Sunday, October 16, 2022

माळशेजची प्राचीन घाट वाट आणि काळूचा ओघ ( Malshej Ghat Ancient trade route & Kalucha (Waterfall) Ogh )

 

Malshej Ghat Ancient trade route 


कल्याण बंदराला जून्नरशी (जीर्ण नगर) जोडणारा माळशेज घाट ही  प्राचीन घाट वाट आहे.  या वाटेने कल्याण बंदरात उतरणारा माल  घाट माथ्यावरील जून्नरच्या बाजारपेठेत जात असे.  या परिसरात कल्याणला जुन्नरशी जोडणारे  नाणे घाट , दर्‍या घाट इत्यादी प्रसिध्द  घाटमार्ग  असतानाही माळशेज घाटाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असावा हे तिथे अजूनही तग धरुन असलेल्या अवशेषांवरुन दिसून येते.

 

Malshej Ghat

अनेक धबधबे, ओहोळ, रानफ़ुलं , धुक्याच्या पडद्या आडून अचानक दिसणार सह्य़ाद्रीचं रौद्र भीषण रुप यामुळे पावसाळ्यात माळशेज घाटाचे सौंदर्य खुलतं, त्यामुळे शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवसात  इथे पर्यटकांची रिघ लागलेली असते. अशा ठिकाणी येऊन निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असतो हे बर्‍याच जणांच्या गावी नसल्याने दारु ढोसून  नाचगाणी, आरडाओरडा करण्यात धन्यता मानतात.  पण पाऊस ओसरल्यावर मात्र हे  पावसाळी पर्यटक गायब होतात. 

 

कारवीच्या झुडूपातून वाट

१ ऑक्टोबरला सकाळी  आम्ही माळशेज घाट ओलांडला तेंव्हा घाटात शांतता होती . आठवडाभर पाऊस नसल्याने धबधब्यांच्या भर ओसरला होता. हरिश्चंद्रगड आणि परिसर अजून धुक्याच्या  पडद्या आड लपला होता. बोगदा ओलांडून पुढे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळच्या  (MTDC) कमानीतून आत शिरलो. कमानीच्या डाव्या बाजूला प्राचीन माळशेज घाट वाटेची सुरुवात होते आणि घाटा खाली असलेल्या थितबी गावात ही वाट उतरते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळचे रिसॉर्ट असलेले पठार माळशेजच्या मुख्य डोंगररांगेपासून सुटावल्या सारख दिसते. पठार आणि मुख्य डोंगररांग यांच्या मध्ये एक घळ आहे. या घळीतून वाहाणार्‍या ओढ्याच्या काठाने माळशेजची प्राचीन वाट जाते. त्या वाटेच्या सुरुवातीला असलेलेया कारवीच्या दाट झुडूपांमुळे वाटेचे तोंड सापडणे थोडे अवघड आहे. त्यासाठी  कमानीतून आत शिरुन डाव्या बाजूला  घळीच्या विरुध्द दिशेला डोंगर उतरायला सुरुवात करावी. पाच मिनिटात आपण  कारवीच्या दाट झुडूपांपाशी येतो. या झुडूपां मधूनच माळशेजची घडीव दगडात बनवलेली प्राचीन वाट आहे.

 

फरसबंदी वाट

मोठ मोठे दगड तासून, व्यवस्थित बसवून ही वाट बनवलेली आहे. वाटेत लागणार्‍या ओढ्यांच्या प्रवाहामुळे काही ठिकाणी उखडले आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे इतर ठिकाणी इतक्या वर्षानंतरही घडीव दगडांची वाट अजूनही टिकून आहे. कारवीच्या दाटीमुळे पायाखालची वाट दिसत नव्हती. दहा मिनिटे कारवीतून चालल्यावर वाट डावीकडे वळून घळीच्या दिशेने उतरायला लागली.  पाठीवर सामान असलेली दोन जनावर एकाच वेळी जातील एवढी रुंद आणि चढणार्‍या आणि उतरणार्‍या जनावरांना कमीत कमी श्रम होतील अशा प्रकारे घाट वाटेची रचना केलेली आहे.    पायर्‍यांची उंचीही त्याच बेताने ठेवलेली आहे. 

 

ओढ्यातला खडक

उतरायला सुरुवात केल्यापासून २० मिनिटात घळीत पोहोचलो. घळीतून वाहाणार्‍य़ा ओढ्याच्या बाजूने वाट जात होती.  पुढच्या पाच मिनिटात वाट   ओढ्याच्या पात्रात उतरली. या ठिकाणी ओढ्याच्या पात्रात मोठा खडक पडला होता त्याने ओढ्याचे पात्र अडवल्याने बाजूला चिंचोळी वाट होती. पावसाळ्यात हा भाग त्यामुळे धोकादायक आहे. पण आम्ही गेलो तेंव्हा आठवडाभर पाऊस नसल्याने पाणी कमी होते. ओढ्याच्या पात्रात असलेल्या  खडकाच्या मागे हरिशचंद्रगड दिसतो. पण धुक्यामुळे तो दिसत नव्हता. तरीही खडकावर उभ राहून छायाचित्र घेण्याचा मोह कोणाला आवरता आला नाही.  येथून चारही बाजूला झाडीं भरले डोंगर दिसत होते. माळाशेज घाटाचा बोगदा त्याच्या पुढे असलेली  MTDCचे पठार आणि मुख्य डोंगररांग  यांच्या मधली घळ दिसत होती. त्या घळी जवळूनच आम्ही उतरायला सुरुवात केली होती.

 


ओढ्याच्या बाजूने जाणार्‍या चिंचोळ्या वाटेने पुढे निघालो . ओढ्याने इथून अंदाजे ५० फ़ुट खाली उडी मारली होती. पायवाट मात्र डोंगराच्या कडेने जात होती. 



                                    व्हिडीओ पाहाण्याकरिता प्ले बटणवर टिचकी मारा

या ठिकाणी कातळात रुंद पायर्‍या खोदलेल्या होत्या. पायर्‍यांच्या वरच्या बाजूला कातळात कोरलेली तीन पाण्याची टाकी दिसत होती. वर चढून बघितल्यावर दोन टाकी पाण्याने भरलेली होती आणि तिसर टाक वरचे दगड आत पडल्यामुळे बूजलेल होते. पहिल्या टाक्याच्या खाली कातळावर गणपती कोरलेला आहे. तिथेच उगवलेली सोनकीची फ़ुल गणपतीला वाहून पुढे चालायला सुरुवात केली . 

Ganesh, Malshej Ghat Ancient route

Water tank , Malshej Ghat

Water Tanks, Malshej Ghat

आता वाटेच्या दोन्ही बाजूला अनेक छोटी छोटी रानफ़ुल फ़ुलली होती. सोनकी, तेरडा, कानपेट, विंचवी, कर्डू, ताग, हिरवी अबोली इत्यादी फ़ुलांनी आणि त्यावर भिरभिरणार्‍या फ़ुलपाखरांनी वातावरण एकदम प्रसन्न केले.

 


ओढा पायवाटेपासून दूर गेला असला तरी रानातून येणारा त्याचा खळखळाट सोबतीला होता. आता मोकळा भाग संपून पुन्हा जंगलाचा पट्टा चालू झाला. एक मोठा खडक बघून नाश्त्याचे डबे बाहेर काढले. इतक्यात डाव्या बाजूच्या झाडीत एक खंड्या (किंगफ़िशर) चोचीत मासा धरुन आला. या उंचीवर आणि दाट झाडीत पहिल्यांदाच खंड्याचे दर्शन झाले. खंड्या उडून गेल्यावर आम्ही पुढे चालायला सुरुवात केली. आता उतार संपून  जंगलातून जाणारी वळणावळणाची वाट होती. वाटेत  चार आडवे जाणारे ओढे लागले.  वनखात्याने ओढ्यांवर दगडांचे बांध घालून तो वाहून जाउ नये यासाठी त्यावर लोखंडी जाळी घातली होती. तरीही पाण्याच्या प्रवाहाने काही बांध फ़ोडलेले दिसले. पावसाळ्यातले कुंद वातावरण , ओलावा यामुळे जंगलात ठिकठिकाणी मोडून पडलेल्या  लाकडांवर वेगवेगळ्या प्रकारच्या , आकाराच्या , रंगांच्या बुरशी (Fungi) ,कुत्र्याच्या छत्र्या (mushroom) वाढायला सुरुवात होते.  पावसाळा संपत आल्याने जोमाने वाढलेल्या रंगांच्या बुरशी (Fungi) ,कुत्र्याच्या छत्र्या (mushroom) वाटेत दिसत होत्या. 






वाटेत एका झाडा भोवती अळे केलेले असावे , तसे वारुळ पाहायला मिळाले. अळ्याच्या आत डेरेदार झाड होते. या अळ्याच्या आकाराच्या वारुळाच्या आत वाढलेल्या झाडाची वाढ इतर झाडांपेक्षा जास्त आणि चांगली होते असे  लक्षात आल्यामुळे मानवाला अळ्याची कल्पना सुचली असण्याची शक्यता आहे. मानव आजही निसर्गाकडून बर्‍याच गोष्टी शिकतोच आहे.

 

वारुळाचं अळं

सुरुवातीपासून साथ देणारा ओढा आता पुन्हा पायवाटेच्या बाजूला आला.  MTDC पासून उतरायला सुरुवात केल्यापासून २.५ तासात आम्ही एका फ़ाट्यापाशी पोहोचलो. येथून उजव्या बाजूला जाणारी ठळक वाट काळूच्या ओघाकडे जात होती. तर सरळ जाणारी वाट थितबी गावाकडे जात होती.   इथे गाड्यांचे आणि माणसांचे आवाज यायला लागले. अनेक यु ट्यूब व्हिडीओ आणि रिल्समुळे काळूचा ओघ अचानक प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. त्यातच थितबी गावातून इथे यायला बर्‍यापैकी कच्चा रस्ता असल्याने चार चाकी गाड्या आणि बाईक्स ओढ्या पर्यंत येतात. ओढ्यापासून ३ किलोमीटर चालत गेल्यावर "काळूचा ओघ" हा सह्याद्रीच्या माथ्यावरुन पाच टप्प्यात कोकणात पडणारा सुंदर धबधबा आहे.  यातील पहिला टप्पा जवळजवळ १२०० फ़ूटाचा आहे. त्या सरळसोट पाण्याच्या धारेमुळे धबधब्याचे नाव "काळूचा ओघ" असे पडले असावे.  भर पावसात हा धबधबा पूर्ण भरात असतो. या धबधब्याच्या उजव्या बाजूला एक धबधबा आहे. स्थानिक लोक त्याला "माहुली धबधबा" या नावाने ओळखतात. या धबधब्याचे पाणी काळू नदीला मिळते.

 

काळूचा ओघ


साधारण दोन किलोमीटर चालत गेल्यावर एका ठिकाणाहून काळूचा ओघ वर पासून खाल पर्यंत संपूर्ण दृष्टीपथात येतो. भर दुपारीही काळुच्या ओघाकडे अनेक पर्यटक जात होते. त्यामुळे धबधब्या जवळ न जाता लांबूनच त्याची छायाचित्र घेतली. सकाळ पासून ढगात गुरफ़टलेल्या काळभैरव, तारामती (हरिशचंद्रगड) या शिखरांनी दर्शन दिले. परत फ़िरुन ओढ्यापाशी आलो. इथे पाण्याचा एक डोह तयार झालेला आहे. ऑक्टोबर हिटमुळे घामाने अंग भिजले होते. त्यामुळे पाण्यात शिरुन आत्तापर्यंतच्या ट्रेकचा क्षीण घालवणे आवश्यक होते. अर्ध्या तासाने पाण्या बाहेर पडून पुढच्या रस्त्याला लागलो. रुंद कच्चा रस्ता थितबी गावापर्यंत जात होता. रस्त्याच्या बाजूला अनेक बाईक्स आणि कार्स उभ्या होत्या. उजव्या बाजूला "निसर्ग पर्यटन केंद्र" थितबी अशी पाटी होती . वन खात्याने तिथे ४ रुम्स आणि २ डॉर्मेट्री बांधून राहाण्याची सोय केलेली आहे. एक वॉच टॉवर उभारलेला आहे. त्यावर चढून गेल्यावर आजूबाजूचे अफ़ाट दृश्य दिसले. MTDC चे रेलिंग , आम्ही उतरुन आलेली घळ , माळशेज घाटाची डोंगररांग, कालभैरव, हरिशचंद्रगड, काळूचा ओघ असा पॅनोरमा व्हिव्यू इथून दिसत होता. रिव्हर कॉसिंग, आर्टिफ़िशिअल वॉलची इत्यादी साहासी खेळांची येथे सोय आहे. पण करोना पासून हे निसर्ग पर्यटन केंद्र बंद आहे.

 



टॉवर वरुन खाली उतरुन कच्च्या रस्त्याने थितबी गावाकडे चालायला सुरुवात केली. रस्ता माळरानावरुन होता आणि त्यात दुपारचे उन , वाटेत एके ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला शेंदुर लावलेला दगड होता. ती वाघदेवाची मुर्ती होती . उन्हा पावसात राहिल्यामुळे आणि शेंदुराचे थर चढल्यामुळे वाघाची प्रतिमा जेमतेम दिसत होती. 
(वाघदेवाबद्दल माहिती वाचण्याकरिता या लिंकवर टिचकी मारा  https://samantfort.blogspot.com/2015/08/waghdev.html )

पुन्हा रस्त्यावर येऊन गाव गाठले. थितबी गावात जेवणाची आणि गाईडची सोय आहे. "निसर्ग पर्यटन केंद्र ते थितबी गावाचे अंतर  २.५ किलोमीटर आहे. थितबी गाव ते कल्याण - माळशेज रस्ता हे अंतरही २.५ किलोमीटर आहे. थितबी गावाच्या फ़ाट्यावर बस थांबत नाहीत. त्यामुळे मिळेल ते वाहन पकडून धसई फ़ाटा किंवा टोकवडे गाठावे . येथून मुरबाड , कल्याणला जाणार्‍या बसेस मिळतात.

 

वाघदेवाची मुर्ती

माळशेज MTDC - थितबी हा अर्ध्या दिवसाचा ट्रेक आहे. सप्टेंबर , ऑक्टोबरमध्ये पाणी ओसरल्यावर पुढे मे महिन्यापर्यंत हा ट्रेक करता येइल. पाऊस पूर्ण भरात असतांना हा ट्रेक करणे टाळावे.

माळशेज MTDC-  थितबी  :-  २.५ तास चाल.

GPS ने रेकॉर्ड केलेली प्राचीन माळशेज घाटाची भटकंती, नकाशा  :- महेंद्र गोवेकर

माळशेज MTDC - काळूचा ओघ - थितबी हा पूर्ण दिवसाचा ट्रेक आहे . सप्टेंबरऑक्टोबर हे महिने छायाचित्रणाच्या दृष्टीने योग्य आहेत.

 माळशेज MTDC -  काळूचा ओघ - थितबी  :- ४ ते  ५ तास चाल.

थितबी - माळशेज MTDC चढाई :- ४ ते  ५ तास चाल.

 


Photos by :- Amit Samant & Mahendra Govekar © Copy right

 Video by :- Amit Samant

 Map :- Mahendra Govekar © Copy right

 कॅमेरा :- Gopro Hero 5 

सोबत डोंगरभाऊ :- महेंद्र गोवेकर, मोहन शेट्टी, मंदार सारंग


काळू नदी

चोंढ्या घाट ते उंबरदरा (घाटघर परिसरातली भटकंती) हा ब्लॉग वाचण्याकरिता या लिंकवर टिचकी मारा
https://samantfort.blogspot.com/2021/02/blog-post.html





Thursday, June 30, 2022

ऑफ़बीट शानगड आणि पुंडरिक ऋषी सरोवर ट्रेक , हिमाचल प्रदेश (Offbeat Shangarh & Pundrik Rishi lake trek, Himachal Pradesh)

 

Shangarh Medow

हिमाचल प्रदेशात अशी अनेक सुंदर ठिकाण आहेत, जी अजून प्रसिध्दीच्या झोतात आलेली नाहीत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे शानगड. मनाली सारख्या गर्दीने भरलेल्या ठिकाणापासून जवळ असूनही शानगड अजूनही शांत आणि गजबजाटा पासून दूर आहे. शानगडला तीन ते चार दिवस मुक्काम करुन शानगडचे मुख्य आकर्षण असलेले मेडोज (Medow) म्हणजेच गवताळ कुरणंधबधबे, पक्षी निरिक्षण आणि जंगलातले छोटे ट्रेक्स करता येतातयशिवाय पुंडरिक ऋषी सरोवराचा छोटा एक दिवसाचा ट्रेक करता येतो. रुपी रैला (रोपा) धबधबा, रुपी रैलाचे जुळे मनोरे (Twin Towers) , देवरी जवळ असलेली पहाडातील गाव आणि मंदिरे अशी आजुबाजूची ठिकाण पाहाता येतात. निसर्गप्रेमी आणि ट्रेकर्स यांना याठिकाणी पाहाण्या सारख (ए़क्स्प्लोर करण्यासारख) भरपूर काही आहे.

Shangarh Medows

 शानगड हे हिमालयाच्या कुशीत सैंज व्हॅलीमध्ये वसलेले टुमदार गाव आहे. सैंज व्हॅली ,पार्वती व्हॅली, जीवा नाल व्हॅली, आणि तिर्थन व्हॅली ही चार ठिकाणं मिळुन ११०७ स्क्वेअर किलोमीटरचे " ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क" तयार झालेले आहे. १००० प्रकारच्या वनस्पती, ३१ जातीचे प्राणी आणि २०९ प्रकारचे पक्षी असलेल्या या ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कला २०१४ मध्ये "UNESCO World Heritage Site" हा दर्जा मिळाला आहे. या नॅशनल पार्क मध्ये असलेल्या जीवा नाल्या पासून उगम पावणारी सैंज नदी पुढे डोंगर दर्‍यातून वाट काढत लाजरी गावाजवळ बियास नदीला जाउन मिळते. या नदीच्या खोर्‍यात सैंज हे बाजारपेठ असलेले मोठे गाव आहे. औट बोगद्या पासून निघणारा वळणावळणांचा रस्ता सैंज नदी काठाने सैंज गावात पोहोचतो. वाटेत नदीवर दोन मोठे विज निर्मिती प्रकल्प आहेत. सैंज गावच्या पुढे रोपा गाव आहे. या रोपा गावापासून उभ्या चढणीचा ७ किलोमीटरचा रस्ता आपल्याला निसर्गरम्य शानगड गावात घेऊन जातो. इसवीसन २०१५ मध्ये हा रस्ता तयार झाला. त्यापूर्वी रोपा गावातून चालत जावे लागत होते.

Shangarh Thach/ Bugyal

शानगडचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथले मेडोज (Medow)  म्हणजेच गवताळ कुरणं. पहाडी भाषेत या गवताळ कुरणांना "थाच" म्हणतात, तर तिबेटी भाषेत "बुग्याल" म्हणातात.  डोंगर उतारावर चारही बाजूंनी पसरलेले देवदार वृक्षांचे जंगल अचानक या गवताळ कुरणापाशी थबकलेल आहे. झाडांची रांग जिथे संपते तेथून दूरवर पसरलेले हिरवगार गवताळ कुरण आहे.  कुरणात चरणारी गुरं , त्यामागे दाट जंगल , जंगलावरुन डोकावणारी डोंगररांग आणि मागे डौलात उभ असलेल पार्वतीच हिमाच्छादित शिखर असं नजरबंदी करणार अफ़ाट दृश्य इथुन पाहायला मिळत. या निसर्ग दृष्याला धक्का न लावता त्याच सौंदर्य अजून खुलवणार लाकडी बांधणीच शंकर मंदिर या कुरणाच्या कोपर्‍यात आहे.  हे गवताळ कुरण पवित्र स्थळ आहे . त्यामुळे या ठिकाणी खाणे, पिणे, गाणी लावणे, कचरा करणे इत्यादी गोष्टींना मज्जाव आहे. सुर्यास्ता नंतर कुरणांवर  जाण्यास मनाई आहे. या गवताळ कुरणा भोवती असलेल्या धार्मिक संकल्पनेमुळे हे कुरण इतके वर्षे अबाधित राहिले असावे.


सर्व बाजूंनी असलेल्या डोंगर उतारावर घनदाट वनराई असतांना त्याला लागून असलेल्या गवताळ कुरणावर एकही झाड किंवा झुडूप नाही आहेत्याच कारण आमच्या Geology च्या डॉ. बोरकर सरांनी सांगितले. "हिमालयाच्या डोंगर उतारावरच्या गाळाला इंग्रजीत scree (स्क्रीम्हणतात.  या उतारावर साठलेल्या गाळात मोठमोठे दगडगोटेधोंडे यांचे प्रमाण अधिक आहेत्या उतारावरच्या गाळात सच्छिद्रता जास्त आहेत्यामुळे त्यात भूजल टिकून रहातेतिथे उंच झाडांना पोषक वातावरण आहेम्हणून तिथे उंच झाडांचे जंगल माजले आहे.  त्याला लागून जो गवताळ पट्टा आहेत्याच्या पृष्ठभागावर साठणाऱा गाळ सिल्ट आणि क्ले यांनी बनलेला आहेतो गवताळ वनस्पती समुदायासाठी पोषक आहे.  दोन एकमेका लगतच्या पट्ट्यांमधल्या वनस्पती सृष्टींमधे फरक दिसतो याचे रहस्य हे असे आहे." 


Mahadev Mandir, Shangarh

शानगड थाच (Medow)  लांबवर पसरलेले आहे. त्यात छोट्या टेकड्या आणि उंच सखल भाग आहेत. त्यावर फ़िरण्यात, वेगवेगळ्या कोनातून छायाचित्र घेण्यात कितीही वेळ घालवला तरी मनाचे समाधान होत नाही. चालून चालून दमल्यावर त्या हिरवळीवर नुसते पडुन राहाण्यात पण सुख आहे.  शानगड मधील चार दिवसांच्या मुक्कामात मी दरारोज वेगवेगळ्या वेळी या कुरणामध्ये फ़िरलो. पहाटे आणि सुर्यास्ताच्या वेळी इथले सौंदर्य जास्तच खुलून दिसते



या कुरणातून गावात टॉवर सारखी दिसणारी एक लाकडी इमारत आपल्याला खुणावत असते. कुरणातून गावात जाणार्‍या पायवाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर घरांच्या दाटीत असलेल्या शांग्चुल महादेव मंदिरा जवळ आपण पोहोचतो.

शांग्चुल महादेव मंदिर


हे टॉवर सारखे दिसणारे मंदिर लाकडी वासे आणि दगड वापरुन बांधलेले आहे.. दगडांची एक रांग आणि त्यावर लाकडी वाशांची एक रांग अशाप्रकारे दगड आणि वासे एकमेकांवर रचुन हे मंदिर बांधलेले आहे. दगडांमधील लाकडी वाशांवर कोरीव काम केलेले आहे.

Shangchul Mahadev Temple, Shangarh

मंदिराच्या भव्य लाकडी प्रवेशव्दारावर अप्रतिम कोरीव काम आहे. त्यात दशावतार कोरलेले आहेत. ( मंदिर शंकराचे असूनही प्रवेशव्दारावर दशावतार कोरलेले आहेत.) प्रवेशव्दाराच्या वर असलेल्या दोन मजल्यांना कोरीवकाम केलेले कमानदार सज्जे आहेत. त्यावर मंदिराच्या गाभार्‍यात शंकराची मुर्ती व पिंड आहे. मंदिराच्या उतरत्या छपराला छोट्या घंटा टांगलेल्या आहेत. वार्‍यामुळे होणारा त्यांचा किनकिनाट मन प्रसन्न करुन जातो. 


Shangchul Mahadeo Temple, Shangarh
 
Wood carving

पहिल्या दिवशी शानगड थाच (Medow) आणि शांग्चुल महादेव मंदिर पाहून झाल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळीच शानगड पासून ३ किलोमीटर अंतरावर असलेला "बार्शानगड ( Barshangharh) धबधबा पाहायला जावे. शानगडमधून एक कच्चा रस्ता जंगलातून दरीच्या काठाने फ़िरत-फ़िरत धबधब्या पर्यंत जातो. या रस्त्यावर असलेल्या पहिल्याच मोठ्या ओढ्याच्या पुलाखाली पाणचक्की आहे. ओढ्यातले पाणी एका लाकडी पाटाव्दारे या  पाणचक्कीत वळवलेले आहे. या पाण्याच्या शक्तीवर चक्की फ़िरवून धान्य दळले जाते. रस्त्याच्या दुतर्फ़ा फ़ुललेली फ़ुल, वहाणारे ओढे ओलांडत रमतगमत तासभरात आपण धबधब्याकडे जाणार्‍या पायवाटेवर पोहोचतो.  इथे दाट जंगल आहे. इथे असलेल्या मोठ्या वृक्षांखाली बसण्यासाठी देवदारचे ओबडधोबड ओंडके व त्यावर फ़ळ्या टाकून बाकडे बनवलेले आहेत. त्यावर थोडावेळ विश्रांती घेऊन आजुबाजूला दिसणार्‍या पक्षी आणि फ़ुलपाखरांचे निरिक्षण आणि छायाचित्रण करण्यात मस्त वेळ जातो. या भागात आढळणार्‍या Yellow Beeled Blue Magpie या लांबलचक शेपटी असलेल्या सुंदर पक्ष्याचे प्रथम दर्शन मला इथेच  झाले.  इथुन पुढे धबधब्या पर्यंत १० मिनिटाची खडी चढण आहे. ती चढून गेल्यावर धबधब्याचा आवाज कानावर पडतो,  समोर कड्यावरुन कोसळणारा सुंदर धबधबा दिसतो. धबधब्याच्या नादाला छेदत जंगलातून येणारे पक्ष्यांचे आवाज, धबधब्याच्या पाण्यावर पडलेल्या उन्हामुळे मध्येच उमटणारे इंद्रधन्युष्य पाहात तिथे बसले की वेळ कसा जातो कळत नाही.  शानगड ते  बार्शानगड धबधबा हे अंतर जाउन येऊन ६ किलोमीटर आहे.  या कच्च्या रस्तावरुन कारनेही जाता येते. पण चालत जाण्यात जास्त मजा आहे. सकाळ धबधब्यावर घालवल्यावर संध्याकाळी गावातली एखादी पायवाट पकडून फ़िरायला जाता येते किंवा थाचला जाऊन किंवा एखाद्या कड्यावरुन सुर्यास्त पाहाता येतो.

