मार्च महिन्याच्या अखेरीस जोडून सुट्टया आल्यामुळॆ आड, डुबेरगड, सिध्देश्वर मंदिर आणि गंगाधरेश्वर मंदिर अकोले, पेमगिरी किल्ला आणि पेमगिरीचा महा वटवृक्ष पाहाण्याचा प्लान बनवलेला. पण अचानक उष्णतेचा पारा ४० अंशाच्या पुढे पोहोचल्यामुळे ज्याला विचारतोय तो वेगवेगळी कारण सांगून ट्रेकला नाही म्हणायला लागला. मुंबईतच ४० अंश सेल्सियस तापमान, तर नाशिक नगरच्या सीमेवर असलेल्या या वैराण किल्ल्यांवर काय होईल हा खरच प्रश्न होता. पण इतक्या वर्षाची भटकंती आणि त्यातून मिळालेला अनुभव यामुळॆ एकदा जायच नक्की केल्यामुळे आता माघार घेण्याचा प्रश्नच नव्हता.
हि सगळी ठिकाण एका दिवसात पाहायची होती. त्यामुळे गाडी घेऊन रात्री ११ च्या सुमारस डोंबिवलीहून निघालो. कसारा घाट पार केल्यावर हवा थंड झाली, मुंबईची उकाड्यातून आल्यामुळे एकदम फ़्रेश वाटायला लागल. पहाटे ३.३० ला आड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या आडवाडीत पोहोचलो. झुंजूमुंजू झाल्यावर वर जायचे होते. पण त्यासाठी अजून दोन तास बाकी होते. त्यामुळे पाठ टेकायला जागा शोधण भाग होते. गावातील शाळा, मंदिर, घरांच्या पडव्या, अंगण ही आमची नेहमीची झोपायची ठिकाण, त्या दृष्टीने शोध चालू केला. इतक्यात येवढ्या रात्रीही एक माणूस गावात फ़िरताना दिसला. त्याला विचारल्यावर त्याने जवळाच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरात जायला सांगितले. श्रीकृष्णाचे मंदिर ऐसपैस होते. इथल्या पध्दतीप्रमाणे गावातले काही लोक मंदिरात झोपायला होते. आमची चाहूल लागताच काही लोक उठले आणि चौकशी चालू केली. सकाळी किल्ल्याची वाट दाखवायच एकाने मान्य केल्यावर मी आणि कौस्तुभने स्लिपिंग बॅग अंथरल्या, वैभव आणि उमेशने स्लिपिंग बॅग आणली नसल्याने त्यांनी सॅक मधून वर्तमानपत्र काढली. तितक्यात एका माणसाने त्यांना हाक मारून उशाशी घेतलेली गोधडी दिली. या भागात दिवसा तापमान ४० अंशाच्या पुढे असले तरी रात्री मात्र व्यवस्थित थंडी असते. १२ महिने वारे वाहात असतात. त्यामुळे या भागात पवनचक्क्यांची संख्याही जास्त आहे. आम्ही झोपलेलो त्या मंदिरातही थंडगार वारा लागत होताच. पहाटेचा गजर लावून स्लिपिंग बॅगमध्ये शिरलो. दिवसभराच्या धावपळीने कधी झोप लागली कळलच नाही. अचानक नगार्याच्या आवाजाने जाग आली. काकड आरती चालू झाली होती. मागे एकदा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याच्या मंदिरात झोपलो असताना सकाळी इलेक्ट्रीकवर चालणारा ढोल आणि झांजने झोपमोड केली होती. पण आज नगारा अतिशय तालात वाजत होता आणि आरतीच्या चाली प्रमाणे त्याचा ताल बदलत होता. कुतूहलामुळे उठून बसलो. एक आजोबा समरसून नगारा वाजवत होते. आरती म्हणणाऱ्या माणसाचा आवाजही चांगला होता. पण आरतीचे शब्द मात्र मला तरी अपरिचित होते. आमच्यातला वैभव उठून आरतीला आधीच उभा राहीला होता. मीही गाभाऱ्या समोर जाऊन उभा राहिलो. तेंव्हा लक्षात आले की हे देउळ महानुभाव पंथांच्या लोकांचे आहे .
|
Aad Fort |
आरती संपल्यावर झोपण शक्य नव्हते. मग गाववाल्यांशी गप्पा मारायला सुरुवात केली अशा गप्पांमध्ये दंतकथा, गावचे प्रश्न, राजकारण इत्यादी अनेक गोष्टी कळतात. फक्त आपण आपला शहरी शहाणपणा आणि आगाऊपणा सोडून नम्र श्रोत्याची भुमिका घ्यायची असते आणि संवाद यज्ञ चालू ठेवण्यासाठी प्रश्नांच्या समिधा मधून मधून टाकत राहायच्या असतात. गावातली ३०० घर महानुभाव पंथाची आहेत . त्यांनीच हे श्रीकृष्णाचे मंदिर बांधले आहे .गावात दुधदुभत भरपूर आहे. एकेकाळी गावातून मोठ्या प्रमाणावर खवा सिन्नरच्या बाजारात जायचा. या भागतले उघडे बोडके डोंगर दिसतात त्याच कारण हा खवा आहे. खवा बनवण्यासाठी भरपूर सरपण लागायच त्यामुळे जंगलतोड झाली. नंतरच्या काळात पवनचक्क्या आल्या त्याबरोबर रस्ते आले, एसटी आली. आज गावात खवा बनवणार एकच घर आहे.(त्याच नाव मी गुगल मॅपवर पाहीले होते. ते त्यांना सांगितल्यावर आश्चर्य वाटले ) गावातील बाकी सर्व लोक आता दिवसातून दोनदा दुध सिन्नरच्या बाजारात घेउन जातात. त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन जीप सिन्नरला जातात. गप्पा चालू असतानाच पूर्वेकडे फटफटायला लागल . त्याबरोबर आकाशाच्या पार्श्वभूमीवर पनचक्क्या फिरताना दिसायला लागल्या. गाववाल्यांकडून आम्हाला चहाचा आग्रह होत होता पण उन्हाच्या आधी आड किल्ला पाहून पुढे जायचे होते. त्यामुळे आम्ही सामान आवरून निघालो. एक गाववाला आम्हाला थोड्या अंतरापर्यंत वाट दाखवायला आला . गावाच्या बाहेर एक मातीच धरण होते . मार्च महिन्यातच त्यातला पाणीसाठा आटला होता. धरणाच्या पुढे वाट शेतातून जात होती . समोर आड किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला होता. किल्ल्याच्या उत्तर दिशेकडील डोंगरधारेच्या खाली मारुती मंदिर आहे . गावातून मंदिरापर्यंत २० मिनिटात पोहोचलो . कौलारू मंदिरात हनुमानची मुर्ती आणि काही वीरगळी ठेवलेल्या आहेत . या मंदिरापासून किल्ल्याच्या मध्यावर असलेल्या गुहेपर्यंत जाण्यासाठी पाउलवाट आहे असे आम्हाला वाटाड्याने सांगितले. त्याप्रमाणे पाउलवाटेला लागल्यावर १० मिनिटे चढ चढल्यावर एका आंब्याच्या झाडाखाली आलो. येथून दोन ठळक पाउल वाटा फुटत होत्या एक उत्तर डोंगरधारेकडे तर दुसरी दक्षिण डोंगरधारेकडे जात होती . आम्ही उत्तरेकडे जाण्याऱ्या पायवाटेने निघालो. ती वाट हळूहळू चढत जात होती. पण १० मिनिटात लक्षात आले की ही वाट किल्ल्याच्या डोंगराला वळसा घालून मागे जातेय . मग परत फिरलो आणि आंब्याच्या झाडापासून दक्षिणेस जाणाऱ्या वाटेने पुढे गेलो पण ती वाट सरळच जात होती आम्ही गुहेच्या खालून पुढे गेल्यावरही वाट वर चढेना तेंव्हा लक्षात आल की ही पण किल्ल्यावर जाण्याची वाट नाही . मग गुहेच्या खाली येउन एक छोटासा कातळटप्पा चढून गुहेपाशी आलो. हि किल्ल्यावर जाण्याची वाट नव्हती . पण दिवसभराचा कार्यक्रम पार पाडायाचा असल्याने आमच्या पुढे पर्याय नव्हता.
|
Tank on Aad Fort |
आडु बाईची गुहा ही एक डोंगराच्या कातळटोपी खाली असलेली भलीमोठी नैसर्गिक गुहा आहे. या गुहेत कातळात कोरलेला बसण्यासाठी केलेला ओटा आणि एक टाक याच मानवनिर्मित गोष्टी होत्या . गुहेपर्यंत येण्यासाठी वाट चुकल्यामुळे अर्धा तास जास्त खर्ची पडला होता . सकाळी नाश्ता न केल्याने भुकपण लागली होती . त्यामुळे गुहेत बसून नाश्ता केला आणि पाणी पिउन किल्ल्याच्या उत्तरधारेकडे निघालो. या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या त्या जपून चढून गेल्यावर किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो. किल्ल्याचा माथा विस्तीर्ण पसरलेला आहे. माथ्यावर पाण्याची १५ टाकी , एक तलाव आहे म्हणजे किल्ला नांदता असेल त्याकाळी किल्ल्यावर भरपूर वस्ती असणार त्याचे अवशेष किल्ल्याच्या माथ्यावर दिसत होते. किल्ल्याचे प्रवेशद्वार सध्या उध्वस्त स्थितीत आहे . किल्ला व्यवस्थित पाहाण्यात एक तास कसा गेला ते कळलच नाही. किल्ला उतरताना प्रथम त्या कातळात कोरलेल्या पायऱ्या लागल्या . किल्ला चढताना दरीकडे पाठ असल्याने त्याची भयानकता जाणवली नव्हती. पण उतरताना तिन्ही बाजूला दरी असल्याने कातळाकडे तोंड करुन उतरायला सुरुवात केली. पाय खालच्या पायरीवर टेकेपर्यंत हाताची पकड सोडायची नाही हा नियम पाळून जपून उतरताना तापलेल्या कातळाचे चटकेही बसायला लागले होते . किल्ला उजाडल्या उजाडल्या चढायला सुरुवात करायची हा निर्णय योग्यच होता. जपून पायऱ्या उतरून सपाटीला आलो. किल्ला चढताना हरवलेली पायवाट यावेळी अचूक सापडली . १० मिनिटात किल्ला उतरुन गावाकडे मोर्चा वळवला. पुन्हा श्रीकृष्ण मंदिरात पोहोचल्यावर चहाचा आग्रह झाला पण थांबलो नाही . त्यांनी दिलेले विहिरीतील थंडगार पाणी पिउन निघालो. गाडी काढणार तर समोरुन पाण्याची पिंप भरुन ट्रॅक्टर आला . उन्हाळ्याला सुरुवात झाली होती पण आत्ताच गावात पाणी टंचाई होती. गाडीने थेट ठाणगाव गाठले. मध्ये एके ठिकाणी रस्ता एका डाईक वरुन गेला . दोन्ही बाजूला दरी आणि कातळाच्या भिंतीवर बनवलेला रस्ता .
ठाणगावात मिसळ पाव आणि चहा घेउन ७ किलोमीटरवरचे डुबेरा गाठले. डुबेरा हे पहिल्या बाजीरावांचे आजोळ, त्यांचा जन्म याच डुबेरा गावातील बर्वेवाड्यात झाला होता. डुबेरा किल्ला गावा बाहेरील टेकडीवर आहे . टेकडीच्या पायथ्याशी आश्रम आहे तिथपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता आहे . किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एकमेव वडाच्या झाडाखाली गाडी लावली . उन मी म्हणत होते . सर्व अंग, तोंड कपड्यानी झाकून घेतले . समोर किल्ल्यावर जाणाऱ्या पायऱ्या दिसत होत्या . कडक उन आणि पायऱ्या म्हणजे भयानक कॉंबिनेशन होते . नेहमी ट्रेकला जाणारे कितीही चालतील , चढतील पण पायऱ्या असल्या की जाम कंटाळा येतो हा सार्वत्रिक अनुभव आहे . पण कंटाळून चालणार नव्हते . त्यामुळे मनाचा हिय्या करुन पहिल्या पायरीवर पाय ठेवला आणि एका दमात पाव किल्ला चढून गेलो. मध्ये कुठेच सावली नसल्याने तिथे असलेल्या कातळाच्या एका खोबणीत आम्ही सर्वजण शिरलो. सावलीत आल्यावर थोड बर वाटल. बाहेरच्या उन्हाकडे बघवत नव्हत . पाणी पिउन पुन्हा चढायला सुरुवात केली . आता पायऱ्या सोडून प्रत्येक जण वेगळ्या वाटेने गड चढायला लागला. १० मिनिटात धापा टाकत गड माथ्यावर पोहोचलो . माथ्याच्या एका टोकाला मंदिर आहे मध्ये तुरळक बाभळीची झाड आहेत . माध्यान्हीच्या टळटळीत दुपारी तेवढ अंतर चालण पण जीवावर आल होते पण पर्याय नव्हता. सावलीसाठी एका बाभळीच्या झाडाखाली थांबलो. त्याच्या जाळीदार पानां मधून उन अंगावर पडत होतच. उन्हापासून बचाव होण्यासाठी बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या हरणांच्या कळपाचा फोटो सध्या सोशल मिडीयावर फिरतोय त्याची आठवण झाली आणि त्या परिस्थितीतही हसू आल . देवळाच्या मागच्या कट्यावर देवळाचीच सावली पडली होती त्या सावलीत येउन बसलो. उन्हाच्या तडाख्यामुळे सगळेच बराच वेळ गप्प बसून राहीलो . इतक्यात सिन्नर दिशेच्या दरीतून प्लास्टीकची एक पिशवी वाऱ्यावर तरंगत आली . हळूहळू वर चढत आमच्या डोक्यावरुन साधारणपणे १५ ते २० फुटावरुन ती पिशवी तरंगत आड किल्ल्याच्या दिशेने निघून गेली . बराच वेळ त्या तरंगत जाणाऱ्या पिशवीकडे पाहात बसलो. प्लास्टीकचा भस्मासुर अशा मार्गानेही डोंगरदऱ्यात पसरतोय ही गोष्ट कधी लक्षातच आली नव्हती. सावलीत बसल्याने जीवाला थोडा थंडावा मिळाला मग घशाला थंडावा देण्यासाठी बरोबर आणलेली द्राक्ष खाल्ली, पाणी पिउन देवळात गेलो. देवळात सप्तशृंगी मातेची मुर्ती होती . नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच किल्ल्यावर सप्तशृंगीदेवीच्या मुर्ती आढळतात. देवीचे दर्शन घेउन आल्या मार्गाने परत जाताना पाण्याची कातळात खोदलेली टाकी दिसली. सप्तशृंगी मातेच्या देवळाच्या विरुध्द बाजूस असलेल्या पठारावर एक कोरडा पडलेला तलाव आहे तो पाहून किल्ला उतरायला सुरुवात केली. १० मिनिटात किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो.
|
Dubera (Dubergad) |
|
उन्हात न संपणारी पायर्यांची वाट |
गाडी घेउन बाजीराव पेशव्यांचे जन्मस्थान असलेला बर्वेवाडा गाठला. वाड्याला चार बुरुज तटबंदी आणि प्रवेशव्दार आहे . वाड्याची सध्याची अवस्था दयनीय आहे . प्रवेशव्दाराच्या आत पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. तटबंदीच्या आत चौसोपी दुमजली वाडा आहे . वाड्याच्या लाकडी खांबावर आणि हस्तांवर सुंदर नक्षीकाम आहे . पण वाड्याची निगा न राखल्याने त्याची रया गेलेली आहे . दिल्ली पर्यंत धडक मारणाऱ्या बाजीराव पेशव्यांच्या जन्मस्थानाची अवस्था पाहून मन विषण्ण झाले .
|
Bajirao Peshwa Birth place, Barve Wada , Dubera |
|
Entrance of Barve Wada |
पुढचा टप्पा होता २७ किलोमीटर वरील अकोले गाव प्रवरा नदीकाठी गाव वसलेले आहे या ठिकाणी एकेकाळी अगस्ती मुनींचा आश्रम होता आणि वनवासात असताना राम लक्ष्मण सीता या आश्रमात येउन गेले होते अशी दंतकथा आणि गावकऱ्यांची श्रध्दा आहे. अगस्ती ऋषींचे मंदिर गावात आहे. पण आम्हाला पाहायची होती ती सिध्देश्वर आणि गंगेश्वर मंदिरे . भंडारदरा धरणातून पाणी सोडल्याने प्रवरा नदीला पाणी होते. एवढ्या उन्हात ते पाणी नुसते पाहूनही नजरेला थंडावा मिळत होता. प्रवरा नदीवरील पुल ओलांडल्यावर डाव्या बाजूला सिध्देश्वर मंदिर आहे .
|
Mukh Mandap, Siddheshwar Temple , Akole |
सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती . त्यामुळे त्यांनी या परिसरात अनेक सुंदर कोरीवकाम असलेली मंदिरे बांधली किल्ले बांधले . सिन्नरचे गोंदेश्वर मंदिर , एकतेश्वर मंदिर, टाहाकरीचे महालक्ष्मी मंदिर , रतनवाडीतले रत्नेश्वर मंदिर, अकोलेचे सिध्देश्वर मंदिर इत्यादी मंदिरे पाहायला मिळतात. ऱाजधानीच्या, बाजारपेठांच्या गावात किंवा व्यापारी मार्गावर ही मंदिर बांधलेली आढळतात आणि व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी किल्ले बांधलेले दिसतात.
|
Siddheshwar Temple , Akole |
महाराष्ट्रातील सर्व मंदिराना सरसकट हेमाडपंथी मंदिरे म्हणायची पध्दत पडलेली आहे. हेमाद्री (हेमाडपंत) हा यादवांचा कर्णाधीप (प्रधान् होता. यादवांच्या सत्तेला स्थैर्य मिळाल्यावर त्यांनी कला साहित्य निर्मितीला प्रोत्साहन् दिले. त्यामुळे या मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे या नावाने ओळखले जाते. पण त्यापूर्वीही वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, होयसाळ यांनी एकापेक्षा एक सुंदर मंदिरे महाराष्ट्रात बांधलेली आहेत. यादवांच्या उत्तरकाळात मंदिरांवरील नक्षीकाम कमी कमी होत गेले. व्दारशाखा, सभामंडप, बाह्यभिंती त्यावरील मुर्ती, शिल्प, नक्षी जाऊन मोठमोठ्या सपाट दगडांनी बांधलेली मंदिरे सर्वत्र दिसायला लागली.
|
Ardha mandap with Sur sundari panel |
उत्तर भारतात नागर शैलीची मंदिरे पाहायला मिळतात तर दक्षिण भारतात द्रविड पध्दतीची मंदिरे पाहायला मिळतात. या दोन्ही शैलीपेक्षा वेगळ्या शैलीतील मंदिरे महाराष्ट्रात पाहायला मिळतात त्यांना भुमिज शैलीतील मंदिरे म्हणतात. या मंदिरांसाठी चतुरस्त्र आणि तारकाकृती या दोन प्रकारचे आराखडे वापरले जातात. अकोल्याचे सिध्देश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून मंदिराला मुखमंडप, दोन अर्ध मंडप, अंतराळ आणि असे मंदिराचे भाग आहेत. मुखमंडप ६ पूर्णस्तंभ आणि २ अर्ध स्तंभांवर तोललेला आहे. सर्व स्तंभावर सुंदर कोरीवकाम आहे. या स्तंभासाठी सलग दगड वापरलेला आहे. जवळपास सापडणार्या सलग दगडाच्या लांबी वरुन मंदिराची उंची ठरवली जात असे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणे मंदिरांची उंची वेगवेगळी आढळते. या मंदिरातील खांब खालच्या बाजूला चौकोनी आहेत. हा खांबाचा पाया असल्याने तो रुंद आहे. एक फ़ुट उंच खांबाच्या पायाच्या चारही बाजूस मधोमध छोट्या मुर्ती कोरलेल्या आहेत.त्यावरील २ फ़ुटाचा भाग चौकोनी आहे. त्यावर शंकराच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. त्यावरचा भाग अष्टकोनी आहे. यात तीन पट्ट्या कोरलेल्या आहेत. यात खालील पट्टीवर मुर्ती कोरलेल्या आहेत. वरच्या पट्टीवर युध्द करणारे योध्दे आहेत. त्यावरील छोट्या शिल्पपट्टीवर हंस कोरलेले आहेत. त्यावरचा छत तोलून धरणारा भाग फ़ुगीर गोलाकार आहे. त्यावर छत तोलून धरणारे किचक कोरलेले आहेत. छातासाठी खांबांच्यावर चौकोनी दगडी तुळया आहेत. त्यावर षटकोनी आकारात दगडी पट्ट्या बसवलेल्या आहेत. चौकोनावर षटकोन बसवल्यामुळे तयार झालेल्या रिकाम्या कोपर्यात किर्तीमुख कोरलेली आहेत. षटकोनाच्या वर एका आत एक वर्तुळ असून त्यात खाली लोंबणारे दगडी फ़ुल कोरलेले आहे. चौकोनाच्या आणि षटकोनाच्या प्रत्येक पट्तीवर शिल्प कोरलेली आहेत. मुखमंडपात मध्यभागी नंदी आहे. मुखमंडपातून मुख्यमंडपात जाण्यासाठी दार आहे. व्दारशाखेवर वेलबुट्टीचे सुंदर नक्षीकाम आहे. ललाटबिंबावर गणपती आहे. ललाटपट्टीच्यावर पाच छोटी देवकोष्ठ आहेत. त्यात मुर्ती कोरलेल्या आहेत. देवकोष्ठांमधिल जागेत व्याल आणि गजमुख् कोरलेले आहे. व्दारशाखांच्या बाजूला तळाशी शैव व्दारपालांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. दरवाजाच्या उंबरठ्या खाली किर्तीमुख कोरलेली आहेत.
|
Mukhya Mandap, Siddheshwar Temple, Akole |
|
Kirti Mukh |
मुख्य मंडप ८ खांबावर तोललेला आहे. त्यातील चार नक्षीदार खांब आधी वर्णन केल्याप्रमाणे आहेत. तर उरलेले चार खांब साधे आहेत त्यावर थोडेच अलंकरण आहे. मुख्य मंडपाच्या बाजूला दोन अर्ध मंडप आहेत . या अर्धमंडपांना अर्धभिंती असल्याने त्यातून येणारा प्रकाश खांबावर पडून छाया प्रकाशाच्या खेळात खांबावरील मुर्ती उठून दिसतात. मुखमंडपाच्या पुढे अंतराळ व त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृहात पिंड आहे. मंदिराच्या बाह्यभिंतींवर दोन देवकोष्ठ आहेत. त्यातील मुर्ती भंगलेल्या आहेत. अर्ध मंडपांच्या भिंतींवर सुरसुंदरी कोरलेल्या आहेत. मंदिराच्या बाह्य भिंतीवर सर्वात खाली फ़ुलांची पट्टी व सर्वात वर किर्तीमुखांची पट्टी आहे. मंदिराचे मुळ कळस अस्तित्वात नाहीत. मंदिरा जवळ काही वीरगळ पडलेले आहेत.
