Pages

Friday, June 23, 2017

सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी. (St.Mary's Island , Udupi) Offbeat Karnataka

सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी.


मुंबईकरांना उडुपी माहिती आहे ते मुंबईतल्या उडुपी हॉटेल्समुळे आणि उडुपीतल्या प्रसिध्द श्रीकृष्ण मंदिरामुळे. या उडुपीला सुंदर समुद्र किनारा आहे त्याच नाव आहे मालपे बीच. या बीच पासून  ६ किलोमीटर अंतरावर निसर्गातील एका आश्चर्याने समुद्रातुन डोक वर काढलेल आहे, ते म्हणजे सेंट मेरीज आयलंड. पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्ट्कोनी अशा उभ्या बेसॉल्ट खडकाच्या स्तंभांनी ही चार बेट बनलेली आहेत. भारतातली अशा प्रकारची ही एकमेव बेट असुन, जिओग्राफ़िकल सर्व्हे ऑफ़ इंडीयाने २००१ साली या बेटांना "नॅशनल जिओग्राफ़िक मॉन्युमेंटचा" दर्जा दिलेला आहे.


उडुपी बस स्थानका पासून ५ किमीवर जेटी आहे. सेंट मेरीज आयलंडला जाण्यासाठी येथून बोटी सुटतात. बोटीचे तिकीट रुपये १००/- असून ३० लोक जमा झाल्याशिवाय बोट सोडत नाहीत. त्यामुळे शक्यतो सुट्टीचा दिवस आणि संध्याकाळी ४ च्या दरम्यान जावे म्हणजे सुर्यास्त पाहून परतता येते. बेटावर वस्ती नसल्याने खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळत नाहीत.. त्यामुळे त्या सोबत बाळगाव्यात. धक्क्यावरुन साधारण अर्ध्या तासात आपण सेंट मेरीज आयलंडपाशी  पोहोचतो. स्थानिक दंतकथे प्रमाणे केरळला जाण्यापूर्वी १४९८ मध्ये वास्को द गामा प्रथम या बेटांवर आला आणि मदर मेरीच्या नावावरून त्याने या बेटाला सेंट मेरी आयलंड (ओ पाड्रो दी सांता मारीया) असे नाव दिले. या ठिकाणी  कोकनट आयलंड ( या बेटावर नारळाची झाड आहेत.), नॉर्थ आयलंड, दर्या बहादुरगड आयलंड आणि साऊथ आयलंड या चार मोठ्या बेटांनी समुद्रातून डोके वर काढलेले आहे. यातील कोकनट आयलंड म्हणजेच (सेंट मेरीज आयलंड) वर बॅसॉल्ट खडकाचे बहुकोनी स्तंभ आहेत.



   बेटा जवळ बोट आल्यावर दुरुनच बेटावर आणि समुद्रात आजूबाजूला विखुरलेले बेसॉल्टचे स्तंभ दिसायला लागतात. बेट २४ एकरावर पसरलेले आहे. बेटावर काही माडाची झाड आणि खुरटी झुडप पाहायला मिळतात. बेटावरची जमिन वाळुने बनलेली नसून चक्क शंख शिंपल्यांनी बनलेली आहे. बेटावर अगणित शंख शिंपले पाहायला मिळतात. एवढ्या मोठ्या प्रमाणवर शंख शिंपले इतर ठिकाणी क्वचितच पाहायला मिळतात.या बेटाला वाळूचा किनारा नसून या शंख शिंपल्यांनी बनलेला किनारा आहे. बेटाच्या आजूबाजूला खडक असल्याने समुद्रही पोहोण्याच्या लायक नाही आहे. बेटावर फ़िरतांना वरुन पाहिले तर कासवाच्या पाठीसारखे आणि बाजूने पाहिले तर खांबांसारखे दिसणारे बेसॉल्टचे दगडी स्तंभ दिसायला लागतात. 

६० दशलक्ष वर्षापूर्वी लाव्हारसामुळे दख्खनच्या पठाराची निर्मिती झाली त्याच वेळी या बेटाची आणि त्यावरील स्तंभांची निर्मिती झाली. या स्तंभांसारख्या रचनेला "कॉलम्नर जॉईंट" म्हणतात. चौकोनी, पंचकोनी, षटकोनी, सप्तकोनी, अष्ट्कोनी अशा बहुकोनी आकारात तयार झालेले हे स्तंभ एकमेकाला चिकटलेले असतात. ज्वालमुखीच्य उद्रेका नंतर लाव्हारस जर खोलगट भागात जमा झाला तर अशा प्रकारची रचना तयार होण्याची शक्यता असते. लाव्हारस थंड होण्याची प्रक्रीया पृष्ठभागापासून चालू होते. वरचा भाग थंड झाल्यावर हळूहळू खालचा भाग थंड होत जातो. अशा प्रकारे द्रवरुपातून घनरुपात येतांना तो आकुंचन पावतो आणि त्यामुळे त्याला भेगा पडतात. सामान्यत: या भेगा एकमेकांशी ६० अंशाच्या कोनात पडतात. त्यामुळे दगडाला षटकोनी आकार येतो. या भेगा पृष्ठभागाशी ९० अंशाचा कोन करतात त्यामुळे षटकोनी आकाराचे उभे स्तंभ तयार होतात. जर भेगा पडण्याच्या प्रक्रीयेत काही बाधा आली तर चौकोनी, पंचकोनी आकारचे स्तंभ तयार होतात. 

वर्षानूवर्षे लाटांच्या आणि वार्‍याच्या मार्‍यमुळे या ठिकाणी अनेक स्तंभ तुटून पडलेले पाहायला मिळतात. बेटावर काही सेंटीमीटर उंच ते जास्तीत जास्त ३ ते ४ मीटर उंचीचे स्तंभ पाहायला मिळतात. 

दगडी स्तंभांचे विविध आकार, त्यावर फ़ुटणार्‍या लाटा आणि विविध आकाराचे, रंगांचे शंख शिंपले गोळा करतांना वेळ कसा जातो ते कळत नाही. बोटीचा परतीचा इशारा देणारा भोंगा वाजायला लागतो. समुद्रात बुडणार्‍या सूर्याला साक्षीला ठेऊन आपण या सुंदर बेटाचा निरोप घेतो.



जाण्यासाठी :- कर्नाटकातील उडुपी स्थानक कोकण रेल्वे वरील महत्वाचे स्थानक आहे. या ठिकाणी सर्व गाड्या थांबतात. उडुपीत राहाण्यासाठी अनेक हॉटेल्स आहेत. कोस्टल कर्नाटक सहलीत वाट थोडी वाकडी करुन आपण उडुपी आणि सेंट मेरी आयलंडचा समावेश करु शकतो.


अमित सामंत

#Offbeatkarnataka

13 comments:

  1. अमित, मस्त माहिती !!!

    ReplyDelete
  2. Amit Dada khup Chan mahiti ahe

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती आहे

    ReplyDelete
  4. पुन्हा एकदा अनोळखी ठिकाण पटलावर आणलेस, धन्यवाद!

    ReplyDelete
  5. नेहमी प्रमाणे माहितीपूर्ण लेख 💐

    ReplyDelete
  6. खूप छान लिहिले आहेस एका अनोळखी पर्यटन स्थळाबद्दल..

    ReplyDelete
  7. 👌👌👌सुंदर माहिती

    ReplyDelete
  8. एक वेगळीच आणि छान माहिती.

    ReplyDelete
  9. Ohhh... कसले भारी आहे. जायला पाहिजे आता. मस्त माहिती दादा

    ReplyDelete
  10. Thank you for sharing such great information ❣️

    ReplyDelete