Wednesday, November 29, 2017

टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला आणि विठठल मंदिर, जामगावचा किल्ला आणि पारनेरचे सोमेश्वर मंदिर (Takali Dhokeshwar, Palashi Fort , Jamgaon Fort & Someshwar Temple , Parner, Dist. Ahmednagar)


सप्तमातृका, टाकळी ढोकेश्वरची लेणी

ऑक्टोबर महिना सुरु झाला की, ऑक्टोबर हिटमुळे एक महिना ट्रेकना विश्रांती असते. पण भटकंतीच वेड काही घरी स्वस्थ बसू देत नाही. या ऑक्टोबर मध्ये एका शनिवारी सकाळी असाच एक झंजावती दौरा काढला. नर जिल्ह्यातील टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला आणि विठठल मंदिर, जामगावचा किल्ला आणि पारनेरचे सोमेश्वर मंदिर अशी चार ठिकाण बघण्याची योजना होती. डोंबिवलीहून एकूण अंतर ५०० किमी पेक्षा जास्त असल्याने सकाळी सहा वाजतच गाडी काढली आणि थेट माळशेज घाटातील बोगद्याच्या पुढे असलेल्या टपरीवर थांबलो. एका मस्त धबधब्याच्या पार्श्वभुमीवर सकाळच्या कोवळ्या उन्हात गरमागरम चहा आणि नाश्ता करुन पुढचा प्रवास चालू केला.

टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी
कल्याण - नगर रस्त्यावर नगरच्या अलिकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याण पासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणार्‍या रस्त्याने गाव पार करुन पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेण्यांपर्यंत जाण्यासाठी पायर्‍या बांधलेल्या आहेत. लेण्यांपासून पाऊण उंचीवर मध्ययुगात बांधलेले प्रवेशव्दार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरुनच लक्ष वेधून घेतात. पायर्‍यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला आहे. पायर्‍या चढतांना प्रवेशव्दाराच्या अलिकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरे आहेत. त्यावर दगडी फ़ुल आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेल आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेंव्हा बांधली असेल तेंव्हा त्याच्या बाजूला हे शरभ शिल्प असणार पण कालांतराने डागडूजी करतांना ते मुळ जागेवरून काढून टाकले असावे. अश्या प्रकारचे नक्षीकाम केलेले दगड पायर्‍या चढतांना पायर्‍यांमध्येही आढळतात.  


टाकळी ढोकेश्वर प्रवेशव्दार 

 टाकळी ढोकेश्वरचे मुख्य लेण प्रशस्त आहे. लेण्यात शिरतांना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वहानांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसर्‍या बाजूला वीरभद्राची मुर्ती कोरलेली आहे. गाभार्‍याच्या दारावर व्दारपाल कोरलेले आहेत. गाभार्‍यात पिंड आणि सभामंडपात नंदी आहे. गाभार्‍या भोवती प्रदक्षिणापथ कोरुन काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ ठेवलेल्या आहेत. एक मोठा नंदी आणि सर्पशिळा येथे ठेवलेल्या आहेत.

लेण्याचा सभामंडप आणि गर्भगृह,टाकळी ढोकेश्वर 


मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाके कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरुन काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या कोरलेल्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे.
पाण्याचे टाके
सीता न्हाणीला जाण्यासाठी दगडातल्या खोबण्या



फ़ुलझाडांची लागवड करुन परीसर सुशोभित केलेला आहे. या ठिकाणाहून दुरवरचा परिसर दिसतो. आम्ही लेण्यांच्या परिसरात आलो तेंव्हा तेथे पांढरा लेंगा सदरा घातलेले आजोबा होते. लेण्यांची साफ़सफ़ाई करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. अशा स्थानिकांशी गप्पा मारल्यावर अनेक नवीन गोष्टी कळतात असा माझा अनुभव आहे. आजोबांशी संवाद साधायचा प्रयत्न केल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला तंबाखू आहे का? तो आमच्याकडे नसल्याने त्यांची निराशा झाली आणि त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तर देण्यचे टाळले आणि एका जागी जाऊन चक्क झोपले.  


टाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून झाल्यावर आता पळशीचा किल्ला पाहायचा होता. त्यासाठी पुन्हा टाकळी ढोकेशवर गावातून महामार्गावर येऊन उजव्या बाजूला परळीचा रस्ता पकडावा . टाकळी ढोकेश्वर - पळशी अंतर २५ किलोमीटर आहे. पळशी नदीच्या काठी पळशीचा भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यात असलेल्या पळशीकरांच्या वाड्यात लाकडावर केलेले अप्रतिम कोरीवकाम पहाण्यासारखे आहे. पळशी किल्ल्याबाहेर असलेले विठ्ठल मंदिरही अप्रतिम कोरीवकामाचा नमुना आहे. पळशी गाव जवळ यायला लागल्यावर किल्ला दिसायला लागला.

पळशीच्या भुईकोट

पळशीच्या भुईकोटाला १६ बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील २ दरवाजे मोठे असून दोन दरवाजे लहान आहेत. किल्ल्याच्या उत्तरेला आणि पूर्वेला असलेल्या मोठ्या दरवाजातून थेट गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते. किल्ल्यात गाव वसलेले असल्याने किल्ल्याच्या उत्तर भागात पक्के रस्ते बनवलेले आहेत. किल्ल्याचा उत्तर दरवाजा आणि त्याच्या बाजूचे भक्कम बुरुज आजही दिमाखाने उभे आहेत, गावकर्‍यांनी याला रंग लावून शोभा घालवलेली आहे. दरवाच्या दोन्ही बाजूला दोन शिलालेख कोरलेले आहेत. दरवाजातून गाडी घेऊन किल्ल्यात जाता येते. 

पळशीकरांचा वाडा

किल्ल्यात शिरल्यावर चौफ़ेर वस्ती दिसते. या वस्तीतून महादेव मंदिराकडे चालत जाण्यास ५ मिनिटे लागतात. या मंदिराचे दगडी बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीवर हनुमान कोरलेला आहे. गाभार्‍या समोर मोठे कासव आहे. मंदिरासमोर एक वीरगळ आहे. मंदिर पाहून पुढे गेल्यावर उजव्या बाजूस एक गल्ली जाते या गल्लीत एक मोठा तोफ़गोळा पडलेला आहे. तेथेच दोन पुरातन दिपमाळा आहेत. तेथून पुढे गेल्यावर पळशीकरांचा वाडा आहे. 


पळशीकरांचा वाडा

पळशीकरांचा वाडा


पळशीकरांचे वंशज रामराव कृष्णराव पळशीकर यांच्या ताब्यात सध्या हा वाडा आहे. या वाड्याचा दरवाजा आणि त्याची चौकट यावर सुंदर कोरीवकाम केलेले आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर एक बोळ लागतो. तो पार केल्यावर डाव्या बाजूला वाड्याचे दुसरे दार आहे. त्यातून आत गेल्यावर आपण वाड्याच्या चौकात प्रवेश करतो. वाड्यात सध्या दोन भाडेकरु राहातात. वाडा बांधला तेंव्हा दुमजली होता पण आज केवळ एकच मजला शिल्लक आहे. चौकात शिरल्यावर वाड्याच्या खांबांवर, हस्तांवर केलेले अप्रतिम नक्षीकाम पाहायला मिळते. वाड्याला तळघर आहे पण ते सध्या बंद केलेले आहे. चौकात मोरी असून त्यात एक दगडी पाट आहे. वाड्यात शिरल्यावर उजव्या बाजूला देवघर आहे. त्यात जुने टाक आणि मुर्ती आहेत. देवघरच्या बाजूला असलेल्या खोलीच्या चौकटीवर कोरीवकाम केलेले आहे. याच खोलीत वाड्यातील आड आहे.


पळशीकरांचा वाडा


लाकडावरील नक्षीकाम , पळशीकरांचा वाडा

देवघर, पळशीकरांचा वाडा

वाड्याच्या पहिल्या मजल्यावरील खांब पाम वृक्षा सारखे कोरलेले आहेत. वाड्याचा दुसरा मजला कोसळलेला असल्याने त्यावर पत्रे घातलेले आहेत. वाड्याची कुठल्याही प्रकारची निगा न राखल्याने त्याची दुरावस्था झालेली आहे.




 वाडा पाहून बाहेर आल्यावर समोर एका दुमजली इमारतीचे अवषेश दिसतात. याठिकाणी दुसरा वाडा होता. या वाड्याच्या दोन भिंती कशाबशा उभ्या आहेत. त्या भिंतीतले कोनाडे पाहाण्यासारखे आहेत. या वाड्याची गावातल्या लोकांनी हागणदरी केलेली आहे. त्यामुळे येथे थोडा वेळ उभ राहाणे कठीण आहे. या दोन वाड्यांच्या मधून एक वाट देवीच्या मंदिराकडे जाते. मंदिरात डोक्यावर नागाचा फ़णा असलेली, हातात चक्र, गदा घेतलेली आणि पायाशी हत्ती असलेली देवीची मुर्ती आहे.   



         देवीचे मंदिर पाहून पुन्हा महादेव मंदिराच्या चौकात येऊन मंदिराकडे पाठ करुन सरळ चालत गेल्यावर ५ मिनिटात आपण पूर्व दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. दरवाजाच्या बाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे अरुंद पात्र आहे. दरवाजावर चढून जाण्यासाठी पायर्‍या आहेत. दरवाजा वरून संपूर्ण किल्ला आणि आजूबाजूचा परीसर दिसतो.

विठ्ठल मंदिर, पळशी

व्याल आणि हत्ती, विठ्ठल मंदिर, पळशी

पूर्व दरवाजातून बाहेर पडून नदीचे पात्र ओलांडून गेल्यावर आपण विठ्ठल मंदिरापाशी येते. येथे नदीला बांध घातल्यामुळे जलाशय तयार झाला आहे. या जलाशयाच्या एका बाजूला विठ्ठल मंदिर आणि दुसर्‍या बाजूला शंकर मंदिर आहे. जलाशयाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिरे सुंदर दिसतात. विठ्ठल मंदिराच्या बाहेर नदीपात्राला लागून पुष्कर्णी आहे. मंदिराला भव्य प्रवेशव्दार आहे. त्यावरील कोरीवकामावर इस्लामी प्रभाव जानवतो. मंदिर तटबंदीच्या आत वसलेले आहे. प्रवेशव्दारावर नगारखाना आहे. मंदिर नागर शैलीतले आहे. मंदिराचा सभामंडपात कासव आहे. हे कासव थेट किल्ल्यातील महादेव मंदिरातील कासवाची प्रतिकृती आहे. सभामंडपाच्या छता़ची आतील बाजूची रचना महादेव मंदिराच्या छतासारखीच आहे. गर्भगृहाच्या व्दारपट्टीवर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजच्या वरच्या बाजूस श्रीकृष्ण आणि गोपिका कोरलेल्या आहेत. उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मुर्ती आहे.गर्भगृहात विठ्ठलाची नविन मुर्ती आहे. बाजूला काही नव्या जुन्या मुर्ती मांडून ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या खांबांवर फ़ारसे नक्षीकाम नाही पण त्यावर मोर आणि हत्ती कोरलेले आहेत. 



मंदिराला बाहेरुन प्रदक्षिणा मारताना तीन दिशांना तीन देव कोष्टक दिसतात त्यात विष्णू आणि महिषासूर मर्दिनीची मुर्ती आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींवर नक्षीकाम आणि नेहमी आढळणार्‍या सुरसुंदरी दिसत नाहीत. पण दोन फ़ुलांच्या पट्ट्या आणि कळसाच्या खालील बाजूस किर्तीमुखाची पट्टी पाहायला मिळते. गर्भगृहातील पाणी बाहेर जाण्यासाठी जो सांडवा आहे तेथे मकरमुख बसवलेले आहे. मंदिराच्या तटबंदीला असलेल्या जीन्याने फ़ांजीवर चढून कळस जवळून निरखता येतो. कळसात चार देवकोष्टक असून त्यात विष्णूच्या मुर्ती आहेत. छोटे छोटे कळस एकमेकात गुंफ़ून मुख्य कळसाची रचना करण्यात आली आहे. प्रवेशव्दाराच्यावर असलेल्या नगारखान्यात जाऊन बसलो . बाहेर ऑक्टोबरच्या दुपारचे उन रणरणत होते. नदीवरुन येणारी गार वार्‍याची झुळूक, नगारखान्यातली सावली आणि मंदिरात उभा असलेल्या वारकर्‍याच्या एकतारीतून एकाच सुरात, संथ लयीत ऐकू येणार संगीत यामुळे मस्त समाधी लागत होती . पण पोटात ओरडणारे कावळे आणि आजच्या दिवसात बघायची राहीलेली दोन ठिकाणे यामुळे समाधी सोडून निघण भाग होते. नदीच्या काठा पल्याडचे शिवमंदीर पाहून जामगावच्या किल्ल्याकडे निघालो. जामगावला जाण्यासाठी पुन्हा टाकळी ढोकेश्वरला जाणे आवश्यक होते. तिथे हायवे वर असलेल्या धाब्यावर पोट्पूजा उरकून जामगावचा किल्ला गाठला. 

मुख्य प्रवेशव्दार, जामगावचा भुईकोट 

जामगावच्या भुईकोटाला एका टेकडीची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे जामगावच्या किल्ल्याची तटबंदी टेकडीच्या दोन बाजूंना भिडवलेली आहे. पण टेकडीच्या संरक्षणाची काही व्यवस्था केलेली आढळत नाही. ८६ एकरावर पसरलेल्या या किल्ल्याच्या तटबंदीत २० बुरुज आणि ४ दरवाजे आहेत. त्यातील ३ दरवाजे बंद केलेले असून एकाच दरवाजातून किल्ल्यात जाता येते. जामगाव पारनेर रस्त्यावर मळगंगा मंदिराच्या समोर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. सध्या हा दरवाजा बंद केलेला आहे पण त्याच्या बाजूचे दोन भक्कम बुरुज आणि तटबंदी आजही सुस्थितीत आहे. हा दरवाजा पाहून रस्त्याने पुढे गेल्यावर किल्ल्याचा पुर्वाभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या समोरच्या बाजूला रस्त्याच्या पलिकडे हनुमानाचे मंदिर आहे. हनुमानाचे दर्शन घेऊन किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोर दुहेरी तटबंदी दिसते या तटबंदीत महादजी शिंदे यांचा वाडा आहे. या वाड्याकडे न जाता प्रथम डाव्या बाजूला दिसत असलेल्या मंदिराकडे गेलो. येथे पेशवेकालिन मंदिर शैलीतले रामाचे मंदिर आहे. समोरच्या देवळीत हनुमानाची मुर्ती आहे. राम मंदिरात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मुर्ती आहेत. मंदिरात गावकर्‍यांचा वावर नसल्याने मंदिर अस्वच्छ झालेले आहे. रामाचे मंदिर पाहून समोर दिसणार्‍या विठ्ठल रखुमाईच्या मंदिर गेलो. त्याचीही निगा राखली जात नाही. या मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे (जो बंद केलेला आहे. . दोन्ही मंदिरे पाहून आल्या वाटेने परत वाड्या कडे जाणार्‍या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक वास्तूंचे चौथरे दिसतात. कारण पूर्वीच्या काळी या किल्ल्यातच जामगाव वसलेले होते. नंतरच्या काळात ते किल्ल्या बाहेर वसवण्यात आले.

शिंदेंचा वाडा, जामगाव किल्ला 

वाड्याकडे जातांना उजव्या बाजूला ३ कमानी असलेली मशिदीची इमारत दिसते. तर डाव्या बाजूला एक वीटांनी बांधलेली पडकी इमारत पाहायला मिळते. पुढे गेल्यावर दोन्ही बाजूला मजबूत तटबंदी पाहायला मिळते. वाड्याचे संरक्षण करण्यासाठी त्याला पुढील बाजूने दुहेरी तटबंदी बांधलेली पाहायला मिळते. हि तटबंदी ओलांडल्यावर वाड्याच्या भोवतीची तटबंदी आणि त्यात असलेला छोटा दरवाजा दिसतो. या तटबंदीला एकूण सहा बुरुज आहेत. दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला घोड्यांच्या पागा दिसतात. समोरच्या बाजूला आठ पायर्‍या आहेत त्या चढून गेल्यावर आपण वाड्या समोर येतो. वाड्या समोरच उजव्या बाजूला प्रशस्त विहिर आहे. वाडा दुमजली आहे. वाड्यात अनेक वर्षे रयत शिक्षण संस्थेच्या ताब्यात असल्याने त्यात काही बदल केलेले आहेत. वाडा पूर्ण फ़िरुन पाहाता येतो. वाड्यात फ़ारसे कोरीवकाम किंवा नक्षीकाम केलेले नाही. वाड्याच्या गच्ची वरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर दिसतो. वाड्याच्या भिंतीतही जंग्या आहेत. वाडा पाहून विहिरी जवळ वाड्याच्या तटबंदीत असलेल्या दुसर्‍या दरवाजाने बाहेर पडावे. तेथून वळसा घालून मुख्य प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. किल्ला पाहाण्यासाठी शनिवार किंवा रविवार निवडावा कारण इतर दिवशी कॉलेज चालू असल्यामुळे वाडा पाहाता येत नाही. वाड्याची आता खुप पडझड झाली आहे आणि तो सांभाळणे रयत शिक्षण संस्थेला जड जात असल्याने वाड्याच्या बाजूलाच कॉलेजची नवी इमारत बांधण्यात येणार आहे असे तेथिल एका माणसाने सांगितले.

सोमेश्वर मंदिर, पारनेर 

जामगावच्या किल्ल्याचा निरोप घेऊन पारनेरचा रस्ता पकडला. पारनेरच्या पुढे ४ किमीवर दोन ओढ्यांच्या संगमावर  सोमेश्वर मंदिर आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पराशर ऋषींची तपोभुमी होती असे स्थानिक लोक मानतात. या जागेत सध्या असलेल्या सोमेश्वर मंदिराचे बांधकाम मात्र मध्ययुगात झालेले असावे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ओढ्यावर बांधलेला पुल ओलांडावा लागतो. येथे दोन्ही ओढ्यांवर बांधारे बांधून पाणी अडवलेले आहे. येथुन मंदिराचे होणारे प्रथम दर्शन आपल्याला या जागेच्या प्रेमात पाडते. मंदिरासाठी या जागेची योजना ज्याने केली तो खरच निसर्गप्रेमी रसिक माणूस असणार. मंदिराच्या प्रांगणात जमिनीवर बांधलेला एक घुमट आहे . घुमटाखाली  उतरण्यासाठी पाय‍र्‍या आहेत. पायर्‍या उतरुन गेल्यावर छोटासा काळोखी गाभारा आहे. त्यात पिंड आहे. गाभार्‍यात हवा खेळती राहावी यासाठी छ्ताला झरोके आहेत. हे मंदिर खास ध्यानधारणा करण्यासाठी बनवलेले असावे. मुख्य मंदिर दगडात बांधलेले आहे. मंदिराच्या भिंतींवर कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम किंवा मुर्ती नाहीत. मात्र मंदिराच्या परिसरात अनेक जीर्ण मुर्ती व्यवस्थीत ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्या जुन्या मंदिराच्या असाव्यात. मंदिर पाहून परत पुलापाशी येऊन मंदिराच्या विरुध्द दिशेला गेल्यास दगडात बांधलेली सुंदर पुष्कर्णी आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या कमानदार ओवर्‍या पाहायला मिळतात. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यात हा परिसर नितांत सुंदर दिसतो. एव्हाना सूर्य मावळला होता. त्यामुळे अधिक वेळ न घालवता परतीचा प्रवास चालू केला. 

पुष्कर्णी, सोमेश्वर मंदिर, पारनेर 

टाकळी ढोकेश्वरची लेणी, पळशीचा किल्ला, जामगावचा किल्ला आणि सोमेश्वर मंदिर पाहून घरी न परतता नगरला मुक्काम केल्यास दुसर्‍या दिवशी नगरचा किल्ला, रणगाडा म्युझियम (यावर आधीच ब्लॉग लिहिलेला आहे), फ़राह भाग इत्यादी ठिकाणे पाहात येतील. टाकळी ढोकेश्वरच्या १७५ पायर्‍या सोडल्यास बाकी सर्व ठिकाणे जनिमीवर असल्याने कोणालाही सहज भेट देता येईल .

सोमेश्वर मंदिर, पारनेर 

जाण्यासाठी :- कल्याण - नगर रस्त्यावर नगरच्या अलिकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याणपासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर २५ किमी) अंतरावरील पळशी गावाकडे जातो. कल्याण ते पळशीचा किल्ला हे अंतर १९१ किमी आहे. (पुणे - शिरुर - पारनेर - टाकळी ढोकेश्वर - पळशीचा किल्ला हे अंतर १३३ किलोमीटर आहे.)


कल्याण - नगर रस्त्यावर टाकळी ढोकेश्वर गावातून एक रस्ता (अंतर ३३ किमी) पारनेरला जातो. पारनेरहून १२ किलोमीटरवर जामगावचा किल्ला आहे. कल्याण ते जामगावचा किल्ला हे अंतर २०३ किमी आहे. जामगावचा किल्ला पारनेर जामगाव रस्त्याला लागून आहे. पारनेर गावातून ४ किलोमीटरवर सोमेश्वर मंदिर आहे. (पुणे - शिरुर - जामगावचा किल्ला हे अंतर १०५ किलोमीटर आहे.)



10 comments: