Blog is about Offbeat Treks, places in India & around the world. Budget backpacker tours with history, archeology, geology.. All about nature insects, flowers, birds, (Birds in India) Jungle safari, Museum, food trails, (Indian food), what & where to eat
आजचा प्रवास इंकाची
राजधानी कुस्को पासून ओलायतायतांबो पर्यंत होता. या प्रवासा दरम्यान इंकांच्या
पवित्र दरीत आम्ही प्रवास करणार होतो. सकाळीच आमचा गाईड गाडी घेऊन हजर झाला.
कुस्को पासून वळणा वळणाच्या रस्त्याने चढत गाडी १३००० फ़ूट उंचीवर पोहोचली. आज
आम्ही १३,००० फ़ूट उंची वरुन ८००० फ़ूट ऊंचीवरील ओलायतायतांबोला जाणार होतो. कुस्कोच्या आजूबाजूच्या डोंगरावर स्थानिक
लोकांची वस्ती आहे. छोटी छोटी लाल छपरांची
घरे त्यातून चढत जाणारे छोटे रस्ते असा माहोल होता. वस्ती मागे पडली आणि छोटी छोटी
गाव अधून मधून दिसायला लागली. गावातील घरा बाहेर खुराडी दिसत होती. त्यात गिनिपिग
ठेवलेले होते. स्थानिक लोकांमध्ये गिनिपिगच्या मटनाला उच्च दर्जाचे मानले जाते.
लग्नाच्या मेजवानीत, खास पाहुणे घरी आल्यावर गिनिपिगचे मटण
केले जाते. आमची मात्र परत येई पर्यंत गिनिपिग खायची हिंमत झाली नाही.
गिनिपिग
१३००० फ़ूटावरुन जस
जशी उंची कमी व्हायला लागली, तशी झाडे दिसायला
लागली. यात निलगिरीची भरपूर झाडं दिसत होती. गाईडाने सांगितल ही झाड पटकन वाढतात
म्हणून सरकारने लावली आहेत. लोकांनाही सरपण म्हणून याचा चांगला उपयोग होतो. पण
स्थानिक झाडांवर मात करुन आता निलगिरीची झाड सर्वत्र वाढलेली दिसत होती.
आपल्याकडेही निलगिरीच्या झाडांनी अनेक ठिकाणी जंगलावर आक्रमण केलेल आहे. निलगीरीचे
तेल हुंगले की, उंचीमुळे होणारा श्वसनाचा त्रास कमी होतो.
अशी जाहीरात करुन निलगिरीच तेल कुस्कोमध्ये पर्यटकांना विकतांना पाहिले होते. आत्ता
पर्यंतच्या एकूण संभाषणातून लक्षात आले की, आजचा गाईड
माहितगार होता. अनोळखी ठिकाणी इंग्रजीत बोलणारा, माहितगार
गाईड मिळण म्हणजे दुग्धशर्करा योग.
डोंगराळ भागातून
प्रवास करतांना अचानक सपाट प्रदेश दिसायला लागला. या सपाट जमिनीवर सगळीकडे शेती
दिसत होती. या भागातील प्रमुख आणि पूरातन गाव चिंचेरो हे हिमाचल प्रदेश मधील
एखाद्या गावा सारख टुमदार होत. कुस्को शहर ११५०० फ़ूट उंचीवर असल्याने तिथे शेती
करण शक्य नाही. त्यामुळे शतकानुशतके ८५०० फ़ूट उंचीवर असलेले चिंचेरो हे गाव
कुस्कोसाठी धान्याचे कोठार आहे.या
भागात अनेक शतके मका, बटाटा, क्यूनो इत्यादींची शेती केली जाते. त्याच बरोबर इथे लामा आणि अल्पाका हे
प्राणी पाळले जातात. त्यांच्या लोकरीपासून स्वेटर, टोप्या
विणण्याचा व्यवसायही केला जातो. गावातल्या एका घरात लामा आणि अल्पाकाच्या
लोकरीपासून धागा कसा तयार केला जातो याच प्रात्येक्षिक पाहाण्यासाठी आम्ही गेलो.
घराच्या बाहेर पिंजर्यात गिनिपिग होते आणि गोठ्यात लामा आणि अल्पाका बांधून
ठेवलेले होते. लामा हा अल्पाका पेक्षा उंच असतो. त्याचे कान अल्पाका पेक्षा लांब
असतात. लामाची लोकर जाडी भरडी असते तर अल्पाकाची लोकर मऊसूत असते. अल्पाका
लोकरीसाठी पाळतात तर लामा लोकरी बरोबरच भारवाही प्राणी म्हणून पाळला जातो.
लामा
घराच्या अंगणात
पारंपारिक कपडे घातलेल्या तीन बायका आम्हाला प्रात्येक्षिक दाखवत होत्या. त्यांनी
लोकरीच जॅकेट घातले होते. त्याला "जोबाना" म्हटले जाते. त्यावर रंगित
शाल (लिसिला) घेतलेली होती. शाल जॅकेटला अडकवण्यासाठी चांदीची पिन वापरली जाते
तीला "टूपू" म्हणतात. शालीचा उपयोग थंडीपासून संरक्षण करणे ते त्यात
वस्तू भरुन पाठीवरुन आणण्यासाठी होतो. "पोलेरा" नावाचा पूर्ण पाय
झाकणारा स्कर्ट त्या घालतात. या सर्वांवर सुंदर वीणकाम केलेले असते. स्कर्टवर
लोकरीचा पट्टा असतो त्याला "चूपी" म्हणतात. डोक्यावर घालायच्या टोपीला
"मॉन्टेरा" म्हणतात. या सर्वांवर सुंदर वीणकाम केलेले असते. या वीणकामा
वरुन त्यांचा प्रदेश ओळखता येतो. लग्न झालेल्या स्त्रिया काळ्या रंगाचे कपडे
घालतात. तर अविवाहीत स्त्रिया रंगीत कपडे घालतात.
अल्पाका
लामा आणि अप्लाकाची
लोकर काढून झाल्यावर त्यावरील घाण काढण्यासाठी रिठ्यासारख्या पदार्थाने गरम
पाण्यात धुवून काढतात. धुतलेली लोकर सावलीत वाळवली जाते, वाळली की त्याचे धागे
बनवले जातात. या लोकरी पासून बनवलेल्या अनेक गोष्टी तिथे विकायला ठेवल्या होत्या.
प्रात्येक्षिक पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो रस्त्यात एका जागी विमानतळाचे
काम चालू होते. कुस्कोतील विमानतळ छोटा असल्याने इथे नवीन विमानतळ बांधत होते.
लवकरच या टूमदार गावाची वाट लागणार हे निश्चित होते.
Saltpan,Maras
इंकाच्या सेक्रेटेड
व्हॅलीतील सुपीक जमीन, पाणी यामुळे शेतीसाठी पोषक
वातावरण होते. त्यामुळे पीक पाणी भरपूर होते. पण हा भाग समुद्रापासून हजारो
किलोमीटर दूर असल्याने येथे मिठाची कमतरता होती. निसर्गानेच त्यावर उत्तर शोधल
होते. जगभरात समुद्रापासून दूरवर असलेल्या अनके ठिकाणी असे मिठाचे साठे पाहायला मिळतात.
इथेही मारस या खेड्या जवळ डोंगरात जमिनी खाली खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या
भूगर्भातील सरोवरातून वहाणारे पाणी इथल्या स्थानिकांनी दरीत वळवलेले आहे. डोंगर
उतारावर दोन्ही बाजूला एका खाली एक खाचरे खोदून त्यामधून पाटाने हे खारे पाणी
फिरवलेले आहे. खाऱ्या पाण्याने खाचरं भरली की, त्या खाचरांचे
तोंड बंद केले जाते. सूर्याच्या उष्णतेने पाण्याचे बाष्पीभवन होते आणि खाचरात मीठ
तयार होते. ते मीठ लाकडी अवजाराने खरवडून काढतात. यात तीन प्रतीचे मीठ मिळते.
सर्वात वरचे पांढरे मीठ उत्तम प्रतीचे असतें. त्याखालील गुलाबी मीठ दुय्यम प्रतीचे
असते. त्यात थोड्या प्रमाणात मातीचा गाळ मिसळलेला असतो. तिसऱ्या प्रतीचे मीठ
म्हणजे माती सकट खरवडून काढलेले मीठ, हे जनावरांसाठी वापरले
जाते. सूर्याच्या उष्णते प्रमाणे एक किंवा दोन आठवड्यात एका खाचरात मीठ तयार होते
त्यानंतर पुन्हा त्या खाचराची डागडुजी करून त्यात पाट फोडून खारे पाणी सोडले जाते.
Saltpan,Maras
इंकांच्या आधीपासून चालू असलेली मीठ बनवण्याची ही पद्धत अजूनही तशीच
चालू आहे. मारस गावातील लोकांनी आता कॉ ऑपरेटिव्ह सोसायटी बनवलेली आहे. एकासिझन मध्ये ( उन्हाळ्यात ) या भागात १५००० किलो मीठ तयार केले जाते.
सध्याच्या काळात समुद्राच्या पाण्याचे झालेले प्रदूषण व त्यात आढळणाऱ्या
प्लास्टिकच्या कणाचे घातक प्रमाण पाहाता हे शुद्ध नैसर्गिक स्रोतपासुन नैसर्गिक
पद्धतीने बनवलेले मीठ जास्त भावाने विकले गेले पाहिजे पण या मिठाचे ब्रॅण्डिंग न
झाल्यामुळे ते अजूनही स्थानिक बाजारातचं विकले जाते. आजूबाजूच्या लालसर मातीच्या
डोंगर उतारावर पांढरी शुभ्र मीठाची खाचर सूर्य प्रकाशात चमकत होती. या परिसरात एक
स्थानिक कलाकार बासरीवर त्यांची पारंपारीक धून वाजवत होता. बासरी हे सर्वात जूने
नैसर्गिक वाद्य आहे. त्यामुळे ते अनेक पूरातन संस्कृतीत पाहायला मिळते.
निसर्गाच्या सानिध्यात विशेषत: डोंगरदर्यात हे वाद्य ऐकण हा सुखद अनुभव आहे.
Saltpan,Maras
इंका साम्राज्य हे
पॅसिफिक महासागराचा किनारा आणि अँडीज पर्वतरांगेच्या आजूबाजूला वसलेले होते. ७५00
किलोमीटर लांब असलेली अँडीज पर्वतरांग ही चिली, अर्जेंटिना, बोलेव्हीया, पेरू,
इक्विडोर, कंबोडिया या दक्षिण अमेरिका खंडातीलदेशांमध्ये पसरलेली आहे. इंकांचे राज्य स्थिर स्थावर झाल्यावर धान्याची
गरज वाढत होती. त्यासाठी समुद्र सपाटी पासून ॲमेझॉनचे जंगल ते बर्फाच्छादितअँडीज पर्वतरांगां पर्यंत वेगवेगळ्या उंचीवर, हवामानात, भुभागात टिकणारी आणि जास्तीत जास्त
उत्पन्न देणारी वाण शोधून काढण किंवा तयार करण आवश्यक बनले होते. त्यासाठी मोराय
येथे शेतीची प्रयोगशाळा बनवण्यात आली. इंका साम्राज्यातील वेगवेगळ्या प्रदेशात,
हवामानात उगवणारी वेगवेगळी रोप येथे आणून त्यांच्या पासून जास्त पीक
देणारी वाण या प्रयोगशाळेत तयार केली जात होती.
Moray, Peru
मोरायला
पोहोचल्यावर जमिनीत फ़नेलच्या आकाराचा १०० फ़ूट खोल खड्डा खोदून त्यात एका खाली एक
वर्तूळाकार खाचरं बनवलेली पाहायला मिळतात. यातील वरच्या वर्तूळाकार खाचराचा व्यास
४५० फ़ूट आहे. सर्वात वरच्या खाचराचे तापमान आणि सगळयात खालच्या खाचराचे तापमान यात
८ ते १५ अंश सेल्सिअसचा फरक आहे. डोंगरामधून वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी या वर्तुळाकार
खाचरातून फिरवलेले आहे. वेगवेगळ्या उंचीवर हवामानात सापडणाऱ्या वनस्पती इथे आणून
त्यांचा संकर घडवून, त्यापासून जास्त उत्पादन
देणाऱ्या जाती इथे तयार केल्या गेल्या आणि शेतकऱ्यांना पेरणीसाठी दिल्या होत्या.
पेरू मध्ये आजमितीला बटाट्याच्या अंदाजे ४०००,तर मक्याच्या ७०,
टॅमोटोच्या १५जाती आहेत. त्यातील एका
बटाट्याला अनेक गाठी असतात. आत्ता आत्ता पर्यंत वधू परीक्षेमध्ये हा बटाटा एकही
गाठ न वाया जाऊ देता सोलून दाखवावालागत असे. यावरून
वधू काटकसरी आणि कुशल आहे असे समजले जाई. या भागात केलेल्या उत्खननात पुरातत्व
तज्ञांना अशा चार प्रयोगशाळा सापडल्या आहेत. त्या डोंगरात वेगवेगळ्या उंचीवर आणि
दिशेला आहेत.
