Thursday, August 16, 2018

केनियन सफारी -३ (मारा नदीच्या परिसरात) Kenya Safari - 3 (Mara River and How to plan budget Kenya Safari)

Hippopotamus at Mara River

आमचा गाईड कम ड्रायव्हर सायमन काल म्हणाला होता , उद्या आपण अर्ली मॉर्निंग सफारी करुया. नाश्ता करुन आम्ही ६ ३० ला निघालो. आज आम्ही मारा नदी पर्यंत जाणार होतो. मारा नदी ही टांझानिया आणि केनियातील अभयारण्यांची जीवनदायिनी आहे . मारा अभयारण्याच्या गेटपासून मुख्य रस्ता थेट मारा नदी पर्यंत गेलेला आहे . इथे एके ठिकाणी केनिया टांझानियाची बॉर्डर मिळते . काल रात्री भरपूर पाऊस पडल्यामुळे सगळीकडे चिखल असेल अस वाटले होते . पण पाण्याचा निचरा झालेला होता. रस्त्याच्या बाजूला पाणी जाण्यासाठी जो चर खोदला होता त्यावर अनेक प्राण्यांच्या आणि पक्षांच्या पायाचे ठसे उमटले होते. मसाई मारा अभयारण्यात केवळ प्राणीच नाही तर पक्षीही मोठ्या प्रमाणावर आढळतात. Ant eater Chat, African roller, Green bee eater, pigions, अनेक प्रकारचे Storks, Herons, Egrets, Robin, Vulturers, falcon, Grass hawk, swifts, Starlings  असे काही परिचित तर काही अपरिचित पक्षी दिसत होते .  

Egyptian Goose, Masai Mara



Superb Starling, Masai Mara

वायरलेसवर मेसेज आल्याने सर्व गाड्या एका आड रस्त्यावर वळल्या . समोरच्या गवताळ मैदानात सिंहाचे ८ छावे बसलेले होते. काल एकाच वेळी ५ छावे बघितले होते . आज एकदम आठ छावे बघून हरखून गेलो. त्यांचे निरीक्षण करताना काही गोष्टी लक्षात आल्या. सगळ्यात पुढे बसलेला छावा दूरवर नजर लावून बसलेला होता. थोडावेळ निरीक्षण करुन त्याने गवतातून चालायला सुरुवात केली. तो/ती  चालायला लागल्यावर इतरांनी चालायला सुरुवात केली. ठराविक अंतर चालल्यावर म्होरक्या थांबत होता आणि पुढील अंदाज घेत होता. सगळ्यात मागे असलेल्या दोघांना मात्र त्याच्याशी काही देणघेण नसावे . शाळेत शेवटच्या बेंचवर बसलेल्या मुलांसारखे ते एकमेकांशी लुटूपुटूची मारामारी करण्यात गढलेले होते. म्होरक्याने मुख्य रस्ता ओलांडला आणि तो परत कुरणात शिरला. आम्ही सुध्दा आमची गाडी त्यांच्या मागे घेतली. हळूहळू एक एक जण मुख्य रस्ता ओलांडून रस्त्या पल्याडच्या कुरणात शिरत होते. दोन मस्तीखोर छावे मात्र मागेच मस्ती करत होते. बऱ्याच वेळाने त्यांच्या लक्षात आले की, आपले इतर साथीदार पुढे गेले. मग ते आरामात रस्ता ओलांडून कुरुणात आले . दोघांनी परत मस्ती चालू केली. म्होरक्याने आता दिशा बदलली आणि तो पुढे चालायला लागला. त्या दिशेला एक ओढा होता. ओढ्याच्या पलिकडे एक हिरवे  कुरण आणि त्यामागे टेकडी होती. त्या कुरणात ४ टापी हरण चरत होती. म्होरक्या ओढ्यापाशी पोहोचल्यावर हरणांना त्यांचा वास आला असावा. कारण गवत उंच असल्याने छावे दिसणे शक्य नव्हते . हरणांनी चरणे सोडून टेकडीकडे धाव घेतली आणि अर्धी टेकडी चढल्यावरच त्यांनी दम घेतला . सुरक्षित अंतरावर गेल्यावर त्यांनी छावे होते त्या दिशेकडे पाहीले आणि परत पळायला सुरुवात केली. इकडे छाव्यानी एका मागोमाग एक ओढा ओलांडला . हरणं आपल्या टप्प्या बाहेर गेली आहेत हे म्होरक्याच्या लक्षात आल्यावर त्याने दिशा बदलली इतका वेळ सांभाळलेल गांभीर्य सोडून तोही इतरांबरोबर दंगा मस्ती करायला लागला. 

Lion Cubs , Masai Mara

Lion Cubs , Masai Mara

आम्ही पुढे निघालो. एका झाडाच्या बुंध्यावर एक निळ्या रंगाचा सुंदर सरडा (Agma Lezard male) सकाळच्या उन्हात अंग शेकत बसला होता. त्याची मादी तपकिरी रंगाची असते. गवतातून एक मुंगूस बाहेर आले आणि आमच्याकडे पाहून त्याने रस्ता ओलांडला. सकाळीच मुंगूस दिसल्यावर दिवस चांगला जातो म्हणतात. मसाई मारा सारख्या जंगलात रोजच चांगला दिवस असतो काहीना काही न पाहिलेल दिसत असते. वेगळ घडत असते. 
Masai Giraffe, Masai Mara

Masai Giraffe, Masai Mara

गाडी आता एका सुनसान रस्त्यावर धावायला लागली . सायमनही या भागात सहजा येत नाही अस म्हणाला. मसाई माराचा स्टॅंडर्ड प्रोग्राम दिड दिवसाच्या असल्याने मुख्य रस्त्याच्या आजूबाजूलाच सगळे फिरत असतात . अचानक बाजूच्या झुडूपातून एक जिराफ बाहेर आला आणि आमच्या समोर रस्ता ओलांडून निघून गेला. डाव्या बाजूला झुडपांच्या आड एक नव्हे तब्बल ९ जिराफ चरत होते. आमची गाडी रस्त्यात असल्याने रस्ता कसा ओलांडावा असा त्यांना प्रश्न पडला असावा. झुडूपांच्या वरुन डोकावून ते आमच्याकडे अधूनमधून पाहात चरत होते. आमच्या समोर रस्ता ओलांडून गेलेला जिराफ दरी उतरून समोरच्या टेकडीवर चढून गेला तरी बाकींच्यानी अजून रस्ता ओलांडला नव्हता. शेवटी मनाचा हिय्या करुन एक जिराफ आमच्या समोर रस्त्यावर उतरला आणि आपल्या लांबलांब ढांगा टाकत रस्ता ओलांडून गेला. त्याच्या मागोमाग एकेक करुन सगळे जिराफ रस्त्यावर उतरले आणि थोड्याच वेळात दरीत उतरुन गेले. जिराफ एवढ्या जवळून पाहायची ही पहिलीच वेळ होती .

Masai Giraffe, Masai Mara

वायरलेसवर अचानक गोंधळ चालू झाला सायमनने गाडी वळवली आणि सुसाट हाणली. काही वेळात आम्ही एका झाडापाशी पोहोचलो. झाड साधारण १२ फूट उंच होते.  त्या झाडावर बिबट्या एका हरणाची शिकार करून घेउन गेला होता. आम्ही पोहोचलो तेव्हा तो शिकार झाडाच्या फांद्यांच्या बेचक्यात नीट अडकवत होता. शिकार व्यवस्थित अडकल्यावर त्याने खायला सुरुवात केली पानांच्या मधून कधी त्याचा पंजा, तोंड, दिसत होते. त्याची शिकार पूर्ण खाऊन होइपर्यंत त्याचे पूर्ण दर्शन होणे कठीण होते. वाट बघण्या शिवाय पर्याय नव्हता कॅमेरा सरसावून आम्ही बसलो होतो तितक्यात बिबट्या खाली उतरला. मधल्या फांदीवर बसून त्याने आपले तोंड आणि पंजा साफ केला आता तो तिथेच बैठक मारणार असे वाटत असतानाच त्याने झाडावरून उतरायला सुरुवात केली . गवतात उतरल्यावर त्याने झाडापासून १५ फुटावर चरणार्‍या झेब्रा आणि वाईल्ड बीस्टच्या कळपाकडे पाहीले आणि संथपणे बाजूच्या झुडपात निघून  गेला. आम्हीही जेवणासाठी बसण्यासाठी झाड शोधायला निघालो. एका झाडाखाली पथारी पसरली आणि पॅक लंच खाउन पुढे निघालो.

(वर वर्णन केलेल्या बिबट्याचा (बिबळ्याचा) व्हिडीओ पाहाण्याकरिता खालील Youtube लिंकवर टिचकी मारा.)
https://www.youtube.com/watch?v=Y5ag5EaP3oo

Leopard, Masai Mar

मारा नदीच्या अलिकडे एक डोंगर आहे. त्यावर मारा व्ह्यु पॉईंट आहे. बरेच लोक इथूनच फोटो काढून माघारी फिरतात. आम्ही डोंगर उतरुन मारा नदीपाशी पोहोचलो. नदीच्या पात्रात वाळूवर ६ पाणघोडे झोपलेले होते. त्यांच्या अंगावर काही पक्षी उड्या मारत होते. तिथून थोड्या अंतरावर एक मगर उन खात पडली होती. नदीचा काठ पाण्यापासून १५ ते २० फूट उंचावर होता. त्यावर काही ठिकाणी पात्रात उतरायच्या वाटा होत्या. ऋतुचक्रा प्रमाणे टांझानिया आणि केनियात फिरणारे प्राण्यांचे कळप अशा वाटांनी नदी ओलांडतात. ती नदी ओलांडतानाही सर्वप्रथम कळपाचा नायक सुरक्षित मार्गाची चाचपणी करतो. पाण्यातल्या मगरींपासून त्यांना भय असते. असा सुरक्षित मार्ग सापडल्यावर नायक सर्वप्रथम पाण्यात उतरतो आणि त्यामागून हजारोंच्या संख्येने असलेले प्राणी नदीत उतरतात. केनियात एप्रिल-मे मध्ये पाउस पडून गेल्यावर, जून-जुलैत व्यवस्थित गवत वाढलेले असते. ते खाण्यासाठी हजारोंच्या संख्येने वाईल्ड बीस्ट , झेब्रे , हरण इत्यादी तृणभक्षी प्राणी केनियात येतात . त्यांच्या मागून त्यांना खाणारे प्राणी येतात. त्यामुळे जुलै ऑगस्ट हे केनियात स्थलांतराचे महिने मानले जातात आणि हे स्थलांतर बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. पण हे प्राणी नदी नक्की कोठे ओलांडतील हे कोणीच सांगू शकत नाही . आम्हालाही नदी ओलांडणारे कळप दिसले नाहीत . पण मारा नदीच्या जवळच एक मोठा वाईल्ड बीस्टचा कळप दिसला म्हणजे त्यांनी एखाद्या दिवसापूर्वी नदी ओलांडली असावी. नदीच्या काठाने पुढे गेल्यावर एका ठिकाणी एक दगड आहे. या ठिकाणी केनिया आणि टांझानियाच्या सीमा मिळतात. पुढे मारा नदीवर पूल आहे. पूलाच्या पलिकडे केनियन सैन्याचे ठाणे आहे . या पूलावरुनही नदीपात्रात असलेले पाणघोडे दिसत होते. 
Mara River & Migration Routes

Crocodile, Masai Mara

Hippopotamus at Mara River

आता परतीचा प्रवास चालू केला, एका ठिकाणी एका तिरक्या झाडावर Lappet-faced vulture,White-backed vulture, Rüppell's vulture, Egyptian Vulture, Hooded Vulture अनेक प्रकारची गिधाड बसलेली दिसली. त्याठिकाणी थोडावेळ थांबलो. तर अचानक एकामागोमाग एक गिधाड आमच्या समोरच रस्त्याच्या बाजूला उतरायला लागली . गवतामुळे कुठल्या प्राण्याचा फडशा पाडायला ती जमली आहेत हे कळत नव्हते. इथे खाण्याचा  पहिला मान असतो Lappet-faced vulture या गिधाडाला कारण त्याच्या बाकदार आणि मजबूत चोचीने तो प्राण्याची कातडी फाडू शकतो . त्याने फित कापल्यावर सगळी गिधाड मृत प्राण्यावर तुटून पडली. अजून आकाशातून गिधाड उतरच होती . त्यांच्या बरोबर दोन Marabou stork सुध्दा त्या गर्दीत उतरले . सकाळीच यांना एका पाणवठ्यावर पाहीले होते. हे इथे काय करतात हा प्रश्न होता. गिधाडांची खाण्यासाठी ढकलाढकली मारामारी चालू होती पण Marabou stork शांत होते. कारण सगळ्यात शेवटी खाण्याचा मान त्यांचा होता . आपल्या लांब आणि निमुळत्या चोचीमुळे ते प्राण्यांच्या हाडाला चिकटलेले मांस खाऊ शकतात. गिधाडांना तिथेच सोडून आम्ही पुढे निघालो . एक बबून्स माकडांचा कळप रस्ता ओलांडत होता. रस्त्याच्या मध्ये असलेल्या दिशादर्शक फलकावर बसून तो आपल्या कळपावर लक्ष ठेउन होता. आता दिवस उतरणीला लागल्याने आम्ही माराच्या गेटच्या दिशेने निघालो. आम्ही तिघेही छतावरुन निशब्दपणे माराचा परिसर न्याहळत होतो. अडीच दिवस चाललेली ही आमची गेम ड्राईव्ह आता संपणार याची हुरहूर मनात दाटून आलेली. 


Vultures in Masai Mara

Lappet-faced vulture, Masai Mara

Vultures in Masai Mara, please click on link

************** 

केनिया सफारीचे प्लानिंग.

केनिया सफारी असे गूगलवर सर्च केले की अनेक देशीविदेशी साईटस ओपन होतात. त्यावर ठराविक चित्ररुपी प्रश्न विचारलेले असतात १)किती दिवस , २)किती माणसे , ३)राहाण्याची सोय (बजेट (तंबू) , मिडीयम (रुम), लक्झरीयस) आणि ४) गाडीचा प्रकार (व्हॅन / ४ x ४ जीप) तुम्ही पर्याय निवडले की एक स्टॅंडर्ड प्रोग्राम आपल्याला मेल केला जातो. तो पुढीलप्रमाणे असतो . 
पहिला दिवस:- नैरोबीच्या हॉटेलातून पिक अप (६ तास प्रवास / किंवा विमानाने मसाई मारा (यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात.)) दुपारपर्यंत मसाई मारा अभयारण्य, संध्याकाळचा गेम ड्राईव्ह.
दुसरा दिवस :- पूर्ण दिवस मसाई मारा (गेम ड्राईव्ह) , 
तिसरा दिवस :- Lake Nakuru (६ तास प्रवास) पाणपक्षी, फ्लेमिंगो आणि गेंडे पाहाण्यासाठी, 
चौथा दिवस :-  Amboseli National Park (८ तास प्रवास) 
पाचवा दिवस:- Amboseli National Park गेम ड्राईव्ह, अफ्रीकन हत्ती पाहाण्यासाठी 
सहावा दिवस:- (५ तास प्रवास ) नैरोबी . 
या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च ६ माणसांच्या तंबू निवासासाठी" $ ९५० माणशी पासून सुरु होतो, मिडीयम (रुमसाठी) $१२५० माणशी पासून सुरु होतो तर लक्झरीअस साठी $१४५० माणशी पासून सुरु होतो. तुम्ही जे हॉटेल निवडाल त्याप्रमाणे आणि सिझनप्रमाणे रेट बदलतात. या पैशात नैरोबी ते नैरोबी सगळा खर्च, यात राहाणे, खाणे, प्रवास, पार्क एंट्री सर्व समाविष्ट असते. याशिवाय तुम्हाला वेगळे काही करायचे असल्यास त्याचा वेगळा चार्ज असतो. (उदा. मसाई गावाला भेट $ २५ प्रत्येकी, मसाई मारा बलून सफ़ारी $३०० प्रत्येकी इत्यादी) 

हा कार्यक्रम मला मिळाल्यावर मी आधी केनियाला जाऊन आलेल्या अनेकांशी बोललो, इंटरनेटवर शोधाशोध केली आणि आता स्वत:च जाऊन आल्यावर माझ असे मत आहे की, एक दिवस मसाई मारा पाहणे आणि इतर दिवशी अर्धा किंवा पूर्ण दिवस प्रवासात घालवून उरलेल्या वेळात जंगल पाहाणे हे टूर कंपन्यांच्या सोईचे असले तरी आपल्या (म्हणजे ज्यांना खरच जंगल पाहायचेय आणि छायाचित्रण करायचे आहे त्यांच्यासाठी) सोईचे नाही. त्यामुळे ३ दिवस तीन रात्र मसाई मारा, चौथा दिवस नकुरु लेक, पाचवा दिवस :- नैरोबी असा पाच दिवसाचा कार्यक्रम केल्यास साधारणपणे $ ६०० प्रत्येकी खर्च होतो. यात सर्व प्राणी, पक्षी पाहायला मिळण्याची शक्यता असते (याची खात्री कोणीच देऊ शकत नाही). अफ़ीकन हत्ती आणि किलिमांजरो पर्वत पाहाण्यासाठी Amboseli National Park ला जायचे की नाही हा प्रश्न प्रत्येकाने स्वत: सोडवायचा आहे. हत्ती मसाई माराला भरपूर दिसतात. अंबासोलीला गेल्यास त्याचे दोन दिवस वाढून पैसे वाढतात.

या $ ६०० व्यतिरिक्त, $ ५० प्रत्येकी व्हिसा फ़ी द्यावी लागते. व्हिसा तुम्ही ऑनलाईन काढू शकता किंवा केनियात पोहोचल्यावरही काढता येतो. केनियात इमिग्रेशनच्या वेळी व्हिसा काढणार असल्यास $ ५० कॅश द्यावी लागते. कार्डने पैसे घेत नाहीत. व्हिसा तीन महिन्यासाठी मिळतो. केनियात (अफ़्रिकेतील देशात) जाण्यासाठी आपल्याला पिवळ्या तापाचे इंजेक्शन आणि पोलिओ डोस किमान १५ दिवस आधी घ्यावे लागतात. पिवळ्या तापाचे इंजेक्शन ठराविक गव्हर्मेंट हॉस्पिटल मध्येच मिळते त्याची यादी आणि वेळ इंटरनेटवर उपलब्ध आहे. पोलिओ डोस सर्व महानगरपालिकेच्या दवाखान्यात मिळतो. पिवळ्या तापाचे इंजेक्शन आता एकदा घेतले की आयुष्यभर चालते. याला खर्च ३००/- रुपये येतो. या इंजेक्शन आणि डोस बद्दल आपल्याला भारतात परत येतांना इमिग्रेशनला विचारणा होते तेंव्हा त्यांना इंजेक्शन आणि डोस घेतल्याची कार्डस दाखवावी लागतात. 


एअर इंडीया आणि केनियन एअरवेजचे मुंबई ते नैरोबी डायरेक्ट फ़्लाईट आहे. इतर अनेक विमान कंपन्यांची १ स्टॉप असलेली फ़्लाईट्स आहेत. रिटर्न तिकिट लवकर काढल्यास साधारणपणे २२०००/- माणशी पासून सुरु होते. केनियात केनियन शिलिंग वापरतात. $ १ ला १०४ केनियन शिलिंग मिळतात ( जुलै २०१८ चा रेट). भारतीय रुपयेही येथे बदलून केलियन शिलिंग घेता येतात. केनियात पोहोचल्यावर विमानतळावर $ ५० ते $ १०० पर्यंतचे केनियन शिलिंग बदलून घ्यावे. किरकोळ खरेदीसाठी (पाणी, भेटवस्तू, सोवेनियर इत्यादी) त्याचा उपयोग होतो. (१ लिटरच्या १ पाण्याच्या बाटलीला १०० केनियन शिलिंग पडतात.) केनियात एअरटेलचे नेटवर्क आहे पण ते शहराबाहेर मिळत नाही. Saharacom हे स्थानिक नेटवर्क अगदी मसाई मारातही मिळते. त्याचे सिमकार्ड विमानतळावर मिळते. नैरोबीत उबर टॅक्सीज आहेत.

Migration Map

मसाई मारात जाण्याची योग्य वेळ :- केनियात वर्षभर गेले तरी सर्व प्राणी दिसण्याची शक्यता असते. कारण मसाई मारात स्थानिक प्राणी आहेतच. पण ऋतूचक्रा प्रमाणे त्यांची संख्या कमी जास्त होते. केनियात डिसेंबर ते मार्च उन्हाळा असतो, एप्रिल ते जुन पाऊस, जुलै - ऑगस्ट थंडी, सप्टेंबर - उन्हाळा, ऑक्टोबर, नोव्हेंबर - थोडा पाऊस असे साधारणपणे ऋतूमान असते. एप्रिल ते जुन पाऊस पडल्यावर मसाई मारात गवत उगवते, ते खाण्यासाठी जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टमध्ये सर्व तृणभक्षी प्राणी टांझानियाच्या सेरेंगेटी नॅशनल पार्क मधून मारा नदी ओलांडून केनियात येतात. त्यांच्या मागोमाग त्यांचे भक्षक येतात. त्यामुळे मसाई मारात मोठ्या प्रमाणावर प्राणी असतात. जसजसे गवत कमी होते, उन वाढत जाते तसतसे प्राणी टांझानियात जातात. त्यामुळे जुलै शेवटचा आठवडा ते ऑगस्ट संपूर्ण महिना हा काळ मसाई मारात जाण्यासाठी उत्तम काळ समजला जातो. त्यावेळी तेथे थंडी असल्याने दिवसाचे तापमान २० ते २२ डिग्री आणि रात्रीचे तापमान १२ ते १५ डिग्री सेल्सियस असते त्यामुळे दिवसभर फ़िरुनही उन्हामुळे होणारा त्रास जाणवत नाही.   

नैरोबीत एक दिवस मुक्काम केल्यास जिराफ़ सेंटर, एलिफ़ंट ऑरफ़नेज ( यावर दोन वेगळे लेख लिहिले आहेत) आणि नॅशनल म्युझियम ही ठिकाणे जरुर पाहावीत अशी आहे. त्यासाठी टूर ठरवतानाच ट्रॅव्हल कंपनीशी बोलून घ्यावे. अर्थात त्याचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतील. कुठली ट्रॅव्हल कंपनी निवडावी, हे ज्याने त्याने ठरवावे. सगळ्यांकडून कोटेशन घेउन, त्यांच रेटींग आणि रिव्ह्यू वाचून ठरवावे. अर्थात हे सर्व लिहिले आहे ते कमीतकमी पैशात जास्तीत जास्त कसे पाहाता येईल त्यासाठी, अर्थात हा माझा दावा आहे असही नाही . ज्यांची पैसे खर्च करण्याची तयारी आहे त्यांना केनियात पाहाण्यासारखे आणि फ़िरण्यासारखे भरपूर आहे.

केनिया सफ़ारीवर तिथल्या Offbeat ठिकाणांवर ७ लेख लिहिलेले आहेत ते जरुर वाचावेत.

समाप्त

छायाचित्रण:-  © कौस्तुभ आणि अमित सामंत  (©Copy Right)
कॅमेरा :- Nikon, P900 

केनिया सफ़ारी आणि त्याचे प्लानिंग स्वत:च कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 

केनिया सफारी- 1 (Kenya Safari - Part -1)

केनिया सफारी भाग - २ सिंहांच्या प्रदेशात

हे दोन भाग नक्की वाचा .

Tuesday, August 14, 2018

केनिया सफारी - २ ( सिहांच्या प्रदेशात ) Kenya Safari - 2 (Lion Kingdom)


Lion , Masai Mara
मसाई मारा अभयारण्यात जाण्यासाठी एकच गेट आहे. या गेट मधून एक मोठा कच्चा रस्ता थेट मारा नदीपर्यंत (टांझानियाच्या सीमेपर्यंत) जातो त्यामुळे हे गेट आणि मारा नदीजवळचे गेट या दोन्ही गेटवर केनियन लष्कराचा ताबा आहे. या मुख्य रस्त्याला अनेक उप रस्ते फुटलेले आहेत. या रस्त्यांवरुन तुम्ही कुठेही गाडीने भटकू शकता. फ़क्त रस्ता सोडून गाडी चालवायला मनाई आहे. काल सारखेच वाईल्ड बीस्ट, हरण, झेब्रे यांनी आमच स्वागत केले. थोडे पुढे गेल्यावर ईस्ट अफ्रीकन क्राऊन क्रेनच संपूर्ण कुटुंब परत त्याच जागी दिसले. इतक्यात वायरलेसवर मेसेज आला आणि आमची गाडी सुसाट त्या दिशेने निघाली. एका माळरानावर सिंहाच्या कळपाने वाईल्ड बीस्टची शिकार केली होती आणि ६ सिंहिणी ती शिकार खात होत्या. सातव्या सिंहीणीचे खाऊन झाले असावे. ती बाजूला सकाळच्या थंडीत उन अंगावर घेत बसली होती.  नेहमीप्रमाणे सिंह पहिल्यांदा शिकार खाऊन निघून गेला असावा.त्यामुळे तो आसपास कोठे दिसला नाही.

Lioness with (kill) wild beest, Masai Mara

Lioness with kill , Masai Mara

थोड्या वेळात एकेका सिंहीणींचे पोट भरले, तश्या त्या थोड्या उंचावर येउन वेगवेगळ्या भागात विसावल्या. सकाळच्या कोवळ्या उन्हात त्या सुंदर दिसत होत्या. त्यातील एक सिंहीणी आमच्या गाड्यां मधून मार्ग काढून रस्त्याच्या बाजूच्या गवतात गडप झाली. खर तर मारा अभयारण्यात दुरवर पसरलेला गवताळ प्रदेश आणि तुरळक झुडपं/ झाडे आहेत तरीही सिंह, बिबट्या सारखे प्राणी त्याच्याशी समरुप होऊन जातात. 

( झुडपात जाऊन बसलेल्या सिंहीणेचे झूम कमी करत काढलेले ३ फ़ोटोज खाली दिले आहेत. शेवट्च्या फ़ोटोत सिंहीण झुडूपात समरुप झालेली दिसतेय .)




पुन्हा वायरलेस खणखणला आणि गाडी दुसर्‍या दिशेला निघाली. इथे एका उंच खडकावर एक सिंह आणि तीन सिंहीणी सकाळचे ऊन खात शांतपणे झोपल्या होत्या. सिंह आणि त्याच्या बाजूची सिंहीण अधूनमधून उठून आजूबाजूचा कानोसा घेत होती. त्या खडकाला पूर्ण फ़ेरी मारुन त्यांची अनेक छायाचित्र घेतली. अर्धा तास गेला त्यांची समाधी भंग होण्याचा संभव दिसत नव्हता. आम्ही पुढे जाण्यासाठी गाडी वळवली आणि खडकाला वळसा घालतोय तर जीप समोरच एक सिंहीण आणि तिच्या मागोमाग चार छावे रस्ता ओलांडून खडकाकडे निघालेले दिसले.

Lion  at Masai Mara
सिंहींण झपाझप खडक चढून गेली आणि झोपलेल्या सिंहाच्या अंगावर ओरडली. (ती बहुतेक म्हणाली असावी, "शिकार पण आम्हीच करायची, पोर पण आम्हीच सांभाळायची आणि तुम्ही आयत गिळून झोपा काढताय लाज नाही वाटत... वगैरे") सिंह अनिश्चेने उठला आणि खडक उतरुन दुसर्‍या बाजूला गवतात गायब झाला. 

Lioness with Cubs, Masai Mara

Lion, lioness & Cubs ,Masai Mara

दोन छावे खडकाच्या पायथ्यापर्यंत सिंहाच्या मागोमाग गेले. आई बरोबर असलेल्या दोन छाव्यांनी खडकावर इकडे तिकडे बागडायला सुरुवात केली. एकाने सिंहाच्या बाजूला झोपलेल्या आपल्या मावशीशी लाडात येऊन खेळायला सुरुवात केली. पण मावशी त्याच्यावर गुरकावली. तो पर्यंत खाली गेलेले दोन छावे परत खडकावर आले आणि चौघे मिळून खेळू लागले. छाव्यांच्या प्रवेशामुळे मघापासून स्तब्ध असलेल्या चित्रात अचानक चैतन्य आल. पण एवढ नाट्य घडूनही दुसर्‍या बाजूला झोपलेल्या सिंहींणींच्या समाधीचा भंग झाला नाही. 

खेळायला आलेल्या छाव्यावर ओरणारी सिंहीण (कैकयी)

Lioness & Cub , Masai Mara

छाव्यांच्या बाललीला पहाण्यात वेळ मस्त जात होता. इतक्यात बाजूच्या गवतातून अजुन एक सिंहींण आणि तिचा छावा बाहेर आला. सिंहींण पुढे आणि छावा मागोमाग लंगडत येत होता. त्याच्या पुढच्या उजव्या पंजाला काहीतरी झाले होते. सिंहींण खडकावर चढून गेली. छावा लंगडत – लंगडत खडकावर चढत होता. इतक्यात मघाशी खेळायला आलेल्या छाव्यावर ओरडलेली सिंहींण खाली उतरुन आली आणि छाव्यावर गुरकावली. त्याबरोबर छाव्याने जमिनीवर लोळाण घेतली आणि तो तसाच पडून राहीला. सगळ्या छाव्यांचा द्वेष करणार्‍या या सिंहीणीला आम्ही "कैकयी" अस नाव दिले.  मुलाच्या मदतीला आई धावून गेली. त्याबरोबर कैकेयी मावशीने माघार घेतली. हा प्रकार चार छावे खडकावरुन भेदरुन पाहात होते. आईच्या मागोमाग लंगडत आलेल्या दादाला पाहून ते खुष झाले. सगळे मिळून खेळण्यात दंग झाले. या सगळ्या गडबडीने गाढ झोपलेल्या सिंहीणी पण उठून बसल्या. आयांनी पिल्लाना आपल्या जवळ घेउन गोंजारायला चाटायला सुरुवात केली. हे सुंदर दुर्मिळ दृश्य मनात साठवून पुढे निघालो.

या सर्व घडामोडीचा लाईव्ह व्हिडिओ पाहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
 https://www.youtube.com/watch?v=JVUZv70ZFmA

Injured Cub , Masai Mara

 दुखापत ग्रस्त छाव्यावर ओरणारी सिंहीण (कैकयी)

Lioness & Cub , Masai Mara

मसाई माराच्या मधोमध एक धावपट्टी आहे . दिवसा नैरोबीतून छोटी विमाने पर्यटकांना घेउन येतात. त्यामुळे नैरोबी पासून ६ तासाचा प्रवास वाचतो. पण त्यामुळे ट्रिपच्या खर्चात वाढ होत असल्यामुळे आम्ही तो पर्याय घेतला नव्हता .विमानाच्या प्रवासापेक्षा आम्हाला इतर प्रवास आवडतात. आजूबाजूचा परिसर बघत बघत हव तिथे थांबत प्रवास करता येतो. याठिकाणी मसाई लोक त्यांची कांबळी, कपडे , लाकडाची खेळणी इतर अनेक गोष्टी विकायला बसलेले असतात. सर्व गाड्या इथे येत असल्याने ड्रायव्हर लोक माहितीची देवाणघेवाण करतात. थोडावेळ थांबून आम्ही पुढे निघालो. 

मसाई मारा पहाण्यासाठी देशी विदेशी प्रवासी कंपन्यानी बनवलेले स्टॅंडर्ड प्लान आहेत . पहिल्या दिवशी गाडीने किंवा विमानाने मसाई मारा एक सफारी , दुसरा संपूर्ण दिवस मसाई मारा तिसऱ्या दिवशी परतीचा प्रवास . यात राहाण्याचे ३ प्रकार आहेत . बजेट (म्हणजे तंबू निवास), मिडीयम आणि लक्झरी . तसेच तुम्ही व्हॅन घेता का जीप आणि गाडीत किती जण आहेत . या सर्वांवरुन किंमत ठरते . साधारणपणे एका व्हॅन मध्ये ६ जण आणि तंबू निवास असा मसाई मारा आणि नकुशा लेक असा चार दिवसाचा प्लान घेतल्यास नैरोबी ते नैरोबी $६०० प्रति माणशी खर्च येतो. यात जेवण, नाश्ता , राहाणे, सर्व पार्क एंट्रीज आणि नैरोबी ते नैरोबी प्रवास खर्च येतो.  आम्ही तिघेच जण एका व्हॅन मध्ये होतो. जंगल सफारीत जितके कमी लोक असतील आणि समान आवड असलेले असतील तर शांतपणे जंगलाचा आनंद घेता येतो. दुसरी एक गोष्ट तिथे गेल्यावर लक्षात आली की जीप किंवा व्हॅन रुफ टॉप ओपन असणार्‍या असतात. पण दिसणारा प्राणी गाडीच्या कुठल्या तरी एकाच बाजूला असतो. त्यामुळे ३ जण असतील तर व्यवस्थित कॅमेरा, दुर्बीण घेऊन उभे राहून पाहाता येते. ६ जण असल्यास आळीपाळीने पाहावे लागते. (अभयारण्यात गाडीच्या टपावर बसण्याची परवानगी नाही. तसेच रुफ़ टॉप उघडे असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने खिडक्या बंद ठेवतात.)

Ostrich Male, Masai Mara
Ostrich  Female, Masai Mara

गाडी पुढे जात होती, बाजूला गवतात दोन शहामृग चरत होते. शहामृगाच्या नराची पिसे काळ्या रंगाची असतात तर मादीची तपकीर रंगाची असतात. जुलै - ऑगस्ट हा त्यांचा मिलनाचा काळ असल्याने नराची मान आणि पाय गुलाबी रंगाचे झाले होते. अंडी घातल्यावर दिवसा मादी अंड्यांवर बसते. तिच्या पिसांच्या तपकिरी रंगामुळे ती गवताशी समरुप होवून जाते. तर नर रात्री अंड्यांवर बसतो. त्याच्या काळ्या पिसांमुळे तो अंधाराशी एकरूप होतो. शहामृगाची अंडी आदिवासी चोरतात . कारण त्याचे दोन उपयोग आहेत. शहामृगाचे एक अंड म्हणजे कोंबडीची २४ अंडी, शहामृगाच्या अंड मोठे असते आणि अंड्याचे कवच जाड असते. त्यामुळे त्याचा उपयोग आदिवासी बाटली सारखा करतात. शहामृगाचे अंड चोरण्यासाठी एकमेकांना पुरक असलेल्या दोन चपळ माणसांची गरज असते. अंडी चोरण्यासाठी अंड्यावर बसलेल्या शहामृगाला दिसेल अशा प्रकारे पण सुरक्षित अंतरावर एक जण हालचाली करतो. शहामृगाचे लक्ष त्याच्याकडे गेल्यावर त्याला हुसकवायला शहामृग अंड्यावरुन उठून त्याच्या मागे जातो. या संधीचा फायदा घेउन मागे लपलेला दुसरा माणूस अंडी चोरुन धूम पळून जातो. अंड चोरणारा जर शहामृगाला सापडला तर त्याची खैर नसते. शहामृग हा मसाई मारातला सगळ्यात जोरात धावणारा पक्षी आहे. चित्ता हा शहामृगापेक्षा जोरात धावतो. त्यामुळे बर्‍याच वेळा शहामृगाची शिकार चित्त्याकडून होते.

(शहामृगांचा व्हिडीओ पाहाण्याकरिता खालील Youtube लिंकवर टिचकी मारा.)
https://www.youtube.com/watch?v=SpO8CKg8DHs

Ostrich Male & Female, Masai Mara

मसाई मारात तीन दिवस राहाणार असल्याने आम्हाला कसलीच घाई नव्हती. मसाई मारात येणाऱ्या प्रत्येकाला त्याला मिळणाऱ्या वेळेत "बिग फाईव्ह" (Big Five) बघायचे असतात. सिंह, बिबट्या, गेंडा, हत्ती, रानम्हैस हे ते बिग फाईव्ह. इंग्रज शिकारी लोकांनी शिकार करायला धोकादायक आणि कठीण असलेल्या प्राण्याच  बिग फाईव्ह अस नामकरण केल. पण दिड दिवसाची सफ़ारी घेतल्यामुळे बहुतेक पर्यटक बिग फाईव्हच्या शोधात गरागरा फिरत असतात. जंगल अनुभवायचे मात्र ते विसरून जातात. 

आम्हाला असले बंधन नसल्यामुळे रस्ता सोडून आड रस्त्याला लागल्यावर एक झेब्रा , वाईल्ड बीस्ट , हरण यांचा मिश्र कळप लागला . आता जेवणाची वेळ होइपर्यंत या कळपा बरोबर हिंडायच आम्ही ठरवले. गाडी आणि वायरलेस बंद केल्यावर त्यांच्या गवत खाण्याचाही आवाज ऐकू यायला लागला. कळपात लहान मोठे अक्षरशः हजारो प्राणी होते. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी एकत्र राहातात याचही कारण आहे. यातील कोणाची घाणेंद्रीय तीक्ष्ण असतात त्यांना शिकारी प्राण्यांचा गंध खूप दुरुन येतो. कोणाची नजर चांगली असते, तर कोणाचे कान तिखट असतात. या सगळ्यांच्या सम्नवयाने शिकारी प्राण्यांच्या पासून कळपाला वाचवता येते.

Zebra, Masai Mara

कळपातल्या प्रत्येक झेब्र्याच्या अंगावरच्या पट्ट्यांच डिझाईन वेगळ होते. झेब्र्यांच्या लहान आणि तरुण पिल्लांच्या मानेवरचे केस तपकीर रंगाचे होते तर पूर्ण वाढ झालेल्या झेब्र्यांच्या मानेवरचे केस काळे होते. दुपारच ऊन तापत होते. चरुन झाल्यावर काही वाईल्ड बीस्ट त्यातल्या त्यात उंचावर जाऊन उभे राहीले. काहीनी गवतात बसकण मारली तर उभ्या राहीलेल्या प्राण्यानी वेगवेगळ्या दिशेला तोंड केल होते. त्यामुळे चहूबाजूना लक्ष ठेउन शिकारी प्राण्यांच्या हालचाली टिपण्यात त्यांना मदत होत होती.

Lunch Break at Masai Mara

कळप एका जागी स्थिर झाल्यावर आम्हीही जेवणासाठी एखादे झाड शोधायला लागलो. एका  झाडाखाली गाडीतल कांबळ पसरल आणि सकाळी कॅंप मधून सोबत घेतलेले पॅक लंच उघडले . त्यात दोन उकडलेली अंडी, दोन फळ, फ्रूट ज्युसचा छोटा पॅक आणि सॅण्डविच होते. मसाई मारा मध्ये फिरताना पर्यटकांना गाडी बाहेर पडायची परवानगी नाही. गाडी बिघडली तरी गाडीचा चालकच गाडी बाहेर उतरु शकतो. फक्त जेवणाच्या वेळी सर्वांना थोड्या वेळाकरीता बाहेर पडायची संधी मिळते. आम्ही खायला सुरुवात केल्यावर झाडावरुन एक सुंदर पक्षी खाली उतरला . चमकदार निळी पाठ आणि  पोटावरचा पिवळा रंग यामुळे हा "अफ्रीकन स्टार्लिंग" उठून दिसत होता. स्टार्लिंग म्हणजे मैना कुळातील पक्षी. आपल्या इकडच्या साळुंखी सारखे हे पक्षीही केनियात सगळीकडे दिसतात. एकामागोमाग एक चार पक्षी आमच्या भोवती जमा झाले. झाडावरुन एक निळा पक्षी सतत ओरडत होता. त्याचे घरटे झाडावर होते आणि त्यात पिल्ल किंवा अंडी असावीत. त्यामुळे त्याला आमचे तिथे असणे असुरक्षित वाटत असावे. आम्ही जेवायला बसलो होतो. त्या झाडापासून २० फ़ुटांवर एक झेब्रा आणि वाईल्ड बीस्ट्चा कळप आरामात चरत होता. जेवण आटपून आम्ही पुढचा प्रवास चालू केला. बिबळ्याच्या शोधासाठी सायमनने गाडी एका ओढ्या जवळ नेली. ओढ्याच्या दुतर्फ़ा उंच झाड होती. झाडावर झुडूपात पाहात. हळूहळू पुढे चाललो होतो. झुडपातून चार रानडुकरांचा कळप येऊन आमच्या समोर रस्ता ओलांडून गवतात शिरला. एक एकांडा हत्ती झाडांच्या फ़ांद्या तोडून खात उभा होता. आम्हाला पाहिल्यावर तो झाडीत शिरला. झाडा मागून एका जिराफ़चे डोक दिसत होते. झाडाचा पाला खाण्यात तो दंग होता. ज्या बिबट्याच्या शोधात आम्ही फ़िरत होतो तो मात्र नजरेस पडला नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर झेब्रे, वाईल्ड बीस्ट आणि हरण दिसत होतीच. 

Warthog , Masai Mara (Hakuna Matata)

उन्हं उतरायला सुरुवात झाली. त्या आड रस्त्यावरुन मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी वळण घेतल. रस्त्याच्या बाजूला ५ फ़ुटावर एक चित्ता गवतात बसून आराम करत होता. चित्त्याच्या अचानक दर्शनाने सगळी मरगळ निघून गेली. वायरलेसवर मेसेज गेला आणि थोड्या वेळात असंख्य गाड्या दाखल झाल्या, पण चित्ता निवांत होता. त्याने कोणाचीही दखल घेतली नाही. मनसोक्त फ़ोटो काढून झाल्यावर आम्ही जागा सोडली आणि इतरांना जवळुन पाहायचा चान्स दिला. 

Cheetah, Masai Mara

कॅंपवर पोहोचल्यावर कॉफ़ी घेण्यासाठी कॅंटीनमध्ये गेलो. तिथे बेथी आणि तिची सहकारी पोळ्या बनवत होते. केनियात ते लोक सणासुदीला पोळ्या बनवतात त्याला चपाती म्हणतात. अर्थात केनियात सगळच मोठे असते. मटणाचे तुकडे असो, कोंबडीचे आहेत की शहमृगाचे असा प्रश्न पडायला लावणारे चिकनचे तुकडे, तशाच चपात्यांचा आकारही मोठा होता. आम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. केनियात भारतीयांबद्दल आदर आहे. डॉक्टर, इंजिनीअर , बिझनेसमन अशा अनेक व्यवसायात भारतीय आहेत. स्थानिक भारतीय अस्खलित स्वाहीलीत बोलतात. पण पर्यटक म्हणून इथे येणारे भारतीय मात्र खुप आगाऊ आणि भांडखोर असतात. माझ्या डोळ्यासमोर टुर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फ़े फ़िरायला जाणारे पर्यटक डोळ्यासमोर आले. तीने पुढे जे सांगितले त्यामुळे आम्ही उडालोच, त्यांना आपल्या कुंकू आणि बालिका वधू या सिरीयल फ़ारच आवडतात. स्वाहीली भाषेत डब केलेल्या या सिरीयल दररोज संध्याकाळी टिव्हीवर दाखवल्या जातात आणि मोठ्या प्रमाणावर पाहिल्या जातात. हिंदी चित्रपटांचेही तेथील लोक फ़ॅन आहेत. त्यांनी बाहुबली बघितलेला होता. ७ वाजताच जेऊन घेतल. रात्री तुफ़ान पाऊस पडल्यामुळे तंबूतून बाहेर पडता आले नाही. मारा नदीतून होणार्‍या प्राण्यांच्या मायग्रेशनची स्वप्न पाहाता पाहाता कधी झोप लागली कळलच नाही.  

Jackal, Masai Mara

क्रमश: (केनिया सफ़ारी भाग -३)

केनिया सफ़ारी आणि त्याचे प्लानिंग स्वत:च कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 

केनिया सफारी- 1 (Kenya Safari - Part -1)

केनियन सफारी -३ (मारा नदीच्या परिसरात) Kenya Safari - 3 (Mara River and Kenya Safari Planning)

हे दोन भाग नक्की वाचा 

 Male & Female Ostrich, Masai Mara
छायाचित्रण:- © कौस्तुभ आणि अमित सामंत  © Copy Right) 
कॅमेरा :- Nikon, P900 




Monday, August 13, 2018

केनिया सफारी- 1 (Kenya Safari - Part -1)


Masai Mara
नैरोबीहून सकाळीच मसाई मारा अभयारण्य पाहाण्यासाठी निघालो. मसाई हे स्थानिक आदिवासी जमातीचे नाव आहे आणि मारा ही केनिया आणि टांझानिया मधून वहाणारी मुख्य नदी आहे. मसाई मारा नॅशनल रिझर्व आणि सरेंगेटी नॅशनल पार्क मधील वन्य जीवन पूर्णपणे मारा नदीवर अवलंबून आहे. गेली १५ वर्ष मारा अभयारण्याचा अनुभव असलेला ५० वर्षीय सायमन हा ड्रायव्हर कम गाईड आम्हाला घ्यायला आला होता. माराला जाण्यासाठी ४x४ जीप्स आणि व्हॅन मिळतात. एका जीप/व्हॅनमध्ये ७ जण बसू शकतात. जीप आणि व्हॅनच्या भाड्यात माझ्या ६ दिवसांच्या प्लानसाठी १००$ चा फरक होता त्यामुळे मी व्हॅन घेतली होती . पूर्ण प्रवासात व्हॅन घेतल्या बद्दल वाईट वाटले नाही पण प्रवास संपल्यावर १००$ वाचवल्याचा आनंद झाला .

