Sunday, December 21, 2025

" ओल्ड फोर्ट नायगरा " (Old Fort Naigara ) (विदेशातले किल्ले भाग- ४)

 

Old Naigara Fort

अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर असलेल्या जगप्रसिद्ध नायगरा धबधब्यापासून २८ किलोमीटरवर  "ओल्ड फोर्ट नायगरा " नावाचा अप्रतिम किल्ला आहे. अमेरिका आणि कॅनडा या देशाच्या मध्ये असलेल्या ग्रेट लेकच्या काठावर हा किल्ला साधारणपणे ३०० वर्षापूर्वी बांधला होता. अमेरीकेच्या इतिहासात महत्वपूर्ण योगदान दिलेला हा किल्ला पाहाण्यासाठी " ओल्ड फोर्ट नायगरा " पार्कला भेट द्यावी लागते.

स्वागत कक्षात प्रवेश शुल्क भरल्यावर किल्ल्यावर बनवलेला १६ मिनिटांचा माहितीपट दाखवतात. याशिवाय किल्ल्याचे एक छोटे मॉडेल आणि किल्ल्यात सापडलेल्या वस्तूंचे छोटेसे प्रदर्शन येथे मांडलेले आहे. हे सर्व पाहून स्वागत कक्षातून बाहेर पडल्यावर समोरच किल्ल्याचा खंदक व त्यामागे पसरलेली तटबंदी दृष्टीपथात येते. सुंदर हिरवळ आणि फ़ुलझाड लावून खंदक सुशोभित केलेला आहे. किल्ल्यातही ठिकठिकाणी हिरवळ राखलेली आहे.

 

Old Naigara Fort

साधारणपणे ३०० वर्षाचा इतिहास असलेला हा किल्ला फ्रेंचानी बांधलेला होता. त्यानंतर इंग्रज, नेटीव्ह अमेरिकन आणि सगळ्यात शेवटी अमेरीकन यांच्यात या किल्ल्याचे हस्तांतरण होत गेले. किल्ल्याच्या बांधणीत, किल्ल्यांवरील वास्तूंमध्ये या विविध राजवटींची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात. सतराव्या शतकात वसाहतवादी फ्रेंच आणि इंग्रज हे अमेरीकेच्या उत्तर भागात पोहोचले. तिथे पसरलेल्या ग्रेट लेक्स, नायगरा नदी आणि नायगरा फॉल्समुळे या भागातील प्रवास आणि व्यापार पाण्यातून करणे सोयीचे होते. या भागातील रेड इंडियन्स सुध्दा पूर्वंपार प्रवास पाण्यातून आणि थोडा जमिनीच्या मार्गाने करत असत. ग्रेट लेक्स मधून बोटीने प्रवास केल्यावर नायगारा फॉल्सच्या अलिकडे जमिनीवर उतरून ते काठाकाठाने  फॉल्स ओलांडत आणि पुन्हा जलमार्गाचा वापर करीत. फ्रेंच आणि इंग्रज वसाहतवाद्यांनी व्यापारासाठी, वाहातुकीसाठी तसेच सैन्याच्या हालचालीसाठी याच मार्गाचा वापर केला आणि या मार्गावर ताबा ठेवण्यासाठी या भागात अनेक किल्ल्यांची निर्मितीही करण्यात आली.

 इसवीसन १६६९ मध्ये फ्रेंचांनी नायगरा नदीचा आणि ग्रेट लेक्सचा सर्व्हे करुन नायगरा फॉल्स पासून ७ मैलावर आणि नायगरा नदीच्या मुखावर किल्ल्याची जागा निश्चित केली. इसवीसन १६७९ मध्ये त्यांनी निवडलेल्या जागी लाकडी किल्ला बांधला, त्याला नाव दिले फोर्ट कॉंटी (Fort Conti) पण तो वर्षाच्या आतच आगीच्या भक्षस्थानी पडला. त्यानंतर इसवीसन १६८७-८८ मध्ये या ठिकाणी  फोर्ट डेनोव्हीले ( Denonville)  किल्ला बांधला. किल्ल्यात १०० सैनिक होते, त्यातील ६० सैनिक कडक हिवाळ्यामुळे दगावले. त्यामुळे किल्ला सोडून देण्यात आला.

त्यानंतर इसवीसन १७२६ मध्ये  फ्रेंचांनी "फ्रेंच कॅसल" हा किल्ला बांधला. हा किल्ला म्हणजे घरासारखी दिसणारी एक तीन मजली इमारत होती. त्या भोवती लाकडी आणि मातीची तटबंदी बांधली होती. आजही ही इमारत किल्ल्यात पाहायला मिळतेया किल्ल्यामुळे इंग्रजांच्या हालचालीवर मर्यादा येत होत्या त्यामुळे इंग्रज आणि फ्रेंच यांच्या मध्ये तणाव निर्माण झाला. युध्दाची शक्यता लक्षात घेऊन फ्रेंचांनी किल्ल्या भोवती खंदक खणून किल्ल्याला विटांची तटबंदी आणि बुरुज बांधले त्यावर तोफ़ा चढवून किल्ला युध्दासाठी सज्ज केलाफ्रेंच आणि रेड इंडीयन्स यांच्यातील लढाईचा फायदा घेऊन इंग्रजांनी इसवीसन १७५९ मध्ये किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर त्यांनी किल्ल्यात नवीन बांधकाम करुन तो संरक्षण दृष्ट्या मजबूत केला. इसवीसन १७९६ मध्ये अमेरिकन सैन्याने किल्ला इंग्रजांकडून जिंकून घेतला. इसवीसन १८१२ मध्ये अमेरिकन आणि इंग्रज यांच्या मध्ये झालेल्या युध्दात, नायगरा नदीच्या पलिकडच्या तीरावर असलेल्या फोर्ट जॉर्ज वरुन किल्ल्यावर तोफा डागून किल्ला जिंकून घेतला.  इसवीसन १८१४ मध्ये अमेरिकन सिव्हिल वॉर संपल्यावर नायगरा फोर्ट कायमचा अमेरीकेच्या ताब्यात आला.

 

लाकडी, वीटांची आणि दगडाची तटबंदी, ओल्ड नायगरा फोर्ट

फ्रेंचानी सुरुवातीला मातीची तटबंदी, नंतर बांधलेली लाकडाची तटबंदी,  त्यानंतर बांधलेली विटांची तटबंदी, आणि सर्वात शेवटी इंग्रजांनी बांधलेली दगडी तटबंदी अशा सर्व प्रकाराच्या तटबंद्या आजही येथे पाहलायला मिळतात. तसेंच फ्रेंच स्थापत्य शास्त्राचा प्रभाव असलेले पंचकोनी (बाणाच्या आकाराचे) बुरुज, इंग्रजी धाटणीचे चौकोनी बुरुज पाहायला मिळतात.

 

खंदक आणि पूल , पहिले प्रवेशव्दार

किल्ल्याचा ३०० वर्षाचा इतिहास समजून घेत किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापाशी पोहोचलो. फ्रेंचांनी बांधलेल्या या प्रवेशव्दाराला "गेट ऑफ फ़ाईव्ह नेशन" (Gate of five Nation ) या नावाने ओळखले जाते.  किल्ला तीन बाजूंनी नायगरा नदीने वेढलेला असून चौथ्या बाजुला म्हणजेच  किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारापुढे खंदक आहे. एके काळी हा खंदक नायगरा नदीला जोडलेला होता आणि नदीचे पाणी त्यात खेळवलेले होते. खंदकावर पूल आहे. युध्द प्रसंगी तो पूल वर उचलण्यासाठीची यंत्रणा आणि त्यासाठी दगडांनी बनवलेले काउंटर वेट्स प्रवेशव्दारच्या आत पाहायला मिळतात. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश करुन काटकोनात वळल्यावर किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार आहे. इंग्रजांनी इसवीसन १७७० मध्ये बांधलेल्या या प्रवेशव्दारावर असलेले छ्प्पर पॅगोडाच्या छतासारखे आहे. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी त्यांच्या वसाहती आशियात झालेल्या होत्या. तेथे त्यांनी पॅगोडा पाहीलेले होते. त्याप्रकारचे छत त्यांनी या प्रवेशव्दारावर बांधले . किल्ल्यातील अजुन एका इमारतीचे छत असेच पॅगोडासारखे आहे. या दुसर्या प्रवेशव्दाराच्या दुसर्या मजल्यावर एक मोठी तोफ आहे , तसेच सैनिकांना राहाण्यासाठी खोल्या आहेत. या दोन्ही प्रवेशव्दारांच्या मधला मार्ग आणि खंदकावर असलेल्या पुलावर  दोन्ही बाजुंनी रोखलेल्या तोफा तटबंदीच्या मागे ठेवलेल्या आहेत. यातील डाव्या बाजूला असलेल्या तोफांना "डाऊफिन बॅटरी" (Dauphin Battery) या नावाने ओळखले जाते. यात एकूण ५ तोफा असून त्यातील ३ तोफा ६ पाऊंडी आणि २ तोफा १२ पाउंडी आहेत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला असलेल्या तोफ़ांना "पाउंडर बॅटरी " (Pounder Battery) या नावाने ओळखले जाते. इसवीसन १८४० मध्ये अमेरीका आणि कॅनडा मध्ये तणाव निर्माण झाल्यावर या तोफा बसवण्यात आल्या होत्या. यात गाड्यावर बसवलेल्या तीन तोफा आहेत आणि एक "मॉर्टर कॅनन" ( मराठीत ज्याला "उखळी तोफ म्हणतात)" आहे. या तोफेच्या नळीची लांबी कमी असते. त्यामुळे तोफेतून उडणारा तोफ गोळा वक्राकार मार्गाने जात असल्याने जास्त लांब जाऊ शकत नाही . त्यामुळे उखळी तोफेचा उपयोग लक्ष आणि तोफ यांच्या मध्ये तटबंदी सारखा उंच अडथळा असल्यास केला जातो.

