 |
| Sacsayhuman Fort, Cusco |
जगातील सात आश्चर्यां पैकी एक असलेले माचू पिचू पाहाण्यासाठी दक्षिण अमेरीका खंडातील पेरू देशाची राजधानी लीमा मध्ये दाखल झालो. लिमा हे पॅसिफिक महासागराच्या काठावर वसलेलं सुंदर शहर आहे. तर कुस्को हे इंकांच्या राजधानीचे शहर आहे. इंकांची पवित्र दरी (Sacred Valley) कुस्को पासून सुरू होते ती थेट माचू पिचू पर्यंत पसरलेली आहे.
स्पॅनिश लोकांनी आक्रमण करण्यापूर्वी इंका संस्कृती सोळाव्या शतकापर्यंत दक्षिण अमेरीकेत सुखाने नांदत होती. इंकापूर्वी चाविन, पाराकस, मोचे, नाझका, इत्यादी अनेक संस्कृती याभागात नांदत होत्या. या संस्कृतीं मध्ये असलेल्या श्रद्धां आणि परंपरां झिरपत इंका संस्कृतीत आल्या होत्या. इंका साम्राज्याच्या उदयापूर्वी तिवनाकू संस्कृती टिटिकाका सरोवराच्या (पेरु आणि बोलिव्हिया देशांच्या सीमेवर आहे) आसपासच्या प्रदेशात अस्तित्वात होती. इंका संस्कृतीत " विराकोचा " हा मुख्य देव म्हणून पूज्य मानला जात असे. हा देव तिवनाकू संस्कृतीतही अस्तित्वात होता. इंकांच्या दंतकथांनुसार विराकोचाने सर्व सृष्टी निर्माण केली. त्यानंतर त्याने इंकांची निर्मिती केली. त्यातील सर्वात जेष्ठ इंकाला, मॅन्को क’पाक (Manco Cápac) हे नाव दिले आणि त्याला सांगितले "तू आणि आणि तुझे पुत्र अनेक देशांवर राज्य कराल". विराकोचा याने मॅन्को क’पाकला, Tupayauri हे शस्त्र भेट म्हणुन दिले आणि म्हणाला "हे शस्त्र जेथे जमिनीत लुप्त होईल त्या अद्भूत जागी तू तुझ्या राजधानीच शहर वसव."
 |
| इंकांचा देव, विराकोचा |
विराकोचाच्या आदेशाप्रमाणे इंका टिटिकाका सरोवराच्या काठावरुन राजधानीच्या शोधात निघाले. Tupayauri शस्त्राची ओढ उत्तर दिशेला होती. त्याप्रमाणे उरुबांबा नदीच्या खोर्यात इंकांनी प्रवेश केला. हीच ती इंकांची प्रसिध्द Sacred Valley ( पवित्र दरी). या नदीच्या काठाने पुढे पुढे जात असतांना सर्व बाजूंनी डोंगरांनी वेढलेली जागा आली, तेथे विराकोचाने दिलेले शस्त्र जमिनीत लुप्त झाले. त्याठिकाणी मॅन्को क’पाक यांने कुस्को हे राजधानीचे शहर वसवले. या शहराचा आकार प्युमा या इंकांना पवित्र असलेल्या प्राण्यासारखा होता. त्याचे डोके एका डोंगरावर होते त्याठिकाणी सॅक्सेह्युमन (sacsayhuman) हे सूर्य मंदिर उभारण्यात आले होते. कोरीकोंचा (Qoricancha) हे सूर्य मंदिर प्युमाच्या हृदयाच्या जागी उभारण्यात आले होते. त्याच्या बाजूला राजवाडा बांधण्यात आला होता. थोडक्यात दंतकथेच्या आवरणा खाली टिटिकाका सरोवराच्या परिसरातून स्थलांतर केलेल्या एका टोळीची भरभराट झाल्यावर त्याच्या प्रमुखाचा संबंध थेट देवाशी जोडण्यात आला. आपल्याकडील दंतकथेतही अशी उदाहरण बरीच सापडतात. (जसे:- शिलाहार राजघराण्याची दंतकथा) .
 |
| प्युमाच्या आकारातील कुस्को |
कुस्को शहर समुद्रसपाटी पासून ११,५०० फ़ूट उंचीवर आहे. विमानाने समुद्रसपाटी वरील लीमा पासून थेट साडेअकरा हजार फुटावर असलेल्या कुस्कोला उतरलो. तेथिल ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आम्हाला थोडासा त्रास जाणवत होता. हॉटेलमध्ये पोचल्यावर रिसेप्शन मध्येच गरम पाणी आणि काही वाळलेली पानं ठेवली होती. रिसेप्शन वरच्या माणसाने सांगितलं की, "तुमचा त्रास कमी होण्यासाठी ही वाळलेली पाने गरम पाण्यात टाकून ते पाणी थोडं थोडं पीत राहा. ती पाने गरम पाण्यात टाकल्यावर त्याची चव हर्बल चहा सारखी लागत होती. तिथल्या थंडीत ते पाणी पिण फारच सुखकारक होतं. कुस्को आणि परिसरात फिरताना सगळ्या हॉटेलमध्ये, रूममध्ये, लॉबीमध्ये ही पानं आणि गरम पाणी ठेवलेलं दिसत होत. तो चहा पिऊन थोडी तरतरी आली होती. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आम्ही कुस्को शहर पाहायला बाहेर पडलो. कुस्को शहर एखाद्या वाडग्या सारख आहे. त्याच्या चारही बाजूला डोंगर आहेत आणि तळात कुस्को शहर वसलेल आहे. पंधराव्या शतकात स्पॅनिश लोकांनी कुस्को शहर जिंकून घेतल्यावर तिथल्या मूळ बांधकामावर युरोपियन पद्धतीच्या इमारती, चर्चेस आणि भव्य चौक बांधले आहेत.
 |
| Cathedral del, Cusco |

त्यातील महत्वाचा चौक म्हणजे cathedral del Cusco. या चौकाच्या चारी बाजूला दुकान, रेस्टॉरंट आहेत. दिवसभर याठिकाणी पर्यटकांचा राबता असतो. आम्ही चौकात पोचलो तेव्हा शाळेतील मुलांचा गट रस्त्यावर नाचत होता. त्यांचे सर कॅथेड्रलच्या पायऱ्यांवर उभे राहून बासरी वाजवत होते आणि त्या मुलांना सूचना देत होते. दरवर्षी ११ जूनला या चौकात शाळेतील मुलांच्या स्पर्धा असतात त्यासाठी हा सराव चालू होता. इथे आम्हाला एक एक पाऊल उचलताना त्रास होत होता, पण ती मुलं अतिशय उस्फूर्तपणे, पूर्ण ताकदीने नाचत होती. त्यांचा नाच पाहून आम्हालाही हुरूप आला आणि चौकाच्या बाजूला असलेल्या गल्ल्या मधून आम्ही फिरायला सुरुवात केली. याभागातले सगळे रस्ते दगडानी बांधलेले होते. डोंगरावर जाणारे हे रस्ते अरुंद असल्यामुळे सर्व रस्त्यांवर एकेरी वाहातुक होती. इथे सामान्य माणसांची घरे डोंगरावर होती. त्यांना नोकरी आणि शाळा यासाठी खाली शहरात ये-जा करावी लागत होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होती. अरुंद रस्ते आणि एकेरी वाहातुक असूनही सगळं शिस्तीत नियमानुसार चालू होतं त्यामुळे कुठेही गोंधळ, हॉर्नचे आवाज येत नव्हते.
 |
| भूकंपामुळे बाहेर आलेल मुळ कोरीकोंचा मंदिर |
 |
| कोरीकोंचा मंदिरावर बांधलेले चर्च |
इंकांचे कोरीकांचा (Qoricancha) हे सूर्य देवाचे मंदिर जवळच असल्यामुळे आम्ही चालतच निघालो. कोरीकांचा याचा अर्थ सोन्याचे देऊळ. पंधराव्या शतकात इंकांची राजधानी कुस्को जिंकून घेतल्यावर स्पॅनिश लोकांनी कोरीकांचा या सूर्य मंदिरातील सोने आणि चांदी लुटून मंदिराची मोडतोड करुन त्यावर सेंट डोमिनिक चर्च बांधले. त्याच बरोबर स्थानिक इंका प्रजेचे धर्मांतरण सुरु झाले. कालांतराने लोक कोरीकांचा बद्दल विसरुन गेले. इसवीसन १६५०, १७४९, आणि १९५० मध्ये मोठ मोठे भुकंप होऊन चर्चची पडझड झाली. १९५० साली झालेल्या भूकंपात कोरीकांचाच्या सूर्य मंदिराच्या मुळ दगडी बांधणीच्या भिंती उघड्या पडल्या आणि पुरातत्व तज्ञांचे तिकडे लक्ष वेधले. याठिकाणी सूर्य मंदिरा बरोबर Goddess Killa (चंद्र, चंद्राला इंका सूर्याची बायको मानतात), God Illapa (वीज), God K'uychi (इंद्रधनुष्य) आणि Goddess Chack'a (चांदणी) यांची मंदिरे सापडली. चर्चने दडपून ठेवलेले रहस्य भूकंपामुळे बाहेर आले. आज चर्चच्या आत मधील हे कोरीकांचा मंदिर पाहाण्यासाठी सर्वांना फ़ी आकारली जाते. पंधराव्या शतकात चर्चनेच मंदिर पाडले आणि लुटले. आता त्याच मंदिराचे अवशेष पाहाण्यासाठी चर्च पैसे घेत आहे म्हणजे दोन्हीकडून फायदा त्यांचाच आहे असे आमच्या स्थानिक गाईडने बोलून दाखवल.
 |
| कोरीकोंचा मंदिराच्या बांधकामात वापरलेले दगड जोडण्यासाठी केलेल्या खाचा |
चर्चच्या आतील कोरीकांचा मंदिराचे बांधकाम दगडात केलेले आहे. बांधकाम करण्यासाठी वापरलेले दगड एकमेकांत इंटरलॉक करुन बसवलेले आहेत. या मंदिरांची दार आपल्याकडे असतात तशी आयतकृती न ठेवता, समलंब चौकोनासारखी ठेवलेली आहेत. या रचनेमुळे अनेक भुकंप येऊन गेले तरीही, बाराव्या शतकात बांधलेल्या या मंदिराच्या भिंती अजूनही उभ्या आहेत. मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्य उद्यान आहे. त्यात ५ दगडी कारंजी आहेत. त्यातून डोंगरातून आणलेले पाणी खेळवलेल आहे. हे पाणी वाहून नेण्यासाठी दगडांच्या पन्हाळी आहेत. मंदिर आणि चर्च पाहून गाईड बरोबर गप्पा मारत होतो. त्याने सांगितलेकी, पेरुची ९२% जनता आता रोमन कॅथॅलिक आहे. त्यांच्यावर चर्चचा मोठा पगडा आहे.
 |
| बाग आणि कारंजे, कोरीकोंचा मंदिर |
सर्वांचे शालेय शिक्षण चर्चेसनी चालवलेल्या शाळेत होते. त्यानंतरच्या शिक्षणासाठी सरकारी आणि चर्चेसनी चालवलेली कॉलेज असे दोन पर्याय आहेत. चर्चेसनी चालवलेली कॉलेज महाग आहेत, तरीही लोक आपल्या मुलांना त्या कॉलेजात घालतात. त्यामुळे सर्व शिक्षण चर्चच्या देखरेखी खाली स्पॅनिश मध्ये होते. त्यामुळे स्थानिकांची " क्वेचा" ही भाषा मरणपंथाला लागलेली आहे. भाषा व आपली संस्कृती टिकवण्यासाठी काही लोक आता झटत आहेत.
जगभरात फ़िरतांना स्थानिकांशी संवाद साधल्यावर लक्षात येते की, त्यांचा मुळ धर्म, भाषा आणि संस्कृती त्यांच्यावर राज्य करणार्या इतर धर्मीय राज्यकर्त्यांनी नष्ट केली आहे. त्यांच्यावर ख्रिश्चन आणि इस्लाम धर्म लादल्याची खंत अनेक जणांना आहे. अशावेळी अनेक आक्रमणां नंतरही हिंदुंनी टिकवलेली संस्कृती,भाषा आणि सणवार याबद्दल मी त्या लोकांना आवर्जून माहिती देतो.
 |
| स्थानिक जेवण, कुस्को |
आम्ही भारतातून आलोय हे कळल्यावर त्याने शहारुख खान तिथल्या तरुण मुलामुलींमध्ये फ़ेमस असल्याचे सांगितले. जगाच्या दुसर्या टोकावर असलेल्या लोकांना शहारुख खान आणि बॉलिवुडचे सिनेमे माहित आहेत हे ऐकून गंमत वाटली. त्याने एका इंडीयन रेस्टॉरंटपाशी आम्हाला सोडल. पण ते इंडीयन रेस्टॉरंट एक स्थानिक माणूस चालवत होता. त्यामुळे त्या भानगडीत न पडता, कौस्तुभने गूगलवर एक मस्त रेस्टॉरंट शोधून काढले. तिथे फ़क्त तंदूर कोंबडीचे प्रकार मिळत होते. चवही चांगली होती. त्यामुळे यथेच्छ ताव मारुन आम्ही हॉटेल गाठले. दिवसभराच्या दगदगीमुळे सर्व ज्ण अंथरुणाला पाठ टेकताच झोपी गेले , मी मात्र टक्क जागा होतो. काही केल्या झोप येईन. त्याचे कारण कळायला शेवटचा दिवस उजाडला.
 |
| sacsayhuman |
दुसर्या दिवशी नाश्ता करुन सकाळीच बाहेर पडलो. कुस्को मधून माचूपिचूला जाणार्या इंका ट्रेलने आम्ही कुस्को शहरापासून सॅक्सेह्युमन (sacsayhuman) या १२५०० फूट उंचीवर असलेल्या इंकानी बांधलेल्या किल्ल्यात / मंदिरात जाणार होतो. चौकात येऊन डोंगरावर जाणाऱ्या रस्त्याने चढायला सुरुवात केली. वेगवेगळ्या टप्प्यावरून कुस्को शहरांची सकाळची रूप न्याहळत १००० फ़ूट चढून सॅक्सेह्युमनच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. तिथे दोन डॉक्टर आणि ॲम्बुलन्स उभी होती. त्यांनी आमची चौकशी केली. हाय अल्टिट्यूडचा अनेक पर्यटकांना त्रास होत असल्यामुळे सरकारने हे निशुल्क सेवा केंद्र ठेवल होत. तिकिट काढून आत प्रवेश केल्यावर समोर मोठ मैदान होते. सॅक्सेह्युमनचा वापर किल्ला आणि धार्मिक विधी करण्यासाठी होत असे. दरवर्षी २४ जूनला या मैदानावर Inti Raymi हा इंकांचा मोठा सण साजरा केला जातो. इसवीसन १५३३ मध्ये फ़्रान्सिस्को पिझारो (Francisco Pizarro) या स्पॅनिश सरदाराने कुस्को ही इंकांची राजधानी जिंकून घेतली. इंकांचा राजा मॅन्को इंका युपांक्वी याला मांडलिक म्हणून राज्यावर बसवले. इसवीसन १५३६ मध्ये मॅन्को इंका स्पॅनिशांच्या तावडीतून निसटला आणि त्याने सैन्याची जमवाजमव केली . सैन्यानिशी हल्ला करुन त्याने कुस्कोवर ताबा मिळवला . मे १५३६ मध्ये स्पॅनिश सरदार फ़्रान्सिस्को पिझारो याने सॅक्सेह्युमनवर हल्ला केला. त्यात त्याचा भाऊ मारला गेला. तरीही माघार न घेता त्यांनी युध्द चालू ठेवले आणि १० महिन्यानंतर कुस्को पुन्हा ताब्यात घेतले. ही लढाई या परिसरात लढली गेली.
 |
| २५ फूट उंच, २०० टन वजन असलेले दगड |
मैदानाच्या पलिकडे असलेल्या टेकडी भोवती १००० फूट लांबीची सर्पिलाकार तिहेरी तटबंदी आहे. या तीन तटबंद्या Hanan Pacha (स्वर्ग), Kay Pacha (पृथ्वी), आणि Ukhu Pacha (पाताळ) यांच्या निदर्शक आहेत असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. तटबंदी जवळ पोहोचल्यावर त्याची भव्यता आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम पाहून त्या स्थपतींना मनोमन साष्टांग नमस्कार घातला. या तटबंदीचे बांधकाम करताना अवाढव्य दगड वापरलेले आहेत. त्यातील काही दगड २५ फूट उंच, २०० टन वजन असलेले आहेत. अशाप्रकारच्या बांधकमाला Cyclopean Walls असे म्हटले जाते. इंकाकडे हत्ती, घोडे, बैल असे प्राणी नव्हते. त्यामुळे हे दगड खाणीतून लाकडी ओंडक्यांवरुन खेचत आणलेले होते. तसेच लहान आकाराचे दगड खेचत आणण्याकरिता जमिनीवर लहान खड्यांचा (बॉलबेरींग) थर रचून त्यावरुन दगड खेचून आणत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागत असे. संशोधकांनी अशाप्रकारे १०० टन वजनाचा दगड दोर बांधून खेचून नेण्याचा प्रयोग याठिकाणी केला होता. त्यासाठी १००० माणसे लागली होती.
 |
|
जगभरातील पूरातन इमारती, किल्ल्यांच्या तटबंद्या या साधारणपणे चौकोनी आकाराच्या घडीव दगडात बांधलेल्या असतात. एका वर एक रचलेले दोन दगड जोडण्यासाठी चूना, धातूचा रस किंवा इंटरलॉकींगचा वापर केलेला असतो. पण इंकानी केलेल्या सर्व बांधकामांचे वैशिष्ट्य म्हणजे बांधकामासाठी वापरलेल्या दगडाचा आकार कुठलाही असू शकतो. हे दगड चुना, धातूचा रस इत्यादी न वापरता एकमेकांमध्ये अशाप्रकारे बसवलेले आहेत की दोन दगडांमध्ये पातळ कागद जाईल इतकीही जागा नसते. या भूकंप प्रवण क्षेत्रात अनेक भूकंप पचवून ही तटबंदी आणि इंकांनी केलेली इतर बांधकामे आजही उभी असलेली पाहायला मिळतात.

विविध आकाराचे दगड एकमेकांत कसे बसवले असतील यावर संशोधकांची अनेक मत आहेत. त्यात अमेझॉनच्या जंगलात आढळणार्या विशिष्ट वनस्पतींचा रस वापरुन दगड जोडले आहेत पासून अनेक आरसे वापरुन सूर्याच्या उष्णतेने दगड वितळवले होते असे अनेक तर्क वितर्क आहेत. त्यातील सध्या मान्य झालेला तर्क म्हणजे पायाचे वेगवेगळ्या आकाराचे दगड बसवल्यावर दोन दगडांमध्ये जी पोकळी निर्माण होते, त्याचा आकार लाकडाच्या पटट्यांवर काढला जात असे. जो दगड या पोकळीत बसवायचा आहे त्याला लाकडाच्या पट्ट्यांवर काढलेल्या आकाराप्रमाणे तोडले जात असे. दगड योग्य आकारात येईपर्यंत दुसर्या दगडांनी त्यावर घाव घातले जात. हे काम अतिशय कौशल्याचे आणि वेळखाऊ होते. अशा प्रकारे तयार केलेला दगड त्या पोकळीत बसवून वरुन लाकडी हातोडीने ठोके मारुन दगड घट्ट बसवला जात असे. हे सर्व लिहायला दोन ओळी पुरल्या पण प्रत्यक्ष काम किती जटिल असेल याचा तटबंदी पाहून अंदाज येत होता.
 |
| मनोर्याचा पायथा |
या तटबंदीत इंका पध्दतीचा समलंब चौकोनी आकाराचा दरवाजा आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यावर गेल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला दोन उंचवटे आहेत. त्यावर दोन मनोरे होते. यातील डाव्या बाजूच्या उंचवट्यावर असलेल्या मनोर्याला Paucarmarka म्हणतात. या उंचवट्या पासून उतरत खाली गेल्यावर गोदामांचे अवशेष पाहायला मिळतात. येथुन उजव्या बाजूच्या उंचवट्याकडे जातांना मधल्या खोलगट भागात एक मनोरा होता त्याला SallaqMarka या नावाने ओळखले जाते. उजव्या बाजूच्या उंचवट्यावर Muyuq Marka नावाचा मनोरा होता. आज तिनही मनोरे अस्तित्वात नाहीत, पण त्यांचे अवशेष पाहायला मिळतात. याठिकाणी दगडात कोरलेले सिंहासन आहे. किल्ल्याच्या या सर्वोच्च स्थानावरुन कुस्को शहराचे विहंगम दृष्य दिसते. सॅक्सेह्यूमन या शब्दाचा अर्थ "Satisfied Hawk". इथे आल्यावर आपल्यालाही ससाण्याच्या नजरेतून कुस्कोचे दर्शन होते.
 |
| Tambomachay, Cusco |
पुढील ठिकाण होते टांबोमाचाय (Tambomachay ) टाम्बो या क्वेचा भाषेतील शब्दाचा अर्थ थांबा आहे. सेक्रेड व्हॅली मध्ये अनेक असे टाम्बो (थांबे) आहेत. सेक्रड व्हॅली मधून कुस्को या राजधानीच्या शहराकडे जाणार्या इंका ट्रेलवर हा थांबा म्हणजेच सराई आहे. इंका संस्कृती मध्ये पाणी पवित्र मानल जात असे. पाण्याला जीवन आणि शाश्वत मानले जाते. पाण्याला जमिन आणि आकाशातील देव यांच्या मधील दुवा मानले जाते. त्यामुळे इंकांनी बांधलेल्या अनेक वास्तूंच्या भोवती पाणी खेळवलेले पाहायला मिळते. टांम्बोमाचाय याठिकाणी डोंगरातून आणलेल पाणी दगडात कोरलेल्या पाटांनी खेळवलेले आहे. पाण्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी उतारांचा आणि गुरुत्वाकर्षणाचा वापर करण्यात आलेला आहे. याठिकाणी काही स्नानगृह बांधलेली आहेत. कुस्को या पवित्र शहरात प्रवेश करण्यापूर्वी स्नान करुन शुध्द होऊन पुढे जावे लागत असे.
 |
| टांबोमाचाय, कुस्को |
दिवसभर तंगडतोड केल्यामुळे अंथरुणावर पडल्या पडल्या सगळे झोपले पण मी मात्र काल सारखाच टक्क जागा होतो. उद्या पासून सेक्रेड व्हॅलीचा प्रवास चालू होणार होत. त्याबद्दल पुढच्या भागात....
*****************
पेरु मधील वरील ऑफबीट भटकंतीवर लिहिलेले लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा...
१) नाझका लाईन्सचे गुढ (भाग- १) ( Unsolved Mystery of Nazca Lines -1 ) हा ऑफबीट पेरु वरील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा...
२) नाझका लाईन्सचे गुढ (भाग- २) ( Unsolved Mystery of Nazca Lines - 2) हा ऑफबीट पेरु वरील लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा...
 |
| सोल, पेरुच चलन |
छायाचित्रण:- अमित सामंत, अस्मिता सामंत, कौस्तुभ सामंत (©Copy Right)
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro -5