Forts, Forts in Sahyadri, Forts in India, Offbeat Treks, Offbeat Places in India, Budget back packing tours, Insects, flowers, Birds, Birds in India, Jungle safari, Nature, Museum, food trails, What & where to eat, Indian food, offbeat places around the world.
अझरबैजान या देशाला "लँड ऑफ फायर" या नावाने ओळखलं जाते. तिथे असलेल्या नैसर्गिक वायुच्या आणि तेलाच्या साठ्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीतून बाहेर पडणाऱ्या ज्वाळा पाहायला मिळतात. तसेच भूगर्भशास्त्रातील (Geology) अनेक आश्चर्य इथे पाहायला मिळतात. भूगर्भशास्त्र शिकताना यातील अनेक गोष्टी शिकल्या होत्या, पण प्रत्यक्षात पाहायला मिळाल्या नव्हत्या. अझरबैजान मध्ये फिरायला जाण्याचे हे पण एक कारण होते.
अझरबैजानची राजधानी बाकू शहराच्या बाहेर पडले की मोकळा भाग सुरु होतो. याभागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जमिनीतून तेल काढण्यासाठी करकोच्या सारख्या दिसणाऱ्या मशिन्स आणि क्रेन्स दिसायला लागतात. अगदी गावातल्या घरांच्या कुंपणाला लागून पण तेल काढणाऱ्या मशिन्स दिसत होत्या. त्यातून निघणार्या पाईप लाईन्स सर्वत्र दिसत होत्या. या भागात जमिनी खाली तेल आणि नैसर्गिक वायुचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत. या भूगर्भातील साठ्यांमुळे याभागात अनेक नैसर्गिक आश्चर्य (Geological wonders) पाहायला मिळतात.
Mud Volcano, Gobustan
जगभरात ९०० च्या वर चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) आहेत. त्यातील निम्मे ज्वालामुखी एकट्या अझरबैजान मध्ये आहेत. बाकू पासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या गोबूस्थानला आपल्या गाडीने पोहोचल्यावर पुढे ज्वालामुखी पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. त्यावरून जाण्यासाठी १९६०-७० च्या जमान्यात बनवलेल्या जुन्या रशियन कार मधून प्रवास करावा लागतो. पूर्णपणे खिळखिळ्या झालेल्या गाड्यां मधून जीव मुठीत बसून प्रवास करावा लागतो. आमच्या गाडीच्या चालकाला त्यांची स्थानिक भाषा सोडून इतर भाषाचा गंधही नव्हता त्यामुळे आम्ही त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केल्यावर त्याने गाडीतल्या गाण्याचा आवाज वाढवला आणि त्या उंच सखल कच्च्या रस्त्यावरुन गाडी बेफ़ाम वेगात चालवायला सुरुवात केली. समोरुन येणार्या गाड्याही त्याच वेगात येत होत्या. असा १० मिनिटाचा थरारक प्रवास संपवून आम्ही मढ व्हॉलकॅनोंच्या परिसरात पोहोचलो.
Mud Volcano, Azerbaijan
लाव्हारस बाहेर पडणार्या ज्वालामुखीचे विवर आपण अनेकदा चित्रात, डॉक्युमेंट्रीज मध्ये पाहिलेले असतें, तसेच चिखलाच्या ज्वालामुखीचे विवर असते, विवराला गोलाकार तोंड असते, फक्त त्यातून लाव्हारसा ऐवजी पाणी, चिखल आणि नैसर्गिक वायू बाहेर पडत असतो. या विवारातून बाहेर पडणाऱ्या चिखलामुळे शंकूच्या आकारच्या ज्वालामुखीच्या टेकड्या तयार होतात. अशाच एका टेकडीवर चढताना चिखलाचे ताजे ओघळ टेकडीच्या उतारावर दिसत होते. टेकडी चढून गेल्यावर ज्वालामुखीच्या तोंडाजवळ चिखल मिश्रीत राखाडी रंगाचे पाणी दिसत होते. ठराविक काळाने त्यात हवेचे मोठे बुडबुडे येऊन फ़ुटत होते. त्या बुडबुड्यांच्या फ़ुटण्यामुळे चिखल खाली ओघळत होता. हे बुडबुडे फ़ुटल्यावर नैसर्गिक वायू बाहेर पडत होता. तिथे असलेल्या स्थानिक माणसाने आम्हाला तो त्याच्याकडील लायटरने पेटवून दाखवला. गेली २५००० वर्ष याभागात हे चिखलाचे ज्वालामुखी आहेत.
चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) तयार होण्यासाठी जमिनीखाली नैसर्गिक वायूचे साठे, पाण्याचा स्त्रोत आणि अवसादी गाळाचा खडक (Sedimentory rock) हे मुख्य घटक असावे लागतात. गाळाचा खडक पाण्यात तो विरघळून चिखल तयार होतो. त्या खाली असलेल्या नैसर्गिक वायूच्या दाबाने तो चिखल वरच्या दिशेला ढकलला जातो आणि जमिनीतून बाहेर पडतो. याठिकाणी जमिनीतून बाहेर पडणारा चिखल साठत जाऊन शंकूच्या आकाराच्या टेकड्या तयार होतात. चिखलाच्या ज्वालामुखीच्या परिसरात फ़िरताना अनेक छोट्या मोठ्या टेकड्या दिसत होता. काही ठिकाणी एकाच टेकडीवर वेगवेगळ्या ऊंचीवर ज्वालामुखीच्या विवराची तोंडे होती. ज्वालामुखीतून येणारा चिखल औषधी असून त्यात आंघोळ केल्यास (लोळल्यास) अनेक व्याधी बर्या होतात असा दावा काही ठिकाणी केला जातो, पण त्याला शास्त्रीय आधार नाही.
चिखलाचा ज्वालामुखीचा (Mud Volcano) व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणावर टिचकी मारा
चिखलाचे ज्वालामुखी (Mud Volcano) पाहून आम्ही पुढचे ठिकाण "यानार डाग" (Yanar Dag) गाठले. बाकूच्या उतरेला १६ किलोमीटरवर यानार डाग आहे. यानार डाग या शब्दाचा अर्थ "जळता पर्वत" (Burning Mountain) असा आहे. येथे एका टेकडीच्या पायथ्याशी अनेक ठिकाणाहून जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडतांना पाहायला मिळतात. याठिकाणी जमिनीखाली असलेला नैसर्गिक वायू गाळाच्या सच्छीद्र दगडातून बाहेर पडतो. अनेक वर्षापासून हा वायू पेटतो आहे. पाऊस , बर्फ़, वारा या नैसर्गिक गोष्टींनी ही आग विझत नाही. या आगीच्या ज्वाळा १ मीटर ते १० मीटर उंची पर्यंत जातात. अझरबैजान देशात अशा प्रकारे जमिनीतून येणारा नैसर्गिक वायू पेटल्यामुळे निर्माण झालेल्या आगी पूर्वी अनेक ठिकाणी होत्या.
यानार डाग" (Yanar Dag)
तेराव्या शतकात सिल्क रुटवरुन प्रवास करणार्या मार्कोपोलोने अझरबैजान मध्ये अशा प्रकारे जमिनीतून पेटलेल्या आगी पाहील्याची नोंद केलेली आहे, पण त्यामुळे नैसर्गिक वायूच्या साठ्याचे नुकसान होत असल्याने सरकारने त्या विझवल्या आता फ़क्त "यानर डाग" येथेच अशा प्रकारे पेटलेली आग पाहायला मिळते. मुस्लिम धर्माचे आक्रमण होण्यापूर्वी झोराष्ट्रीयन धर्म हा अझरबैजानी लोकांचा मुळ धर्म होता. आजही नवरोज हा अझरबैजान मधला प्रमुख सण आहे.
झोराष्ट्रीयन धर्मात आगीला शुध्द आणि पवित्र मानलेले आहे. झोराष्ट्रीयन अग्निपूजक आहेत. या प्रदेशात अशा नैसर्गिकरित्या पेटलेल्या आगी त्यांच्यासाठी पवित्र होत्या. त्या मागचे शास्त्रिय कारण त्यांना त्याकाळी माहिती नव्हते पण या भागात सापडलेल्या दगडावर या आगीचे शिल्पांकन केलेले पाहायला मिळते. यानार डाग इथे पेटलेल्या आगीत अनेक नाणी टाकलेली पाहायला मिळतात. याचा पण धागा जून्या झोराष्ट्रीयन धर्मापर्यंत जातो.
यानार डाग "जळता पर्वत" (Burning Mountain) चा व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणावर टिचकी मारा
बाकूच्या पासून ९० किलोमीटर अंतरावर खिजी जिल्ह्यात "कॅंडी केन माऊंटन" आहेत. या डोंगरांवर असलेल्या पांढर्या , गुलाबी आणि लाल मातीच्या पट्ट्यांमुळे हे डोंगर दुरुन "कॅंडी" सारखे दिसतात म्हणून यांना कॅंडी केन माऊंटन म्हटल जाते. या भागात शिरल्यावर अशा प्रकारचे अनेक डोंगर दिसतात. अशाच एका डोंगराच्या पायथ्याशी आमच्या चालकाने गाडी थांबवली. समोर लाल आणि पांढरे पट्टे असलेली निष्पर्ण डोंगररांग पसरलेली होती. आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली.
कॅंडी केन माऊंटन
ही डोंगररांग शेल या एक प्रकारच्या गाळाच्या खडकापासून तयार झालेला आहे. या खडकात चिकणमाती आणि विविध प्रकारची खनिजे असतात. अशा प्रकारचा गाळाचा खडक अतिशय संथ गतीने तयार होतो. नद्यांनी आणलेला गाळ समुद्रतळाशी किंवा सरोवराच्या तळाशी संथ पाण्यात जमा होत जातो. या गाळात अनेक जीवश्मांचे अवशेषही असतात. या गाळाचे एकावर एक थर जमा होऊन गाळाचा खडक तयार होतो. कालांतराने जमिनीच्या हालचालीमुळे हा दगड जमिनीच्या वर येतो. या दगडात असलेल्या लोहाचा पाण्याशी संयोग होऊन तो ऑक्सिडाईज होते आणि डोंगरावर लाल आणि गुलाबी रंगाचे पट्टे दिसायला लागतात. तर उरलेल्या चिकणमातीचे पांढरे पट्टे तयार होतात.
डोंगरावर चढतांना पाया खालची जमिन भुसभुशीत लागत होती. अनेक ठिकाणी पाण्यामुळे वाहून गेलेल्या मातीमुळे विवर निर्माण झालेली होती. त्यांच्या जवळील भुसभुशीत मातीवरुन जपून चढत होतो. डोंगरावरचे लाल आणि पांढरे पट्टे ओलांडत एका अरुंद जागेवर पोहोचलो, दोन्ही बाजूला दरी होती. याठिकाणी भुसभुशीत जमिनीवर जेमतेम पाऊल मावेल एवढ्याच पायाऱ्या खोदलेल्या होत्या. त्या पार करून पठारावर आलो. इथून दिसणारे दृश्य नजरबंदी करणारे होते. पायाखाली आणि सभोंवर लाल - गुलाबी आणि पांढरे पट्टे असलेले, गवताचे एकही पाते नसलेले डोंगर आणि समोरच्या बाजूला हिरव्या गवताच्या पात्याने आच्छादलेले करडे डोंगर दिसत होते. एखाद्या परीकथेतल्या डोंगरावर आल्यासारखा भास होत होता. पठारावर फिरून डोंगरमाथ्याकडे चढाई करायचा प्रयत्न केला पण भुसभुशीत माती आणि तीव्र चढ यामुळे गणित जमले नाही. त्यामुळे पुन्हा पठारावर येऊन समोर दिसणारे दृश्य मनात साठवत बसून राहिलो.
Candy cane mountain , Azerbaijan
भारतापासून अंदाजे ४००० किलोमीटर दूर एक हिंदू मंदिर आहे आणि त्यात १४ संस्कृत (देवनागरी ) आणि २ गुरुमुखी लिपीतील शिलालेख आहेत हे मला कोणी सांगितले असतें तर मी विश्वास ठेवला नसता. याशिवाय एक शिलालेख पर्शियन (फारसी) लिपीत आहे.
संस्कृत (देवनागरी) शिलालेख
या हिंदू मंदिराला अतेशगाह या नावाने ओळखले जाते. स्थानिक भाषेत अतेश म्हणजे “आग”आणि “गाह”म्हणजे जागा, "आगीची जागा" या अर्थी “अतेशगाह” हा शब्द वापरला जातो. बाकू पासून ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुरखानी या शहरात अतेशगाह हे हिंदू मंदिर आहे. या ठिकाणी जमिनीखाली असलेल्या नैसर्गिक वायुच्या स्रोतांमुळे एकेकाळी ७ ठिकाणी जमिनीवर आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्या ठिकाणी हे मंदिर आणि सराई (धर्माशाला ) बांधलेली आहे. या ज्वाळांचा स्त्रोत शोधण्यासाठी इसवीसन १९६९ मध्ये इथे सोव्हीएत सरकारने केलेल्या उत्खननामुळे या ज्वाळा विझल्या. त्यानंतरच्या काळात बाहेरुन पाईप व्दारे नैसर्गिक वायू आणून येथील मुख्य मंदिरातील ज्वाळा पेटत्या ठेवण्यात आलेल्या आहेत.
अतेशगाह Fire Temple
इसवीसनाच्या सुरुवाती पासून भारताचा युरोपाशी व्यापार होत असे. माल घेऊन भारतीय व्यापारी खुष्कीच्या (जमिनीच्या) आणि सागरी मार्गाने जात असत. हा एकच ठराविक रस्ता नव्हता, तर पूर्व आशियाला युरोपशी जोडणारे अनेक मार्ग त्यात अंतर्भूत होते. त्यात जमिनी मार्गे, तसेच जमिन आणि समुद्र मार्गे जाणरे अनेक रस्ते होते. या रस्त्यांनी मुख्यत्वे करुन रेशीम, नीळ, कापड,मसाले इत्यादी अनेक वस्तू युरोपात जात असत. साधारणपणे इसवीसनाच्या सहाव्या शतकापासून प्राचीन चिनच्या राजधानीचे शहर चांगआन (आताचे शिआन) येथून युरोपात मोठ्या प्रमाणावर रेशीम पाठवायला सुरुवात झाली. या व्यापारी मार्गांना रेशीम मार्ग (Silk Road) हे नाव मात्र इसवीसनाच्या अठराव्या शतकातल्या इतिहासकारांनी दिले.
Natraj, Ateshgah Hindu Temple
भारतातून जमिनीवरुन आणि समुद्रातून जाणारे असे अनेक रेशीम मार्ग होते. त्यापैकी एक आपल्या मुंबई जवळील कान्हेरी (कृष्णगिरी) लेणी , शुर्पारक (सोपारा) बंदर हा मार्गही होता. या मार्गावर असलेल्या कान्हेरी लेण्यातील लेणी क्रमांक २ च्या बाहेरील भिंतीवर दोन वाशिंड असलेला उंट कोरलेला आहे. हा उंट तिबेट परिसरात आढळतो. तेथून भारतात प्रवास करणार्या व्यापार्यांनी/ कारागिरांनी तो प्रत्यक्ष पाहिला असल्याने कान्हेरीत कोरला आहे. याशिवाय वायव्य भारतातून आजच्या काबूल (अफ़गाणिस्थान), तेहरान (इराण) मार्गे अझरबैजानला जाणारा रेशिम मार्ग होता. याच मार्गाने वायव्य भारतीय हिंदू, शिख व्यापारी अझरबैजानला जात असत. हिंदुकुश पर्वतातील टोळीवाले, तेथिल अतीथंड तापमान, इराणचे वाळवंट अशा विपरीत परिस्थितीला तोंड देत अंदाजे ४००० किलोमीटरचे अंतर कापून ते अझरबैजानला पोहोचत असत.
रेशीम मार्ग (Silk Road)
अतेशगाह अग्नि मंदिर आणि सराई परिसराला वेढणार्या दोन तटबंदी बांधलेल्या आहेत. बाहेरील तटबंदीत असलेल्या प्रवेशव्दारातून प्रवेश केल्यावर "L" आकारात बांधलेली मोठी सराई पाहायला मिळते. या सराईत व्यापार्यांना राहाण्यासाठी तसेच सामान (माल) साठवून ठेवण्यासाठी अनेक दालन आहेत. त्याच बरोबर अनेक धर्माची प्रार्थना स्थळ सुध्दा याठिकाणी होती. त्या दालनांना जोडणारी लांबलचक आणि प्रशस्त ओवरी आहे. सध्या या दालनात तिकिटघर आणि स्थानिक कलाकुसरीच्या वस्तू विकण्याची काही दुकान आहेत. या सराई समोर मोठे मोकळे आवार आहे. त्याकाळी व्यापारी माल जनावरांच्या पाठीवरुन घेऊन जात. त्या जनावरांना बांधण्यासाठी, गाडे उभे करण्यासाठी हे मोठे आवार बांधलेले होते. हे आवार ओलांडून मंदिराच्या दिशेने जातांना दुसरी तटबंदी लागते. या तटबंदीतही दरवाजा आणि त्यावर संस्कृत शिलालेख आहे. त्याच्या छायाचित्रावरुन त्याचे वाचन केले, काही शब्द अस्पष्ट असल्यामुळे त्यांचा अर्थ लागत नाही.
Sarai, Ateshgah hindu temple
श्री गणेशाय नम: श्रीरामजी सतश्री
ज्वालाजी सहाय संवत १८०२ ॥ मतक
षवदी ७ बी रवार सा त नसानो जीजति
घातात पकोग्या नम: वसना गच्छतात च
त सफरधामत गनबना यप्म प्रपात:
या शिलालेखाची सुरुवात "श्री गणेशाय नम: श्रीरामजी सतश्री ज्वालाजी " .... अशा प्रकारे श्री गजाननाला , श्रीरामाला आणि ज्वालाजीला नमन करुन होते. या शिलालेखात सहाय संवत १८०२ म्हणजेच इसवीसन १७४५ मध्ये हे मंदिर व सराई बांधली असाही उल्लेख आहे. काही संस्कृत शिलालेखा शिवाला (शंकराला ) वंदन केलेले आहे.
Shilalekh (Inscription)
प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर तटबंदी युक्त पंचकोनी रचना दिसते. याच्या मध्यभागी अग्निमंदिर आहे. चार खांबांवर घुमटाकार छत तोललेले आहे. मध्यभागी असलेल्या वेदीवर अग्नि प्रज्वलित केलेला पाहायला मिळतो. हे मंदिर चारही बाजूने उघडे आहे, त्याला भिंती नाहीत. या मंदिराचे चारही खांब पोकळ असून त्यातून नैसर्गिक वायू वर नेऊन घुमटाच्या बाजूला चार ज्वाळा पेटत असत असे येथे सांगितले जाते. ते दर्शवणारी चित्रेही इथे आहेत, पण ती काल्पनिक असावित. या मुख्य ज्वाला मंदिराच्या आजूबजूला काही चौथरे आहेत. त्यांचा वापर धार्मिक विधी तसेच बळी देण्याकरीता केला जात असे. या परीसरात एक विहिर आहे. येथे केलेल्या उत्खननात दगडात कोरलेले पाईप सापडले आहेत. या पाईप मधून नैसर्गिक वायू दालनांमध्ये आणण्यात आला होता. त्याच्यावर पेटणार्या आगीचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी, उजेडासाठी आणि दालन गरम राखण्यासाठी केला जात होता. उत्खनन केलेल्या काही जागा काचेने बंद करुन ठेवलेल्या आहेत. येथे तटबंदीत असलेल्या दालनांच्या दरवाजावर संस्कृत (देवनागरी) आणि गुरुमुखी लिपीतील शिलालेख आहेत . या दालनांमध्ये कायमस्वरुपी प्रदर्शन आहे. त्यात या जागेचा इतिहास, इथे उत्खननात सापडलेल्या वस्तू , भांडी, शिल्प इत्यादी मांडून ठेवण्यात आलेल्या आहेत. यातील एका दालनात गणपतीची मुर्ती आणि दुसर्या दालनात नटराजाची मुर्ती ठेवलेली आहे. येथे झालेल्या उत्खननात पंधराव्या शतकातील गणपतीच्या मुर्तीचा काही भाग मिळालेला आहे. सध्याचे हिंदू मंदिर आणि सराईच्या यांच्या बांधकामावर इस्लामी स्थापत्यकलेचा प्रभाव दिसून येतो. इथे झालेल्या उत्खननात सापडलेल्या पुराव्यांवरुन याठिकाणी पूर्वी झोरोस्ट्रियन धर्माचे मंदिर असावे.
अझरबैजानी इतिहासकार काझिम अझीमोव्ह यांच्या मते, येथे झोरोस्ट्रियन धर्म रुजला याची अनेक कारणे आहेत. अझरबैजान सिल्क रुटवर मोक्याच्या जागी असल्यामुळे झोरोस्ट्रियन व्यापाऱ्यांचा या भागात मोठ्या प्रमाणावर वावर होता. अझरबैजान मध्ये असलेल्या नैसर्गिक वायूच्या साठ्यामुळे येथे अनेक ठिकाणी पेटलेल्या ज्वाळा पाहून झोरोस्ट्रियन धर्माच्या लोकांनी या पवित्र ज्वाळांभोवती मंदिरे बांधली. या ज्वाळांना नैसर्गिक वायूचा अखंडीत पुरवठा होत असल्यामुळे आग कायम प्रज्वलित ठेवण्यासाठी वेगळी सोय करण्याची आवश्यकता उरली नव्हती. हळूहळु या देशात झोरोस्ट्रियन लोक मोठ्या प्रमाणात राहू लागले. इसवीसनाच्या सहाव्या शतकात झोरोस्ट्रियन धर्माला अधिकृत राज्य धर्म म्हणुन याभागात मान्यता मिळली . सातव्या शतकात ससानियन साम्राज्याच्या अस्त होईपर्यंत पवित्र ज्वाळांचे संरक्षण करण्यासाठी हजारो अग्नि मंदिरे बांधली गेली. इसवी सनाच्या सातव्या शतकात इस्लामने या भागात जोर धरल्यावर त्यातील अनेक मंदिरे नष्ट झाली.
अतेशगाह अग्नि मंदिराला १९९८ साली युनेस्कोचा वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा मिळाला. त्यानंतर सरकारनेही मंदिर परिसराचा विकास केला.
जाण्यासाठी :- अझरबैजानला भेट द्याल तेंव्हा चिखलाचे ज्वालामुखी (Mud volcano), यानार डाग (जळता पर्वत ) आणि अतेशगाह (अग्नी मंदिर) ही बाकूच्या जवळची ठिकाण एका दिवसात पाहाता येतात. त्यासाठी एका दिवसाच्या गाइडेड टूर्स आहेत. कँडी केन माऊन्टेन्स वेगळ्या बाजूला असल्याने ते पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. यासाठी सुध्दा गाइडेड टूर्स आहेत.