटबंदीतून आत आल्यावर उजव्या बाजूने चालत गेल्यावर एक बांधीव मार्ग दिसतो. हा मार्ग तटबंदी बाहेरील विहिरीकडे जातो. किल्ल्यावर पाण्याची सोय नसल्यामुळे किल्ल्या बाहेरून पाणी आणण्यासाठी हा बांधीव मार्ग बांधलेला होता. विहिर पाहून परत आल्या मार्गाने परत येउन किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्याच्या दरवाजाचे दगड या मार्गावर पडलेले आहेत. गोमुखी दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. दरवाजाच्या आत दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. त्या ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला तटबंदीत एक कमानदार खिडकी आहे . त्यातून खालचे मांगेली गाव, तिलारी धरण आणि दूरवरचा प्रदेश दिसतो. टेहळणीसाठी या खिडकीची योजना केलेली आहे. या खिडकीच्या समोरच्या बाजूला असलेल्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर पोहोचतो. येथून डाव्या बाजूने जाणाऱ्या वाटेने पुढे चालत गेल्यावर दुसऱ्या बुरुजावर एक ओतीव तोफ आहे. किल्ल्याचा आवाका त्यामानाने छोटा आहे. अर्ध्या तासात किल्ला पाहून झाला. 

Cannon on Sada Fort

सडा किल्ल्यासमोरील डोंगरावर एक गुहा आहे. तसेच सडा गावापासून २ किलोमीटरवर एक धबधबा आहे. फक्त सडा किल्ला बघायचा असल्यास या दोन्ही गोष्टी पाहाणे शक्य होते पण आम्हाला आज राजहंसगड आणि बेळगावचा किल्ला पाहायचा होता. त्यात सडाला येणारा रस्ता कोसळला असल्याने आम्हाला मांगेली घाट उतरुन तिलारी घाट चढून बेळगाव मार्गे राजहंसगड गाठावा लागणार होता. (सडा ते राजहंसगड अंतर ६८ किलोमीटर आहे) सकाळी लवकर निघाल्याने वाटेत कुठे नाश्ता केला नव्हता. आता पोटात कावळे ओरडायला लागलेले. रस्त्यात भेडशी हे त्यातल्या त्यात मोठे गाव होते. तिथे एकमेव हॉटेल होते त्याने सांगितले जेवणाच्या वेळी  फक्त उसळपाव मिळेल. दुसरा पर्याय नसल्याने उसळ पाव खाऊन आणि लिंबू सोडा पिउन जठराग्नी तात्पुरता थंड केला. तिलारीघाट चढून बेळगावमार्गे १४ किलोमीटर वरील येल्लुर गाठले. येल्लूर गावाजवळ राजहंसगड आहे. किल्ल्याच्या प्रवेशव्दारापर्यंत पक्का रस्ता आहे.


2) ऱाजहंसगड (येल्लुरचा किल्ला) (Rajhansgad , Yellur Fort)


Entrance Gate of Rajhansgad

Entrance Gate of Rajhansgad

Rajhansgad (Yellur Fort)

Siddheshwar Temple, Yellur fort
ऱाजहंसगड :- राहजंसगडाला त्याच्या पायथ्याच्या गावमुळे येल्लुरचा किल्ला म्हणून लोक ओळखतात. किल्ल्याचे प्रवेशव्दार गोमुखी आहे. प्रवेशव्दारातून आत प्रवेश केल्यावर समोर सिध्देश्वराचे जीर्णोद्धारीत मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे . टाकीच्या आत कमानी आहेत. सध्या लोखंडी जाळी लावून ती टाकी झाकलेली आहे. टाकीच्या बाजूला एका वास्तूचे अवशेष आहेत ते दारु कोठार असावे. त्याच्या पुढे सध्या केवळ तळघरच शाबूत असलेली एक वास्तू आहे. या वास्तू जवळील तटबंदीत चोर दरवाजा आहे. सुधागड किल्ल्याच्या चोर दरवाजासारखी याची रचना आहे..चोर दरवाजा पाहून थोडे पुढे गेल्यावर तटबंदीत इंग्रजी L आकाराची खोली आहे. सिध्देश्वर मंदिराच्या बाजूला एक विहिर आहे. त्याच्या बाजूला पाणी साठवण्यासाठी दगडी धोणी आहे. फांजीवरुन किल्ल्याला संपूर्ण प्रदक्षिणा घालून आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो. 
किल्ल्याच्या इतिहासात डोकावले तर रट्ट घराण्याने बेळगाव या आपल्या राजधानीला येणार्‍या मार्गाचे रक्षण करण्यासाठी राजहंसगड बांधला. त्यानंतर आदिलशाहीच्या काळात असाद खान लारी या पर्शियन सरदाराने त्याला आजचे स्वरुप दिले. हा किल्ला विजयनगर, बहामनी, आदिलशाही, मोगल, मराठे इत्यादी विविध राजवटींच्या अधिपत्याखाली होता. या किल्ल्यावर ३ लढाया झाल्या आहेत. पहीली लढाई पेशवे आणि सावनूरचे नवाब यांच्यात झाली . दुसरी लढाई पेशवे आणि टिपू सुलतान यांच्या मध्ये झाली . तिसरी लढाई भिवगड आणि राजहंसगडच्या सैन्यात झाली होती. किल्ला आजही उत्तम स्थितीत ठेवलेला आहे. त्यामुळे पाहून समाधान झाले. 

3) बेळगावचा किल्ला (Belgavi Fort)

Belgaum Fort entrance gate

Belgavi Fort

Kamal Basadi jain Temple, Belgavi Fort

Carving on ceiling of  Sabhamandapa in Kamalbasadi jain temple, Belgaum

Shiva Temple, Belgaum Fort

Shiva Temple at Belgavi Fort
बेळगावचा किल्ला :- आजच्या लांबलेल्या दिवसातला तिसरा किल्ला होता बेळगावचा किल्ला. बेळगाव शहराच्या मध्यभागे हा किल्ला आहे. किल्ला मिल्ट्रीच्या ताब्यात असल्याने उत्तम स्थितीत ठेवलेला आहे. किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खंदक खोदलेला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला अंबाबाई व गणपतीचे प्राचीन मंदिर लागते. या ठिकाणी पहारेकर्‍यांसाठी अनेक देवडया आहेत. किल्ल्याच्या अंर्तभागात अदिलशहाच्या काळात बांधलेल्या अनेक इमारती आहेत. प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या इमारतीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कचेर्‍या आहेत. तेथून पुढे गेल्यावर प्रवेशद्वारसदृश्य कमानीचे बांधकाम दिसते. यापुढील भागात मराठा लाइट इंन्फन्ट्रीचा कँप व लष्कराचे भरती केंद्र लागते. भरती केंद्राच्या बाजूला "कमल बसदी" नावाचे इसवीसन १२०४ मध्ये बांधलेले जैन मंदिर आहे. काळया ग्रॅनाइट दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा एक अजोड नमुना आहे. या मंदिरात नेमिनाथांची मुर्ती आहे. या मंदिरातील दगडी झुंबर पाहाण्यासारखे आहे. या झुंबरात कोरलेल्या कमळामुळे या मंदिराला कमल बसदी या नावाने ओलखले जाते. पुरातत्व विभागाने या मंदिराचा जिर्णोध्दार केलेला आहे. या मंदिराच्या बाजूला चालुक्य शैलीतील अनेक हिंदू मंदिरेही आहेत, परंतु या मंदिरातील मुर्ती गायब आहेत. किल्ल्यामध्ये अदिलशाही काळात बांधलेल्या साफा व जामिया या नावाच्या दोन मशीदी आहेत.

Donna Biryani , Belgavi

दिवसभर झालेली पायपीट आणि कुपोषणावर उपाय म्हणून बेळगावतल्या डोना बिर्याणीमध्ये बिर्याणीवर ताव मारला. याठिकाणी केळीच्या पानापासून बनवलेल्या भांड्यात बिर्यानी आणून देतात. जस्त तिखट, तेलकट नसलेल्या या बिर्यानी चव छान होती आणि भरपूरही होती.दुसऱ्या दिवशी चार किल्ले पाहायचे होते. सकाळी नाश्ता करुन काकती किल्ल्याकडे निघालो. 

4) काकती किल्ला (Kakati Fort)

Kakati Fort, Belgaum District

Steps to kakati Fort Belgavi

काकती किल्ला :- मुंबई बंगलोर महामार्गावर बेळगावच्या अलीकडे ११ किलोमीटर अंतरावर काकती गाव आहे. गावाच्या मागे किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायऱ्यांपर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे.बेळगाव या महत्वाच्या शहरावर आणि शहराकडे जाणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काकती किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. हा टेहळणीचा किल्ला असल्याने यावर फारसे बांधकाम नसावे. आज या किल्ल्याचा एकमेव बुरुज आणि त्याला लागून असलेली थोडीफार तटबंदी शिल्लक आहे. या बुरुजापर्यंत जाण्यासाठी सिमेंटमध्ये २५१ पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. किल्ल्यावर वनखात्याने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केलेले आहे . पाणी अडवण्यासाठी जागोजागी चरही खोदलेले आहेत . त्यामुळे किल्ल्यावर फिरणे मुश्किल झालेले आहे. त्यामुळे किल्ल्यावर इतर काही अवशेष आढळत नाहीत. किल्ल्यावरुन बेळगाव शहर दिसते.

5) होन्नुर गड  (Honnur Fort)


Honnur Fort, Belgaum District

Entrance of Honnur Fort , Belgavi District

Hidkal Dam from entrance of Honnur Fort

Honnur Fort & Hidkal Dam

होन्नुर गड :- काकती किल्ल्याच्या पुढचा किल्ला होता होन्नुर गड. बेळगाव जिल्ह्या घटप्रभा नदीवर बांधलेल्या हिडकल धरणाच्या काठावर होन्नुर हा किल्ला आहे. धरणामुळे तीनही किल्ल्याच्या तीन बाजूला पाणी आहे . त्यामुळे लाल चिर्यामध्ये बांधलेला हा किल्ला एखाद्या चित्रासारखा सुंदर दिसतो. किल्ल्याच्या अर्ध्या उंचीवर असलेल्या विठ्ठल भवन नावाच्या सर्कीट हाउस पर्यंत पक्का रस्ता बनवलेला आहे. तेथून किल्ल्याच्या तटबंदी पर्यंत जाण्यास चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. तटबंदी डावीकडे ठेवत दोन बुरुज पार केल्यावर किल्ल्याचा पूर्वाभिमुख गोमुखी दरवाजा आहे. हा दरवाजा दोन भक्कम बुरुजांच्या मध्ये लपवलेला आहे. किल्ल्याचे बुरुज आणि तटबंदी लाल चिर्यात बांधलेली आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर किल्ल्याचा संपूर्ण पसारा दृष्टीपथात येतो. या किल्ल्याची निर्मिती टेहळणीसाठी केल्याने किल्ल्यावर मोठ्या वास्तू नसाव्यात त्यामुळे किल्ल्यावर फ़ारसे अवशेष आढळत नाहीत. तटबंदीवरुन किल्ल्याला प्रदक्षिणा मारतांना हिडकल डॅमचा पसारा लक्ष वेधून घेतो. किल्ल्याच्या पश्चिमेला होन्नुर गाव आहे. त्यावरुन किल्ल्याला होन्नुर नाव पडलेले आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला झेंडा बुरुज आहे. त्याच्या जवळ किल्ल्याचा होन्नुर गावाच्या दिशेला उतरणारी वाट आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी दरवाजा असावा. आज मात्र तो अस्तित्वात नाही . तटबंदीवरुन फिरुन प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर पाण्याचे टाक / तलाव आढळत नाही. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था कशी होती याचा अंदाज येत नाही. किल्ला आणि त्याचे आजचे स्थान दोन्ही सुंदर असल्याने किल्ल्यावरुन पाय निघत नव्हता. पण अजून दोन किल्ले बाकी होते. उन चढायलाही सुरुवात झाली होती. होन्नुर किल्ल्याच्या पुढे १४ किलोमीटरवर पाच्छापूर किल्ला आहे. 

6) पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)

Pachhapur Fort, Belgavi Dist

Pachhapur Fort, Belgavi Dist

पाच्छापूर किल्ला :- पाच्छापूर म्हणजेच पातशहापूर या गावातील टेकडीवर एक किल्ला आहे. एकेकाळी सुंदर आणि बुलंद असलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था दयनीय आहे.  गावाच्या मधोमध असलेला हा किल्ला गावातल्या लोकांच्याच उपेक्षेचा धनी झालेला आहे. किल्ल्याच्या टेकडी भोवती दाट लोकवस्ती आहे. गावात शिरतानांच किल्ल्याचे बुरूज दिसायल लागतात. किल्ल्याच्या खाली गाव वसलेले आहे तेथेही तटबंदी आणि प्रवेशव्दार होती. किल्ल्यावर जाण्यासाठी गावाला वळसा घालून गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जातांना उत्तरेकडील प्रवेशद्वार लागते. गावात पोहोचल्यावर दाट वस्तीमुळे किल्ल्यावर जाणारा रस्ता मिळत नव्हता. शाळे समोर असलेल्या पुस्तकाच्या दुकानात चौकशी केल्यावर त्याने किल्ल्यावर काही नाही उगाच कशाला जात वगैरे नेहमीची पालुपद चालू केली. किल्ल्याचा रस्ता इंग्रजी शाळेतून जातो अस तिथे असलेल्या एका माणसाने सांगितले. पण रविवार असल्याने शाळेच्या गेटला कुलूप होते. मग चावी शोधण्याची मोहीम चालू झाली. आत्ता पर्यंत आम्ही मालवणहून किल्ला पाहायला आलोय ही गोष्ट कळल्यामुळे बरेच लोक शोध मोहीमेत सामिल झाले थोड्या वेळाने कळाले की ज्या मास्तरांकडे चावी आहे ते दुसर्‍या गावाला गेले आहेत. मग शाळेतल्या दोन मुलांनी पुढाकर घेऊन दुसरा रस्ता दाखवायला ते आमच्या बरोबर आले. शाळेच्या पुढे गेल्यावर एका दर्ग्याकडे जाणारा रस्ता आहे. हाच किल्ल्याला जाणारा राजमार्ग होता. याठिकाणी अतिशय रुंद पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. या पायऱ्यानी वर चढून गेल्यावर आपण थेट किल्ल्याचा भव्य प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दारावर दोन बाजूला दोन शरभ, दोन कमळ कोरलेली आहेत. प्रवेशव्दारा समोर वरच्या बाजूला एक बुरुज आहे. प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी त्याची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रस्ता काटकोनात वळतो . याठिकाणी दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी कमानदार देवड्या आहेत . या देवड्यांच्या बाजूला प्रवेशव्दाराच्या समोरच्या बाजूला एक छोटा दरवाजा आहे. मुख्य दरवाजा बंद असताना त्याचा दिंडी दरवाजा म्हणून वापर होत असावा. शाळेच्या मागून येणारी वाट या छोट्या दरवाजातून येते. राजमार्ग असतानांही गावातले लोक आम्हाला त्या अवघड वाटेने का जायला सांगत होते त्यांनाच माहिती. आमच्या बरोबर आलेल्या शाळेतल्या मुलांनाही शाळेमागे असलेला किल्ला माहित नव्हता. ते किल्ल्यावर कधी आलेही नव्हते. किल्ल्यावर बाभळीच्या झाडीचे रान माजलेले आहे त्यातून फिरणे मुश्किल झालेले आहे. त्यामुळे इच्छा असूनही किल्ल्यावरील इतर अवशेष पाहाता आले नाहीत. किल्ल्याची अवस्था आणि गावकर्‍यांची नकारत्मकता बघून बाईट वाटले.

7) वल्लभगड  (vallabhgad)

Vallabhgad Fort

Entrance of Vallabhgad Fort

वल्लभगड मी ट्रेक क्षितिज सोबत २००७ साली पाहिला होता. त्यानंतर त्या किल्ल्याची माहिती साईटवर लिहिल्यावर वल्लभगडचे संवर्धन करणार्‍या गजानन साळुंखेंशी ओळख झाली. अजून आमची प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. त्यामुळे आज भेटता येईल आणि त्यांनी सातत्याने किल्ल्यावर केलेले काम पाहाता येईल म्हणून त्यांच्याशी सकाळीच संपर्क साधला. ते स्वत: तिथे नव्हते पण त्यांनी वल्लभगड किल्ल्यावर संवर्धन करणारे श्री महेश मिलगे यांना पाठवतो असे कळवले होते. किल्ल्याच्या पायथ्याशी भरदुपारी एक वाजता महेश आम्हाला भेटला. स्वत:चा व्यवसाय असलेला महेश गेली तीन वर्ष वल्लभगडावर खूप मेहनत घेतोय . आज जो वल्लभगडाचा चेहरामोहरा बदललाय त्याचे श्रेय महेश आणि टिमचे आहे . आदल्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन सकाळीच संकेश्वरला आला होता. केवळ किल्ल्यावरील प्रेमापोटी तो खास संकेशवरहून आला होता. गेल्या अनेक वर्षांच्या किल्ल्यांच्या भटकंतीत असे अनेक डोंगरभाऊ भेटलेत. किल्ल्यावरील प्रेम हाच आमच्यातला समान दुवा आहे आणि किल्ल्यासाठी काहीतरी करावे हिच माफ़क अपेक्षा आहे.

Well , Vallabhgad Fort

Separated bastion on Vallabhgad Fort 

Cave & Siddheshwar Temple at Vallabhgad Fort

महेशच्या मागून आम्ही निघालो किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर बुरुजाच्या बाजूला गावदेवी मरगुबाईचे मंदिर आहे. मंदिराच्या मागून पायवाटेने चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार गोमुखी बांधणीचे आहे. दोन भव्य बुरुजांच्या आड प्रवेशव्दार लपवलेले आहे. मुख्य प्रवेशद्वाराची कमान उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे विहिरीत उतरणारी पायर्‍यांची भव्य वाट कोरुन काढलेली आहे. पायर्‍या उतरुन आत गेल्यावर दगडात कोरलेल्या कमानीतून आपला बोगद्यात प्रवेश होतो. पुढे थोड्या पायर्‍या उतरल्यावर वरुन प्रकाश येण्यासाठी झरोका ठेवला आहे तिथपर्यंत पोहोचतो. पुढे  पहिली विहिर आहे. ही विहीर एका बोगद्याने दुसर्‍या मोठ्या विहिरीशी जोडलेली आहे. या दोन्ही विहीरी आणि भव्यता आणि खोली पाहाण्यासाठी आपल्याला पुन्हा पायर्‍या चढून वर यावे लागते. विहिरी पाहून पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला एक मुख्य तटबंदीपासून सुटा असलेला बुरुज पाहायला मिळतो. हा बुरुज पूर्णपणे झाडीत झाकला गेला होता. वल्लभगडाचे संवर्धन करणार्‍या शिलेदारांनी त्याला मोकळा श्वास दिला. त्यामुळे आज हा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे दोन बुरुज या किल्ल्यावर आहेत. दुसरा बुरुज किल्ल्याच्या पूर्व टोकावर आहे. किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील भागावर नजर ठेवण्यासाठी या सुट्या बुरुजांचा उपयोग होतो. किल्ल्याची तटबंदी ज्या ठिकाणी ढासळली आहे तेथे दुर्गवीर प्रतिष्ठानने त्याची डागडूजी केलेली आहे. फ़ांजीवरुन पुढे गेल्यावर तटबंदीतले दोन संडास पाहायला मिळतात. गडाच्या उत्तर टोकावर सुटा बुरुज आहे. तो पाहून माघारी फ़िरुन पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाजुने पुढे गेल्यावर पेशवेकालिन शंकराचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ तटबंदीतून खाली उतरणारी पायवाट आहे. या वाटेने खाली उतरल्यावर सिध्देश्वराची मोठी गुहा आहे. तिच्यात सिध्देश्वराचा मुखवटा आणि पादुका आहेत. गुहा पाहून परत गडावर येऊन पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. ते पूर्णपणे मातीने बुजलेले होते. त्यातील माती काढून ते पूर्णपणे मोकळे केलेले आहे. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम म्हणजे मेहनत, सातत्य आणि निष्ठा यांची परिक्षा पाहाणारे असते. तरीही अनेक संस्था स्वत:चे तन मन धन अर्पून हे काम करत असतात म्हणून आपल्याला आजही सुस्थितीतले किल्ले पाहायला मिळतात. वल्लभगड वेब पोर्टल आणि दुर्गवीर प्रतिष्ठान दरवर्षी किल्ल्यावर गुढीपाडवा आणि दसरा हे सण साजरे करते. दसर्‍याला रात्री किल्ल्यावर मशाली पेट्वून किल्ला उजळवून टाकतात. 

दसरा उत्सव, वल्लभगड, फ़ोटो सौजन्य:- गजानन साळुंखे

वल्लभगड संवर्धन, दुर्गवीर प्रतिष्ठान फ़ोटो, सौजन्य:- गजानन साळुंखे 

वल्लभगड पाहून झाल्यावर दोन दिवसात ७ किल्ले पाहाण्याचा आमचा संकल्प पूर्ण झाला. महेशचा निरोप घेऊन आम्ही मालवणच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. बेळगांवच्या आसपासचे हे सात किल्ले व्यवस्थित नियोजन केल्यास मुंबई आणि पुण्याहून दोन दिवसात पाहून होतात.

Honnur Village from Honnur Fort
Entrance Gate of Sada Fort.