Monday, July 16, 2018

मांडु (एक अधुरी प्रेम कहाणी) (Mandu, Mandavgad, Madhya Pradesh)

    

Jahaz Mahal, Mandu, Madhya Pradesh  (PC:- MP Tourism)

    मांडू उर्फ़ मांडवगड या भारतातल्या सर्वात मोठ्या किल्ल्याला ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी आहे. तसच बाझबहाद्दुर आणि राणी रुपमतीच्या प्रेमाची एक सोनेरी किनारही याला लाभलेली आहे. मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यात येणारा हा किल्ला २००० फ़ुट उंचीवर वसलेला आहे . दक्षिणेला असलेल नर्मदेच खोर आणि उत्तरेला असलेल्या काकराकोह या दरीमुळे हा किल्ला माळव्यातील डोंगर रांगेपासून वेगळा झालेला आहे. यामुळे किल्ल्याला नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. याच कारणामुळे याठिकाणी अनेक राजसत्ता नांदल्या आणि उत्तरोत्तर या गावाचा एक राजधानीचे शहर असा प्रवास होत गेला.
  
आज मांडू एक पर्यटनस्थळ म्हणुन प्रसिध्द असले तरी या गावाचे धागेदोरे थेट इसवीसनपूर्व सहाव्या शतकापर्यंत जातात. इथे मिळालेल्या पाचव्या शतकातील संस्कृत शिलालेखात ६ व्या शतकातील या गावाचा उल्लेख आहे. अकराव्या शतकात इथे परमारांची सत्ता होती. त्यावेळी या ठिकाणाचा उल्लेख मांडवगड या नावाने केलेला आढळतो. इसवीसन १३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने मांडवगड जिंकून त्याच नाव शबिदाबाद ठेवले. चौदाव्या शतकात दिल्लीची सत्ता तिमुरच्या हाती गेल्यावर माळव्याचा सुभेदार दिलावर खान याने मांडव्याची सत्ता ताब्यात घेतली. या घौरी घराण्याच्या काळात मांडव्याची राजधानी धार येथून मांडूला हालवण्यात आली. घौरी घराण्याच्या अस्तानंतर सत्ता खिलजी घराण्याच्या ताब्यात गेली. या घराण्यातील घियासुद्दीन याने ३१ वर्ष सत्ता उपभोगली. संगित आणि कलेच्या रसिक असलेल्या या सुलतानाच्या काळात बांधल्या गेलेल्या जहाज महाल, हिंदोळा महाल इत्यादी अनेक वास्तू आज मांडूच आकर्षण ठरलेल्या आहेत.

इंदुरहुन किंवा धार मार्गे येतांना मांडू गावाच्या आधी छोटा घाट लागतो. घाट मार्गाने मांडुत प्रवेश करतांना किल्ल्याची तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. या तटबंदीची लांबी सुमारे ४३ किलोमीटर आहे. तटबंदीत दिल्ली दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे. याशिवाय आलमगिर दरवाजा, जहांगिर दरवाजा, रामपाल दरवाजा, तारापूर दरवाजा असे बारा दरवाजे आणि अनेक बुरुज आहेत. मांडू मध्ये मध्यप्रदेश पर्यटन विभागाची दोन ठिकाणी कॉटेजेस आहेत. त्यातील माळवा रिट्रीट हे दरीच्या टोकाला आहे. इथुन माळव्याचा दुरवरचा प्रदेश सुंदर दिसतो. तर दुसर कॉटेज तलावाच्या किनारी आहे. दोन्ही ठिकाणी निसर्गाचा वेगवेगळा पण सुंदर अविष्कार पाहायला मिळतो. याशिवाय मांडू मध्ये अनेक खाजगी हॉटेल्स आहेत, श्रीराम मंदिरात धर्मशाळा आहे, तिथे बहुदा नर्मदा परिक्रमेसाठी आलेले यात्रेकरु राहातात. यापैकी आपल्या खिशाला परवडेल त्याठिकाणी सामान टाकून मांडू पाहायला बाहेर पडावे. मांडु मधिल सर्व ठिकाण आणि वास्तूंचा आस्वाद घेत नीट पाहायची असल्यास दोन दिवस वास्तव्य करण आवश्यक आहे. मांडु मधिल दोन महत्वाच्या गोष्टी म्हणजे जहाज महाल आणि रुपमती महाल. यापैकी एक उत्तर टोकाला आहे तर दुसरे दक्षिण टोकाला. त्यामुळे पहिल्या दिवशी सकाळी होशंगशहाचा टोंब, जामी मशिद, अश्रफ़ी महाल पाहून घ्यावा. दुपार नंतर बाझ बहाद्दुरचा राजवाडा , रेवाकुंड आणि रुपमतीचा महाल पाहावा. तर दुसर्‍या दिवशी निळकंठ मंदिर, महाल, जहाज महाल आणि हिंदोळा महाल पाहावा.

होशंगशहाचा मकबरा (टोंब) ही ताजमहालापूर्वी संगमरवरात केलेली अजोड कलाकृती आहे. ताजमहाल बांधण्यापूर्वी हुमायुने उस्ताद हमीद याला या वास्तूचा अभ्यास करण्यासाठी पाठवले होते. होशंगशहाने हा मकबरा बांधायला सुरुवात केली पण तो इसवीसन १४४० मधे खिलजीच्या कारकिर्दीत पूर्ण झाला. मकबर्‍याच्या मुख्य घुमटाच्या बाजूला ४ छोटे मिनार आहेत. कमानदार प्रवेशव्दारातून मकबर्‍यात प्रवेश केल्यावर आत राजघराण्यातल्या लोकांच्या कबरी पाहायला मिळतात. मकबर्‍यात हवा आणि प्रकाश येण्यासाठी ज्या खिडक्या आहेत त्यावरील संगमरवरी जाळीवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मकबर्‍याच्या आत बाहेर वेलबुट्टीचे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मकबर्‍याचा घुमट. बाजूचे चार मिनार , नक्षीकाम आपल्याला ताजमहालाची आठवण करुन देतात. मकबर्‍याच्या बाजूला हिंदु पध्दतीने बांधलेली धर्मशाळा आहे.

होशंगशहाच्या मकबर्‍या जवळ जामी मस्जिद आहे. दमास्कस मधल्या मशिदीपासून प्रेरणा घेऊन या मषिदीची निर्मिती करण्यात आली आहे. मशिदीचा प्रार्थना कक्ष भव्य असून तो मुख्य घुमटाखाली आहे. त्याच्या बाजूला अनेक छोटे छोटे घुमट आहेत.. मशिदीला कमानदार ओवर्‍या आहेत. मशिदीच्या परिसरात हिरवळ राखुन त्याच्या सौंदर्यात भर घातलेली आहे.

Ashrafia Mahal, Mandu (Mandavgad. Madhya Pradesh)  (PC:- MP Tourism)
   जामी मशिदीजवळ अश्रफ़ी महाल आहे. या महालात जाण्यासाठी उंच पायर्‍या आहेत. इथे अशी दंतकथा सांगितली जाते की, सुलतानाच्या बेगमा पौष्टीक आहार आणि आरामदायी दिनचर्येमुळे स्थुल झाल्या होत्या. त्यांना परत सुडौल करण्यासाठी सुलतान या महालांच्या पायर्‍यांवर सोन्याचे नाणी (अश्रफ़ी) ठेवत असे आणि जास्तीत जास्त नाणी गोळा करण्यास बेगमांना प्रवृत्त करत असे. खर म्हणजे या जामी मशिदी समोरच्या वास्तूची निर्मिती मदरसा म्हणुन केली गेली होती. या वास्तूच्या बाजूला महम्मद शाह खिलजी याने १४४० मध्ये राणा कुंभाचा पराभव केल्याच्या निमित्त ७ मजली मनोरा बांधला होता. त्याकाळी ती मध्य भारतातील सर्वात मोठी इमारत होती असे म्हणतात. दुर्दैवाने या वास्तूचा आज एकच मजला अस्तित्वात आहे.

