Showing posts with label Europe. Show all posts
Showing posts with label Europe. Show all posts

Tuesday, October 22, 2019

परीकथेतील गाव, हॉलस्टॅट (Hallstatt, Austria)

Hallstatt, Austria

ऑस्ट्रीयाला फ़िरायला जाणारे पर्यटक व्हिएन्ना आणि साल्झबर्ग ही मोठी शहरे पहातात. त्याच बरोबर आल्प्सच्या पर्वतराजीत असलेली छोटी छोटी खेडी आणि निसर्गरम्य परिसर पाहाणे ही सुध्दा एक पर्वणी आहे. ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग या मोझार्टमुळे प्रसिध्द असलेल्या शहरापासून ८० किलोमीटरवर आल्प्सच्या कुशीत हॉलस्टॅट नावाचे निसर्गरम्य गाव आहे. हॉलस्टॅट सी या सरोवराला चारही बाजूंनी उंचच उंच डोंगरांनी वेढलेले आहे. या डोंगरांपैकी एका डोंगराच्या उतारावर हॉलस्टॅट हे परीकथेत शोभावे असे प्राचीन गाव वसलेले आहे.

ऑस्ट्रीया, स्लोव्हाकीया, जर्मनी इत्यादी लॅंडलॉक देश आहेत, लॅंडलॉक म्हणजे चारही बाजूंनी जमिनीने वेढलेले देश, या देशांना समुद्र किनारा नाही. या सागरी किनारा नसलेल्या देशांची मीठाची गरज भागवण्याचे काम हॉलस्टॅट या गावाने अश्मयुगापासून केले आहे. हॉलस्टॅट येथील डोंगररांगांमध्ये मीठ मोठ्या प्रमाणावर सापडत होते. त्यामुळे या भागाची भरभराट झाली. हॉलस्टॅट मधून निघणार्‍या व्यापारी मार्गामुळे या भागातील नद्यांच्या खोर्‍यांची भरभराट झाली आणि या व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या काळात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.

Salt trolley in Halstatt salt Musium, Halstatr

याशिवाय उत्तर युरोपातून (आजच्या रशियातून) दक्षिण युरोपातील इटली पर्यंत जाणारा अंबर व्यापारी मार्गही याच नद्यांच्या खोर्‍यातून जात होता. नवाश्मयुगापासून या मार्गावर अंबर या दागिन्यात वापरल्या जाणार्‍या पिवळ्या रंगाच्या खड्याचा व्यापार होत असे. उत्तरेत सापाडणार्‍या या अंबरला उत्तरेचे सोने म्हणून ओळखले जात असे.

Funicular train, Hallstatt

हॉलस्टॅटची मिठा़ची खाण ७००० वर्षे जूनी आहे. जगातली सगळ्यात जूनी मिठाची खाण म्हणून ही ओळखली जाते. ज्यावेळी रोम नव्हते तेंव्हाही ही खाण अस्तित्वात होती. याठिकाणी झालेल्या पुरातत्वीय उत्खननात ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील सांबार शिंग सापडले त्याचा खाणीतून मिठ काढण्यासाठी कुदळी सारखा वापर केला जात होता. या प्राचीन खाणीची सफ़र करण्यासाठी ३० युरोचे तिकीट काढावे लागते. तिकिट घराजवळ खाणीची माहिती देणारे प्रदर्शन आहे, याठिकाणी खाणीतून काढलेले मिठाचे गुलाबी रंगाचे दगड विकत मिळतात. खाण असलेल्या डोंगरावर जाण्यासाठी फ़ेनिक्युलर ट्रेन आहे. ८० अंशात चढणार्‍या या ट्रेन मधून सरोवराचे आणि डोंगर उतारावर वसलेल्या गावचे विहंगम दृश्य दिसते.

Funicular train, Hallstatt

                                                                               Video of Funicular train, Hallstatt

ट्रेन मधून उतरल्यावर जंगलातून रस्ता खाणीकडे जातो. या रस्त्यावर खाणीची माहिती देणारे फ़लक आणि फ़ोटोज लावलेले आहेत. खाणीत शिरल्यावर एक लाकडी घसरगुंडी आहे. खाणीत लवकर उतरण्यासाठी कामगार याचा वापर करीत. घसरगुंडीवरुन घसरत खाली उतरल्यावर कामगारांना खाणीत खोलवर नेणार्‍या ट्रेनमधून एक तासाची सफ़र चालू होते. यात खाणीचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्य, कामगारांची त्याकाळातली जोखीम, त्यांची अवस्था याची माहिती दिली जाते. तत्कालिन पेहराव घातलेले आणि हत्यारे घेऊन उभे असलेले पुतळे खाणीत जागोजागी बसवलेले आहेत. 

Salt mine tour Entrance gate, Hallstatt

Salt mine tour train , Hallstatt

खाणीतून बाहेर पडल्यावर फ़ेनिक्युलर ट्रेनने परत न जाता पायवाटेने खाली उतरावे. आल्प्सच्या घनदाट जंगलातून जाणार्‍या या पायवाटेवर अनेक ओहोळ धबधबे आहेत. वेगवेगळ्या काळात खोदलेली मिठाच्या खाणींची कही तोंडे (बोगदे) या वाटेवर दिसतात. पायवाटेने उतरतांना भोवतालच्या डोंगररांगा आणि सरोवर वेगवेगळ्या कोनातून दिसते. पायवाटेवर जागोजागी बसण्यासठी बाकडे ठेवलेले आहेत. तिथे निवांत बसून तिथल्या शांततेचा, तिथून दिसणार्‍या निसर्ग दृश्यांचा आस्वाद घेता येतो. या पायवाटेने तासभरात आपण हॉलस्टॅटच्या मुख्य चौकात पोहोचतो. 

Trek route from salt mine Hallstatt

Once entrance gate of salt mine

Lahn lake Hallstatt, Austria

हॉलस्टॅट या छोट्याश्या गावातून फेरफटका मारण्यासाठी एकमेव रस्ता आहे. ऱस्त्याच्या एका बाजूला  नितळ पाण्याचे सरोवर आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. या डोंगर उतारावर बांधलेली सुबक सुंदर रंगीबेरंगी घर. प्रत्येक घराच्या बाल्कनीत, फ्लॉवर बेड मध्ये  फुललेले फुलांचे ताटवे त्या घराना अजून सुंदर बनवत होते . या घरांची आणि गावाच्या टोकाला असलेल्या चर्चच्या टॉवरचे सरोवराच्या संथ पाण्यात पडणारे प्रतिबिंब म्हणजे सत्याहून आभास सुंदर ....


Lahn lake, Hallstatt, Austria

गावातल्या या रस्त्यावर अनेक रेस्टॉरंटसनी टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या. देश विदेशातली मंडळी तिथे खात पित होती. सगळीकडे आनंदी आणि उत्साही वातावरण होते. गावातल्या  गल्ली बोळातून चालत आम्ही गावातल्या सेंट्रल ( मार्केट) स्क्वेअर मध्ये पोहोचलो. येथून एक रस्ता जेट्टीकडे जातो. एकेकाळी याठिकाणी मिठाचा बाजार भरत असेल. खरेदी विक्री चालत असेल. बोटीत माल भरुन सरोवराच्या दुसर्‍या टोकाला जात असेल.  आज मात्र याठिकाणी बाजार भरत नाही . येथे आता अनेक रेस्टॉरंट आहेत . जेट्टी वरुन सरोवरात फ़ेरफ़टका मारण्यासाठी बोटी मिळातात. 

Hallstatt Village



येथून एक रस्ता चर्च कडे जातो.  या चर्चला लागूनच एक स्मशानभूमी आहे. मुळात या गावात सपाट जागा कमी असल्यामुळे जूनी थडगी उकरुन त्याच जागी नवीन मृतदेह पुरले जातात. अशाप्रकारे गेली अनेक शतके उकरलेल्या कवट्या आणि हाड इथे रंगवून ठेवलेली आहेत.


Skulls in church , Hallstatt, Austria

Skulls & bones in church , Hallstatt, Austria
हे आगळेवेगळे चर्च पाहून "फाईव्ह फिंगर पॉईंट" याठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरुन १४३ क्रमांकाची बस मिळते . बसने आपण फेनिक्युलर ट्रेन स्टेशनपाशी पोहोचतो. (खाजगी गाडीने थेट पॉईंटपाशी पोहोचतो.) ट्रेनने आपण फाईव्ह फिंगर पॉईंटला पोहोचतो. येथे हाताच्या पंजाच्या आकाराचे काचेचे प्लॅटफॉर्म आहेत. त्यावर उभे राहून संपूर्ण हॉलस्टॅटचे विहंगम दृश्य दिसते.

Ice cave, Hallstatt

हॉलस्टॅट पासून १४ किलोमीटर वरील डॅचस्टाईन डोंगरात इसवीसन १९१० मध्ये मिळालेली बर्फ़ाची गुहा हे एक आगळेवेगळे ठिकाण आहे . इथे जाण्यासाठी ५४३ क्रमांकाची बस पकडून डॅचस्टाईन विझिटींग सेंटरपर्यंत जाता येते. तेथून केबल कारने डोंगरावर पोहोचून साधारणपणे २० मिनिटांचा ट्रेक केल्यावर आपण या बर्फ़ाच्या गुहेत पोहोचतो. भर उन्हाळ्यातही या गुहेतला धबधबा गोठलेले असतो. गुहेतील तापमान शुन्याखाली असल्याने उन्हाळ्यातही थंडेचे कपडे घालून या बर्फ़ाच्या नैसर्गिक गुहेची एक तासांची सफ़र करावी लागते

हॉलस्टॅट हे गाव आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. व्हिएन्नाहून साल्झबर्गला जातांना सकाळी लवकर निघून दिवसभर हॉलस्टॅट फ़िरुन संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचावे. त्यासाठी गाडी भाड्याने घेणे आवश्यक आहे. साल्झबर्गहून एक दिवसाच्या  टूर्स हॉलस्टॅटसाठी असतात. पण त्या सकाळी ९ ला साल्झबर्गहून निघतात आणि दुपारी ३ वाजता परतीचा प्रवास चालू करतात.


                                             Hallstatt time laps (Pl. watch in full screen)

हॉलस्टॅट व्यवस्थित आणि मनसोक्त फ़िरायचे असल्यास खाजगी गाडीने किंवा बसने जाणे उत्तम आहे. (बसच्या रुट बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.) हॉलस्टॅट भारतीयांसाठी थोडे महागडे आहे. येथील मुख्य आकर्षण असलेले सॉल्ट माईन ३० युरो, आईस केव्ह ३२ युरो माणशी तिकिट आहे. पैसे वाचवण्यासाठी जातांना फ़ेनिक्युलर/ केबल कारने जाऊन येतांना चालत उतरण्याचा पर्याय आहे. त्यासाठी तंगडतोड करायची तयारी मात्र हवी.


हॉलस्टॅटला जाण्यासाठी  :-

हॉलस्टॅटला जाण्यासाठी साल्झबर्ग आणि व्हिएन्ना या दोन्ही ठिकाणाहून बस आणि ट्रेनचा पर्याय आहे.

१) व्हिएन्नाहून येण्यासाठी ट्रेन किंवा कार हे दोन पर्याय आहेत.
अ) व्हिएन्नाहून हॉलस्टॅटला जाण्याकरीता २ ट्रेन बदलाव्या लागतात आणि त्यानंतर फ़ेरी बोटीने हॉलस्टॅटला पोहोचता येते. या प्रवासाला ४ तास लागतात.

Vienna Central Station - Attnang- Puchheim  - Hallstatt Train Station

ट्रेनचे तिकिट माणशी ३५००/- रुपये आहे.

ब)व्हिएन्नाहून कारने हॉलस्टॅटला पोहोचायला ३.३० तास लागतात.
 

२) साल्झबर्गहून हॉलस्टॅटला जाण्यासाठी दोन बस बदलाव्या लागतात. ट्रेन पेक्षा बसने २० मिनिटे लवकर पोहोचता येते.

अ) बसचे तिकिट माणशी १,०००/- रुपये आहे.

बस क्रमांक १५० (Salzburg > Bad Ischl (Bus 150)) :- हि बस साल्झबर्ग मेन रेल्वे स्टेशन समोरच्या डेपोतून सूटते आणि ९० मिनिटांनी Bad Ischl ला पोहोचते. दर तासाला दोन बस अशी या बसची फ़्रिक्वेन्सी आहे. सकाळची पहिली बस ५.५५ वाजता आहे.

बस क्रमांक ५४२ (Bad Ischl > Hallstatt Gosaumühle (Bus 542)) :- Bad Ischl ला उतरल्यावर तेथूनच Gosausee (उच्चार :- गो-झो-झी) ला जाणारी बस पकडावी. २० मिनिटात ही बस Gosaumühle (उच्चार :- गो-झो-मुल) याठिकाणी पोहोचते. येथे बाजूलाच बस क्रमांक ५४३ उभी असते.

बस क्रमांक ५४३ (Hallstatt Gosaumühle > Hallstatt Lahn > Dachstein Ice Caves) :- या बसने १० मिनिटात हॉलस्टॅटच्या मुख्य चौकात पोहोचतो. या बसने पुढे Dachstein Ice Caves पर्यंत जाता येते.

ब) साल्झबर्गहून हॉलस्टॅटला जाण्यासाठी दोन ट्रेन बदलाव्या लागतात.
ट्रेनचे तिकिट माणशी २,३००/- रुपये आहे.

Salzburg Hbf  - Attnang-Puchheim  - Hallstatt Train Station


ऑस्ट्रीयातील आणखीन एका ऑफ़बीट ठिकाणावर लिहीलेला ब्लॉग "नयनरम्य वाचाऊ व्हॅली ( Offbeat Austria, Wachau Valley)" वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा.
Hallstatt 
Photos by :- Amit & Kaustubh Samant Copyright

#hallstat#saltminehallstat#howtogotohallstat#icecavehallstat#offbeataustria#offbeatdestinationineurope#

Friday, September 6, 2019

स्वस्तात मस्त बुडापेस्ट (भाग - २ ) What & where to eat & buy in Budapest

Fishermen's Bastion, Budapest

Air bnb च्या अपार्टमेंट मध्ये राहाण्याचे सुख म्हणजे घरच्या सारखे राहायला मिळते . किचन असल्याने आपल्याला हव्या त्या गोष्टी बनवता येतात . अनेक वर्षाचा ट्रेक्सचा अनुभव असल्याने पूर्ण ट्रिपचा फूड प्लान बनवून त्याप्रमाणे सामान घेतले होते . त्याचा खूप फायदा झाला. त्याबरोबर स्थानिक खाण्याचा आस्वादही घेतला . उन्हाळ्याचे दिवस असल्याने सकाळी ७ ते रात्री ८. ३० पर्यंत सूर्यप्रकाश असायचा त्याचा फायदा घेउन भरपूर भटकंती केली . 

हंगेरी हा देश अनेक वर्ष रशियन कम्युनिस्ट राजवटीच्या पोलादी पडद्या आड होता . त्यामुळे त्याची छाप इथल्या लोकांवर आणि इमारतींवर दिसत होती. एकाच प्रकारच्या ठोकळेबाज इमारती. त्यांची कड्या कुलूपात बंद असलेली भव्य दारे. इथे लोकांमध्ये सिगारेट पिण्याचे प्रमाण भरपूर आहे. त्यामुळे जिकडे तिकडे सिगारेटसची थोटक पडलेली पाहायला मिळतात . रस्ता आणि परिसर स्वच्छ पण सिगरेटसच्या थोटकांमुळे त्याला गालबोट लागलेल . ऱस्त्यात कचरा टाकायला जे स्टीलचे डबे ठेवले होते . त्यावरही सिगारेट विझवून टाकायला वेगळी सोय केलेली होती. बस प्रवासात स्थानिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण मुख्य अडचण भाषेची होती. इंग्रजी भाषा फक्त गाईड आणि विक्रेत्यांना थोडीफार येते. बाकी मात्र आनंदी आनंद आहे. भाषेच्या अडचणीमुळे लोक संवाद साधायला उत्सुक नसतात. हा देश २००४ साली पर्यटकांसाठी खुला झालेला आहे. बुडापेस्ट मध्ये देशोदेशीचे पर्यटक आता मोठ्याप्रमाणावर येत असल्याने हळूहळू बदल होतोय.

Turul bird, Budapest

आम्ही ॲस्टोरीया चौकात येउन आज बुडा बाजूला जाणारी बस पकडली . काल बुडापेस्ट मध्ये उतरल्यापासून ट्राम, बसेस, इलेक्ट्रीक बसेस, मेट्रो अशा सर्व प्रकारची सार्वजनिक वाहातुक व्यवस्था  (Public transport) दिसत होती. या शिवाय आपल्या कडच्या उबर सारखी बोल्ट (Bolt) ही टॅक्सी सेवाही आहे  भारतातल्या कुठल्याही राज्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेला हा छोटा देश आहे,  तरीही त्यांना सर्व प्रकारची सार्वजनिक वाहातुक व्यवस्था कशी काय परवडते हा प्रश्न होता . कारण आपल्याकडे पब्लिक ट्रांसपोर्ट तोट्यात आहे सांगून बंद करण्यासाठी सरकारच पुढाकार घेत असते. या ठिकाणी अजून एक गोष्ट पाहिली . पब्लिक ट्रांसपोर्टसाठी रस्त्यावर वेगळी लेन आहे .त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळी रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर गाड्या आल्यामुळे ट्रॅफीक जाम होते. तेंव्हा बसेस मात्र त्यांच्यासाठी राखीव लेन मधून सुसाट पुढे जातात. याशिवाय पूर्ण शहरात फुटपाथला लागून असलेली एक छोटी लेन लाल रंगात रंगवलेली असते . ती फक्त सायकलींसाठी असते . त्यामुळे सायकल आणि बॅटरी ऑपरेटेड स्कुटर चालवणाऱ्याचे प्रमाणही इथे जास्त आहे .

Chain bridge, Budapest

डॅन्यूब नदीवरचा चेन ब्रीज हा पूल ओलांडून बस बुडा बाजूला आली . समोर दोन हिरव्यागार टेकड्या दिसत होत्या . एकावर बुडा कॅसल वसवलेला आहे तर दुसऱ्या टेकडीवर गेल्लर्ट हिलवर (Gellért Hill) सिटाडेल आहे . बुडापेस्ट मधली ऐतिहासिक ठिकाणे या भागात मोठ्या प्रमाणावर आहेत.

Archaeological Site at Buda Castle 

हंगेरीचा इतिहासात डोकावल्यास इसवीसन ८९५ पूर्वी वेगवेगळ्या भटक्या जमातींचे हंगेरीवर राज्य होते. पोपने पाठवलेल्या दुतांनी या जमातींना एकत्र करुन ख्रिश्चनांचे राज्य स्थापन केले. इसवीसन १००० मध्ये सेंट स्टिफनसन यांना पोपने हंगेरीचा राजा म्हणून मान्यता दिली . चौदाव्या शतकात हंगेरीची भरभराट होत होती . त्यावेळी मोंगंलानी आक्रमण केले . ते परतवून हंगेरीने सांस्कृतिक आणि इतर आघाड्यांवर प्रगती केली.  इसवीसन १५६७ मध्ये तुर्कानी हंगेरीवर आक्रमण केले आणि हंगेरीचे ट्रांसव्हीलिया, हंगेरी आणि तुर्की साम्राज्य असे तीन तुकडे झाले . पुढच्या १५० वर्षात तुर्कानी हंगेरियन साम्राज्याचे अजून लचके तोडले. उरलेले हंगेरीन साम्राज्य ऑस्ट्रियाच्या हाब्सबर्ग साम्राज्याचा भाग झाले. १८ व्या शतकात हाब्सबर्गांनी तुर्कींचा पाडाव केला आणि हंगेरीची पुन्हा भरभराट सुरु झाली . बुडापेस्ट हे युरोपातले महत्वाचे शहर म्हणून उदयाला आले . हाब्सबर्ग साम्राज्या विरुध्द जनक्षोभ उसळला परंतु त्यांनी तो दाबून टाकला आणि काळाची गरज म्हणून ऑस्टो हंगेरीय साम्राज्याची स्थापना केली . पहिल्या महायुध्दात हंगेरी जर्मनीच्या बाजूने लढली. महायुद्धानंतर झालेल्या तहानुसार हंगेरीने आपली ७२% जमीन गमावली . झेकोस्लाव्हेकीया , युगोस्लाव्हिया , रोमानिया या देशात जर्मनीचा भूभाग वाटला गेला . यामुळे असंतुष्ट झालेल्या हंगेरिने दुसऱ्या महायुद्धात पुन्हा जर्मनांना साथ दिली . दुसरे महायुद्ध संपल्यानंतर हंगेरी सोव्हिएत युनियनच्या अधिपत्याखाली गेला. त्यानंतर तेथील अर्थव्यवस्था आणि लोकांच्या राहाणीमानाचा दर्जा खालावत गेला . इसवीसन १९६८ ला हंगेरीने आपली अर्थव्यवस्था खुली केली. २३ ऑक्टोबर १९८९ मध्ये रिपब्लिक ऑफ हंगेरीची स्थापना होवून पहिल्या निवडणूका झाल्या . इसवीसन २००४  मधे हंगेरी युरोपियन युनियनची सदस्य बनली .

Fishermen's Bastion, Budapest
Fishermen's Bastion, Budapest

बुडा कॅसल च्या टेकडीवर जाण्यासाठी फेनिक्युलर ट्रेन, बॅटरी ऑपरेटेड ८ सीटर गाड्या आहेत आणि चालत जाण्याचा पर्यायही आहे . फ़ेनिक्युलरची लाईन पाहून आम्ही चालत जाण्याचा पर्याय निवडला. बुडा कॅसलच्या टेकडीवर जाणार्‍या वळणावळणाच्या रस्त्याने १० मिनिटे चढत गेल्यावर डाव्या बाजूला " फ़िशरमन बॅशन" (Fishermen's Bastion)  कडे जाणार्‍या पायर्‍या दिसत होत्या. एखाद्या परीकथेत शोभावी अशी फ़िशरमन बॅशनची रचना करण्यात आलेली आहे. मुळ किल्ल्याची तटबंदी तोडून इसवीसन १८९५ मध्ये इथे ७ बुरुज बांधण्यात आले. हंगेरीची स्थापना करणार्‍या ७ जमातींचे प्रतिक असलेल्या या बुरुजांची रचना परीकथेतल्या किल्ल्या बुरुजांसारखी आहे. या बुरुजांच्या खिडक्यां मधून बुडापेस्टचे विहंगम दृश्य दिसते. Fishermen's Bastion २४ तास उघडे असते. या बुरुजांच्या सर्वात वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पैसे आकारले जातात. पण तिथे पर्यंत जाण्याची गरज नाही, कारण जिथे पर्यंत फ़्री एंट्री आहे तिथूनही संपूर्ण दृश्य दिसते. यातील एका बुरुजात रेस्टॉरंटही आहे. Fishermen's Bastion (मच्छीमारांचा बुरुज) हे नाव किल्ल्याच्या टेकडी त्याखाली असलेल्या कोळी लोकांच्या गावामुळे पडले असावे. मध्ययुगापासून त्याठिकाणी कोळी लोकांची वस्ती होती. फिशरमन बॅसेशन पर्यटकांनी कायम फुललेले असते.

Matthias Church, Budapest
Matthias Church, Budapest

Fishermen's Bastion च्या आतल्या बाजूला मॅथ्थिअस चर्चचे (Matthias Church) दोन सुळके आकाशात घुसलेले दिसतात. दहाव्या शतकात या ठिकाणी चर्च होते. वेगवेगळ्या काळात या चर्चची पूर्नबांधणी करण्यात आली. आज दिसणारे चर्च एकोणीसाव्या शतकात हॉफ़्सबर्ग सम्राट जोसेफ़ने बांधले. या चर्चच्या कौलांची रंगसंगती सुंदर आहे. चर्च मध्ये फिरण्यासाठी एंट्री फी नाही, पण टॉवर चढून जाऊन वरुन पाहाण्याकरीता ५ युरो फी आहे .  

Buda Palace, Buda Castle

Buda Palace, Buda Castle

चर्च पाहून १० ते १५ मिनिटे चालत गेल्यावर आपण बुडा कॅसल मधील राजवाड्यापाशी पोहोचतो. इसवीसन १२४७ मध्ये राजा बेला - ४ याने या टेकडीवर पहिल्यांदा राजवाडा बांधल्याचा उल्लेख आढळतो. पण तो नक्की कुठे बांधला होता त्याचा ठावठिकाणा सापडलेला नाही. किल्ल्यातील सर्वात जूने अवशेष चौदाव्या शतकातील आहेत. स्टिफ़न या स्लोव्हेनियाच्या सरदाराने बांधलेल्या किल्ल्याच्या अवशेषांना "स्टिफ़न टॉवर" या नावाने ओळखले जाते. त्यानंतर राजा मॅथिअस याने याठिकाणी अनेक इमारती आणि चर्च बांधले होते. ११ सप्टेंबर १५२६ रोजी ओटोमान साम्राज्याने (तुर्कांनी) बुडा कॅसलवर आक्रमण करुन तो जिंकून घेतला. तुर्कांनी किल्ल्यातील संपत्ती बरोबर, ब्रॉंझची शिल्प, लायब्ररीतील पुस्तकेही लुटून नेली. त्यानंतर बुडा कॅसलचे वाईट दिवस सुरु झाले. त्याचा उपयोग बराकी, दारुकोठार, शस्त्रे ठेवण्याची जागा यासाठी व्हायला लागला. सतराव्या शतकात ख्रिश्चनांच्या संयुक्त फ़ौजेने या किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी दारुकोठाराला लागलेल्या आगीत स्टिफ़न टॉवर नष्ट झाला. या विजयानंतर बुडा कॅसलचे दिवस पुन्हा पालटले. हाब्सबर्ग साम्राज्याने किल्ल्यावर आज दिसणार्‍या अनेक इमारती, महाल बांधले. दुसर्‍या महायुध्दात जर्मनांच्या ताब्यात हा किल्ला होता. त्यावेळी झालेल्या लढाईत किल्ल्याचे आणि महालांचे मोठे नुकसान झाले. महायुध्दानंतर किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली. किल्ल्याचा हा इतिहास किल्ल्यातील चार मजली बुडापेस्ट हिस्ट्री म्युझियम मध्ये पाहाता येतो. अकराव्या शतकापासूनच्या हंगेरीच्या आर्ट हिस्ट्रीचे प्रदर्शन "हंगेरीयन नॅशनल गॅलेरीत" पाहाता येते. याशिवाय किल्ल्याच्या आवारात असणारे  Matthias Fountain, Monument of Prince Eugene of Savoy, Turul bird, (काल्पनिक पक्षी), Fishing Children हे पुतळे पाहाण्यासारखे आहेत.  

Royal Garden & Danube, Buda Castle


Gate of Buda palace

किल्ल्याच्या डॅन्यूब नदीच्या बाजूला असलेल्या तटबंदीवरुन बुडा बाजू, डॅन्यूब नदी आणि पेस्ट बाजूचा अप्रतिम नजारा दिसतो. या तटबंदी खाली थेट रस्त्यापर्यंत दोन टप्प्यात रॉयल गार्डन १८७५ ते १८८२ दरम्यान बनवण्यात आले. तटबंदीत असलेल्या जीन्याने या रॉयल गार्डन मधून थेट खाली रस्त्यावर उतरता येते. रस्त्यावर दोन सुंदर आणि भव्य सैनिकांचे पुतळे आहेत. बस मधून जातांना हे पुतळे लक्ष वेधून घेतात. या ठिकाणी जागतिक महायुध्दावर आधारीत प्रदर्शन आहे. बुडापेस्टमध्ये अनेक म्युझियम्स आहेत. सर्व पाहायची तर आठवडाही पुरणार नाही. त्यामुळे म्युझियमचा नाद सोडून आम्ही किल्ल्यापासून १० मिनिटांच्या अंतरावर असणार्‍या लुकास बाथ (Lucas Bath) या ऐतिहासिक हमामखान्याकडे निघालो.

World War Exhibition, Budapest

बुडापेस्ट शहर फॉल्ट लाईनवर वसलेले आहे त्यामुळे बुडापेस्ट मध्ये १२० च्यावर गरम पाण्याचे झरे आहेत. रोमनानी या गरम पाण्यांच्या झऱ्यांच्या बाजूला वस्ती केली होती. त्याचे पुरावे उत्खननात मिळालेले आहेत. सोळाव्या शतकात तुर्कांनी बुडापेस्टवर आक्रमण केले आणि जिंकून घेतले. ओटोमान सम्राटांनी हमामखाने बुडापेस्ट बांधले. गरम पाण्यांच्या झर्‍यांचे पाणी वळवून हमामखान्यात खेळवण्यात आले. बुडापेस्ट मधल्या हमामखान्यांचा उपयोग आंघोळी बरोबरच औषधोपचारासाठी करण्यात आला. त्यामुळे युरोपाच्या वेगवेगळ्या भागातून याठिकाणी औषधोपचार करण्यासाठी याठिकाणी राज घराण्यातील लोक, सरदार, व्यापारी  यायला लागले. त्यामुळे हे तुर्की हमामखाने युरोपात अल्पावधीत लोकप्रिय झाले. बुडापेस्टच्या संस्कृतीचा ते भाग बनले आहेत. आजही बुडापेस्टचे नागरीक या हमामखान्यांत वरचेवर येतात. हमामखाने सकाळी ६ वाजता उघडतात. बुडापेस्टचे नागरीक गर्दी होण्यापूर्वी सकाळीच हजेरी लावतात.


 बुडापेस्ट मधल्या हमामखान्यांचा उपयोग आंघोळी बरोबरच औषधोपचारासाठी करण्यात आला. बुडा बाजूला असलेले अनेक बाथ सोळाव्या शतकापासून आजवर कार्यरत आहेत . त्यातलाच एक म्हणजे लुकास बाथ. बुडा पास असणार्‍यांसाठी इथे मोफ़त प्रवेश आहे. या बाथ मध्ये २५ अंश सेल्सियस ते ३२ अंश सेल्सियस तापमान असलेले चार वेगवेगळे पूल आहेत. याशिवाय वॉटर जेट असलेले पूल, सौना बाथ, हॉट प्लॅट्फ़ॉर्मस आहेत. इथे लॉकर भाड्याने घेऊन आपले सामान त्यात ठेवता येते. टॉ्वेल आणि बाथ किट येथे सशुल्क मिळते, पण आपले नेलेले चांगले. येथील पाण्यात calcium, magnesium, hydrogen-carbonate and sulphate, chloride, Sodium हे घटक असल्याने हे पाणी मध्ययुगा पासून सांधेदुखी आणि इतर आजार बरे करण्यासाठी वापरले जाते. त्यासाठी पहिल्या मजल्यावर वेगळे पूल आहेत. लुकास बाथ मध्ये केबीन्स म्हणजे प्रायव्हेट पूल सुध्दा आहेत.  गरम पाण्यात डुंबण्यामुळे आमच्या शरीरातला सर्व शिण निघून गेला. जेट असलेल्या स्विमिंग पूल मध्ये आणि व्हर्ल पूल मध्ये भरपूर गर्दी असते. सर्व बाथ्स मध्ये खाण्या पिण्यासाठी रेस्टॉरंट आहेत.


रुडास बाथ (Rudas bath) हा डेन्युब नदी आणि त्यामागे असलेल्या गेल्लर्ट हिलच्या मधल्या चिंचोळ्या पट्ट्यावर आहे. या बाथ मध्ये अष्टकोनी स्विमिंग पूल असून त्याच्या ८ कोपऱ्यात असलेल्या खांबावर वरचा घुमट तोलून धरलेला आहे. या घुमटात नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी झरोके ठेवलेले आहेत. बर्‍याच ठिकाणी या नैसर्गिक प्रकाशाची जागा विद्युत दिव्यांनी घेतलेली आहे.हॉप इन हॉप बसचा रुडास बाथ येथे स्टॉप आहे. याशिवाय पेस्ट बाजूला Széchenyi Thermal Bath हा युरोपातील सर्वात मोठा हमामखाना आहे. या ठिकाणी पर्यटकांची भरपूर गर्दी असते.


रुडास बाथ बघून सिटाडेलला जाण्यासाठी बस पकडली. बुडा बाजूला जाणार्‍या बसेसचा शेवटचा थांबा आहे. थांब्यावर उतरुन १० मिनिटे चढत गेल्यावर आपण सिटाडेलवर पोहोचतो. बुडापेस्ट मधला हा सर्वात उंच भाग आहे. येथून सूर्योदय अणि सूर्यास्त दोन्ही सुंदर दिसतात. आम्ही जुलै महिन्यात तिथे होतो. सूर्यास्त रात्री ८.४५ वाजता होणार होता. त्यामुळे सिटाडेल वरुन दिसणारे बुडापेस्ट शहराचे विहंगम दृश्य पाहून गेल्लर्ट हिल उतरुन खाली आलो. डेन्यूब नदीवरचा सुप्रसिध्द चेन ब्रीज ओलांडून वॅसी स्ट्रीटवर आलो.


Citadel from Buda Castle, Budapest

वॅसी ऊट्का Vaci Utca हा रस्ता खरेदीसाठी आणि खाऊ गल्लीसाठी प्रसिध्द आहे. या रस्त्यावर वहानांना प्रवेश नाही. त्यामुळे फ़ुटपाथवर, रस्त्यावर अनेक रेस्टॉरंटनी टेबल खूर्च्या मांडून ठेवलेल्या असतात. सोबत मेन्यू कार्ड असते. त्यावर पदार्थांचे फ़ोटो आणि त्यातील घटकांची नावे लिहीलेली असतात. हंगेरीयन पदार्थ श्निट्झेल (Schnitzel), गुलाश सूप, चिकन पॅप्रिका, डोबोस टोर्टे इथे खायला मिळतात.   

Vaci Street, Budapest

What & where to eat at Vaci Street, Budapest


गुलाश सूप (Goulash Soup) :-

गुलाश सूप हा हंगेरीची राष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे. सणासुदीला आणि पाहूणे आले की हा खास पदार्थ आजही घरोघरी बनवला जातो. गुलाश सूप हे मटण, पोर्क, बीफ़, व्हिएल यापासून बनवतात. कांदा आणि मटणाचे तुकडे तपकीरी होईपर्यंत तेलात परतात. त्यात पॅप्रिका, पाणी, गाजर, ब्रोकोली, फ़्लॉवर, कोबी इत्यादी घालून सुप बनवले जाते. काही ठिकाणी यात वाईन आणि टोमॅटोही घातला जातो.

Goulash Soup

गुलाश या शब्दाचा अर्थ आहे गुराखी. साधारणपणे नवव्या शतकात हंगेरीतले धनगर गुरे चारायला नेतांना सोबत खारवलेले आणि उन्हात सुकवलेले मांस चामड्याच्या पिशवीत घेऊन जात. त्यात पाणी मिसळून उकळून त्याचे सूप बनवून पीत असत. त्यावेळी आत्ता गुलाश सूपचा महत्वाचा भाग असलेल्या पॅप्रिकाचा वापर होत नव्हता, कारण सोळाव्या शतकात पॅप्रिकाचा मध्य युरोपातील खाद्य संस्कृतीत प्रवेश झाला. कमी वेळात तयार होणारे हे पौष्टीक सूप हंगेरीच्या साम्राज्या बरोबर मध्य युरोपात सर्वदूर पसरले आणि स्लोव्हाकीया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रीया इत्यादी देशांच्या खाद्य संस्कृतीचा भाग बनले. गुलाश सूपचा गाभा सर्व देशात सारखाच असतो पण प्रत्येक ठिकाणी त्यात वेगवेगळे पदार्थ, वाईन यांचा वापर होतो. 

श्निट्झेल (Schnitzel) :-

बुडापेस्ट (हंगेरी) मधील व्हॅसी स्ट्रीटवर ,व्हिएन्नातील प्रसिध्द खाऊ गल्ली नॅश मार्केटमध्ये फिरताना, ब्राटीस्लाव्हात (स्लोव्हाकिया) श्निट्झेलच्या पाट्या जिकडे तिकडे दिसत होत्या. श्निट्झेल हे मटण, चिकन, पोर्क, बीफ़, व्हिएल यापासून बनवतात. व्हॅसी स्ट्रीटवर एका रेस्टॉरंट मध्ये चिकन श्निट्झेलची ऑर्डर दिली. शेफ़ने फ़ायबरच्या हातोड्याने बोनलेस चिकनचा तुकडा ठोकून पातळ बनवला. त्यानंतर तो तुकडा पीठ, फ़ेटलेले अंड आणि पावाचा चुरा या मिश्रणात घोळवून तेलावर परतला. अशाप्रकारे तयार झालेले कुरकुरीत श्निट्झेल सॅलेड बरोबर सर्व्ह केले जाते. 

Schnitzel

श्निट्झेल या पदार्थाच्या शोधा बद्दल इतिहासकारां मध्ये दोन मत आहेत. हाप्स्बर्ग या राजघराण्याची एक शाखा इटलीत होती. मिलान शहरात ११३४ मध्ये आयोजित केलेल्या शाही मेजवानीसाठी हा पदार्थ प्रथम बनवला गेला होता. तर काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, रोमनांनी पहिल्या शतकात हा पदार्थ प्रथम बनवला त्याची नोंद ऍपिकस (Apicus) या पाककृतीच्या पुस्तकात आहे. रोमनांनी हा पदार्थ जर्मन प्रांतात आणला. युरोपियन लोकांनी श्निट्झेल हा पदार्थ जगभर नेला.

व्हिनर श्निट्झेल (Wiener Schnitzel) हा ऑस्ट्रीयाचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे, सणासुदीला आणि पाहूणे आले की हा खास पदार्थ आजही घरोघरी बनवला जातो. श्निट्झेल हा मुळ पदार्थ सर्व देशात सारखाच बनवतात पण प्रत्येक ठिकाणी त्याबरोबर वेगवेगळे पदार्थ असतात. हंगेरीत श्निट्झेल बरोबर भात, तळलेल्या बटाट्याच्या काचर्‍या मिळतात. स्लोव्हाकीयात श्निट्झेल बरोबर उकडलेले बटाटे , भाज्या आणि टार्टर सॉस बरोबर मिळते. 

डोबोस टोर्टे (Dobos torte) :-

गुलाश सूप, श्निट्झेल, चिकन पॅपारिका या पारंपारिक हंगेरियन पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर गोड पदार्थाने जेवणाची इतिश्री करण्यासाठी डेझर्ट मध्ये एखादा हंगेरियन पदार्थ आहे का याची चौकशी केली . तेव्हा डोबोस टोर्टे या पेस्ट्रीची वेटरने शिफारस केली . डोबोस टोर्टे पेस्ट्री मध्ये स्पॉंज केकेच्या सात थरांमध्ये बटर चॉकलेट क्रिमचे थर असतात वरुन कॅरॅमल कस्टर्डचे टॉपिंग केलेले असते . पेस्ट्रीच्या बाहेरच्या बाजूला वॉलनट , चेस्ट नटचे तुकडे लावलेले असतात . चॉकलेटसाठी खास कोको पावडर वापरलेली असते . यामुळे ही पेस्ट्री खातानाच तोंडात विरघळत जाते .

Dobos torte

शेफ जोसेफ डोबोस याने १८८५ मध्ये नॅशनल जनरल एक्झिबिशन ऑफ बुडापेस्ट मध्ये हा पदार्थ प्रथम सादर केला. या प्रदर्शनाला हजर असलेल्या किंग फ्रांझ जोसेफ आणि राणी एलिझाबेथ यांनी हा पदार्थ खाऊन पाहीला . त्यांच्या पसंतीस उतरल्याने हा पदार्थ रॉयल डिनरचा भाग बनला . त्याकाळात फ्रिज नसल्यामुळे पेस्ट्रीज आणि केक जास्त काळ टिकवून हे मोठे आव्हान होते. त्यामुळे केक बनवले तरी स्थानिक बाजारांशिवाय दूरवर पाठवून व्यवसाय वाढवता येणे शक्य नव्हते . त्या दृष्टीने प्रयत्न करताना डोबोसने ही पेस्ट्रीची रेसिपी शोधून काढली . फ्रांसमध्ये प्रवास करताना त्याला  बटर क्रिमची कल्पना सुचली. चॉकलेट बटर क्रिम आणि केकवरील कॅरेमलचा थर यामुळे पेस्ट्री जास्त दिवस टिकत असे. रॉयल डिनरचा भाग असलेली आणि दिर्घ काळ  टिकणाऱ्या पेस्ट्रीला  मागणी यायला लागली . खास बनवलेल्या लाकडी खोक्यातून या पेस्ट्रीच सर्वदूर पाठवल्या जाऊ लागल्या . खुद्द डोबोसने युरोपात फिरुन पेस्ट्री बनवण्याची प्रात्यक्षिके अनेक ठिकाणी केली . आज बुडापेस्ट मध्ये डोबोस टोर्टे सर्व ठिकाणी मिळत असला तरी बुडा किल्ल्याच्या भागातील काही जून्या बेकऱ्या मधील या पेस्ट्रीची चव मूळ पेस्ट्रीच्या जवळ जाणारी असते असे स्थानिक लोक मानतात .

डोनेर कबाब (Doner Kebab/kabab):-

बाराव्या शतकात आजच्या तुर्कस्थानातल्या ओटोमान साम्राज्याने पूर्व युरोप पादाक्रांत केला होता. त्यानंतर विसाव्या शतकात कामधंद्या निमित्त अनेक तुर्की लोकांनी युरोपचा आश्रय घेतला. त्या लोकांनी आपल्या बरोबर आपली खाद्य संस्कृती युरोपात आणली आणि रुजवली. युरोपात फ़िरतांना अनेक ठिकाणी तुर्कस्थानातून आलेल्या लोकांची हॉटेल्स दिसतात. हॉटेलचे नाव आणि पुढे केबाब (कबाब) असे लिहीलेले असते. दुकानाच्या दर्शनी भागात काचे आड फ़िरणार्‍या उभ्या दांड्यावर उलट्या ठेवलेल्या कोनच्या आकारात मसाले लावलेले मटण शिजत ठेवलेले असते. येथे मिळणारा लोकप्रिय पदार्थ म्हणजे डोनेर केबाब. हा पदार्थ दोन प्रकारत मिळतो. प्लेट मध्ये आणि रॅप मध्ये.

Doner Kebab

Doner Kebab wrap
डोनेर कबाब मागवल्यावर तिथला कुक उभ्या दांड्यावर शिजत असलेल्या मटणाचे बोनलेस तुकडे आपल्या समोरच सुरीने कापून प्लेट मध्ये घेतो. सोबत वेगवेगळ्या प्रकारचे सॅलेड्स, पिट्टा ब्रेड आणि भात देतात. दोन ते तीन जणांना ही डिश खाता येते. डोनेर रॅप मध्ये मैद्याच्या रोटी मध्ये मटणाचे तुकडे सॉस आणि गाजर, लुट्येस इत्यादीचे सॅलेड असते. डोनेर कबाबचा शोध एकोणीसाव्या शतकात तुर्कस्थानातल्या बुर्सा शहरात या पदर्थाचा शोध लाहला. तेथून तो व्हाया इस्तंबूल जगभर पसरला. फ़ास्ट फ़ूड मध्ये त्याने आपले स्थान निर्माण केले. आपल्याकडे मिळणारा शोरमा हा त्याचा भाऊबंद आहे.      

Soproni आणि Borsodi या दोन स्थानिक draught beer सर्व ठिकाणी मिळतात. 

वॅसी स्ट्रीटवर खरेदीसाठी : (What to buy in Budapest)

१) पॅप्रिका (Paprika) :- पॅप्रिकाने हंगेरीच्या खाद्यसंस्कृतीत अढळ स्थान मिळवलेले आहे. हे आपल्या कडील लाल मसाल्या सारखे दिसते. सोळाव्या शतकात तुर्की आक्रमकांनी हा मसाला हंगेरीत आणला. सुकवलेल्या लाल मिरच्या आणि भोपळी मिरची यापासून हा मसाला बनवला जातो. पदार्थाना स्वाद आणि रंग येण्यासाठी याचा वापर करतात. 
Paprika

२) टोकाजी वाईन (Tokaji Wine) :- राणी एलिझाबेथच्या वाढदिवसाला हंगेरीचा सम्राट फ़्रांझ जोसेफ़ टोकाजी वाईनच्या १२ बाटल्या पाठवत असे (महिन्याला एक अशा एकूण ९७२ बाटल्या ८१ व्या वाढदिवसापर्यंत पाठवल्याची नोंद आहे.) पूर्व हंगेरीत बनणारी ही टोकाजी वाईन अनेक फ़्लेवर मध्ये उप्लब्ध आहे. रुपये २००/- पासून २०००/- रुपया पर्यंत टोकाजी वाईन मिळते (मिळण्याचे ठिकाण २३ वॅसी स्ट्रीट) 

Tokaji Wine
३) युनिकम (Unicum) :- ४० औषधी वनस्पती आणि मसाल्यांपासून दारु बनवण्याची पध्दत सम्राट जोसेफ़-२ याचे रॉयल डॉक्टर Dr. József Zwack यांनी १७९० मध्ये शोधून काढली. याचा फ़ॉर्म्युला अनेक शतके गुप्त ठेवंण्यात आला होता. युनिकम हे हंगेरीचे राष्ट्रीय पेय आहे . ४० % अल्कोहल असलेली ही दारु औषधी आहे अशी अनेक हंगेरीयन लोकांची आजही श्रध्दा आहे. ४००/- पासून १००००/- रुपया पर्यंत युनिकम मिळते. (मिळण्याचे ठिकाण २३ वॅसी स्ट्रीट) 

४) हंगेरीयन सिक्रेट बॉक्स (Hungerian Secret box) :- चोर कप्पे असलेले वेगवेगळ्या रंगाचे, आकाराचे लाकडी बॉक्स येथे मिळतात. मध्ययुगापासून दागिने ठेवण्यासाठी हे बॉक्स वापरले जातात.

५) रुबिक क्युब (Rubic Cube) :- जगभरात मोठ्या प्रमाणावर वापरले जाणार्‍या रुबिक क्युबचा शोध हंगेरीयन प्रोफ़ेसर ईमो रुबिक याने १९७४ मध्ये लावला. वॅसी स्ट्रीट वरच्या अनेक दुकानात रुबिक क्युब मिळतो.



६) पारंपारीक हंगेरीयन झगा (शर्ट) :- पांढर्‍या किंवा क्रिम कलरच्या या शर्टवर काशीदा विणलेला असतो. 

Hungarian Shirt 

या शिवाय व्हॅसी स्ट्रीटवर सोवेनियर, मॉन्युमेंटस, स्कार्फ़, टिशर्ट्स इत्यादी कुठल्याही पर्यटन स्थळी मिळणार्‍या वस्तू मिळतात.

Souvenir Vaci street 

व्हॅसी स्ट्रीटवर पोटपूजा करुन आम्ही बुडापेस्ट मधल्या दुसर्‍या दिवसाची सांगता केली.


***********


बुडापेस्ट शहर पर्यटकांसाठी उत्तम आणि सुरक्षित शहर आहे. इंग्रजी भाषेचा अडसर सोडला तर स्थानिक लोक मदतीला तप्तर आहेत. सर्व ठिकाणी माहिती फ़लक, दिशादर्शक फ़लक इंग्रजी भाषेत आहेत. इंटरनॅशनल कॉलिंग करुन घेतल्यास व्होडाफ़ोन चालतो. मुख्य म्हणजे इतर युरोपीय देशांच्या मानाने स्वस्ताई आहे. बुडापेस्ट (हंगेरी), ब्राटीस्लाव्हा (स्लोव्हाकीया) , ऑस्ट्रीया हे तीन देश एकमेकांपासून जवळ आहेत. ते सात दिवसात आरामात पाहून होतात. मुंबई ते बुडापेस्ट आणि विएन्ना ते मुंबई विमान तिकिट काढल्यास कमी पैसे लागतात. या देशात आणि देशांतर्गत प्रवासासाठी ट्रेन आणि बस हे दोन पर्याय आहेत. आधीच तिकीटे काढली तर स्वस्तात तिकीटे मिळतात. ट्रेन आणि बसच्या तिकिटां संदर्भात शोधाशोध करतांना एक गोष्ट सापडली. तुम्ही ज्या देशातून दुसर्‍या देशात जात आहात तिथल्या रेल्वेच्या वेबसाईट वरुन तिकिटे काढली तर स्वस्त पडतात. उदाहरणार्थ बुडापेस्ट (हंगेरी) वरुन विएन्नाला (ऑस्ट्रीया) जाण्यासाठी ट्रेनची तिकीटे OBB या ऑस्ट्रीयन रेल्वेच्या साईटवर ज्या किंमतीत होती त्याच्या पेक्षा निम्म्या किंमतीत हंगेरीयन रेल्वेच्या साईटवर मिळाली आणि ती सुध्दा सीट रिझर्वेशनसकट (साधारणपणे तिकिट काढल्यावर आपल्याला फ़्री सीट मिळतात म्हणजे प्रवासा दरम्यान ज्या सीट रिकाम्या असतात त्यावर जाऊन बसायचे. (पिक सीझन मध्ये अशा सीट मिळणे कठीण असते.) जर रिझर्व्ह सीट हव्या असतील तर त्यासाठी जास्तीचे पैसे भरावे लागतात.) विएन्नाहून बसने ब्राटिस्लाव्हाला जातांनाही हाच अमुभव आला. flexi bus या युरोपात मोठ्या प्रमाणावर चालणार्‍या बसच्या तिकिटापेक्षा Slovak lines या स्लोव्हाकियाच्या स्थानिक बसचे तिकिट कमी पैशात मिळाले.          

जाण्यासाठी उत्तम कालावधी :- जून ते सप्टेंबर 


दुसर्‍या दिवसाचा खर्च (बुडापेस्ट :- बुडा साईड)
राहाण्याचा खर्च :- ४५००/-
दुपारचे जेवण (डोनेर कबाब, पिझा, Soproni) :- ७८०/- (३ जणांसाठी)
वॅसी स्ट्रीट (श्निट्झेल,गुलाश सूप, डोबोस टोर्टे, Borsodi)  :- २१००/- (३ जणांसाठी)

स्वस्तात मस्त सफ़र बुडापेस्टची भाग- १ (Budapest in two days) हा पहीला भाग जरुर वाचा. 
वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.....

https://samantfort.blogspot.com/2019/08/budapest-in-two-days.html

Symbol of Austro Hungerian Dynasty, Buda Castle
Buda Castle 


Photos by :- Amit & Kaustubh Samant , Copyright


#budapest#budacastle#Goulashsoup#Schnitzel#vacistreet#dobos torte#paprika#what&wheretoeatinbudapest#thingstodoinbudapest#howtoplanbudgettriptobudapest#hungery#hamaminbudapest#thermalbathsofbudapest#