|
Lava flow, Bhorwadi Gad |
जुलै संपता संपता पावसाने चांगलाच जोर पकडला होता. त्यामुळे भटकंतीसाठी बाहेर पडणे अपरिहार्य हो्ते. यावेळी नगर जिल्ह्यातील भोरवाडी गड आणि त्याच्या जवळची दोन "जिओलॉजीकल वंडर्स" बघायचे ठरवले होते. साधारणपणे ६५ दशलक्ष वर्षापूर्वी भारतीय उपखंड दक्षिणेला अंटार्टिका आणि इक्वेडोरच्या जवळ होता. त्याच्या उत्तरेकडे सरकण्यामुळे ज्वालामुखीचे स्फ़ोट होत राहीले आणि त्यातून हजारो वर्षे लाव्हा रस वाहत राहीला. त्यापासून बेसॉल्ट (Basalt) खडकापासून बनलेल्या दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली. अशाप्रकारे तयार झालेल्या दख्खनच्या पठारात अनेक "जिओलॉजीकल वंडर्स" पाहायला मिळतात.
माळशेज घाटात देमार पाऊस होता. धुकं, धबधबे यामधून वाट काढत पुढे निघालो, भोरवाडीला जाण्यासाठी कल्याण - नगर रस्ता सोडला आणि उजवीकडे वळलो तर एकदम वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटायला लागलं. या भागात नुसता रखरखाट होता. ओहोळ सुकलेले होते, त्यात साधं पाण्याचं डबकंही दिसत नव्हत. पाऊसा अभावी पिकं सुकून गेलेली, पिकात शेतकर्यांनी चरायला गुर सोडली होती. हे दृश्य पाहात पाहात म्हसोबा झाप गावातील भोरवाडीला पोहोचलो. भोरवाडीच्या मागे असलेल्या डोंगरावर छोटासा किल्ला आहे. किल्ल्यावर माऊलाई देवीचे ठाणं आहे. दरवर्षी नागपंचमीला येथे देवीची यात्रा असते. भोरवाडीतून किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्या पर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. या रस्त्याने किल्ल्याचा डोंगर व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या मधील खिंडीतून ५ मिनिटांची चढाई केल्यावर आपण दोन डोंगरांमधील खिंडीत पोहोचतो. खिंडीतून डाव्या बाजूच्या डोंगरावर थोडी चढाई केल्यावर कातळात खोदलेल्या लांब रुंद पायर्या दिसतात. कातळातील पायर्या चढून वर गेल्यावर गडमाथ्यावर जाण्यासाठी मातीत खोदलेल्या पायर्या दिसतात. गडमाथावर मोठे मोठे खडक आहेत. गड माथ्याच्या एका टोकाला माऊलाई देवीचे ठाणं आहे. किल्ल्याच्या डोंगरावर चकचकीत दगड (Quartz) सापडतात. त्यापैकी काही दगड येथे पुजण्यासाठी ठेवलेले आहेत. किल्ल्यावर कातळात खोदलेली तीन पाण्याची टाकी आहेत, किल्ल्याच्या चारही बाजूला लांबलचक पसरलेले पठार असल्याने दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याचे स्थान आणि त्याचा आकार पाहाता या किल्ल्याची निर्मिती टेहाळणीसाठी केलेली होती.
किल्ल्यावरुन हे पठार पाहातांना हे सर्व आधी कुठेतरी पाहिल्या सारख वाटत होते. अचानक, आमच्या जिओलॉजीच्या लेक्चर मध्ये सरांनी "लाव्हा नदीचा (Lava river/Lava flow) " दाखवलेला फ़ोटो आठवला. आम्ही उभे होतो त्या ठिकाणाहून आजूबाजूचा प्रदेश तसाच दिसत होता. खिंडीच्या बाजूला असलेल्या डोंगरावरुन लाव्हा नदीचा प्रवाह खाली उतरत गेलेला दिसत होता. खात्री करण्यासाठी सरांना फ़ोन केला. त्यांना म्हसोबा झाप हे गावाचे नाव सांगितल्यावर त्यांनी तिथे लाव्हा नदीचा काही भाग आहे आणि त्याचा शोध डॉ. सुधा वडाडी यांनी लावला होता असे सांगितले. आजही आईस लॅंड आणि हवाई बेटावर असलेल्या जागृत ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या तप्त लाव्हा रसाची नदी वाहाताना पाहायला मिळते. ती पाहाण्यासाठी " लाव्हा रिव्हर टुरीझम" पण तिथे उदयाला आलेले आहे.
