महाराष्ट्रात ऐतिहासिक मंदिरे, लेणी आहेत त्याच बरोबर मध्ययुगीन मशिदीही पाहाण्यासारख्या आहेत. तेराव्या शतकापासून महाराष्ट्रातील मुस्लिम शासकांनी मशिदी बांधायला सुरुवात केली. अल्लाउद्दीन खिलजी आणि मुहम्मद बीन तुघलकाच्या आक्रमणां नंतर दक्षिणेत मुस्लिम राजवटी स्थिरावल्या. सुरुवातीच्या काळात हिंदु, जैन मंदिरांचे खांब, दगड वापरुन मशिदी बांधलेल्या पाहायला मिळतात. देवगिरी , परांडा इ. किल्ल्यावरील मशिदीत अशा प्रकारचे खांब पाहायला मिळतात.
![]() |
Mosque in Paranda Fort |
मुस्लिम राज्यकर्त्यांनी सुरुवातीच्या काळात उत्तरे कडून कारागिर आणून मशिदी, वास्तू, किल्ले यांची निर्मिती केली. त्यामुळे त्यावर उत्तरेच्या स्थापत्य शैलीची छाप दिसून येते. त्यानंतरच्या काळात मुस्लिम राजवटी दक्षिणेत स्थिरावल्या त्यामुळे स्थानिक स्थापत्य शैलीचा प्रभाव पुढील काळात बांधकामांवर पडलेला दिसतो. त्याबरोबरच पर्शिया, अरबस्तान इत्यादी भागातून अनेक कारागिर दक्षिणेत काम मिळवण्यासाठी आले त्यांनीही यात भर घातली. कालांतराने यातून बहामनी, बिदर, विजापूर, अहमदनगर गोवळकोंडा इत्यादी स्थापत्य शैली निर्माण झाल्या.
![]() |
katichi Masjid, kati, Osmanabad dist |
उस्मानाबाद जिल्ह्यात, तुळजापूर तालुक्यात तुळजापूर पासून २४ किलोमीटर काटी नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावात हिजरी १०१२ (इसवीसन १६०४) मध्ये अहमदनगरचा निजाम बुर्हाणशहा याच्या काळात बांधलेली प्रसिध्द जामा मशिद आहे. बुर्हाणशहाचा सरदार याकुतच्या बायकोने मेहेरच्या पैशातून या मशिदीची निर्मिती केली होती. काळ्या बेसॉल्ट मध्ये बांधलेली ही मशिद म्हणजे दख्खनी शैलीच्या इस्लामी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे.
![]() |
Entrance gate of Kati Masjid |
काटी गाव हे मध्ययुगात अहमदनगर - तुळजापूर - सोलापूर व्यापारी मार्गावरील गाव असावे. त्यामुळे या गावात भव्य जामा मशिदीची निर्मिती करण्यात आली असावी. मराठवाड्यातल्या इतर गावंप्रमाणे काटी हे छोटेसे गाव आहे. गावच्या बाहेरच्या परिघावर शेत आहेत तर गावात दाटीने बांधलेली घरे आहेत. या घरांच्या मध्ये त्यांना फ़टकून असलेली भव्य आणि सुंदर जामा मशिद उभी आहे.
![]() |
Minar, Kati |
पूर्वाभिमुख भव्य अशा सदर दरवाजातून आपला मशीदीच्या परीसरात प्रवेश होतो. दरवाजाच्या चारही बाजूला सडपातळ मिनार आहेत. मिनारांवर फ़ुलांची आणि पाकळ्यांची नक्षी आहे. मिनाराच्या वर छोटे घुमट असून घुमटा खाली उठावदार पाकळ्या आहेत. सदर दरवाजाच्या आतील भाग अनेक कमानींचा बनवलेला आहे. कमानींच्या बाजूला फ़ूल कोरलेली आहेत. दरवाजातून प्रांगणात प्रवेश केल्यावर समोरच वजू करण्यासाठी बांधलेला तलाव आहे. तो भरण्यासाठी मशिदीच्या आवारात एक विहिर आहे. तलावाच्या समोर मशिदीची तीन कमान असलेली इमारत आहे. मशिदीच्या चौकोनी इमारती भोवती फ़िरवलेल्या फ़ुलांच्या पट्टीमुळे (cornice) इमारत दोन मजली असल्याचा भास होतो. इमारतीच्या बाहेरच्या बाजूने एक सुंदर जीना आहे. मशिदीचा आतील भाग कमानींनी बनलेला आहे.
मशिदीच्या पश्चिमेच्या भिंतीत असलेल्या मेहराबावर आणि त्यावरील अर्ध घुमटावर अप्रतिम नक्षीकाम केलेले आहे. मशिदीच्या आतील भिंतींवर कुराणातील आयात आणि सुविचार फ़ारसी भाषेत कोरलेले आहेत. आश्चर्याचा भाग म्हणजे भिंतीवर कोरलेली ही अक्षरे सहजासहजी दिसत नाहीत. त्यावर पाणी मारल्यास ती अक्षरे दिसतात.
![]() |
Beautiful steps, Kati |
मशिदीच्या बाहेरच्या बाजूला सुंदर आणि उठावदार फ़ूलं कोरलेली आहेत. मशिदीच्या चारही कोपर्यात चार मिनार आहेत. त्यांना जोडणारी नक्षीदार कठडापट्टी आहे. मशिदेचा मुख्य घुमट गोलाकार पायावर आहे. या घुमटाखाली नाजूक आणि उठावदार पाकळ्या आहेत. मशिदीच्या आवाराच्या चारही बाजूला रिवाक (तटबंदी) आहे. पूर्णपणे दगडात बांधलेली आणि दगडातील अप्रतिम कोरीव कामासाठी ही आडवाटेवर असलेली मशिद एकदा तरी नक्की पाहायलाच हवी.
![]() |
पाणी मारल्यावर दिसणारी अक्षरे |
जाण्यासाठी :- काटी गाव तुळजापूर पासून २४ किलोमीटर आणि सोलापूर पासून ७० किलोमीटरवर आहे.
(उस्मानाबाद परिसरातील अपरिचित ठिकाणां बद्दल "ऑफ़बीट मराठवाडा (उस्मानाबाद,लातूर)" हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.)
(उस्मानाबाद परिसरातील अपरिचित ठिकाणां बद्दल "ऑफ़बीट मराठवाडा (उस्मानाबाद,लातूर)" हा लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.)
#osmanabad#offbeatmaharashtra#mosqueinmaharashtra#tuljapur#