  ऱविवार असल्याने नैरोबीच्या ट्रॅफीक मधून सुटका झाली. नैरोबीतील रस्ते प्रशस्त आणि अप्रतिम होते. केनियासारख्या भारतापेक्षा मागास देशाला जे जमले ते अजून आपल्याला जमलेल नाही. आपण रस्ते खराब होण्यासाठी पावसाच कारण देतो. पण इथे तर विषुववृत्तीय प्रदेश असल्याने पावसाळ्या नंतर इतर वेळीही पाऊस असतोच. नैरोबी शहर जगातील इतर राजधानीच्या शहरांसारखच चकचकीत आहे. त्याच बरोबर अफ़्रीकेतील सगळ्यात मोठी झोपडपट्टी सुध्दा या शहरात आहे. शहरा बाहेर पडल्यावर हायवे चालू झाला. मोंबासा हे केनियाच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले बंदर आहे.  युगांडा, रवांडा, बुरुंडी या समुद्र किनारा नसलेल्या देशात (Land lock) येणारा आणि जाणारा माल मोंबासा बंदरातून जातो. त्यामुळे केनियाला चांगल उत्पन्न मिळवून देणारा हा महामार्ग आहे. चिनी कंपनीने मोंबासापासून हा महामार्ग बांधलेला आहे आणि आता रेल्वे मार्गाचे काम जोरात सुरु आहे . अफ्रीकेतील अनेक देशात चीनने गुंतवणूक चालू केलेली आहे. या मार्गांचा चीनला अफ्रीकेतील कच्चा माल आपल्या देशात न्यायला व त्यांच्याकडे बनलेला पक्का माल या देशात ओतायला चांगला उपयोग होतोय. अठराव्या शतकात इंग्रजांनीही मोंबासा ते लेक व्हिक्टोरिया नॅरोगेज रेल्वे बांधली होती. त्याचा वापर इंग्रजांच्या अफ्रिकेतील साम्राज्याचे रक्षण करणे आणि अफ्रिकेतील व्यापार वाढवणे याकरिता होणार होता. त्याकाळी इंग्रजांना स्थानिक अफ्रिकन कामगार मिळेनात त्यामुळे त्यांनी रेल्वे बांधण्यासाठी भारतातून ३८००० कामगार नेले. त्यातील अनेकजण आजारपण आणि सिंहाच्या हल्ल्यात मरण पावले होते. (त्या सत्य घटनेवर आधारीत "The Ghost & The Darkness" हा इंग्रजी चित्रपट मागे पाहिला होता, त्यात ओम पूरीने काम केले होते). 


या रेल्वेपासून इंग्रजांना म्हणावा तसा फायदा  झाला नाही त्यामुळे "Two rusting pieces of Iron" अशी त्या रेल्वे मार्गाची ओळख झाली. रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर ६७४८ मजूरानी (त्यांना इथे कुली म्हणतात) परत जाण्यास नकार दिला आणि ते इथेच राहीले. केनियाच्या स्वातंत्र्य चळवळीत आणि उभारणीत भारतीयांचे मोठे योगदान आहे. नैरोबीतल्या नॅशनल म्युझिअम मध्ये या रेल्वे बांधणीवर आणि भारतीयांच्या राष्ट्र उभारणीतील्या योगदानावर वेगळे विभाग आहेत .

Hyrax in Maasai Mara National Reserve, Ngiro-are Road, Kenya

Great Rift Valley

नैरोबीतून मसाई माराला जाणारा महामार्ग ग्रेट रिफ्ट व्हॅलीतून जातो. ग्रेट रिफ्ट व्हॅली आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात दक्षिणोत्तर ९६०० किलोमीटर पसरलेली आहे. खंडांच्या प्लेटसच्या सरकण्यामुळे ग्रेट रिफ्ट व्हॅली तयार झाली आहे, खंडांच्या या सरकण्यामुळे आजपासून अंदाजे ५० लाख वर्षांनी या व्हॅलीच्या जागी समुद्र असेल आणि ईस्ट अफ़्रिका हा अफ़्रिके पासून वेगळा झालेला नवीन खंड तयार होईल. रिफ़्ट व्हॅलीतून जातांना आजही आपल्याला लांबच्या लांब पसरलेले खंदक (Trenches) पाहायला मिळतात. "जमिन दुभंगली आणि आभळ फ़ाटल तर दाद मागायची कोणाकडे" या म्हणीचा प्रत्यय या व्हॅलीत राहाणार्‍या लोकांना नेहमीच येत असतो. खंडांच्या प्लेटच्या सरकण्याने या भागातील जमिन दुभंगते. या भागात अनेक सुप्त आणि जागृत ज्वालामुखी आहेत. जमिनीत त्यांच्या राखेचे थर आहेत. भरपूर पाऊस पडल्यावर ही राख हलकी असल्याने पाण्याबरोबर वाहून जाते आणि अचानक जमिन खचते. चीनेने नविनच बनवलेल्या महामार्गावर अशीच जमिन खचल्याने मोठा चर पडलेला आम्हाला पाहायला मिळाला. यू ट्युबवर या संदर्भात अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.

View of Great Rift Valley
या ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या पूर्वेला असलेल्या डोंगरातून घाट काढलेला आहे. या घाटात व्ह्यू पॉईंट आहे. येथे काही भेटवस्तूंची दुकाने आणि कॉफी शॉप्स आहेत. पर्यटक इथे थांबून ग्रेट रिफ्ट व्हॅली पाहातात . दुकानात चक्कर मारली. इथे लाकडात कोरलेले प्राणी, माणसे त्यांचे मुखवटे, बुकमार्कर, ट्रे , रिंग्ज इत्यादी अनेक प्रकार होते. किंमती मात्र काहीच्या काही सांगत होते. एक छोटा जिराफ १२०० केनियन शिलिंगला होता . याठिकाणी बार्गेनिंग करुन अर्ध्या किमतीत मिळाला असता . या गोष्टी माराला याच्याहून महाग असे तिथला विक्रेता सांगत होता. आम्ही विंडो शॉपिंग करुन पुढचा प्रवास चालू केला . घाट उतरुन पुढचे ४० किलोमीटर ग्रेट रिफ्ट व्हॅलीतून प्रवास केला, पुढे ग्रेट रिफ्ट व्हॅलीच्या पश्चिमेच्या डोंगरावर चढून नारोख हे शहर वजा गाव गाठले. माराच्या आधीचे हेच मोठे गाव आहे . या ठिकाणी माराला जाणाऱ्या सर्व गाड्या पेट्रोल/ डिझेल भरायला थांबतात . कारण यापुढे थेट माराला पेट्रोल पंप आहे पण तिथे पेट्रोल खूप महाग  मिळते. गावात टस्कीज नावाचा मॉल आहे. त्यातून पाण्याच्या बाटल्या घेतल्या. १ लीटरच्या १२ बाटल्यांचा जंबो पॅक ७२० केनियन शिलिंगला मिळाला. याच बाटल्या माराला जास्त किमतीत मिळतात. (आणि इतर ठिकाणी १ लीटरची एक बाटली १०० केनियन शिलिंगला पडते). केनियातल्या सर्व प्रवासात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली तिथे पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. प्रायव्हेट बस , गाड्या, बाईक्स यांच्यावर पाण्याचे रिकामे / भरलेले कॅन घेउन माणसे दिसतात. कुठल्याही हॉटेलात तुम्हाला फुकट पाणी देत नाहीत , विकतच घ्यावे लागते .

Nairobi to Masai Mara Shortcut
नारोखच्या पुढे खरा प्रवास चालू झाला. ऱस्ता असा नव्हताच. कच्च्या रस्त्यावरुन खड्डे, ओहळ, नाले पार करत ही ५० किलोमीटरची हाडे खिळखिळी करणारी, धुळीने माखून टाकणारी "बंपिंग राईड" चालू झाली. ही राईड साधारणपणे २ तास चालते. या ठिकाणीही चीनी कंपनीचे रस्ता बांधण्याचे काम चालू आहे. एक दोन वर्षात ते पूर्ण होइल. केनियाला मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मिळवून देणाऱ्या मारा अभयारण्याला जाण्यासाठी आजवर सरकारने पक्का रस्ता का बांधला नाही हे आश्चर्यच आहे ? या रस्त्यावरून जाण्याचा त्रास वाचावा यासाठी नेहमीचे चालक "शॉर्टकटने" गाडी नेतात. अनेक मसाई पाड्या मधून हा रस्ता जात होता. अनेक ठिकाणी हा नसलेला रस्ता खणून मसाईनी अनधिकृत टोल नाके उभारले होते . पारंपारिक कपड्यातले मसाई साध्या लाकडाची काठी आडवी टाकून रस्ता अडवत होते आणि आमचा चालक प्रत्येक वेळी १०० शिलिंग त्यांना देत होता. माराच्या अलिकडे ४० किलोमीटरवर लागणाऱ्या या छोटया छोट्या पाड्यांच्या आजूबाजूलाच झेब्रे, जिराफ, वाईल्ड बिस्ट, हरण दिसायला लागली होती. हे प्राणी पाहून आम्ही हरखून गेलो. कॅमेरे सरसावून बसलो पण आमचा चालक गाडी थांबवायला तयार नव्हता तो म्हणाला,"तुम्हाला मारामध्ये हे प्राणी इतके दिसतील की तुम्ही नंतर त्यांच्याकडे पाहाणारही नाही". आम्हाला वेळेवर कॅंपवर पोहोचवून संध्याकाळच्या गेम ड्राईव्ह (सफारी) साठी त्याला आम्हाला न्यायचे होते . त्यामुळे त्याने गाडीचा वेग जराही कमी न करता त्या तसल्या रस्त्यावरून सुसाट हाणली. आम्ही आमचे बंप एकाजागी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत त्या बंपिंग राईडचा आनंद घ्यायचा प्रयत्न करु लागलो. दुपारी २ वाजता आम्ही एकदाचे "रायनो कॅंपवर" पोहोचलो. इथे ओळीने तंबू मांडलेले होते. वेळी अवेळी पडणाऱ्या पावसापासून संरक्षण होण्यासाठी चार पक्क्या खांबावर तंबूच्यावर पत्रे टाकलेले होते. जमीन पक्की होती. तंबूत तीन खाटा,मच्छरदाण्या आणि मागच्या बाजूला अटॅज्ड संडास, बाथरुम होते. बाथरुम मध्ये फक्त शॉवर होता. बादली तांब्या / जग इथे आंघोळीसाठी वापरत नसावेत . कारण पुढेही सगळ्या हॉटेलात हिच परिस्थिती होती. मात्र प्लास्टिकच्या बादल्या घेउन शॉपिंगला निघालेले आणि बादल्या भरुन सामान आणणारे स्त्री पुरुष मात्र नैरोबी पासून सगळीकडे दिसले.

Rhino Camp, Masai Mara

Tent for 3 days, Rhino Camp, Masai Mara

तंबूत सामान टाकून जेवायला पळालो. ४ वाजता सायमन व्हॅन घेउन आला. आता व्हॅनचे रुफ टॉप उघडले होते. थोड्याच वेळात आम्ही माराच्या गेट मधून आत प्रवेश केला. एका बाजूला डोंगर डोंगराच्या पायथ्यापासून दूरवर नजर ठरणार नाही तिथपर्यंत पसरलेले पठार , त्यावर उगवलेले हिरव - पिवळ गवत आणि या लॅंडस्केपला छेद देत उभे असलेले एखादेच झाड असा एकंदर माराचा नजारा होता. प्रवेशव्दारातून अर्धा किलोमीटर अंतरावर गाडी आली आणि पर्यटकांचे स्वागत करायला उभे असल्या सारखे  झेब्रे, वाईल्ड बिस्ट, हरण दोन्ही बाजूला दिसायला लागली. थोडे पुढे गेल्यावर अफ्रिकन हत्तीचे एक कुटुंब दिसले.  दोन मोठे हत्ती आणि 3 पिल्ल अस ५ जणांच कुटुंब होते. त्यांच्या पाठी धुळीने माखलेल्या होत्या, नुकतेच धुळस्नान झाले असावे. त्यांचे निरीक्षण करत असतानाच मागच्या बाजूला झाडांच्या आड जिराफांचा कळप दिसला. पहिल्याच सफारीत सगळे प्राणी दिसताहेत की काय अस वाटायला लागले.

African Elephant Family, Masai Mara, Kenya
East African Crowned Crane, Masai Mara

Zebra, Masai Mara

African Wild Buffalo

Tapi, Masai Mara

Masai Mara
आम्हाला छायाचित्र घेण्यासाठी वेळ देत थांबत / संथ गतीने व्हॅन पुढे चालली होती. आता रस्त्याच्या डाव्या बाजूला दूरवर तीन रानम्हशी चरत होत्या. त्यातील एक रेडा चिखलात मनसोक्त लोळत होता . नंतर डोक्याने माती उकरुन इकडे तिकडे फेकायला त्याने सुरुवात केली. दुर्बिणीतून त्याच्या हालचाली व्यवस्थित पाहाता आल्या. आता ६ वाजून गेले होते आणि ६.३० ला अभयारण्यातून बाहेर पडायचे असल्याने परत फिरलो. येताना रस्त्याच्या बाजूला आम्हाला रस्त्यालगत "ईस्ट अफ्रीकन क्राऊन क्रेन" या पक्ष्याचे संपूर्ण कुटुंब दिसले. आई बाबा आणि दोन छोटी पिल्ले असा परीवार शांतपणे चरत होता. हा सुंदर आणि राजबिंडा पक्षी घानाचा राष्ट्रीय पक्षी आहे. गंमत म्हणजे त्यानंतर आम्ही जितक्या वेळा या रस्त्याने गेलो त्यावेळी ते कुटुंब तिथेच चरताना दिसले. परतीच्या प्रवासात दोन कोल्हे (जॅकल ) दिसले .

     (Play Video for Masai Mara View from Roof Top Open Van)
तंबूत पोहोचल्यावर सर्वात पहिले काम म्हणजे आपल्या कडील सर्व गोष्टी चार्ज करणे. कारण या भागात वीजेची सोय नाही. संध्याकाळी ७ ते १० आणि सकाळी ५ ते ७  जनरेटर चालवले जाते . त्यात जे काय चार्जिंग करायचे ते करा. चार्जिंगसाठी कॅमेरा लावायला गेल्यावर लक्षात आले की इथे चौकोनी खाचा असलेले सॉकेट आहेत. आपल्याकडच्या गोल पिना यात घुसत नाहीत. मग इथल्या बेथी नावाच्या मॅनेजरला गाठले . बेथी हसतमुख आणि मदतीला तत्पर होती. तिने तिच्याकडचे सॉकेट मला दिले हे चालत का बघ असल्यास मी तुला दुसरे आणून देते म्हणाली . एवढ्या रात्री कुठून आणणार त्यावर ती म्हणाली माझा माणूस बाईकवर जाऊन आणून देइल . फक्त ५०० शिलिंग पडतील अस सांगितले . "नाविलाज को क्या विलाज", अर्ध्या तासात दुसरे सॉकेट हजर झाले . दोन कॅमेरे तंबूत आणि मोबाईल चार्ज करण्यासाठी जेवण घरात गेलो. तिथे कोपऱ्यात छोटासा बार होता . सगळे विदेशी पर्यटकांचे दारुकाम सुरु झालेले होते. जेवण बुफे होते . भारतीय खाद्य संकृतीचा केनियन खादयपदार्थावर प्रभाव आहे. त्यामुळे भात, उसळ, चपाती, मटन, चिकन इत्यादी पदार्थ सहज मिळतात. त्यामुळे खाण्याचा कुठेही प्रॉब्लेम झाला नाही. खाऊन झाल्यावर तंबूत परतलो. पाउस चालू झाल्याने आज कॅंप फायर रद्द करण्यात आले होते. त्यामुळे तंबूत जाऊन झोपलो. दिवसभराच्या प्रवासाने झोप कधी लागली ते कळलेच नाही .

Wilde Beest

Masai Mara

Masai Mara

Evening at Masai Mara

Photos by :- kaustubh & Amit Samant  © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 
क्रमशः 

केनिया सफ़ारी आणि त्याचे प्लानिंग स्वत:च कसे करावे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 
केनिया सफारी भाग - २ सिंहांच्या प्रदेशात
https://samantfort.blogspot.com/2018/08/lion-masai-mara.html

केनियन सफारी -३ (मारा नदीच्या परिसरात) Kenya Safari - 3 (Mara River and Kenya Safari Planning)
https://samantfort.blogspot.com/2018/08/
हे दोन भाग नक्की वाचा