![]() |
| ५ कोटी वर्षापुर्वीच्या मगरीचे जीवाश्म |
अमेरीकेतील
प्रसिध्द यल्लो स्टोन नॅशनल पार्क पा्हून परतीच्या प्रवासात वेगळ, नवीन काही पाहायला मिळेल का हे शोधत असतांना "फॉसिल ब्युट नॅशनल
मोन्युमेंट" (Fossil Butt National Monument) सापडले. २०
लाख वर्षांपेक्षा जास्त काळ अस्तित्वात असलेल्या फॉसिल लेक सरोवराच्या उथळ भागात
आणि खोल पाण्यात विविध प्रकारचे मासे राहत होते. सरोवराचे किनारे मगरींनी गजबजलेले
होते, जमिनीवर आदिमानवसदृश प्राणी (primates) आणि कुत्र्यांच्या आकाराचे घोडे वावरत असत, तर पक्षी
आणि वटवाघुळे आकाशात भरारी घेत असत. हवामानातील बदल , भूगर्भाची
हालचाल यामुळे सरोवर कालांतराने कोरडे पडल्यामुळे हे दृश्य आता नाहीसे झाले आहे.
परंतु, लाखो
वर्षापूर्वी या भागात नांदणार्या हजारो जीवांची “जीवाश्म”
या ठिकाणी सापडतात. जगातील अनेक दुर्मिळ जीवाश्म या भागात सापडलेली
आहेत. त्यामुळे जीवाश्म पाहण्यासाठी हे जगातील एक महत्वाचे ठिकाण मानले जाते.
यल्लो स्टोनहून गुळगुळीत हायवे वरुन ३ तास सुसाट प्रवास करुन फॉसिल ब्युट नॅशनल मोन्युमेंटकडे जाणार्या वळण रस्त्यावरुन खाली उतरल्यावर एकदम दृश्य बदललं, रस्ता छोटा आणि खडबडीत झाला होता. हॉरर हॉलिवूडपटात नायकाची गाडी अशीच आडरस्त्याला लागते आणि पुढे अनेक घडामोडी घडतात अशा प्रकारचे अनेक सिनेमे पाहीले होते त्यांची आठवण व्हावी असा सुनसान प्रदेश होता, दूरदूरवर वस्तीचे किंवा मनुष्य प्राण्याचे अस्तित्व नव्हते. रस्त्यावर एकही गाडी दिसत नव्हती. खुरटी झुडुपे आणि छोट्या टेकड्या असलेला आजूबाजूचा वैराण परिसर पाहाता याठिकाणी नक्की नॅशनल मोन्युमेंट आहे ना? असा प्रश्न कोणाच्याही मनात येणे साहाजीकच होते, पण माझ्या बरोबर गाडीत असणारे सर्वजण निवांत होते , कारण यापूर्वीही आम्ही अनेक offbeat ठिकाण हुडकून काढून आणि तिथे जाऊन आलो होतो.
पुन्हा एक वळण आले आणि तिथे फॉसिल ब्युट नॅशनल
मोन्युमेंटची मोठी पाटी आणि माहिती फलक होता. खरतर हे ठिकाण गुगलवर शोधल्यापासून आम्ही त्याचा उच्चार
फॉसिल “बट" असाच करत होतो आणि "बट" या
शब्दावर अडखळत होतो. आमच्या सारखी इतरांचीही गत होत असणार म्हणून पहिल्याच पाटीवर
"Butte (Noun) :- An isolated flat topped hill with steep slides
(Pronounce as first 4 letters of Beautiful. अस स्पष्ट लिहिले
होते. पाटीच्या मागे दूरवर जीवाश्म सापडतात तो तीव्र उतार असलेला डोंगर दिसत होता.
त्या डोंगरावर जाण्यापूर्वी आम्ही म्युझियमकडे आमचा मोर्चा वळवला.