गाठीचा बटाटा
मक्याच्या जाती
आमचा पुढचा थांबा
होता ओलायतायतांबो. क्वेचुआ भाषेत "तांबो" म्हणजे थांबा. आमच्या गाईडशी गप्पा
मारतांना त्याला क्वेचा भाषेत डोंगर, दर्या,
धबधबे यांच्यासाठी वापरले जाणारे शब्द विचारत होतो. ही भाषा बोलायला
थोडी कठीण आहे. कारण या भाषा बोलतांना ठराविक पध्दतीने तोंडातून हवा सोडतात.
निसर्गात येणारे आवाजानुसार त्या भाषेला नाद आहे. (उदाहरणार्थ Paqucha म्हणजे धबधबा (तो उंचावरुन पडतो त्याप्रमाणे त्याचा उच्चार होतो).
क्वेचुआ (Quechua) भाषेची झलक
व्हिडीओ पाहाण्यासाठी Play बटण दाबा.
वाटेत दिसणार्या डोंगरांना विविध स्थानिक नाव होती. एका
सुळक्याला फ़ूलांचा स्कर्ट घातलेली राजकुमारी या नावाने ओळखतात, कंडोर पक्षी (गिधाड) सारखा
दिसणारा एक डोंगर त्याच नावाने ओळखला जातो. एका हिमाच्छादीत पर्वताल सूर्याचे
अश्रू अस स्थानिक नाव आहे. आपल्याकडेही सह्याद्रीतल्या सुळक्यांना (नवरा, नवरी, वाजंत्री, भटजी इत्यादी) डोंगरांना
(कोंबडा, कारंडा, म्हसा, नाखिंद इत्यादी) अशी नाव
स्थानिकांनी दिलेली पाहायला मिळतात. डोंगरदर्यात फ़िरणार्या लोकांना खाणाखूणा
लक्षात ठेवण्यासाठी या नावांचा उपयोग होतो.
Olaytaytambo, Peru
ओलायतायतांबो हा
किल्ला मोक्याच्या जागी बांधलेला आहे. कुस्को वरुन माचूपिचूला जाणारी वाट आणि
ॲमेझॉनच्या जंगलात जाणारी वाट याठिकाणी एकत्र येते. या डोंगरावर किल्ला बांधतांना
मुख्य आवाहन होते ते ८० अंश उतार असणार्या डोंगराचे. त्यासाठी डोंगराच्या
पायथ्यापासून एकावर एक अशी १७ खाचरे बांधण्यात आली. मोठे मोठे दगड लावून ती खाचरे
संरक्षित करण्यात आली होती. या खाचरांच्या मधून माथ्यावर जाण्यासाठी दगडांनी
बांधलेले जीने आहेत. या खाचरांचा नक्की उपयोग कशासाठी केला गेला याबद्दल दुमत आहे, काही अभ्यासकांच्या मते या
खाचरांमध्ये शेती केली जात होती. खाचरां मध्ये असलेल्या जीन्यांनी वर जातांना
किल्ल्याच्या डोंगरासमोर एक उंच डोंगर दिसतो. त्या डोंगरावर "तुनुपा" या
सैतानाचा १४० मीटर उंच चेहरा कोरलेला आहे. हा डोंगर ॲमेझॉन जंगलाच्या दिशेला आहे.
इंका आपले सैन्य ॲमेझॉनमध्ये पाठवत, त्यातील
निम्मेच सैन्य परत येत असे,
आलेले
सैनिकही पिवळ्या तापाने आजारी पडून मरत असत. त्यामुळे त्या दिशेला सैतानाची दिशा
म्हणून ओळखले जात असे.
