|
माचू पिचू ऑफ अझरबैजान |
अझरबैजान फिरायला जायचे प्लांनिंग करत असताना नेहमी प्रमाणे किल्ले शोधायला सुरुवात केली. एकेकाळी चीनवरुन युरोपला जाणारा रेशीम मार्ग ( silk route ) अझरबैजान मधून जातं असल्याने त्याचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधलेले होते. त्यातील " अलिंजा कॅसल " या किल्ल्याने लक्ष वेधून घेतले. त्याची छायाचित्र पाहूनच किल्ल्याच्या प्रेमात पडलो. कॉकेशियस डोंगररांगेत असलेल्या या किल्ल्याला भेट देण मात्र सोपं नव्हते. हा किल्ला अझरबैजान या देशात असला तरी, या देशातल्या नाखचिवान भागात होता. हा भाग इराण, तुर्कस्थान आणि आर्मेनिया या देशाच्या सीमांनी वेढालेला आहे.
इसवीसन १९९१ मध्ये मिखाईल गार्बोचेव्ह यांनी glasnost and perestroika या पॉलिसीज आणल्यावर सोव्हिएत युनियनची शकलं होऊन १५ नवीन देश निर्माण झाले. त्यातील आर्मेनिया ( ख्रिश्चन बहुल ) आणि अझरबैजान (मुस्लिम बहुल ) या देशाच्या सीमा ठरवताना धर्माच्या आधारावर ठरवल्यामुळे आर्मेनियाचा एक भाग पाचर मारल्यासारखा अझरबैजान देशात घुसला आहे, त्यामुळे अझरबैजानचे दोन भाग झाले. त्यातील एका भागात बाकू हे राजधानीचे शहर आणि देशाचा 80% भूभाग तर दुसऱ्या बाजूला नाखचिवान, अशी देशाची दोन शकलं झाली. त्यामुळे बाकूवरून रस्त्याने थेट नाखाचिवानला जाता येत नाही. इराण किंवा तुर्कस्थान देशात जाऊन तेथून नाखचिवानला जावे लागते.
|
आर्मेनियाची पाचर |
त्यामुळे नाखचिवानला पोहोचण्याचा सोपा मार्ग म्हणजे विमानाने जाणे. बाकुहून सकाळी ५ वाजल्यापासुन रात्री १ वाजेपर्यंत नाखचिवानला दर तासाला विमान आहे. त्यामुळे नाखचिवानला जाण्याचा प्रश्न निकालात निघाला. पण अलिंजा किल्ला नाखचिवान पासून ३३ किलोमीटर अंतरावर होता तिथेपर्यंत पोहोचायचे कसे हा प्रश्न होता. हा किल्ला फार कमी पर्यटकांनी पाहिला असल्याने त्याबद्दल त्रोटक माहिती उपलब्ध होती. किल्ल्याची उंची, लागणारा वेळ याबाबत कोणीही माहिती लिहिलेली नव्हती. किल्ल्यावर जाण्यासाठी दमसास ( endurance level ) जास्त हवा असे बऱ्याच जणांनी लिहिले होते.
अशा अडनीड्या ठिकाणी जायची आमची पहिलीच वेळ नव्हती. पण माहितीचं उपलब्ध नसल्याने आंतरजालावर शोधाशोध केल्यावर "नाखचिवान ट्रॅव्हल्स" हा स्थानिक टूर ऑपरेटरचा इमेल मिळाला. त्याच्याशी चर्चा केल्यावर त्याने गाडी अरेंज करून दिली.
