तासुबाई डोंगररांगेत असलेल्या वांद्रे, मळेवाडी, पढारवाडी (पदरवाडी) या घाटमाथ्यावरिल गावातून बैलदरा घाट, बैलदरा घाट (पायर्यांची वाट), खेतोबा, कौल्याची धार, नाखिंदा घाट अशा अनेक प्राचिन घाटवाटा पेठ किल्ल्यामार्गे कोकणात उतरतात. पेठ उर्फ़ कोथळीगडाची विस्तिर्ण माची ही कोकणातून आणि घाटावरुन येणार्या मालाची देवाण - घेवाण , खरेदी - विक्री करण्यासाठी बाजारपेठ होती. या व्यापारी मार्गाचे संरक्षण करण्यासाठी कोथळीगडा सारखा सह्याद्रिच्या मुख्य रांगेपासून सुटावलेला, बेलाग किल्ला होता.
प्राचीन व्यापारी मार्ग म्हटला की, त्याचे संरक्षण करण्यासाठी किल्ला, व्यापारी, पांथस्त, जनावरं यांच्यासाठी मार्गावर केलेली पाण्याची सोय, विश्रांतीसाठी लेणी (शैल गृह), वस्तूंच्या देवाण घेवाणीसाठी बाजारपेठ या गोष्टी आवश्यक होत्या. आजच्या नाखिंदा घाटाच्या ट्रेक मध्ये यापैकी कुठल्या गोष्टी दिसतात ते पाहायचे होते व त्याचे GPS Mapping करुन नकाशा बनवायचा होता.
पवनचक्क्या, पढारवाडी |
खंडाळा घाटातल्या वाहातूक कोंडीमुळे पहाटे पढारवाडीत पोहोचलो. धरणाच्या सानिध्यात असल्याने थंडी भरपूर होती. स्लिपिंग बॅगमध्ये शिरुन स्थिरस्थावर होईपर्यंत उठायची वेळ झाली होती. नाश्ता करुन डोंगररांगेवर दिसणार्या पवनचक्क्यांच्या दिशेने चालायला सुरुवात केली. पढारवाडी गाव तीन बाजुंनी डोंगराने वेढलेले असून एका बाजूला धरण आहे. गावातून जाणार्या डांबरी रस्त्याने १० मिनिटे चालल्यावर उजव्या बाजूला पायवाट झाडीत शिरली.
मातृवृक्ष ? |
डोंगर उतारावरील झाडीत मोठ मोठे वृक्ष होते. नुकतेच "Finding
the Mother Tree: Discovering the Wisdom of the Forest" हे "Suzanne Simard" यांचे पुस्तक वाचले होते. अरण्यातील जुन्या जाणत्या विशाल वृक्षांना त्यांनी " मातृवृक्ष " असं नामकरण केले आणि अशा प्रकारचे अनेक वृक्ष अमेरिका आणि कॅनडात शोधून काढले. अनेक पावसाळे, दुष्काळ पाहिलेले हे पुराणवृक्ष म्हणजे जंगलाचा प्राण असतात. प्रकाशसंश्र्लेषणाची प्रचंड क्षमता असलेले हे मातृवृक्ष जमिनीतील कर्ब धरुन ठेवणे, नायट्रोजनचा पुरवठा करणे, पाणी प्रवाही ठेवणे इत्यादी महत्वाची कार्य करुन जंगल नांदत ठेवतात. या वृक्षांच्या मुळावर असलेल्या बुरुशीच्या जाळ्यांनी (Mycorrhizal
network) तरुण आणि लहान झाडांशी संपर्क ठेवतात. त्यांना जीवनसत्व, पाणी इत्यादी पुरवतात. तसेच किडं, हवामान
बदल इत्यादी संकटांची सूचना जमिनी खालील संपर्क यंत्रणे व्दारे (Wood Wide Web) देतात.
(जंगलातील झाडांच्या संपर्क यंत्रणेवर "Fantastic Fungi" ही डॉक्युमेंटरी Netflix वर
आहे.) मातृवृक्षांबद्दल सगळ्यांना माहिती दिल्यावर ट्रेक संपेपर्यंत दिसणारे वेगवेगळे
वृक्ष पाहुन हे या जंगलातले मातृवृक्ष असतील का यावर आम्ही चर्चा करत होतो.
पाण्याची टाकी, पढारवाडी |
पायवाटेने जातांना मध्येच कच्चा रस्ता आडवा आला. पवनचक्क्यांपर्यंत जाण्यासाठी हा रस्ता बनवलेला आहे. इथवर गाडीने येता येत. रस्ता ओलांडल्यावर पायवाट पुन्हा झाडीत शिरली . चढ चढून आम्ही पवनचक्क्यांच्या जवळ पोहोचलो. पवनचक्क्या डोंगराच्या माथ्यावर आहेत. याच पवनचक्क्यांच्या बाजूला डोंगरात एक नेढ आहे, नेढ्याला नाखिंद असेही म्हणतात. या नेढ्यावरुन घाटाला "नाखिंदा घाट" नाव पडल आहे. या पवनचक्क्या आणि नेढ पेठच्या किल्ल्यावरुन स्पष्ट दिसतात.
(नेढ्याबद्दल अधिक माहिती वाचण्याकरीता "निसर्गाचा
अविष्कार चेमेदेव डोंगर आणि बितनगड Offbeat trek to Chemdev & Bitangad" हा
लेख वाचा, लेख वाचण्याकरिता लिंकवर टिचकी मारा https://samantfort.blogspot.com/2019/11/blog-post.html)
डोंगरमाथा ओलांडून पवनचक्कीच्या बाजूने खाली उतरल्यावर पाण्याची चार टाकी दिसली. टाक्यांमधल पाणी पिण्यायोग्य नव्हते. टाक्यांजवळ उभे राहिल्यावर खाली दूरवर असणार्या पेठ किल्ल्याचे पहिले दर्शन झाले. पायवाट कारवीच्या झुडूपांमधून उतरुन पठारावर आली. लांबलचक पसरलेल्या या पठारावरुन सह्याद्रि आणि कोकणाचा अफ़ाट नजारा दिसत होता. उजव्या बाजूला भिमाशंकर, पदरगड, तुंगी , खालच्या बाजूला खेतोबा दिसत होता. तर डाव्या बाजूला दूरवर ढाकची रांग दिसत होती. समोर खालच्या बाजूला सह्याद्रिच्या मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेला तरिही मुख्य डोंगररांगेला धारेने जोडलेला पेठ उर्फ़ कोथळीगड किल्ला दिसत होता.
पेठ किल्ला |
पठारावरुन डावीकडे चालायला सुरुवात केली . या भागात पठाराच्या खालच्या अंगाला एक टाकं आहे असे साईप्रकाश बेलसरे यांच्या ब्लॉगवर वाचले होते, पण ते टाकं काही आम्हाला सापडल नाही.
पेठ किल्ला, कौल्याची धार , भिमाशंकर डोंगररांग (उजवीकडे) |
पठारावरुन १० मिनिटे चालल्यावर वाट थोडी खाली उतरुन जंगलात शिरली. या वाटेने साधारण पाच मिनिटे चालल्यावर वाटेला एक फ़ाटा फ़ुटला . तिथून सरळ जाणारी वाट कौल्याच्या धारेकडे जात होती, तर खाली उतरणारी वाट नाखिंदा घाटाची होती. कौल्याची धार आणि नाखिंदा घाट दोन्ही वाटा पेठवाडीत उतरतात. आम्ही नाखिंदा घाटाने दाट जंगलातून खाली उतरायला सुरुवात केली. आमच्या डाव्या बाजूला कौल्याची धार आणि आणि त्याचे दोन्ही कातळ टप्पे दिसत होते. साधारणपणे अर्धातास उतरल्यावर उजव्या बाजूला कातळात कोरलेले पाण्याचे एक टाकं दिसले. हे टाकं सध्या कोरडं पडलेल आहे. या मार्गावर सुरवाती पासून दिसणारी पाण्याची टाकी या व्यापारी मार्गाचे प्राचीनत्व सिध्द करत होती. पाण्याच्या टाक्याजवळ थोडावेळ विश्रांती घेऊन पुढचा टप्पा उतरायला सुरुवात केली.
पाण्याची टाकी, नाखिंदा घाट |
उतार संपून पेठच्या किल्ल्याच्या पदरात आल्यावर वाट छान वळसे घेत पेठवाडी जवळ आली. इथे शेताच्या बांधावर एक दगडी समाधी पाहायला मिळाली.
(समाधी बद्दल अधिक माहिती वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा (https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html )
समाधी |
कातळात कोरलेला पायर्या |
पेठ किल्ल्याचा माथा म्हणजे डोंगरावर असलेली कातळटोपी आहे. यात लेणी , पाण्याची टाकी आणि पेठच्या किल्ल्याचे वैशिष्ट्य असलेल्या, गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात कोरलेला पायर्या आहेत. पायर्या चढून गडमाथ्यावर पोहोचण्या अगोदर कातळात कोरलेले एक प्रवेशव्दार आहे. किल्ल्याला या शिवाय दोन उध्वस्त प्रवेशव्दार आहेत. गडमाथ्यावर पाण्याच एक छोट तळ आहे. गडमाथ्यावरुन सर्व घाटवाटा आणि भिमाशंकर ते ढाक पर्यंतचा विस्तृत परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. यावरुन किल्ल्याचे स्थान किती मोक्याचे (महत्वाचे) आहे ते लक्षात येते. या कातळ टोपीला खालच्या बाजूने प्रदक्षिणा घालता येते . यामार्गावर पाण्याची टाकी आहेत. तसेच टेहळणीसाठी खोदेलेली एक गुहा पण आहे. पेठ माची वरुन गडमाथ्यावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.
पायवाट, डुक्कर पाडा |
चिल्हार नदी |
शूर्पारक, कल्याण या बंदरातून आणि कान्हेरी सारख्या
धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणावरून कार्ले - भाजे या ठिकाणी जाणाऱ्या व्यापारी मार्गावरील
विश्रांतीचे ठिकाण म्हणून हे लेणे चौथ्या शतकाच्या सुमारास खोदण्यात आले होते. पेठ
किल्ला आणि बाजारपेठही याच व्यापारी मार्गावर आहे.
आंबिवली लेणी |
लेण्याचा परिसर फार सुंदर आहे लेण्या समोरून खालच्या बाजूला एक सुंदर वळण घेऊन चिल्हार नदी वाहते. त्यावर एक बंधारा असून तेथे नदीत उतरण्यासाठी प्रशस्त पायऱ्या ही बांधल्या आहेत. लेण्यांतून समोर भीमाशंकर डोंगररांग आणि त्यातील तुंगी, पदरगड हे किल्ले दिसतात. अशा रम्य ठिकाणी हे लेणे खोदलेले आहे. लेण्यासमोर मोठे प्रांगण आहे. लेण्याचे व्हरांडा आणि दालन असे दोन भाग आहेत. व्हरांडा चार खांबांवर तोललेला असून त्यातील दोन खांब अष्टकोनी आणि दोन खांब सोळा कोनी आहेत. या खांबांचे स्तंभशीर्ष उलट्या ठेवलेल्या घटा सारखे आहेत. त्यावर हर्मिके सारखी रचना आहे. व्हरांड्यात दोन बाजूला दोन दगडी बाकडे आहेत.
टाकं, आंबिवली लेणी |
व्हरांड्यातून आतील दालनात जाण्यासाठी दोन दरवाजे
आहेत. पण त्यातील एक दरवाजा जाळी लावून बंद करण्यात आला आहे. आतील दालन प्रशस्त असून
त्याच्या तीन बाजूंच्या भिंती प्रत्येकी चार खोल्या अशा एकूण बारा खोल्या खोदलेल्या
आहेत. सध्या यापैकी काही खोल्यांमध्ये गणपती, श्रीकृष्ण इत्यादी देवतांच्या मूर्ती
ठेवलेल्या आहेत. लेण्याच्या उजव्या बाजूला थोड्या वरच्या बाजूस पाण्याची दोन टाकी खोदलेली आहेत. त्यातील एका टाक्यात बारमाही
पाणी असते.
बारव, कोठिंबे |
दगडी ढोणी |
GPS ने रेकॉर्ड केलेली व्यापारी मार्गाची भटकंती, नकाशा :- महेंद्र गोवेकर |
पढारवाडीच्या डोंगरावर असलेली पाण्याची टाकी - नाखिंदा घाटातील पाण्याची टाकी - व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी असलेला पेठ किल्ला - आंबिवली लेणी (शैलगृह) व्यापार्यांसाठी असलेले विश्रांती स्थान - कोठिंब्याची बारव या प्राचीन व्यापारी मार्गावरील महत्वाच्या खुणांची नोंद घेत आजच्या ट्रेकची सांगता झाली.
जाण्यासाठी :-
पढारवाडी :- तळेगाव MIDC तून पढारवाडीला जाणारा रस्ता आहे. अंतर अंदाजे ५० किलोमीटर आहे
डुक्करपाडा (देवाचा पाडा) जामरुंग :- कर्जत रेल्वे स्टेशन ते डुक्करपाडा हे अंतर अंदाजे ३० किलोमीटर आहे. (आंबिवलीच्या पुढे ५ किलोमीटर) कर्जतहून डुक्करपाड्याकरीता टॅक्सी मिळतात. डुककरपाड्यात "रिच फ़िल्ड" नावाची बंगल्यांची कॉलनी आहे. या कॉलनीतून गडावर जाणारी पायवाट आहे.
पढारवाडी ते पवचक्की - अर्धातास
पवनचक्की ते नाखिंदा घाट १५ मिनिटे
नाखिंदा घाट ते पेठ माची सव्वा तास
पेठ माची ते गडमाथा अर्धा तास
पेठ माची ते डुक्करपाडा पाऊण तास
घाटवाटांवरिल इतर ब्लॉग :-
डुक्करपाडा वाटेवरुन, पेठ किल्ला |
Photos by :- Amit Samant, Mahendra Govekar, Ketaki Mahajan © Copy right
Map :- Mahendra Govekar © Copy right
खूप छान माहिती दिली आहे. महेंद्रने आखलेला नकाशा पण उपयुक्त आहे.
ReplyDeleteमस्त मार्गदर्शक लेख. तसेच वेळोवेळी संदर्भांची दिलेली लिंक उपयुक्त ठरते
ReplyDeleteखुप छान माहिती
ReplyDeleteअमित, तुझ्या प्रत्येक ब्लाॅगमुळे काहीतरी नवीन ज्ञानाची भर पडते. या ब्लाॅग मध्ये मातृवृक्षाची संकल्पना ज्ञात झाली. तुझे अभ्यासपूर्ण अवांतर वाचन आणि त्यातील माहितीचा समन्वय साधत डोळसपणे केलेली भटकंती ह्यामुळे तुझ्या लेखनाला वेगळे परिमाण लाभते!
ReplyDeleteअतिशय उपयुक्त आणि अमूल्य माहिती
ReplyDeleteअत्यन्त् उपयुक्त महिति
Deleteमाहितीपूर्ण लेख
ReplyDeleteअतिशय सुंदर माहिती अमित दादा. त्याकाळी असणारा व्यापारी मार्ग अगदी जिवंत झाला शिवाय डुक्करपाड्यावरुन जाणारी किल्ल्याची नवीन वाट कळली.
ReplyDeleteअतिशय सुंदर माहिती दिली आहे. इतिहासातील अनेक खुणा उत्कृष्टरित्या मांडल्या आहेत. अनेक भटक्यांना या ब्लॉगचं नक्कीच उपयोग होईल. 👍
ReplyDeleteअमित दादा, वर्णनामुळे मार्ग डोळ्यासमोर उभा राहिला. नवीन घाटामध्ये फिरवून आणल्याबद्दल धन्यवाद...
ReplyDeleteखूपच सुंदर लेखणी....
ReplyDeleteसुंदर लेखाटन, काही नवीन ज्ञानाची भर पडली मातृवृक्ष ही संकल्पना ज्ञात झाली
ReplyDeleteसुंदर
छानच लिखाण
ReplyDeleteनेहमीप्रमाणे उत्तम आणि माहितीपूर्ण लेख आणि सगळे फोटोही झकासच 😊👍
ReplyDeleteलेख नेहमी प्रमाणे छान. वर्णन वाचताना ट्रेक अनुभवल्याचा आनंद मिळतो. मातृवृक्ष, नकाशा व इतर छायाचित्र मस्तच... 👌🏼😊
ReplyDeleteलेख नेहमीप्रमाणेच उत्तम, अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण..
ReplyDeleteलेख नवख्या भटक्यांना मार्गदर्शन करणारा आहे. वेगवेगळ्या पायवाटा चालताना, अभ्यासपूर्ण नजर कशी ठेवावी हे सांगून जातं. मातृ वृक्षांबद्दल लिहिल्यामुळे पुढे जंगल भटक्यांची नजर नक्कीच शोधक बनवणारी आहे. मस्त. अभ्यासपूर्ण लेख आहे.
ReplyDelete