Saturday, June 21, 2025

नाझका लाईन्सचे गुढ (भाग- २) ( Unsolved Mystery of Nazca Lines - 2)

 

Parrot , Nazca lines

    नाझका रेषा आणि चित्र प्रत्यक्ष पाहिल्यावर त्याची व्याप्ती आणि भव्यपणा आपल्याला भारुन टाकतो आणि मग साहजिकच प्रश्न पडतात. नाझका लाईन्स कोणी कोरल्या ? कशा कोरल्या ? आणि का कोरल्या ?  नाझका रेषा आणि चित्र सापडल्या पासून या प्रश्रांची उत्तर शोधण्याचा आणि नाझका रेषांचे गुढ उकलण्याचा प्रयत्न पूरातत्वशास्त्रज्ञ, जिओलॉजी तज्ञ, कॉस्मोलॉजी तज्ञ, जलतज्ञ इत्यादी विविध शाखांमधले तज्ञ करत आहेत.

इसवीसनाच्या सतराव्या शतकात पेरु मधील एका प्रवाशाला नाझका लाईन्स मधिल काही रेषा दिसल्याचा उल्लेख त्याने त्याच्या नोंदीत केलेला आहे. या रेषा म्हणजे इंका ट्रेलच्या काही खूणा असाव्यात असा तर्क त्याने मांडला. पंधराव्या शतकात इंका साम्राज्यांनी अनेक शहरे वसवली, पण आतापर्यंत सापडलेला अवशेषांमध्ये नाझका लाईन्सशी साधर्म्य असणारे कुठलेही अवशेष त्यात सापडलेले नाहीत. इसवीसन १९२६-३० च्या दरम्यान नाझका वाळवंटावरुन विमानांचे उड्डाण व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी वैमानिकांना जमिनीवर खोदलेली चित्र आणि रेषा पहिल्यांदा पूर्णपणे दिसायला लागल्या. त्यानंतर पेरुच्या हवाई दला तर्फे या भागात शोध मोहिमा घेण्यात आल्या. पण ही चित्रे आणि रेषा शोधण्याला खरी गती आली ती इसवीसन १९४१ साला नंतरच. जर्मन पूरातत्व शास्त्रज्ञ मरिया राश्चे (Maria Reiche) यांनी नाझका पंपाच्या वाळवंटात प्रत्यक्ष जाऊन ती चित्र आणि रेषा पाहिल्या आणि त्यांच्या भव्यतेने त्या भारुन गेल्या. त्या रेषां जवळच भर वाळवंटात घर बांधून त्या राहील्या आणि जवळपास १४ चित्र उजेडात आणली. त्यांना "लेडी ऑफ लाइन्स”  या नावाने ओळखले जाऊ लागले. पेरु सरकारने नाझका वाळवंटातील काही भाग लागवडी खाली आणण्यासाठी प्रयत्न चालू केले होते. त्यामुळे नाझका रेषांना धोका उत्पन्न झाला होता. त्यावेळी मरिया राश्चे यांनी पेरु सरकारच्या या प्रकल्पाला विरोध करुन हा प्रकल्प थांबवला होता. त्यांच्या अथक प्रयत्नाने १९९४ मध्ये नाझका लाईन्सना युनेस्कोच्या वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाले.

Flower Nazca lines

    मरिया राश्चे यांनी नाझका लाईन्सचा अभ्यास केला तेंव्हा त्यांना यातील काही रेषा या सूर्याच्या दक्षिणायन आणि उत्तरायण याच्याकडे निर्देश करत आहेत असे आढळून आले. त्यामुळे त्यांनी या रेषांच्या आणि चित्रांचा संबंध खगोलीय कॅलेंडरशी आहे असा तर्क मांडला. जगभरच्या खगोल शास्त्रज्ञांनी यावर अभ्यास केला, पण काही रेषा वगळता या नाझका लाईन्स आणि चित्रांचा खगोलीय कॅलेंडरशी काही संबंध आढळला नाही त्यामुळे ती थेअरी मागे पडली.

त्यानंतर काही तज्ञांनी असा दावा केला की, या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पाणी साठवण्यासाठी या रेषा आणि चित्रे खोदली गेली. यावर भूगर्भ शास्त्रज्ञ आणि जलतज्ञांनी अभ्यास केला. नाझका लाईन्स या रुंदीला १२ इंच ते ७२ इंच रुंदीच्या आहेत. तर त्यांची खोली १० ते ३० सेंटीमीटर (४ ते १२ इंच) इतकीच आहे. नाझका वाळवंट हे जगातील सगळ्यात कोरडं वाळवंट आहे. इथे पाऊस जवळजवळ पडतच नाही . त्यामुळे इथे पाणी साठवण्यासाठी किंवा जमिनीत मुरण्यासाठी या लाईन खोदल्या असण्याची शक्यताच मोडीत निघते.  या थेअरी मध्ये काही तथ्य आढळले नाही. त्यामुळे ही थेअरी  मागे पडली.  

इसवीसन १९७० च्या दशकात परग्रहवासी , UFO इत्यादी गोष्टींची चलती होती. त्यातच Chariots of gods हे Erich von Daniken या लेखकाने पुस्तक प्रसिध्द केल. त्यात त्यांनी असा दावा केला की नाझका लाईन्स परग्रहवासी लोकांनी बनवलेल्या आहेत. त्यांना  ग्रहमालेतील पृथ्वीचा पत्ता सापडावा याकरिता या केवळ आकाशातून दिसणार्‍या रेषा त्यांनी बनवलेल्या आहेत.  दुसर्‍या दाव्यानुसार या लाईन्स म्हणजे परग्रहवासींची यान उतरण्यासाठी बनवलेल्या एअर स्ट्रीप्स असाव्यात. नाझका लाईन्स मध्ये डोंगर उतारावर एक हात वर केलेल्या माणसाचे चित्र कोरलेले आहे. त्याला स्पेस मॅन ( Astronaut ) म्हटले जाते. या थेअरी मध्येही काही तथ्य न मिळाल्याने ती मागे पडली.

Puquio, Nazca

पूरातत्वशास्त्रज्ञांना या भागात शोध घेतांना एका संस्कृतीचे अवशेष सापडले. त्याचे नामकरण त्यांनी "नाझका संस्कृती" असे केले. इसवीसन पूर्व (BC) १०० ते इसवीसन (AD) ६०० याकाळात नाझका वाळवंटात ही संस्कृती नांदत होती. अँडीज पर्वता मध्ये उगम पावणार्‍या काही नद्या या नाझका वाळवंटातून वहात होत्या. त्याकाठी ही संस्कृती बहरली होती. त्यांनी जमिनीतील पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पुकियोज (Puquio) बांधले. पुकीयोज म्हणजे गोल आकाराचे एका खाली एक बांधलेले खालच्या, बाजूला निमुळते होत जाणारे खड्डे. हे खड्डे दगडांनी बांधलेले आहेत आणि एकमेकांशी जोडलेले आहेत. त्यांच्या निमुळत्या होत जाणार्‍या आकारामुळे जमिनी खालच्या भागात सूर्याचे उन (उष्णता) पोहोचत नाही. त्यामुळे वरच्या गोलातील तापमान आणि सर्वात खालच्या गोलातील तापमान यात ८ अंशाचा फ़रक असतो. त्यामुळे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. नंतरच्या काळात इंकांनी पण या पुकीयोज सारख्या रचना मोराय येथे बांधलेल्या त्यांच्या शेतीच्या प्रयोगशाळेसाठी केलेल्या पाहायला मिळतात. 

Inca Structure , Moray

या पुकियोजचा वापर करुन नाझका संस्कृतीतील लोकांनी मका, बीन्स, बार्ली, कापूस इत्यादी पिके घेतली. या लोकांनी बनवलेली सिरॅमिकची उत्तम भांडी येथे केलेल्या उत्खननात सापडलेली आहेत. त्यावरही हमिंग बर्ड, माकड, कंडोर इत्यादी नाझका लाईन्स मध्ये दिसणारी चित्र पाहायला मिळतात. आजही हे पुकीयोज आणि त्यातील पाण्यावर केली जाणारी शेती नाझका वाळवंटात पाहायला मिळते.


Cyramic pots , Nazca Cul

नाझका पासून २५ किलोमीटर अंतरावर पूरातत्वशास्त्रज्ञांना १.५ स्क्वेअर किलोमीटरवर पसरलेले कवाची (Cahuachi) हे गाव सापडले. या गावात वस्तीचे अवशेष सापडलेले नाहीत. पण याठिकाणी अनेक धार्मिक विधी पार पाडले जात असल्याचे पुरावे त्यांना इथे मिळाले आहेत. 

Cahuachi, Nazcz


काही पूरातत्वशास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, या नाझका लाईन्स आणि चित्रे याच नाझका संस्कृतीतल्या लोकांनी काढली असावीत. ती कशी काढली हे समजून घेण्यासाठी त्यांनी नाझका वाळवंटात काही प्रयोग केले . नाझका लाईन्स आणि चित्र जिथे बनवली आहेत तिथे जमीनीवर आर्यन ऑक्साईडचा थर पसरलेला आहे. त्या थराच्या खाली पांढऱ्या मातीचा थर पसरलेला आहे. आर्यन ऑकसाईडच्या थरात छोटे छोटे दगड आहेत. हे दगड हातानेही बाजूला करता येतात. दगड बाजूला करुन ठेवले की खालची पांढरी माती दिसायला लागते. अशा प्रकारे दगड बाजूला करत गेल्यास पांढर्‍या रेषा तयार होतात. पांढऱ्या मातीमुळेच ऑक्साईडने बनलेल्या जमिनीवर या रेषा उठून दिसतात. नाझका लाईन्स मध्ये खोदलेल्या आकृत्या, रेषा, चित्र अशा प्रकारेच बनवण्यात आलेली आहेत असा दावा करण्यात आला असला तरी अवाढव्य चित्र, भौमित्तीक रचना आणि मैलोंमैल जाणार्‍या सरळ रेषा  ज्या केवळ आकाशातूनच (५०० फ़ूट उंचीवरुन) दिसतील यापधद्तीने कशाप्रकारे काढल्या गेल्या असतील?  त्या योग्य प्रकारे काढल्या जात आहेत की नाहीत यावर कोणी आणि कुठून लक्ष ठेवले असेल. हे प्रश्न अनुत्तरीतच आहे. 




हे संशोधन चालू असतांनाच नाझकाच्या उत्तरेला ६० किलोमीटर अंतरावर काही चित्र डोंगर उतारावर सापडली. त्या चित्रांना पल्पा लाईन्स या नावाने ओळाखले जाते. त्यांच्या अभ्यास करतांना पूरातत्वशास्त्रज्ञांच्या असे लक्षात आले की, ही चित्र नाझका संस्कृतीच्या आधीच्या काळी इसवीसन पूर्व (BC) ८०० ते इसवीसन पूर्व (BC) १००  इथे नांदत असलेल्या पराकस संस्कृतीतील लोकांनी बनवलेली आहेत. पराकस संस्कृतीतील लोकांनी बनवलेल्या सिरॅमिकच्या भांड्यांवर हिच चित्र सापडली आहेत. पेरुची राजधानी लीमापासून २६० किलोमीटर अंतरावर पराकस शहर आहे. या शहराजवळ समुद्राला लागून असलेल्या डोंगरावर एक त्रिशुळाच्या आकाराची ७०० फ़ूट उंच आकृती कोरलेली आहे.  त्याला Candelabro de Paracas (Candelabra of Paracas) मेणबत्तीचा स्टॅंड किंवा Trident of Paracas (त्रिशुळ) या नावाने ओळखले जाते. डोंगरावर कोरलेल्या या चित्राचा उपयोग खलाशांना होत असावा असा अंदाज आहे.

Trident of Paracas

पराकस येथील डोंगरावर कोरलेले हे चिन्ह म्हणजे त्रिशुळ असून त्याचा संबंध थेट रामायणाशी आहे असाही दावा केला जातो. या पर्वताचे वर्णन किष्किंधा कांडात आढळते. किष्किंधा कांडात सीतेच्या शोधासाठी वानर चारही दिशांना जाणार होते तेंव्हा त्यांना मार्गदर्शन करताना सुग्रीवाने त्यांना वाटेत कोणत्या खाणाखूणा दिसतील याचे वर्णन केलेले आहे (हे संपूर्ण वर्णन वाचण्या सारखे आहे. यात भारतापासून पूर्वेला इंडोनेशिया - जावा - ऑस्ट्रेलिया ते पेरु (पराकासचे त्रिशुळ) या मार्गाचे त्यावरील खाणाखुणां सकट अचूक वर्णन केलेले आहे.) त्यात पूर्वेकडील (सध्याच्या पेरु देशातील) उदय अग्री (सुर्योदयाचा पर्वत) वर्णन करतांना सुग्रीव सांगतो.
  
त्रिशिराः काञ्चनः केतुस्तालस्तस्य महात्मनः स्थापितः पर्वतस्याग्रे विराजति सवेदिकः ॥५३॥

त्रिशिरधारी सुवर्ण ध्वज पर्वताच्या अग्रावर तळपत होता ज्याचा पाया भूतलावर होता.

यात पराकस किनार्‍यावरील डोंगरावर कोरलेल्या त्रिशुळाचा उल्लेख केलेला आहे.  पुढे वर्णन करतांना सुग्रीव म्हणतो, 

पूर्वस्यां दिशि निर्माणं कृतं तत् त्रिदशेश्वरैः । ततः परं हेममयः श्रीमानुदयपर्वतः ॥५४॥

पूर्व दिशा निर्देशित करण्यासाठी इंद्राने  ही रचना निर्माण केली होती. 

सध्या आपण पृथ्वीवर जपान मध्ये सर्वप्रथम सूर्याचा प्रकाश पडतो असे मानतो. रामायणात मात्र उदय अग्रीवर सर्व प्रथम सूर्य उगवतो असे मानले जाते. कारण वामन अवतारात (त्रिविक्रम) विष्णूने तिन्ही लोक पादाक्रांत करतांना पहिले पाऊल या उदय अग्री पर्वतावर ठेवले होते.  (अग्रीचा अपभ्रंश अँडीज असावा)

तत्र पूर्वं पदं कृत्वा पुरा विष्णुस्त्रिविक्रमे। द्वितीयं शिखरे मेरोश्चकार पुरुषोत्तमः ॥५८॥



पराकस येथे डोंगरावर कोरलेल्या या चित्राचा उपयोग खलाशांना दिशादर्शनासाठी होत असावा. मग नाझका लाईन्सचा उपयोग नक्की कशासाठी होत असावा असा प्रश्न पूरातत्वशास्त्रज्ञांना पडला होता . त्यासाठी त्यांनी एक प्रयोग करायचे ठरवले. नाझका लाईन्स आणि त्याच्या बाजूचा भाग यांचा “magnetometry survey" केला. या सर्व्हे मध्ये दोन्ही भागातले  "मॅग्नेटीक फ़िल्ड" मोजण्यात आले. त्यात असे आढळून आले की नाझका लाईन्सच्या आत आणि बाहेर मॅग्नेटिक फ़िल्ड मध्ये फ़रक आहे. लाईन्स आणि चित्रांमधल्या रेषांमध्ये अनेक वेळा दाब पडल्यामुळे त्याचे मॅग्नेटिक फ़िल्ड हे रेषे बाहेरच्या मॅग्नेटीक फ़िल्ड पेक्षा वेगळे आहे. रेषांमध्ये हा दाब कशाचा पडला असावा ? याचा अभ्यास करतांना असे लक्षात आले की या रेषांमधून लोकांनी अनेक वर्षे चालत / नाचत फ़िरल्यामुळे त्याचा जमिनीवर दाब पडून त्याचे Soil composition बदलले आहे. त्यामुळे त्याचे मॅग्नेटीक फ़िल्ड पण बदललेले आहे. 

Entry & Exit

नाझका येथिल चित्रांचा अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की, ही चित्रे ज्या रेषांनी काढलेली आहेत त्यांना सुरुवात आणि शेवट आहे. त्यामुळे एका रेषेवरुन चित्रात प्रवेश करुन दुसर्‍या बाजूने बाहेर पडता येते. तिथे असलेल्या वर्तुळाकार चिन्हा मध्येही अशीच रचना पाहायला मिळते. त्यामुळे त्याकाळातले लोक या रेषांवरुन फ़िरत असावेत . तो त्यांच्या उपासनेचा (Rituals) भाग असावा (जसे आपण देवळात प्रदक्षिणा घालतो तशा प्रकारचा) असे अनुमान पूरातत्वशास्त्रज्ञांनी काढलेले आहे . 

Entry-Exit

नाझका वाळवंटाचा सर्व्हे करुन पूरातत्वशास्त्रज्ञांनी त्याचे ३ डी मॉडेल बनवून AI च्या सहाय्याने त्याचा अभ्यास केल्यावर त्यांना असे आढळून आले की, या नाझका लाईन्स मध्ये जिथे जिथे समलंब चौकोन आहेत तिथे तिथे मातीचे दोन छोटे उंचवटे आहेत. त्याठिकाणी उत्खनन केल्यावर त्यांना मातीचे ओटे (चौथरे) आढळून आले . तेथे मका, बार्ली , कापडाचे तुकडे आणि शिंपले यांचे अवषेश मिळाले. इथे मिळालेले स्पॉन्डिलस (Spondylus) शिंपले हे अँडीज पर्वत रांगेत राहाणारे लोक त्यांच्या पूजेत वापरतात. हा शिंपला पाण्याचे आणि सृजनाचे प्रतिक आहेत. हे शिंपले इथून हजारो किलोमीटर दूर असलेल्या इक्वेडोर देशाच्या किनार्‍यावर सापडतात. या मातीच्या ओट्याचा उपयोग देवाला नैवेद्य (Offering) ठेवण्यासाठी केला जात होता . नाझका वाळवंटातील चित्रात काढलेले बहुतांश प्राणी आणि पक्षी हे पाण्याशी संबंधीत आहेत. त्यावरुन पूरातत्वशास्त्रज्ञांनी असे मत मांडले आहे की, वाळवंटात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी. या पाण्यासाठी देवांना आवाहन करण्याकरीता नाझका संस्कृतीतील लोकांनी या रेषा, चित्र कोरलेली आहेत. 

Spondylus Shell

आठव्या नवव्या शतकात आलेल्या लागोपाठच्या प्रचंड दुष्काळामुळे नाझका संस्कृती या भागातून् नष्ट झाली. पावसाचे प्रमाण या भागात आजही नगण्य असल्यामुळे नाझका लाईन्सची एवढी वर्ष होऊनही झीज झालेली नाही. त्यामुळे रेषा आणि चित्र आजही आपल्याला पाहायला मिळतात.

आत्तापर्यंत ८०० सरळ रेषा, ३०० भौमित्तिक रचना, ७० प्राणी, पक्षी , झाडे या नाझका लाईन्स मध्ये काढलेली सापडलेली आहेत. यातील अनेक प्राणी, पक्षी , किटक इथून अंदाजे  १००० किलोमीटर अंतरावर असेलेल्या ॲमेझॉनच्या जंगलातच आढळतात. ते नाझका वाळवंटात इतक्या बारकाईने कोणी आणि का कोरले ?  त्यामधिल भव्यता, प्रमाणबध्दता आणि गुंतागुंत पाहाता ही केवळ आकाशातूनच दिसतील अशी चित्र कोणी आणि का ? काढली असावित हे अजूनही न उलगडलेल कोडच आहे. 


२००४ ते २०२४ मध्ये जपानी संशोधकांच्या टिमने ड्रोन आणि AI च्या सहाय्याने नाझका वाळवंटाचा सर्व्हे केला. तेंव्हा त्यांना ३१८ नविन Geoglyps सापडली आहेत. त्यावरुन आता पुढील अभ्यास चालू आहे. नजिकच्या काळात कदाचित नाझकाचे रहस्य उलगडू शकेल.




नाझका लाईन्सचे गुढ (भाग- १) ( Unsolved Mystery of Nazca Lines ) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...


Paracas Geoglyphs

 

Photos by :- kaustubh, Asmita &  Amit Samant  © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Go Pro 13, Google pixle

References :- 1) Nazca : Decoding the riddle of the lines

2) Finger prints of the god  :- Graham Hankok

3) Magicians of the Gods :- Graham Hankok

4) Research Paper :- AI-accelerated Nazca survey nearly doubles the number of known figurative geoglyphs and sheds light on their purpose. September 2024.


Offbeat Kokan  गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg) वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा ...


44 comments:

  1. खूप छान माहिती आहे.

    ReplyDelete
  2. अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. असेच लिहित रहा व आम्हालाही वाचायला नवीन माहिती देत आहात. खूप छान

    ReplyDelete
  3. बापरे. केवढा अभ्यास आहे हा. अतिशय माहितीपूर्ण लेख आणि व्यवस्थित मांडणी असल्या मुळे प्रवास वर्णन वाटत नाही. आपण सुद्धा त्या रेषा का असाव्यात ह्याचा विचार करतो. असो ह्या विषयाचा संपूर्ण अभ्यास असल्या शिवाय एवढा लेख होऊच शकत नाही. धन्यवाद माहिती बद्दल.

    ReplyDelete
  4. अद्भुत, वाखाणण्याजोगी माहिती वाचून ज्ञानात तर भर पडली खूपच छान

    ReplyDelete
  5. दोन्ही ब्लॉग वाचले, उत्तम लेख, छान माहितीपूर्ण लेख आहे....द्रुमन..

    ReplyDelete
  6. गुरुदत्त तेलंगेJune 21, 2025 at 7:03 PM

    खूप चांगली माहिती, अभ्यास पूर्ण माहिती,
    वाचताना आपण तेथे गेल्यासारखे वाटते

    ReplyDelete
  7. हेमंत सावंतJune 21, 2025 at 7:04 PM

    खरोखर अप्रतिम आणि ज्ञान्यात भर घालणारी माहिती मिळाली, डोंगरभाऊंचे खूप खूप आभार, आणि शतशः प्रणाम 👍👍🙏🙏💐💐

    ReplyDelete
  8. डोंगरभाऊ खूप खूप धन्यवाद या अद्भुतरम्य माहितीसाठी! पुढच्या उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  9. amazing information and knowledge 👌👍👍

    ReplyDelete
  10. सुंदर माहीती. भारतीय पुराणांना सत्य ठरवणारा हा मोलाचा पुरावा आहे

    ReplyDelete
  11. खूप छान लेख सर

    ReplyDelete
  12. Bhaari lihila aahes re Dada..... Koni Kadhali astil ? Paragrahwasi astil te lok... Dr.Sureshchandra Nadkarni ne sangitlya pramane maanus ch upra asel Pruthivar..... aani trishul baddal me pan purvi aikle hote... kiti clear diste te... Aaplya kade pan Kaatalshilp aahet. Kasale bhaari aahet. aani khup mothi mothi chitre aahet tee.

    ReplyDelete
  13. खुप महितीपूर्ण लिखाण, अमित. तुझ्या डोंगरभाऊ या नावाला सलाम. इतक्या विविध ठिकाणी जाणे, माहिती संकलित करणे आणि ती लोकांपुढे आणणे, ही खरंच एक अवघड बाब आहे जी तु सहजरीत्या निभावून नेतोस. तु आणि तुझ्या सर्व टीमचे अभिनंदन

    ReplyDelete
  14. अप्रतिम लेख, खूपच छान

    ReplyDelete
  15. खूप छान लेख साहेब

    ReplyDelete
  16. खूप छान माहिती

    ReplyDelete
  17. संतोष कदमJune 21, 2025 at 9:45 PM

    त्या काळात विमाने अथवा अवकाश भ्रमण करण्याचे साधन नसताना ही उपद्व्याप कोण करेल? एक तर पूर्वी प्रगत संस्कृती येथे होती किंवा पृथ्वीबाहेर होती हे यावरून सिद्ध होऊ शकते. पाषाणयुग, ताम्रयुग वगैरे पहाता येथे प्रगत संस्कृती होती म्हणता येणार नाही परंतु बाहेरून कोणीतरी पृथ्वीवर लक्ष ठेवले असेल अशी दाट शक्यता आहे. त्याच्या या खुणा आणि त्याबाबत माहिती दिल्याबद्दल डोंगरभाऊ आपले शतशः आभार.

    ReplyDelete
  18. खूप सुंदर अभ्यासपूर्ण लेख, आवडला.-रितेश वाझकर.

    ReplyDelete
  19. खूप च अद्भुत,माहिती,छायाचित्रे,रोचक माहिती विश्लेषणे. ओघवणारी लेखन पद्धती.लेख सतत वाचत पूर्ण करावा.खूप छान देश बाहेर ही पाहण्यासारखे खूप आहे.सुन्दर दृष्टिकोन.धन्यवाद.

    ReplyDelete
  20. 2nd part also deyond imagination

    ReplyDelete
  21. खरंच....कधीही न ऐकलेले 'नाझका लाईन्स'..... पण इतके गूढ रहस्य..... सुंदर लिखाण.... अमित सर.... Keep it up......

    ReplyDelete
  22. खूप छान माहिती आहे.
    उत्सुकता वाढत जाते वाचताना.
    अजून असे लेख वाचायला खूप आवडेल.

    ReplyDelete
  23. Nice information 👍👍

    ReplyDelete
  24. भाग २ हि अनोख्या माहिती सहीत नेहमीप्रमाणे उत्तम.....

    ReplyDelete
  25. अमित, हा ब्लॉग म्हणजे तुझ्या नेहमीप्रमाणेच ओघवत्या भाषेत लिहिलेली उत्कंठावर्धक रहस्यकथाच जणू..खरच नाझका लाईन्स म्हणजे केवळ अनाकलनीय गुढ..अजुन असे लेख वाचायला खरच आवडेल..

    ReplyDelete
  26. देवेन सावंतJune 22, 2025 at 12:51 PM

    अत्यंत सुदंर माहिती चित्र आणि त्यांची उत्पती जाणून घ्यायला आनंद वाटला.
    तूझ्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा 🙏

    ReplyDelete
  27. नेहमीप्रमाणे खूप छान आणि माहितीपूर्ण.

    ReplyDelete
  28. अप्रतिम लेख, खूपच छान

    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम लेख, खूपच छान

      Delete
  29. अनिल सावंतJune 22, 2025 at 9:17 PM

    नाजका लाईन्स हे खरोखरच एक गूढ आहे. जगभरात बऱ्याच ठिकाणी अशी शिल्पे आढळतात आणि त्यांचे गुढही कधी उलगडू शकेल की नाही हे आपण सांगू शकत नाही. उत्सुकता वाढवणारा लेख. अप्रतिम

    ReplyDelete
    Replies
    1. Very interesting and informative

      Delete
  30. . खूप छान माहिती

    ReplyDelete
  31. नेहमी प्रमाणेच ओघवत्या निवेदन शैलीमुळे सहज समजणारा, अभ्यासपूर्ण अप्रतिम लेख.

    ReplyDelete
  32. बाप रे,
    अमित,
    किती अभ्यास केला आहे तुम्ही....
    खूप छान, वाचताना कुठेही बोअर होत नाही.
    प्रवाही भाषा आहे.
    पुढील लेखांची वाट बघतोय..

    ReplyDelete
  33. अतिशय अभ्यासपूर्ण आणि रंजक लेख! विस्मयकारक माहीती!!

    ReplyDelete
  34. सामंत सर, आपण नाझका लाईन्सवरील आपल्या अनुभवाचे केलेले वर्णन अतिशय जिवंत आणि माहितीपूर्ण आहे. माचू पिचूच्या ओढीपासून सुरू झालेला प्रवास, पराकसचे निसर्गसौंदर्य, आणि नाझकाच्या आकाशातून दिसणाऱ्या रहस्यमय आकृत्यांची रोमांचक सफर वाचताना आम्हालाही त्या क्षणांमध्ये जगायला भाग पाडते. विविध प्राणी, पक्षी, भौमितिक आकृत्या आणि त्या मागे दडलेले प्रश्न यांचा अचूक आढावा घेऊन आपण लेखाला अभ्यासाचा आणि विचारप्रवृत्ततेचा दर्जा दिला आहे. आपल्या लेखामुळे नाझका लाईन्सकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच व्यापक आणि जिज्ञासावर्धक झाला आहे.

    ReplyDelete
  35. It is very interesting and informative 👍

    ReplyDelete
  36. This is a completely new subject for me. Nicely explained. Thanks.

    ReplyDelete
  37. खूप छान!

    ReplyDelete
  38. नाझका लाईन्स ब्लॉगचा दुसरा भाग ही गूढ रम्यच.खरोखरच या अनादी अनंत विश्वात खरोखरच अजून कुणीतरी आहे तिथे ? ही कातळ चित्रे इतकी विशाल आहेत हे या ब्लॉग वरूनच कळले. अँडीज पर्वतावरील रहस्यमय त्रिशूळाबाबतचे विवेचन रोचक आणि उत्सुकता वाढवणारे आहे.हिंदू संस्कृतीबाबत अभिमान आहेच तो या विवेचनाने वृद्धिंगत झाला.

    ReplyDelete
  39. Very interesting read thoroughly researched and thought provoking.
    Thank you very much for sharing,dear Amit.
    May you continue to explore such exotic places and share with us commoners.

    ReplyDelete
  40. सुधिर नेमाडेJune 26, 2025 at 10:20 AM

    पहिल्या भागात नाझका रेषांचे दर्शन घडवून या भागात त्यांच्या उत्पत्ती बद्दल चे सुंदर अभ्यासपूर्ण वर्णन केले आहे. अमित तुला सलाम!

    ReplyDelete
  41. श्रीनाथ कुलकर्णीJuly 2, 2025 at 6:11 PM

    अद्भुत माहिती दिली आहेस. परदेशात जाऊन इतका खोलवर अभ्यास आणि माहिती एखादा पुरातत्व अभ्यासकच करू शकतो. खूप विस्तृत पणे मांडले आहेस.

    ReplyDelete