|
Water tank at Bijak ki Pahadi |
विराट नगरच्या इतिहासात डोकावल्यास , ख्रिस्तपूर्व पाचवे ते सहावे शतकातील घडामोडींनी प्राचीन भारत खंडाच्या इतिहासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. सिंधू संस्कृतीचा र्हास झाल्यावर तेथील लोक पूर्वेकडे यमुना आणि गंगेच्या खोर्यापर्यंत आणि दक्षिणेकडे पसरले. त्यांनी लहान वसाहती आणि खेडी तयार केली, त्या वसाहती किंवा गावांना 'जनपद' असे म्हणतात. कालांतराने ज्या जनपदांची अर्थव्यवस्था, व्यापार मजबूत होता. त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभारली.आणि शेजारील कमजोर व लहान जनपदे जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेतली. अशी लहान लहान जनपदे मिळून तयार झालेल्या मोठ्या राज्यांना 'महाजनपदे' म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी छोटी छोटी १६ राज्ये स्थापन झाली . ती "१६ महाजनपद" या नावांने ओळखली जातात. बौध्द आणि जैन ग्रंथात १)अंग, २) अस्माक,३) अवंती, ४) चेडी, ५) गंधर्व, ६)काशी, ७) कंबोज, ८) कोसला, ९) कुरु , १०) मगध, ११) मल्ल , १२) मत्स्य , १३) पांचाल, १४)सुरसेना, १५) वाज्जी, १६) वत्स या १६ महाजनपदांचा उल्लेख येतो.
|
१६ महाजनपद, Courtesy google.com |
प्राचीन भारतात १६ महाजनपदे होती. त्यातील मत्स्य महाजनपद हे आजच्या जयपुर, अलवार , भरतपुर या भागात पसरलेले होते . विराट राजाने स्थापन केलेले विराट नगर ही
मत्स्य महाजनपदाची राजधानी होती. मौर्यांच्या
काळात विराट नगर हे भारतातले प्रमुख शहर आणि बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते. त्याच काळात या स्तुपाची निर्मिती करण्यात आली.
|
Cave temple, Virat Nagar |
स्तुपाचे अवशेष असलेल्या टेकडीच्या वर चढून गेल्यावर , एक गुहा मंदिर पाहायला मिळते. या परिसरात झालेल्या
उत्खननात विटांचे काही चौथरे पाहायला मिळतात. येथून खालच्या टेकडीवर दिसणार्या स्तूपाच्या अवशेषाकडे पाहिल्यावर (Arial View) काहीतरी गुढ चिन्ह ,आकार दिसायला लागतो. पुरातत्व खात्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर , नीटनेटका आणि सुशोभित ठेवलेला आहे.
|
गणेश मंदिर, विराट नगर |
बिजक की पहाडी उतरुन संग्रहालय आणि गणपती मंदिर
पाहाण्यासाठी गावात शिरलो. गावातील अरुंद रस्त्यावरुन वाट काढत . एका टेकडीच्या पायथ्याशी
पोहोचलो . ही टेकडी पण मोठमोठ्या खडकांनी बनलेली होती. या टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव
व संग्रहालय आहे. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर स्वयंभु गणेश मंदिर आहे. इथले वातावरण बिजक
की पहाडीच्या एकदम विरुध्द होत. तिथे एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही दोघच होतो. इथे मात्र
प्रचंड गर्दी होती, टेकडी खालचे पार्कींग
फ़ुल होते. प्रसाद, हार विकणारी दुकान आणि त्यामध्ये असलेली गर्दी यातून
वाट काढत गणपतीचे दर्शन घेतले . पायथ्याशी असलेल्या संग्रहालयात शिरलो. संग्रहालय अतिशय
सुंदर आहे. विराट नगरचा इतिहास वस्तू रुपात खूप चांगल्या प्रकारे मांडलेला आहे, सोबत पूरक माहितीही लिहिलेली आहे.
|
Clay Objects, Virat Nagar |
|
Punch Marked Coins, Virat Nagar |
|
Indo Greek Coins, Virat Nagar |
विराट नगरच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर अनेक गुहा आहेत. या गुहांमधून आदिमानवाचे
वास्तव्य होते. इसवी सन १८७१ -७२ मध्ये कॅनिंग हॅम यांनी विराट नगर मधील अवशेष शोधून
काढले. या गुहांमध्ये आणि या परिसरात पुरातत्व
खात्याने केलेल्या उत्खननात मिळालेल्या अश्मयुगीन
दगडी हत्यारांवरून अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य या ठिकाणी एक लाख ते पन्नास हजार वर्षांपूर्वी
पासून होते असे मत श्री एन.आर. बॅनर्जी यांनी मांडले आहे. त्यांनी कैलास नाध दीक्षित
यांच्याबरोबर या ठिकाणी १९६०-६२ मध्ये उत्खनन केले होते . विराट नगर येथे केलेल्या उत्खननात विविध काळातील
दगडी हत्यारे, मातीचे भांडी, मूर्ती, विटा, दागिने, लोखंडाची हत्यारे सापडली आहेत .
याशिवाय अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या काळातील नाणी सापडलेली आहेत. यात Punch Mark coins, Indo
Greek coins ( यावर ग्रीक आणि खरोष्टी लिपीत
मजकूर लिहिलेला आहे ), मुघलांची नाणी
इत्यादी आहेत. या सर्व गोष्टी या ठिकाणी
व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत इसवी सन ६३४ मध्ये चिनी प्रवासी ह्यूएनत्संग (युआनच्वांग)
विराट नगरला आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात विराट नगरचा उल्लेख केलेला
आहे. संग्रहालय पाहाण्यसाठी शुल्क नाही , तरीही बाहेर एवढी गर्दी असूनही
संग्रहालय पहायला मात्र दोन चार जणच आले होते.
आपल्याच संस्कृती, इतिहासा बद्दल असलेली अनास्था दुसर काय ?
संग्रहालय बघितल्यावर पुढची तीन ठिकाण गावाच्या
दुसऱ्या भागात होती. भीम डुंगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर "सम्राट अशोक शिलालेख"
अशी दिशा दर्शक पाटी पाहून त्या दिशेने चालत निघालो. पुरातत्व खात्याने तिथे जाण्यासाठी
पायावाट व्यवस्थित बांधून काढलेली आहे. ज्या दगडावर शिलालेख होता त्यावरही काँक्रीटची
शेड बांधलेली आहे. पण शिलालेख मात्र त्या ठिकाणी नाही.
|
सम्राट अशोक शिलालेख, |
पुन्हा रस्त्यावर येऊन भीम डुंगरीच्या पायाथ्याशी आलो. या डोंगरावर भीमाशी संबंधित
अनेक गोष्टी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी गुहा आहे त्यात भीम वास्तव्य करत होता, पाऊलाच्या आकाराचे
पाण्याचे कुंड आहे. भीमाने लाथ मारून ते कुंड निर्माण केले असे समजले जाते.
डोंगराच्या मध्यावर एका गुहेत ११ मुखी शिवलिंग आहे. तिथेच भीमाचे आणि हनुमंताचे देऊळ
आहे. भीम आणि हनुमंत हे दोघेही पवनपुत्र, त्यांचे एकत्र देऊळ
भारतात केवळ या ठिकाणी आहे. या डोंगरावर अनेक गोलाकार मोठ्या आकाराचे खडक आहेत त्यांना
भीम गट्टे म्हणतात. भीम याने खेळत असे . या दगडांना पडलेले खड्डे त्याच्या बोटांमुळे
पडले आहेत असे स्थानिक लोक मानतात.
भीम डुंगरी उतरुन मुघल गेट म्हणजेच पंचमहाल जवळ पोहोचलो. हा पंच महाल आमेरच्या राजाने शाही यात्रींसाठी बांधला होता. अजमेरला जातांना आणि या परिसरात शिकारीला आल्यावर अकबर या ठिकाणी थांबत असे. या दुमजली महालात घुमटाकार छत असलेल्या खोल्या आहेत. छतांवर आणि भिंतींवर नक्षीकाम केलेले आहे. महाला समोर कारंजे आहे. मुघल स्थापत्य शैलीत बांधलेल्या या महालावर असलेल्या पाच छत्र्यांमुळे हा महाल पंचमहाल म्हणून ओळखला जातो.
|
मुघल गेट (पंचमहाल) |
जैन मुनी विमल सुरी यांनी विराट नगरच्या डोंगरात तपश्चर्या केली. विराट नगर मध्ये आजही भव्य जैन मंदिर आहे. विराट नगर मध्ये असलेले जैन नासिया मंदिर १६ व्या शतकात बांधले होते. मुघल गेट समोर असलेल्या या जैन मंदिराच्या बांधणीवर मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.
|
Jain Temple , Virat Nagar |
|
Adinatha, Virat Nagar |
विराट नगर मधील हिंदू, बौध्द,
जैन आणि मुस्लिम धर्माचे वेगवेगळ्या काळातील अवशेष, वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो.
जाण्यासाठी :-
विराट नगरला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर
ते विराट नगर हे अंतर १०३ किलोमीटर आहे. या भागात
बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.
जयपूर - भानगड - विराट नगर हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.
"सरीस्का व्याघ्र प्रकल्प" विराट नगर पासून १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे सरिस्का जवळ राहुनही "विराट नगर" पाहाता येते.
1) "झपाटलेला (?) किल्ला, भानगढ (Bhangarh , the most haunted (?) fort)" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2022/11/bhangarh-haunted-fort.html
2) "भीम - बकासूर युध्द आणि विखुरलेले तांदूळ" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2024/07/blog-post.html
3) "राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2017/06/blog-post_16.html
|
Shree Ram Mandir built by Pandava |
Photos by :-
Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5