सैतानाचा चेहरा आणि धान्य कोठारं
सैतानाचा १४० मीटर उंच चेहरा
इंकांचे
खगोलशास्त्राचे ज्ञान अद्ययावत होते. त्यांच्या सर्वदूर पसरलेल्या साम्राज्यात पिक
पेरणीचा काळ कधी चालू होणार हे ठरवण्यासाठी त्यांना तुनुपाचा (सैतानाचा) चेहरा
कोरलेला डोंगर उपयोगी ठरत होता. २१ जून पासून या भागात हिवाळा चालू होतो. हा काळ
साठवलेले धान्य वापरण्याचा असतो. त्यावेळी सूर्य डोंगराच्या डाव्या कड्या जवळून
उगवतो आणि २१ डिसेंबर पासून उन्हाळा चालू होतो, हा पिकं पेरणी चालू
करण्याचा काळ असतो तेंव्हा सूर्य डोंगराच्या उजव्या कड्या जवळुन उगवतो याची नोंद
इंकांनी घेतली होती. त्यामुळे ओलायतायतांबोवर सूर्यमंदिर बांधताना ते अशा जागी
बांधले की, २१
जूनला सकाळीच ते सूर्य प्रकाशाने न्हाऊन निघेल. सैतानाच्या डोंगरावरील सूर्याचे
स्थान पाहून सूर्यमंदिराचा पूजारी लोकांना मार्गदर्शन करत असे. याच डोंगरात
सैतानाच्या चेहर्याच्या बाजूला काही इमारती बांधलेल्या दिसतात. त्यांचा उपयोग
धान्य साठवण्यासाठी होत असे. युध्द काळात आणि दुष्काळात हे धान्य वापरले जात असे.
Olaytaytambo Fort
इसवीसन १५३६ मध्ये
मॅन्को इंका हा सॅक्सेह्युमन येथिल लढाई हरल्यावर स्पॅनिशांच्या तावडीतून निसटला
आणि त्याने ओलायतायतांबो किल्ल्याचा आसरा घेतला. स्पॅनिशांनी त्याचा पाठलाग केला.
किल्ल्यावरुन इंकांनी जोराचा हल्ला करुन स्पॅनिश सैन्याला माघार घ्यायला लावली होती.
पुढील काळातस्पॅनिश सैन्याने हा किल्ला
जिंकून घेतला आणि किल्ल्याच्या बाजूच्या डोंगरात तुरुंग आणि चर्च बांधले.
सूर्य मंदिराचे अवशेष
राजवाड्याच्या भिंती
ओलायतायतांबो
किल्ल्याच्या माथ्यावर थोडी सपाटी आहे. या सपाटीवर सूर्य मंदिर बांधलेले होते. आत
त्याचे अवशेष उरलेले आहेत. हे मंदिर बांधण्यासाठी दगड नदीच्या पलिकडे ५०० मीटर
उंचीवर असलेल्या कांचीकाटा या दगडाच्या खाणीतून इथे आणले आहेत. दगडांचा आकार, वजन बघता कुठलेही आधुनिक
साधन नसतांना हे दगड एका डोंगरावरुन उतरवून, नदी पार करुन दुसर्या
डोंगरावर कसे चढवले असतील. त्यासाठी किती माणसे लागली असतील हे एक कोडच आहे. या
मंदिराच्या जवळच राजवाड्याचे बांधकाम केलेले आहे. राजवाड्याच्या भिंती Cyclopean Walls पध्दतीच्या म्हणजे
दगड एकमेकांत बसवून बनवलेल्या आहेत. (या भिंती बद्दल पहिल्या भागात सविस्तर लिहिले
आहे).
याकू (पाण्याचे) मंदिर
किल्ला पाहून
पायथ्याशी आलो. याभागात डोंगरातून पाटांनी आणलेले पाणी देवळातून खेळवलेल आहे. याकू ही इंकांची पाण्याची देवता आहे. त्याची मंदिरे इथे बांधलेली आहेत. इंकानी पाणी हे
पुरुष तत्व आणि जमिन ही स्त्री तत्व मानलेलं आहे. पाणी आणि जमिनीचा समागम होऊन
त्यातून नवनिर्मिती होते असे ते मानतात. आपल्या वेदातही पुरुष तत्त्व आणि स्त्रीतत्त्वाचा उल्लेख आहे. हे पाण्याचे मंदिर पाहातांना मला कोकणातील सातेरी देवीची मंदिेरे आठवली. तेथेही वारुळ आणि साप हे स्त्री आणि पुरुष तत्त्वाचे प्रतिक मानलेली आहेत.
याकू (पाण्याचे) मंदिर
आजची सगळी ठिकाणं
पाहून झाली होती. आमचा आजचा मुक्काम उरुबांबा नदी काठी असलेल्या रिसॉर्ट मध्ये
होता. गाईडचा निरोप घेऊन आम्ही गाव फ़िरायला बाहेर पडलो. लाल चुटूक रंगाच्या
छपरांची छोटी घर आणि त्यातून जाणार्या दगडांनी बांधलेल्या छोट्या चढ उतार
असलेल्या गल्ल्या असे गावाच स्वरुप होत. गावात फ़िरण्यासाठी चक्क बजाज आणि टिव्हीएस
या भारतीय कंपन्यांच्या रिक्षा होत्या. पेरु मध्ये सार्वजनिक वाहान म्हणून या
मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.
Bajaj & TVS Riksha
फ़िरत फ़िरत आम्ही उरुबांबा नदीच्या काठी पोहोचलो.
मावळतीची किरणे डोंगरावर पडली होती आणि त्याच प्रतिबिंब नदीच्या संथ पाण्यात पडल होत. नजरबंदी करणार हे दृष्य पाहात असताना अचानक ट्रेनचा हॉर्न ऐकू आला. नदीच्या
बाजूने जाणार्या ट्रॅकवरुन माचूपिचूला जाणारी ट्रेन जात होती. उद्या सकाळी याच
ट्रेनने आम्ही माचूपिचूला जाणार होतो.
उरुबांबा नदी
माचू पिचू बद्द्ल
पुढील भागात ......
माचू पिचू ( भाग १) , Machu Pichu -1 (Cusco) वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा....
प्रवासवर्णनामध्ये ठिकाणांची, प्रेक्षणीय स्थळांची माहीती देणे हि तर नित्याचीच बाब! काहीजण तिथूनची संस्कृती, सण, चालीरीती ह्या आजुबाजुंच्या गोष्टींची भर घालतात. पण स्थानिक लोकभाषेची वैशिष्ट्ये - स्थानिक गाईडकडून वदवून आपल्यापुढे सादर करणे ... हे फक्त 'डोंगरभाऊ' च करु जाणे!
👌👌👌नेहमीप्रमाणे सुंदर आणि माहिती पूर्ण लेखन
ReplyDeleteक्वेचुआ ट्रेकिंग इक्विपमेंट ब्रँड आठवला. एका अनामिक.प्रदेशात फिरल्या सारखं वाटत होत. लोकल लोकांचे छायाचित्र पहायला मिळाले तर आवडेल. मस्त लिहिलं आहे.
ReplyDeleteसर,
Deleteकेचुआ भाषेचा व्हिडीओ टाकला आहे. बघा म्हणजे भाषेचा अंदाज येईल.
खूप छान माहिती 👍
Delete👍🏻very nice n informative
ReplyDeleteVery nice Amit sur
ReplyDeleteअमित फार सुंदर माहिती तुझ्या ब्लॉगमध्ये दिलेली
ReplyDeleteपुढच्या ब्लॉगची मी आतुरतेने वाट बघत आहे
सुंदर लेख
ReplyDeleteनेहमीप्रमाणे सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. असेच लिखाण चालू दे. होऊन जाऊ दे खर्च. तुझा खर्च आणि आम्हाला जगभराची माहिती.. 😀😀
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteखूप छान लेख
ReplyDeleteNice information
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteनेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण विवेचन. स्थानिक पिकांची, भाषेची सुद्धा छान माहिती मिळाली.
ReplyDeleteसुंदर लिखाण उत्कृष्ट छायाचित्रण उपयुक्त माहिती मिळाली
ReplyDeleteभरत तलावडेकर
नेहमी प्रमाणे सुंदर लिखाण आणि छायाचित्रांनी आम्हाला ही माचु पिचु सैर झाली.. धन्यवाद 😊
ReplyDeleteनेहमीप्रमाणे सुंदर... माहितीपूर्ण....फोटो, व्हिडिओ छान....
ReplyDeleteखुप विलोभनीय
ReplyDeleteपरदेशात किल्ल्या चा इतिहास नवीन क्षेत्र आवडेल स्वीकारायला
प्रवासवर्णनामध्ये ठिकाणांची, प्रेक्षणीय स्थळांची माहीती देणे हि तर नित्याचीच बाब! काहीजण तिथूनची संस्कृती, सण, चालीरीती ह्या आजुबाजुंच्या गोष्टींची भर घालतात. पण स्थानिक लोकभाषेची वैशिष्ट्ये - स्थानिक गाईडकडून वदवून आपल्यापुढे सादर करणे ... हे फक्त 'डोंगरभाऊ' च करु जाणे!
ReplyDeleteKhoop Chan mahiti. Thank you 😊
ReplyDelete