त्यावर्षी रक्षाबंधन व १५ ऑगस्टची सुट्टी जोडून आली होती. अशी जोडून सुट्टी आली की आमची पावल कधीही घरात राहात नाहीत. अनेक वर्षापूर्वी लागलेल डोंगर भटकंतीच वेड स्वस्थ बसू देत नाही. त्यात पावसाळा असेल तर मग काही विचारायला नकोच! नेहमीचे गर्दीचे किल्ले नकोत म्हणून आम्ही नगर जिल्ह्य़ातील आडवाटेवरचे कुंजरगड, भैरवगड व पेमगिरी हे तीन किल्ले दोन दिवसात सर करायचे ठरवले. सकाळी प्रचंड पावसातच गडाच्या पायथ्याच्या विहिर गावात उतरलो. विहिर गाव म्हणजे २०-३० घरांची छोटी वस्ती आहे. गावाच्या बाजूने डोंगर उतारावर थोडीशी भातशेती दिसत होती. त्यामागे कुंजरगड एखाद्या महाकाय हत्ती सारखा पसरलेला दिसत होता.
रात्री पासूनच पाऊस दणकून कोसळत होता. वातावरण कुंद व ओलसर झाले होते. अशावेळी गडाची माहिती चोख वाचली असली तरी वाटाड्या सोबत घेणे शहाणपणाच असत, हे अनेक वर्ष डोंगरदर्यात पायपिट केल्यामुळे माहित होत. थोडी शोधाशोध केल्यावर वाटाड्या मिळाला. आम्ही प्रथम चहाची चौकशी केली. तो आम्हाला त्याच्या घरीच चहाला घेऊन गेला. त्याच घर म्हणजे कुडाच्या भिंती असलेली १० फूट * १२ फूटाची झोपडी होती, सतत पडणार्या पावसामुळे छपरावरील नळ्याच्या कौलांवर गवत उगवलेल होत. दरवाजातून वाकून घरात शिरलो. पावसामुळे ७ दिवसापासून गावात लाईट नव्हती, त्यामुळे चुलीच्या अंधूक प्रकाशात शेणाने सारवलेली जमिन, विरूध्द बाजूच्या कोपर्यात असलेली खाट व खोलीत असलेल तुरळक सामान दिसत होत. वाटाड्या भाऊंना दुसरीत जाणारी मुलगी व पाचवीत जाणारा मुलगा होता. दोघांनाही बोलत करेपर्यंत बिनदुधाचा (कोरा) चहा आला. चहा बरोबर आम्ही आणलेला सुका खाऊ सगळ्यांना वाटून खाल्ला. जेवायला परत गावातच येऊ असा विचार करून खायच सामानही बरोबर घेतल नाही. पण धुवाधार पावसाने आणि जोरदार वार्याने आमचे सर्व अंदाज चुकवले. सकाळी ९ वाजता किल्ला चढायला सुरुवात केलेले आम्ही दुपारी ३ वाजता गावात पोहोचलो.
गावात आल्यावर समाज मंदिराच्या आडोशाला कपडे बदलले, तेव्हा जिवात जीव आला. आता आवश्यकता होती एका कडक चहाची व काहीतरी पोटात ढकलण्याची. ओले कपडे , कॅमेरे गाडीत टाकून आपापले डबे घेऊन आम्ही चहा पिण्यासाठी भाऊंच्या घरी दाखल झालो. मुलांची भीड आता चेपली होती. त्यांच्याशी गप्पा मारत डबे खात असतांनाच चहा आला. चहा पिऊन निघण्याच्या बेतात असतांना ताईंनी आम्हाला विचारल," आज रक्षाबंधन आहे अनायासे तुम्ही चार भाऊ माझ्या घरी आला आहात, मी तुम्हाला ओवाळल तर चालेल का ?" या अनपेक्षित प्रश्नामुळे आम्ही आवाक झालो, गोंधळून गेलो. कसा बसा होकार दिला. ताईंनी ताट सजवल, आम्हाला टिळा लावला , राखी बांधली आणि ओवाळल. निरंजनाच्या अंधुकश्या प्रकाशात ताईचा चेहरा ओझरता पाहिला. ओवाळणी झाल्यावर तिथे भयंकर शांतता पसरली. आम्हा चौघांना सतावणारा प्रश्न म्हणजे ओवाळणी काय द्यायची. पावसामुळे पाकीटं सुध्दा गाडीत ठेवलेले. माझ्या डोळ्या समोर लहानपणी पासूनची रक्षाबंधन सरकून गेली. रक्षाबंधन म्हटले की, बहिणी ओवाळणार, मग आई-बाबांनी दिलेल पैशाच पाकीट किंवा गिफ्ट तिला द्यायच म्हणजे समारंभ पार पडला , मग वर्षभर तिच्याची भांडाभांडी-मारामारी केली तरी काही फरक पडत नाही, रक्षण तर बाजूलाच राहिलं. पुढे बहिणी मोठ्या झाल्या आपापल्या सासरी गेल्या, पहिले काही वर्ष उत्साहाने रक्षाबंधनाला त्यांच्याकडे जायचो, आता दोघांनाही वेळ नसल्यामुळे sms टाकला तरी काम भागत. या आठवणींनी माझ्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. अंधाराचा फायदा घेऊन चेहर्यावरचे भाव न दाखवता "निघतो" एवढेच शब्द उच्चारून आम्ही घराच्या बाहेर पडलो. गाडीजवळ आल्यावर आम्ही सर्वांनी दिर्घ निश्वास सोडला, सॅक मधून पाकीट बाहेर काढली व ओवाळणीची रक्कम गोळा करून ताईला देऊन आलो, तेव्हा कुठे आम्हाला सुटल्यासारख वाटल. शहरात वाढलेल्या आमच्या मनाला अशी अकृत्रीम, कुठलीही अपेक्षा नसलेली नाती असतात याचाही विसर पडत चालला आहे याची प्रकर्षाने जाणीव झाली.
या घटनेला आता दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पुन्हा काही विहिर गावात जाण झाल नाही. परत कधी मी विहिर गावात गेलो तरी मला ते घर सापडेल की नाही या बद्दल मी साशंक आहे. मधल्या काळात मोबाईल हरवल्यामुळे भाऊंचा नंबर पण गेला. गेलेल्या काळा बरोबर निरंजनाच्या अंधुकश्या प्रकाशात ओझरता पाहिलेला ताईचा चेहरा पण धुसर झाला आहे. या सर्वात नशीबाने एकच गोष्ट माझ्याकडे शिल्लक आहे ती म्हणजे ताईने बांधलेली राखी. ती मी आजही जपून ठेवली आहे.
या घटनेला आता दोन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. पुन्हा काही विहिर गावात जाण झाल नाही. परत कधी मी विहिर गावात गेलो तरी मला ते घर सापडेल की नाही या बद्दल मी साशंक आहे. मधल्या काळात मोबाईल हरवल्यामुळे भाऊंचा नंबर पण गेला. गेलेल्या काळा बरोबर निरंजनाच्या अंधुकश्या प्रकाशात ओझरता पाहिलेला ताईचा चेहरा पण धुसर झाला आहे. या सर्वात नशीबाने एकच गोष्ट माझ्याकडे शिल्लक आहे ती म्हणजे ताईने बांधलेली राखी. ती मी आजही जपून ठेवली आहे.
सदर लेख "लोकसत्ताच्या" अंकात ’ब्लॉग इट" सदरात प्रसिध्द झाला होता.