महाराष्ट्रातील मंदिरे आणि त्यांचे स्थापत्य
|
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर, जि. नाशिक |
पुण्याजवळचा पुरंदर किल्ला पाहून पायथ्याच्या नारायणपूर गावात उतरलो. नारायणपूर गाव बालाजी मंदिर, एकमुखी दत्त मंदिर व पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याचे गाव म्हणून आज प्रसिध्द आहे. याच गावात चालुक्य कालिन प्राचीन नारायणेश्वर मंदिर आहे. इतक्या वेळा येऊनही हे मंदिर एकदाच पण घाईघाईत पाहिल होत. आजचा मुक्कम गावातच होता त्यामुळे कॅमेरा घेऊन मंदिरा भोवती तटबंदीतील छोट्या दरवाजातून आवारत शिरलो. मंदिराच्या कळासाकडे पाहून आपण येथे का आलो ? असा मला प्रश्न पडला. मंदिराचा मुळचा कळस काळाच्या ओघात नष्ट झाल्यामुळे त्या जागी मंदिराच्या रचनेला न शोभणारा सिमेंटचा कळस बांधलेला आहे. नुसता सिमेंटचा कळस बांधून हा आधुनिक शिल्पकार गप्प बसला असता तरी ठिक होत. पण त्याने त्या भोवती पाच फण्यांचा मोठा नाग बनवलेला आहे. एवढे कमी होते म्हणून त्या नागाच्या डोळ्यात लाल रंगाचे दिवे लावून वेगखाच "इफेक्ट" दिला होता. खरतर आमचा भ्रमनिरास झाला होता पण, हिम्मत करून मंदिरात गेलो. मंदिराचा पुजारी मंदिरात एकटाच होता. आमची जिज्ञासा पाहून त्याने संपूर्ण मंदिर त्यातील बारकाव्यां सकट दाखवले. जोडीला अनेक दंतकथा सांगितल्या. पाच मिनिटात मंदिर पाहून जाऊ म्हणून आत आलेलो आम्ही तब्बल दिड तासाने तृप्त होऊन बाहेर पडलो.
|
नारायणेश्वर मंदिर |
सह्याद्रीच्या दर्या खोर्यात केलेल्या भटकंतीत अशी अनेक प्राचीन मंदिर पाहायला मिळाली होती. दमुन भागुन या मंदिराच्या शांत गार सभामंडपात विश्रांती घेतली होती. खरतर मंदिर ही कल्पनाच किती सुंदर आहे. प्राचीन काळी ही मंदिर म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींची केंद्रे होती. पण त्याही आधी अनेक ठिकाणी डोंगर फोडून त्यामध्ये गुहा करून त्यात मुर्तीची स्थापना केली जात होती. सह्याद्री डोंगररांगेत आजही देवरुख जवळचे मार्लेश्वर मंदिर, वासोट्या जवळचे नागेश्वर मंदिर, ढाक किल्ल्या वरील बहिरीची गुहा इत्यादी अनेक गुहा मंदिर आपल्याला पाहायला मिळतात.
|
लहुगडा वरील गुहेतील मंदिर, जि. औरंगाबाद |
|
वासोट्या जवळचे नागेश्वर मंदिर |
|
गुहा मंदिर हरीश्चंद्रगड |
त्यानंतरच्या मंदिरांची रचना ही एखाद्या सर्वसामान्य घरासारखी होती. गुप्तकालिन मंदिरे (४ थे शतक) ही एक खोली व तीच्या पुढिल लहानसा सोपा म्हणजे व्हरांडा अशी होती. पुढील काळात पूजापद्धतीचा विस्तार होऊन पूजन, नैवेद्य यांच्या जोडीला नृत्य, गायन ह्या गोष्टी आल्या. देवाचे स्नान, भोग, सोहळे आले. हे सर्व विधी सहजतेने करता येतील अशाच प्रकारची मंदिरे उभी राहिली पाहीजेत याची स्थापतींना जाणीव झाली आणि हळुहळू मंदिरांच्या रचनेत बदल होत गेला. खोलीवजा घराचे रुपांतर कळस, सभामंडप, मुखमंडप, इत्यादी घटकांनी युक्त स्थापत्यात झाले. गाभार्या भोवती प्रदक्षिणापथ व समोर मोठा मंडप आला. मंडपाचे छप्पर सपाट, आणि गाभार्यावर शिखर आले. गाभार्याच्या आणि मंडपाच्या मधला भाग म्हणजे अंतराळ व त्यावर गजपृष्ठ पद्धतीचे छप्पर असे. चौकोनी मंडप बाधू लागल्यावर कोनाकार, शंकूसारखी छपरे बसविण्यात येऊ लागली. या छपरांची उंची गाभार्यापासून मंडपाच्या दिशेने कमी कमी होत जात असे.
|
नागर शैलीतील मंदिर |
या मंदिरांमधून एकूण १८ विभाग कार्यरत असत. तेथे पाठशाळा चालत, त्यांच्या प्रांगणात व आजुबाजूला बाजार भरे, ग्रामसभा, न्यायसभा होत. गाभार्यातीला देवदेवतांच्या सन्मुख राहून मंडपाच्या मध्यभागी प्रवचन, किर्तन, भजन, गायन वादन, नर्तन केले जात असे. मंदिरात 1)वास्तुकला 2) चित्रकला 3) शिल्पकला 4) किर्तन 5) नृत्यकला 6) धर्मसभा 7) धर्मविवेचन 8) संगीत 9) आयुर्वेदीक वनस्पती 10) गोशाळा 11) अतिथीगृह 12) धर्मकार्ये 13) प्राणिसंग्रह 14) ध्यानमंदिर 15) खलबत खाना 16) ग्रंथालय 17) अनाथ बालसंगोपन 18) पाठशाळा हे विभाग होते.
भारतीय वास्तुकारांनी भौगालिक परिस्थितीनुसार अनेकविध प्रकारांची सुंदर सुंदर मंदिरे निर्माण केली. या मंदिरांचे अनेक प्रकार आहेत.
नागर शैली मंदिरे :- यांनाच इंडो आर्यन मंदिरे असेही म्हणतात. हा सर्वात प्राचीन हिंदु मंदिरांचा प्रकार आहे.याच्या शिखराचा भाग वर निमुळता होत जाणारा व काहीसा बहिर्वक्र स्वरुपाचा असतो. शिखराच्या मुख्य आकाराच्या वर बसक्या लोट्या प्रमाणे भाग असतो ज्याला "आमलक' म्हणतात. ही मंदिर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात आढळतात.
द्रविड शैली मंदिरे :- द्रविड हा शब्दच मुळात भौगोलिक प्रदेशाचे सूचक आहे. कृष्णानदी पासून कन्याकुमारी पर्यंतच्या प्रदेशात ही शैली प्रसिध्द होती. याचे वैशिष्ट्य म्हणजे यात मंदिराच्या शिखरात मजले बांधलेले असतात. यांनाच "भूमी' असे म्हणतात. ही मंदिरे मोठ्या परिसरात पसरलेली असतात. या मंदिराचा आणखी एक विशेष म्हणजे "गोपूर'. मालवण जवळील कुणकेश्वराचे देऊळ हे द्रविड शैलीत बांधलेले प्राचीन मंदिर आहे.
वेसर शैलीची मंदिरे:- या शैलीची मंदिरे प्रामुख्याने पश्चिम भारतात आढळतात. विंध्यपर्वता पासून कृष्णानदी पर्यंत ही शैली प्रचलित आहे. यात नागर आणि वेसर दोन्ही पध्दतीचा समावेश दिसतो. यालाच "मिश्रक' असेही नाव आहे.
भूमिज शैलीची मंदिरे :- ही शैली नागर शैलीच्या मंदिरांची उपशैली आहे. या प्रकारची मंदिरे नर्मदा नदीच्या बाजूच्या परिसरात, माळव्यात व महाराष्ट्रात आढळतात. यातही प्रस्तर शिखर असलेली आणि विटांची शिखर असलेली भूमिज मंदिरे असे दोन प्रकार आढळतात. अंबरनाथचे शिवमंदिर, गोंदेश्वरचे मंदिर ही भूमिज प्रकारची मंदिरे आहेत.
|
चाळीसगाव जवळचे महादेव मंदिर |
|
सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर |
|
सिध्देश्वराचे मंदिर, माचणूर |
|
अमृतेश्वर मंदिर,रतनगड |
|
कर्णेश्वर मंदिर,संगमेश्वर |
या सर्व प्रकारच्या मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे, या वास्तूच्या उभारणीत सांधे जोडण्यासाठी चुना, माती यांचा वापर केला जात नसे. मंदिरे विविध म्हणजेच त्रिकोणी, चौकानी, वर्तुळाकृती, अर्धवर्तुळाकृती इत्यादी आकाराच्या दगडांनी बांधली जात असत. या दगडांना विशिष्ट ठिकाणी खोबणी असत, त्यांच्या सहाय्याने हे दगड एकमेकांवर बसवून संपूर्ण वास्तू उभी केली जात असे.
सह्याद्री डोंगररांगांमुळे महाराष्ट्राचे कोकण किनारपट्टी सह्याद्रीची रांग व त्यावरील पठार किंवा घाटमाथा असे तीन भाग पडले आहेत. येथील राज्यकर्त्यांचा प्राचीन काळापासून परदेशासी व्यापार चाले. कोकण किनारपट्टीवर उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये जात असे. त्यामुळे या परिसरात संपन्न बंदरे, शहरे, बाजारपेठा तयार झाल्या. इअसवी सनाच्या आठव्या-नवव्या शतकांपासून तेराव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात शेकडो मंदिरे बांधण्यात आली. यातील बहुतेक मंदिरांचे बांधकाम एखाद्या राजाने करून घेतले आहे, त्यामुळे ही मंदिरे त्यावेळच्या राजधान्या, व्यापारी मार्ग, बाजारपेठा यांच्या जवळ बांधली गेली. अशाच घाटमार्गांवर असलेले भीमाशंकरचे प्राचीन शिवमंदिर आजही प्रसिध्द आहे. हरीश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेले खिरेश्वर गावातील मंदिर, रतनगडाच्या पायथ्याशी असलेले अमृतेश्वर मंदिर, सोलापूर पंढरपूर मार्गावर असलेले माचणूर येथील सिध्देश्वराचे मंदिर, डोंबिवली जवळचे खिडकाळेश्वर मंदिर, अंबरनाथचे शिव मंदिर, टाकेदचे जटायू मंदिर अशी अनेक मंदिरे व्यापारी मार्गांवर होती. तर संगमेश्वर जवळचे कर्णेश्वर मंदिर, नगर जवळचे सिध्देश्वराचे मंदिर, निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर, सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर, फलटणचे जरबेश्वर मंदिर ही प्राचीन नगरांजवळ बांधण्यात आली होती.
याशिवाय पूराण कथांमधील उल्लेखांमुळे पवित्र मानल्या गेलेल्या स्थानांवर देखील अनेक मंदिरे बांधण्यात आली. चाळीसगाव जवळचे पाटणादेवी मंदिर व महादेव मंदिर, नाशिक परीसरातील मंदिरे, मुंबईचे वालुकेश्वर मंदिर, सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूरचे मंदिर, लोणारचे मंदिर अशी अनेक मंदिरे पूराण कथांमधील पवित्र स्थानांवर बांधण्यात आली.
|
फलटणचे जरबेश्वर मंदिर |
|
निलंग्याचे निलकंठेश्वर मंदिर |
महाराष्ट्रातील मंदिरे प्रामुख्याने चालुक्य, विजयनगर, यादव यांच्या काळात बांधली गेली. त्यामुळे मंदिरांच्या रचनेत व बांधकामावर त्याचा प्रभाव पडला. त्याशिवाय स्थानिकरित्या उपलब्ध झालेली साधने वापरून ही मंदिरे बांधल्यामुळे, सह्याद्रीच्या कुशीतील व घाटमाथ्यावरील मंदिरे काळया पाषाणात बांधण्यात आली. मंदिरासाठी लागणारा दगड मंदिराच्या परिसरातूनच काढला गेला आणि त्याजागी पाण्याची कुंड किंवा पुष्करणी तयार केल्या गेल्या. कोकणातील मंदिरे चिर्यापासून बनवलेली होती, त्यावर कौलारू छप्पर असे.
दिपमाळ हे महाराष्ट्रीयन मंदिर रचनेतील खास वैशिष्ट्य आहे. विटांचा किंवा दगडांचा निमुळता होणारा स्तंभ उभारुन त्याच्यात ओळीने हात बसविलेले असतात. उत्सवाच्या प्रसंगी, दिवाळीच्या वेळी त्रिपुरी पौर्णिमेला या दिपमाळा उजवळण्यात येत असत.
|
नाग शिल्प |
|
सतीगळ |
|
किर्तीमुख |
|
गोमुख |
|
गध्देगाळ |
वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ (Hero Stone, Sati Stone, Gadhhegal, Dhenu (Cow) Stone) यावर वेगळा ब्लॉग लिहिलेला आहे. तो जरुर वाचावा. ब्लॉग वाचण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.
https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html
|
सुरसुंदरी |
|
पुष्कर्णी |
सह्याद्रीतील ही प्राचीन मंदिर हा किल्ले, लेणी यासारखा अभ्यासण्याचा विषय आहे. मंदिराची रचना, त्यावरील कोरीव काम, मुर्ती, शिलालेख, विरगळ, गध्देगाळ, मंदिरां भोवतीच्या अनेक दंतकथा या सर्वांचे मिळुन खरतर मंदिर तयार होत. आज काळाच्या रेट्याने काही प्राचीन मंदिरे नष्ट झाली, काही आडबाजूला पडल्यामुळे लोकांच्या विस्मरणात गेली आहेत.
#ancienttemplesinmaharashtra#templearchitecure#templesinmaharashtra#
1) ओसियॉ (Temples of Osian) आणि मंदोर दुर्ग (Mandore Fort) Offbeat Places near Jodhpur,Rajasthan
हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
2) Tahakari Temple टाहाकारीचे मंदिर
हा लेख वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा
प्रस्तुत अभ्यासपूर्ण माहितीसाठी आभारी आहोत.
ReplyDeleteमाहितीपूर्ण लेख
ReplyDeleteखूप छान माहिती मिळाली
ReplyDelete