|
Lava flow, Iceland |
ज्वालामुखीचे मुख्य दोन प्रकार असतात. १) विस्फ़ोटक आणि २) अस्फ़ोटक. स्फोटक उद्रेकामध्ये ज्वालामुखीचा स्फोट होतो आणि अस्फोटक उद्रेकामधून लाव्हा वाहत राहतो. याचे कारण म्हणजे स्फोटक उद्रेकामधील लाव्हा रसाचे तापमान सुमारे ६००० सेल्सियस ते ८००० सेल्सियस असते, त्यामुळे लाव्हा खूप दाट असतो व वाहू शकत नाही. अस्फोटक उद्रेकामध्ये हे तापमान सुमारे १,१००० सेल्सियस ते १,२५०० सेल्सियस असते. त्यामुळे हा लाव्हा प्रवाही असतो. हा लाव्हा रस वाहायला लागल्यावर हवेच्या संपर्कात येतो आणि त्याचा पृष्ठभाग थंड होऊन लाव्हाची नळी (Lava Tube) तयार होते. त्याच्या आतून लाव्हाचा प्रवाह दूरवर पसरत जातो. पृष्ठभागावर पसरणाऱ्या लाव्हाचा "बेसॉल्ट खडक" तयार होतो.
|
Lava river/flow , Mhasoba Zap |
एकेकाळी भोरवाडीच्या अस्फ़ोटक ज्वालामुखीचा लाव्हा रस असाच लाव्हाच्या नळीतून वाहात दूरवर गेला होता. इतक्या वर्षाचा काळ लोटल्यामुळे झीज आणि विदारण झाल्यमुळे लाव्हाची नळी आज नष्ट झालेली असली तरी लाव्हाच्या नदीचे अवशेष आजही येथे पाहायला मिळतात. टेकडीच्या बाजूने जाणारा लाव्हा फ़्लो पाहात थोडे अंतर खाली उतरलो. एखाद्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे वळण घेत तो खाली उतरत होता. त्या प्रवाहा बरोबर वाहून आलेले आणि त्यात अडकलेले मोठे लालसर रंगाचे दगड दिसत होते. आमच्या मुळ प्लान मध्ये ही लाव्हाची नदी नसल्यामुळे वेळेच्या अभावी जास्त अंतर जाता आले नाही.
|
Lava Flow , Mhasoba Zap |
घरी आल्यावर सॅटेलाईट इमेज वरुन लाव्हा नदीचा प्रवाह व्यवस्थित पाहाता आला. साधारणपणे प्रवाहाची रुंदी ३० ते ५० मीटर असून लांबी ८ किलोमीटर आहे. म्हसोबा झाप परिसर हा दुष्काळी भाग असल्याने या भागात फ़ारशी शेती आणि वस्ती नाही आहे. त्यामुळे या भागतील लाव्हा नदीचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
आमचे पुढचे ठिकाण होत बोरी गाव . कुकडी नदीच्या तीरावर वसलेल्या बोरी गावात, इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर ७५,००० वर्षांपूर्वी जागृत झालेल्या "टोबा" ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख (tephra Ash) पाहायला मिळते . बोरी आणि टोबा मधले अंतर अंदाजे ३००० किलोमीटर आहे. जगात हाताच्या बोटांवर मोजता येण्या इतके महाज्वालामुखीचे उद्रेक झालेले आहेत. महाज्वालामुखींचा उद्रेक साधारणतः लक्षावधी वर्षांतून एकदा होतो. इतिहासातील शेवटचा मोठा महाज्वालामुखी उद्रेक हा टोबा (Toba), इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर सुमारे ७५,००० वर्षांपूर्वी झाला होता . त्याला Young Toba Tuff (YTT) म्हणतात. त्यापूर्वी ८ लाख वर्षापूर्वी टोबा ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता . त्याला Oldest Toba Tuff(OTT) म्हणतात. या महाउद्रेकाचा जोर इतका प्रचंड होता, की अख्खा टोबा पर्वतच कोसळून तेथे प्रचंड मोठे विवर तयार झाले. कालांतराने त्यात पाणी भरून तळे तयार झाले. हेच आता "लेक टोबा" या नावाने ओळखले जाते. टोबा कॅटेस्ट्रॉफी थिअरी (Toba Catastrophe Theory) नुसार या उद्रेकामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर राख बाहेर पडली, की उद्रेकानंतर ६ ते १० वर्षे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यामुळे हिमयुग आले. त्याचा परिणाम पुढील शेकडो वर्षे राहिला. अशा प्रकारच्या हिमयुगाला ज्वालामुखीय हिमयुग (Volcanic Ice Age) म्हणतात. टोबा ज्वालामुखीच्या उद्रेका नंतर त्याची राख आशिया, अफ्रिका आणि युरोप मध्ये पसरली. आपल्या महाराष्ट्रात ही राख आजही दोन ठिकाणी पाहाता येते. १) अहमदनगर जिल्ह्यातील "बोरी" या गावी कुकडी नदीच्या तीरावर आणि २) पुणे जिल्ह्यात अष्टविनायका पैकी "मोरगाव" जवळ कर्हा नदीच्या तीरावर पाहायला मिळते. या दोन्ही ठिकाणी एकाच ज्वालामुखीची राख असली तरी ती वेगवेगळ्या स्वरुपात पाहायला मिळते.
|
Tefra Ash, Bori |
बोरी गावातून कुकडी नदीवरील पूल पार केल्याबर नदीच्या कडेने एक छोटा रस्ता जात होता. रस्त्याच्या एका बाजूला ऊसाची शेती आणि दुसर्या बाजूला नदीच पात्र दिसत होते. एका शेतकर्याच्या घरा जवळून पाऊल वाटेने नदी काठचा उतार उतरून, नदी पात्रा लगत २ ते ३ मिनिटे चालल्यावर "टेफ्रा ॲशचे" (Tephra Ash) पिवळ्या मातकट रंगाचे चूनखडीच्या दगडासारखे काही पट्टे पाहायला मिळतात. टोबा ज्वालामुखीची राखेचे पट्टे नदीपात्रापासून पाच ते दहा मीटर आत आहेत. याठिकाणी साधारणपणे २० सेंटीमीटर ते ३ मीटर जाडीचे राखेचे थर विखुरलेले आहेत. ही राख चुन्याच्या दगडा सारखी घट्ट झालेली असून, तीचा रंग मातकट पिवळा झालेला आहे. नदी पात्रातल्या वाळूतील घटकांशी वर्षानुवर्ष रासायनिक प्रतिक्रिया (Chemical reaction) झाल्यामुळे टोबा ज्वालामुखीची राख इथे मुळ स्वरुपात आढळत नाही.
या ठिकाणी एक निळ्या रंगाचा फ़लक लावून त्यावर राखे संबंधी थोडीशी माहिती लिहिलेली आहे. नदी काठ असल्याने या ठिकाणी भरपूर झाडं झूडपं उगवलेली आहेत. त्यातच राखेचे अवशेष आहेत. कुकडी नदीच्या काठावर ही राख पूर्वी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होती, पण वाळू उपस्यामुळे ही राख मोठ्या प्रमाणावर नष्ट झाली. इसवीसन २०१६ मध्ये हायकोर्टाने वाळू उपश्यावर बंदी आणल्यावर बोरी गावातल्या लोकांनी उरल्या सुरल्या राखेच्या पट्ट्याचे संरक्षण आणि जतन करायला सुरुवात केली आहे. गावातील जून्या पिढीला या राखेचे महत्व माहिती नव्हते, पण आता गावतील लहान मुलांनाही याबद्दल माहिती आहे. इथे येणार्या पर्यटकांची नोंद याठिकाणी एका वहीत केली जाते. ती पाहिले असता सुट्टीच्या दिवसात अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देतात , पण जिओ टुरीझमच्या (Geo Tourism) दॄष्टीने या परिसराचा काहीच विकास ग्रामपंचायतीने किंवा स्थानिक लोकांनी केलेला दिसत नाही.
|
Tefra Ash, Bori
|
बोरी गावात उत्खनन करतांना राखेच्या थराच्या वर Early Acheulian युगातली हत्यारं मिळाली होती. टोबा ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या राखेचे वय माहिती असल्याने पुरातत्वशास्त्रात उत्खननात मिळालेल्या वस्तूंचे वय ठरवतांना ती वस्तू राखेच्या थराच्यावर की खाली थराच्या खाली मिळाली यावरुन निश्चित करता येते.
|
Tefra Ash, Morgaon |
दोन वर्षापूर्वी आमच्या जिओलॉजीच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासदौर्या दरम्यान श्री बोरकर सर आणि श्री अभिजीत घोरपडे सर यांच्या बरोबर मोरगाव येथील "टोबा" ज्वालामुखीतून बाहेर पडलेली राख पाहाण्याची संधी मिळाली मोरगाव येथे कर्हा नदीच्या तीरावर (18° 27′ 82″N, 74° 32′ 39 E) असलेली टोबा ज्वालामुखीची राख, मातीच्या दोन थरांमध्ये पसरलेली पाहायला मिळते. राखेच्या या थराची कमाल उंची २० सेंटीमीटर पर्यंत आहे. या ठिकाणी टोबा ज्वालामुखीची राख मातीच्या दोन थरांमध्ये कशी राहिली असावी ? असा प्रश्न पडतो. यासाठी एक सिध्दांत (Theory) मांडला जातो की, "ज्वालामुखीची राखेचा थर नदीच्या किनारी पसरलेला होता . त्याकाळात नदीला पूर येऊन गाळाचा थर त्यावर पसरला असावा." त्यामुळे ही राख मातीच्या दोन थरांमध्ये अडकून राहीली आणि आजही आपल्याला ती पाहायला मिळते. पांढर्या शुभ्र रंगाचा थर दोन मातीच्या थरांमध्ये पसरलेला दिसतो. ही राख हाताळली तर भुसभुशीत लागते.
|
Tefra ash layer between sand layers |
ज्वालामुखीतून राख बाहेर फ़ेकली जाण्यासाठी पुढील पैकी तीन गोष्टी घडाव्या लागतात. १) मॅग्मावरील दाब कमी होऊन त्यात वायूचे बुड्बुडे तयार होण्याच प्रामण वाढत जाते. (magmatic), २) तप्त मॅग्मा आणि भूगर्भातील पाणी यांचा संपर्क येऊन स्फोटक मिश्रण तयार झाल्यास (hydrovolcanic) ३) ज्वालामुखीतील वाफेच्या दाबामुळे खडकांचे विखण्डन झाल्याने (phreatic). या तिन्ही गोष्टी ज्वालामुखीतून बाहेर पडणार्या राखेतील घटक निश्चित करतात. या राखेतील मुख्य घटक असतो ज्वालामुखी जन्य काच . या काचेच्या गुणधर्मावरुन ती राख कुठल्या ज्वालामुखीची आहे हे ओळखता येते. बोरी व मोरगाव येथे सापडलेल्या राखेचा अभ्यास करुन त्याची तुलना इंडोनिशिया व जगाच्या इतर भागात सापडलेल्या टोबा ज्वालामुखीच्या राखेशी केल्यावर ती राख ७५००० वर्षापूर्वी विस्फ़ोट झालेल्या ज्वालामुखीची आहे हे सिध्द झाले.
|
Natural Stone Bridge, Gulanchwadi |
आमच आजच्या दिवसाचे शेवटचे ठिकाण गुळंचवाडीचा नैसर्गिक दगडी पूल होता. कल्याण- नगर रस्त्यावर असलेल्या अणे घाटाच्या खालच्या बाजूला गुळंचवाडी नावाचे गाव आहे. या गावातील ओढ्यावर बेसॉल्ट खडकात बनलेला नैसर्गिक दगडी पूल आहे. आणे घाटातून नगरकडे जातांना डाव्या बाजूला मळगंगा देवस्थान लिहिलेली कमान दिसते. त्या कमानीतून १० मिनिटे उतरल्यावर आपण मळगंगा देवीच्या मंदिरापाशी पोहोचतो. याच ठिकाणी नैसर्गिक दगडी पूल आहे. या ठिकाणी असलेल्या बेसॉल्ट खडकात असलेल्या भेगांमधून वर्षानूवर्ष वाहाणार्या पाण्यामुळे दगडाची झीज होऊन मोठे छिद्र तयार झाले. त्यात भेगांमधून निखळलेले दगड पडून कमानीचा आकार मोठा झाला. सध्या इथे असलेली दगडी पुलाची कमान १० ते १३ फ़ूट रुंद आणि २ ते ७ फूट उंच आहे. या कमानीतून वाहाणार्या ओढ्यामुळे या पुलाची झीज होणे अजुन चालूच आहे.
|
Natural Stone Bridge, Gulanchwadi |
भोरवाडीचा किल्ला आणि लाव्हाची नदी, बोरी गावातील ज्वालामुखीची राख आणि गुळंचवाडीच्या नैसर्गिक दगडी पूल ही ठिकाण एकमेकांपासून जवळ ( एकुण अंतर ३५ किलोमीटर) आहेत. त्यामुळे मुंबई पुण्याहून एका दिवसात आरामात पाहाता येतात.
जाण्यासाठी :- १) कल्याण - नगर आणि पुणे - नाशिक रस्त्यावरील आळेफ़ाट्या पासून १८ किलोमीटर अंतरावर अणेघाट आहे. अणे घाटातून पायवाटेने गुळंचवाडीच्या नैसर्गिक दगडी पूलाकडे जाता येते.
२) कल्याण - नगर आणि पुणे - नाशिक रस्त्यावरील आळेफ़ाट्यापासून ५१ किलोमीटर अंतरावर भोरवाडीचा किल्ला (म्हसोबा झाप) आहे.
३) कल्याण - नगर आणि पुणे - नाशिक रस्त्यावरील आळेफ़ाट्यापासून १२ किलोमीटर अंतरावर बोरी गावातील टेफ्रा ॲशचे पट्टे आहेत.
Photos by :- Amit Samant, © Copy right
Map :- Mahendra Govekar
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5
Ref :-
1.Geochemical variability in
distal and proximal glassfrom the Youngest Toba Tuff eruptionE. Gatti &I.
M. Villa &H. Achyuthan &P. L. Gibbard &C. Oppenheimer
2. Morphology of the Volcanic
Ash from the OCukadi River Section, Pune District, Maharashtra N.R. KARMALKAR*,
S.N. GHATE, SHIELLA MrsHRA AND S.N. RAIAGURU * Department of Geology,
University of Pune, Pune-411 007. Deccan College, Pune-411 006.
3. AGE OF THE
BORI VOLCANIC ASH
AND LOWER PALAEOLITHIC CULTURE OF
THE KUKDI VALLEY, MAHARASHTRA Korisettar R.,
Mishra Sheila, Rajaguru S. N., Gogte V. D., Ganjoo R. K., Venkatesan T. R.,
Tandon S. K., Somayajulu B.L.K., and Kale V. S.
या विषया संदर्भातले इतर ब्लॉगज :-
१) केनियातील निद्रिस्त ज्वालामुखी आणि लाव्हा टनलला भेट देऊन लिहिलेला लेख "offbeat Kenya, Suswa Mountain , निद्रिस्त )ज्वालामुखीच्या विवरात, सुस्वा माउंटन , केनिया" वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
२) महाराष्ट्रातील लाव्हा टनलला भेट देऊन लिहिलेला लेख, "निसर्गाचा अविष्कार चेमेदेव डोंगर आणि बितनगड Offbeat trek to Chemdev & Bitangad" वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
३) भोरवाडी गडाच्या आजूबाजूची इतर ऑफ़बिट ठिकाण :- "टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला आणि विठठल मंदिर, जामगावचा किल्ला आणि पारनेरचे सोमेश्वर मंदिर (Takali Dhokeshwar, Palashi Fort , Jamgaon Fort & Someshwar Temple , Parner, Dist. Ahmednagar)" हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2017/11/kandhar-fort-siddheshwar-mandir-hottal.html