Pages

Tuesday, July 14, 2020

नयनरम्य वाचाऊ व्हॅली ( Offbeat Austria, Wachau Valley)


Wachau Valley From Durnstein Castle

डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरावर हिरवेगार डोंगर त्यातून डोकावणारी लालचुटूक रंगाच्या छप्परांची घरे, त्या गर्दीतून मान उंच करुन पाहाणारा एखादा चर्चचा टॉवर, नदी काठाने जाणारा वळणावळणाचा रस्ता, रस्त्यापासून थोड्या उंचावरुन जाणारी रेल्वे असे स्वप्नवत दृश्य वाचाऊ व्हॅलीत फ़िरतांना दिसते. ऑस्ट्रीयाची राजधानी व्हिएन्ना ही एकेकाळी युरोपची वाईन कॅपिटल होती. व्हिएन्ना शहराला लागून असलेल्या ग्रीन्झींग या निसर्गरम्य भागात इसवीसनाच्या बाराव्या शतकापासून दाक्षाची लागवड होत आहे. तसेच व्हिएन्ना पासून ८० किलोमीटरवर असलेल्या वाचाऊ व्हॅलीतही मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची लागवड होते. डॅन्यूब नदीच्या खोर्‍यात वसलेल्या वाचाऊ व्हॅलीला युनेस्कोच्या वर्ल्ड हेरीटेज साईटचा दर्जा मिळालेला आहे.

 

Durnstein  Village, Wachau Valley , Austria

वाचाऊ व्हॅलीत मल्क, स्पिट्झ, डुरींन्स्टाईन आणि क्रेम्स ही गाव पाहाण्यासारखी आहेत. व्हिएन्नाहून वाचाऊ व्हॅलीला जाण्यासाठी बोट, रेल्वे आणि बस असे तीन पर्याय उपलब्ध आहेत. व्हिएन्नहून बोटीने २ तासात वाचाऊ व्हॅलीत जाता येते. डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरावर असलेली गाव, नदीकिनार्‍यावर, डोंगरात असलेली अप्रतीम घरे आणि वर्ल्ड हॅरीटेजचा दर्जा मिळालेली वाचाऊ व्हॅलीची अप्रतीम दृश्य पाहात पाहात आपण क्रेम्सला पोहोचतो. ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिएन्ना ते व्हिएन्ना तिकिट मिळते . यात व्हिएन्ना ते मल्क ट्रेनचा प्रवास , मल्क ते क्रेमस बोटीचा प्रवास आणि क्रेम्स ते व्हिएन्ना ट्रेनचा प्रवास करता येतो. या बरोबरच मल्क ऍबी पाहाण्यासाठीचे तिकिट अंतर्भूत असते. ऑस्ट्रीयातील रेल्वे कंपनी OBB Rail च्या साईटवर (https://kombitickets.railtours.at/wachau-ticket/austria/wachau/wachau-ticket.html) वाचावू व्हॅलीला जाण्यासाठी कॉम्बो तिकीट मिळते.

 

Melk Abbey, Melk
Melk Abbey, Melk, Austria

वाचाऊ व्हॅलीत जाण्यासाठी तिसरा पर्याय म्हणजे व्हिएन्नात असलेले टूर ऑपरेटर्स. व्हिएन्नातून प्रायव्हेट बसने आणि कारने वाचाऊ व्हॅलीत घेऊन जातात. तिथे फ़िरायला साधारणपणे ६ तासांचा वेळ मिळतो. याशिवाय वाईन टेस्टींग टूर्स, सायकलींग टूर्सही व्हिएन्नाहून जातात. आपापल्या आवडीप्रमाणे आपण टूर निवडू शकतो.

Mulk Abbey, Wachau Valley

 वाचाऊ व्हॅलीतल्या सायकल टूर्स प्रसिध्द आहेत. मल्क ते क्रेम्स हे अंतर २४ किलोमीटर आहे. डॅन्यूब नदीच्या दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही काठाने आपण प्रवास करु शकतो. खास सायकलींसाठी इथे फ़रसबंदी मार्ग आहेत. यातील दक्षिण काठाने जाणारा मार्ग सायकलींग करणार्‍यांचा आवडीचा मार्ग आहे. या मार्गावर रहादारी कमी असते. छोट्या छोट्या गावातून, दाक्षाच्या मळ्यां मधून हा मार्ग जातो. या मार्गावर अनेक वाईनरीज आहेत. वाचाऊ व्हॅलीतील मोठी आकर्षणे नदीच्या उत्तर काठावर आहेत. ती पाहाण्यासाठी साय़कल घेऊन बोटीतून नदी ओलांडण्याची सोय स्पिट्झ, Weissenkirchen आणि डुरींन्स्टाईन येथे आहे. मल्क येथील टुरीस्ट इन्फ़ॉर्मेशन सेंटर येथे सायकलींग संबंधी सर्व माहिती मिळते. येथे सायकली भाड्यानेही मिळतात.  

 

Painting on Ceiling of Abbey

वाचाऊ व्हॅलीतील मल्क हे छोटेसे गाव तिथल्या मल्क ऍबे या मॉनेस्ट्रीमुळे प्रसिध्द आहे. ख्रिश्चन धर्मातल्या बेनेडिक्टाईन पंथातल्या लोकांचे हे जगप्रसिध्द धार्मिक ठिकाण आहे. सेंट बेनेडिक्ट याने इसवीसन ५१६ मध्ये Benedict of Nursia हे बेनेडिक्टाईन पंथातल्या लोकांसाठी नियमावलीचे पुस्तक लिहिले. त्यानुसार या पंथातील मॉंक्स आणि नन्स वागतात. ऍबे म्हणजे बेनेडिक्टाईन मॉंक्स आणि नन्स यांचे धार्मिक कर्मकांड करण्याचे आणि राहाण्याचे  ठिकाण. या बेनेडिक्टाईन पंथातल्या लोकांना ब्लॅक मॉंक म्हणूनही ओळखले जाते.  मल्क या टुमदार गावातील टेकडीवर मल्क ऍबे ही पिवळ्या आणि पांढर्‍या रंगातली भव्य मॉनेस्ट्री दूरवरुनही नजरेत भरते. मल्क गावातल्या फरसबंदी वाटेने चढत आपण १० मिनिटात मल्क ऍबे पाशी पोहोचतो. मल्क ऍबे मध्ये वर्षभर वेगवेगळी प्रदर्शन कार्यक्रम चालू असतात. या ऍबेतील मार्बल हॉल, इंपेरीयल हॉल, लायब्ररी आणि म्युझियम पाहाण्यासारखे आहे. मार्बल हॉल आणि इंपेरीयल हॉल मधील बाल्कनीतून डॅन्यूब नदी आणि परीसराचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. ऍबेच्या छतावर काढलेली चित्रे, जागोजागी असलेले सुंदर पुतळे यामुळे सौंदर्यात भर पडलेली आहे. या शिवाय मल्क मधील कॉलेजीएट चर्चलाही आपण भेट देऊ शकतो. मल्क बाजारातून फ़ेरफ़टका मारतांना जर्दाळू, जर्दाळूचे जाम, सरबतं, चॉकलेट्स विकणारी दुकान दिसतात. वाचाऊ व्हॅलीत द्राक्षा खालोखाल जर्दाळूचे उत्पादन होते. त्यापासून बनवलेले विविध पदार्थ तिथे मिळतात.

 

Apricot, Wachau Valley

Apricot Jam & Juice 

मल्कहून बोटीने किंवा रस्त्याने १८ किलोमीटर वरील स्पिट्झ गावाला जाता येते. रस्त्यावर दुतर्फ़ा द्राक्षाचे मळे आणि जर्दाळूच्या बागा दिसतात. स्पिट्झ छोटेसे गाव डोंगर उतारावर वसलेले आहे. वाचाऊ व्हॅलीत २०० प्रकारच्या वाईन बनतात. स्पिट्झ गावाजवळ असलेल्या वाईनरीजची गाईडेड टूर करुन तुम्ही वाईन टेस्ट करु शकता . या वाईनरीज आणि इथल्या रेस्टॉरंटसच्या बाहेर बसण्याची व्यवस्था केलेली आहे तिथे बसून वाचाऊ व्हॅलीच निसर्ग सौंदर्य न्याहाळत तुम्ही वाईनचा आस्वाद घेऊ शकता. Burgruine Aggstein हा बाराव्या शतकात बांधलेला किल्ला स्पिट्झ जवळ आहे.

 

Dürnstein Castle Wachau Valley

View from Top of Dürnstein Castle

स्पिट्झ पासून ११ किलोमीटरवर डुरींन्स्टाईन गाव आहे . गावा मागील टेकडीवर कॅसल आहे. मध्ययुगातील या गावातील रस्ते फ़रबंदी आहेत. गावात वहानांना प्रवेश नाही. त्यामुळे या गावामधील गल्ल्यां मध्ये फ़िरतांना मध्ययुगीन युरोपातील गावात फ़िरल्याचा भास होतो. गावातील फ़रसबंदी रस्ते त्याच्या दुतर्फ़ा लालचुटूक रंगाच्या उतरत्या छपरांची सुंदर घरे. घरांच्या गॅलरीत फ़्लॉवर बेड मध्ये फ़ुललेले रंगीबेरंगे फ़ुलांचे ताटवे. दिव्याच्या खांबांवर लावलेल्या कुंड्यां मधून फ़ुललेली फ़ुले असे रंगीबेरंगी आणि प्रसन्न वातावरण गावभर पसरलेले असते. गावात काही कमानी सुध्दा आहेत. गावातल्या भर वस्तीत असलेल्या दोन घरांच्या मध्ये असलेल्या गल्लीतून डुरींन्स्टाईन कॅसलला जाणारी पायर्‍यांची वाट आहे. दुतर्फ़ा दाट झाडी असलेल्या यावाटेने अर्ध्या तासात किल्ल्यावर पोहोचता येते. किल्ला चढतांना वेगवेगळ्या टप्प्यावरुन गावाचा आणि डेन्यूब नदीच्या खोर्‍याचा सुंदर नजारा दिसतो. १२ व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्यात इंग्लंडचा राजा रिचर्ड - १ याला डिसेंबर ११९२ ते मार्च ११९३ मध्ये कैदेत ठेवलेले होते. इसवीसन १६४५ मध्ये स्विडीश सैन्याने हा किल्ला जिंकून तो उध्वस्त केला . त्यानंतर तो किल्ला पुन्हा बांधला गेला नाही . किल्ल्याची दोन प्रवेशव्दारे, तटबंदी, बुरुज, काही वास्तू आजही शाबूत आहेत. किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावरुन झोकदार वळण घेणारी डॅन्यूब नदी आणि तीच दूरवर दिसणारे खोरे हे दृश्य नजर खिळवून ठेवते. या ठिकाणाहून पाय निघता निघत नाही. डुरींन्स्टाईन कॅसल Wachau Cultural Landscape" UNESCO World Heritage Site चा महत्वाचा भाग आहे. 

 

 डुरींन्स्टाईन पासून ७ किलोमीटरवर क्रेम्स गाव आहे. या गावात वाईनरी आणि वाईन टूर करता येतात. या व्यतिरीक्त या गावात दोन म्युझियम आहेत. त्यापैकी एक आर्ट म्युझियम असून दुसरे कार्टून (कॅरीकेचर) म्युझियम आहे. कॅरीकेचर म्युझियम मध्ये १९०० पासूनची कॅरीकेचर्स पाहायला मिळतात. क्रेम्स ते व्हिएन्ना ट्रेनने किंवा बोटीने बसचा प्रवास करता येतो.

 

Wine Grape Fields , Wachau Valley

ट्रेन, बोट, बस या कोणत्याही मार्गाने वाचाऊ व्हॅलीत आल्यास दिवसभर फ़िरण्यासाठी फ़क्त ६ तास मिळतात. त्यामुळे सर्व ठिकाणे धावत पाहावी लागतात. वाचाऊ व्हॅली व्यवस्थित शांतपणे तिथल्या निसर्गाचा आणि संथ शांत वातावरणाचा आनंद घेत पाहायची असल्यास तिथे एक दिवस मुक्काम करणे आवश्यक आहे. संध्याकाळी सर्व पर्यटक निघून गेल्यावर ही गाव रिकामी होतात. त्यावेळी इथल्या सुनसान ऐतिहासिक गल्ल्यांमधून फ़िरणे , डुरींस्टाईन कॅसलवरुन संध्याकाळचा गार वारा अंगावर घेत सूर्यास्त न्याहाळणे यासारखे सुख नाही. व्हिएन्ना, साल्झबर्ग ही ऑस्ट्रीयातली ठिकाणे फ़िरायला अनेक जण जातात, त्यांनी एक दिवस वेगळा काढून व्हिएन्ना जवळील वाचाऊ व्हॅलीला आवर्जून भेट द्यावी.  

 पूर्व युरोपातील ऑस्ट्रीया, हंगेरी, स्लोव्हाकिया, सर्बिया या देशांना समुद्र किनारा नाही. पण डेन्यूब ही या भागातून वहाणारी सर्वात मोठी नदी आहे. या नदीत आणि युरोपात सुध्दा झँडर मासे (zander fish) मोठ्या प्रमाणात आढळतात. झँडर मासे पकडणे हा युरोपातल्या फ़िशिंग गेम मधला महत्वाचा भाग आहे. झँडर माशचे वजन १० किलो ते २२ किलो भरते. या माशामध्ये कमी हाडे आणी जास्त आणि रुचकर मांस असल्यामुळे हा मासा युरोपियन लोकांच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. इथल्या मॉल्समध्ये झँडर फ़िश फ़िलेट्स मिळतात. फ़िलेट्स म्हणजे माशाच्या हाडाला समांतर कापलेले माशाचे तुकडे . हे तुकडे तळून किंवा बेक करुन खाल्ले जातात.

 

Zander fish

डेन्यूब नदी काठच्या एका रेस्टॉरंट मध्ये झँडर फ़िशची ऑर्डर दिली. एका डिशमध्ये बटर मध्ये तळलेला फ़िश फ़िलेट्सचा आयताकृती तुकडा आणि सोबत उकडलेले बटाटे, गाजर, मटार आणुन दिले. माशाचा तुकडा आणि त्याच्या बरोबर दिलेले पदार्थ यांचे प्रमाण व्यस्त होते. मासा लुसलुशीत आणि चवीला चांगला होता. त्यात हाडे (काटे) नसल्याने मासे खाण्याची सवय नसलेल्यांनाही व्यवस्थित खाता येतो. युरोपच्या भटकंतीत झँडर फ़िश एकदा खाऊन बघायला हरकत नाही.

Photos :-  Copy right Amit & Kaustubh Samant 




" परीकथेतील गाव, हॉलस्टॅट (Hallstatt, Austria)"  हा ऑस्ट्रीयातील ऑफ़बीट पर्यटन स्थळावरचा लेख  वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा. 

https://samantfort.blogspot.com/2019/10/blog-post.html

6 comments:

  1. खुप सुंदर लेखणी.....

    ReplyDelete
  2. अतिशय उत्तम माहिती... खूप छान👍👌

    ReplyDelete
  3. खूप छान माहिती. वाचताना सगळा प्रदेश डोळ्यासमोर उभा रहातो

    ReplyDelete
  4. मस्त माहिती आणि लेखन 👌👍🏻😇🙏🏻

    ReplyDelete
  5. प्रवासवर्णन खुप भारी आणि माहितीपूर्ण लेख 👍👍

    ReplyDelete