 


Yellow Beeled Blue Magpie








Yellow Beeled Blue Magpie

तिसर्‍या दिवशी रुपी रैला धबधबा , रैलाचे जुळे मनोरे (Twin Towers) , देवरी जवळ असलेली पहाडातील गाव आणि मंदिरे अशी आजुबाजूची  ठिकाण पाहाण्यासाठी गाडी भाड्याने करावी लागते. शानगड ते शानगड ८० - ८५ किलोमीटर अंतर आहे. पण ही ठिकाण एकमेकांपासून लांब आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या डोंगरांवर असल्यामुळे घाट चढावे आणि उतरावे लागतात. या भागात दिवसातून एखाद दुसरी बस असल्याने ही तीन ठिकाणे पाहाण्यासाठी २५००/- रुपये टॅक्सी भाडे घेतात. शानगडचा घाट उतरुन रोपा गाव ओलांडल्यावर उजव्या बाजूला सैंज नदीवरचा पूल लागतो. हा पूल ओलांडाल्यावर वीज निर्मिती केंद्राच्या बाजूने रस्ता धबधब्याकडे जातो. गाड्यांसाठी पार्किंग आहे तेथुन कच्च्या रस्त्याने आणि पुढे पाउलवाटेने १५ मिनिटे चालल्यावर आपण धबधब्यापाशी पोहोचतो. हा धबधबा बार्शानगड धबधब्या पेक्षा सुंदर आणि मोठा आहे. धबधब्या जवळ उभ राहून त्याच नितळ , थंड पाणी थेट अंगावर घेता येत

Rupi Raila waterfall


Plembeous Water Redstart

या ठिकाणी मला Plembeous Water Redstart या निळ्या रंगाच्या छोट्या पक्षाची सुंदर छायाचित्र मिळाली. घरटं बांधण्यासाठी तो काड्या जमा करत होता. मनाजोगी काडी सापडल्यावर आणि  ती घरट्यात रचून आल्यावर तो धबधब्या जवळील पाण्यात असणार्‍या एका मोठ्या खडकावर जाऊन बसत होता. शत्रुला घरट्याचा सहजासहजी पत्ता लागू नये यासाठी पक्षी थेट घरट्यात न जाता मध्ये एखादा थांबा घेतात. हि त्यांची नेहमीची जागा असल्याने तो पक्षी निर्धास्त होता आणि मला मनसोक्त छायाचित्र मिळाली.



रुपी रैला धबधबा पाहून जुळे मनोरे (Twin Towers) पाहाण्यासाठी गाडीने पुढे निघालोवळणावळणांचा रस्ता डोंगरावर चढत होतासमोरच्या डोंगरावर वेगवेगळ्या उंचीवर  घर दिसत होतीतिथे पोहोचणार्‍या दुर्गम पायवाटा पाहाता ही घर बांधण्यासाठी सामान कसे नेत असतील आणि जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी रोज किती पायपीट करावी लागत असेल.  त्यातली काही एकेकेटी घर आणि डोंगर उतारावर केलेली शेती अशक्य जागी होती

दुर्गम जागेवरील घर , शेत

अशाच एका घराचे छायाचित्र घेण्यासाठी गाडी थांबवलीमाझ्या बरोबर गाडीचा चालकही बाहेर आलात्याला मला पडलेले प्रश्न विचारल्यावर तो म्हणाला, "पहाडातल्या लोकांना त्याची  सवय असतेएखादा झरा बघून अशी घर आणि शेती केली जातेमुळात गरजा कमी असल्याने फ़ार खाली शहरात जास्त वेळ जायचा प्रश्न येत नाहीकधी कधी मात्र अशा अडनिड्याधोकादायक जागी मुद्दामहून शेती करताततिथे अफ़ु वगैरे पिक घेतली जातातत्या जागेच्या दुर्गमतेमुळे पोलिस तिथे पोहोचु शकत नाहीतअशाप्रकारे श्रीमंत झालेले काही लोक मला माहिती आहेत".

Rupi raila Twin Towers

                                                                      रुपी रैलाची मधील आजी

खिडक्यांच्या चौकटीवरील नक्षीकाम

 शानगडहून रोपाला जेवढ उतरलो त्याच्या दुप्पट वर चढत होतो . जिथे थोडीशी सपाटी होती तिथे शेती आणि वस्ती दिसत होती. दूर खाली सैंज नदीवरचा वीज प्रकल्प दिसत होता. धबधब्या पासून १५ किलोमीटरवर मुख्य रस्ता सोडून एक छोटा रस्ता रैला गावातील जुळ्या मनोर्‍यांकडे जातो. जेमतेम एक गाडी जाईल अशा छोट्या रस्त्याने १.५ किलोमीटर गेल्यावर थेट जुळ्या मनोर्‍यांच्या खाली पोहोचलो. रस्त्याच्या कडेला गाडी लावून थोड्या पायर्‍या चढून गेल्यावर दोन मनोर्‍यांच्या मध्ये पोहोचलो. शानगड मध्ये पाहिलेल्या महादेव मंदिरांसारखेच हे मनोरे होते. मनोर्‍यांची दार बंद होती, म्हणुन बाजूला असलेल्या घरात डोकावलो तर एक बाई हातमागावर शाल विणत होती. मनोरे पवित्र स्थळ असल्याने आणि आता धोकादायक स्थितित असल्याने फ़क्त पुजारी आत जातो असे तिने सांगितले. त्यातल्या एक मनोरा दुरुस्त करुन त्याची रंगरंगोटी केलेली होती. तर दुसरा मनोरा धोकादायक स्थितीत होता. या मनोर्‍यांना "ठाकुर की कोठी /धलियारा कोठी" या नावाने ओळखतात. त्याच्या आतील रचना पाहायला मिळाली नाही , त्यामुळे ती राहाण्यासाठी वापरली जात होती की देऊळ होते हे कळले नाहीया कोठीच्या खिडक्यांच्या चौकटीवर नक्षीकाम दिसत होते. खिडक्या बाहेरच्या बाजूला रुंद आणि आतल्या बाजूला निमुळत्या आहेत. या रचनेमुळे थंडीत आत मध्ये उबदार  राहात असावे.


रैलाचे मनोरे बघून पुन्हा रोपा पर्यंत उतरुन दुसरा डोंगर चढून देवरीला (Deohari) पोहोचलो. देवरी हे डोंगर उतारावर असलेले सुंदर गाव आहे. देवरी गावातून १) पुंडरिक ऋषी लेक आणि २) मन्याशी गाव (Manyashi) हे दोन ट्रेक करता येतातदोन्ही ट्रेक रुट एकमेकांच्या विरुध्द बाजूला आहेत . मन्याशी गाव देवरी वरुन आपल्याला वरच्या बाजूला दिसत असते. तिथे जाण्यासाठी शेताच्या बांधावरुन ,सफ़रचंदाच्या बागांमधून पायवाट जाते. साधारण अर्धा ते पाऊण तासात आपण मन्याशी गावात पोहोचतो. इथे गावाच्या दोन टोकाला दोन मनोर्‍यांसारखी मंदिर आहेत. या टुमदार गावतून आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो. मन्याशीहुन उतरुन देवरी गावात परत येऊन देवरी ते पुंडरिक ऋषी लेक हा तासभराचा ट्रेक करता येतो. आम्ही दुसर्‍या दिवशी रोपा मधुन हा ट्रेक करणार होतो त्यामुळे शानगडला परत आलो.

जंगली जर्दाळु


चौथ्या दिवशी पुंडरिक ऋषी सरोवर हा ट्रेक करण्यासाठी शानगडहून सकाळची बस पकडून रोपा गाठले. रोपाला  ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कचे गेस्ट हाऊस रस्त्याला लागूनच आहे. या गेस्ट हाऊसच्या बाजूने एक कच्चा रस्ता सराहन गावापर्यंत जातो. पुंडरिक ऋषी सरोवर आणि मंदिर याच गावात आहे. हिमाचल मध्ये फ़िरतांना अनेक छोट्या छोट्या वस्त्यांपर्यंत असे कच्चे रस्ते पंतप्रधान ग्राम सडक योजनेत झालेले दिसत होतेजीप सारखे वाहान या रस्त्यावरुन जाते. ज्या ठिकाणी रस्त्यावर पाणी झिरपते अशा अवघड वळणावरचा थोडासा भाग सिमेंट कॉन्क्रिटने बांधून काढलेला दिसतो. या रस्त्यामुळे या दुर्गम भागात राहाणार्‍या लोकांची चांगली सोय झालेली आहे. रोपाहून कच्च्या रस्त्याने दाट जंगलातून चालत निघालो. डाव्या बाजुला एक ओढा खळखळाट करत वाहात होता . त्या ओढ्या वरचा पुल ओलांडून चढाईला सुरुवात केली. कच्चा रस्ता बनवलेला असला तरी गावातील लोक पायवाटाच वापरत असल्याने त्या ठळक आहेत. त्या पायवाटांनी चढायला सुरुवात केली. सकाळची वेळ असल्याने भरपूर पक्षी दिसत होते. वाटेत पिवळ्या तांबूस रंगाच्या फ़ळांनी लगडलेली झाड दिसत होती. पुढे एका गावाजवळ ते झाड पुन्हा दिसल्यावर गावतल्या लोकांना विचारल. ते जंगली जर्दाळुच झाड होते. आपल्याला बाजारात मिळणार जर्दाळुच फ़ळ मोठ असते हे छोट होते. त्याने झाड हालवल्यावर भरपूर फ़ळ पडली. त्यातली काही खाल्ली. खूप मधुर होती

(या आधी ऑस्ट्रीयातल्या वाचाऊ व्हॅलीत अशी जर्दाळूने लगडलेली झाडं पाहीली होती. (ब्लॉग वाचण्यासाठी लिंकवर टिचकी मारा  https://samantfort.blogspot.com/2020/07/offbeat-austria-wachau-valley.html)





वाटेत एके ठिकाणी सिमेंटने बांधलेली टाकी होतीत्यातून बाहेर आलेल्या लोखंडी पाईप मधुन पाणी वाहात होते. बाजूला पाणी साठवण्याची जूनी लाकडी ढोणी  पडलेली होती. टाकीच्या आत डोकवलो तर आत दगडात खोदलेले पुरातन कुंड होते. त्यात झर्‍याचे पाणी येत होते. पुरातन मार्गावर बनवलेली ही पाणपोई होती. हल्लीच त्यावर छत बनवलेले होत आणि कुण्डातून पाईप काढून बाजूला टाईल्स लावल्या होत्या या सगळ्याचा खर्च फ़क्त (?) ८ लाख रुपये असे तिथे लिहिलेले होते. कुंडात पाणी कुठून येत हा जसा प्रश्न होता तसाच एवढस बांधकाम केल्यावर उरलेला पैसा कुठे झिरपतो हाही अनुत्तरीत प्रश्न होता . 

 

Pundarik Lake trek route

रोपा पासून ५ ते ६ तासात आपण सराहन गावात पोहोचतो. गावात चार कार उभ्या होत्या, आणि बाजूच्या छोट्याश्या मैदानात १०-१५ लोक जमून चर्चा करत होते.  चौकशी केल्यावर कळल की, आता देवरी आणि रोपा दोन्ही कडून कच्चा रस्ता झालेला आहे. पण तो पावसाळ्यात वापरता येत नाही. त्यासाठी पक्का रस्ता लवकर बांधावा असे निवेदन देण्यासाठी ही मिटींग होती. त्यांना पुंडरीक सरोवराची दिशा विचारुन पायवाटेने शेतं ओलांडत थोडेसे चढुन गेलो. शेतं संपल्यावर जंगलाच्या अलिकडे एक घर होत. पायवाट चुकून आम्ही घराजवळ पोहोचलो होतो. व्हराण्ड्यात दोन बायका आणि पुरुष गप्पा मारत बसले होते. त्यांना रस्ता विचारल्यावर त्या पुरुषाने इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला चला मी तुम्हाला सगळा परिसर दाखवून आणतो. त्याच नाव लाला होते. तो देवरी जवळच्या गावात राहातो आणि ट्रेक गाईडच काम करतो. ऑस्ट्रेलियन ग्रुपला घेऊन तो इथे आला होता. त्यातील एक मुलगा २० वर्षापूर्वी त्याच्या आई वडिलांबरोबर या भागात ट्रेकला आला होता. त्या आठवणी पुन्हा जागवण्यासाठी तो परत इथे आला होता. तो ग्रुप आजच परत मनालीला गेल्यामुळे लाला मोकळा होता. त्यामुळे त्याने आम्हाला परिसर दाखवायची जबाबदारी स्वत:हुन घेतली.

 

Pundrik Lake

त्या घराच्या मागून जाणार्‍या पायवाटेने ५ मिनिटे चालल्यावर आम्ही पुंडरीक सरोवराजवळ आलो. तिन्ही बाजूला जंगलांनी वेढलेले डोंगर आणि एका बाजूला गवताळ कुरण, त्यावर चरणारी गुर अस सुंदर दृश्य होत.  कुरणात एका बाजूला पुंडरिक ऋषींच लाकडी छोट मंदिर होत.  सरोवरात गवत माजलेल होत आणि त्यात कोणी उतरु नये यासाठी त्या संपूर्ण सरोवराला कुंपण घालतेल होत.  यात्रेच्या दिवशी फ़क्त सरोवरात स्नानाला जाता येत असे लालाने सांगितले. सरोवराच्या बाजूने जाणार्‍या पायवाटेने आम्ही चालायला सुरुवात केली. लालाने सांगितलेल्या एका दंतकथेनुसार सरोवराच्या ठिकाणी पूर्वी लोक शेती करायचे. एकदा लोक शेतीची काम करत असतांना समोरच्या डोंगरावर एक कुत्रा आला आणि त्याने मनुष्यवाणीत सांगितले की थोड्या वेळात मोठा पाऊस येणार आहे. सर्व लोकांनी इथून निघून जावे. पण कुत्र्य़ाच्या बोलण्याकडे लोकांनी दुर्लक्ष केल. थोड्याच वेळात जोरात पाऊस आला आणि त्याबरोबर डोंगरातून पाण्याचा लोंढा चिखल ,गाळ, राडारोडा घेऊन आला . शेतात काम  करणारे सगळे लोक त्याखाली गाडले गेले. समुद्राची जमिन वर उचलली गेल्यामुळे बनलेल्या ठिसुळ हिमालयात भूस्खलन ही काही नवीन गोष्ट नाही.  पूर्वी कधी काळी इथे घडून गेलेल्या अशाच एखाद्या घटनेची आता दंतकथा झालेली असावी. लाला कडून कथा ऐकता ऐकता आम्ही सरोवराला अर्धी फ़ेरी मारली होती. समोर एक आडवी पायवाट लागली. ही पायवाट थेट शानगडला जाते असे लालाने सांगितले. या वाटेने पुंडरिक लेक ते शानगड अंतर कापायला ६ तास लागतात, वाटेत दोन धबधबे लागतात.  ट्रेकचा विषय निघाल्यावर त्याला या परिसरात कुठे कुठे ट्रेक करता येईल अस विचारल्यावर त्याने   ) समोरच्या डोंगराकडे बोट दाखवून राजथाटी १ दिवसाचा ट्रेक, ) राजथाटी -बुंगा - थिनी  - रोपा हा तीन दिवसाचा ट्रेक आणि  )  शानगड अर्ध्या दिवसाचा ट्रेक करतात असे सांगितले. ट्रेक गाईड , गावात राहाण्याची , जेवणाची सर्व सोय तो करुन देतो.

 

जीजी

Carving Pundarik Temple

Carving on Entrance, Pundrik Mandir

Pundrik Temple

सरोवराच्या बाजूची पायवाट सोडून आम्ही उजव्या बाजूच्या देवदारच्या जंगलात शिरुन वर चढायला सुरुवात केली. थोडे चढून गेल्यावर ब्रम्हा - विष्णुच्या मंदिरा जवळ पोहोचलो. हे मंदिर २० वर्षापूर्वी बांधलेले आहे. मंदिर पाहून पायवाटेने सरोवराच्या विरुध्द बाजूला चालायला सुरुवात केली . थोड्याच वेळात खाली एक छोटस "थाच" (मैदान) दिसायला लागल . त्यात एक लाकडी मंदिर होते. डाव्या बाजूला शाळा होती. शाळेतली मुलमुली थाच मध्ये खेळत होती. थाच मध्ये असलेले मंदिर पुंडरिक ऋषीच होते. लाकडी मंदिरावर अप्रतिम कोरीवकाम होते.  मंदिर वर्षातून ठराविक वेळीच उघडत असल्याने आत जाता आले नाही. मंदिराला प्रदक्षिणा घालून आतल्या कोरीव कामाची छायाचित्र घेतली. मंदिराच्या उजव्या बाजूला थोडे खाली उतरुन गेल्यावर एक नैसर्गिक गुहा आहे. तिथे अनेक झेंडे आणि त्रिशुळं लावलेली होती. इथल्या  देवाच नाव "जीजी" असून त्याला नवस बोलला जातो आणि तो पूर्ण झाला की झेंडे आणि त्रिशुळ अर्पण करतात. या भागातली सगळी ठिकाण बघून झाली होती. परतीचा प्र्वास करुन पुन्हा रोपाला उतरायला २ ते ३ तास लागणार होते. लालाने आम्हाला त्या ऐवजी देवरीला जा असे सांगितले. तिथून ४ वाजताची बस मिळेल. आम्हाला देवरीच्या वाटेला लावून लालाने आमचा निरोप घेतला. आम्ही पाऊण तासात देवरीला पोहोचलो. बसने सैंज आणि तिथून टॅक्सीने शानगड गाठले.  ( देवरीला ११ , २ आणि ४ वाजता बस आहेत त्या सैंज पर्यंत जातात)

      


शानगड आणि परिसर अजूनही टुरिस्ट डेस्टीनेशन न झाल्याने स्थानिक लोक व्यवस्थित माहिती देतात, कुठलीही अपेक्षा न ठेवता मदतही करतातट्रेकही स्थानिकांना माहिती विचारुन करता येतात. कुठेही धोका जाण नाही उलट स्थानिक योग्य माहिती देतात. ट्रेक न करता फक्त आराम , वाचन करण्यासाठी ही शानगड ही उत्तम जागा आहे.  


School near Pundrik Rishi Mandir

शानगड मध्ये राहून शानगड थाच (Medow) , शांग्चुल महादेव मंदिर ,बार्शानगड ( Barshangharh) धबधबा पाहायला गाडीची आवश्यकता नाही. या भागात बसेस कमी असल्यामुळे आजूबाजूची ठिकाण फ़िरण्यासाठी एक दिवस गाडी करावी लागते.

Greay Bushchat करडा गप्पीदास

Russet Sparrow लाल गौरय


शानगड मध्ये दुकानचहाच्या टपर्या किंवा नाश्ता जेवण करण्यासाठी हॉटेल्सखरेदीसाठी दुकान नाहीतत्यामुळे फिरण्या बरोबर खरेदी करणार्‍यांची निराशा होऊ शकते.


जाण्यासाठी :-  चंदीगड  - मनाली रस्त्यावरून चंदीगडहून मनालीच्या दिशेने जाताना, मनालीच्या अलीकडे   ७० किलोमीटर (२ तास)  अंतरावर औट  नावाचे गाव आहे. या  गावाच्या अलीकडे बोगदा आहे. बोगदा  जिथे सुरु होतो त्या ठिकाणी  उजवीकडील  रस्ता सैंज मार्गे शानगडला जातो. इथून शानगड ३४ किलोमीटर अंतरावर आहे. या फाट्यावरुन  सैंजला  जाण्यासाठी जीप आणि बसेस  मिळतात.

 बस :- HRTC च्या बसेस औट, कुलू इत्यादी ठिकाणाहून सैंज पर्यंत जातात. औट टनेल जवळ असलेल्या फाट्यावर त्या थांबतात. पुढे सैंज मधून प्रायाव्हेट टॅक्सी करून शानगड गाठावे  लागते .

औटहुन थेट शानगडला जाण्यासाठी  दिवसातून एकच बस संध्याकाळी ४ वाजता आहे. ही बस शानगडला  ५.४५ पर्यंत पोहोचते. रात्री थांबून सकाळी ७.३० वाजता पुन्हा औटला जाते.

कार / जीप :- दिल्ली, चंदीगडहुन येणाऱ्या बसेस पहाटेच औटला पोहोचतात. त्यावेळी औट टनेल जवळ न उतरता औट गावात उतरून तेथून टॅक्सी करावी. औट ते शानगड १८०० ते २०००/- रुपये भाडे घेतात .

औट टनेल जवळ उतरल्यास तिथे शानगडसाठी शेअर टॅक्सी  ८००/- किंवा पूर्ण टॅक्सी बुक केल्यास १८०० ते २०००/- रुपये भाडे घेतात .

विमानमार्गे :- जवळचा विमानतळ भुंतर ५३ किलोमीटर अंतरावर आहे. भुंटरहुन टॅक्सीने (वरील मार्गने) शानगडला जाता येते.

ट्रेनने :- जवळचे रेल्वे स्टेशन जोगिंदर नगर  शानगड पासून १२३ किलोमीटर अंतरावर आहे. तेथून टॅक्सीने थेट शानगडला जाता येते.  

Golden Emperor 

राहाण्यासाठी :- शानगड मध्ये हळुहळु हॉटेल्स उभी राहात आहेत. सध्या झोस्टेल, होस्टेलीअर, आणि अनेक होम स्टेज शानगड मध्ये आहेत. त्यांची ऑनलाइन बुकींग उपलब्ध आहेतआम्ही ४ दिवस झोस्टेल मध्ये राहिलो होतो. डॉर्मेट्री ते डिलक्स रुम असे पर्याय तिथे आहेत. लोकेशन, जेवण, नाश्ता उत्तम आहे.

 

Beas River ,Aut

खाण्यासाठी :- अनेक स्थानिक लोकांशी गप्पा मारल्यावर कळल की इथला स्थानिक पदार्थ "सिड्डु" आहे. सणासुदीला हा पदार्थ बनवला जातो. हा पदार्थ दोन प्रकारे बनवतात. अक्रोडची पेस्ट घालून किंवा बटाटे घालून. अक्रोड पेस्ट घालून बनवलेला उच्च दर्जाचा समजला जातो. झोस्टेलच्या शेफ़ला आम्ही अक्रोड्चा सिड्डु बनवायला सांगितला , दोन सिड्डु मध्येच आम्ही गार झालो. सिड्डु हा करंजी सारखा दिसतो .बाजरीच्या पिठाच्या करंजीत अक्रोड, आलं, लसूण, मिरची, कोथिंबिर एकत्र करुन मिक्सरला लावून त्याच सारण (स्टफ़िंग) बनवतात, ते या करंजीत भरले जाते. करंजी उकडून घेतात. त्यावर तूप चोपडतात. सिड्डु तिखट चटणी बरोबर खाल्ला जातो. यात वापरले जाणारे सर्व पदार्थ उष्ण आहेत. इथल्या थंड वातावरणात भरपूर कॅलरीज मिळण्यासाठी उपयुक्त आहे.   

 

Siddu सिड्डु

जाण्यासाठी योग्य वेळ :- शानगडला (समुद्र सपाटी पासून उंची :- ६९०० फ़ूट)  वर्षभर जाता येते. एप्रिल ते जुलै हा काळ इथे जाण्यासाठी उत्तम काळ आहे. हिवाळ्यात शानगड आणि आजूबाजूच्या प्रदेशात बर्फ़ पडतो. हा भाग दुर्गम असल्याने आठवड्यातून दोनदा रस्त्यावरचा बर्फ़ साफ़ करणार्‍या सरकारी गाड्या येउन रस्ता मोकळा करतात. त्यानंतरच वाहातुक सुरु होते. तरीही ३१ डिसेंबरला या भागातील हॉटेल्स, होम स्टे हल्ली भरलेले असतात.    

Shangarh

Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5 




Offbeat Chhattisgarh कुटुमसर गुहा (Kutumsar, Limestone Caves in Chhattisgad) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा