Sunday, September 1, 2013

अंतुर किल्ल्यावरचा गुप्त (भूयारी) मार्ग (Secret Passage on Antur Fort , DIst :- Aurangabad)

       

   अंतुर किल्ल्यावरील भव्य बुरुज
 
      किल्ल्यावरील चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे अबाल वृध्दांची नेहमीच उत्कण्ठा वाढवतात. लहानपणापासून वाचलेल्या अनेक रहस्य कथा, साहस कथांमधून आपल्याला या गोष्टी आधीच भेटलेल्या असतात, त्यांनी आपल्या मनाचा एक कप्पा व्यापलेला असतो. त्यात भर म्हणजे किल्ल्यावरील गुप्त मार्ग, भूयारे यांच्या भोवती तयार झालेल्या दंतकथांमुळे त्यांना एक गुढतेचे वलय प्राप्त झालेले असते. भूयारे आणि गुप्त वाटा यांच्या बद्दल जनमानसात अनेक अतिरंजीत समज पिढ्यान पिढ्या पसरलेले असतात. (उदा :- सिंधुदुर्ग किल्ल्यातील भूयार समुद्राखालून मालवण शहरात जात हो्ते., कुलाबा किल्ल्यातील भुयार समुद्राखालून अलिबाग मधील कान्होजी आंग्रे यांच्या वाड्यापर्यंत जाते. अशा भूयारांबाबत अनेक कथा वेगवेगळ्या किल्ल्यांवर ऎकायला मिळतात) त्या शास्त्रकाट्यावर पारखून न घेता त्यावर अंधविश्वास ठेवला जातो, याला कारण म्हणजे या भूयारांनी नकळत व्यापलेला आपल्या मनातील कप्पा. खरतर चोर (गुप्त) दरवाजे, चोर (गुप्त) मार्ग, भूयारे ही किल्ल्याची महत्वाची अंग होती. त्याकाळचे राजकारण, युध्द, फंद - फितुरी यांच्याच साक्षीने होत होती.  महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील अंतुर किल्ल्यावरील चोर (गुप्त) मार्ग अचानक पाहाण्याची संधी मिळाली आणि आम्ही हरखूनच गेलो.

बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर

त्याच झाल असं की, २०१३ च्या पावसाळ्यात पेडका, लोंझा ,कण्हेरगड, अंतुर या दुर्लक्षित किल्ल्यांचा अभ्यास करून www.trekshitiz.com  या साईटवर माहिती लिहीण्यासाठी आम्ही चाळीसगावात दाखल झालो. सकाळी लोंझा किल्ला पाहून अंतुर किल्ला गाठला. अंतुर जरी दुर्लक्षित किल्ला असला तरी किल्ल्यावर भरपूर अवशेष आहेत. संपूर्ण किल्ला व्यवस्थित बघायचा असेल तर दोन ते तीन तास लागतात. त्यात आम्ही नोंदी करीत, नकाशा बनवत किल्ला पाहात होतो. त्यामुळे किल्ला पाहायला अंमळ जास्तच वेळ लागला. त्यात भर पडली ती अर्धा - एक तास आम्हाला झोडपून काढणार्‍या पावसाची. संपूर्ण किल्ला पाहून संध्याकाळी ६.०० च्या सुमारास आम्ही अंतुर किल्ल्याच्या भव्य, सुंदर बुरुजासमोर बसून तो नजरेत साठवण्याचा प्रयत्न करत होतो. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण प्रसन्न होतं, वारा भन्नाट वहात होता. त्यामुळे दिवसभराचा शीण हळूहळू उतरत होता. खंदका पलिकडे बुरुजाच्या अर्ध्या उंचीवर बसून आम्ही त्या भव्य बुरुजाचे निरीक्षण करत होतो.

 अंतुर किल्ला दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगर रांगेच्या टोकावर बांधलेला आहे. मुख्य डोंगररांगेपासून किल्ला वेगळा करुन तो संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यासाठी त्याकाळच्या स्थापतींनी येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे २५० फूट लांब, १०० फूट रूंद व ३० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे २००० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानव निर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. या खाचेच्या (खिंडीच्या) दक्षिण बाजूला  उंचावर भव्य बुरुज व तटबंदी बांधलेली आहे. तर पूर्व- पश्चिम बाजूला खोल दरी आहे. शत्रु या खिंडीच्या पलिकडच्या बाजूस आल्यास बुरुजा आडून शत्रूवर हल्ला करणे सोपे होते. त्यातूनही जर शत्रू खंदकात पोहोचलाच, तर बुरुजांवरुन त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. दोन्ही बाजूला खोल दरी व मागील बाजूस असलेल्या खंदकाच्या भिंतीमुळे शत्रुची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत. ही खाच बनवण्यामागे हा विचार असावा. खिंडीच्या किल्ल्याकडील भागात अंदाजे १०० ते १५० फुट उंचीचा कातळ आहे. त्या कातळावर तेवढ्याच उंचीचा भव्य बुरुज बनवण्यात आला आहे. या बुरुजाच्या बाहेरच्या बाजूस ३० फूट ते ५० फूट उंच तटबंदी बांधून तो संरक्षणाच्या दृष्टीने मजबूत करण्यात आला आहे.

या बुरुजाचे खंदकच्या पलिकडे बसून निरीक्षण करतांना असे दिसून आले की, बुरुजाच्या खाली असलेल्या कातळाच्या तळाकडे उजव्या बाजूला एक भगदाड पडलेलं आहे. तशीच नजर फिरत वर आली, तर बुरुजाच्या खालच्या कातळात साधारण मध्यभागी एक गुहा दिसत होती. गुहेपासून थोड्या अंतरावर डावीकडे भिंत बांधून कातळात पडलेलं भगदाड बुजवल्याच दिसत होत. या भिंतीत जंग्याही ठेवलेल्या दिसत होत्या. किल्ला बांधतांना एवढा विचारपूर्वक बांधणारे स्थापती कातळात मध्येच भिंत बांधून त्यात जंग्या कारणाशिवाय बांधतील हे पटत नव्हत. मग नजर थोडीशी "झुम आऊट" करून या तीनही गोष्टी एकत्र पाहील्यावर त्यांना एकत्र सांधणारा काही दुवा असावा असे वाटायला लागले. गेल्याच वर्षी औरंगाबाद जिल्ह्या्तीला सुतोंडा किल्ला पाहीला होता. त्यालाही असाच कातळात कोरलेला खंदक होता आणि त्या खंदकातच किल्ल्याचे प्रवेशव्दार देवड्या व छोटासा भूयारी मार्ग कातळात कोरून काढलेला होता.



खंदकात कसे उतरायचे हा आता मुख्य प्रश्न होता. आमच्याकडे ३० फूटी रोप होता, पण वेळ कमी होता. खाली उतरण्यासाठी रस्ता शोधतांना उजव्या बाजूला चक्क कातळात कोरलेल्या ३ पायर्‍या दिसल्या. त्या उतरून गेल्यावर दरीच्या बाजूने एक चिंचोळी वाट खंदकात उतरत होती. खंदकात उतरल्यावर झुडूपामागे लपलेल्या भगदाडापाशी पोहोचलो.  


या भगदाडाच्या वरच्या बाजूस चुन्यात लावलेले दगड दिसत होते.एकेकाळी दगड लावून हे भगदाड बंद केलेले असावे. पूर्वीच्या काळी एक - दोन मुख्य प्रवेशव्दार सोडली तर इतर चोर दरवाजे, भिंती बांधून चिणून टाकले जात असत. भगदाडाची उंची २.५ ते ३ फूट होती. आत मध्ये मिट्ट काळोख होता. पावसाळा असल्याने अशा अंधार्‍या भागात साप, विंचू असण्याची दाट शक्यता होती. हातात काठी आणि टॉर्च घेऊन भगदडातून आत प्रवेश केला वाट काटकोनात वळून वर चढत होती. 

भूयाराचा अंर्तभाग, अंतुर


कातळात कोरलेल्या पायर्‍यांवरून १० मिनिटे चढल्यावर प्रकाश आणि गार हवेचा झोत जाणवायला लागला आणि आम्ही चक्क किल्ल्याखालील कातळाच्या मध्यभागी असलेल्या गुहेत पोहोचलो होतो. इथे भन्नाट वारा होता, समोर खंदकाची पलिकडची बाजू (जिथे काही वेळापूर्वी आम्ही बसलो होतो) ती दिसत होती. 



बुरुजा खालील कातळातील गुहा व तटबंदी, अंतुर
                                                     

 गुहेच्या आतल्या बाजूला बुरुजावर जाणारी भूयारी वाट दिसत होती. त्या वाटेवर थोडे अंतर चढल्यावर समोर वरून सुटून खाली पडलेल्या दगडांची रास दिसत होती. त्यामुळे हा भूयारी मार्ग अजून चिंचोळा झाला होता. त्या दगडांच्या राशीवर चढून पुढे सरकल्यावर आतून वटवाघळांचा आवाज व त्याच्या शीटेचा गुदमवणारा वास येत होता. आता बाहेर संध्याकाळचे ६.३० वाजून गेले होते. यापूढील मार्गाबद्दल काहीच अंदाज येत नव्हता, त्यामुळे माघारी परतण्याचा शहाणपणाचा निर्णय घेतला. पुढच्या वेळी पूर्ण तयारीनीशी या गुप्तमार्गात शिरायचे असे ठरवून आम्ही परतीचा प्रवास चालू केला.

दगडांमुळे मार्ग बंद झाला होता.
      अंतुर किल्ल्यावरील या भूयारी मार्गाची नोंद पुरातत्व खात्याकडे नक्कीच असणार. त्यांनी जर हा गुप्त मार्ग मोकळा करून सर्वांसाठी खुला केला तर, या किल्ल्यावर येणार्‍या पर्यटकांच्या (अंतुर किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत १२ महिने वहानाने जाता येत) संख्येत वाढ होईल. त्यांना नविन काही पाहिल्याच समाधान मिळेल.


10 comments:

  1. खूप अविस्मरणीय क्षण आणि दिवस आहे हा आणि त्या क्षणाला शब्दात मांडल्याबद्दल तुझे खूप खूप आभार…

    ReplyDelete
  2. खूप छान लिहिलं आहेस. जुन्या आठवणी ताज्या झाल्या..

    ReplyDelete
  3. Amit khup cchan mahiti lihili aahes.

    ReplyDelete
  4. अमित,

    उत्कृष्ट प्रयत्न आणि नवीन माहिती.

    "अंतुर किल्ला दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगर रांगेच्या टोकावर बांधलेला आहे." - हे चुकीचे आहे

    अंतुर किल्ला सातमाळ - अजिंठा डोंगररांगेत आहे आणि ती पूर्व-पश्चिम पसरलेली आहे.

    अंतुरला पुन्हा भेट देण्यासाठी आपल्यामुळे भक्कम कारण मिळाले.

    धन्यवाद !

    राजन महाजन

    ReplyDelete
  5. Atishay upyukt ani chaan mahiti aahe hi. Tumchi parat bhet zalich asel. Nantarche varnan tasech mahiti vachayla nakki aavdel.

    ReplyDelete
  6. अमित दादा, खुपच छान माहिती!

    ReplyDelete
  7. Really,bcoz of such adventurous post I came to know about unknown place...........our Maharashtra is great

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद , डोंगरभाऊ या ब्लॉग मध्ये इतरही अनेक अपरिचित ठिकाणां बद्दल माहिती वाचायला मिळेल.

      Delete