 

पहिले  आणि दुसरे प्रवेशव्दार

दुसर्या प्रवेशव्दाराकडून किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजुला धान्य कोठार आणि दारु कोठाराच्या इमारती आहेत. यातील एका इमारतीत सध्या छोटेसे म्युझियम बनवलेले आहे. तेथे किल्ल्याची प्रतिकृती, नायगरा नदीच्या खोर्याचे मॉडेल, व्यापारी मार्गाचा नकाशा, त्याकाळी वापरलेल्या जाणार्या होड्या, धान्य, दारु इत्यादी साठवण्यासाठी वापरली जाणारी लाकडी पिंप इत्यादी ऐतिहासिक गोष्टी व्यवस्थित मांडून ठेवल्या आहेत. या कोठारांच्या काटकोनात एक लाकडी ओंडक्यांनी बांधलेले घर ( Log Cabin ) आहे. इथे सैनिकांना जेवण आणि दारु विकत मिळत असे. 

 

धान्य, दारु इत्यादी साठवण्याची लाकडी पिंप 

ओल्ड नायगरा फोर्टची प्रतिकृती

इसवीसनाच्या सतराव्या आणि अठराव्या शतकात युरोपियन सैनिक "मस्केट रायफल" (Musket rifle) (चापाच्या बंदुका) वापरत असत. किल्ल्यात दर तासाला एक स्वयंसेवक, सतराव्या शतकातल्या फ्रेंच सैनिकाच्या पारंपारीक पोशाखात मस्केट रायफलचे प्रात्येक्षिक दाखवतो. त्यावेळी खुसखुशीत व खुमासदार शैलीत त्याकाळच्या पोशाखाची, सैनिकांच्या दिनचर्येची आणि बंदुकीची माहिती देऊन , बंदुकीतून बार उडवून दाखवतो. पंधरा मिनिटांचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण आहे. किल्ला पाहातांना आपल्याला पडलेले प्रश्नही यावेळी विचारता येतात. आपल्या इथेही देवगिरी, रायगड, सिंधुदुर्ग अशा मोठ्या प्रमाणावर पर्यटक जाणार्या किल्ल्यावर तलवार , भाला, दाणपट्टा आणि इतर मध्ययुगीन शस्त्र चालवण्याचे प्रात्येक्षिक ठेवले तर किती बहार येईल,  असा विचार मनात येऊन गेला.

मस्केट रायफलच्या प्रात्येक्षिकाचा व्हिडीओ पाहण्याकरिता टिचकी मारा..

मस्केट रायफलचे प्रात्येक्षिक दाखवलेल्या स्वयंसेवकाचे आभार मानून आम्ही पुढे निघालो . किल्ल्याच्या नायगरा नदीच्या बाजूला किल्ल्याचे एक प्रवेशव्दार आहे. "पोस्टर्न गेट" (Postern Gate) या नावाने ते ओळखले जाते. इसवीसन १८३७ मध्ये अमेरिका आणि कॅनडा यांच्यात तणाव निर्माण झाल्यावर किल्ल्याची ही नदी कडील बाजू २० फूट उंच तटबंदी आणि भव्य बुरुज बांधून मजबूत करण्यात आली. नायगरा नदीच्या पैलतीरावर कॅनडात फोर्ट जॉर्ज ( Fort Gorge) किल्ला आहे. त्यावर मारा करण्यासाठी दोन लांब पल्ल्याच्या गाड्यावरील तोफा बुरुजावर बसवण्यात आल्या. या बुरुजा जवळ एक भट्टी आहे. त्यात तोफेचे गोळे तापवून लालभडक झाल्यावर तोफेत भरुन त्याचा मारा केला जात असे. असा गरम तोफेचा गोळा बोटीवर किंवा लाकडी घरावर पडला की ते पेट घेत असे.

 

Cannon, Old Naigara Fort

"पोस्टर्न गेट" (Postern Gate)

इसवीसन १८१२ मध्ये झालेल्या इंग्रज आणि अमेरीकन यांच्या युध्दात बेस्टी डॉयल या अमेरीकन स्त्रीने हे गरम तोफगोळे भट्टी पासून तोफेपर्यंत नेण्याचे कठीण काम केले. फ्रेंचांच्या काळापासून किल्ल्यात स्त्रिया जेवण बनवणे, कपडे धुणे, परिचारिका इत्यादी काम त्या करत असत.  पण युध्दात प्रत्यक्ष भाग घेतलेली स्त्री म्हणुन बेस्टी डॉयल हिचा गौरव झाला.

 

भट्टी

बुरुजावरुन दिसणारे नायगरा नदीचे पात्र आणि पलिकडील काठावर असलेला कॅनडातील किल्ला "फोर्ट जॉर्ज" , नदी काठावर नांगरलेल्या बोटी आणि किनार्यावर पसरलेली छोटी छोटी गाव असे विहंगम दृष्य पाहून बुरुजावरुन खाली उतरल्यावर तटबंदीत बांधलेली एक खोली दिसते. त्या खोलीत गाड्यावरील छोट्या तोफा, उखळी तोफा आणि जनावरांच्या (घोड्याच्या) पाठीवर ठेऊन उडवायच्या तोफा ठेवलेल्या आहेत.(आपल्याकडेही मध्ययुगीन कालखंडात जनावरांच्या पाठीवरुन उडवायच्या तोफा वापरात होत्या. हत्तीच्या पाठीवर असलेल्या तोफेला गजनाल आणि उंटाच्या पाठी वरुन उडवायच्या तोफेला शुतरनाल म्हणत)

 


तोफा पाहून पुढे गेल्यावर पुन्हा एक भट्टी पाहायला मिळते. ही ब्रेड बनवण्यासाठी असलेली भट्टी आहे. त्याच्या बाजूला भटारखान्याची बैठी इमारत आहे. त्यात वापरली जाणारी भांडी, चमचे, पळ्या, विविध आकाराचे ब्रेड इत्यादी तेथे मांडून ठेवण्यात आलेल आहे.

 

भटारखाना

भटारखान्या जवळ "फ्रेंच कॅसल"ची इमारत आहे. इसवीसन १७२६ मध्ये  फ्रेंचांनी "फ्रेंच कॅसल" हा किल्ला बांधला. हा किल्ला म्हणजे घरासारखी दिसणारी एक तीन मजली इमारत होती. दोन फूट रुंदीच्या दगडी भिंती, धातूची तावदान असलेल्या खिडक्या , इमारती भोवती खंदक, लाकडी आणि मातीची तटबंदी अशी संरक्षण व्यवस्था केलेली होती. इमारतीच्या तिसर्या मजल्यावरुन  शत्रूवर मारा करण्यासाठी उतरत्या छपरातून बाहेर काढलेल्या उभ्या खिडक्या ( dormer window) बनवलेल्या होत्या. या इमारतीत किल्लेदार , इतर अधिकारी आणि ४० सैनिकांची राहाण्याची व्यवस्था होती. या स्वयंपूर्ण इमारतीचा (किल्ल्याचा) उपयोग व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी तसेच स्थानिक रेड इंडीयन लोकांशी व्यापारासाठी केला जात असे. 

