Pages

Thursday, July 4, 2024

भीम - बकासूर युध्द आणि विखुरलेले तांदूळ

 

भीमाच्या पाऊलाचा ठसा

महाभारत काळात भीमाने बकासुराचा वध केला ती एकचक्र नगरी म्हणजेच आताचे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे गाव असे मानले जाते. या एरंडोल पासून १० किलोमीटरवर आणि जळगाव पासून ३१ किलोमीटर अंतरावर पद्मालाय नावाचे गणपतीचे प्रसिद्ध देवस्थान आहे. मंदिराच्या प्रवेश्वदाराजवळ मोठं धान्य दळण्याचे मोठ जातं आहे. मंदिराच्या बाजूला असलेल्या तलावात वर्षभर विविध रंगाची कमळ फुललेली असतात म्हणून हे पद्मालंय. या पुरातन मंदिरात उजव्या आणि डाव्या सोंडेच्या गणपतीच्या मूर्ती एकाच गर्भगृहात आहेत. याला अर्धपीठ म्हटले जाते. मंदिरात पितळेची मोठी घंटा आहे.

 

पद्मालय


मंदिराच्या मागाच्या बाजूस मंदिरापासुन १.५ किलोमीटर अंतरावर एका ओढ्यात भीमकुंड आहे. दाट जंगलाची पार्श्वभूमी असलेल्या एका ओढ्यात (भीमच्या) पायाच्या आकाराचे कुंड आहे. भीमकुंडा पर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात पाऊलवाट आहे. भीमाने बकासुरचा वध याच परिसरात केला होता असे मानले जाते.

 

भीम कुंड 

त्याचा पुरावा म्हणून ओढ्यात असलेला भीमच्या पायाचा ठसा (त्यामुळे तयार झालेले भीम कुंड ) दाखवतात, तसेच कातळात असणारे "तांदूळ" दाखवतात. महाभारतातल्या कथेनुसार एकचक्र (एरंडोल ) गावाच्या रहिवाश्यां ऐवजी अन्नाने भरलेला गाडा घेऊन भीम बकासुराला भेटायला गेला. त्यानंतर त्यांच्यात झालेल्या युद्धात गाडा उलटला आणि गाड्यातले तांदूळ विखूरले. ते तांदुळ आजही कातळावर दिसतात असे इथले लोक मानतात. भीमकुंडाकडे जातंना पायर्‍या संपल्यावर पाऊलवाट चालू होते तेथून भीमकुंडापर्यंत हे स्फटीक असलेले दगड पाहायला मिळतात.

 

"मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट"

विखुरलेले तांदूळ (Mega porphyry Besalt)


या ठिकाणी "मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट" ( Mega porphyry Besalt)  आहे. महाराष्ट्रात  बेसॉल्ट हा अग्निजन्य खडक मोठ्या प्रमाणावर आढळतो. ज्वालामुखीच्या स्फोटानंतर लाव्हारस जमिनीच्या पोटातून बाहेर येऊन जमिनीवर पसरतो. त्या पासून बेसॉल्ट या अग्निजन्य खडकाची निर्मिती होते. हा लाव्हारस हवेच्या किंवा पाण्याच्या संपर्कात येऊन लवकर थंड झाल्यास त्यातील खनिजांचे स्फटीक बनण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या बेसॉल्ट खडकामध्ये स्फटीक असले तरी ते मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात. आपल्या डोळ्यांना मात्र काळा कातळच दिसतो.

 


लाव्हारस जमिनीतून बाहेर आल्यावर, त्यावर अजून एखादा लाव्हारसाचा थर जमा झाला तर, खालचा लाव्हारस हळूहळू थंड होतो. त्यामुळे  खनिजांचे स्फटीक बनण्यास पुरेसा वेळ मिळतो आणि ३ ते ४ सेंटीमीटर लांब आणि साधारणपणे १ सेंटीमीटर रुंद असे आयताकृती खनिजांचे स्फटीक तयार होतात. अशा प्रकारच्या दगडाला "मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट" असे म्हटले जाते. कालांतराने हा दगड भूपृष्ठावर आल्यावर त्या दगडात पांढर्‍या रंगाचे स्फटीकांचे तुकडे दिसायला लागतात.

 

Bheem Kund

भीमकुंड परिसरात दिसणारे विखुरलेले तांदुळ म्हणजेच हा "मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट" आहे. कुठल्यातरी काळातल्या चतूर माणसाने हा दगड पाहून याला महाभारतातल्या भीम - बकासूर युध्दाची कथा चिकटवली आणि या दंतकथेचा जन्म झाला.

 

या प्रकारचा मेगा पॉरफॅरी बेसॉल्ट" ( Mega porphyry Besalt)  खडक पुरंदर किल्ल्यावर वरच्या टप्प्यातही आढळतो. तसेच महाराष्ट्रात बरेच ठिकाणी पाहायला मिळतो.

  

मेगा-पॉरफॅरिटीक बेसॉल्ट

 भीमकुंड परिसर सुंदर आहे. या परिसरात दाट जंगल आहे. वाहात्या ओढ्याच्या काठी थोडावेळ विश्रांती घेऊन पायर्‍या चढून पुन्हा पद्मालय परिसरात आलो. मंदिर परिसरात ताज्या माव्याचे अप्रतिम मोदक मिळतात. बकासूराचे स्मरण करत इथली इथली तिखट जाळ मिसळ आणि मोदक खाऊन जळगावच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु केला. जळगावला गेलात तर महाभारताच्या कथेत गुंफ़लेल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऎनारी गुहा (बकासूर वाडा) येथेही भीम आणि बकासुराचे युध्द झाले असे मानले जाते .  

विशेष आभार :- बोरकर सर आणि अभिजीत घोरपडे सर



महाभारतातील विराट नगर " हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.


" सेंट मेरीज आयलंड , ऊडुपी " हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.