![]() |
| ५ कोटी वर्षांपूर्वी फॉसिल लेक (नकाशा) |
५
कोटी (५० दशलक्ष) वर्षांपूर्वी याठिकाणी (आताच्या
अमेरीकेतील वायोमिंग, युटा आणि कोलोरॅडो राज्यात)
तीन मोठी सरोवरे अस्तित्वात होती. 'लेक गोश्यूट'
(Lake Gosiute), 'लेक उइन्टा' (Lake Uinta) आणि
सर्वात लहान असलेले 'फॉसिल लेक' (Fossil Lake). आज ही सर्व सरोवरे नामशेष झाली
आहेत, परंतु त्यांनी सरोवराच्या गाळामध्ये जीवाश्मांचा (fossils)
एक मोठा खजीना मागे सोडला आहे. हा गाळ पुढे जाऊन खडकांमध्ये
रूपांतरित झाला, ज्यांना आज 'ग्रीन
रिव्हर फॉर्मेशन' (Green River Formation) म्हणून ओळखले
जाते. हे खडक प्रामुख्याने थरावर थर असलेल्या चुनखडी (limestone), चिखलाचा खडक (mudstone) आणि ज्वालामुखीच्या
राखेपासून बनलेले आहेत. हे जीवाश्म जगातील प्राचीन वनस्पती आणि प्राणी जीवनाचे
सर्वात उत्कृष्टपणे जतन केलेले अवशेष मानले जातात.
जीवाश्म म्हणजे लाखो वर्षांपूर्वीच्या
वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष आणि खूणा. जीवाश्म शास्त्राचे जीवाश्म वनस्पतीशास्त्र
(Palaeobotany), जीवाश्म प्राणीशास्त्र (Palaeozoology),
सूक्ष्म जीवाश्मशास्त्र (Micropalaeontology) असे
तीन भाग पडतात. यात अगदी सूक्ष्मजीवांपासून ते प्रचंड मोठ्या डायनासॉर पर्यंत सर्व
सजीवांच्या अवशेषांचा अभ्यास केला जातो. जीवाश्म हे साधारणपणे गाळाच्या खडकांमध्ये
सापडतात. बऱ्याचदा भूगर्भात अगदी खोलवर असलेले हे जीवाश्म उत्खनन करतांना किंवा भूपृष्ठावरील
थराची धूप होऊन पृष्ठभागावर येतात. जीवाश्म हे जीवांपासून तयार झालेले असले,
तरी प्रत्येक जीवाचा जीवाश्म तयार होईलच, असे नाही.
जीवाश्म तयार होण्यासाठी हजारो, लाखो वर्षांचा कालावधी जावा लागतो. त्यासाठी मृत जीवाचे अवशेष पूर्णपणे
गाळाखाली गाडले गेले पाहिजेत. ते हवेच्या संपर्कात आल्यास अवशेषांचे विघटन होते. साधारणपणे
जलीय (सरोवर, तलाव) पर्यावरणात जीवाश्मांचे संवर्धन चांगले होते,
सजीव मृत झाल्यावर पाण्याच्या खाली तळात जाऊन पडतो. पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहात येणारा गाळ त्यावर जमा होत जातो
आणि त्याखाली मृत अवशेष गाडले जातात त्यातून जीवाश्म तयार होतात.
![]() |
| माशांचे जीवाश्म |
जीवाश्म तयार होण्यासाठी साधारणपणे मृत जीवाच्या शरीरात हाडांचा सापळा किंवा कोणताही असा कठीण भाग असला पाहिजे, ज्यावर रासायनिक अभिक्रिया होऊन तो सहजपणे नष्ट होणार नाही. पाने, फुले, कळ्या यांसारखे वनस्पतींचे अवशेष, तसेच जेलीफिश आणि कीटक यांमध्ये कोणताही असा कठीण भाग नसल्यामुळे त्यांच्या अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा सहसा मिळत नाहीत, आणि त्यामुळे यांचे जीवाश्म अत्यंत दुर्मिळ असतात.
यांपैकी काही विलक्षण दुर्मिळ जीवाश्म फॉसिल लेकच्या परिसरातून मिळतात.
त्या अमूल्य जीवाश्मांचे जतन करण्यासाठी १९७२ मध्ये अमेरिकन संसदेने
या परिसराला 'फॉसिल ब्युट नॅशनल मॉन्युमेंट' म्हणून घोषित केले.
डोंगरावर
जाण्यापूर्वी आम्ही तेथे असलेल्या छोट्याश्या संग्रहालयात गेलो. संग्रहालयाच्या
कंपाऊंड वॉलवर पृथ्वीचा जन्म झाल्यापासून विविध कालखंड आणि त्यात निर्माण झालेल
सुक्ष्मजीव, प्राणी, पक्षी
याबद्दल माहिती दिलेली होती. त्यानुसार पृथ्वीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत पाच
वेळा नैसर्गिक कारणांमुळे प्रचंड महाविनाश (Mass Extinction) झाले आहेत, ज्यामध्ये पृथ्वीवरील ७५ टक्क्यांहून
अधिक जीवसृष्टी नष्ट झाली होती. आपल्याला डायनासोर नष्ट झालेले माहिती असतात,
पण त्याआधीही चार वेळा पृथ्वीवरील ७५% सजीव नष्ट झाले होते.
वैज्ञानिक आणि पर्यावरणतज्ज्ञांच्या मते, सध्या पृथ्वी 'सहाव्या महाविनाशाच्या' (Sixth Mass Extinction) उंबरठ्यावर
आहे. विशेष म्हणजे, इतिहासातील पहिल्या पाच विनाशांपेक्षा हा
महाविनाश अत्यंत वेगळा आहे, कारण याचे मुख्य कारण निसर्ग
नसून आपण सर्व मानव आहोत.
५
कोटी वर्षांपूर्वी याठिकाणी ५० मैल लांब आणि २० मैल रुंद असलेले एक सुंदर सरोवर
होते त्याला आता फॉसिल लेक या नावाने ओळखले जाते. हे सरोवर खजूर,
अंजीर, सायप्रस आणि इतर उपोष्णकटीबंधीय (subtropical)
झाडे व झुडुपांच्या समृद्ध जंगलाने वेढलेल्या पर्वतांच्या कुशीत
वसलेले होते. पर्वताच्या खालच्या उतारांवर विलो, बीच,
ओक, मॅपल आणि फर्नची झाडे उगवली होती; तर थंड डोंगराळ भागांवर स्प्रूस आणि फरची जंगले पसरलेली होती. सरोवराच्या
या उबदार पाण्यात आणि त्याच्या सभोवताली प्राणीजीवन अत्यंत वैविध्यपूर्ण आणि
समृद्ध होते.
![]() |
| कासवाचे जीवाश्म |
या
उपोष्णकटीबंधीय प्रदेशात वर्षभर तीव्र सूर्यप्रकाश
आणि उष्णता उपलब्ध असल्यामुळे येथील सरोवरांमध्ये प्रचंड जैवविविधता पाहायला
मिळते. यामध्ये फायटोप्लँक्टन (सूक्ष्म शैवाल) आणि पाण वनस्पतींचा समावेश होतो,
त्या प्रकाश संश्लेषणाद्वारे सरोवराचा प्राथमिक अन्नस्रोत तयार
करतात. त्यावर विविध जलचर, किटक, उभयचर
उपजीविका करतात. या जलचरांवर उभयचर, पक्षी, आणि प्राणी उपजीविका करतात. जीवाणू आणि बुरशी यांसारखे सूक्ष्मजीव मृत
वनस्पती व प्राण्यांचे विघटन करून सरोवरातील पोषक द्रव्यांचे चक्रीभ्रमण सुरळीत
ठेवतात. हे सर्वजण अन्नसाखळीनुसार एकमेकांवर अवलंबून असतात. अशाप्रकारे सरोवरामुळे
एक परिपूर्ण परिसंस्था तयार होते.
![]() |
| माशाचे जीवाश्म |
म्युझियम मध्ये शिरल्यावर समोरच मगरीचे
१३ फूटी जीवाश्म लावलेले आहे. एवढे सलग
मोठे जीवाश्म सापडणे आणि त्यावर किचकट प्रकीया करुन त्यातून जीवाश्म कोरुन काढणे
मोठे जीकरीचे आणि कौशल्याचे काम आहे. मगरीच्या बाजूला माशांची अनेक जीवाश्मा
लावलेली होती. फॉसिल लेकमध्ये गोड्या पाण्यातील माशांच्या २० हून अधिक प्रजातींची
ओळख पटली आहे. यातील अनेक प्रजाती (उदाहरणार्थ
स्टींग रे, गार्स, हेरिंग आणि सनफिश) आजही अस्तित्वात असल्याचे ओळखता येतात. येथे थव्याने पोहणाऱ्या कोट्यवधी 'हेरिंग' माशांचे अवशेष दगडावर कोरलेल्या चित्रांच्या
रूपात जतन झाले आहेत. पाच फूट लांब गार्स आणि चार फूट लांब बोफिन्ससारख्या मोठ्या
शिकारी माशांचे नमुने मात्र दुर्मिळ आहेत. या जीवाश्मांचे तपशील थक्क करणारे आहेत.
अनेक माशांचे संपूर्ण सांगाडे, दात, नाजूक
खवले आणि त्वचा अजूनही जशाच्या तशा टिकून आहेत. फॉसिल ब्युट नॅशनल मोन्युमेंटचा
लोगो असलेले माशाचे जीवाश्म याठिकाणी लावलेले आहे. फॉसिल लेकमधील अनेक प्राणी आणि वनस्पतींचा
मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असला, तरी काही वेळा अचानक
प्रचंड संख्येने मासे मृत्यूमुखी पडले. या सामूहिक मृत्यूच्या घटना 'ग्रीन रिव्हर फॉर्मेशन'च्या खडकांच्या थरांवर
नोंदवल्या गेल्या आहेत, ज्यांना 'मास
मॉर्टॅलिटी लेयर्स' (mass mortality layers) म्हणतात. मोठ्या
संख्येने माशांचा मृत्यू कशामुळे झाला असावा ? निळ्या- हिरव्या शेवाळाच्या (blue-green
algae) अतिवाढीमुळे, ज्यामुळे पाण्यातील
ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले ? की पाण्याच्या तापमानात किंवा
क्षारतेमध्ये अचानक झालेल्या बदलामुळे ? की या सर्व
कारणांमुळे? यावर
अजूनही संशोधन सुरु आहे, कदाचित भविष्यात या रहस्याचा उलगडा
होऊ शकेल.
![]() |
| Mass mortality layer |
माशांच्या जीवाश्मां व्यतिरिक्त, इतर शेकडो सजीव
दगडांमध्ये कैद झाले आहेत. जगातील सर्वात जुनी संपूर्ण वटवाघुळे आणि
आश्चर्यकारकपणे अखंड राहिलेले सापांचे जीवाश्म येथे जतन केलेले आहेत. गोगलगायींचे
शंख, किटकांचे ठसे,
मगरी, गोड्या पाण्यातील मोठ्या शेपट्या
असलेले कासव, पक्ष्यांचे सांगाडे, पंखांचे
ठसे आणि विविध वनस्पतींची पाने, बिया, देठ
आणि फुले येथे जीवाश्मांच्या स्वरुपात पाहायला मिळतात. खरेतर जीवाश्म तयार
होण्यासाठी सजीवांमध्ये कठीण भाग असावा लागतो.ज्या सजीवांमध्ये कोणताही कठीण भाग
नसतो, त्यांचे जतन छापांच्या माध्यमातून होते. गाळाच्या
खडकांमध्ये गाडले गेल्यावर खडक कठीण होताना ह्या मृतावशेषांचा जीवाश्म तयार
होण्याऐवजी यांचा छाप खडकावर उमटतो.पाने, बिया, देठ आणि फुले यांचे जीवाश्म याच पध्दतीने तयार झालेले आहेत.
इथे ५ कोटी वर्षापूर्वीचे वटवाघूळाचे जीवाश्म पाहायला मिळते.
या परिसरात आजही वटवाघुळे अस्तित्वात आहेत. याशिवाय सरोवराच्या गाळातील थरांमध्ये
फ्रिगेट पक्ष्यांसह (frigate birds) इतर अनेक किनारी
पक्ष्यांची नाजूक हाडे जतन झाली आहेत.
![]() |
| पक्ष्यांची जीवाश्म |
![]() |
| मगरीच्या दाताच्या खुणा असलेले कासव |
एका दालनात अतिशय वेगळ्या प्रकारची जीवाश्म पाहायला मिळाली. येथे असलेल्या कासवांच्या कवचात अनेक खड्डे दिसत होते. मगरीने केलेल्या हल्ल्यात मगरीच्या दातांमुळे कासवांच्या कवचात खड्डे पडलेले होते.
![]() |
| मगरीच्या दाताच्या खुणा असलेले कासव |
एका मोठ्या
माशाने छोट्या माशाला गिळतांना लहान तोंडी मोठा घास घेतला. त्यामुळे तो मासा घशात
अडकून मोठ्या माशाचा गुदमरून मृत्यू झाला. हे एका जीवाश्मात कैद झालेले आहे. या ठिकाणी
एक मासा दुसऱ्या माशाची शेपटी खात असतानाचे जीवाश्म पाहायला मिळते. इथे शेपटी
तुटलेल्या अनेक माशाची जीवाश्म लावलेली आहेत. शेपटीचे
बलिदान देऊन भक्षकाकडून वाचलेल्या माशाना “शेपटीवर निभावलं” असच
म्हणावं लागेल. इथे मासे, प्राणी,
इत्यादींच्या विष्ठेची अनेक जीवाश्म सापडलेली आहेत.
![]() |
| मोठा मासा छोट्या माशाला गिळतांना |
इथे
एक अतिशय दुर्मिळ जीवश्म पाहायला मिळते. Asterotygon (स्टींग रे माशाचे पूर्वज) या माशाच्या आईच्या पोटात असलेले (न जन्मलेले)
पिल्लू इथे जीवाश्म रूपात पाहायला मिळाले. इतर माशांप्रमाणे स्टिंगरे पाण्यात अंडी
घालत नाही. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत Ovoviviparity म्हणतात.मादी
स्टिंगरेच्या शरीरातच अंडी तयार होतात आणि ती तिच्या पोटातच उबवली जातात. पिल्ले
अंड्यातून बाहेर येईपर्यंत ती मादीच्या गर्भाशयातच सुरक्षित राहतात. पूर्ण वाढ
झालेल्या लहान पिल्लांना मादी थेट पाण्यात जन्म देते.
![]() |
| आईच्या पोटात असलेले पिल्लू |
प्रोटोरॉहिप्पस
व्हेंटिकोलम (Protorohippus
venticolum) हा आधुनिक घोड्यांचा एक अतिशय प्राचीन आणि
नामशेष झालेला पूर्वज आहे. हा प्राणी सुमारे ५ कोटी (५० दशलक्ष) वर्षांपूर्वी
इओसीन (Eocene) कालखंडात
उत्तर अमेरिकेत अस्तित्वात होता. हा प्राणी आजच्या घोड्यांसारखा मोठा नव्हता; तो एका लहान कुत्र्याएवढा
किंवा कोल्ह्याएवढा होता. याची लांबी सुमारे २ फूट आणि खांद्यापर्यंतची उंची फक्त
१ ते १.५ फूट होती. घोड्यांना प्रत्येक पायाला एक खूर असते, परंतु प्रोटोरॉहिप्पसच्या
पुढच्या पायांना ४ बोटे आणि मागच्या पायांना ३ बोटे होती. या बोटांखाली
कुत्र्यांच्या पंजाप्रमाणे मऊ गाद्या (pads) होत्या, ज्यामुळे त्यांना जंगलातील
मऊ जमिनीवर चालणे सोपे जात असे. या प्राण्याचे सर्वात चांगले आणि जवळपास पूर्ण
अवशेष येथे सापडलेले आहेत.
![]() |
| घोड्याचा ५ कोटी वर्षापूर्वीचा पूर्वज |
![]() |
| घोड्याच्या उत्क्रांतीतले टप्पे |
अनेक
प्रकारची पाने, फुले, बिया यांची
जीवाश्म पाहायला मिळतात. त्यातील काही पानांवर किटकांनी अंडी घातलेली पाहायला मिळतात.अंड्यातून
बाहेर पडलेल्या अळ्यांनी कुरतडलेली पानेआहेत. तर काही पानं बुरशी किंवा
बँकटेरियामुळे खराब झालेली जीवाश्मामध्ये पाहायला मिळतात.
![]() |
| ताडाचे पान |
याठिकाणी
मोठ्या प्रमाणात सापडणाऱ्या बिया Ailanthus या
स्वर्गीय वृक्षाच्या आहेत. हे झाड उत्तर अमेरिकेतून नामशेष झाले होते. त्यांनतर
काही दशकांपूर्वी ते चीन मधून आणून येथे लावण्यात आले. पण आता त्या झाडाने
मोठ्याप्रमाणात देश व्यापून टाकला आहे. स्थानिक
झाडांवर आणि पर्यावरणावर मोठा आघात केलेला आहे. पूर्वीच्याकाळी हे झाड या प्रदेशात
होते तेंव्हा झाडावर नियंत्रण ठेवणारे किटक, बुरशी, बॅकटेरिया इथल्या पर्यावरणातच होते. त्यामुळे झाडाची अनिर्बंध वाढ
नैसर्गिकपणे रोखली जातं होती. सध्याच्या पर्यावरणात या झाडाला नैसर्गिक शत्रू न
उरल्याने त्याचा अनिर्बंध प्रसार झाला आहे.
![]() |
| Butt, Historic Quarry |
म्युझियम पाहून झाल्यावर जीवाश्म ज्या डोंगरातून काढली जातात त्या "Historic Quarry Trail" या ट्रेकला जाण्यासाठी गाडीने डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून खाणीत जाऊन परत येण्यासाठी २.५ किलोमीटरचा लूप ट्रेक करायचा होता. ट्रेकच्या सुरुवातीला सपाटीवरुन काही अंतर चालून गेल्यावर पायवाट झुडुपांमध्ये शिरली. गुढग्याच्या उंचीच्या या झुडूपां शिवाय इथे दुसरी कुठलीही झाडे दिसत नव्हती. भर उन्हात हा ट्रेक करण म्हणजे शिक्षाच होती. १० मिनिटे चालत गेल्यावर वाट डोंगराला भिडली आणि खडा चढ चालू झाला. साधारणपणे ७०० फ़ुटाचा खडा चढ चढून ७४०० फ़ूट उंचीवर पोहोचलो. कमी वेळात इतकी उंची गाठल्याने धाप लागली होती त्यामुळे डोंगराच्या कड्याचा आधार घेऊन उभा राहीलो. खाली दरीत दूरदूर पर्यंत फ़क्त झुडूपच पसरलेली होती. लाखो वर्षापूर्वी याठिकाणी मोठे सरोवर आणि त्याबरोबरची परिसंस्था नांदत होती यावर विश्वास ठेवणे कठीण जात होते.
![]() |
| Butt trail |
डोंगराच्या कड्याच्या बाजूने पुढे जात असतांना मातीचे वेगवेगळे थर दिसत होते. त्या थरांवर माहिती फलक लावले होते. तो थर कशाचा आहे. त्यात कुठल्या प्रकारचे जीवाश्म सापडले याची माहिती लिहिली होती. इथे विविध थरात अडकलेली काही जीवाश्म दिसतात. डोंगराच्या माथ्यावर जीवाश्म काढली जातात ती खाण आहे. दरवर्षी उन्हाळ्याचे ४ महिने इथे जीवाश्मांसाठी खोदकाम केले जाते. साधारणपणे दरवर्षी याभागात १०,००० जीवाश्म आजही मिळतात. या जीवाश्म उत्खननात पर्यटकही भाग घेऊ शकतात.
![]() |
| 18 Inch Layer |
जीवाश्म
उत्खनन करण्यासाठी जीवाश्मशास्त्रज्ञ गाळाच्या खडकांच्या ठिकाणांचे सर्वेक्षण
करतात, ग्रिड
आणि छायाचित्रांच्या मदतीने जीवाश्मांची जागा नकाशावर नोंदवतात आणि कुदळ, फावडे व ब्रश वापरून वरचा
मातीचा थर काढतात. नाजूक नमुने रासायनिक द्रावण लावून मजबूत केले जातात, प्लास्टरमध्ये भिजवलेल्या
गोणपाटाच्या आवरणात सुरक्षित गुंडाळले जातात, खडकापासून अलग केले जातात
आणि पुढील स्वच्छता, जतन
व अभ्यासासाठी प्रयोगशाळेत नेले जातात.
प्रयोगशाळेत जीवाश्मांवर साचलेला जाड किंवा घट्ट खडक, माती व गाळाचा थर अतिशय काळजीपूर्वक काढून जीवाश्माचे दीर्घकालीन जतन केले जाते. जीवाश्माचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि अचूक साधनांच्या मदतीने पूर्ण केली जाते. खडकाचा जाड थर काढण्यासाठी सुरुवातीला लहान हातोडी, छिन्नी किंवा सूक्ष्म कंपनाने खडक फोडणारे साधन (air scribe ) वापरले जाते. अत्यंत नाजूक भागांवर लहान ब्रश, सुया किंवा मायक्रो-ब्लास्टर (सूक्ष्म वाळू/पावडरच्या झोताने स्वच्छ करणारे यंत्र) वापरून खडकाचे कण काढले जातात.
रासायनिक
प्रक्रिया (आवश्यक असल्यास): काही विशिष्ट खडकांमध्ये (उदा. चुनखडी) जीवाश्म
अडकलेला असल्यास, सौम्य
आम्लाच्या नियंत्रित वापराने खडक विरघळवून जीवाश्म मोकळा केला जातो. सूक्ष्म
जीवाश्म किंवा हाडांचे नाजूक सांधे मोकळे करताना स्टिरिओ मायक्रोस्कोप
(सूक्ष्मदर्शक यंत्र) वापरून काम केले जाते, जेणेकरून मूळ आकारास धक्का
पोहोचणार नाही.
![]() |
| fossil hunter's Cabin |
| pronghorn |
| pronghorn |
जीओलॉजीचा अभ्यासक्रम करतांना जीवाश्म हा विषय होता, पण प्रत्यक्ष जीवाश्म पाहाणे आणि ती जीथे मिळाली त्याभागात जाऊन पाहाणे हा सुंदर अनुभव होता.
![]() |
| विष्ठेची जीवाश्म |

























