२० नोव्हेंबर २०१० ला आमच्या "ट्रेक क्षितिज" संस्थेचा कोठिम्ब्याच्या वनवासी कल्याण आश्रमात स्लाइड शो होता . मी आणि श्रीकृष्णने पाठ पिशवीत प्रोजेक्टर , camera, पाण्याची बाटली भरून कर्जत लोकल पकडली . नेरळला उतरून टमटमचा १२ कि.मी .चा खडतर प्रवास करुन कशेले गावात पोहोचलो . तिथें दूसरी टमटम पकडून कोठीम्बा गावाच्या पुढील फाट्यावर उतरालो . त्यानंतर अर्धा कि.मी. चालल्यावर आम्ही एकदाचे वनवासी कल्याण आश्रमात पोहोचलो .
नोव्हेंबर महिना असून सुध्धा उन "मी म्हणत "होते. आम्ही दोघे घामाने चिंम्ब झालो होतो. पण आश्रमात पोहोचल्यावर तेथील दाट झाडी व नीटनेटकपणा पाहून डोळ्याना थंडावा मिळाला. आश्रमात आमचे छान स्वागत झाले. आम्ही गेलो तेंव्हा मुलांचे जेवण चालु होते. सार काही शिस्तीत , कुठेही गोंधळ गड़बड़ दिसत नव्हती . आश्रमातील कार्यकर्त्यां बरोबर गप्पा मारल्यावर वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याची माहिती मिळाली. देशभर आदिवासी वस्तीत असे अनेक वनवासी कल्याण आश्रम आहेत. तेथे आदिवासी मुलांची राहाण्या - खाण्याची सोय केली जाते. आदिवासी मुलांवर संस्कार केले जातात. कोठिम्ब्याच्या आश्रमात ३५ मुले आहेत . आता शिबिर चालू असल्यामुळे ठाणे व रायगड जिल्ह्यामधून निवडक मुले व मुली येथे आल्या आहेत अशी माहिती मिळाली.
आश्रमाच्या रुचकर व सात्विक जेवणाचा आस्वाद घेउन आम्ही आश्रमा मागील जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेलो . तेथे अनेक प्रकारची फुलपाखरे व फुले होती त्यांची छायाचित्रे घेतली . थोड्या अंतरावर एका ओढ्यावर आश्रमाने बांध घालून छोटेसे धरण केले होते , त्यावरुन पडणारया पाण्याचा नाद ऐकत आम्ही बराच वेळ बसलो. जर स्लाइड शो करायचा नसता तर आम्ही फुलपाखरा सोबत तिथेच बसलो असतो .
बरोबर २.३० वाजता सह्याद्रितील किल्ले या स्लाइड शो ला आम्ही सुरुवात केली. मुले व कार्यकर्त्यां बरोबर संवाद साधत केलेला कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतच गेला . कार्यक्रम संपल्यावर उपस्थितांबरोबर पावसानेही आम्हाला दाद दिली . नंतर धो - धो पाउस तासभर पडला .पाउस कमी झाल्यावर आश्रमाताल्या कार्यकर्त्यांनी कशेले गावापर्यंत आम्हाला सोडले. पडणारया पावसाने वातवरणात सुखद बदल घडवून आणला होता .त्यामुले सकाळी रखरखीत आणि कंटाळवाणा वाटणारा प्रवास आता सुंदर वाटत होता . कदाचित "ट्रेक क्षितिज" संस्थेने अजुन एक छान स्लाइड शो केल्याचा हा परिणाम असावा .