|
Gangadhareshwar Mandir, Akole |
सिध्देश्वर मंदिर पाहून पुन्हा मुख्य रस्त्यावर येऊन रस्ता ओलांडल्यावर भर वस्तीत गंगाधरेश्वर मंदिर आहे. आम्ही पोहोचलो तेंव्हा मंदिराच्या आवारात जाण्यासाठी असलेल्या दिंडी दरवाजाला कुलूप होते. श्री पोतनीस (संत) यांचे खाजगी मंदिर, सर्वांना मुक्त प्रवेश अस त्यावर रंगवले होते. तिथे खेळणार्या मुलांनी पोतनीसांच घर दाखवले. त्यांच्या कडून चावी आणून मंदिराच्या आवारात प्रवेश केला. मंदिराच्या धाटणी वरुन ते पेशवेकाळात बांधलेले असावे. त्यावर फ़ारसे कोरीव काम नाही, पण मंदिराच्या बाह्यभिंतींवर कोरलेली फ़ुले, कमळे आणि किर्तीमुख हे कोरीवकामाचा उत्तम नमुना आहे. मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे तीन भाग आहेत. मंदिराचा सभामंडप १२ खांबांवर तोललेला असून, छताचा भार तोलण्यासाठी दोन खांबांच्या मध्ये कमानी आहेत. सभामंडप ३ बाजूंनी उघडाच आहे. त्याला भिंती नाहीत. सभामंडपाचे छत कमी कमी होत जाणार्या गोलाकार पट्ट्यां एकमेकांवर रचून बनवलेले आहे. मध्यभागी उलटे लटकणारे दगडी फ़ुल कोरलेले आहे. मंडपाच्यावर छोटा कळस आहे. गर्भगृहाच्या वर असलेला कळस छोट्या छोट्या कळसांचा मिळून बनलेला आहे. या कळसाच्या तिन्ही बाजूला शंकराच्या सुंदर मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिर पाहून शेवटचा टप्पा म्हणजे पेमगिरी किल्ला गाठायचा होता. अकोले ते पेमगिरी किल्ला अंतर १७ किलोमीटर आहे. पेमगीरी किल्ला आडवाटेवर येतो. त्यामुळे बघायचा राहून गेला होता.
पेमगिरी उर्फ शहागड उर्फ़ भीमगड हा नगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात येणारा किल्ला आडबाजूला असल्यामुळे फारसा परिचित नाही. पण मराठ्यांच्या इतिहासातला एक महत्वाचा प्रसंग या किल्ल्यावर घडला होता.इ.स. १६३२ च्या अखेरीस मोगल सरदार महाबतखानाने निजामाची राजधानी असलेल्या दौलताबाद किल्ल्याला वेढा घातला आणि जिंकुन घेतला. त्याने खुद्द हुसेन निजामशहा आणि त्याचा वजिर फत्तेखान याना तुरुंगात टाकल. निजामशाहीची अखेर झाली. त्यावेळी शहाजी राजे निजामाकडे सरदार होते. त्यानी पेमगिरी किल्ल्यावर अटकेत असलेल्या निजामाच्या अल्पवयीन मुलाला मुर्तिजा निजामशहाला सोडवल आणि त्याला गादीवर बसवुन शहाजी राजानी स्वत:ला निजामाचा वकील जाहीर करुन राज्य चालवायला सुरुवात केली. मोगल आणि आदिलशहाच्या संयुक्त सैनाशी शहाजी राजानी ६ मे १६३६ रोजी तह केल्यावर निजामशाहीची अखेर झाली.
किल्ल्यावर जाण्यासाठी वनखात्याने डांबरी रस्ता बांधलेला आहे. त्यामुळे आपण थेट किल्ल्यावर पोहोचतो. बाळेश्वर या मुख्य डोंगररांगेपासून वेगळ्या झालेल्या डोंगरावर पेमगिरी हा पुरातन किल्ला वसलेला आहे. वनखात्याने किल्ल्यावर जाण्यासाठी गाडी मार्ग बांधल्यामुळे खाजगी वाहानाने थेट किल्ल्यावर जाता येत. किल्ल्यावर पेमादेवीची दोन मंदिर आहेत. जुन्या छोट्या मंदिरा समोर ४ सातवहान कालिन टाकी आहेत. त्यात मधली दोन खांबटाकी आहेत. टाकी पाहुन डाव्या बाजुंने पुढे गेल्यावर खालच्या बाजुस एक लांबलचक टाक आहे त्याला "बाळंतीणीच टाक" म्हणतात. ते टाक पाहुन किल्ल्याच्या दक्षिण टोकापर्यंत जाता येते. या ठिकाणी कुठलेही अवशेष नाहीत. पण किल्ल्याच नैसर्गिक संरक्षण करणारी किल्ल्या मागची बाळेश्वर डोंगररांग इथुन पाहायला मिळते. टोकावरुन परत फिरुन किल्ल्यावर नविन बांधलेल्या पेमादेवी मंदिराकडे जाताना डाव्या बाजुला दोन कोरडी टाक आहेत. पेमादेवी मंदिरात देवीची नविन मुर्ती बसवलेली आहे. या मंदिराचा कळस दुरवरुनही सहज दृष्टीस पडतो. देवीच दर्शन घेउन किल्ल्याच्या उत्तरेला असलेल्या टेहळणी बुरुजाकडे जावे. येथे बुरुज आज अस्तित्वात नाही पण येथुन दुरवरचा परीसर दृष्टीस पडतो. याठिकाणी वनखात्याने लोखंडी शिडी बसवलेली आहे. पायथ्या पासून चालत आल्यास या मार्गानेच आपला प्रवेश होतो. टेहळणी बुरुज पाहुन झाल्यावर आपली गड फेरी पूर्ण होते. गडावर वनखात्याने सुशोभित करायला सुरुवात केलेली आहे. रस्ता बनवण्यात आला आहे त्यातही गडाचे बुरुज आणि तटबंदीचे अवशेष दिसतात.
पेमगिरी गावात किल्ल्या पासुन २.५ किमीवर एक प्राचिन वडाचे झाड आहे. या झाडाने एक एकरहुन अधिक परीसरात व्यापलेला आहे. ग्रामस्थानी हा परीसर सुशोभित आणि स्वच्छ ठेवलेला आहे. मुळ वट वृक्षाखाली काही वीरगळी आहेत. त्यावर खंडोबा आणि त्याच्या दोन पत्नींच शिल्प कोरलेल आहे. पेमगिरीच्या भेटीत हा वटवृक्ष आवर्जुन पाहावा असाच आहे.
पेमगिरी पाहून बामनवाडा - ओतुर - माळशेज कल्याणमार्गे डोंबिवलीला पोहोचायला रात्रीचे ९ वाजले.
|
ट्रेकला मिसळ हवीच |
डुबेरगड, आडगड, पट्टा, अवंधा आणि बितनगड हे पाच किल्ले २ दिवसात सहज पाहाता येतात. डुबेरगड, बर्वेवाडा, आड आणि पट्टा पाहून पट्ट्यावर मुक्काम करावा. दुसर्या दिवशी अवंधा आणि बितनगड किल्ले पाहाता येतात. (यातील आड आणि अवंधा या किल्ल्यावर कातळटप्पे (रॉक पॅच) चढावे लागतात) सोबत टाहाकारीचे मंदिर आणि टाकेदचे जटायु मंदिरही या सोबत पाहाता येईल. त्यासाठी खाजगी वहान असणे आवश्यक आहे. जुलै ते फ़ेब्रुवारी हा काळ या ट्रेकसाठी योग्य काळ आहे. (यावर वेगळा ब्लॉग लिहिलेला आहे. वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा... )