 |
Indian Sailor Home, Mumbai |
मुंबईतील मस्जिद स्टेशन हे तिथे असलेल्या वेगवेगळ्या मार्केटसाठी प्रसिध्द आहे. या कायम गजबजलेल्या मस्जिद स्टेशन जवळ इसविसन १९३१ मध्ये इंग्रजानी खलाशांसाठी बांधलेली इंडियन सेलर होम ही वास्तू आजही वापरात आहे आणि त्यात असलेले पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या खलाशांचे स्मारक उत्तम स्थितीत ठेवलेले आहे. ब्रिटिश रॉयल नेव्हीने आशियात अशा प्रकारची दोन स्मारके बांधलेली आहेत. त्यापैकी एक हॉंगकॉंगला आहे. त्यात चायनीज खलाशांचे स्मारक आहे, तर दुसरे स्मारक आपल्या मुंबईत इंडीयन सेलर होम मध्ये आहे. त्यात हिंदुस्थानी, ब्रिटीश आणि अफ़्रिकन खलाशांचे स्मारक आहे.
 |
Indian Sailor Home Building since1931 |
 |
Dome , Indian Sailor Home |
अठराव्या शतकात इंग्रजानी मुंबईचा बंदर म्हणून विकास सुरु केला. त्यावेळी जहाजावर जाणाऱ्या आणि जहाजावरून येणाऱ्या खलाशांसाठी, सैनिकांना त्यांच्या पुढच्या प्रवासाला जाण्यापूर्वी राहण्यासाठी तात्पुरती सोय म्हणून सेलर होम बांधण्यात आले होते. Royal alfred Sailors Home ही वास्तू (सध्याचे पोलिस मुख्यालय) बडोदा नरेशांनी बांधली होती. इसवीसन १९३१ मध्ये इंग्रजांनी सेलर होम आणि पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या खलाशांची आणि सैनिकांची स्मृती कायम ठेवण्यासाठी मस्जिद बंदर याठिकाणी एक कायम स्वरुपी स्मारक बनवले. यालाच आता इंडीयन सेलर होम या नावाने ओळखले जाते.
 |
गॅसच्या दिव्याचा खांब |
मस्जिद स्टेशनला कल्याण दिशेला असलेला पूल चढूनवर गेल्यावर आपण वाहनांच्या पुलावर येतो. या पुलाच्या मुंबई पोर्ट ट्र्स्टच्या बाजूच्या कोपऱ्यात इसविसन १८६७ मध्ये पोलादात ओतलेले एक शिल्प आहे. इसवीसन १८४३ पासून मुंबईतल्या ठराविक ठिकाणी केरोसिनवर चालणारे दिवे होते. १८६२ मध्ये मुंबईत लालबाग येथे बॉम्बे गॅस कंपनीची स्थापना झाली.आजही लालबग मध्ये गॅस कंपनी लेन आहे. १८६५ मध्ये आर्थर क्रॉफ़र्ड या पहिल्या म्युनिसिपल कमिशनरने मुंबईत मस्जिद, भेंडीबाजार, चर्चगेट, एस्पलनेड इयादी अनेक ठिकाणी गॅसचे दिवे बसवले. हे दिवे पेटवण्यासाठी काम करणार्या लोकांना "लायटर" म्हणत. पुढिल काळात बेस्ट ( बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय आणि ट्रामवेज) या कंपनीने रस्त्यावर इलेक्ट्रिकचे दिवे बसवले. ते चालू बंद करणार्या लोकांना "लायटर"च म्हटले जात असे. आजही मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमामध्ये (BEST) लायटर विभाग आहे.
 |
गॅसच्या दिव्याचा खांब १८६७ |
मस्जिदच्या पुलावर असलेला गॅस लाईटचा पोलादात ओतलेला खांब एखादे शिल्प असावे असा सुंदर आहे. त्याच्या बाजूला एक मंदिर बांधल्यामुळे त्याला केशरी ऑइलपेन्ट लावून रंगवण्यात आलेले आहे. हे शिल्प पाहून पूल ओलांडून दुसऱ्या बाजूला असलेल्या पायऱ्या उतरल्यावर आपण वेगळ्याच भागात आल्याचा भास होतो. मस्जिद स्टेशन जवळ असलेली गर्दी त्यातून वाट काढणारी वाहन, सामानांनी भरलेल्या हातगाड्या या सगळ्यांचा संमिश्र गोंगाट यापासून पूर्ण वेगळा शांत असा हा भाग आहे. या भागात भांडूप स्ट्रीट, कुर्ला स्ट्रीट, ठाणा स्ट्रीट इत्यादी मुंबईच्या उपनगराच्या नावाने असलेले रस्ते आहेत. ब्रीजपासून ५ मिनिटे चालत गेल्यावर ठाणा स्ट्रीट आणि एमबीएस स्ट्रीट हे दोन रस्ते जेथे मिळतात त्या कोपर्यावर एक गोल घुमट असलेली इमारत दिसते. या घुमटाच्या बाहेरच्या भिंतीवर खालच्या बाजूला, इसविसन १४ जानेवारी १९३१ रोजी "His excellency Sir Fedrick huge Skyes" यांनी बसवलेली या इमारतीची कोनशीला आहे.


इंडीयन सेलर होम ही इमारत इंडीयन सेलर सोसायटीच्या अख्यातरीत असल्याने MSF ची सिक्युरिटी आहे. पण परवानगी घेऊन स्मारक पाहाता येते. इमारतीच्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर, इमारतीचा आकार जहाजाच्या नाकासारखा (टोका) सारखा बनवलेला पाहायला मिळतो. या दोन इमारती जेथे मिळतात त्याठिकाणी गोलाकार हॉल बांधलेला आहे. त्यावर घुमट बांधलेला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या खलाशांची आणि सैनिकांचे स्मारक या गोलाकर हॉल मध्ये आहे.
 |
जहाजाच्या नाकासारखा आकार |
 |
जहाज आणि लाटा, नक्षीदार चौकट |
या गोलाकार हॉलचे लाकडात कोरलेले दार आणि त्याची नक्षीदार चौकट पहाण्यासारखी आहे. त्यावरही समुद्राच्या लाटा आणि बोटीचा पुढचा भाग कोरलेला आहे. हॉलच्या जमिनीवर होकायंत्र (compass ) बनवलेल आहे. त्यात उत्तर दिशा सोनेरी रंगाने दाखवलेली आहे. घुमटावर सूर्य आणि त्यामध्ये तारा काढलेले आहेत. त्यावर " Heaven light our Guide" असे लिहिलेले आहे. होकायंत्र आणि सूर्य, तारे यांचा उपयोग खलाशांना दिशा समजण्यासाठी आजही होतो. या गोलाकार हॉलच्या घुमटामध्ये तीन खिडक्या आहेत. त्यांची रचना अशा प्रकारे केली आहे की, त्यातून येणारा सूर्यप्रकाश घुमटाच्या छतावर असलेल्या सूर्य आणि ताऱ्याच्या शिल्पावर पडेल. त्यामुळे ते शिल्प सूर्यप्रकाशाने उजळते. या गोलाकार हॉलच्या भिंतीवर पितळेच्या फलकावर (Bronze board ) पहिल्या महायुद्धात हुतात्मा झालेल्या २२२३ खलाशांची आणि त्यांच्या जहाजांची नावे कोरलेली आहेत.
 |
जमिनी वरिल होकायंत्र |
 |
छतावरील सूर्य आणि तारा |
हॉलच्या मधोमध एक शिसवी टेबल आहे. त्या टेबलच्यावर काचेच्या कपाटात एक सोनेरी किनार असलेले रजिस्टर ठेवलेले आहेत. या रजिस्टर मध्ये दुसऱ्या महायुद्धात मरण पावलेल्या ६५३१ खलाशांची नाव लिहिलेली आहेत. त्यात वरच्या बाजूला जहाजाचे नाव व त्याखाली खलाशाचे नाव, पद आणि हुतात्मा झाल्याची तारीख लिहिलेली आहे. आपल्या पूर्वजांची नाव शोधत अनेक जण आजही इथे येतात. या टेबलाच्या ड्रॉवर खाली असलेल्या ब्रासच्या प्लेटवर "Sailor and Merchant seamen who died in the service of the motherland and have no grave but the sea." असे कोरलेले आहे.
 |
पहिल्या महयुध्दातील शहीद खलाशांची नाव |
 |
रजिस्टर आणि शहीद खलाशांची नाव |
या ठिकाणी अजून दोन पुस्तक पाहायला मिळतात. त्यातील एक पुस्तक The war Dead of Common wealth, Bombay (St. Thomas) Cathedral Memorial, Bombay Sewri Cemetry हे २१ फ़ेब्रुवारी २०१२ रोजी प्रकाशित झालेले पुस्तक आहे. यात Indiam Merchant Navy मध्ये काम करतांना पहिल्या आणि दुसर्या महायुध्दात शहीद झालेल्या खलाशांची नाव आहेत. दुसर पुस्तक आहे. The war Dead of Common wealth Bombay / Chitgong war Memorials दुसर्या महायुध्दात शहीद झालेल्या भारतीय आणि बांगलादेशी खलाशांची नाव आहेत.
या इमारतीत असलेल्या खोल्यांमध्ये आजही ३०० जणांची राहण्याची सोय आहे. रस्त्याच्या पलीकडे १९४६ साली बांधलेली अजून एक इमारत आहे त्यात ७०० खलाशांची रहाण्याची सोय आहे. या इमारतींमध्ये कॅन्टीन, जीम, दवाखाना,योग सभागृह, बैठे खेळ इत्यादी सोई आहेत.
दरवर्षी ५ एप्रिल रोजी नॅशनल मेरीटाईम दिनानिमित्त याठिकाणी कार्यक्रम आयोजित केला जातो. ९४ वर्ष जुने असलेल मुंबईतले हे अपरिचित स्मारक नक्कीच पाहाण्यासारखे आहे.
Photos by :- Amit Samant © Copy right
विशेष आभार :- प्रकाश सामंत
* कोटातला बालाजी ( Balaji Temple in Fort,Mumbai) हा अपरिचित मुंबई वरिल ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा...