Pages

Tuesday, September 24, 2013

" पेव फुटणे " (Flowers in Sahyadri :-- Costus speciosus)

      
  " बॉम्बस्फोटा नंतर अफवांचे पेव फुटले ", "अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले" असे अनेक मथळे वर्तमानपत्रात आपण वाचत असतो. लहानपणी न समजून ही अनेक गोष्टी पाठ केल्या होत्या, त्यापैकी "पेव फुटणे - भराभर बाहेर पडणे",  हा वाकप्रचार ही पाठ करून १ मार्कही मिळवला होता. पण या शब्दाचा अर्थ पुढे कधीतरी मला माझ्याच अंगणात सापडेल असं मात्र वाटल नव्हत. सप्टेंबर महिन्यात गणपतीला गावी गेलो होतो, आमच्या सुपारीच्या बागेत जिथे नेहमी मोकळी जागा असते तिथे एकाच प्रकारच्या झुडूपांच गचपण माजल होत. त्या झुडूपांवर क्रेपच्या कागदासारखी दिसणारी पांढर्‍या रंगाची नरसाळ्या सारखी सुंदर फ़ुले फ़ुललेली होती. गावातल्या मित्राला त्याच नाव विचारल तर म्हणाला हे पेवाच झाड... आणि शाळेत केवळ घोकंपट्टी करून पाठ केलेल्या "पेव फुटणे" या वाकप्रचारचा अर्थ खर्‍या अर्थाने मला कळला. 

पेवच फुल (Costus speciosus)
Costus speciosus (family:- Zingiberaceae)

       

सुपारीच्या बागेत मला झालेल्या या साक्षात्कारामुळे "पेव" बद्दल कुतूहल निर्माण झाले. पेवच शास्त्रीय नाव Costus speciosus असून त्याच कुदुंब (family) Zingiberaceae आहे. ही "आल्याच्या" (आपण चहात, जेवणात वापरतो ते आलं) कुटुंबातील वनस्पती आहे. आल्यासारखे याचे कंद जमिनीत पसरतात. त्यातुन फ़ुटणारी झुडूपं आजुबाजूची जमिन व्यापून टाकतात. त्याठिकाणी इतर वनस्पतींना वाढायला वाव मिळत नाही. त्यामुळे आपल्याला "पेवच बेट" दिसायला लागत. दरवर्षी जुलै महिन्यात जमिनित असलेल्या कंदांमधून पेव उगवत, सप्टेंबर मध्ये त्याला फुलं येतात आणि नोव्हेंबर मध्ये हे झाड सुकून जा्ते. जेमतेम ४ ते ५ महिन्यांच आयुष्य असलेल हे झुडूप आहे.
पेवच बेट


         पेव ही झुडूप (shrub) या प्रकारात मोडणारी वनस्पती आहे. २ ते ३ मीटर उंच वाढणारी ही वनस्पती दाट सावलीत वाढते. त्यामुळे याच्या पानांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असते.पान १५ ते ३० सेंटीमीटर लांब असतात. दाट झाडीखाली वाढणार्‍या या झुडूपाच्या पानांना झाडीतून झिरपणारा सूर्यप्रकाशाचा कवडसा पकडता यावा याकरीता पेवाच्या पानांची रचना मुख्य दांड्याभोवती सर्पीलाकार (Spiral) गोल जिन्यासारखी केलेली असते. याचा अजून एक फायदा म्हणजे एका पानाची सावली दुसर्‍या पानावर पडत नाही. 

  पेवच्या पानांची सर्पिलाकार रचना        


     पेवच्या बेटाकडे आपल लक्ष वेधले जाते ते हिरव्या बेटावर डोलणार्‍या त्याच्या नरसाळ्या सारख्या दिसणार्‍या पांढर्‍या फुलांमुळे. या फुलांच्या खालच्या बाजूस किरमिजी -लाल रंगाची रुपांतरीत पाने पाहायला मिळतात. पूर्ण फुललेल फुलाचं तोंड खालच्या बाजूला झुकलेल असत. फुल पांढर्‍या रंगाच असून आतल्या बाजूस मध्यभागी पिवळा रंग असतो. यामुळे परागीभवनासाठी येणार्‍या किटकांना मकरंद (मध) कुठल्या दिशेला आहे त्याचे मार्गदर्शन होते. या लांब दांड्याच्या फुलातील मकरंद (मध) पिण्यासाठी / परागीभवनासाठी लांब सोंड असलेल ग्रास डेमन (Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae)  हे फुलपाखरू पेवच्या बेटातून उडतांना दिसत. हे कृष्णधवल रंगाचे फुलपाखरू असून पंखांवर पांढरे ठिपके असतात. या फुलपाखराला सावलीत, जमिनीलगत उडायला आवडते. त्याची सोंड त्याच्या आकाराच्या दुप्पट असते. उडतांना फुलपाखराची सोंड (Probosis) कॉईल सारखी गुंडाळलेली असते. पेवसारख्या लांब दांड्याच्या फुलावर बसल्यावर हे फुलपाखरू आपली सोंड उलगडून फुलातील मकरंद (मध) पिते. निसर्गातील हे परस्परावलंबन आश्चर्यचकीत करणारे आहे.

पेवच फुल आणि त्यावरील ग्रास डेमन फुलपाखरू 









Grass Demon ,family -Skipper/Hesperiidae

      पेवच्या कंदांचा उपयोग प्राचीन काळापासून आयुर्वेदात ताप, दमा, खोकला आणि जंत यावरील औषधात होतो. ज्ञानेश्वरीतही पेवा़चा उल्लेख आलेला आहे.
  
जे भुलीचे भरिव। जे विकल्पाचे वोतिव। किंबहुना "पेव" विंचवाचे॥८-४५॥ ज्ञानेश्वरी.
  










                     





संदर्भ :-   1) Flowers of Sahyadri :- Shrikant Ingahallikar ,  2) महाराष्ट्रातील फुलपाखरे :- डॉ. राजू कसंबे.


"सह्याद्रीतील रानफ़ुलं"  हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.....

21 comments:

  1. फोटो मस्त आले आहेत पण त्याहून महत्वाचे म्हणजे सोप्या भाषेत मांडलेली फुलाची माहिती
    मला हा लेख आवडला.
    एक किरकोळ दुरुस्ती करावी लागेल. ह्या फुलाचे इंग्रजी नाव Castus speciosus असे लिहिले आहे ते Costus speciosus असे आहे. ते कृपया बदलून घे आणि अशीच माहिती इकडे भरत रहा

    ह्या माहिती बद्दल आभारी

    रूपक

    ReplyDelete
  2. very informative . Thank you very much .

    ReplyDelete
  3. aaj parayant PEV = Dhanyache Kothar mahit hote, zudup hi asate he aajch samajale.

    ReplyDelete
  4. याची पानाची भाजी बनवून खातात असे ऐकले आहे.

    ReplyDelete
  5. छान माहिती!!
    धन्यवाद

    ReplyDelete
  6. खरंतर आज योगायोगाने हा लेख वाचायला मिळाला. सहज म्हणून गुगलवर पेव फुटणे टाकले आणि हा लेख वाचायला मिळाला.

    आपण खूप मेहनत घेऊन छान माहिती संकलित केली आहे. त्यामुळे आज माझ्या ज्ञानात भर पडण्यास मदत झाली. लहानपणापासून गणपतीत कित्येकदा हि 'पेयाची' फुले बघितली होती. पण आज समजले तो 'पेव्याची फुले' चा अपभ्रंश असावा. त्याचमुळे आज मला पेव फुटणे आणि हि फुले ह्यांचा संबंध समजला.

    धन्यवाद 🙏🖋

    ReplyDelete
  7. खूपच छान माहिती सर,तुमच्या मूळे आम्हाला अशी नवीन नवीन माहिती मिळते...नितीन

    ReplyDelete
  8. उपयुक्त माहिती 👍

    ReplyDelete
  9. पेव फुटणे हा वाक्प्रचार माहित होता; पण पेव नावाची फुले असतात हे आजच समजले. छान माहिती

    ReplyDelete
  10. खुप छान माहिती आहे.

    ReplyDelete
  11. नरेंद्र सोनवणेAugust 10, 2021 at 2:31 AM

    चित्रासहीत दिलेली माहिती खूपच छान आणि उपयुक्त आहे. अमित धन्यवाद

    ReplyDelete
  12. शाळे मध्ये वाकप्रचार ऐकला होता पण त्याचा उलगड़ा आज झाला खुप छान माहिती
    भरत तलवडेकर

    ReplyDelete
  13. सुंदर माहीती. छान संकलन.

    ReplyDelete
  14. अमित सावंत साहेब
    विषय, माहिती संकलन, मांडणी, सादरीकरण , सर्वच अतिशय सुंदर. फोटोजमुळे लहानपणापासून पहात असलेल्या या फुलां बद्दल अगदी बारीक सारीक माहिती मिळाल्यामुळे त्यांच्याबद्दलचा चांगला उलगडा झाला आणि त्यामुळे आता पेव फुलांमध्ये जास्तच कुतुहल आणि आकर्षण वाटू लागले आहे आणि हीच आपल्या कार्याची पोहोचपावती आहे.

    ReplyDelete
  15. Masta mahiti sir

    ReplyDelete