लॉकडाउनला सुरुवात होण्या अगोदरच आमच्या लायब्ररीने प्रत्येकाला ५ पुस्तके एकदम न्यायची मुभा दिली होती . ती वाचण्यात लॉकडाउनचे पहिले पर्व संपले . तितक्यात लॉकडाउनचे दुसरे पर्व चालू झाले घरात न वाचलेली काही पुस्तक होती ती पुरवून वाचायचे ठरवले. मग सोबत ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. यापूर्वीही ज्ञानेश्वरी वाचली होती, पण यावेळी वाचताना त्यातील पक्षी, किटक आणि प्राणी असलेले श्लोक टिपून ठेवायचे ठरवल . मागे अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या पुस्तकात "संत साहित्यातील पक्षी" यावर लेख वाचला होता . त्यात त्यांनी ज्ञानेश्वरीतील पक्ष्यांवरही लिहिले होते . त्यामुळे अर्थात हा विषय काही नवा नाही. या विषयावर यापूर्वीही लेख आलेले असतील कदाचित कोणीतरी पी.एच.डी. साठीही हा विषय घेतला असेल. त्यामुळे यावर लिहावे की, न लिहावे ? या संभ्रमात मी होतो. त्यावर उत्तरही माउलींनी ज्ञानेश्वरीत देउन ठेवले होते.
पांख फुटे पाखिरु | नुडे तरी नभीच थिरु |
गगन क्रमी सत्वरु | तो गरुडही तेथे || १७१२||
राजहंसाचे चालणे | भूतळी आलिया शहाणे |
आणिक काय कोणे | चालवेचिना || १७१३|| अ १८
वेगवान गरुड आकाशात भरारी मारतो तशीच नुकतेच पंख फुटलेल्या पक्ष्याच्या पिल्लाने त्याच आकाशात उडू नये की काय ?
जगात राजहंसाची चाल डौलदार आहे म्हणून इतर कोणी चालूच नये की काय ?
ज्ञानेश्वरीत वाचताना मला एकुण १७ पक्ष्यांचे संदर्भ मिळाले .
यात १८ वा संदर्भ हा पक्षी / विहंग / पाखरू हे शब्द वापरले त्या ओव्या आहेत .
* सोळाव्या अध्यायात "तळे आटले की मासे पकडायला ढिवर जमा होतात" अशा अर्थाचा श्लोक आहे.
जै आटावे होती जलचर। तै डोही मिळती ढिवर।
का पडावे होय शरीर । तै रोगा उदयो ॥३१८॥ अ. १६
* चकोर हा उत्तर भारतात हिमालयाच्या पायथ्याशी सापडणारा पक्षी सोडला तर बाकी दाखले दिलेले सर्व पक्षी आपल्या आजूबाजूला दिसणारे शेतकरी आणि सामान्य माणसाच्या नित्य परिचयातले आहेत .
* ससाण्या बद्दलचा उल्लेख माऊली कुठल्या संदर्भात करतात बघा
पाशिके पोती वागुरा | सुनी ससाणे चिकाटी खोचरा |
घेउनी निघती डोंगरा पारधी जैसे ||३४५ || अ १६
* पारधी (रानात ) डोंगरात शिकारीला जातात तेंव्हा सोबत पाश , पोती , जाळ्या , कुत्री , ससाणे, भाले इत्यादी साहित्य घेउन जातात .
* ज्ञानेश्वरांनी पोपटासाठी पुंसा आणि शुक हे दोन शब्द वापरले आहेत . पोपटाला नळीच्या साहाय्याने पारधी कसे पकडतात याचे (शुक नलिका न्याय) वर्णन सहाव्या अध्यायात तीन श्लोकात केलेले आहे .
* टिटवीचा संदर्भ देतांना माऊलींनी पंचतंत्रातील टिटवी आणि समुद्राच्या कथेचा संदर्भ देतात.
की टिटिभू चाचूंवरी । माप सुये सागरी ।
मी नेणतु त्यापरी। प्रव्ते येथ ॥३६८॥ अ.१
ज्ञानेश्वरीतील घुबड
* ज्ञानेश्वरीतील डुडुळ
(म्हणजे घुबड ) शब्द
असलेल्या ४ ओव्या आलेल्या आहेत
.
पैं आणिकही एक
दिसे ।
जे दुष्कृतीं चित्त
उल्हासे ।
आंधारी देखणें जैसें
।
डुडुळाचें ॥ १४-२५०
॥
विश्वाचें आयुष्य जेणें उजळे
।
तो सूर्यु उदैला
देखोनि सवळे ।
पापिया फुटती डोळे
।
डुडुळाचे ॥ १६-२३९
॥
म्हणौनि उमपा आत्मयातें ।
देहचिवरी मविजे एथें ।
विचित्र काई रात्रि दिवसातें ।
डुडुळ न करी
? ॥ १८-३८५
॥
पैं द्राक्षरसा आम्ररसा ।
वेळे तोंड सडे
वायसा ।
कां डोळे फुटती
दिवसा ।
डुडुळाचे ॥ १८-६८२
॥
या ओव्या वाचताना संस्कृत श्लोक
आठवला .
यद्यमि तरणे : किरणै:
सकलमिंद विश्वमुज्जलं विदघे |
तथापि न पश्चति
घूक: पुराकृत भ्युज्यते कर्म
||
(सूर्य किरणांनी सारे
जग उजळून जाते
, घुबड मात्र ते
पाहू शकत नाही
. हा त्याच्या पूर्व
कर्माचा दोष आहे .)
घुबडाला आपल्याकडे उगाच
बदनाम केलेले आहे. त्याच्या बद्दल अफ़वा, अंधश्रध्दाही भरपूर आहेत. खरतर घुबड हे
लक्ष्मीचे वहान आहे. त्याबाबतची कथा अशी आहे. सृष्टीची निर्मिती केल्यावर एक दिवस
सर्व देवी-देवता पृथ्वीवर आले. पशु पक्ष्यांनी त्यांना पृथ्वीवर पायी फिरताना
पहिले तेव्हा त्यांनी देवांना विनंती केली, तुम्ही पृथ्वीवर पायी फ़िरु नका. आम्हाला
वाहनाच्या रुपात निवडा. देवी देवतांनी त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आपल्या
वाहनाच्या रुपात निवडायला सुरुवात केली. जेव्हा लक्ष्मीची पाळी आली तेव्हा तीने
सांगितले की कार्तिक अमावास्येला मी पृथ्वीवर येईन, त्या दिवशी मी तुमच्यापैकी
एकाला माझे वाहन बनवेन. कार्तिक अमावास्येच्या दिवशी सर्व पशु पक्षी लक्ष्मीच्या
वाटेकडे डोळे लावून बसले होते. रात्रीच्या वेळी जेव्हा लक्ष्मी पृथ्वीवर आली
तेव्हा घुबडाने आपल्या तीक्ष्ण नजरेने तिला पहिले आणि तीव्र गतीने ते तिच्याजवळ
पोहोचले आणि प्रार्थना केली की, मला तुमचे वाहन बनवा. तेव्हापासून घुबड लक्ष्मीचे
वाहन आहे. तेव्हापासूनच लक्ष्मीला "उलूक वाहिनी" म्हटले जाते.
ग्रीक पुराणातली
बुध्दीची (हुशारीची) देवी अथेना हिच्या जवळ घुबड दाखवलेले असते. आपल्या इथे आढळणार्या पिंगळा या लहान घुबडाचे इंग्रजी नाव यावरुनच Athena Brama असे आहे.
Athena & Owl , Photo courtesy :- Wikipedia |
या कथेत घुबडाची
वैशिष्ट्ये अचूक पकडलेली आहेत. घुबडे निशाचर आहेत. रात्रीच्या काळोखात त्यांना
चांगले दिसते आणि ते रात्री शिकार करतात. त्याचे मोठे डोळे आणि २७० अंशात
फ़िरणारी मान (१३५ अंश दोन्ही बाजूला) यामुळे भक्ष्य पकडण्यासाठी घुबडे दृष्टि
क्षमते बरोबर, ऐकण्याच्या क्षमतेवरही अवलंबून असतात. घुबडाचे कान
एका सरळ रेषेत नसतात त्यामुळे त्याला अतिशय कमी आवाजही ऐकू येतात. मिट्ट
काळोखात जमिनीवर वावरणार्या प्राण्यांच्या हालचालींमुळे होणाऱ्या सूक्ष्म आवाजाचा
वेध घेऊन ती भक्ष्य पकडतात. अन्य भक्षक पक्ष्यांच्या तुलनेने घुबडे कमी वेगाने
उडतात; परंतु ती वेगाने देखील उडू शकतात. घुबडाच्या पिसांच्या कडांची
विशिष्ट दातेरी रचना असल्यामुळे त्यांच्या उडण्याचा आवाज कमी होतो.
अशीच एक महाभारतातील
सौप्तिक पर्वातील कथा आहे. श्लोक क्रमांक (10-1-36 ते 10-1-44) अश्वथामा ,
कृपाचार्य इत्यादी वनात (वडाच्या झाडाखाली) झोपलेले असतात. पांडवांचा नाश कसा करता
येईल या विचारांनी अश्वथामा तळमळत असतो. त्याचवेळी झाडावर झोपलेल्या कावळ्यांच्या
थव्यावर महाकाय घुबड हल्ला वेगाने पण गपचूप हल्ला करते आणि आपल्या तिक्ष्ण
नख्यांनी कावळ्यांना फ़ाडून मारुन टाकते. झोपलेल्या कावळ्यांवर घुबडाने केलेला
हल्ला पाहून अश्वथामाला पांडवांना निद्रिस्त असतांनाच मारता येईल ही कल्पना
सूचते.
सुप्तेषु तेषु काकेषु
विस्रब्धेषु समन्ततः।
सोऽपश्यत्सहसा यान्तमुलूकं घोरदर्शनम्॥
10-1-37(63982)
महास्वनं महाकायं
हर्यक्षं बभ्रुपिङ्गलम्।
सुतीक्ष्णघोणानखरं
सुपर्णमिव वेगितम्॥ 10-1-38(63983)
सोऽथ शब्दं मृदुं
कृत्वा लीयमान इवाण़्डजः।
न्यग्रोधस्य ततः साखां
पातयामास भारत॥ 10-1-39(63984)
सन्निपत्य तु शाखायां
न्यग्रोधस्य विहङ्गमः।
सुप्ताञ्जघान
विस्रब्धान्वायसान्वायसान्तकः॥ 10-1-40(63985)
केषाञ्चिदच्छिनत्पक्षाञ्शिरांसि
च चकर्त ह।
चरणांश्चैव
केषाञ्चिद्बभञ्ज चरणायुधः॥ 10-1-41(63986)
क्षणेनाघ्नत्स
बलवान्येऽस्य दृष्टिपथे स्थिताः॥ 10-1-42(63987)
तेषां शरीरावयवैः
शरीरैश्च विशाम्पते।
न्यग्रोधमण्डलं सर्वं
सञ्छन्नं पर्वतोपमम्॥ 10-1-43(63988)
तांस्तु हत्वा ततः काकान्कौशिको मुदितोऽभवत्।
प्रतिकृत्य यथाकामं
शत्रूणां शत्रुसूदनः॥ 10-1-44
या १० श्लोकांमध्ये
व्यासांनी घुबडासाठी उलुक, पिंगल (पिंगळा), कौशिक, वायसान्तक (कावळ्यांचा संहार
करणारा) असे ४ पर्यायी शब्द वापरलेले आहेत. अनेकदा दिवसा कावळे आपल्याला
घुबडाच्या मागे लागलेले दिसतात. तर घुबड रात्री कावळ्यांवर हल्ला करते. घुबड आणि
कावळ्यांमध्ये शत्रुत्व (वायसान्तक) का असते याची एक कथा जातक कथे मध्ये वाचायला
मिळते. गरुड हा पक्ष्यांचा राजा पण तो विष्णूचेही वाहान असल्यामुळे त्याला आपल्या
प्रजेसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे सर्व पक्षी घुबडाला आपला राजा बनवायचे ठरवतात.
सल्ला घेण्यासाठी ते चौकस आणि हुशार कावळ्याकडे जातात. कावळा त्यांना विचारतो, अशा
भयानक दिसणार्या , रात्री फ़िरणार्या कुरुप पक्ष्याला तुम्ही राजा का बनवता आहात?
त्यामुळे पक्ष्यांचे मत बदलते आणि ते सभा घेऊन नवीन राजा निवडायचे ठरवतात. आपल्या
राज्याभिषेकात विनाकारण विघ्न आणल्याने घुबड आणि कावळ्या मध्ये वैर सुरु झाले .
पंचतंत्रातही कावळे आणि
घुबडांच्या वैरावर गोष्ट आहे . त्यात कावळे घुबडांवर कुरघोडी करतात.
कवी हंसदेवाने अनुष्टुभ छंदात पशुपक्ष्यांचे रंग, रूप, आकार, सवयी याचा अभ्यास करुन 'मृगपक्षीशास्त्र' हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. यातील प्रथम खंडात १२७ पशूंची व द्वितीय खंडात ९७ पक्ष्यांची माहिती आहे.
वायसारति: वायसद्वेषिणस्ते तु ये वायसविरोधीन: ||३४६॥
वायसांचा व्देष करणारे व त्यांचा नाश करणारे असल्याने (वायसारति - Barn Owl) हे त्यांचे नाव सार्थ ठरते. असा उल्लेख श्री मारुती चितमपल्ली यांनी "मृगपक्षिशास्त्र" या पुस्तकाच्या मराठी अनुवादात केलेला आहे.
कवी हंसदेवाने अनुष्टुभ छंदात पशुपक्ष्यांचे रंग, रूप, आकार, सवयी याचा अभ्यास करुन 'मृगपक्षीशास्त्र' हा संस्कृत भाषेतील ग्रंथ लिहिला. यातील प्रथम खंडात १२७ पशूंची व द्वितीय खंडात ९७ पक्ष्यांची माहिती आहे.
वायसारति: वायसद्वेषिणस्ते तु ये वायसविरोधीन: ||३४६॥
वायसांचा व्देष करणारे व त्यांचा नाश करणारे असल्याने (वायसारति - Barn Owl) हे त्यांचे नाव सार्थ ठरते. असा उल्लेख श्री मारुती चितमपल्ली यांनी "मृगपक्षिशास्त्र" या पुस्तकाच्या मराठी अनुवादात केलेला आहे.
घुबड मोठ्या प्रमाणावर किटक, उंदीर, घुशी इत्यादी खाऊन ते माणसाला मदतच करते. महाराष्ट्रात १७ प्रकारची घुबडं आढळतात. कोठी घुबड (Barn owl) , पिंगळा (Spotted Owlet / Athena Brama) आणि पिसांची शिंग असलेली हुमा घुबड (Spotted bellied Eagle-Owl) आणि शृंगी घुबड (Eurasian Eagle-Owl) ही आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात.
ज्ञानेश्वरीतील पक्षी यावर लिहीतांना घुबड या एकाच पक्ष्याचे इतके संदर्भ सापडत गेले. अजूनही नक्कीच असतील. घुबडासाठी ज्ञानेश्वरांनी जो "डुडुळ" हा शब्द वापरला आहे तो त्यानंतरच्या किंवा आधीच्या साहित्यात कोणी वापरला आहे का हेही शोधाता येईल.
पिंगळा (Spotted Owlet / Athena Brama) P. C:- Rupak Pande |
ज्ञानेश्वरीतील पक्षी यावर लिहीतांना घुबड या एकाच पक्ष्याचे इतके संदर्भ सापडत गेले. अजूनही नक्कीच असतील. घुबडासाठी ज्ञानेश्वरांनी जो "डुडुळ" हा शब्द वापरला आहे तो त्यानंतरच्या किंवा आधीच्या साहित्यात कोणी वापरला आहे का हेही शोधाता येईल.
#dnyaneshawari#birdsindyaneshwari#birdsinmaharashatra#