Pages

Sunday, September 27, 2015

सह्याद्रीतील रानफ़ुले (Sahyadri the valley of flowers)


Fkowers on slopes of sahyadri

कौंडल


Harishchandra gad 

पावसाळा सुरु झाला की सह्याद्रीच्या पठारावर डोंगर उतारांवर छोटी छोटी रानफुले फुलायला लागतात. विविध जातीची ,रंगांची, आकाराची ही फुल आपल लक्ष वेधुन घेतात. सप्टेंबर अखेर पर्यंत त्या फुलांची चादर सर्वदुर पसरलेली दिसायला लागते. काही तासांच ते दिवसांच आयुष्य असलेली ही फुल डोंगर भटके आणि अभ्यासकांपुढे आपल भांडार उघड करतात. सह्याद्रीतील फुल म्हटली की सर्वांच्या नजरेसमोर पहिल्यांदा येत ते कासच पठार. कास पुष्प पठारावर पाउस पडायला लागला की दर महिन्यात वेगवेगळी फ़ुल फ़ुलायला लागतात. पण कासच्या पठारावर मोठ्या प्रमाणात असलेली टोपली कारवी सात ते बारा वर्षात एकाच वेळेस फ़ुलते तेंव्हाचे कास पठाराच दृष्य अवर्णनीय असत. विविध साईटवर, वृत्तपत्रां मधुन येणारे सात ते बारा वर्षात एकदाच फ़ुलणार्‍या कारवीने खच्चुन बरलेल्या कासच्या पठाराचे फोटो पाहून त्याठिकाणी जाणार्‍या पर्यटकांचा लोंढा इतका वाढायला लागला की शनिवार, रविवार सातार्‍यात ट्रॅफिक जाम व्हायला लागला. त्याच्या प्रदुषणाने, लोकांच्या बॉलिवुड टाईप बागडण्याने त्या पठारावरच्या फ़ुलांनाही धोका उत्पन्न झाला. त्यामुळे वनखात्याने कास पठारालाच कुंपण घालुन टाकले. हिंदी सिनेमात दिसते तशी ऑर्कीडची एकाच प्रकारची फ़ुल पाहाण्याच्या अपेक्षेने आलेल्या पर्यटकांचा भ्रमनिरास व्हायला लागला. या सर्व गोष्टींमुळे पुण्या - मुंबईहुन प्रवास करुन पोहोचणार्‍या लोकांनी कासला पाहायला काही नाही म्हणुन मग ठोसेघर, बारामोटेची विहिर या जवळपासाच्या ठिकाणांची महती वाढायला लागली.

Kas Platu

कास पठार इतकी पुष्प वैविध्यता सह्याद्रीत इतर ठिकाणी नाही हे मान्य केल तरी, कास हे रानफुले पाहाण्यासाठी एकमेव ठिकाण नाही. सहज पाहाता येण्यासारखी अनेक ठिकाण सह्याद्रीत आहेत. अर्थात तिथे जाउन काय पाहायच ? हे मात्र माहित पाहिजे.

पाऊस पडायला सुरुवात झाली की जमिनीवर पडलेल्या बियांना, जमिनीतल्या कंदांना धुमारे फ़ुटायला लागतात. जमिन हिरवीगार दिसायला लागते. पाउस पडल्या - पडल्या सर्वप्रथम हजेरी लावतात ती पाण कुसुमची फ़ुल. त्यानंतर काळी मुसळीची चांदणी सारखी दिसणारी पिवळी फ़ुल हजेरी लावतात. त्याच्या औषधी गुणधर्मामुळे ती मुळासकट उपटली जातेय. मग येते आषाढ आमरी, आमरी म्हणजे इंग्रजीत ऑर्किड. ती येते तेंव्हा गवत जास्त वाढलेल नसते त्यामुळे त्याची पांढरी सुंदर फ़ुल त्या हिरव्या गालिच्यावर उठुन दिसतात. एकदा एका पावसाळी संध्याकाळी एका पठारावर विसावलेलो. पावसामुळे वातावरण कुंद होत. संध्याकाळच्या कमी होत जाणार्‍या प्रकाशात गवताच्या वर डोलवणार्‍या दांड्यांमधुन आषाढ आमरीची फ़ुल फ़ुलायला लागली आणि काही वेळातच ते पठार त्या पांढर्‍या फ़ुलांनी चमकायला लागल. या फ़ुलांमधे पण गमती जमती असतात. पाउस पडल्यावर "हबे आमरीच्या" कंदातुन एक दांडा बाहेर येतो त्यावर पांढरी फ़ुल येतात. त्यानंतर त्याला जमिनी लगत एकच मोठ पान येत. परागीभवन झाल की फ़ुल गळुन पडतात. पानात तयार झालेल अन्न कंदात साठवल जाते ते पुढच्या पावसाळ्यासाठी. ऑगस्ट, सप्टेंबर मधे तेरड्याची फ़ुल आणि सोनकीने सह्याद्रीची पठार झाकली जातात, रस्त्यांच्या कडेला, दाट झाडीत जागा मिळेल तिथे पेवची बेट फ़ुलायला लागतात. हा पुष्प सोहळा सह्याद्रीत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्या पर्यंत चालु असतो.  




  काही तासांचे आयुष्य ते काही दिवसांचे आयुष्य असलेली, काही मिलीमीटर ते काही सेंटीमीटर आकाराची फ़ुल आपल्या रंगाने, सुवासाने किटकांना आकर्षित करायला लागतात. स्वत: अचल असल्याने पराग वाहुन नेण्यासाठी त्यांना किटकांची आवश्यकता असते. त्यामुळे किटकांच्या पटकन नजरेत भरतील असे रंग, त्यांना परागांपर्यंत जाण्याच्या वाटा दाखावण्यासाठी बनवलेले वेगळ्या रंगाचे बाण हे प्रत्येक फ़ुलात असतात आणि त्याची रचना पाहाण्यासारखी असते. पराग वहनाच्या मोबदल्यात दिला जाणारा मकरंद ही अशा ठिकाणी साठवलेला असतो की तिथे पोहोचेपर्यंत त्या किटकाला जास्तीत जास्त परागकण चिकटले पाहिजेत. अर्थात यातही काही उस्ताद फ़ुल असतात. काही न देता किटकांकडुन परागीभवन करुन घेतात. तर काही ठिकाणी फ़ुलांचा आणि किटकांचा सुंदर सहजीवन दिसुन येत.

पावसाळ्यात फ़ुटणार्‍या पेवच्या बेटाकडे आपल लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणार्‍या त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्‍या पांढर्‍या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी -लाल रंगाची रुपांतरीत पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेल फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेल असत. फुल पांढर्‍या रंगाच असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या किटकांना मध कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांड्याच्या फुलातील मध खाण्यासाठी/ परागीभवनासाठी लांब सोंड असलेल ग्रास डेमन (Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae) हे फुलपाखरू पेवच्या बेटातून उडतांना दिसत. हे कृष्णधवल रंगाचे फुलपाखरू असून पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडतांना फुलपाखराची सोंड (Probosis) कॉईल सारखी गुंडाळलेली असते. पेवसारख्या लांब दांड्याच्या फुलावर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मध पिते. निसर्गातील हे परस्परावलंबन आश्चर्यचकीत करणारे आहे.पावसाळ्यात भटकंती करतानांना रानफ़ुलां बरोबर किटक, फ़ुलपाखरे अशा अनेक गोष्टी पाहायला मिळतात. 

काळी मुसळी

विंचवी

निळी चिराईत
साप कांदा


रानफ़ुले ओळखायची कशी ? हा प्रश्न बर्‍याच जणांना पडतो. रानफ़ुले बघायला फ़ारसा प्रयास पडत नाही, ती भटकंती करतांना सहज दिसतात. साध्या मायक्रो मोड असलेल्या कॅमेराने  फ़ुलांचे मस्त फ़ोटो काढावेत. फ़ोटो काढताना फ़ुलांचा क्लोजप आणि एक फ़ोटो पानासकट काढावा. कारण बर्‍याचदा फ़ुल एक सारखी दिसल्याने ओळखण्यात चुक होते. त्यावेळी पानांवरुन अचुक ओळखता येते. फ़ोटो काढुन झाले की ती फ़ुल ओळखण्यासाठी अनेक पुस्तक आणि साईटस उपलब्ध आहेत. या रानफ़ुलांची तीन नाव असतात, एक शास्त्रिय, दुसरे त्याच्या फ़ॅमिलीच नाव आणि तिसरे मराठी नाव. तेरड्याच शास्त्रिय नाव आहे Impatiens balsamina तेरड्याच्याच जातीतच एक मोठ फ़ुल आहे त्याला मराठीत "ढाल तेरडा" (Impatiens phulcherima)  म्हणतात. Balsaminaceae हे त्यांच्या फ़ॅमिलीच नाव आहे या नावातल Impatiens म्हणजे उतावीळ, अजिबात धीर नसलेला, हा शब्द तेरड्यांच्या फ़ळापासून आलाय. तेरड्याच फ़ळ सुकायला लागले की त्यांना अजिबात धीर नसतो. वार्‍याच्या झोताने, भुंग्याच्या धक्क्यानेही ते फ़ळ फ़ुटते आणि बिया विखुरतात.

 रानफ़ुलांची मराठी नावही फ़ार सुंदर आहेत. गिरीपुष्प, कुमुद, विष्णुकांत, आभाळी इत्यादी नाव लक्षात ठेवायला पण सोपी आहेत. एकदा हा छंद लागला, तुम्ही त्याबद्दल वाचत गेलात की फ़ुलांच्या अनेक गमती जमती कळत जातात. जमल्यास एखादा ट्रेक फ़क्त रानफ़ुल पाहाण्यासाठी काढावा. त्या ट्रेकला आपल्या बरोबर  बॉटनीतला माहितगार घेऊन जावा. आमच्या ट्रेक क्षितिज संस्थे तर्फ़े आम्ही फ़क्त रानफ़ुल पाहाण्यासाठी ट्रेक घेऊन जातो. २०१३ साली पुरंदरवर आमच्या सोबत प्र.के.घाणेकर सर आले होते. त्या दिवसात आम्ही ८४ जातीची फ़ुल नोंदवली. गेल्यावर्षी त्रिंगलवाडी किल्ल्यावर ४६ जातींच्या फ़ुलांची नोंद केली. जर तज्ञ व्यक्तीं बरोबर जर तुम्ही रानफ़ुले एकदा तरी पाहीलीत तरी तुम्हाला बर्‍याच नव्या आणि रंजक गोष्टी कळतील.

बुरुंडी


आभाळी



घाणेरी
ढाल तेरडा

कास प्रमाणेच पुष्प वैविध्य असलेला किल्ला म्हणजे पुरंदर किल्ला. १५०० मीटर उंची असलेल्या या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरील केदारेश्वर मंदिराकडे जाणारी पायवाट सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस फ़ुलांनी भरुन जाते. सोनकीच्या पिवळ्या फ़ुलांनी डोंगर जरी झाकलेला असला तरी पुरंदरवर अनेक प्रकारची फ़ुल पाहायला मिळतात. त्यात निळ्या जांभळ्या रंगाची निलांबरी, आकाश तुळस, इत्यादी दुर्मिळ फ़ुलही पाहायला मिळतात. त्रिंगलवाडी किल्ल्याला नाशिकच कासच पठार म्हणतात. या किल्ल्याच्या पठारावर रानफ़ुलांचे अनेक प्रकार विखुरलेले पाहायला मिळतात. हरिश्चंद्रगडावरचा गुहेसमोरचा आणि मंदिराच्या आजुबाजूचा प्रदेश सोनकीच्या चादरीने झाकलेला असतो. यावरून एक किस्सा आठवला, मध्यंतरी हरीशचंद्रगड उतरतांना काही गावकरी एका रानफूलाच्या बिया ओरबाडून पोत्यात भरत होते. विशिष्ट उंचीवरच दिसणार्‍या या रानफूलांची मोजकीच झुडपं या परीसरात आहेत. आमचं कुतूहल चाळवल्यामुळे आम्ही गावकर्‍यांकडे चौकशी केली. त्यांनी दिलेली माहिती रंजक होती. या रानफूलाच्या बिया लैंगिक क्षमता वाढवण्यासाठीच्या औषधात वापरतात. व्यापरी १ किलोला १००/- रुपये भाव देतात. त्यामुळे या दिवसात गावातील सर्व लोक या बिया गोळा करण्याच काम करतात. त्यांनी पोत्यातून काढून थोड्या- थोड्या बिया सर्वांच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाले खाऊन बघा, काही होत नाही. अख्खा गड उतरायचा असल्याने आम्ही काही बिया खाल्या नाहीत. थोड्या  तरी बिया झुडपांवर ठेवा म्हणजे पुढच्या वर्षी सुध्दा झाडे येतील असा (फूकटचा) सल्ला देऊन आम्ही निघालो. पण त्यांच्या पाचवीला पुजलेलं अठराविश्व दारीद्र्य व या झुडपांपासून मिळणारे पैसे याचा विचार केला तर काही वर्षांनी ही वनस्पती सह्याद्रीत नक्कीच दुर्मिळ होत जाणार आहे.  

निलांबरी , पुरंदर 


रानभेंडी


कानपेट




 कळलावी


सीतेची आसव

ताग

रतनगडाचा परीसरही उतरत्या पावसात रानफ़ुलांनी बहरुन जातो. प्रतापगड, शिवनेरी, राजगड, रायगड, सिंहगड, तोरणा या किल्ल्यांवरही या दिवसात पुष्पोत्सव चालु असतो. कोकण आणि सह्याद्रीला जोडणारे घाट वरंधा, कुंभार्ली, आंबा ,राधानगरी आंबोली हे रानफ़ुलांनी बहरलेले असतात. मुंबईकर आरे कॉलनी, संजय गांधी उद्यानात जाऊन रानफ़ुलांचा आनंद घेऊ शकतात. एकदा का तुम्ही रानफ़ुल ओळखायला लागलात की आपल्या गावा - शहरांबाहेरच्या टेकड्यांवरची रानफ़ुल तुम्हाला साद घालायला लागतात.

कुर्डु, कोंबडा

दुधाळी

गोलगुंडा

पिवळा धोत्रा

चवर

वनराणी

सोनकी

Purandar 

Photos by :- Amit Samant  © Copy right


  अमित सामंत

25 comments:

  1. मस्तच आणी फोटो सह भरपुर माहीती.

    ReplyDelete
  2. मस्तच एकदम अभ्यास पूर्ण

    ReplyDelete
  3. Khup chaan mahiti , photos excellent.

    ReplyDelete
  4. खूप छान माहिती दिली आहेस..

    ReplyDelete
  5. खूप छान माहिती

    ReplyDelete
  6. Khup different fulachi mahiti milali.nisargachi kimya ani tyache vegale colour

    ReplyDelete
  7. खूप छान.अभ्यासपूर्ण लेखन. सहज सोप्या भाषेत सांगण्याची शैली आहे

    ReplyDelete
  8. प्रसाद कुलकर्णीOctober 11, 2020 at 7:05 AM

    छान माहिती

    ReplyDelete
  9. खुपच छान लेख... अत्यंत दुर्मिळ माहिती...

    ReplyDelete
  10. सुनिल कुलकर्णीDecember 11, 2020 at 6:53 AM

    खुपच छान लेख.. अत्यंत दुर्मिळ माहिती...

    ReplyDelete
  11. समजेल अशी शब्द मांडणी,ओघवत्या लयीत चित्र डोळ्या समोर उभे रहाते.आपण भेट दिलेली स्थळे नजरेपुढ उभी रहातात.मला आठवते की रतन गड वरिल तेरडा,कार्वी अन वरुन डोंगर रांगावर दिसणारी पिवळी,जांभली गुलाबी फुलाची चादर तर मनाला वेड लावतील इतकी छान असते.sept- oct मासात भेट द्यावी.

    ReplyDelete
  12. खूप अभ्यासपूर्ण लेख आणि सुंदर चित्रांवर अत्यंत दुर्मीळ माहिती

    ReplyDelete
  13. Ranfulanchi abhyaspurn माहिती gharbasalya मिळाली, nisargachi वैविध्य purna sundarta अनुभवायस मिळाली, आपले अत्यंत आभार.

    ReplyDelete
  14. सुंदर माहितीपूर्ण लेख , नावासहीत वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे फोटो खुप सूंदर आणि मोहक

    ReplyDelete
  15. छान माहिती दिलीत,,, आयुर्वेदिक उपचारासाठी यातील काही फुलांचा अर्क बनवून आम्ही डोंबिवली च्या आमच्या दवाखान्यात वापरतो,,, त्यासोबत त्यांची जपणूक करणं निगा राखण हा भाग ही आलाच,,,, सामान्य आणि सहज शब्दात आपण ही माहिती फोटो सह दिलीत हे उत्तमच,,,,,

    ReplyDelete
    Replies
    1. छान समयोचित लेख! तज्ञ बरोबर असावा ही सूचनाही योग्य!

      Delete
  16. छान फोटो आणि माहिती

    ReplyDelete
  17. कोकणात यातली बहुसंख्य रानफुले पहिली आहेत, पण त्यांची नावे आज समजली. खूपच सुंदर लेख.

    ReplyDelete