या महालाच्या जवळच पूरातन श्रीराम मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच धर्मशाळा आहे. सकाळ्च्या सत्रात ही ठिकाण पाहून दुपारी बाझ बहाद्दरच्या महालात जावे. हा सुंदर महाल रुपमती महालापासून खालच्या बाजूस २ किलोमीटरवर आहे. या महालात कमानदार खोल्या आहेत. महालाच्या गच्चीवर दोन घुमट आहेत. त्यापैकी घुमटात बसल्यावर रुपमती महालातली राणी रुपमतीच्या दालनातील खिडकी दिसते. या महालात एक खाजगी तरण तलाव आहे. बाझ बहाद्दरच्या महालाकडून राणी रुपमतीच्या महालाकडे येतांना वाटेत नर्मदा कुंड लागते. नर्मदा भक्त राणी रुपमतीसाठी बाझ बहाद्दरने हा तलाव बनवून घेतला. नर्मदा परिक्रमेतही या तलवाला महत्व आहे. परिक्रमावासी परिक्रमे दरम्यान या रेवाकुंडाला भेट देतात.

बाझ बहाद्दर आणि राणी रुपमतीची तरल प्रेम कहाणी मांडू किल्ल्याच्या साक्षीने फ़ुलली आणि तीचा अंतही याच किल्ल्यात झाला. मांडूचा राजा बाझ बहाद्दर एकदा शिकारीसाठी नर्मदेकाठी जंगलात गेला असताना त्याला स्वर्गिय आवाजातील गाण ऐकू आल. कवी मनाच्या राजा आवाजाचा वेध घेत गेला असता त्याला रुपमती दर्शन झाल. तिच्या रुपाने आणि आवाजाने घायाळ झालेल्या राजाने इतर राजांसारख अपहरण न करता तीला लग्नाची मागणी घातली आणि तीला मांडूला चलण्याची विनंती केली. रुपमतीने राजाला आपली अडचण सांगितली की, ती रोज नर्मदेच दर्शन केल्याशिवाय अन्नग्रहण करत नाही. राजाने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी मांडु गडाच्या दक्षिण टोकावर रुपमतीमहालाची आणि त्याला पाणीपुरवठा करण्यासाठी रेवाकुंडाची निर्मिती केली. रुपमती महालाच्या अगोदर त्या ठिकाणी टेहळणी करणार्‍या सैनिकांसाठी वास्तू बांधलेली होती. त्यावर दोन मजली रुपमती महाला बांधण्यात आला. या महालाच्या गच्चीवर दोन घुमट आहेत त्याच्या कमानदार सज्जातून दुरवरचा प्रदेश दिसतो. येथूनच राणी रुपमती नर्मदेचे दर्शन घेत असे. राणी रुपमती चांगली कवियत्री होती, गायिका होती तर राजा बाज बहाद्दुर चांगला वादक संगितकार होता. संगिताच्या साथीने दोघांच प्रेम बहरल पण त्याचवेळी त्याच राज्याकडे दुर्लक्ष झाला. याचा फ़ायदा मोगलांनी घेतला. अकबरा पर्यंत राणी रुपमतीच्या सौंदर्याची वार्ता़ पोहोचली होती. त्याने आपला सावत्र भाऊ आदम खानाला माळव्यावर हल्ला करण्यास सांगितले. इसवीसन १५६१ मध्ये आदम खान माळव्यात पोहोचला. हे वृत्त कळताच बाझ बहाद्दर छोट्या फ़ौजेनिशी मोगलांच्या अफ़ाट सैन्याला सामोर गेला. त्याचा दारूण पराभव झाला आणि रणांगणातून पळून गेला. आदम खानाने मांडूवर कब्जा केला. हे वॄत्त कळताच राणी रुपमतीने विष प्राशन केले. एका प्रेमकहाणीचा करुण अंत झाला. बाझ बहाद्दरने परत काही काळ मांडूचा ताबा घेतला पण नंतर तो अकबराला शरण आला आणि त्याचा मनसबदार झाला. बाझबहाद्दर आणि राणी रुपमतीची ही प्रेमकहाणी आजही स्थानिक लोकगीतांतून ऐकायला मिळते. रुपमती महालातून सूर्यास्त पाहाताना या प्रेम कहाणीतली वेदना अजुनच गहीरी होत जाते.

दुसर्‍या दिवशी निळकंठ मंदिर आणि त्याच्या बाजूचा निळकंठ महाल पाहावा. मोगलांच्या काळात अकबराच्या हिंदु पत्नीसाठी हा महाल बांधला गेला होता. त्यानंतर सराई पाहावी. मांडू त्याकाळी राजधानीचे शहर असल्यामुळे तेथे व्यापारी लोकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असे. त्यासाठी येथे मोठी सराई बांधण्यात आली. चारबाजूला खोल्या व मध्ये जनावरे ठेवण्यासाठी मोठे पटांगण अशी याची रचना आहे. सराई जवळ हमाम खाना (सार्वजनिक स्नानगृह ) आहेत. येथे गरम आणि गार पाण्याची सोय असे.

Mandu


सराई बघून जहाज महाल गाठावा. मुंज तलाव आणि कापूर तलाव या दोन कृत्रिम (मानव निर्मित) तलावांची निर्मिती करून त्याच्या काठावर आपल्या राण्यांसाठी स्वप्नवत असा जहाज महाल बनवला. १२० फ़ुट लांब आणि २ मजले उंच असलेल्या या महालाला अनेक सज्जे, दालन आहेत. इमारती बाहेर डोकावणार्‍या सज्ज्यांची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की, तीनही बाजूला पाणी दिसावे आणि आपण पाण्यावर उभे आहोत असा भास व्हावा. या तलावातील पाणी नळांव्दारे महालांच्या भिंतींमधून फ़िरवलेले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हे महाल थंड राहात. महालाच्या प्रवेशव्दाराची रचना अशाप्रकारे केलेली आहे की हत्तीवरील अंबारीसकट राणी महालात प्रवेश करू शकत असे आणि तिची उतरण्याच्या जागेची उंची अशा प्रकारे ठेवलेली आहे की अंबारीतून कूठलेही कष्ट न घेता ती पायउतार होऊ शकेल. राण्यांचे एवढे लाड केल्यावर त्या जाड होणे सहाजिकच आहे. त्यावरूनच अश्रफ़ी महालाच्या दंतकथेचा जन्म कोणाच्या तरी सुपिक डोक्यातून झाला असेल.

जहाज महालाच्या परिसरात सुंदर बाग बनवलेली आहे. जहाज महालात येणारे पाणी शुध्द होऊन यावे म्हणुन पाणी आणणार्‍या पन्हाळींच्या मार्गात चक्राकार रचना पाहायला मिळतात. या रचनेमुळे पाण्याबरोबर येणार काडी कचरा यात अडकून शुध्द पाणी तरण तलावात पडत असे. या महालात एक कासवाच्या आकाराचा तलाव आहे. जहाज महालाजवळ हिंदोळा महाल आहे. त्याच्या बाहेरच्या भिंतींना दिलेल्या तिरक्या आकारामुळे याला हिंदोळा महाल नाव दिले गेले. हा रंग महाल असून यात संगित नृत्याचे कार्यक्रम होत असत. याशिवाय या परिसरात अनेक वास्तू आहेत.


      मांडू परिसरात फ़िरतांना आपल्याला जागोजागी गोरखचिंचेची (Baobab) मोठमोठी झाड दिसतात. प्रचंड मोठा बुंधा आणि वर विरळ पान असलेलेल फ़ांद्यांचे फ़राटे अशी या झाडाची रचना असते. कमंडलूसारखी दिसणारी त्याची फ़ळही तिथे स्थानिक लोक विकतांना दिसतात, पोर्तुगिजांनी (मादागास्कर) अफ़्रीकेतून भारतात आणलेल हे झाड मांडू परीसरात दिसत याचा अर्थ येथिल राजवटींचा व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगिजांशी संबंध आला असावा.

Water Purification , Mandu

      मांडु किल्ला तेथिल निसर्ग आणि वास्तू वैभव पाहाण्यात दोन दिवस पटकन संपून जातात. मांडू सोबत ३ दिवसांचा कार्यक्रम केल्यास उज्जैन, धार, महेश्वर आणि ओंकारेश्वर पाहात येईल.

Lake at Mandu
#fortmandu#fortsinmadhyapradesh#mandulovestory#lovestory#

10 comments:

  1. I am very happy that I read your post again. Keep the good work going on....

    ReplyDelete
  2. मस्तच. .पुढच्या वेळी MP ला गेलो की नक्की जाऊन येईन

    ReplyDelete
  3. नेहमी प्रमाणेच सुंदर लेख

    ReplyDelete
  4. Khup sundar lekh ahe.
    Lekh vaachun killyala bhet dyayachi echha zali ahe.

    ReplyDelete
  5. वाह फारच छान !

    ReplyDelete
  6. सुंदर मांडणी,माहितीपूर्ण लेख लिहिला आहे

    ReplyDelete