Wednesday, May 6, 2020

ज्ञानेश्वरीतील पक्षी ( Birds in Dnyaneshawari )


लॉकडाउनला सुरुवात होण्या अगोदरच आमच्या लायब्ररीने प्रत्येकाला ५ पुस्तके एकदम न्यायची मुभा दिली होती . ती वाचण्यात लॉकडाउनचे पहिले पर्व संपले . तितक्यात लॉकडाउनचे दुसरे पर्व चालू झाले घरात न वाचलेली काही पुस्तक होती ती पुरवून वाचायचे ठरवले. मग सोबत ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. यापूर्वीही ज्ञानेश्वरी वाचली होती, पण यावेळी वाचताना त्यातील पक्षी, किटक आणि प्राणी असलेले श्लोक टिपून ठेवायचे ठरवल .  मागे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकात "संत साहित्यातील पक्षी" यावर लेख वाचला होता .  त्यात त्यांनी ज्ञानेश्वरीतील पक्ष्यांवरही लिहिले होते . त्यामुळे अर्थात हा विषय काही नवा नाही. या विषयावर यापूर्वीही लेख आलेले असतील कदाचित कोणीतरी पी.एच.डी. साठीही हा विषय घेतला असेल. त्यामुळे यावर लिहावे की, न लिहावे ?  या संभ्रमात मी होतो. त्यावर उत्तरही माउलींनी ज्ञानेश्वरीत देउन ठेवले होते.

पांख फुटे पाखिरु | नुडे तरी नभीच थिरु |
गगन क्रमी सत्वरु |  तो गरुडही तेथे  || १७१२||
राजहंसाचे चालणे | भूतळी आलिया शहाणे |
आणिक काय कोणे | चालवेचिना  || १७१३|| अ १८

वेगवान गरुड आकाशात भरारी मारतो तशीच नुकतेच पंख फुटलेल्या पक्ष्याच्या पिल्लाने त्याच आकाशात उडू नये की काय ?
जगात राजहंसाची चाल डौलदार आहे म्हणून इतर कोणी चालूच नये की काय ?

ज्ञानेश्वरीत वाचताना मला एकुण १७ पक्ष्यांचे संदर्भ मिळाले .

यात १८ वा संदर्भ हा पक्षी / विहंग / पाखरू हे शब्द वापरले त्या ओव्या आहेत .


ज्ञानेश्वरीतील पक्षी
अनु क्र. 
पक्ष्याचे नाव 
अध्याय (ओवी)

छायाचित्र
१)
चकोर (१६)
(Chukar partridge)
१(५६), १(२३१), ५(१०७), ६(२९), ६(४८५), ९(२३३,२३४), १०(४), ११(९६), १३(२७६), १३,(३२६), १३(६४२), १८(१३१३), १८(१५२०), १८(१६८७), १८(१७४८)  

२)
राजहंस / हंस (१२)
(Swan)
२(४), २(१२७), ६(१७७)हंस, ९(४४), ९(१४६)हंस, १३(३२५)हंस, १३(११४३), १४(२०७),  १५(२९६),  १६(१०९)हंस, १८(७९८)हंस,   १८(१७१३)

 
३)
वायस/ काऊळा/ कावळा/काऊ (११)
(Crow)
१(२५१), ३(१९८)वा, ४(२४), ६(२९)वा, ९(४३८), १५(१३५)वा, १६(२८५)वा, १७(३०१), १८(५५६), १८(६८२), १८(१४८८)वा

४)
शुक/पुंसा (१०)
(Rose-ringed parakeet)
६(७६), ६(१७६), ११(१७)पुं, ११(१०७)पुं, ११(१७०), १३(२४)पुं, १३(५५९), १३(११३७), १४(३८२), १८(३९३)

५)
गरुड (१०)
(Eagle)

१(१३८), २(२१६), ९(३०६), ९(३९२), १०(२४९), ११(३३), ११(१६७), १३(३९४), १५(२९५), १८(१७१२)

६)
चातक (६)
(Jacobin cuckoo)
९(२६३), १०(१८३), ११(६७९), १५(२०), १८(१३७७), १८(१४६८)


७)
मयुर/ मोर (५)
(Peacock)
६(१७८), १४(३१९) मो, १३(८३६), १८(३८४), १८(१५२०) मो

८)
कोकिळ (५)
(Koel)

१(२३०), ६(१७७), ६(४५०), ११(११३), १८(१५१९)

९)
बगळा (५)
(Little Egret)
११(१५६), १३(२४७), १८(४८०), १८(६५४), १८(७१७)

१०)
डुडुळ (घुबड) (४)
(Owl)
१४(२५१), १६(२३९), १८(३८५), १८(६८२)


११)
टिटिभू (टिटवी)(२)
(Red Wattled lapwing)
१(६८), १६(२३४)
१२)
सारस (२)
(Crane)
६(१७७), १८(७८५)


१३)
गिधाड (१)
(Vulture)
२(२००)






१४)
चक्रवाक (१)
(Brahminy duck)
१६(६)


१५)
ससाणा (१)
(Hawk)

१६(३४५)


१६)
ढिवर (१)
(Kingfisher)
१६(३१८)

१७)
पारवा/पारवी (१)
(Pigeon)
१८(३८३)


१८)
पक्षी/विहंग (८)
९(३३९), ११(२५८), ११(६३४), १२(१८१), १३(४००,४०१), १५(२८८), १९(१६८)


(१७) प्रकारचे पक्षी
(१०१) ओव्या


 *  सोळाव्या अध्यायात "तळे आटले की मासे पकडायला ढिवर जमा होतात" अशा अर्थाचा श्लोक आहे.

जै आटावे  होती जलचर। तै डोही मिळती ढिवर।
का पडावे होय शरीर । तै रोगा उदयो ॥३१८॥ अ. १६

या ठिकाणी ढिवर म्हणजे कोळी की ढिवर पक्षी (खंड्या (Kingfisher)) हे नक्की ठरवता आले नाही. कारण तळी किंवा ओढे आटून जेंव्हा छोटी छोटी डबकी तयार होतात तेंव्हा त्या ठिकाणी मासे पकडण्यासाठी ढिवर पक्षी सुध्दा (खंड्या (Kingfisher)) आलेले पाहायला मिळतात.

* चकोर हा उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याशी सापडणारा पक्षी सोडला तर बाकी दाखले दिलेले सर्व पक्षी आपल्या आजूबाजूला दिसणारे शेतकरी आणि सामान्य माणसाच्या नित्य परिचयातले आहेत .

* ससाण्या बद्दलचा उल्लेख माऊली कुठल्या संदर्भात करतात बघा

पाशिके पोती वागुरा | सुनी ससाणे चिकाटी खोचरा |
घेउनी निघती डोंगरा पारधी जैसे ||३४५ || अ १६

* पारधी (रानात ) डोंगरात शिकारीला जातात तेंव्हा सोबत पाश , पोती , जाळ्या , कुत्री , ससाणे,  भाले  इत्यादी साहित्य घेउन जातात .

* ज्ञानेश्वरांनी पोपटासाठी पुंसा आणि शुक हे दोन शब्द वापरले आहेत . पोपटाला नळीच्या साहाय्याने पारधी कसे पकडतात याचे (शुक नलिका न्याय) वर्णन सहाव्या अध्यायात तीन श्लोकात केलेले आहे .

* टिटवीचा संदर्भ देतांना माऊलींनी पंचतंत्रातील टिटवी आणि समुद्राच्या कथेचा संदर्भ देतात.

की टिटिभू चाचूंवरी । माप सुये सागरी ।
मी नेणतु त्यापरी। प्रव्ते येथ ॥३६८॥ अ.१


ज्ञानेश्वरीतील घुबड


* ज्ञानेश्वरीतील डुडुळ (म्हणजे घुबड ) शब्द असलेल्या ओव्या आलेल्या आहेत .

पैं आणिकही एक दिसे
जे दुष्कृतीं चित्त उल्हासे
आंधारी देखणें जैसें
डुडुळाचें १४-२५०


विश्वाचें आयुष्य जेणें उजळे
तो सूर्यु उदैला देखोनि सवळे
पापिया फुटती डोळे
डुडुळाचे १६-२३९

म्हणौनि उमपा आत्मयातें
देहचिवरी मविजे एथें
विचित्र काई रात्रि दिवसातें
डुडुळ करी ? १८-३८५

पैं द्राक्षरसा आम्ररसा
वेळे तोंड सडे वायसा
कां डोळे फुटती दिवसा
डुडुळाचे १८-६८२

या ओव्या वाचताना संस्कृत श्लोक आठवला .

यद्यमि तरणे : किरणै: सकलमिंद विश्वमुज्जलं विदघे |
तथापि पश्चति घूक: पुराकृत भ्युज्यते कर्म ||

(सूर्य किरणांनी सारे जग उजळून जाते , घुबड मात्र ते पाहू शकत नाही . हा त्याच्या पूर्व कर्माचा दोष आहे .)

घुबडाला आपल्याकडे उगाच बदनाम केलेले आहे. त्याच्या बद्दल अफ़वा, अंधश्रध्दाही भरपूर आहेत. खरतर घुबड हे लक्ष्मीचे वहान आहे. त्याबाबतची कथा अशी आहे. सृष्टीची निर्मिती केल्यावर एक दिवस सर्व देवी-देवता पृथ्वीवर आले. पशु पक्ष्यांनी त्यांना पृथ्वीवर पायी फिरताना पहिले तेव्हा त्यांनी देवांना विनंती केली, तुम्ही पृथ्वीवर पायी फ़िरु नका. आम्हाला वाहनाच्या रुपात निवडा. देवी देवतांनी त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आपल्या वाहनाच्या रुपात निवडायला सुरुवात केली. जेव्हा लक्ष्मीची पाळी आली तेव्हा तीने सांगितले की कार्तिक अमावास्येला मी पृथ्वीवर येईन, त्या दिवशी मी तुमच्यापैकी एकाला माझे वाहन बनवेन. कार्तिक अमावास्येच्या दिवशी सर्व पशु पक्षी लक्ष्मीच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते. रात्रीच्या वेळी जेव्हा लक्ष्मी पृथ्वीवर आली तेव्हा घुबडाने आपल्या तीक्ष्ण नजरेने तिला पहिले आणि तीव्र गतीने ते तिच्याजवळ पोहोचले आणि प्रार्थना केली की, मला तुमचे वाहन बनवा. तेव्हापासून घुबड लक्ष्मीचे वाहन आहे. तेव्हापासूनच लक्ष्मीला "उलूक वाहिनी" म्हटले जाते.



ग्रीक पुराणातली बुध्दीची (हुशारीची) देवी अथेना हिच्या जवळ घुबड दाखवलेले असते. आपल्या इथे आढळणार्‍या पिंगळा या लहान घुबडाचे इंग्रजी नाव यावरुनच Athena Brama असे आहे.  


Athena & Owl , Photo courtesy :- Wikipedia

या कथेत घुबडाची वैशिष्ट्ये अचूक पकडलेली आहेत. घुबडे निशाचर आहेत. रात्रीच्या काळोखात त्यांना चांगले दिसते आणि ते रात्री शिकार करतात. त्याचे मोठे डोळे आणि २७० अंशात फ़िरणारी मान (१३५ अंश दोन्ही बाजूला) यामुळे भक्ष्य पकडण्यासाठी घुबडे दृष्टि क्षमते बरोबर, ऐकण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतात. घुबडाचे कान एका सरळ रेषेत नसतात त्यामुळे त्याला अतिशय कमी आवाजही ऐकू येतात. मिट्ट काळोखात जमिनीवर वावरणार्‍या प्राण्यांच्या हालचालींमुळे होणाऱ्या सूक्ष्म आवाजाचा वेध घेऊन ती भक्ष्य पकडतात. अन्य भक्षक पक्ष्यांच्या तुलनेने घुबडे कमी वेगाने उडतात; परंतु ती वेगाने देखील उडू शकतात. घुबडाच्या पिसांच्या कडांची विशिष्ट दातेरी रचना असल्यामुळे त्यांच्या उडण्याचा आवाज कमी होतो. 

अशीच एक महाभारतातील सौप्तिक पर्वातील कथा आहे. श्लोक क्रमांक (10-1-36 ते 10-1-44) अश्वथामा , कृपाचार्य इत्यादी वनात (वडाच्या झाडाखाली) झोपलेले असतात. पांडवांचा नाश कसा करता येईल या विचारांनी अश्वथामा तळमळत असतो. त्याचवेळी झाडावर झोपलेल्या कावळ्यांच्या थव्यावर महाकाय घुबड हल्ला वेगाने पण गपचूप हल्ला करते आणि आपल्या तिक्ष्ण नख्यांनी कावळ्यांना फ़ाडून मारुन टाकते. झोपलेल्या कावळ्यांवर घुबडाने केलेला हल्ला पाहून अश्वथामाला पांडवांना निद्रिस्त असतांनाच मारता येईल ही कल्पना सूचते.   

सुप्तेषु तेषु काकेषु विस्रब्धेषु समन्ततः।
सोऽपश्यत्सहसा यान्तमुलूकं घोरदर्शनम्॥ 10-1-37(63982)

महास्वनं महाकायं हर्यक्षं बभ्रुपिङ्गलम्
सुतीक्ष्णघोणानखरं सुपर्णमिव वेगितम्॥ 10-1-38(63983)

सोऽथ शब्दं मृदुं कृत्वा लीयमान इवाण़्डजः।
न्यग्रोधस्य ततः साखां पातयामास भारत॥ 10-1-39(63984)

सन्निपत्य तु शाखायां न्यग्रोधस्य विहङ्गमः।
सुप्ताञ्जघान विस्रब्धान्वायसान्वायसान्तकः॥ 10-1-40(63985)

केषाञ्चिदच्छिनत्पक्षाञ्शिरांसि च चकर्त ह।
चरणांश्चैव केषाञ्चिद्बभञ्ज चरणायुधः॥ 10-1-41(63986)

क्षणेनाघ्नत्स बलवान्येऽस्य दृष्टिपथे स्थिताः॥ 10-1-42(63987)

तेषां शरीरावयवैः शरीरैश्च विशाम्पते।
न्यग्रोधमण्डलं सर्वं सञ्छन्नं पर्वतोपमम्॥ 10-1-43(63988)

तांस्तु हत्वा ततः काकान्कौशिको मुदितोऽभवत्।
प्रतिकृत्य यथाकामं शत्रूणां शत्रुसूदनः॥ 10-1-44

 या १० श्लोकांमध्ये  व्यासांनी घुबडासाठी उलुक, पिंगल (पिंगळा), कौशिक, वायसान्तक (कावळ्यांचा संहार करणारा) असे ४ पर्यायी शब्द वापरलेले आहेत. अनेकदा दिवसा कावळे आपल्याला घुबडाच्या मागे लागलेले दिसतात. तर घुबड रात्री कावळ्यांवर हल्ला करते. घुबड आणि कावळ्यांमध्ये शत्रुत्व (वायसान्तक) का असते याची एक कथा जातक कथे मध्ये वाचायला मिळते. गरुड हा पक्ष्यांचा राजा पण तो विष्णूचेही वाहान असल्यामुळे त्याला आपल्या प्रजेसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्व पक्षी घुबडाला आपला राजा बनवायचे ठरवतात. सल्ला घेण्यासाठी ते चौकस आणि हुशार कावळ्याकडे जातात. कावळा त्यांना विचारतो, अशा भयानक दिसणार्‍या , रात्री फ़िरणार्‍या कुरुप पक्ष्याला तुम्ही राजा का बनवता आहात? त्यामुळे पक्ष्यांचे मत बदलते आणि ते सभा घेऊन नवीन राजा निवडायचे ठरवतात. आपल्या राज्याभिषेकात विनाकारण विघ्न आणल्याने घुबड आणि कावळ्या मध्ये वैर सुरु झाले .

पंचतंत्रातही कावळे आणि घुबडांच्या वैरावर गोष्ट आहे . त्यात कावळे घुबडांवर कुरघोडी करतात. 

कवी हंसदेवाने अनुष्टुभ छंदात पशुपक्ष्यांचे रंग, रूप, आकार, सवयी याचा अभ्यास करुन 'मृगपक्षीशास्त्र' हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. यातील प्रथम खंडात १२७ पशूंची व द्वितीय खंडात ९७ पक्ष्यांची माहिती आहे.

वायसारति:  वायसद्वेषिणस्ते तु ये वायसविरोधीन: ||३४६॥ 

वायसांचा व्देष करणारे व त्यांचा नाश करणारे असल्याने (वायसारति - Barn Owl) हे त्यांचे नाव सार्थ ठरते. असा उल्लेख श्री मारुती चितमपल्ली यांनी "मृगपक्षिशास्त्र" या पुस्तकाच्या मराठी अनुवादात केलेला आहे. 

घुबड मोठ्या प्रमाणावर किटक, उंदीर, घुशी इत्यादी खाऊन ते माणसाला मदतच करते. महाराष्ट्रात १७ प्रकारची घुबडं आढळतात.  कोठी घुबड (Barn owl) , पिंगळा (Spotted Owlet / Athena Brama) आणि पिसांची शिंग असलेली हुमा घुबड (Spotted bellied Eagle-Owl) आणि शृंगी घुबड (Eurasian Eagle-Owl) ही आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. 


पिंगळा (Spotted Owlet / Athena Brama) P. C:- Rupak Pande

ज्ञानेश्वरीतील पक्षी यावर लिहीतांना घुबड या एकाच पक्ष्याचे इतके संदर्भ सापडत गेले. अजूनही नक्कीच असतील. घुबडासाठी ज्ञानेश्वरांनी जो "डुडुळ" हा शब्द वापरला आहे तो त्यानंतरच्या किंवा आधीच्या साहित्यात कोणी वापरला आहे का हेही शोधाता येईल.  

#dnyaneshawari#birdsindyaneshwari#birdsinmaharashatra#

Saturday, January 18, 2020

रडतोंडी घाट - पार घाट - प्रतापगड - मधुमकरंदगड - हातलोट घाट, जावळीच्या खोर्‍यातील भटकंती (Radtondi ghat, Par ghat, Pratapgad, Madhumakrandgad, Hatlot ghat)


रडतोंडी घाट
अफजलखानाचा वध हे शिवचरित्रातले एक रोमहर्षक प्रकरण आहे . लहानपणापासून विविध पुस्तकात , व्याख्यानातून ऐकून हे प्रकरण पक्के डोक्यात बसले होते. प्रतापगडच्या खाली जावळी खोर्‍यात लढलेली लढाई म्हणजे छ. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भूगोलाचा केलेला उत्तम उपयोग आहे. या लढाईचा भूगोल रडतोंडीचा घाट, पारघाट आणि प्रतापगड या तीन ठिकाणां भोवती फ़िरतो. त्यामुळे ही त्रिस्थळी भटकंती आणि सोबत मधुमकरंदगड आणि हातलोट घाट भटकंती करायचे पक्के केले.  

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही ६ जण रात्रभर प्रवास करुन पहाटे महाबळेश्वर - पोलादपूर रस्त्यावर महाबळेश्वर पासून  ६ किलोमीटरवर असलेल्या मेटतळे या गावी पोहोचलो . अजून अंधार होता . प्रवासाने अंग आंबले होते . आजचा पूर्ण दिवस धावपळीचा असणार होता त्यामुळे थोडावेळ झोप काढणे आवश्यक होते. मेटतळ्यातल्या कुंभळजाई मंदिराच्या ओसरीत पथार्‍या पसरल्या आणि स्लीपिंग बॅग मध्ये घुसलो . पण पहाटेची थंडी आणि स्लिपींग बॅग मध्ये शिरणारा  वारा यामुळे सगळे जण झोपण्याचा प्रयत्न करत होतो तोवर झुंजूमुंजू झाले . सगळ्यांना उठवून रस्त्यावरच्या एका हॉटेलात चहा नाश्ता करुन रस्त्याने पोलादपूरच्या दिशेने चालत निघालो. 

कुंभळजाई मंदिर, मेटतळे
गाव संपते तेथे सध्या ओंकार नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या पुढे रस्ता एक मोठे वळण घेतो . या वळणावरच डाव्या बाजूला  रडतोंडी घाटाचे सध्याचे तोंड आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेतून आपण रडतोंडी घाटात पाउल ठेवतो . दोन तीन मिनिटे दाट झाडी आणि अरुंद पायवाटेवरुन उतरल्यावर आम्ही  एका पठारावर पोहोचलो. येथून समोर प्रतापगड किल्ला आणि डाव्या बाजूला मधु मकरंदगड किल्ला दिसत होता. आज हे दोन्ही किल्ले पाहायचे होते . 

रडतोंडी घाटाचे तोंड 
पठारावरून पुढे रडतोंडी घाट एक बैलगाडी सहज जाईल इतका रुंद होता. घाट रस्त्याच्या दोन्ही बाजूला दगड एकमेकांवर रचून बनवलेल्या संरक्षक भिंती आजही पाहायला मिळतात. अफजलखानाला वाईतून जावळीत उतरणे सुलभ व्हावे याकरीता छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई ते जावळी मधल्या घाटवाटा झाडे तोडून रुंद केल्या होत्या आणि तोडलेली झाडे इतर वाटा, चोरवाटा बंद करण्यासाठी वापरली होती. या रुंद रस्त्यावर वरुन १० मिनिटे उतरल्यावर आम्ही जावळीच्या दाट जंगलात शिरलो. आजही तुरळक सूर्यप्रकाश शिरणार्‍या या जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती, फुले, फुलपाखरे पाहात घाट उतरायला सुरुवात केली. येथे जंगल दाट असले तरी घाटवाट अजूनही प्रशस्त आणि रुंद आहे . दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे आजही शाबूत आहेत . अर्थात जावळीच्या खोऱ्यात पडणाऱ्या महामूर पावसामुळे आणि सर्वभक्षी काळाने काही ठिकाणी आपला प्रभाव दाखवल्याने वाट अरुंद होते . मेटतळे पासून साधारणपणे तासभरात आम्ही सिमेंटने बांधलेल्या  मोठ्या  पाण्याच्या टाकी जवळ पोहोचलो . या टाकी जवळ एक समाधी आहे. त्यावर शिवपिंडी आणि पावले कोरलेली आहेत. ही समाधी अलिकडच्या काळातील असावी. टाकीच्या बाजूने जाणाऱ्या पायवाटेने आम्ही  घोघलवाडीत उतरलो.

 रुंद रडतोंडी घाट आणि दगडांच्या संरक्षक भिंती

रडतोंडी घाट

घोघलवाडी, समाधी
घोघलवाडीतील वस्तीकडे न जाता उजव्या बाजूला वळून डांबरी रस्त्याने पुढे गेल्यावर आम्ही ५ मिनिटात पार - चतुरबेट रस्त्यावर पोहोचलो. पुन्हा उजवीकडे वळून १० मिनिटात कोयना नदीवरील शिवकालीन पूलावर पोहोचलो . याठिकाणी असलेल्या पुलाचे मजबूतीकरण करताना त्यात कॉंक्रीटचा वापर केलेला आहे. पुलाला चार पाकळ्यांच्या आकाराच्या कमानी आहेत . नदीच्या प्रवाहाच्या दिशेला असलेल्या कमानीच्या प्रत्येक खांबा पुढे एक तिरकी भिंती बांधलेली आहे. या भिंतीमुळे पाण्याच्या प्रवाहाचा पूलाच्या खांबावर येणारा दाब कमी होतो . पुलाच्या दुसऱ्या टोकाला गणपतीचे मंदिर आहे .

कोयना नदीवरील शिवकालीन पूल, पार


गजाननाचे दर्शन घेऊन डांबरी सडकेने २ किलोमीटरवरील पार गाव गाठले. अफजलखाना बरोबर जावळीत उतरलेले १५,००० सैन्य या गावाच्या आजूबाजूला कोयना नदीच्या काठाने पसरलेले होते . तेथेच त्यांच्या छावण्या पडल्या होत्या. पार गावात जिर्णोध्दार केलेले पूरातन रामवरदायिनी मंदिर आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे. मंदिरात देवीची नवीन मुर्ती बसवलेली आहे. जुन्या झिजलेल्या मुर्ती, वीरगळ मंदिराच्या आवारात पाहायला मिळतात. मंदिरातून आणि गावातून प्रतापगड दिसतो. कोकणातून घाटावर जाणार्‍या प्राचीन पार घाटावर लक्ष ठेवण्यासाठी छ. शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्याची निर्मिती केली होती.

पार घाट मागे प्रतापगड


रामवरदायिनीचे दर्शन घेउन आम्ही मंदिरा समोरील टेकडीवर जाणारी वाट पकडली. गावातील घरांमधून जाणारा रस्ता टेकडीच्या पायथ्यापर्यंत जात होता. टेकडीच्या पायथ्याशी पाण्याची टाकी आहे. त्या टाकीतील पाणी पाईपातून प्रतापगडावर नेलेले आहे. पार घाटाच्या वाटनेच हे पाईप टाकलेले आहेत. त्यामुळे वाट चुकण्याची शक्यता नाही. टेकडीचा खडा चढ चढून १० मिनिटात माळरानावर आलो. दुपारच उन चांगलेच तापलेले होते. पटापट पाय उचलत झाडीत शिरलो. वाट अजूनही खड्या चढाईचीच होती, पण सावलीमुळे सुसह्य झाली. साधारण अर्ध्या तासात पायवाट एका कड्या जवळ आली तेथून प्रतापगडचे दर्शन झाले.  वाट संपली त्या ठिकाणी एक विहिर आहे . विहिरीच्या वरच्या बाजूला एकेकाळी बांधलेल्या सरकारी रेस्ट हाउसचे अवशेष आहेत. हे अवशेष पार केल्यावर अफझलखानाच्या कबरीपाशी पोहोचलो. अफ़जलखानाची कबर जेथे आहे त्याला जनीची टेंब किंवा छावणीचे टेंब म्हणतात. ही जागा एका बाजूने प्रतापगडाच्या डोंगराला जोडलेली आहे आणि इतर तीन बाजूंना दरी आहे. छावणीची जागा पार गावातून दिसत नाही, पण प्रतापगडावरुन त्यावर बारीक लक्ष ठेवता येते. अफ़जलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी त्यांच्या सैन्याची जी व्यूहरचना केली होती त्यासाठी या भागातल्या डोंगरसोंडा, घळी, घाटवाटा जंगले यांचा व्यवस्थित उपयोग केला होता. छावणीच्या टेंबेच्या खालच्या बाजूला असलेल्या डोंगरसोंडाच्या घळीत, जेधे, शिमळकर, पासलकर, बांदल यांचे सैन्य लपून बसले होते. प्रतापगडावर हल्ला झालाच तर त्याचा प्रतिकार हे सैन्य करणार होते. पारघाटात कोकणाच्या बाजूला मोरोपंत पिंगळे पायदळासह लपून बसले होते. घाटवाट रोखणे आणि तोफ़ेची इशारत होताच खानाच्या पार गावात कोयनेकाठी असलेल्या सैन्यावर चालून जाणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. आंबेनळी घाटात नेताजी पालकर आपल्या घोडदळासह लपून बसले होते. खानाच्या पार मधील घोडदळावर हल्ला करुन मग थेट वाईच्या छावणीवर हल्ला करायची जबाबदारी त्यांच्याकडे होती. रडतोंडी घाटात बाबाजी भोसले घोडदळासह लपून बसले होते. खानाच्या सैन्याने वाईकडे पळायचा प्रयत्न केल्यास त्यांना अडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. आज रडतोंडी घाट उतरुन पार घाटाने अफ़जलखानाच्या कबरी पर्यंत आल्यावर महाराजांनी केलेल्या या व्युहाची बर्‍यापैकी कल्पना आली. महाराजांच्या सैन्याने जावळीतून जाणार्‍या सर्व घाटवाटा ताब्यात घेतलेल्या होत्या. खानाच्या सैन्याची जावळीतून सुटका होण्याची शक्यताच नव्हती.  

अफ़जलची कबर, प्रतापगड

     अफ़जलच्या कबरी जवळ पोलिस बंदोबस्त असल्याने कबरीच्या खालच्या बाजूने वळसा घालून प्रतापगडाकडे गेलो. पार गावातून प्रतापगडावर पोहोचण्यास आम्हाला १ तास लागला. प्रतापगडावर अनेक वेळा येउन गेल्याने फक्त थंडगार ताक पिउन परतीचा मार्ग धरला . आल्या मार्गाने पारघाट उतरून पार गावात पोहोचलो .

प्रतापगड, पारघाटातून
रामवरदायिनी मंदिरात येउन मंदिराच्या परीसरातील एका झाडाखाली बसून आमच्या शिदोर्‍या सोडल्या . पोट भरल्यावर तिथेच मस्त ताणून द्यायचा मोह होत होता . पण आजचा पुढचा टप्पा मधुमकरंदगड अजून गाठायचा होता. चांगली झोप मिळाल्याने आमच्या गाडीचा चालक ताजातवाना झाला होता.


GPS ने रेकॉर्ड केलेली रडतोंडी घाट - शिवकालीन पूल - पारघाट भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर 

गाडीने तासभरात मधुमकरंदगडाच्या पायथ्याच्या चतुरबेट गावात पोहोचलो. गावाच्या पुढे एक कच्चा रस्ता गडाच्या माचीवरील घोणसपूर गावात जातो. दिड तासात घोणसपूर गाठले. मधु गडावर जाण्यासाठी वाटाड्या हवा होता, पण कोणी सापडले नाही .

मधुमकरंदगड
गावाच्या वरच्या अंगाला मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरात सामान टाकून गडाच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट पकडली . किल्ल्याचा चढ खडा आहे.  त्यातही हा भाग उघडा बोडका असल्याने उन्हाचा ताप जाणवत होता. प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो तेंव्हा सगळेच घामाने न्हाऊन निघालो होतो . येथे दगड फोडून किल्ल्याचे प्रवेशद्वार बनवलेले होते. त्यामुळे या प्रवेशव्दाराला नैसर्गिक संरक्षण मिळालेले होते. प्रवेशव्दारातून गडावर प्रवेश केल्यावर एक वाट किल्ल्याच्या माथ्यावर जाते तर उजवीकडे जाणारी वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून किल्ल्याच्या मागच्या बाजूला जाते . चढाई करुन सगळे थकले होते त्यामुळे प्रथम सपाटीने सावलीतून जाणारी वाट पकडली.  या वाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर किल्ल्याच्या पिछाडीला असलेल्या मोठ्या खांब टाक्यापाशी पोहोचलो . या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य नाही आहे. खांबटाके पाहून आलो त्या मार्गाने परत फ़िरलो, खांबटाक्या जवळच गडमाथ्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसल्या. या पायऱ्या ठिकठिकाणी मोडलेल्या आहेत त्यावरुन जपून चढत गडमाथ्यावर पोहोचलो.  गडमाथ्यावर मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिरा बाहेर उघड्यावर नंदी आहे . मंदिराच्या समोरच्या बाजूला एक उध्वस्त वास्तूचा चौथरा आहे . त्या चौथऱ्यावर वास्तूचे दगड वापरुन एक समाधी बनवलेली आहे . मंदिराच्या मागच्या बाजूला कोणतेही अवशेष नाहीत .मकरंदगडावरुन महाबळेश्वरचा डोंगर, चकदेव, पर्वत, मधुगड , रसाळ, सुमार आणि महिपतगड हे किल्ले दिसतात .

मल्लिकार्जुन मंदिर, मधुमकरंदगड

खांबटाके, मधुमकरंदगड

दगडातला बोगदा , मधुमकरंदगड
मकरंदगडाच्या माथ्यावरुन उतरण्यासाठी मळलेली वाट आहे. या वाटेने उतरताना मध्ये एक वेगळाच दगड पाहायला मिळला. पाणी आणि वाऱ्यामुळे या दगडाची झीज होवून त्यातून आरपार बोगदा तयार झालेला आहे. येथून खाली उतरल्यावर गडाच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचलो. या ठिकाणी डावीकडे वळून डोंगराच्या कडेने जाणाऱ्या वाटेने चालत जाताना उजव्या बाजूला एक सुकलेले टाके दिसले.  पायवाटेने पुढे निघालो. वाटेवर गवत फार माजले होते. सूर्यास्ताची वेळ पण झाली होती. आज मधु गडावर पोहोचता येणार नाही याची जाणीव झाली. त्यामुळे परत फिरलो. मल्लिकार्जुन मंदिराच्या आसपास पाणी नाही. त्यामुळे सर्व सामान घेउन गावात गेलो. गड चढताना जंगमकाका भेटले होते. त्यांच्या घरी गेलो मस्त स्वच्छ सारवलेले अंगण होते. बाजूलाच शेतात काळा घेवडा लावलेला होता . शेताच्या कडेला उघड्यावर बाथरुम आणि चोवीस तास पाणी असलेला नळ होता. अंधार पडल्याने थंडीही वाजायला लागली होती. पण दिवसभरचा थकवा घालवण्यासाठी थंड पाण्याने आंघोळ करायची मनाची तयारी केली. हे पाहील्यावर जंगमकाकांनी चुलीवर गरम करुन पाणी आणून दिले. जेवणासाठीही त्यांची चूल वापरण्याची परवानगी दिली. गरमागरम खिचडी खाऊन त्यांच्या अंगणातच झोपायचे ठरवले होते भरल्या पोटी पुन्हा सर्व सामान घेउन मल्लिकार्जुन मंदिराकडे जायचा कंटाळा आला होता. आम्ही अंगणात झोपतोय बघून जंगमकाकानी आम्हाला ओसरीत झोपायला सांगितले. रात्री दव पडत असल्याने अंगणात झोपू नका अस त्यांचे म्हणणे होते. आम्ही सुध्दा आयत्या मिळालेल्या ओसरीत हातपाय पसरले. 

जंगमकाकां बरोबर ओसरीवर गप्पांचा फड जमवला. घोणसपूर गावात जंगम लोकांची वस्ती आहे. हे जंगम लोक जावळी परीसरातील अनेक घराण्यांचे पिढीजात पुजारी आहेत . त्यामुळे गाव पूर्णपणे शाकाहारी आहे . गावात गायी गुरे आहेत पण कोंबड्या पाळत नाही . गावात आणि देवळात मांसाहार करण्यास बंदी आहे . तसा फलक मल्लिकार्जुन मंदिराजवळ लावलेला आहे . गावाची लोकसंख्या ४०० आहे पण गावात सध्या ४० लोकच राहातात . बाकीचे शिक्षण, नोकरी धंद्या निमित्ताने मुंबई पुण्याला असतात . गावात राहाणार्‍यांचे जीवन कष्टमय आहे. गावात चौथीपर्यंत शाळा आहे. पुढच्या शिक्षणासाठी मुलांना रोज अडीच तास चालत डोंगर उतरुन जावे लागते. कुठलीही वस्तू, डॉक्टरसाठी महाबळेश्वर गाठावे लागते. पण गावातली लोक मेहनती आणि आनंदी आहेत. चतुरबेट ते घोणसपूर हा रस्ता गावातल्या लोकांनीच श्रमदानातून बनवलेला आहे. त्यातला काही भाग वनजमिनीतून जात असल्याने पक्का रस्ता होत नाही. गावात १२ महिने २४ तास झऱ्यांचे पाणी आहे. तेच पाईपातून सर्व घरात खेळवलेले आहे .

मधुमकरंदगड ते हातलोट गाव 

मधुमकरंदगड ते हातलोट गाव 
दुसर्‍या दिवशी सकाळी मधुगडावर आमच्या सोबत येण्याचा काकांना आग्रह केला. पण गवत खूप माजले आहे आणि वाट मोडल्यामुळे रोपची आवश्यकता आहे असे त्यांनी सांगितले. त्यामुळे मधुगडावर न जाता थेट हातलोट गावात उतरण्याचे ठरवले. दिवसभरच्या पायपीटीमुळे स्लीपिंग बॅग मध्ये शिरल्या शिरल्या डोळा लागला . सकाळी ४ वाजण्याच्या आसपास थंडीने जाग आली . सगळेच चुळबुळ करत होते . घराच्या बंदिस्त ओसरीवर थंडीने ही हालत केल्याने मल्लिकार्जुन मंदिरात न जाण्याचा निर्णय योग्य होता याची खात्री पटली. सकाळी सहाचा गजर वाजला पण कोणी स्लीपिंग बॅगेच्या बाहेर पडायला बघत नव्हते. शेवटी नाईलाजाने एकेकजण उठला. मॅगी आणि चहा पिउन ८ वाजता वाटेला लागलो. मल्लिकार्जुन मंदिरा मागून जाणारी ठळक पायवाट हातलोट गावात जाते. वाटेवर दाट जंगल आहे. त्यामुळे सकाळच्या प्रसन्न वातावरणात सगळे जण झपाझप चालत तासभरात हातलोट गावात उतरलो . गावाच्या मधून जाणाऱ्या ओढ्यावर पक्का पूल आहे तो ओलांडून पलीकडे आल्यावर तेथे आमचा चक्रधारी गाडी घेउन उभा होता. गाडीत सामान टाकले. पाठपिशव्या आवश्यक सामानाने आणि पाण्याने भरुन घेतल्या . हातलोट घाटाने आम्ही कोकणातील खेड पासून ३५ किलोमीटरवर असणाऱ्या बिरमणी गावात उतरणार होतो . आमच्या चक्रधारीला तिथे कसे पोहोचायचे ते समजवून सांगितले. त्याला हातलोट - पोलादपूर - कशेडी घाट - भऱणा नाका - बिरमणी या मार्गे वळसा घालून यायचे होते . तर आम्ही घाटावरुन थेट बिरमणी गावात उतरणार होतो.  या भागात अजून एक बिरमणी गाव आहे. गुगल मॅपवर बिरमणी टाकल्यावर हेच गाव दिसते. पण हे बिरमणी गाव सातारा जिल्ह्यात हातलोटच्या जवळ आहे. त्याला स्थानिक लोक "वरची बिरमणी" आणि "कोकणातल्या बिरमणीला "खालची बिरमणी’ म्हणतात.

हातलोट गाव ते घाटमाथा, हातलोट घाट 
गावातील सर्व लोक कामावर गेल्यामुळे गावातून रस्ता दाखवायला कोणी मिळत नव्हते . शेवटी श्री अंबरे घाटमाथ्यापर्यंत यायला तयार झाले. ओढ्याच्या काठाने घाटमाथ्यापर्यंत रस्ता बनवायचे काम मायबाप सरकारने कधीकाळी चालू केलेले. ते बंद पडून आता त्यावर रान माजलय. या रस्त्याने चालायला सुरुवात केली. अर्ध्या तासाने एक ओढा ओलांडला. पुढे दुसरा ओढा ओलांडल्यावर पाण्याची टाकी दिसली. त्यातून गावाला पाणीपुरवठा होतो . पुढे रस्त्याने चालत गेल्यावर मराविमचा ट्रांसफॉर्मर आहे. तेथे डाव्या बाजूला झाडीत समाधीचा दगड आहे. त्यावर सूर्य चंद्र कोरलेले आहेत. बाकीचे कोरीवकाम अस्पष्ट झालेले आहे. या ठिकाणी कच्चा रस्ता सोडून पायवाटेने ओढा ओलांडून डाव्या बाजूच्या खिंडीच्या दिशेने चालत निघालो. हातलोट गावापासून खिंडीत पोहोचायला एक तास लागला. या खिंडीत एक पाण्याचे टाक आहे. पण त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या जवळ काही कोरलेल्या पायऱ्या आहेत . येथून दोन डोंगरा मधील नाळेतून उतरायचे होते. आंब्रेकाका इथून आमचा निरोप घेणार होते त्यामुळे पुढची वाट दाखवण्यासाठी त्यांनी आम्हाला बाजूच्या डोंगरावर नेले. तिथून खाली घनदाट जंगल दिसत होते. नाळेतून उतरुन खाली आल्यावर डावीकडे जायचे होते. चूकूनही उजवीकडे जाऊ नका नाहीतर जंगलात हरवाल असे काकांनी दोनदा बजावून सांगितले. चालताना आवाज करत /गप्पा मारत जा कारण या भागात जंगली जनावरांचा वावर आहे. 

समाधी, हातलोट घाट

टाकं, हातलोट घाट 
आंब्रेकाकांचा निरोप घेऊन हातलोट घाट उतरायला सुरुवात केली. मधुमकरंदगडा मागच्या डोंगररांगेत उगम पावणारी जगबुडी नदी खेड या व्यापारी मार्गावर असणार्‍या प्राचीन गावाजवळून वाहाते आणि पुढे वाशिष्टी नदीला मिळते. वाशिष्टी नदी दाभोळ जवळ समुद्राला मिळते. दाभोळ हे प्राचीन बंदर आहे. तसेच वाशिष्टी नदीला मिळाणार्‍या कोडजाई नदीवर पन्हाळेकाजी हे प्राचीन बंदर आहे. या दोन्ही बंदरात उतरणारा माल व्यापारी मार्गाने खेड - हातलोट घाट मार्गे घाटमाथ्यावर जात असे. पन्हाळेकाजी आणि खेड जवळील लेणी तसेच जगबुडी नदीच्या खोर्‍यावर नजर ठेऊन असलेले रसाळगड, सुमारगड, महिपतगड हे किल्ले आणि घाट माथ्यावरील मधुमकरंदगड प्राचीन व्यापारी मार्ग अधोरेखित करतात. आजही हातलोट घाट थोड्याफ़ार प्रमाणात वापरात आहे. घाटावरचे धनगर आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन याच घाटमार्गाने कोकणात उतरतात.

दगड आणि दगडच, हातलोट घाट 

हातलोट घाटाच्या सुरवातीला असलेल्या नाळेच्या दोन्ही बाजुला उंच डोंगर आहेत. या डोंगरावरुन दरवर्षी पडणार्‍या दगडांनी नाळेतील वाट बिकट केलेली आहे. आम्ही दगड धोंड्यातून उतरायला सुरुवात केली . ही वाट फारशी वापरात नसल्याने प्रत्येक हलणार्‍या दगडावर जपून पाय ठेवत चाचपून पुढे जाव लागत होते . त्यामुळे सर्वांचा वेग कमी झाला होता . समाधानाची गोष्ट म्हणजे पूर्ण वाटेवर दाट जंगल आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता. उतरताना दिड तास होवून गेला तरी उतार आणि दगड संपायला तयार नव्हते . पण बऱ्यापैकी खाली उतरलो होतो कारण आता एक ओढा आमची सोबत करत होता. हा ओढा दोनदा ओलांडावा लागला . ओढा ओलांडल्यावर वाट हरवायची त्या ठिकाणी कोणीतरी दगडांची लगोरी रचून ठेवलेली असे. ती शोधतच आम्ही पुढे जात होतो . साधारणपणे २ तासाने सपाटीवर पोहोचलो . याठिकाणी डावीकडची वाट पकडायची होती . पण दाट झाडी आणि उंच गवतामुळे डावीकडे वळणारी वाट दिसेना. त्यामुळे ठळक पायवाट पकडून पुढे निघालो पण ती पायवाट जंगलात शिरली. आपण वाट चुकून भलतीकडेच जातोय हे आम्हाला थोड्या वेळात लक्षात आले. त्यामुळे मागे फ़िरुन एका आंब्याच्या झाडाखाली सर्वजण थांबलो. सगळ्यांनी फ़िरुन शक्ती वाया घालवण्यापेक्षा दोन जणांनी उजवीकडे आणि दोन जणांनी डावीकडे १५ मिनिटे वाट शोधून परत याच ठिकाणी यावे असे ठरवले. उजवीकडे जाणारी वाट जंगलात चालली होती. डावीकडच्या वाटेवर १० मिनिटात शेतासाठी बांधलेले बांध दिसायला लागले. बर्‍याच वर्षापूर्वी इथे शेती करणे सोडून दिले होते. पण गाव जवळ असल्याची ही खूण होती. त्यामुळे सर्वांनी डोंगर उतारावर असलेल्या शेतांमधून खाली उतरायचे ठरवले. अर्ध अंतर उतरुन गेल्यावर समोरच्या झाडीत दोन घरे दिसली त्यामुळे हुरुप आला आणि ५ मिनिटात आम्ही जगबुडी नदीवरील पुला समोर उभे होतो. पूल ओलांडून आम्ही बिरमणी गावात पोहोचलो. घाटमाथा ते बिरमणी गाव अंतर कापायला आम्हाला अडीच तास लागले होते (चुकल्यामुळे अर्धा तास गेला). मधुमकरंदगडा वरुन बिरमाणी पर्यंत चार साडेचार तासात आम्ही ४००० फ़ूट उतरुन आलो होतो.

जंगलात हरवलेली वाट, हातलोट घाट

दोन दिवसात जावळीच्या खोर्‍यात मस्त तंगडतोड भटकंती झाली. दिवसा उन्हामुळे घामाघूम आणि रात्री कडाक्याची थंडी असा दोन टोकाचा अनुभव घेतला. जावळीच्या खोर्‍याची विविध रुप पाहायला मिळाली. 

जगबुडी नदीवरील पुल, बिरमणी
GPS ने रेकॉर्ड केलेली चतुरबेट - मधुमकरंदगड - हातलोट घाट - बिरमणी भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर 

रडतोंडी घाट - पारचा शिवकालिन पूल - पार घाट - प्रतापगड हा अर्ध्या दिवसाचा सुंदर ट्रेक आहे. यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही. 

चतुरबेट - मधुमकरंदगड - हातलोट गाव  हा ट्रेकही सोपा आहे.  यासाठी वाटाड्याची आवश्यकता नाही.  

हातलोट गाव - हातलोट घाट - बिरमणी हा ट्रेक मध्यम स्वरुपाचा आहे. यात वाट चुकण्याची शक्यता असल्याने वाटाड्या सोबत घ्यावा. पावसाळ्यात या भागात जळवा असतात.

बिरमणीहून खेड करीता एसटी बस सकाळी ११.०० आणि संध्याकाळी ६.०० (मुक्कामी) आहे. बिरमणीहून ५ किलोमीटर चालत आल्यावर आपण खेड - वडगाव रस्त्यावर पोहोचतो. याठिकाणी खेड - वडगाव मार्गावर धावणार्‍या बस मिळतात. खेड ते बिरमणी अंतर ३५ किलोमीटर आहे.
 


चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती, One day trek near Mumbai, Nashik) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.



#madhumakrandgad#pratapgad#radtondighat#parghat#shivkalinpul#par#pratapgad#hatlotghat#