५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी मी आणि लीना नाखाचिवानला उतरलो तेंव्हा तापमान ३ अंश होते. "नाखचिवान टूर्सचा " इमिल आमच्यासाठी गाडी घेऊन आला होता. त्याच्या सांगण्यानुसार भारतातून नाखचिवानला येणारे पर्यटक जवळ जवळ नाहीतच. जे येतात ते बाकू पाहून परत जातात. अलिंजा किल्ल्यावर जाणारे माझ्या माहितीतले तरी तुम्ही पहिलेच भारतीय आहात.
|
नोव्हाचे स्मारक नाखचिवान |
नाखचिवान ते किल्ल्याचा पायथा अंतर ३३ किलोमीटर आहे. रस्त्याला लागलो आणि एका पर्वताने लक्ष वेधून घेतले. बर्फाच्छादीत पर्वतांच्या पार्शवभूमीवर काळाकभिन्न पर्वत उठून दिसत होता. त्याचे नाव "इनान डाग" याचा स्थानिक भाषेत शब्दश: अर्थ "खरा पर्वत" असा होतो . या पर्वताची दंतकथा नोव्हाशी जोडलेली होती. तोच नोव्हा ज्याने जगबुडी आल्यावर बोट बनवून त्यात सर्व प्राण्यांना भरून नेले होते. ज्यावेळी हा पूर ओसरायला सुरवात झाली तेंव्हा नोव्हाची बोट याच पर्वताला जाऊन लागली. त्यावेळी नोव्हाने "इनान डाग" म्हणजेच "खरा पर्वत" असे त्या पर्वताला नाव दिले. बोटीतले काही लोक याठिकाणी उतरले. पूर पूर्ण ओसरल्यावर नोव्हाची बोट जमिनी वर लागली. त्याठिकाणी वसलेल्या गावाला नोव्हाच्या नावावरून (नावाचा अपभ्रंश होऊन ) नाखचिवान हे नाव पडलेले आहे. नोव्हाचे सुंदर स्मारक नाखचिवान गावात किल्ल्या शेजारी आहे. अझरबैजानचा मूळ धर्म झोरास्ट्रीयन होता. मुस्लिम आक्रमणानंतर आता मुस्लिम धर्म झालेला आहे. त्यांच्या धर्मात नोव्हाला संताचे (profet ) स्थान देण्यात आलेले आहे.
|
Inan dag (खरा पर्वत) |
किल्ल्याच्या अलीकडे अलिंजा या छोट्याश्या गावातल्या दुकानातून पाण्याच्या बाटल्या घेतल्या आणि किल्ल्याच्या पाययाथ्याशी पोहोचलो. किल्ल्यावर जाणारी वाट दोन डोंगरांच्या खिंडीतून जातं होती. दोन्ही बाजूला गुलाबी रंगाचे कातळकडे आकाशाला भिडलेले होते. त्यातून पायाऱ्यांची वाट किल्ल्यावर जातं होती
|
खिंड |
कुठल्याही ट्रेकरला सगळ्यात जास्त कंटाळवाणी वाटणारी गोष्ट म्हणजे पायाऱ्या, त्यामुळे त्या टाळून कुठे वाट आहे का शोधताना कधीकाळी बांधलेला डांबरी रस्ता दिसला. काळाच्या ओघात तो वाहून गेला होता. अझरबैजानला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारने लोकांची राष्ट्रीय अस्मिता जागृत करण्यासाठी कम्युनिस्ट काळात नष्ट केलेली त्यांची राष्ट्रीय स्मारकं पुन्हा बांधयला सुरुवात केली. त्यावेळी किल्ल्याची डागडुजी करण्याचे सामान नेण्यासाठी हा रस्ता बांधलेला असावा.
|
पायर्याच पायर्या |
वळणा वळणाच्या रस्त्याने १० मिनिटे चढल्यावर रस्ता संपला आणि शेवटी पायऱ्या आल्याच. पायऱ्यांना नमस्कार करून आम्ही दोघांनी महाराजांचा जयजयकार केला आणि खिंडीत शिरलो. खिंडीत "नोझल" सारखी रचना झाल्याने वारा जोरात वाहात होता. त्यात भर म्हणजे उभ्या पहाडामुळे वाटेवर सावली पडलेली होती. या सगळ्यामुळे बाहेरच तापमान ४ अंश सेल्सियस असले तरी "फील्स लाईक" १ अंश सेल्सियस झाले असावे. त्यामुळे स्वेटर आणि जाकीट मध्येही थंडी वाजायला लागली. थंड पडणारे नाक आणि कान झाकून किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ल्याला तीन स्तरावर तटबंदी बांधून संरक्षित केलेल आहे. थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. या ठिकाणी नवीन बांधलेल प्रवेशद्वार आणि उजव्या बाजूला थोड खाली किल्ल्याचे जुने प्रवेशद्वार दिसत होते. त्याच्यासमोर दगडात कोरलेल्या काही ओबडढोबड आणि वेगवेगळ्या उंचीच्या पायऱ्या पाहायला मिळाल्या. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरुज होते. प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला तटबंदी खिंडीच्या टोकाला असलेल्या पहाडापर्यंत गेलेली होती . त्यामुळे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग पूर्णपणे संरक्षित झालेला होता.
|
नवे आणि जुने प्रवेशद्वार, तटबंदी,पायर्या |
पहिले प्रवेशद्वार ओलांडून १० मिनिटे पायऱ्या चढून गेल्यावर दुसरे प्रवेशव्दार आणि तटबंदी लागली. हे प्रवेशव्दार पायाऱ्यांच्या काटकोनात बांधलेले आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला बुरुज पाहायला मिळतात. या बुरुजापासून दोन्ही बाजूला तटबंदी खिंडीच्या टोकाला असलेल्या पहाडापर्यंत गेलेली आहे. याठिकाणी पाण्याच एक बांधिव टाक आहे. डोंगरातून आलेलं पाणी या टाक्यात साठवले जाते.
|
तिसरे प्रवेशद्वार आणि तटबंदी |
किल्ल्याचा तिसरे प्रवेशद्वारही पायऱ्यांच्या काटाकोनात बांधलेले आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला बुरुज आहेत. बुरुजापासून दोन्ही बाजूला तटबंदी गेलेली आहे. डाव्या बाजूची तटबंदी डाव्या बाजूच्या सुळाक्याला भिडलेली आहे. तर उजव्या बाजूची तटबंदी L आकारात पूर्ण माचीला वेढा घालते. तिसऱ्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर आपला किल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो. किल्ल्यावर असलेला सपाट भाग म्हणून याला माची म्हणायचे एवढंच. या माचीवर अनेक घरांचे अवशेष आहेत. त्यांच्या भिंती तटबंदीच्या भिंतीपेक्षा कमी उंचीच्या आहेत. जोरदार वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी अशाप्रकारे रचना केली असावी. या ठिकाणी दोन सोनेरी घुमट असलेल्या वास्तू आहेत. हे घुमट नव्याने बांधलेले आहेत. या माचीच्या टोकाला एक सुळका आहे. या सुळक्याचा आकार आणि माचीवरील अवशेष पाहिले असता त्याचे पेरू देशातील इंका साम्राज्याची राजधानी "माचु पिचूशी" साधर्म्य असल्यामुळे, अलिंजा किल्ल्याला "अझरबैजानचे माचू पिचू" म्हटले जाते. या सुळक्याला सध्या "हुतात्मा सुळका" म्हटले जाते. २०२० मध्ये आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्या मध्ये झालेल्या युद्धात २०० सैनिक हुतात्मा झाले होते त्यांच्या स्मरणार्थ या सुळक्याला हुतात्मा स्मारक म्हटले जाते.
किल्ल्याच्या इतिहासात डोकावल्यास, चीन मधुन युरोपात जाणार्या रेशीम मार्गावर असलेल्या अलिंजा किल्ल्यावर झालेल्या उत्खननात ९ व्या शतकातले खापराचे तुकडे आणि इतर अवशेष सापडले आहेत. किल्ल्याच्या इतिहासात अनेक घडामोडी झालेल्या पाहायला मिळतात. अर्मेनियम , इराणी, तुर्की येथील राजघराण्यांच्या ताब्यात हा किल्ला असल्याचे उल्लेख ९ व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंत कागदपत्रात सापडतात.
|
पाण्याचे टाके आणि कातळात कोरलेले चर |
इसवीसन १३८७ ते १४०७ या २० वर्षाच्या काळात तैमुरलंग आणि त्याचा मुलगा मिरानशहा याने अलिंजा किल्ला जिंकून घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अलिंजा किल्ल्यावर जिवंत पाण्याचे झरे नाहीत त्यामुळे डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी टाक्यात साठवले जाते. तैमुरच्या सैन्याने किल्ल्याला वेढा घातला असतांना एकदा किल्ल्यातील पाण्याचा साठा संपत आला होता. त्यामुळे किल्लेदाराने दुसर्या दिवशी किल्ला तैमुरच्या हवाली करण्याचे ठरवले होते. परंतू त्याच रात्री धुवाधार पाऊस पडल्याने त्यांच्या वरचे पाण्याचे संकट टळले. इसवीसन १३९८-९९ मध्ये तैमुरच्या फौजा पहील्या तटबंदी पर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाल्या होत्या. ही बातमी समजताच अमीर अलतून या सरदाराच्या राखीव सैन्याने तैमुरच्या सैन्यावर बाहेरुन हल्ला केला आणि तैमुरच्या २०००० सैनिकांना कापून काढले. इसवीसन १४०१ मध्ये तैमुरचा मुलगा मिरानशहा याने लढून किंवा फ़ितूरीने अलिंजा किल्ल्यावर ताबा मिळवला.
|
वास्तूंचे अवशेष |
इसवीसन १४०५ मध्ये तैमुरचा अंत झाला त्यानंतर किल्ला पुन्हा स्थानिक अझरबैजानी घराणे कारा कोयुनलू याने जिंकून घेतला. इसवीसन १४२० मध्ये तैमुरचा दुसरा मुलगा शाहारोख मिर्झा याने अलिंजा किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी कारा इस्कंदर याने त्याचा पराभव केला.
|
सुळका ( हुतात्मा स्मारक) आणि तटबंदीतील दरवाजे |
किल्ल्याच्या माचीच्या तटबंदी मध्ये तीन दरवाजे आहेत. त्यातील हुतात्मा सुळक्या जवळील प्रवेशद्वारातून खाली उतरल्यावर एक सपाटी आहे, त्यावर काही वास्तूंचे अवशेष आहेत. इथे डोंगर कड्याला लागून पाण्याचे एक बांधिव टाक आहे. येथून खाली दूरवर अलिंजा गाव दिसते. इनान डाग आणि त्यामागाची पर्वतरांग असे सुंदर दृश्य पाहायला मिळते. हे पाहून पायऱ्या चढून परत माचीवर येऊन डाव्या बाजूच्या सुळक्या जवळील प्रवेशद्वारातून बाहेर पडून थोडे चालत गेल्यावर पाण्याचे अजून एक बांधिव टाक आहे. त्यात पाणी आणण्यासाठी सुळक्याच्या उतारावर खोदलेला चर पाहायला मिळतो. माचीवर एक ध्वज स्तंभ आहे. त्यावर अझरबैजानचा झेंडा फडकत असतो.
|
माचीच्या खालच्या सपाटीवरील वास्तू |
माचीवरून कातळात खोदलेल्या पायाऱ्यांची वाट डाव्या बाजूला असलेल्या सुळक्याकडे जाते. या वाटेने वर चढल्यावर उजव्या बाजूला तटबंदी आणि दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूला या ठिकाणी दोन खोल्या आहेत. या ठिकाणी दरवाजाचे प्रयोजन काय असावे हे कळत नाही. कारण दरवाजाच्या पुढे खोल दरी आहे. कॉकेशस पर्वतराजीचे दृश्य इथून खूप छान दिसते त्यामुळे किल्ल्याचे नूतनीकरण करताना हा दरवाजा बांधला असावा. दरवाजातून दिसणाऱ्या निसर्गरम्य दृश्याचा आस्वाद घेऊन पुढे पायऱ्या चढत गेल्यावर सुळक्या जवळ दोन खोल्या आहेत. या दोन्ही ठिकाणी असलेल्या खोल्या या किल्ल्याच्या माचीवर आणि किल्ल्यावर येणाऱ्या मार्गावर लक्ष ठेवणाऱ्या (टेहळणी) करणाऱ्यांचे ऊन, वारा पाऊस आणि बर्फ यापासून संरक्षण होण्यासाठी बांधलेल्या होत्या. याठिकाणी पायऱ्या संपल्या होत्या. डाव्या बाजूचा सुळका अजूनही आकाशाला गवसणी घालत होता. त्याच्या खडबडीत गुलाबी दगडावरून हात फिरवून परतीचा प्रवास चालू केला.
तसं पाहिले तर, किल्ल्याचे पहिले प्रवेशव्दार त्याखालील पायर्या, टाक्यात पाणी आणण्यासाठी कातळात कोरलेले चर अशा काही पूरातन गोष्टी सोडल्यास किल्ल्यावरील इतर बांधकाम अझरबैजान सरकारने नव्याने केलेले आहे. ते बांधकाम मूळ किल्ल्याच्या बांधकामा बरहुकूम नसेलही, पण त्या बांधकामामुळे किल्ल्याच्या संरक्षणासाठी केलेल्या रचनेचा, वास्तूंचा अंदाज येतो आणि किल्ल्याला जिवंतपणाही येतो.
|
Caucasus Mountain range |
किल्ला चढायला सुरुवात केल्यापासून गेले दोन तास आम्ही दोघच फ़क्त किल्ल्यावर होतो. किल्ला चढायच्या आणि पाहाण्याच्या नादात इतका वेळ विसरलेली भूक आता जागी झाली होती. लीनाने दिवाळीत बनवलेले बेसनचे लाडू सोबत आणले होते पायाऱ्यांवर बसून "माचू पिचूच्या" दृश्याचा आस्वाद घेत फ़स्त केले.
तहानलाडू भूकलाडू खाऊन झाल्यावर किल्ला उतरताना बँडचे सुर ऐकू आले. किल्ल्याखाली बरीच लोकही जमलेली दिसत होती. त्यात सैनिकही होते. किल्ल्याच्या पायथ्याशी कार्यक्रम चालू होता. इतक्यात एक तरुण मुलगा खांद्यावर अझरबैजानचा झेंडा घेऊन किल्ला चढताना दिसला. ते पाहून भगवा ध्वज घेऊन किल्ला चढणारी आपली लोक आठवली. "खाली कसला कार्यक्रम चालू आहे", हे विचारल्यावर त्याने युद्धात कामी आलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आम्ही आज जमलो आहोत आणि मी ध्वज घेऊन किल्ल्यावरच्या हुतात्मा स्मारकवर लावायला जातं आहे असे सांगितले. भारतातून खास आमचा किल्ला बघायला आलात म्हणून त्याने आमचे आभार मानले.
झेंडा घेऊन पायाऱ्या चढणाऱ्या त्या तरुणाकडे पाहाताना मनात विचार चमकून गेला, किल्ला मग तो सह्याद्रीतला असो किंवा तेथून ७००० किलोमीटर दूरवरच्या अझरबैजान मधला किल्ला असो, ते सारखेच प्रेरणादायी असतात. त्यांच्या भेटीने प्रखर राष्ट्रभक्ती जागृत होते. त्यासाठीच हे प्रेरणा देणारे स्त्रोत जपायचे असतात आणि त्यांना वारंवार भेटी देऊन उर्जा मिळवायची असते.
*************************************
जाण्यासाठी :- मुबंई - बाकू (४ तास ) आणि बाकू ते नाखचिवान (१ तास २० मिनिटे) विमान प्रवास, (दोन्ही अझरबैजान एअर लाईन्स)
नाखचिवान विमानतळ ते अलिंजा किल्ला पायथा ३३ किलोमीटर.
किल्ल्याची उंची १८०९ मीटर्स
किल्ला चढण्यासाठी ४५ मिनिटे
पर्वत रांग :- कॉकेशियस पर्वतरांग
डिसेंबर ते मार्च किल्ल्यावर बर्फ असल्याने जाता येत नाही.
नाखचिवानला दोन दिवस मुक्काम करुन अनेक ऐतिहासिक आणि प्रेक्षणिय ठिकाण पाहाता येतात.
Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon P900 , Gopro Hero 5
डाविन कॅसल (स्लोव्हाकीया) :- (विदेशातले किल्ले भाग -१) हा ब्लॉग वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा