Pages

Wednesday, November 30, 2022

महाभारतातील विराट नगर ( Virat Nagar , the Ancient city in Mahabharat )

 

विराट नगर

जयपुरला तिसर्‍यांदा जात होतो. त्यामुळे जयपुर मधील नेहमीची प्रसिध्द स्थळे पाहाण्या ऐवजी वेगळी ठिकाण शोधत असताना "विराट नगर" सापडल. महाभारतातील विराट पर्वात उल्लेख असलेले विराट नगर ते हेच असा येथिल लोकांचा दावा आहे. भारतात अनेक प्राचीन गावांशी रामायण , महाभारतातल्या कथा जोडलेल्या आहेत त्यापैकी हे एक गाव.  जयपूरच्या आसपास  फ़िरतांना महाभारतातल्या कथांशी संबंधित अनेक ठिकाण आढळली.  त्यातही पाच पांडवां पैकी भीमाशी संबधित ठिकाण जास्त आढळली.

 जयपुर जवळील प्रसिध्द मंदिर खाटू श्यामजी . याची कथाही महाभारत आणि भीमाशी निगडीत आहे. भीमाला हिडींबेपासून झालेला मुलगा घटोत्कच. घटोत्कच आणि त्याची पत्नी अहिलावती यांना अंजनपर्व , मेघवर्ण आणि बर्बरिक ही तीन मुले होती.  त्यातील बर्बरिक देवी भक्त होता. त्याला देवीकडून तीन दिव्य बाण मिळाले  होते. महाभारताचे युध्द चालू होण्यापूर्वी बर्बरिकने त्याच्या आईला वचन दिले होते, " युध्दात जो हरेल त्याच्या बाजूने मी लढेन". (हारे का सहारा)

 ही गोष्ट श्रीकृष्णाला कळली , जर बर्बारिक, आईला दिलेल्या वचना प्रमाणे हरणार्‍या कौरवांच्या बाजूने लढला तर त्याच्याकडे असलेल्या तीन दिव्य बाणांमुळे तो युध्दाचा निकाल बदलून टाकेल . हे टाळण्यासाठी श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे रुप घेतले आणि तो बार्बरिकला भेटायला गेला.  त्याच्या कडील  दिव्य बाणांची परिक्षा घेण्यासाठी श्रीकृष्णाने समोर दिसणार्‍या पिंपळाच्या झाडाच्या सर्व पानांना भोक पाडायला सांगितले. त्याप्रमाणे बर्बारिकने सोडलेल्या बाणाने झाडाच्या सर्व पानांना भोक पाडून तो  बाण ब्राम्हणाच्या पाया जवळ आला. कारण श्रीकृष्णाने एक पान पाया खाली लपवलेले होते. श्रीकृष्णाने पानावरुन पाय काढताच बाणाने त्या पानाचाही वेध घेतला. बाणाची दिव्य शक्ती पाहून ब्राम्हणरुपी श्रीकृष्णाने बार्बारिककडे दान मागितले. बर्बरिकने काय हवे ते माग असे सांगितल्यावर श्रीकृष्णाने त्याचे शिर दान म्हणून मागितले. हे विचित्र दान ऐकल्यावर बर्बरिकला कळले या ब्राम्हणाच्या वेषात दुसरेच कोणीतरी आहे. त्याने ब्राम्हणाला मुळ रुपात प्रकट होण्याची विनंती केली. समोर साक्षात श्रीकृष्णाला पाहून त्याने आपले शिर त्याला अर्पण केले.  श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले की कलियुगात तू माझ्या "श्याम" या नावाने पूजला जाशील. आता राजस्थानातील खाटू  या गावात बर्बरिक म्हणजेच "खाटू श्यामचे" मंदिर आहे. बर्बारिकने श्रीकृष्णाला युध्द पाहायचे आहे असे सांगितले. श्रीकृष्णाने त्याचे शिर खाटू जवळील उंच टेकडीवर ठेवले तेथून त्याने युध्द पाहिले

 

पांडू पोल, सरिस्का


महाभारतातील दुसरी प्रसिध्द कथा म्हणजे भीमाचे हनुमंताने केलेले गर्वहरण. ही सुध्दा याभागात घडली असे मानले जाते. सरिस्का अभयारण्यात " पांडू पोल " नावाची जागा आहे . (पोल म्हणजे दरवाजा इथे खिंड या अर्थी ) या खिंडीत ही प्रसिध्द घटना घडली असे मानले जाते. याठिकाणी हनुमान मंदिर आणि त्या जवळून वाहाणारा बारमाही झरा आहे.

 महाभारतातील विराट पर्वात  उल्लेख असलेली तिसरी घटना म्हणजे पांडव अज्ञातवासात वेष बदलून एक वर्ष विराट राजाच्या पदरी राहीले .अर्जुनाला मिळालेल्या शापामुळे त्याचे बृहन्नडा मध्ये रूपांतर झाले होते. त्याने राजकन्या उत्तरा हिची नृत्यशिक्षिका म्हणून भूमिका निभावली. युधिष्ठिराने कंक या नावाने विराट राजाचे मंत्रीपद हाती घेतले होते. द्रौपदी ही विराट नरेशाची पट्टराणी सुदेष्णा हिची केशभुषाकार म्हणून राहीली होती. नकुल हा अश्वपाल तर, सहदेव हा गोशाळा सांभाळत होता. भीम हा बल्लव म्हणुन भोजनगृहात काम करत होता. विराट नगर मध्ये एक टेकडी भीम डुंगरी नावाने  प्रसिध्द आहे.

 

Remains of Stupa, Virat Nagar

सध्याचे विराट नगर (बैराट) हे गाव हायवेच्या आसपास वसलेल्या टिपिकल गावांसारखेच आहे. गावातील सर्व प्राचीन , मध्ययुगीन अवशेष मात्र गावापासून दूर असलेल्या टेकड्य़ांवर व त्याच्या आसपास पसरलेले आहेत.  प्राचीन मंदिर आणि बौध्द स्तुप असलेली "बिजक की पहाडी" , गणपती मंदिर आणि संग्रहालय, सम्राट अशोकाचा शिलालेख, भीम की डुंगरी, मुगल गेट आणि जैन मंदिर ही  ऐतिहासिक ठिकाण आदिमानव काळापासून ते आज पर्यंत या मोठ्या कालखंडाच्या खूणा बाळगून आहे.

 

बिजक की पहाडीची पायवाट

विराट नगर भटकंतीची सुरुवात "बिजक की पहाडी" या स्थानिक नावाने ओळखल्या जाणार्‍या टेकड्यांच्या रांगापासून झाली. गावाबाहेर असलेल्या या टेकड्यांच्या पायथ्याशी जाण्याकरिता पक्का रस्ता बनवलेला आहे . रस्ता जिथे संपतो तिथे मोठ मोठ्या खडकांनी बनलेल्या टेकडीच्या पायथ्याशी आपण पोहोचतो.  पायथ्यापासून एक फ़रसबंदी चढणाचा रस्ता टेकडीवर जातो. पहिली टेकडी चढून गेल्यावर थोडी सपाटी लागते. इथून चारही बाजूला अरवली पर्वताची डोंगर रांग दिसते.   उजव्या बाजूला एका टेकडीवर भगवा ध्वज फ़डकताना दिसतो. त्या दिशेने चढ चढतांना वाटेत अनेक वेगवेगळ्या आकाराचे खडक आजूबाजूला पाहायला मिळतात. या भागात लोकांचा वावर नसल्याने पक्षीही भरपूर प्रमाणात आहेत आणि तेही जवळुन पाहायला मिळतात. हे सर्व पाहात १५ ते २० मिनिटात   मगरीच्या तोंडा सारख्या दिसणार्‍या एका मोठ्या दगडापाशी पोहोचलो. मगरीने जबडा उघडावा तसा त्याचा आकार होता. मगरीच्या नागपुड्याच्या भोकांसारख एक मोठा खड्डाही त्या दगडाला पडला आहे.  या दगडाखाली असलेल्या गुहेत श्रीराम मंदिर आहे. पांडवांनी अज्ञातवासात असतांना याची स्थापना केली अशी लोकांची श्रध्दा आहे.  गुहेत जाऊन श्रीरामच दर्शन घेऊन थोडावेळ आजूबाजूचा परिसर पाहात आणि शांतता अनुभवत बसून राहिलो.

 

श्रीराम मंदिर, बिजक की पहाडी


मंदिराच्या टेकडीच्या वरच्या बाजूला असलेल्या टेकडीला कुंपण घातलेले होते. पुढचा टप्पा चढून कुंपण पार करुन सपाटीवर प्रवेश केला . या भागात पूरातत्व खात्याने उत्खनन करुन शोधून काढलेला बौध्द स्तुप,  भिख्खुंच्या राहण्याच्या जागा , पाण्याचे कुंड यांचे अवशेष आहेत. बौध्द स्तुप आज अस्तित्वात नसला तरी त्याचा पाया आणि प्रदक्षिणा मार्ग पाहायला मिळातो.  स्तुपाचा व्यास ८.२३ मिटर असुन त्याचा घुमट २६ अष्टकोनी खांबावर तोललेला होता. हे खांब बसवण्यासाठी असलेल्या खाचां आजही पाहायला मिळतात . या खाचांमुळे एखाद्या दाते (Gear) असलेल्या यंत्राच्या चाकाप्रमाणे स्तुपाचे अवशेष दिसतात. स्तुपा जवळ असलेला सम्राट अशोकाचा शिलालेख इसवी सन १८४० मध्ये ब्रिटिश सेनाधिकारी कॅप्टन बर्ट याने कलकत्त्याच्या राष्ट्रीय संग्रहालयात नेऊन ठेवला. आजही  तो तिथे पाहायला मिळतो.

Remains of Virat Nagar


Water tank at Bijak ki Pahadi


विराट नगरच्या इतिहासात डोकावल्यास , ख्रिस्तपूर्व पाचवे ते सहावे शतकातील घडामोडींनी प्राचीन भारत खंडाच्या इतिहासावर मोठा प्रभाव टाकलेला आहे. सिंधू संस्कृतीचा र्‍हास झाल्यावर तेथील लोक पूर्वेकडे यमुना आणि गंगेच्या खोर्‍यापर्यंत आणि दक्षिणेकडे पसरले. त्यांनी लहान वसाहती आणि खेडी तयार केली, त्या वसाहती किंवा गावांना 'जनपद' असे म्हणतात. कालांतराने ज्या जनपदांची अर्थव्यवस्था, व्यापार मजबूत होता. त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्यदल उभारली.आणि शेजारील कमजोर व लहान जनपदे जिंकून आपल्या राज्यात सामील करून घेतली. अशी लहान लहान जनपदे मिळून तयार झालेल्या मोठ्या राज्यांना 'महाजनपदे' म्हणून ओळखले जाऊ लागले. अशी छोटी छोटी १६  राज्ये स्थापन झाली . ती "१६ महाजनपद" या नावांने ओळखली जातात.  बौध्द आणि जैन ग्रंथात  १)अंग, २) अस्माक,३) अवंती, ४) चेडी, ५) गंधर्व, ६)काशी, ७) कंबोज, ८) कोसला, ९) कुरु , १०) मगध, ११) मल्ल , १२) मत्स्य , १३) पांचाल, १४)सुरसेना, १५) वाज्जी, १६) वत्स  या १६ महाजनपदांचा उल्लेख येतो.


 

१६ महाजनपद, Courtesy google.com

प्राचीन भारतात  १६ महाजनपदे होती. त्यातील मत्स्य महाजनपद हे आजच्या जयपुर, अलवार , भरतपुर या भागात पसरलेले होते . विराट राजाने स्थापन केलेले विराट नगर ही  मत्स्य महाजनपदाची राजधानी होती.  मौर्यांच्या काळात विराट नगर हे भारतातले प्रमुख शहर आणि बौद्ध धर्माचे मोठे केंद्र होते.  त्याच काळात या स्तुपाची निर्मिती करण्यात आली.

Cave temple, Virat Nagar
 

स्तुपाचे अवशेष असलेल्या टेकडीच्या वर चढून गेल्यावर , एक गुहा मंदिर पाहायला मिळते. या परिसरात झालेल्या उत्खननात विटांचे काही चौथरे पाहायला मिळतात. येथून खालच्या टेकडीवर दिसणार्‍या  स्तूपाच्या अवशेषाकडे पाहिल्यावर (Arial View) काहीतरी गुढ चिन्ह ,आकार दिसायला लागतो. पुरातत्व खात्याने हा संपूर्ण परिसर स्वच्छ, सुंदर , नीटनेटका आणि सुशोभित ठेवलेला आहे. 

 

गणेश मंदिर, विराट नगर

बिजक की पहाडी उतरुन संग्रहालय आणि गणपती मंदिर पाहाण्यासाठी गावात शिरलो. गावातील अरुंद रस्त्यावरुन वाट काढत . एका टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो . ही टेकडी पण मोठमोठ्या खडकांनी बनलेली होती. या टेकडीच्या पायथ्याशी एक तलाव व संग्रहालय आहे. टेकडीच्या अर्ध्या उंचीवर स्वयंभु गणेश मंदिर आहे. इथले वातावरण बिजक की पहाडीच्या एकदम विरुध्द होत. तिथे एवढ्या मोठ्या परिसरात आम्ही दोघच होतो. इथे मात्र प्रचंड गर्दी होती, टेकडी खालचे पार्कींग फ़ुल होते. प्रसाद, हार विकणारी दुकान आणि त्यामध्ये असलेली गर्दी यातून वाट काढत गणपतीचे दर्शन घेतले . पायथ्याशी असलेल्या संग्रहालयात शिरलो. संग्रहालय अतिशय सुंदर आहे. विराट नगरचा इतिहास वस्तू रुपात खूप चांगल्या प्रकारे मांडलेला आहे, सोबत पूरक माहितीही लिहिलेली आहे.  

 

Clay Objects, Virat Nagar 

Punch Marked Coins, Virat Nagar

Indo Greek Coins, Virat Nagar

विराट नगरच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरांवर अनेक गुहा आहेत. या गुहांमधून आदिमानवाचे वास्तव्य होते. इसवी सन १८७१ -७२ मध्ये कॅनिंग हॅम यांनी विराट नगर मधील अवशेष शोधून काढले.  या गुहांमध्ये आणि या परिसरात पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात  मिळालेल्या अश्मयुगीन दगडी हत्यारांवरून अश्मयुगीन मानवाचे वास्तव्य या ठिकाणी एक लाख ते पन्नास हजार वर्षांपूर्वी पासून होते असे मत श्री एन.आर. बॅनर्जी यांनी मांडले आहे. त्यांनी कैलास नाध दीक्षित यांच्याबरोबर या ठिकाणी १९६०-६२ मध्ये उत्खनन केले होते .  विराट नगर येथे केलेल्या उत्खननात विविध काळातील दगडी हत्यारे, मातीचे भांडी, मूर्ती, विटा, दागिने, लोखंडाची हत्यारे सापडली  आहेत .  याशिवाय  अनेक प्रकारची आणि वेगवेगळ्या  काळातील नाणी सापडलेली आहेत. यात Punch Mark coins, Indo Greek coins ( यावर ग्रीक आणि खरोष्टी लिपीत मजकूर लिहिलेला आहे ), मुघलांची नाणी  इत्यादी आहेत.  या सर्व गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित मांडून ठेवलेल्या आहेत इसवी सन ६३४ मध्ये चिनी प्रवासी ह्यूएनत्संग  (युआनच्वांग)  विराट नगरला आला होता. त्याने त्याच्या प्रवास वर्णनात विराट नगरचा उल्लेख केलेला आहे. संग्रहालय पाहाण्यसाठी शुल्क नाही , तरीही बाहेर एवढी गर्दी असूनही संग्रहालय पहायला मात्र दोन चार जणच आले होते.  आपल्याच संस्कृती,  इतिहासा बद्दल असलेली अनास्था दुसर काय ?

संग्रहालय बघितल्यावर पुढची तीन ठिकाण गावाच्या दुसऱ्या भागात होती. भीम डुंगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर "सम्राट अशोक शिलालेख" अशी दिशा दर्शक पाटी पाहून त्या दिशेने चालत निघालो. पुरातत्व खात्याने तिथे जाण्यासाठी पायावाट व्यवस्थित बांधून काढलेली आहे. ज्या दगडावर शिलालेख होता त्यावरही काँक्रीटची शेड बांधलेली आहे. पण शिलालेख मात्र त्या ठिकाणी नाही.

सम्राट अशोक शिलालेख,

पुन्हा रस्त्यावर येऊन भीम डुंगरीच्या पायाथ्याशी आलो. या डोंगरावर भीमाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत. डोंगराच्या पायथ्याशी गुहा आहे त्यात भीम वास्तव्य करत होता, पाऊलाच्या आकाराचे  पाण्याचे कुंड आहे. भीमाने लाथ मारून ते कुंड निर्माण केले असे समजले जाते. डोंगराच्या मध्यावर एका गुहेत ११ मुखी शिवलिंग आहे. तिथेच भीमाचे आणि हनुमंताचे देऊळ आहे. भीम आणि हनुमंत हे दोघेही पवनपुत्र, त्यांचे एकत्र देऊळ भारतात केवळ या ठिकाणी आहे. या डोंगरावर अनेक गोलाकार मोठ्या आकाराचे खडक आहेत त्यांना भीम गट्टे म्हणतात. भीम याने खेळत असे . या दगडांना पडलेले खड्डे त्याच्या बोटांमुळे पडले आहेत असे स्थानिक लोक मानतात.

 


भीम डुंगरी उतरुन मुघल गेट म्हणजेच पंचमहाल जवळ पोहोचलो. हा पंच महाल आमेरच्या राजाने शाही यात्रींसाठी बांधला होता. अजमेरला जातांना आणि या परिसरात शिकारीला आल्यावर  अकबर या ठिकाणी थांबत असे. या दुमजली महालात घुमटाकार छत असलेल्या खोल्या आहेत. छतांवर आणि भिंतींवर नक्षीकाम केलेले आहे. महाला समोर कारंजे आहे.  मुघल स्थापत्य शैलीत बांधलेल्या या महालावर असलेल्या पाच छत्र्यांमुळे हा महाल पंचमहाल म्हणून ओळखला जातो.    

मुघल गेट (पंचमहाल)


जैन मुनी विमल सुरी यांनी विराट नगरच्या डोंगरात तपश्चर्या केली. विराट नगर मध्ये आजही भव्य जैन मंदिर आहे. विराट नगर मध्ये असलेले जैन नासिया मंदिर १६ व्या शतकात बांधले होते. मुघल गेट समोर असलेल्या या जैन मंदिराच्या बांधणीवर मुघल स्थापत्य शैलीचा प्रभाव दिसून येतो.

 

Jain Temple , Virat Nagar


Adinatha, Virat Nagar


विराट नगर मधील हिंदू, बौध्द, जैन आणि मुस्लिम धर्माचे वेगवेगळ्या काळातील अवशेष, वास्तू पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. 

 

 

जाण्यासाठी :-

 विराट नगरला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर ते विराट नगर हे अंतर १०३ किलोमीटर आहे.  या भागात बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.

जयपूर - भानगड -  विराट नगर हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.

"सरीस्का व्याघ्र प्रकल्प" विराट नगर पासून १५ किलोमीटरवर आहे. त्यामुळे सरिस्का जवळ राहुनही "विराट नगर" पाहाता येते.


1) "झपाटलेला (?) किल्ला,  भानगढ  (Bhangarh , the most haunted (?) fort)" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

https://samantfort.blogspot.com/2022/11/bhangarh-haunted-fort.html


2) "भीम - बकासूर युध्द आणि विखुरलेले तांदूळ" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

https://samantfort.blogspot.com/2024/07/blog-post.html


3) "राणाप्रतापांच्या पाऊलखुणांवर" हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा

https://samantfort.blogspot.com/2017/06/blog-post_16.html

  


Shree Ram Mandir built by Pandava


Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right

कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5

Saturday, November 12, 2022

झपाटलेला (?) किल्ला, भानगढ (Bhangarh , the most haunted (?) fort)

Bhangargh , Rajasthan
Hounted (?) Bhangarh

सह्याद्रीत किल्ले भटकताना रात्रीचा मुक्काम किल्ल्यावर असला की, जेवण झाल्यावर शेकोटी भोवती भुतांच्या गोष्टींचा फड जमतो. ग्रुप मध्ये भुतांच्या गोष्टी  रंगवून सांगणारा कोणतरी असतोच. खऱ्या खोट्याची शहानिशा नको म्हणून सहसा ही भूत दुसऱ्याला किंवा मित्राला दिसलेली असतात. रात्र चढत जाते  तशा या गोष्टी रंगत जातात. हळूहळू खूप दमलोय, उद्या ट्रेक करायचा आहे इत्यादी कारणे सांगून काही धीट (?) लोक झोपायला जातात. जे घाबरले नाहीत असं दाखवत असतात तेही हळूहळू शेकोटीच्या जवळ सरकतात किंवा जंगल आणि उघड्यावरचा भाग सोडून पाठीमागे मंदिर किंवा आडोसा असेल अशा जागी बसतात.

Bhangargh, Rajastan
बालेकिल्ला, भानगढ

 किल्ल्यावर रात्री  चालणाऱ्या भुतांच्या गोष्टी पुन्हा आठवण्याच कारण म्हणजे त्यावेळेस सरिस्का व्याघ्र प्रकल्पाला भेट देतांना आजुबाजूला कोणते  किल्ले पाहता येतील ते शोधत होतो.  त्यात भानगढ दिसला . भारतातला सगळ्यात जास्त "हॉंटेड" म्हणजेच "झपाटलेला" किल्ला. या किल्ल्याबद्दल जेवढं वाचायला लागलो , व्हिडिओज बघितले त्यात किल्ला कसा हॉंटेड आहे. अनेक लोकांना तिथे कसे अमानवीय शक्तीचे अनुभव आलेत यावरच भर देण्यात आला होता. किल्ल्याच्या इतिहासा बद्दल किंवा त्याच्या सद्यस्थिती बद्दल फ़ारच कमी माहिती होती.  त्यामुळे हा किल्ला प्रत्यक्ष जाऊन बघायण्यासाठी जयपुरहुन भानगढ गाठले.

जयपुर जवळील आमेर येथील कछवाह वंशाच्या राजा भगवंतदास (१५३७ - १५८९) यांनी भानगढ किल्ल्याची निर्मिती केली. राजा भगवंतदास मुघल सम्राट अकबराचे पंचहजारी मनसबदार होते. त्यांच्या पश्चात मुलांमधे वाटाण्या झाल्यावर मोठा भाऊ मानसिंह (अकबराच्या नवरत्नांतील एक) आमेरचा राजा बनले आणि धाकट्या माधोसिंहच्या वाटेला भानगढचा परिसर आला. त्यांनी या किल्ल्याला आपली राजधानी बनवली. भानगढ किल्ल्याची भरभराट झाली. किल्ल्यात आजही असलेल्या बाजारपेठेवरुन आणि किल्ल्यातील वास्तूंवरुन याची कल्पना येते. मग असा नांदता, भरभराटीला आलेला किल्ला अचानक ओस का पडला याचे कारण जनमानसात प्रचलित असलेल्या दंतकथां मध्ये सापडते.. 

Bhangargh Fort Rajasatan
टेहळणी चौकी (तांत्रिकाचा वाडा ? )

एका दंतकथे प्रमाणे आज भानगढ ज्या डोंगरावर आहे तेथे बाबा बालकनाथ नावाचे  एक तपस्वी साधू राहात होते.  किल्ला बांधण्यासाठी राजा त्यांचा आशिर्वाद आणि परवानगी मागण्यासाठी गेला. साधूने राजाला एका अटीवर किल्ला बांधण्याची परवानगी दिली ती म्हणजे , किल्ल्यावरील कुठल्याही वास्तूची सावली त्यांच्या कुटीवर पडता कमा नये. राजाने अट मान्य करुन भानगढ किल्ला बांधाला . पुढील काळात राजाचे वंशज साधूची अट विसरून राजमहालाची उंची वाढवत गेले.  त्याची सावली साधूच्या कुटीवर पडून अट मोडली . त्याक्षणी किल्ल्यात असलेल्या संपूर्ण शहराचा आणि पर्यायाने किल्ल्याचा विनाश झाला. साधूच्या शापामुळे ही जागा निर्जन झाली . किल्ला का ओस पडला याचे उत्तर या दंतकथेतून मिळत असले तरी , भानगढ किल्ला अघोरी शक्तीच्या सावटाखाली कसा आला हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.

त्याचं उत्तर आपल्याला दुसऱ्या दंतकथेत मिळतं. त्यानुसार सिंघा नावाचा एक वासनांध तांत्रिक होता. काही देणगी पदरी पाडून घेण्याच्या इराद्याने तो राजदरबारी गेला. तिथे त्याची नजर राणी रत्नावतीवर पडली. तिला बघून तांत्रिक वेडापिसा झाला आणि मग तिला मिळवण्यासाठी त्याने एक कारस्थान रचलं. मंत्राने भारलेली तेलाची कुपी त्याने राणीच्या दासीकडे दिली आणि निरोप पाठवला की हे तेल अंगास लावल्यास राणीला अलौकिक सौंदर्याचा लाभ होईल. दासी कुपी घेऊन राणीकडे गेली. तिने तांत्रिकाचा निरोप राणीला सांगितला.  कुपीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे मंत्र, तंत्र जाणणाऱ्या राणीला शंका आली. तिने ती कुपी एका अजस्र शिळेवर आपटली. कुपी फुटली. त्यातील तेल शिळेवर सांडलं तत्क्षणी शिळा घरंगळत खाली गेली आणि नेमकी झुडूपामागे लपून राणीला बघणाऱ्या तांत्रिकाच्या अंगावर पडली. शिळे खाली दबलेल्या तांत्रिकाने मरण्याआधी शाप दिला. 'संपूर्ण भानगढ़ नष्ट होईल आणि या परिसरात यापुढे कोणीही मनुष्य जिवंत राहू शकणार नाही. असे म्हणतात की त्याचा शाप खरा ठरला आणि नंतर थोड्याच दिवसात किल्ल्यावर शत्रूने आक्रमण केलं. त्यात राजपरिवारातील मंडळीसह इथली सगळी रयत मारली गेली. एवढं होऊनही तांत्रिकाचा आत्मा मुक्त झाला नाही.  तो आजही किल्ल्यात भटक्त असतो आणी त्याला अटकाव करण्यासाठी राणी रत्नावतीचा आत्माही किल्ल्यात अजून आहे. 

जनमानसांत प्रचलित या दंतकथां पेक्षा इतिहास वेगळा आहे . माधो सिंहा नंतर त्याचा मुलगा छत्र सिंह भानगढचा राजा झाला. त्याच्या नंतर त्याचा मुलगा अजब सिंह ( जवळच असलेला अजबगढ किल्ला यानेच बांधला) आणि त्यानंतर हरीसिंह भानगढचे राजे झाले. औरंगजेबाच्या काळात हरीसिंहाची दोन्ही मुले मुसलमान झाली. त्याच काळात किल्ल्यात मशिद आणि किल्ल्याबाहेर मकबरा बांधण्यात आला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल सत्ता खिळखिळी झाली त्याचा फ़ायदा घेत महाराजा सवाई जयसिंहानी भानगढवर हल्ला करुन हरीसिंहाच्या दोम्ही मुलांना मारुन टाकले . युद्धात  भानगढची अपरिमित हानी झाली. राज्याची घडी विस्कटली, किल्ल्याचा राजधानीचा दर्जा गेल्याने व्यापार उदीम थंडावला , परिस्थिती हळूहळू खालावली. त्यात अठराव्या शतकात आलेल्या दुष्काळाची भर पडली. त्यामुळे किल्ल्यातील जनता हळूहळू जयपूर, अजबगढ. अलवार इत्यादी जवळपासच्या समृध्द राज्यात स्थलांतरीत झाली.

Haunted Bhangargh Fort
भानगढ किल्ला

आरवली पर्वताच्या पायथ्याला भानगढ किल्ला आहे. किल्ल्याला मागील बाजूने डोंगराचे संरक्षण आहे. भानगढ गावाच्या बाजूने किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी चार ठिकाणी वेगवेगळ्या उंचीवर किल्ल्याला तटबंदी बांधलेली आहे. किल्ल्याच्या सर्वात बाहेरील तटबंदीत चार दरवाजे आहेत. लाहोरी (पोल) दरवाजा, हनुमान पोल (दरवाजा) ,  फ़ुलवारी पोल  आणि दिल्ली पोल. सध्या आपण हनुमान (पोल) दरवाजातून किल्ल्यात प्रवेश करतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला हनुमानाचे मंदिर आहे. या मंदिरावरुन दरवाजाला हनुमान (पोल) दरवाजा हे नाव पडलेले आहे.  मुर्ती असलेले किल्ल्यातील हे एकमेव मंदिर आहे. तिथे आजही पूजाअर्चा चालते. किल्ल्यातील बाकीच्या चारही मंदिरात मुर्ती नाही. हनुमान गेट जवळ पूरातत्व खात्याचे कार्यालय आहे तिथून तिकिट घेऊन ( रोख रक्कम भरल्यास २५/- आणि ई पेमेंट केल्यास २०/- )  किल्ल्यात प्रवेश करता येतो.  येथे पूरातत्व खात्याने किल्ला बघण्याची वेळ सुर्योदय ते सुर्यास्त अशी लिहिलेली आहे . इतर ठिकाणी वेळ लिहिलेली असते पण याठिकाणी अशी पाटी का लावली असावी. किल्ला झपाटलेला आहे म्हणणार्‍यांचा पहिला मुद्दा हाच असतो. पूरातत्व खात्याने  किल्ला अतिशय सुंदर ठेवला आहे. परिसराची साफ़सफ़ाई , राखलेले गवत (लॉन), फ़ुलझाडं,  ठिकठिकाणी खाजगी सुरक्षा रक्षक हे प्रसन्न वातावरण पाहून पहिल्या नजरेत  हा किल्ला  झपाटलेला आहे हे पटत नाही. 

Bhangarh Fort
भानगढ

किल्ल्याची अधिक माहिती मिळावी आणि मला पडलेले काही प्रश्न विचारता यावेत यासाठी सोबत  गाईड घेतला,  पण किल्ला किती भुताटकीने भारलेला आहे हे सांगण्याच्या नादात त्याने कथांचे जे  चर्‍हाट सुरु केले ते एकट्या दुकट्या माणसाच्या मरणाच्या कथेपासून शेवटी शेवटी (आम्ही घाबरत नाही बघुन) एकाच वेळी हजारो माणस मरण्यापर्यंत प्रमाण त्याने वाढवत नेले. किल्ल्याचा इतिहास , वास्तू याबद्दल थोडक्यात सांगून तो जो भूतकथांमध्ये शिरला तो बाहेरच येईना. त्याची गाडी किल्ल्याकडे वळवण्याचा प्रयत्न अनेक वेळा करुन पाहीला पण तो अयशस्वी झाला.  अशा कथांमुळे Dark tourism आणि  Ghost tourism, Haunted Tourism उगम होतो आणि चालना मिळते. अमेरीका आणि युरोपात अशा प्रकारच्या  Dark tourism ची परंपरा आहे. जुन्या किल्ल्यात आणि पूरातन वाड्यांमधे भूतकथा सांगत गाईड फ़िरवून आणतात. रात्र असली तरी त्याठिकाणी पध्दतशीरपणे लाईटस वगैरे लावलेले असतात. लोकांना काहीतरी वेगळ, रोमांचक (Exciting) म्हणून अशा टूर आवडतात. भानगढ पण त्याच्या भोवती निर्माण झालेल्या गुढ वलयामुळे Dark tourism च्या पंक्तीत जाऊन बसलेला आहे. इथे येणारे बहुतांश पर्यटक त्याच साठी ( घाबरवून घेण्यासाठी) आलेले असतात. भानगढ किल्ल्याला राजस्थानी लोकांनंतर , बंगाली लोक मोठ्या प्रमाणावर भेट देतात असे गाईडने आम्हाला सांगितले. काळ्या जादू (तांत्रिक) इत्यादी गोष्टींची तिथे परंपरा असल्यामुळे असेल कदाचित.  युरोपातल्या आणि भानगढच्या गाईडना  एकदा सह्याद्रीतील किल्ल्यावर नेऊन एक रात्र भूतकथा ऐकवायचा मोह आम्हाला झाला होता.

Bhangargh Fort , Rajasthan
Bhangarh Fort

किल्ल्यात शिरल्यावर किंबहूना भानगढ गावात शिरल्यावर सर्वात प्रथम किल्ल्याच्या डोंगरावर असलेली एक सुंदर वास्तू आपले लक्ष वेधून घेते. त्याचे स्थान आणि आकार बघता आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवणार्‍या टेहळ्यांसाठी ती बांधली होती हे स्पष्ट्पणे कळते . पण गाईडच्या कथेतील तांत्रिक तिथे राहात होता, आजही त्याचा आत्मा तिथे राहातो आणि किल्ल्यातील भूताटकीच्या घटना घडवून आणतो . त्याला राणी रत्नावतीचा आत्मा अडवत का नाही ? असे विचारल्यावर गाईडने बाजारपेठ दाखवायला सुरुवात केली.  हनुमान दरवाजाने किल्ल्यात प्रवेश केल्यावर वाटेच्या दोन्ही बाजूला एक मजली इमारती दिसतात. याला  'जौहरी बाजार.'  या नावाने ओळखतात. इथे आपल्याला रायगडाची आठवण आल्याशिवाय राहात नाही. अर्थात इथे दुकानांची/ पेढ्यांची संख्या जास्त आहे. बाजारपेठेच्या आकारमाना वरुन भानगढच्या एकेकाळच्या संपन्नतेचा आणि समृद्धतेचा सहजगत्या अंदाज बांधता येतो. सर्व दुकानांना तळ मजल्यावरुन पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी अरुंद जीने आहेत. या पेठेतील एकाच दुकानाची सुंदर कमान अजूनही शाबूत आहे. एकाही दुकानांचे छ्त मात्र शाबूत नाही आहे.  बाजारपेठेच्या मागच्या बाजूला व्यापार्‍यांचे वाडे आहेत. त्यात " मोडो की हवेली "  ही त्याकाळच्या बड्या व्यापार्‍याची हवेली आहे . 

Johari Market , Bhangargh
बाजारपेठ , भानगढ

दंतकथेतील साधूच्या शापामुळे भानगढ मध्ये मंदिरा व्यतिरिक्त कुठल्याही वास्तूंवर छत टिकत नाही असे गाईडने सांगितले. खरतर अठराव्या शतकात इंग्रजांनी किल्ले ताब्यात घेतल्या नंतर किल्ले ओस पडायला लागले . किल्ल्याना कोणी वाली राहीला नाही .त्यामुळे किल्ल्यावर राहाणार्‍या लोकांनी गावात घरे बांधण्यासाठी किल्ल्यातील वाड्यांचे वासे , दरवाजे  इत्यादी सामान वापरले . त्यामुळे महारष्ट्रातील किल्ल्यावरच्या वास्तू उघड्या बोकड्या बिन छताच्या पाहायला मिळतात. या उलट राजस्थानात इंग्रज आले त्यावेळी तिथले राजे संस्थानिक बनले त्यामुळे राजस्थानात बहुतांश किल्ले आजही व्यवस्थित राहीलेले पाहायला मिळतात. त्यामुळे तिथल्या लोकांना असे छत नसलेल्या उघड्या बोडक्या वास्तू पाहायची सवय नाही . भानगड मध्ये अशा बिन छताच्या वास्तूंना पाहून साधूच्या  दंतकथेचा उगम झाला असावा. 

तीन पोल आणि वड , भानगढ

बाजारपेठ जिथे संपते तिथे किल्ला आणि बाजारपेठ यांना वेगळे करण्यासाठी दुसरी तटबंदी आहे. याठिकाणी या तटबंदीत दरवाजा असावा . तटबंदीतून आत शिरल्यावर दुतर्फ़ा वास्तूंच्या अवशेषावर उगवलेली वडाची मोठमोठी झाड आहेत. वास्तूच्या भिंतीवर चढणारी मुळ आणि लोंबणार्‍या पारंब्या आणि साक्षात वडाचे झाड यामुळे इथे भूतांचे वास्तव्य असलेच पाहीजे. आमच्या गाईडने सुरुवात केली , सर आप जयपूरसे यहा तक आहे आपको रस्ते के बाजूमे एक भी ये पेड दिखा ? ये पिछे पहाडी है लेकीन उधर भी ये पेड नही है ,सिर्फ़ इधर ही क्यू ? मग त्याने "झाशी की रानी " या सिरियलची गोष्ट सांगितली त्याच्या शुटींगच्या वेळी कस इथे एका मुलीला भूत दिसल आणि तिला थेट जयपूरला नेऊन हॉस्पिटलमध्ये भरती कराव लागले इत्यादी. इत्यादी.  गाईड सांगत होता त्यातला अर्धा भाग खरा आहे. याभागात पावसाचे प्रमाण कमी असल्याने वडासारखी झाड तुरळक आहेत . मागच्या डोंगरावरही खुरटी झुडप दिसत होती . वडाची झाडे मोठ्या प्रमाणावर याच भागात होती. त्याच कारण म्हणजे बांधकामासाठी वापरलेला चुना. वड - पिंपळ इत्यादी झाडांना चुनखडी पोषक असते. त्यामुळे ती झाड आपल्याला कंपाऊंड वॉलवर , पडक्या वाड्यांवर रुजलेली आणि फ़ोफ़ावलेली दिसतात. त्यांचा आकार, दाट  सावली, लोंबणार्‍या पारंब्या, पानांची सळसळ ही भूतकथेसाठी योग्य वातावरण निर्मिती असल्यामुळे ही झाड भुतांशी जोडलेली आहेत. भानगढच्या भूतांसाठी ही वडांची झाड म्हणजे नंदनवनच.

Gopinath Temple , Bhangargh
Gopinath Temple Bhangargh


हे गाईडला समजवण्याच्या भानगडीत न पडता पुढे तिसर्‍या तटबंदीत असलेला तीन कमानीचा दरवाजा (तीन पोल) ओलांडून आत गेलो. येथे उजव्या बाजूला उंच जोत्यावर बांधलेले नागर शैलीतील गोपीनाथ मंदिर आहे. मंदिराच्या  भिंतींवर , खांबांवर,  छतांवर अप्रतिम कोरीव काम  केलेले आहे. मंदिरात मुर्ती मात्र नाही आहे. याठिकाणी "करण अर्जून" सिनेमातल्या एका प्रसंगाचे शुटींग झाल्य़ामुळे ते प्रसिध्द आहे.  याशिवाय किल्ल्यात सोमेश्वर मंदिर, गणेश मंदिर, मंगलादेवी मंदिर, केशवराय मंदिर ही मंदिर आहेत पण मंदिरात मुर्ती नाहीत. " त्यामुळे किल्ल्यातल्या भूतांवर देवाचा वचक नाही”, इती गाईड. "अरे, पण किल्ल्याच्या प्रवेशव्दारातच हनुमानाचे मंदिर आहे, हनुमान स्तोत्रात तो "’भूत प्रेत समंधादी ..." चा बंदोबस्त करतो असे म्हटले आहे. त्यावर अर्थात त्याच्याकडे उत्तर नव्हते.  याभागात लॉन , केवड्याची बाग इत्यादी लावून  परिसर सुंदर ठेवला होता.  एका वडाच्या झाडाखाली गणेश मंदिर मंदिर आहे. त्याच्या पुढे पुरोहिताच्या हवेलीचे अवशेष आणि आणि सोमेश्वर मंदिर आहे. सोमेश्वर मंदिरा जवळ पाण्याचा बांधीव कुंड आहे. किल्ल्यात मला आढळलेला हा एकमेव पाण्याचा स्त्रोत होता. 

कोरीवकाम , राजवाडा

Bhangarh Fort

हा परिसर पाहून चौथी तटबंदी ओलंडल्यावर वळणावळणाच्या, चढाच्या, फ़रसबंदी रस्त्याने आपण बालेकिल्ल्याचा बुलंद दरवाजापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्यात राजवाड्याचे अवशेष आहेत. त्याच्या दरवाजांवर आणि खिडक्यांवर कोरीवकाम केलेले आहे. याठिकाणी पाण्याचा कोरडा हौद होता. मागेच असलेल्या डोंगरातून पाणी आणण्यासाठी कुठलीही सोय केलेली इथे आढळली नाही. राजघराण्यातील लोक , त्यांच्या दास दासी . अधिकारी यांच्यासाठी खालून पाणी आणले जात होते असे गाईडने सांगितले. 


राजवाडा, भूत उतरवण्याची जागा 

राजवाड्याच्या खालच्या मजल्यावर छत असल्याने त्या खोल्या अंधार्‍या आहेत. कमानदार लांबलचक बोळ त्यांच्या टोकाशी असलेल्या खोल्या , त्यात वटवाघुळांचा वावर असल्यामुळे येणारा दर्प, पंखांच्या फ़डफ़डण्याचे आवाज यामुळे गुढ वातावरण निर्माण होते. त्यातल्या दोन खोल्यात नेऊन गाईडने तळघरात जाणारा जीना दाखवला आणि "यहा दस हजार के उपर लोक आज तक मरे है" अस सांगितले . एकावेळी एक माणुस आत जायची  मारामारी असलेल्या अरुंद जीन्याने तळघरात जाऊन तिथे "दस हजार लोग मरे है" म्हटल्यावर आम्हाला हसू आवरेना. राजवाड्याच्या सज्जातून किल्ल्याचा परिसर, टेहळणीची चौकी , मागचा डोंगर आणि भानगड गाव दिसत होते.

Bhangarh Fort
तळघर, भानगढ

 किल्ल्यात फ़िरायला येणारे पर्यटक इथे पर्यंत येतात आणि परत जातात . आम्हाला बाहेरच्या तटबंदीत असलेले तीन दरवाजे आणि दोन मंदिर पण पाहायची होती. त्यासाठी वेगळा चार्ज लागेल असे गाईडने सांगितल्यावर त्याचा निरोप घेतला. जाण्यापूर्वी त्याने एक भूतकथा आम्हाला सांगितलीच. शुटिंगच्या युनिट बरोबर आलेल्या कलाकारांपैकी एक कलाकार एकटाच तिथे गेला तो मेला त्याच्या भूताने तिथे नंतर गेलेल्या एका माणसाला पछाडल, तो म्हणायला लागला "मै शहारुख हू, मै सलमान हू" कारण काय तर, त्याची अभिनेता बनण्याची इच्छा अपूर्ण राहीली. मग त्याला राजवाड्यात आणण्यात आले . तिथे भूत उतरवल. आजही राजवाड्यात भूत उतरवल जात . त्यामुळे तुम्ही तिथे जाऊ नका, असे निक्षुन सांगितले.

Bhangarh Fort
सोमनाथ मंदिर, भानगढ

सह्याद्रीत वेळी अवेळी फ़िरण्याची सवय असल्याने आम्ही केशवराय मंदिराकडे निघालो, पायवाट व्यवस्थित होती. आजूबाजूला गुढघ्या एवढी वाढलेली खुरटी झुडप होती. लख्ख उन पडलेल होत. त्यामुळे भूतांसाठी एकदम "अयोग्य" वातावरण होत.  हे मंदिरही नागरशैलीतील आहे. मंदिरात मुर्ती नव्हती. पुढे तटबंदीतल्या लाहोरी प्रवेशव्दाराजवळ पोहोचलो. त्या प्रवेशव्दाराच्या नावाचा आणि लाहोरचा संबंध नसून लोहाराशी संबंध आहे. याठिकाणी लोहारांची वस्ती असावी. उन खूप असल्याने एका झाडाखाली पाणी प्यायला बसलो. बाजूला एका वडाच्या झाडाखाली माकडांची एक टोळी बसली होती. अचानक त्यांच्या म्होरक्याने " खॅक " असा आवाज काढून इतरांना इशारा दिला आणि सगळी माकड सरसर झाडावर चढली.  त्याचवेळी राजवाड्यातून  झांजांचा आवाज आणि धूर यायला लागला . " माकडाला हजारो आत्म्यांपैकी एखादा आत्मा दिसला की काय ’? गाईडने सांगितलेल्या गोष्टीचा परिणाम असेल आम्ही दोघे ताडकन जागेवरुन उठलो . उठल्यावर दिसले, झुडपातून एक कुत्रा तोंडात टिटवी घेऊन पळत आमच्या दिशेने येत होता. माकडाने ते आधीच पाहिल्यामुळे त्याने आपल्या कळपाला सावध केले होते. किल्ल्यात आल्या पासून अंगावर काही क्षणांपुरते रोमांच आणणारा हा एकच प्रसंग होता ....आणि तो ही भूतावीना. 

या जागा खरच झपाटलेल्या असतात की, आपल्याला आधीच मिळालेल्या माहितीमुळे आपणच झपाटलेलो असतो.

Bhangarh Fort
राजवाड्यातून भानगढ

फ़ुलवारी आणि दिल्ली पोल पाहून किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी आलो , आमचा गाईड तिथेच बसला होता. त्याला झांजांच्या आवाजा बद्दल विचारल, तो म्हणाला काही वेळापूर्वी भूत उतरवण्यासाठी एकाला घेऊन लोक आली आहेत. त्यांचा आवाज आहे. किल्ला पूरातत्व खात्याच्या ताब्यात असताना, एवढे पहारेकरी व बंदोबस्त असताना किल्ल्यात भूत उतरवण्याचे प्रकार असे राजरोस पणे चालत असतील तर किल्ला भूताच्या विळख्यातून कधीच सुटणार नाही.

किल्ला फ़िरुन झाला होता. भूक लागली होती गावात हॉटेलची चौकशी करण्यासाठी एके ठिकाणी थांबलो. तिथे काही बुजूर्ग लोक पण बसलेले होते. कुठून आलात वगैरे चौकशी झाली. मी भूताचा विषय न काढता त्यांना विचारल तुम्ही रात्री किल्ल्यात जाता का ? ते बोलले गावातल्या लोकांना जावच लागत. त्यांची गुर ढोर तिथे चरायला जातात एखाद चुकल आणि संध्याकाळी परत आल नाही तर काय, दुसर्‍या दिवशी पर्यंत वाट बघणार ? आम्ही रात्रीच जाऊन शोधून आणतो. हे उत्तर मिळाल्यावर अजून काही विचारण्याची गरज पडली नाही. 

सोमनाथ मंदिर, भानगढ
पाण्याचे कुंड, भानगढ

किल्ला पाहिल्यावर अस म्हणता येईल की ,तो ओस पडण्याचे एक कारण पाणी हे असू शकते. या भागात पाऊस तसाही कमीच पडतो. त्यात या किल्ल्यावर पाणी साठवण्यासाठी जागो जागी सोय केलेली मला तरी दिसली नाही. किल्ल्याच्या आत राहाणार्‍या लोकांना पाण्याचा तुटवडा भासू लागल्यामुळे त्यांनी स्थलांतर केले असावे.  अकबरालाही त्याने वसवलेली नवीन राजधानी फ़त्तेपूर सिक्री ही पाण्याच्या तुटवड्यामुळे सोडून पुन्हा आग्र्य़ाला परतावे लागले होते. 

भानगढ किल्ल्याच्या भोवती असलेल्या भूतकथा सोडल्या तर किल्ला खरच सुंदर आणि एकदा तरी जाऊन पाहाण्यासारखा नक्कीच आहे.   


Bhangarh Fort , Rajasthan

जाण्यासाठी :- 

भानगढ किल्ल्यावर जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन आणि एअरपोर्ट जयपुर येथे आहे. जयपुर ते भानगढ हे अंतर  ८५ किलोमीटर आहे.  याभागात  बसेस कमी आणि अनियमित चालत असल्यामुळे खाजगी गाडी करून जावे.

जयपूर - भानगड - अजबगड - टेहलागड  - निळकंठ महादेव मंदिर - राजुरी फोर्ट हे पाहून एका दिवसात जयपूरला परत जाता येईल.

आम्ही हे सर्व पाहून दोन दिवस "सरीस्का व्याघ्र प्रकल्पा" जवळ मुक्काम केला होता. परतीच्या प्रवासात "विराट नगर"   (विराट नगरवर वेगळा ब्लॉग लिहिला आहे, त्याची लिंक खाली दिलेली आहे )  पाहून जयपुर गाठले होते .

Bhangarh Fort

Photos by :- Amit Samant, Asmita Samant © Copy right
कॅमेरा :- Nikon, P900 , Gopro Hero 5 

महाभारतातील विराट नगर ( Virat Nagar , the Ancient city in Mahabharat ) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.


स्वराज्याची तिसरी राजधानी :- जिंजी Ginjee Fort (Rajagiri, Krishnagiri, Chandrayan Durg) हा ब्लॉग वाचण्याकरिता खालील लिंकवर टिचकी मारा.