एकेकाळी मानवाला निसर्गातील अनेक आश्चर्यांचा उलगडा झाला नव्हता. त्यामागील विज्ञानही त्याला कळले नव्हते. त्यामुळे अशा ठिकाणांना दैवी चमत्कार समजून त्याठिकाणी त्याने मंदिरे उभारली. हिमाचल प्रदेशातील ज्वालाजी मंदिर, गरम पाण्याच्या कुंडांभोवती भारतभर बांधलेली मंदिरे, लोणार सारख्या विवरात आणि आजूबाजूला बांधलेली मंदिरे अशी अनेक उदाहरणे आपल्याला भारतात पाहाता येतात.
मालवण पासून ३३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मठ गावात बोंबडेश्वर मंदिर आहे. कोकणी पध्दतीच्या साध्या कौलारू मंदिरा समोर चिर्याने बांधलेले दोन कुंड आहेत. या दोन्ही कुंडातील पाणी समपातळीत राहावे यासाठी मधल्या भिंतीत काही छिद्र ठेवलेली आहेत. यातील उजव्या बाजूच्या कुंडाता पाण्याचे झरे आहेत. या कुंडातील पाणी मधल्या भिंतीत केलेल्या छिद्रातून बाजूच्या कुंडात जाते आणि पुढे पाणी पाटामार्गे बागायतीत वळवलेले आहे. दोन तलावांपैकी उजवीकडील झरे असलेल्या कुंडातील पाण्यात अधूनमधून बुडबुडे येत असतात. " बोंबडेश्वर "अशी साद मोठ्या आवाजात घातल्यावर तळ्यातून येणाऱ्या बुडबुड्यांची संख्या वाढते. अर्थात बोंबडेश्वर हा उच्चार न करताही केवळ मोठ्या आवाजात उच्चारलेल्या शब्दांच्या कंपनानीही तलावातून बुडबुडे येतात. आम्ही तिथे असताना गावातल्या दोन बायका बाजूच्या कुंडात पाणी भरायला आल्या होत्या. त्यांच्या बोलण्यामुळेही कुंडातून बुडबुडे येण्यास सुरुवात झाली होती. मालवणी भाषेत बोंबाडे म्हणजे बुडबुडे तळ्यातून येणाऱ्या या बुडबुड्यांच्या चमत्कारावरुन याठिकाणी स्थापन झालेल्या पिंडीला (शंकराला) बोंबडेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे.
यावरुन २००२ साली उत्तरांचल मधील केदारेश्वरला पाहिलेल्या पुरातन शंकर मंदिराची आठवण आली. केदारेश्वर मंदिराजवळ असलेले मंदाकिनी नदीचे पात्र ओलांडल्यावर एक पडके मंदिर होते . त्या मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंग पाण्यात पूर्णपणे बुडालेले होते . त्या ठिकाणीही "बम बोले" असे म्हटल्यावर पाण्यात बुडबुडे येत असत. २०१३ साली केदारनाथला झालेल्या उत्पाता नंतर ते मंदिर अस्तित्वात आहे की नाही याची कल्पना नाही . मुंबई गोवा मार्गावरील तरळा गावावरून वैभववाडीकडे जाणार्या रस्त्यावर नाधवडे गावाच्या पुढे 'उमाड्याचा महादेव' मंदिर आहे. या मंदिरासमोर असलेल्या नदीच्या शांत प्रवाहात पाण्यातून सतत बुडबुडे येत असतात.
(आवाज केल्यावर पाण्यातून निघणाऱ्या बुडाबुड्याचा व्हिडीओ पहाण्याकरीता प्ले बटण दाबा )
गंधकामुळे अशा प्रकारचे बुडबुडे पाण्यातून येतात असे ऐकले होते. पण गंधकाचा येणारा विशिष्ट वासही या दोन्हीही ठिकाणी येत नव्हता . मग हे बुडबुडे कशामुळे येत होते . याचा उलगडा होण्यासाठी भूशास्त्राची थोडीशी माहिती करुन घेणे आवश्यक आहे. भूस्तराखाली जे अनेक दगड असतात त्यात सच्छिद्र दगडही असतात. या सच्छिद्र दगडात असलेल्या पोकळीत हवा असते. कोकण होणाऱ्या प्रचंड पावसामुळे बेसॉल्ट खडकातील क्षार वाहून जातात त्यामुळे जांभा दगडाची निर्मिती झालेली आहे . क्षार वाहून गेल्यामुळे हा दगड सच्छीद्र बनलेला असतो. या सच्छिद्र दगडातून वाहात येणार्या पाण्या बरोबर हवा दगडातील पोकळ्यांमध्ये अडकून राहाते. मोठ्या आवाजामुळे पाण्यात कंपने निर्माण होतात. या कंपनांमुळे सच्छिद्र दगडातील पोकळीत अडकलेली हवा बाहेर येते आणि आपल्याला बुडबुड्यांच्या स्वरुपात पाहायला मिळते.

बोंबडेश्वर मंदिर परिसरात काही सुंदर विरगळ ठेवलेल्या आहेत. विरागळी बद्दल वाचण्याकरता खालील लिंक वर टिचकी मारा
निसर्गातील हा चमत्कार पाहाण्यासाठी बंबार्डेश्वर मंदिराला एकदा तरी जायला पाहीजे. या बरोबरच कुडोपी गावातील कातळशिल्प पाहाता येतील. (यावर "गुढरम्य कातळशिल्प" हा ब्लॉग लिहिलेला आहे.वाचण्याकरता खालील लिंक वर टिचकी मारा
जाण्यासाठी :- मालवणहून आचर्यामार्गे कणकवलीला जाणाऱ्या रस्त्यावर मालवण पासून २८ किलोमीटर अंतरावर बुधावळे गावाला जाणारा फाटा आहे. या रस्त्याने बुधावळेला जाताना ५ किलोमीटर अंतरावर मठ नावाचे गाव आहे. गावात रस्त्याला लागून बोंबडेश्वर मंदिर आहे. मठ ते कणकवली अंतर २० किलोमीटर आहे. मठ ते देवगड अंतर ३६ किलोमीटर आहे.
#Offbeatkokan