Monday, December 24, 2018

दक्षिण गुजरात मधील किल्ले (Forts in South Gujrat)


दक्षिण गुजरात मधल्या वापी - दमण भागात ६ किल्ले आहेत. मुंबईहून एका दिवसात हे सहा किल्ले पाहून परत येता येते. दक्षिण गुजरात प्रांत महाराष्ट्रातील ठाणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्याने वेढलेला आहे. डांग जिल्ह्यातील घनदाट अरण्यांचा पर्वतीय प्रदेश ते पश्चिम किनार्‍यावरील सुरत, दमण सारखी बंदरे या टापूत दक्षिण गुजरात वसलेला आहे. प्राचिन काळापासून अनेक व्यापारी मार्ग महाराष्ट्रातील बाजारपेठांपासून दक्षिण गुजरात मधील बंदरापर्यंत जात होते. प्राचीन काळी (इसवीसन ९६० ते १२४३) चालुक्यांच्या राजवटीत गुजरातचा परदेशांशी व्यापार भरभराटीला आला होता. इसवीसन १५०९ मध्ये दिव येथे झालेल्या लढाईतील विजया नंतर पोर्तूगिजांनी दमण, सिल्व्हासा या दक्षिण गुजरात मधील भागात आपले बस्तान बसवले. मध्ययुगात सुरत बंदर भरभराटीला आले होते. पोर्तुगिज, इंग्रज ,डच, फ़्रेंच इत्यादी व्यापार्‍यांनी याठिकाणी आपल्या वखारी टाकल्या होत्या. अशा प्राचीन काळापासून गजबजलेल्या या व्यापारी मार्गाच्या आणि बंदरांच्या टेहळणीसाठी तसेच संरक्षणासाठी वेगवेगळ्या राजवटीत किल्ले बांधले गेले. 

यातलेच सहा किल्ले पाहण्यासाठी सकाळीच मुंबईहून ट्रेनने वापी गाठावे. वापीहून खाजगी गाडी केल्यास हे सहा किल्ले व्यवस्थित पाहाता येतात. मुंबईहून खाजगी गाडीनेही हे सर्व किल्ले एका दिवसात पाहाता येतात.
     
Entrance Gate of  Parnera Fort

पारनेरा किल्ला (Parnera Fort) :- वापी - सुरत रेल्वेमार्गावर अतुल नावचे स्टेशन आहे. वापीहुन पॅसेंजर ट्रेनने अतुलला जाता येते. अतुल स्थानकातून किल्ल्याचा डोंगर दिसतो. अतुल स्थानक ते किल्ला अंतर २.५ किलोमीटर आहे. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत रिक्षाने किंवा चालत जाता येते. रस्त्याने गेल्यास मुंबई - अहमदाबाद महामार्गावर वापीपासून २५ किलोमीटरवर पारनेरा किल्ल्याचा पायथा आहे. अतुल या कंपनीची खाजगी मालमत्ता असल्याचा बोर्ड किल्ल्याच्या पायथ्याशी लावलेला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. तसेच किल्ल्याच्या उतारावर झाडी जोपासलेली आहे. किल्ल्यावर तीन मंदिरे असल्याने येथे भाविकांची कायम वर्दळ असते. किल्ल्याची उंची ४०० फ़ूट आहे. पायथ्यापासून साधारणपणे अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या माथ्यावरील तटबंदी जवळ पोहोचतो. तटबंदी फ़ोडून किल्ल्यात जाण्याचा मार्ग केलेला आहे. त्या मार्गाने किल्ल्यात न जाता उजवीकडे जाणार्‍या पायवाटेने तटबंदीला वळसा घातल्यावर आपण ६ फ़ूट उंच प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार बुरुजांमध्ये लपवलेले आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर साधारणपणे १० पायर्‍या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. समोरच गडची रुंदी व्यापणारे कालिकामातेचे मंदिर बांधलेले आहे. जवळच हार, फ़ुले, प्रसाद विकणारी काही दुकाने आहेत. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला आहे. माची आणि बालेकिल्ला असे किल्ल्याचे दोन भाग आहेत. दोन्ही भाग तटबंदी आणि बुरुजांनी संरक्षित केलेले आहेत.


Bastion & fortification of Parnera Fort

कालिकामाता मंदिराच्या गाभार्‍याच्या बाजूने गडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा अस्तित्वात नाही. बालेकिल्ल्यावर अनेक उध्वस्त वास्तू पाहायला मिळतात. बालेकिल्ल्यावरुन आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश दिसतो. किल्ल्याच्या जवळून वाहाणार्‍या पार नदीचे पात्रही दूरपर्यंत दिसते. या भागात हा एकमेव डोंगर असल्यामुळे टेहळणीच्या आणि संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्याचे स्थान किती महत्वाचे होते ते लक्षात येते.     

Water Tank on Parnera Fort

या डोंगरावर नक्की किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. पण किल्ल्यावरील टाक्यांची रचना पाहाता चालूक्यांच्या काळात या किल्लाची उभारणी झाली असावी. त्यानंतर पंधराव्या शतकात हा किल्ला रामनगरच्या राजाच्या ताब्यात होता. मोहमद बेगाडाने हा किल्ला जिंकून घेतला. बेगाडाच्या अंतिम काळात या किल्ल्याचा ताबा पेंढारींकडे गेला. त्यावेळी १५५१ मध्ये दोनदा दमणच्या पोर्तुगिजांनी या किल्ल्यावर हल्ला केला. त्यानंतर हा किल्ला ओस पडला. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६७६ मध्ये हा किल्ला नव्याने बांधून काढला. त्यानंतर हा किला १७८० पर्यंत मराठ्यांच्या ताब्यात होता. त्यानंतर वेल्सने हा किल्ला जिंकून घेतला.


Chandika Mata Mandir, Parnera Fort

बालेकिल्ल्या वरील वास्तू पाहात आपण चंडीका माता मंदिरापाशी खाली उतरतो. याठिकाणी चंडीका मातेचे आणि हनुमानाचे मंदिर आहे. सर्वत्र संगमरवर आणि पेव्हर ब्लॉक बसवलेले आहेत. मंदिराच्या पुढे गेल्यावर डाव्या बाजूस चांदपीर बाबाचा दर्गा आहे. इथे किल्ल्याचे दुसरे प्रवेशव्दार आणि तिथून खाली उतरणारी पायवाट आहे. दर्गा पाहून पुढे गेल्यावर रामेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी जेथे पायर्‍या आहेत त्या ठिकाणी तीन मोठ्या तोफ़ा बेवारस पडलेल्या आहेत. या किल्ल्याचे अतुल कंपनी आणि मंदिराच्या ट्रस्टने कॉंक्रीटीकरण करुन टाकले आहे. एवढा खर्च केला आहे त्यात ३ चौथरे बांधून हा तोफ़ांचा ऐतिहासिक ठेवा व्यवस्थित ठेवता आला असता. रामेश्वर मंदिर हे किल्ल्याचे उत्तर टोक आहे. ते पाहून पुन्हा माघारी फ़िरुन चंडीकामाता मंदिराच्या बाजूने चालत निघाल्यावर डाव्या बाजूला कातळात खोदलेली ५ पाण्याची टाक आहेत. या टाक्यांच्या बाजूला कॉंक्रीटचे खांब उभारुन पूल बांधलेला आहे. या पुलावरुन आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ला पाहायला अर्धा तास पुरतो.


Cannons on Parnera Fort

पारनेरा किल्ला उतरुन १ किलोमीटर चालत मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गेल्यावर पारडी गावासाठी रिक्षा मिळतात. खाजगी वहानाने थेट पारडी गावातील किल्ल्यापर्यंत जाता येते. पारनेरा ते पारडी अंतर ७ किलोमीटर आहे.


Chhatrapati Shivaji Maharaj Statue at Pardi Fort, Gujrat

पारडी किल्ला (Pardi Fort) :- पारडी गावातील भरवस्तीत पोस्ट ऑफ़ीसच्या इमारती मागे एका छोट्या टेकडा वरती पारडी किल्ला आहे. या टेकडीच्या खालून वहाणार्‍या पार नदीवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. किल्ल्यापाशी पोहोचलो आणि आश्चर्याचा धक्का बसला. किल्ल्या जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला होता.


Bastion on Pardi Fort, Gujrat

इसवीसन १६६४ मध्ये छ.शिवाजी महाराजांनी प्रथम सुरत लुटली. मोगलांच्या संपन्न बंदराची पार रया गेली. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांच्या हल्ल्याच्या अफ़वा उठतच होत्या. इसवीसन १६७० मध्ये छ.शिवाजी महाराजांनी सुरत दुसर्‍यांदा लुटली. त्यानंतर सुरतची होती नव्हती ती पत पण गेली. सुरतेचा व्यापार खालावला. छ.शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत सुरतेवर हल्ला होणार अशा अफ़वा अधूनमधून उठत होत्या. त्यामुळे अनेक व्यापार्‍यांनी स्थलांतर केले. सुरत बंदरातून होणारा व्यापार थंडावला होता. सुरतेवरच्या हल्ल्याने छ.शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेली मोगल साम्राज्याची आर्थिक नाकेबंदी झाली होती.


Pardi Fort Gujrat
Pardi Fort Gujrat

पारडी किल्ल्यात काळानुरुप अनेक बदल झाले आहेत. किल्ल्यात शिरताना प्रवेशव्दाराच्या डाव्या बाजूला भव्य अष्टकोनी बुरुज आहे. किल्ल्याचे प्रवेशव्दार नव्याने बांधलेले आहे. किल्ल्यात प्रवेश केल्यावर बुरुज पाहून पायर्‍या चढून गेल्यावर डाव्या बाजूला पीर आहे. अजून थोड्या पायर्‍या चढल्यावर डाव्या बाजूला कैद्यांसाठी असलेल्या बॅरॅक्स दिसतात. इंग्रजांच्या काळात किल्ल्याचे रुपांतर जेल मध्ये झाले होते. तर उजव्या बाजूला उध्वस्त वास्तू आहेत. हे पाहून पुढे गेल्यावर किल्ल्यावर असलेल्या पाण्यांच्या टाक्यांपाशी पोहोचतो. पारडी गावाला पाणी पुरवण्यासाठी ह्या टाक्या बांधलेल्या आहेत. हा किल्ल्याचा सर्वोच्च भाग आहे. किल्ला पाहून परत हायवे पर्यंत चालत येऊन बागवाडा गावातला अर्जूनगड गाठावा. पारडी ते अर्जूनगड अंतर १२ किलोमीटर आहे. मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील टोल नाका ओलांडल्या रेल्वे लाईन क्रॉस करुन बागवाडा गावात पोहोचता येत. गावाच्या मागे एक झाडांनी झाकलेली टेकडी दिसते. तोच अर्जूनगड आहे.

Bastion on Arjungad, Gujrat

अर्जुनगड (Arjungad) :- एका दंतकथे नुसार अर्जुनाने या ठिकाणीहून सुभद्राहरण केले म्हणून या किल्ल्याचे नाव अर्जूनगड पडले. चिमाजी आप्पांनी हा किल्ला बांधला असे म्हणतात. काही काळ हा किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात होता. अर्जूनगडावर महालक्ष्मीचे देऊळ आहे. त्यामुळे गडावर जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. पायर्‍यांच्या मार्गाने एक मोठ्या बुरुजाला वळासा घालून १० मिनिटात आपण प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. किल्ल्याचे प्रवेशव्दार पूर्वाभिमुख आहे. प्रवेशव्दार, तटबंदी आणि किल्ल्याचे बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर किल्ल्याचा छोटा घेर दिसतो. किल्ल्याच्या मधोमध महालक्ष्मीचे मंदिर आहे. त्याच्या बाजूला पाण्याचे मोठे टाक आहे. किल्ल्याच्या तटबंदीत ६ बुरुज आहेत. तटबंदी वरुन फ़िरताना दक्षिणेकडे कोलाक नदी दिसते. किल्ला फ़िरायला १० मिनिटे पुरतात.

Temple On Arjungad, Gujrat

Water Tank on Arjungad, Gujrat

Kolak River From Arjungad, Gujrat

अर्जूनगड पाहून झाल्यावर इंद्रगडाकडे मोर्चा वळवावा. अर्जुनगड ते इंद्रगडच्या पायथ्याचे पाली करंबेली गावाचे अंतर २३ किलोमीटर आहे. या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. मंदिरा पासून एक कच्चा रस्ता इंद्रगडावर जातो. या रस्त्याने इंद्रगडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

Fortification & Water tank on Indragad

Indragad, Gujrat

इंद्रगड (Indragad):-  गडाच्या डोंगरावर भरपूर झाडे असल्याने गड चढतांना उन्हाचा त्रास होत नाही. गडाच्या तटबंदीला लागून चेडू मातेचे मंदिर बांधलेले आहे. त्यात एक साधू राहातो. या गडाचे प्रवेशव्दार एका अर्धवर्तुळाकार भिंतीमागे लपवलेले आहे. प्रवेशव्दारावर थेट हल्ला करता येऊ नये यासाठी अशाप्रकारे भिंतीची रचना केलेली आहे. या भिंतीत जंग्या आहेत. किल्ल्याचे प्रवेशव्दार शाबूत आहे. पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्‍यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्याच्या आत अनेक इमारतींचे अवशेष आहेत. तटबंदीत आणि बुरुजा खाली खोल्या आहेत. एक पाण्याची टाकी आहे. किल्ल्याच्या उत्तरेला एक दरवाजा आहे. या प्रवेशव्दारासमोर सुध्दा संरक्षणासाठी भिंत बांधलेली आहे. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज बर्‍यापैकी सुस्थितीत आहेत. त्यावरुन किल्ल्याला प्रदिक्षिणा मारता येते. किल्ल्यावरुन दरोथा आणि दमणगंगा या नद्यांची खोरी दिसतात. या परिसरातला हा सर्वात उंच डोंगर असल्याने खूप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.

Entrance Gate , Indragad
African Baobab (गोरखचिंच)

इंद्रगड पाहून झाल्यावर दमणगंगा नदीच्या मुखावर असलेले दोन किल्ले मोटी दमण किल्ला आणि नानी दमण (सेंट जेरोम फ़ोर्ट) हे दोन किल्ले पाहाण्यासाठी पाली करंबेली ते मोटी दमन किल्ला हे ६ किलोमीटरचे अंतर कापावे लागते.

Entrance gate of Moti Daman Fort

Trench around Moti Daman Fort

मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort):- दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावर मोटी दमण किल्ला आहे. नानी दमण आणि मोटी दमन या दोन किल्ल्यामध्ये मोटी दमण किल्ला आकाराने मोठा आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. भारत स्वतंत्र झाल्यावर इसवीसन १९६१ मध्ये हा किल्ला भारताच्या ताब्यात आला. सध्या या किल्ल्यात दमण मधली सर्व सरकारी ऑफ़ीसेस आहेत. किल्ल्यात एक लाईट हाऊस आहे. किल्ल्याची प्रवेशव्दारे, तटबंदी, बुरुज आणि किल्ल्याच्या बाहेरील खंदक सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे. किल्ल्याला पोर्तुगिज शैलीतील १० पंचकोनी बुरुज आहेत. बुरुजांवर आणि तटबंदीवर पोर्तुगिज बांधणीची खासियत असलेले कॅप्सुल बुरुज आहेत. किल्ल्याला उतरेला आणि दक्षिणेला अशी दोन प्रवेशव्दारे आहेत. प्रवेशव्दारांवर शिलालेख आणि कोट ऑफ़ आर्म कोरलेले आहेत. किल्ल्यात बॉम जिजस चर्च नावाचे चर्च आहे या चर्च मधील लाकडावर केलेले कोरीवकाम पाहाण्यासारखे आहे. मोटी दमण किल्ल्याच्या समोरील किनार्‍यावर नानी दमण किल्ला आहे. मोटी दमण किल्ल्यातून बाहेर पडून दमणगंगा नदीवरील पूल ओलांडून नानी दमण किल्ल्यात जाता येते.

Carving on wood, Church of Bom Jejus

Carving on wood, Church of Bom Jejus

नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) :- दमणगंगा नदीच्या उत्तर तीरावर नानी दमण किल्ला आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. सध्या या किल्ल्यात शाळा आणि चर्च  आहे. किल्ल्याच्या दमण गंगा नदीकडील दरवाजाने आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दारांवर शिलालेख आणि कोट ऑफ़ आर्म कोरलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला तटबंदीला लागून असलेल्या फ़ांजीवर चढून जावे. फ़ांजीवरुन संपूर्ण किल्ला फ़िरता येतो. किल्ल्याला ३ बाणांच्या आकाराचे बुरुज आहेत. किल्ल्याला पूर्वेला मुख्य प्रवेशव्दार आहे. फ़ांजीवरुन प्रवेशव्दारा पर्यंत उतरण्यासाठी जीना आहे. किल्ल्याच्या या प्रवेशव्दाराच्या बाजूला एक छोटे प्रवेशव्दार आहे. त्याच्या बाजूला किल्ल्या वरची शाळा आणि चर्च आहे. किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावर झेंडा लावण्यासाठी असलेला लाकडी खांब आहे. किल्ला पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो.

Entrance gate, Nani Daman Fort

St. Jerom Fort (Nani Daman Fort)

Fortification, Nani Daman Fort

दमण मधले हे दोन्ही किल्ले पाहून झाल्यावर १३ किलोमीटरवरील वापी रेल्वे स्टेशन गाठल्यावर आपली ६ किल्ल्यांची भटकंती पूर्ण होते. वापी - पारनेरा किल्ला - पारडी किल्ला - अर्जुनगड - इंद्रगड - मोटी दमण किल्ला - नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) हे अंतर ८५ किलोमीटर आहे. वापीमध्ये ८ तासासाठी , ८० किलोमीटर अंतरासाठी खाजगी गाडी मिळते. या गाडीने सर्व किल्ले एका दिवसात आरामात पाहून होतात. जर मुंबईहून खाजगी गाडी घेऊन येणार असल्यास महाराष्ट्रातला शेवटचा किल्ला बल्लाळगडही पाहून होतो.     

Nani Daman Fort


#fortsinsouthgujrath#onedaytreknearmumbai#indragad#arjungad#pardifort#motidamanfort#nanidamanfort#

13 comments:

  1. माझं दुर्दैव मी याच काळात वापीत नव्हतो अन्यथा हा प्रवास आपण एकत्रच केला असता
    Anyways दमणचे दोन आणि पारनेरा किल्ला सोडून इतर किल्ले मीही पाहिलेले नाहीत वेळ होईल संधी मिळेल तेव्हा नक्कीच पाहीन
    तुझं लिखाण आणि इतर माहिती नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण आणि उत्तम

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणे छान लिहिलयस, असे इतिहासाची साक्ष असलेले छोटे मोठे पण फारसे माहित नसलेले किती किल्ले असतील नाही

    सुधीर कोकाटे

    ReplyDelete
  3. फार छान च अमित दा ..... आम्हाला तर माहित पण न्हवते... तुझ्यामुळे नवीन नवीन माहिती मिळत आहे... धन्यवाद.

    ReplyDelete
  4. खुप छान जुन्या इतिहासाची माहिती मिळाली

    ReplyDelete
  5. खुप छान जुन्या इतिहासाची माहिती मिळाली

    ReplyDelete
  6. खुप कामाची माहिती दिली।धन्यवाद।

    ReplyDelete
  7. अमित दादा तु ट्रेक ला सोबत असताना जेवढी छान माहिती देतोस तेवढंच तुझ्या लिखाणातून त्या जागेचा बसल्या ठिकाणी ट्रेक केल्या सारखा वाटत.

    ReplyDelete
  8. नेहमीप्रमाणे सुंदर माहिती आणि लेखन. तुझ्या (की तुम्हा तिघांच्या) भटकंतीचे कौतुक वाटतं. याला passion म्हणतात...

    ReplyDelete
  9. Excellent information, I was going to Daman for nearly 15/16 years but did not know that there are so many forts nerby .
    Thanks for giving us such interesting information.
    Keep it up
    Ashok Oke

    ReplyDelete