Pages

Friday, June 16, 2017

ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan

ओसिया


राजस्थानातील जोधपूरला पाहण्याच्या यादीत क्लॉक टॉवर, मेहरानगढ किल्ला, जसवंतथाडा, मंडोर इत्यादी ठिकाण होती. स्थानिक रिक्षावाले, हॉटेलवाल्यांशी गप्पा मारतंना ओसिया गावाच नाव समजले. त्या ठिकाणी सचिया मातेच मंदिर आहे आणि ओसिया पासून जवळच वाळूच्या टेकड्या आहेत आणि उंटावरुन किंवा जीप मधून तुम्ही त्यावर फ़िरु शकता असेही कळले. जोधपूर पासून ६० किमीवर अंतरावर ओसियॉ गाव आहे. बसने गावात पोहोचल्यावर गावाच्या बाहेरच रस्त्यालगत दगडात बांधलेली अप्रतिम मंदिर दिसली. बस मधून उतरुन थेट मंदिरे गाठली. नेहमी प्रमाणे पूरातत्व खात्याच्या निळ्या फ़लकाने स्वागत केले. स्मारक संरक्षित असले तरी त्याला काहीही संरक्षण नव्हते. शेळ्या मेंढ्यांचा मंदिरात मुक्त वावर होता आणि गावाची कचराकुंडीही तेथेच होती. रस्ताच्या एका बाजूला ३ आणि दुसर्‍या बाजूला एक मंदिर होते. रस्त्या लगत असलेल्या मंदिराचा कळस तुटलेला होता. पण त्याचा गजपृष्ठाकृती सभा मंडप वैशिष्ट्यपूर्ण आहे. दगडात केलेले हे काम पाहाण्यासारखे आहे. छतावर आणि खांबांवर कोरीवकाम आहे. गर्भगृहात मुर्ती नाही. त्याच्या बाजूचे हरीहरचे मंदिर हे शिल्पकामाचा अप्रतिम नमुना आहे. शेव आणि वैष्णव पंथातील वाद पराकोटीला पोहोचला होता तेंव्हा तो मिटवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पातळीवर केला गेला. त्यातूनच मुर्तीशास्त्रात हरीहर या कल्पनेचा उदय झाला. यात एकाच मुर्तीत उजव्या बाजूला शिव आणि डाव्या बाजूला विष्णू त्याच्या आयुध, अलंकार आणि वाहानांसह कोरलेला असतो.उजवीकडे शंकराच्या जटा, गळ्यातील रुंडमाळा, हातात डमरु, त्रिशुळ, पायाषी गण आणि नंदी दाखवलेले असतात, तर डाव्या बाजूला विष्णूचा मुकुट, गळ्यात वैजयंती माळा, हातात शंख, चक्र आणि पायाशी गरुड दाखवलेला असतो. या मंदिराच्याही गर्भगृहात मुर्ती नाही. पण मंदिराच्या सभा मंडपातील खांब, छत यावर केलेले कोरीवकाम अप्रतिम आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला हरीहर, त्रिविक्रम अवतार, नरसिंहावतार, शंकराची केवलमुर्ती, गणपती, महिषासुर मर्दीनीची मुर्ती आणि इतर मुर्ती कोरलेल्या आहेत. मुर्तींच्या वरच्या शिल्प पटावर रामायण , महाभारत, पुराणातील कथा आणि काही मैथुन शिल्प कोरलेली आहेत. तिसरे मंदिर शंकराचे आहे ते सध्या पुजेत आहे. या मंदिराच्या पुढे एक सुंदर पुष्कर्णी बांधलेली आहे. सध्या मात्र ती कचर्‍याच्या विळख्यात सापडलेली आहे. 




ओसिया हे थर वाळवंटाच्या काठावर असलेले गाव प्राचीन काळापासून व्यापारी मार्गावरचे महत्वाचे स्थान होते. ८ व्या शतकात याठिकाणी प्रतिहार घराण्याची सत्ता होती. त्यांनी ८ ते १२ शतकाच्या दरम्यान याठिकाणी अनेक हिंदु आणि जैन मंदिरे बांधली. ओसवाल जैनांचे हे महत्वाचे धार्मिक क्षेत्र आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला सूर्य मंदिर आहे. त्यावरील कोरीवकामही सुंदर आहे. हि तीन मंदिर पाहून छोट्या टेकडीवर असलेल्या सचिया माता मंदिराकडे जातांना आजुबाजूला हाराची, प्रसादाची दुकान हॉटेल्स दिसतात. सचिया माता म्हणजे इंद्राची पत्नी इंद्राणी. याठिकाणी मुख्य मंदिरात सचिया माता व त्याच्या बाजूला चंडी देवी आणि अंबा मातेची मंदिरे आहेत. ही मुळ मंदिरे ८ व्या शतकात बांधली असली तरी आज असलेली मंदिरे १२ व्या शतकात बांधलेली आहेत. मंदिराच्या सभामंडपात आणि अंतराळाच्या छतावर केलेले कोरीवकाम सुंदर आहे. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस दशावतारातले काही अवतार कोरलेले आहेत. येथे अनेक रुपात कोरलेले व्याल ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत.  ८ व्या शतकात बांधलेले महावीर मंदिर हे सुध्दा शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. ही दोन्ही मंदिरात सध्या पूजा होते.