इमारतीतील विहिर

या इमारतीच्या तळमजल्यावर विहिर आहे. डाव्या बाजूच्या दालनात सैनिकांची राहाण्याची व्यवस्था आहे. उजव्या बाजूच्या दालनात फ्रेंचांचे व्यापारी केंद्र होते. तेथे ते रेड इंडीयन्स कडून हरीण , बिव्हर, अस्वल  इत्यादी प्राण्यांची केसाळ कातडी (Fir) घेत आणि त्या बदल्यात , कापड, मणी, माळा ,  धातूची हत्यारे इत्यादी गोष्टी देत असत. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर डाव्या बाजूच्या दालनात चॅपल आहे. तिथे प्रार्थना केली जात असे. उजव्या बाजूच्या दालनात सैनिकांची राहाण्याची व्यवस्था होती. तेथे त्यांचे बिछाने, भिंतीवर टांगलेले पोशाख, बंदुका , जेवणाचे टेबल इत्यादी गोष्टी उत्तम प्रकारे मांडून ठेवलेल्या आहेत. पहिल्या मजल्यावर मागच्या बाजूला भटारखाना आणि धान्य कोठार आहे. दुसर्या मजल्यावर किल्लेदाराची खोली त्याच्या बिछाना, स्टडी टेबल, पोशाखासह व्यवस्थित मांडून ठेवलेला आहे. त्याच मजल्यावर अधिकार्यांची सभा घेण्यासाठी आणि कामकाज करण्यासाठी बनवलेले सभागृह आहे. नायगरा नदीतील बोटींना मार्गदर्शन करण्यासाठी फ्रेंचांनी इसवीसन १७८२ मध्ये या वास्तूच्या छपरावर  दिपस्तंभ (Light House) बांधलेल होते. त्याचे अवशेष आजही पाहायला मिळतात.

 

सैनिकांची राहाण्याची व्यवस्था

किल्लेदाराची खोली

चर्च

व्यापारी केंद्र 

फ्रेंच कॅसलची इमारत पाहून पुढे गेल्यावर रश - बागोट स्मारक लागते. अमेरीका आणि इंग्लंड यांच्यात सततच्या लढायां होत होत्या. त्या थांबवण्यासाठी  दोघांमध्ये  इसवीसन १८१७ मध्ये तह करण्यात आला . त्यात महत्वाचे मुद्दे होते, ग्रेट लेक्स परिसरातील नौदल कमी करणे आणि व्यापाराला चालना देणे. या तहाचे स्मारक Rush- Bagot treaty monument या ठिकाणी बनवण्यात आले आहे.

 

पॅगोडा सारखे छप्पर असलेली इमारत


स्मारकाच्या समोर मिलेट या  फ्रेंच पाद्रयाने इसवीसन १६८८ साली बसवलेला क्रॉस आहे. मुळात हा क्रॉस लाकडी होता. त्याठिकाणी आता पितळेचा क्रॉस बसवलेला आहे. क्रॉसपासून पुढे गेल्यावर एक इमारत आहे. त्याची रचना किल्ल्याच्या दुसर्या प्रवेशव्दारा सारखीच आहे. या इमारतीवरही पॅगोडा सारखे छप्पर आहे. या इमारतीच्या खालच्या मजल्यावर गन पावडर आणि तोफगोळे साठवले जात. पहिल्या मजल्यावर सैनिकांना  राहाण्यसाठी जागा आहे. तर दुसर्या मजल्यावर गाड्यावर ठेवलेल्या लांब पल्ल्याच्या  तोफा आहेत. येथून किल्ल्याचा संपूर्ण आतील भाग दृष्टीपथात आणि तोफेच्या माराच्या टप्प्यात येतो. या इमारतीच्या मागे पंचकोनी (बाणाच्या आकाराचा) एक बुरुज आहे. सोळाव्या शतकातील फ्रेंच मिल्ट्री इंजिनीअर Sebastian Le Prestre de Vauban याला पंचकोनी बुरुज आणि चांदणीच्या आकाराच्या किल्ल्याच्या डिझाईनचे श्रेय दिले जाते. पण त्या आधी पासून अशा आकाराचे किल्ले आणि बुरुज अतित्वात होते. या पंचकोनी बुरुजाचा फायदा म्हणजे त्याच्या आकारामुळे तोफ गोळा बुरुजावर आपटून होणारे नुकसान कमी होते. तसेच व्दिस्तरीय बुरुजामुळे शत्रूवर जवळून मारा करता येतो.  

 


या इमारतीतून बाहेर पडल्यावर समोर हिरवळ राखलेले मोठे मैदान दिसते. या मैदानाला परेड ग्राऊंड म्हणतात. पहिल्या आणि दुसर्या महायुध्दाच्या काळात या किल्ल्याचा उपयोग सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि जर्मन युध्द कैदी ठेवण्यासाठी केला गेला. या परेड ग्राऊंडवर या किल्ल्यावर ताबा असणार्या ३ देशांचे ध्वज (फ्रान्स (१७२६ - १७५९), इंग्लंड (१७५९-१७९६, १८१४) , अमेरीका (१७९६-१८१३, १८१५ पासून आजतागायत)) फडकवलेले आहेत.

फ्रान्स , इंग्लंड , अमेरीका यांचे ध्वज


किल्ल्यात लोहाराचे दुकान आहे. किल्ल्यातील सैनिकांची शस्त्र बनवणे, त्याला धार लावणे, दुरुस्ती करणे इत्यादी कामे येथे केली जात. स्थानिक रेड इंडीयन्सच्या शस्त्रांची दुरुस्ती पण करुन दिली जात असे.

 


तीन झेंड्यांच्या मागच्या बाजूला असलेल्या वीटांच्या तटबंदीत अर्धगोलाकार कमान असलेला चोर दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर पडल्यावर तीन्ही बाजूंनी तटबंदीच्या आत लपवलेल्या तोफा आपल्यावर रोखलेल्या दिसतात. या तटबंदीच्या पुढे खंदक आणि त्यापुढे लाकडी तटबंदी पाहायला मिळते. चोर दरवाजातून किल्ल्यात येऊन पुन्हा पहिल्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते.

 

चोर दरवाजा

किल्ल्याच्या स्वागत कक्षात आल्यावर किल्ल्यावर , अमेरीकेच्या इतिहासावर लिहिलेली अनेक पुस्तक आणि मोन्य़ूमेंट्स पाहायला मिळतात. स्वागत कक्षातून बाहेर पडल्यावर समोरच नायगरा नदी काठी इसवीसन १८७३ मध्ये बांधलेला दिपस्तंभ आहे. तो १९९६ पर्यंत कार्यरत होता.  किल्ल्याच्या बाहेर पार्क मध्ये नायगरा नदीच्या काठी लाकडी टेबल्स आणि बाक ठेवलेले आहेत. जर तुम्ही सोबत जेवण पॅक करुन घेऊन आला असाल तर इथल्या निसर्गरम्य वातावरणात त्याचा आस्वाद घेऊ शकता.

 

दिपस्तंभ 

दरवर्षी अमेरीकन स्वातंत्र्य दिवसाच्या आठवड्यात (४ जुलै) या किल्ल्यावर अठराव्या शतकातले वातावरण निर्माण केले जाते. फ्रेंच आणि रेड इंडीयन्स यांच्या मध्ये झालेले युध्द स्वयंसेवकांकडून पुन्हा किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर साकारल जाते.

 

अमेरीका आणि कॅनडा यांच्यातील तहाचे स्मारक


नायगरा धबधब्याला भेट देणार असाल तर दोन तास " ओल्ड नायगरा फोर्ट" साठी नक्की काढून ठेवा.

जाण्यासाठी :- ओल्ड फोर्ट नायगराला जाण्यासाठी जवळचा विमानतळ बफेलो आहे. बफेलो विमानतळावरुन ६० किलोमीटर व जगप्रसिद्ध नायगरा धबधब्यापासून २८ किलोमीटरवर  "ओल्ड फोर्ट नायगरा " किल्ला आहे.

 

नायगरा नदी पलिकडे कॅनडा

छायाचित्रण:- अमित सामंत, अस्मिता सामंत (©Copy Right)

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro -5


1) डाविन कॅसल (स्लोव्हाकीया) :- (विदेशातले किल्ले भाग -१) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

2) अलिंजा कॅसल, माचू पिचू ऑफ अझरबैजान Alinja Castle , Machu Pichu of Azerbaijan ( विदेशातले किल्ले भाग - २) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

3) डन्स्टाईन कॅसल ,ऑस्ट्रिया  (विदेशातले किल्ले भाग-३) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

4) इटर्नल फ़्लेम (Eternal Flame) ट्रेक हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा