Monday, January 20, 2025

डन्स्टाईन कॅसल ,ऑस्ट्रिया (विदेशातले किल्ले भाग-३)

 

डन्स्टाईन कॅसल, गाव आणि डॅन्यूब नदी 

ऑस्ट्रियातील हॉलस्टट या नितांत सुंदर गावाहून वाचाऊ व्हॅलीत जाण्यासाठी जी गाडी ठरवली होती त्या गाडीचा चालक आणि मालक डेव्हिड हा स्लोव्हाकीयाचा तरुण मुलगा होता. टुरीस्ट सिझनच्या काळात स्लोव्हाकीयातले अनेक तरुण व्हिएन्ना मध्ये येतात. व्हिएन्ना शहर महागडे असल्यामुळे एखादी खोली भाड्याने घेऊन पाच सहा जण एकत्र राहातात. त्यातील कोणी हॉटेलात काम करतात, कोणी गाड्या चालवतात. सिझन संपला की सगळे आपापल्या गावी परत जातात. 

राजवाड्याचे अवशेष, डन्स्टाईन कॅसल

वाचाऊ व्हॅली फिरतांना शेवटच्या टप्प्यात डन्स्टाईन कॅसल बघायचे ठरवले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास धुवाधार पाऊस सुरु झाला. डन्स्टाईन गावात  वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळे गावाबाहेर असलेल्या वाहनतळापाशी पोहोचलो तर तिथे शुकशुकाट होता. आमची एकमेव गाडी त्या वहानतळावर उभी होती. डेव्हिडने त्याच्या मोबाईल मधले "स्काय मेट" चालू करुन किल्ल्यावर ढग आहेत आणि पश्चिमेकडून ढग येत असल्यामुळे पाऊस थांबणार नाही असे सांगितले. त्यामुळे आपण किल्ला न पाहाता थेट व्हिएन्ना गाठुया असे तो आम्हाला सुचवत होता. पण आम्ही तयारीतच आलो होतो. आमच्या सॅक मधले पॉन्चो अंगावर चढवून आम्ही धुवाधार पावसात डन्स्टाईन गावाकडे कूच केली. या भागात ऑगस्ट महिन्यात रात्री ८ वाजल्या नंतर सुर्यास्त होतो. त्यानंतर अर्धा तास संधिप्रकाश असतो. त्यामुळे आम्ही निर्धास्तपणे किल्ल्याकडे निघालो होतो. 

डन्स्टाईन गाव

ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्ना पासून ८० किलोमीटरवर डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरावर वाचाऊ व्हॅली वसलेली आहे. हिरवेगार डोंगर त्यातून डोकावणारी लालचुटूक रंगाच्या छप्परांची घरे, त्या गर्दीतून मान उंच करून पाहाणारा एखादा चर्चचा टॉवर, नदी काठाने जाणारा वळणावळणाचा रस्ता, रस्त्यापासून थोड्या उंचावरून जाणारी रेल्वे असे स्वप्नवत दृश्य वाचाऊ व्हॅलीत फ़िरतांना दिसते. डॅन्यूब नदीच्या खोऱ्यात वसलेल्या वाचाऊ व्हॅलीला आणि डन्स्टाईन कॅसलला युनेस्कोच्या 'वर्ल्ड हेरीटेज साईट'चा दर्जा मिळालेला आहे.

प्रवेशव्दार, डन्स्टाईन गाव 

ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्ना ही एकेकाळी युरोपची वाईन कॅपिटल होती. वाईनचा उपयोग चलना प्रमाणे केला जात असे. इसवीसनाच्या आठव्या शतकापासून वाचाऊ व्हॅलीतही मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची लागवड होत होती. त्यामुळे हा भाग समृद्ध होता. युरोपात जाणारे व्यापारी मार्ग या वाचाऊ व्हॅलीच्या खोऱ्यातून जात होते. त्या मार्गावर अनेक ठिकाणी डॅन्यूब नदी चंद्रकोरीच्या आकाराचे वळण घेते, अशाच एका  वळणावर डन्स्टाईन नावाचे प्राचीन गाव वसलेले आहे. या गावाला संरक्षणासाठी तटबंदी बांधलेली होती.  इसवी सनाच्या बाराव्या शतकात या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे संरक्षण करण्यासाठी डन्स्टाईन गावाच्या मागे असलेल्या डोंगरावर पहिला हॅडमर याने किल्ला बांधला.

मध्ययुगीन डन्स्टाईन गाव 

डन्स्टाईन गावाभोवतीची तटबंदी आणि त्यातील प्रवेशद्वारे आजही शाबूत आहेत. काळानुरूप त्यात बदल झालेले आहेत. क्रेम्स (टॉर) गेट (पूर्वीचे नाव स्टेनर गेट) या पूर्वाभिमुख प्रवेशद्वारातून आपला गावात प्रवेश होतो. या चौकोनी प्रवेशद्वारावर पंधराव्या शतकात दुमजली टॉवर बांधलेला आहे. प्रवेशद्वारापासून सुरू होणारी तटबंदी खालच्या बाजूला डॅन्यूब नदीच्या पात्रापर्यंत आणि वरच्या बाजूला थेट कॅसलच्या तटबंदीपर्यंत गेलेली आहे. प्रवेशद्वारातून गावात प्रवेश केल्यावर गावातील छोटे फरसबंदी रस्ते आणि त्याच्या दुतर्फा लालचुटूक रंगाच्या उतरत्या छपरांची सुंदर घरे, घरांच्या गॅलरीत फ़्लॉवर बेडमध्ये फुललेले रंगीबेरंगे फुलांचे ताटवे, दिव्याच्या खांबांवर  लावलेल्या कुंड्यांमधून फुललेली फुले असे रंगीबेरंगी आणि प्रसन्न वातावरण गावभर पसरलेले असते. गावात वहानांना प्रवेश नसल्यामुळे गावामधील गल्ल्यांमध्ये फ़िरतांना मध्ययुगीन युरोपातील गावात फिरल्याचा भास होतो.

प्रवेशव्दार, डन्स्टाईन कॅसल

पावसामुळे गावातही शुकशुकाट होता. गावातल्या भर वस्तीत असलेल्या दोन घरांच्या मध्ये असलेल्या अरुंद गल्लीतून डन्स्टाईन कॅसलला जाणारी पायऱ्यांची वाट आहे. दुतर्फा दाट झाडी असलेल्या या वाटेने अर्ध्या तासात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ला चढतांना वेगवेगळ्या टप्प्यावरून गावाचा आणि डेन्यूब नदीच्या खोऱ्याचा सुंदर देखावा दिसतो. हा किल्ला प्रसिद्धीच्या झोतात आला तो इंग्लंडचा राजा पहिला रिचर्ड (Lion Heart) याला डिसेंबर ११९२ ते मार्च ११९३ या काळात या किल्ल्यात कैदेत ठेवल्यामुळे.



जेरुसलेमची पवित्र भूमी अय्युबीद राजघराण्याच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी तिसरे क्रुसेड युद्ध (Third Crusade (११८९-११९२)) सुलतान सल्लाउदीन आणि तीन राजसत्ता इंग्लंड, फ्रान्स, रोमन यांच्या एकत्रित फौजा यांच्यात झाले. या युद्धाहून परतताना युद्धातील मिळकती वरून ऑस्ट्रीयाचा सरदार (Duke) पाचवा लिओपोर्ड आणि इंग्लंडचा राजा पहिला रिचर्ड यांच्यात वाद झाला. त्यात राजाने ऑस्ट्रीयाचा झेंडा फाडून टाकला. त्यामुळे लिओपार्डीने राजा रिचर्डला डन्स्टाईन कॅसलमध्ये बंदीवान बनवले. त्यातूनच ब्लॉंडेल आणि राजा रिचर्डच्या दंतकथेचा उगम झाला. 

ब्लॉंडेल आणि राजा रिचर्ड


राजा रिचर्डला अटक झाल्यावर त्याला शोधण्यासाठी त्याचा गायक, संगीतकार मित्र ब्लॉंडेल वेगवेगळ्या किल्ल्याखाली जाऊन गाणे म्हणू लागला. असाच एकदा डन्स्टाईन कॅसलच्या खाली येऊन गाण्याचे पहिले कडवे गायल्यावर,  राजा रिचर्डने किल्ल्यातील बंदीगृहाच्या खिडकीत उभे राहून पुढचे कडवे गायले. त्यामुळे राजाचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर खंडणी देऊन राजाची सुटका करण्यात आली. या कथेवर अनेक कादंबऱ्या, नाटक, संगीतिका इत्यादी लिहिल्या गेल्या आहेत. ब्लॉंडेलच्या नावावर २४ प्रसिद्ध  गाणी (courtly songs) आहेत. त्याचा पुतळा डन्स्टाईन गावात आहे. 

हि कथा ऐकल्यावर आपल्या महाराष्ट्रात घडलेल्या एका ऐतिहासिक प्रसंगाची आठवण झाली. पेशव्यांचे सरदार त्रिंबकजी डेंगळे यांना इंग्रजांनी ठाण्याच्या किल्ल्यात बंदिवान करुन ठेवले होते. त्यांनी निसटून जाऊ नये म्हणून त्यांच्या भोवती एतद्देशिय सैनिक न ठेवता इंग्रजी सैनिक ठेवले होते. त्यावेळी त्यांच्या सुटकेची योजना किल्ल्या जवळच्या रस्त्यावर एका शाहिराने गाऊन त्रिंबकजी डेंगळे यांना सांगितली होती अशी दंतकथा आहे. दोन्ही दंतकथेतील साम्य जाणवले आणि गंमत वाटली.



किल्ल्यावर पोहोचल्यावर समोर पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार दिसते. त्या प्रवेशद्वारावर एके काळी छोटेखानी मनोरा होता त्याचे अवशेष आज पाहायला मिळतात. डोंगरावर जागा अरुंद असल्याने किल्ल्यातील इमारती वेगवगळ्या टप्प्यावर बांधलेल्या होत्या. आज त्यांचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. यात प्रशासकीय इमारत, चॅपल आणि राजवाड्याची इमारत यांच्या कमानी आणि काही भिंती आजही तग धरून आहेत. किल्ल्यातील इमारतींच्या उरलेल्या भिंतींवर, किल्ला बांधला तेंव्हा त्या इमारती कशा दिसत होत्या त्याची चित्रे स्टीलच्या पत्र्यावर कोरून लावलेली आहेत. या अरुंद जागेतही इमारतींसमोर आवार /अंगण सोडलेले होते. दोन मजली राजवाड्याच्या उभ्या असलेल्या एकमेव भिंतींच्या खिडकीतून आकाशी आणि पांढऱ्या रंगात रंगवलेला गावातील कॅथेड्रलचा टॉवर सुंदर दिसतो. 

कॅथेड्रल, डन्स्टाईन 

किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर एक प्रचंड मोठा खडक आहे. या खडकात कोरून काढलेली गुहा आहे. गुहेच्या वर असलेल्या दगडावर थोड्याशा परिश्रमांनी चढून जाता येते. आम्ही याठिकाणी पोहोचलो आणि बदाबदा कोसळणारा पाऊस कोणीतरी नळ बंद करावा तसा बंद झाला. थोड्या वेळात ढगांच्या आडून सूर्य प्रकट झाला. पाऊस थांबला असला तरी दगडांवरुन पाणी वाहात होते. त्या निसरड्या दगडावरुन किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर असलेल्या खडकावर चढून गेलो. या खडकावरून प्रचंड मोठा परिसर दृष्टिक्षेपात येतो. डॅन्यूब नदीचे चंद्रकोरीच्या आकाराचे वळण घेणारे प्रशस्त पात्र, त्याचा काठावर असलेले डन्स्टाईन गाव आणि नदीपात्राच्या दोन्ही काठावर असलेली द्राक्षाची हिरवीगार शेती हे सुंदर दृश्य पाहातांना तिथून पाय निघत नाही.

डन्स्टाईन किल्ल्याचा माथा 

गुहा 

युरोपात दिसणारे किल्ले सहसा एकदम चकचकीत आणि रंगरंगोटी करून व्यवस्थित जतन केलेले पाहायला मिळतात. डन्स्टाईन किल्ल्याचे वेगळेपण म्हणजे हा डोंगरी किल्ला आपल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांसारखाच परकीय सत्तेने उद्ध्वस्त केलेला आहे. तसे असले तरी तो सतराव्या शतकापासून आजतागायत आहे तसाच जतन करुन ठेवलेला आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी माहिती फलक आणि उद्ध्वस्त वास्तूंची मूळ रचना दाखवणारी चित्रे लावलेली आहेत. या गोष्टी आपल्या सह्याद्रीतल्या किल्ल्यांवरही करणे सहज शक्य आहे. 

वास्तूंची मूळ रचना

किल्ल्यावरून खाली उतरताना आलेल्या वाटेने न उतरता पूर्वेकडील व्हिएन्ना दरवाजातून खाली उतरताना या वाटेवर अनेक रानफुले फुललेली दिसतात. या वाटेवरून डोंगरात जाणाऱ्या अनेक वाटा फुटलेल्या आहेत. ते छोटे छोटे ट्रेल आहेत. त्या वाटांवरून डोंगरात फिरता येते. डन्स्टाईन गावात पंधराव्या ते सतराव्या शतकातल्या अनेक इमारती आणि घरे आजही छान रंगरंगोटी करुन जतन केलेली आहेत. किल्ल्यावरून सतत डोळ्यांत भरणारा आकाशी रंगाचा कॅथेड्रलचा टॉवर, नदीकाठी असलेला न्यू कॅसल इत्यादी ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. वाचाऊ व्हॅलीत द्राक्षा खालोखाल पिकणारे जर्दाळू आणि त्यापासून बनणारे विविध पदार्थ या गावात मिळतात. ऑस्ट्रीयात फिरायला जाणाऱ्या दुर्गप्रेमींनी थोडी वाट वाकडी करून या रांगड्या गिरिदुर्गाला नक्की भेट द्यावी.


जाण्यासाठी : -
वाचाऊ व्हॅलीत मल्क, स्पिट्झ, डन्स्टाईन आणि क्रेम्स ही गावे पाहाण्यासारखी आहेत. व्हिएन्नाहून वाचाऊ व्हॅलीला जाण्यासाठी बोट, रेल्वे आणि बस असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. व्हिएन्नाहून बोटीने दोन तासात वाचाऊ व्हॅलीत जाता येते. डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरावर असलेली गावे; नदी किनाऱ्यावर, डोंगरात असलेली अप्रतिम घरे आणि वर्ल्ड हॅरीटेजचा दर्जा मिळालेली वाचाऊ व्हॅलीची अप्रतिम दृश्ये पाहत पाहत आपण क्रेम्सला पोहोचतो. 

ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिएन्ना ते व्हिएन्ना तिकिट मिळते. यात व्हिएन्ना ते मल्क ट्रेनचा प्रवास, मल्क ते क्रेम्स बोटीचा प्रवास आणि क्रेम्स ते व्हिएन्ना ट्रेनचा प्रवास करता येतो. या बरोबरच मल्क ऍबी पाहाण्यासाठीचे तिकीट अंतर्भूत असते. ऑस्ट्रीयातील रेल्वे कंपनी OBB Rail च्या साईटवर (https://kombitickets.railtours.at/ wachau- ticket/austria/wachau/wachau-ticket.html) वाचावू व्हॅलीला जाण्यासाठी कॉम्बो तिकीट मिळते.

वाचाऊ व्हॅलीत जाण्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे व्हिएन्नात असलेले टूर ऑपरेटर. व्हिएन्नातून खाजगी बसने आणि कारने वाचाऊ व्हॅलीत घेऊन जातात. तिथे फिरायला साधारणपणे सहा तासांचा वेळ मिळतो. याशिवाय वाईन टेस्टींग टूर, सायकलींग टूरही व्हिएन्नाहून जातात. आपापल्या आवडीप्रमाणे आपण टूर निवडू शकतो. 



छायाचित्रण:-  © कौस्तुभ आणि अमित सामंत  (©Copy Right)
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro -5


1) डाविन कॅसल (स्लोव्हाकीया) :- (विदेशातले किल्ले भाग -१) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

2) अलिंजा कॅसल, माचू पिचू ऑफ अझरबैजान Alinja Castle , Machu Pichu of Azerbaijan ( विदेशातले किल्ले भाग - २) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.

3) परीकथेतील गाव, हॉलस्टॅट (Hallstatt, Austria) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.