 \


 


या भागात काही रिसॉर्ट आहेत. डेझर्ट सफ़ारी, तंबूतील निवास, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम अशी पॅकेजेस ते देतात, पण ती खूपच महागडी आहेत. अशा मुद्दाम (आर्टीफ़िशियली) तयार केलेल्या रिसॉर्ट मध्ये राहाण्यापेक्षा येथील गावात टिपिकल राजस्थानी घरात राहाण्याची आणि जेवणाची सोय केली जाते. टेकड्यांपासून ५ किमीवर असलेल्या खेमसरगावातील सिवरों की ढाणी या वस्तीवर आमच्या जीपवाल्याचे घर होते. तेथे त्याने जेवणाची व्यवस्था केली होती. या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नव्हता. पुन्हा वाळूच्या टेकड्यांवरुन उड्या मारत जीप वस्तीत पोहोचली. रस्त्यात एक फ़ोर व्हील ड्राईव्ह जीप मुलांना घेऊन शाळेत जातांना दिसली, हिच येथल्या मुलांची स्कुल बस. पाच सहा घरांची वस्ती असलेल्या सीवरों की धानी वस्तीजवळ मोर, नीलगाय आणि हरणांनी दर्शन दिले. मातीच्या कंपाऊंडच्या आत तीन गोलकार, गवताने शाकारलेली घर होती. त्यातील एक स्वयंपाक घर, दुसरी राहाण्याची खोली आणि एक पाहूण्यांसाठी जेवणाची खोली होती. मध्यभागी अंगण होते. बाहेर काही उंट झाडाखाली बांधलेले होते. जीप नसल्यास प्रवासाचे हे दुसरे साधन होते. राजस्थानी पध्दतीचे गरमागरम जेवण जेऊन परत ओसिया गाठले. ओसियाहून जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला जाता येते.






मंदोर दुर्ग (Mandore Fort)



जेवण झाल्यावर परत ओसियाला येऊन जोधपूरला जाणारी गाडी पकडून जोधपूरच्या  ९ किलोमीटर अलिकडे असलेल्या मंदोर गार्डनला उतरावे. या ठिकाणी ६ व्या शतकातला मंदोर दुर्ग, जोधपूरच्या राजांची समाधी मंदिरे आणि म्युझियम आहे. मांडव्य ऋषींच्या वास्तव्यामुळे टेकड्यांच्या सानिध्यात असलेल्या नगराला  मांडिव्यपूर असे नाव पडले. या नगरात मंदोदरी राहात होती. तीचे रावणाशी लग्न झाल्यामुळे मंदोर शहरातील लोक रावणाला आपला जावई मानतात. त्यांनी मंदोर मध्ये रावणाचे मंदिर बांधलेले आहे, दसर्‍याला देशभर रावणाला जाळण्याची प्रथा आहे, पण मंडोर मध्ये तो दिवस रावणाच्या श्राध्दाचा दिवस म्हणून पाळला जातो. 



       मंदोर दुर्ग दोन टेकड्यांवर वसलेला आहे. त्यामधील दरीतून जाणारा पाण्याचा प्रवाह वापरुन सुंदर जोधपूरच्या राजांनी सुंदर उद्यान बनवलेले आहे. स्थानिकांच्या अनास्थेमुळे या ठिकाणी अस्वच्छता आहे. जोधपूरच्या राजघराण्यातील राजांची येथे लाल दगडात बांधलेली समाधी मंदिरे आहेत. मंदोर गार्डन मधील समाधी मंदिरे पाहून व्यवस्थित बनवलेल्या पायर्‍यांच्या मार्गाने मंदोर दुर्गावर जाता येते. इसवीसनाच्या सहाव्या शतकापूर्वी या ठिकाणी दुर्ग होतो. ही प्रतिहार राजवंशाची राजधानी होती. इसवीसनाच्या १४ व्या शतकात प्रतिहारांनी हा किल्ला राठोडांना दिला.  १३९५ मध्ये गुजरातच्या सुतलानाने या किल्ल्याला वेढा घातला पण त्याला किल्ला जिंकता आला नाही. इसवीसन १४५३ मध्ये राव जोधा याने किल्ला जिंकून घेतला. त्याने आपली राजधानी मंदोर दुर्गावरुन जोधपूरच्या किल्ल्यावर हालवली. तेंव्हा पासून याकिल्ल्याचे महत्व कमी झाले. आज किल्ल्यावर एक मंदिर सोडल्यास बाकी सर्व वास्तू उध्वस्त झालेल्या आहेत. किल्या वरील वास्तूंच्या  अवशेषांवरुन या किल्ल्यावर मोठ्या प्रमाणावर वस्ती होती. मंदोर दुर्ग पाहून जोधपूर सिटी बसने संध्याकाळी जोधपूरला परतता येते. 





 




 अमित सामंत

#OffbeatRajasthan

राजस्थानातील इतर अपरिचित ठिकाणांवरील ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

1) राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर.....(Ranapratap ....Chittorgad Fort, Ahar Museum, Haldighati Memorial & Chetak Smarak, Kumbhalgad, Ranakpur Temple)

2) जोधपूरची खाद्य भ्रमंती (what to eat & where to eat in Jodhpur)

4 comments:

  1. प्रसाद कुलकर्णीOctober 24, 2020 at 1:56 AM

    Nice information

    ReplyDelete
  2. अप्रतिम माहिती अमित, तुमच्या बरोबर एकदा असा नवीन पर्यटन स्थानाचा अनुभव घ्यायला आवडेल.

    ReplyDelete
  3. राजस्थानात पण जोधपूरजवळ Offbeat ठिकाणं आहेत हे माहित नव्हतं. ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  4. पर्यटनासाठी छान माहिती, रावणाची सासरवडी माहिती छान होती.

    ReplyDelete