Pages

Tuesday, October 22, 2019

परीकथेतील गाव, हॉलस्टॅट (Hallstatt, Austria)

Hallstatt, Austria

ऑस्ट्रीयाला फ़िरायला जाणारे पर्यटक व्हिएन्ना आणि साल्झबर्ग ही मोठी शहरे पहातात. त्याच बरोबर आल्प्सच्या पर्वतराजीत असलेली छोटी छोटी खेडी आणि निसर्गरम्य परिसर पाहाणे ही सुध्दा एक पर्वणी आहे. ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग या मोझार्टमुळे प्रसिध्द असलेल्या शहरापासून ८० किलोमीटरवर आल्प्सच्या कुशीत हॉलस्टॅट नावाचे निसर्गरम्य गाव आहे. हॉलस्टॅट सी या सरोवराला चारही बाजूंनी उंचच उंच डोंगरांनी वेढलेले आहे. या डोंगरांपैकी एका डोंगराच्या उतारावर हॉलस्टॅट हे परीकथेत शोभावे असे प्राचीन गाव वसलेले आहे.

ऑस्ट्रीया, स्लोव्हाकीया, जर्मनी इत्यादी लॅंडलॉक देश आहेत, लॅंडलॉक म्हणजे चारही बाजूंनी जमिनीने वेढलेले देश, या देशांना समुद्र किनारा नाही. या सागरी किनारा नसलेल्या देशांची मीठाची गरज भागवण्याचे काम हॉलस्टॅट या गावाने अश्मयुगापासून केले आहे. हॉलस्टॅट येथील डोंगररांगांमध्ये मीठ मोठ्या प्रमाणावर सापडत होते. त्यामुळे या भागाची भरभराट झाली. हॉलस्टॅट मधून निघणार्‍या व्यापारी मार्गामुळे या भागातील नद्यांच्या खोर्‍यांची भरभराट झाली आणि या व्यापारी मार्गांच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या काळात किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली.

Salt trolley in Halstatt salt Musium, Halstatr

याशिवाय उत्तर युरोपातून (आजच्या रशियातून) दक्षिण युरोपातील इटली पर्यंत जाणारा अंबर व्यापारी मार्गही याच नद्यांच्या खोर्‍यातून जात होता. नवाश्मयुगापासून या मार्गावर अंबर या दागिन्यात वापरल्या जाणार्‍या पिवळ्या रंगाच्या खड्याचा व्यापार होत असे. उत्तरेत सापाडणार्‍या या अंबरला उत्तरेचे सोने म्हणून ओळखले जात असे.

Funicular train, Hallstatt

हॉलस्टॅटची मिठा़ची खाण ७००० वर्षे जूनी आहे. जगातली सगळ्यात जूनी मिठाची खाण म्हणून ही ओळखली जाते. ज्यावेळी रोम नव्हते तेंव्हाही ही खाण अस्तित्वात होती. याठिकाणी झालेल्या पुरातत्वीय उत्खननात ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकातील सांबार शिंग सापडले त्याचा खाणीतून मिठ काढण्यासाठी कुदळी सारखा वापर केला जात होता. या प्राचीन खाणीची सफ़र करण्यासाठी ३० युरोचे तिकीट काढावे लागते. तिकिट घराजवळ खाणीची माहिती देणारे प्रदर्शन आहे, याठिकाणी खाणीतून काढलेले मिठाचे गुलाबी रंगाचे दगड विकत मिळतात. खाण असलेल्या डोंगरावर जाण्यासाठी फ़ेनिक्युलर ट्रेन आहे. ८० अंशात चढणार्‍या या ट्रेन मधून सरोवराचे आणि डोंगर उतारावर वसलेल्या गावचे विहंगम दृश्य दिसते.

Funicular train, Hallstatt

                                                                               Video of Funicular train, Hallstatt

ट्रेन मधून उतरल्यावर जंगलातून रस्ता खाणीकडे जातो. या रस्त्यावर खाणीची माहिती देणारे फ़लक आणि फ़ोटोज लावलेले आहेत. खाणीत शिरल्यावर एक लाकडी घसरगुंडी आहे. खाणीत लवकर उतरण्यासाठी कामगार याचा वापर करीत. घसरगुंडीवरुन घसरत खाली उतरल्यावर कामगारांना खाणीत खोलवर नेणार्‍या ट्रेनमधून एक तासाची सफ़र चालू होते. यात खाणीचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्य, कामगारांची त्याकाळातली जोखीम, त्यांची अवस्था याची माहिती दिली जाते. तत्कालिन पेहराव घातलेले आणि हत्यारे घेऊन उभे असलेले पुतळे खाणीत जागोजागी बसवलेले आहेत. 

Salt mine tour Entrance gate, Hallstatt

Salt mine tour train , Hallstatt

खाणीतून बाहेर पडल्यावर फ़ेनिक्युलर ट्रेनने परत न जाता पायवाटेने खाली उतरावे. आल्प्सच्या घनदाट जंगलातून जाणार्‍या या पायवाटेवर अनेक ओहोळ धबधबे आहेत. वेगवेगळ्या काळात खोदलेली मिठाच्या खाणींची कही तोंडे (बोगदे) या वाटेवर दिसतात. पायवाटेने उतरतांना भोवतालच्या डोंगररांगा आणि सरोवर वेगवेगळ्या कोनातून दिसते. पायवाटेवर जागोजागी बसण्यासठी बाकडे ठेवलेले आहेत. तिथे निवांत बसून तिथल्या शांततेचा, तिथून दिसणार्‍या निसर्ग दृश्यांचा आस्वाद घेता येतो. या पायवाटेने तासभरात आपण हॉलस्टॅटच्या मुख्य चौकात पोहोचतो. 

Trek route from salt mine Hallstatt

Once entrance gate of salt mine

Lahn lake Hallstatt, Austria

हॉलस्टॅट या छोट्याश्या गावातून फेरफटका मारण्यासाठी एकमेव रस्ता आहे. ऱस्त्याच्या एका बाजूला  नितळ पाण्याचे सरोवर आणि दुसऱ्या बाजूला डोंगर आहे. या डोंगर उतारावर बांधलेली सुबक सुंदर रंगीबेरंगी घर. प्रत्येक घराच्या बाल्कनीत, फ्लॉवर बेड मध्ये  फुललेले फुलांचे ताटवे त्या घराना अजून सुंदर बनवत होते . या घरांची आणि गावाच्या टोकाला असलेल्या चर्चच्या टॉवरचे सरोवराच्या संथ पाण्यात पडणारे प्रतिबिंब म्हणजे सत्याहून आभास सुंदर ....


Lahn lake, Hallstatt, Austria

गावातल्या या रस्त्यावर अनेक रेस्टॉरंटसनी टेबल खुर्च्या मांडलेल्या होत्या. देश विदेशातली मंडळी तिथे खात पित होती. सगळीकडे आनंदी आणि उत्साही वातावरण होते. गावातल्या  गल्ली बोळातून चालत आम्ही गावातल्या सेंट्रल ( मार्केट) स्क्वेअर मध्ये पोहोचलो. येथून एक रस्ता जेट्टीकडे जातो. एकेकाळी याठिकाणी मिठाचा बाजार भरत असेल. खरेदी विक्री चालत असेल. बोटीत माल भरुन सरोवराच्या दुसर्‍या टोकाला जात असेल.  आज मात्र याठिकाणी बाजार भरत नाही . येथे आता अनेक रेस्टॉरंट आहेत . जेट्टी वरुन सरोवरात फ़ेरफ़टका मारण्यासाठी बोटी मिळातात. 

Hallstatt Village



येथून एक रस्ता चर्च कडे जातो.  या चर्चला लागूनच एक स्मशानभूमी आहे. मुळात या गावात सपाट जागा कमी असल्यामुळे जूनी थडगी उकरुन त्याच जागी नवीन मृतदेह पुरले जातात. अशाप्रकारे गेली अनेक शतके उकरलेल्या कवट्या आणि हाड इथे रंगवून ठेवलेली आहेत.


Skulls in church , Hallstatt, Austria

Skulls & bones in church , Hallstatt, Austria
हे आगळेवेगळे चर्च पाहून "फाईव्ह फिंगर पॉईंट" याठिकाणी जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरुन १४३ क्रमांकाची बस मिळते . बसने आपण फेनिक्युलर ट्रेन स्टेशनपाशी पोहोचतो. (खाजगी गाडीने थेट पॉईंटपाशी पोहोचतो.) ट्रेनने आपण फाईव्ह फिंगर पॉईंटला पोहोचतो. येथे हाताच्या पंजाच्या आकाराचे काचेचे प्लॅटफॉर्म आहेत. त्यावर उभे राहून संपूर्ण हॉलस्टॅटचे विहंगम दृश्य दिसते.

Ice cave, Hallstatt

हॉलस्टॅट पासून १४ किलोमीटर वरील डॅचस्टाईन डोंगरात इसवीसन १९१० मध्ये मिळालेली बर्फ़ाची गुहा हे एक आगळेवेगळे ठिकाण आहे . इथे जाण्यासाठी ५४३ क्रमांकाची बस पकडून डॅचस्टाईन विझिटींग सेंटरपर्यंत जाता येते. तेथून केबल कारने डोंगरावर पोहोचून साधारणपणे २० मिनिटांचा ट्रेक केल्यावर आपण या बर्फ़ाच्या गुहेत पोहोचतो. भर उन्हाळ्यातही या गुहेतला धबधबा गोठलेले असतो. गुहेतील तापमान शुन्याखाली असल्याने उन्हाळ्यातही थंडेचे कपडे घालून या बर्फ़ाच्या नैसर्गिक गुहेची एक तासांची सफ़र करावी लागते

हॉलस्टॅट हे गाव आणि आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे. व्हिएन्नाहून साल्झबर्गला जातांना सकाळी लवकर निघून दिवसभर हॉलस्टॅट फ़िरुन संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचावे. त्यासाठी गाडी भाड्याने घेणे आवश्यक आहे. साल्झबर्गहून एक दिवसाच्या  टूर्स हॉलस्टॅटसाठी असतात. पण त्या सकाळी ९ ला साल्झबर्गहून निघतात आणि दुपारी ३ वाजता परतीचा प्रवास चालू करतात.


                                             Hallstatt time laps (Pl. watch in full screen)

हॉलस्टॅट व्यवस्थित आणि मनसोक्त फ़िरायचे असल्यास खाजगी गाडीने किंवा बसने जाणे उत्तम आहे. (बसच्या रुट बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.) हॉलस्टॅट भारतीयांसाठी थोडे महागडे आहे. येथील मुख्य आकर्षण असलेले सॉल्ट माईन ३० युरो, आईस केव्ह ३२ युरो माणशी तिकिट आहे. पैसे वाचवण्यासाठी जातांना फ़ेनिक्युलर/ केबल कारने जाऊन येतांना चालत उतरण्याचा पर्याय आहे. त्यासाठी तंगडतोड करायची तयारी मात्र हवी.


हॉलस्टॅटला जाण्यासाठी  :-

हॉलस्टॅटला जाण्यासाठी साल्झबर्ग आणि व्हिएन्ना या दोन्ही ठिकाणाहून बस आणि ट्रेनचा पर्याय आहे.

१) व्हिएन्नाहून येण्यासाठी ट्रेन किंवा कार हे दोन पर्याय आहेत.
अ) व्हिएन्नाहून हॉलस्टॅटला जाण्याकरीता २ ट्रेन बदलाव्या लागतात आणि त्यानंतर फ़ेरी बोटीने हॉलस्टॅटला पोहोचता येते. या प्रवासाला ४ तास लागतात.

Vienna Central Station - Attnang- Puchheim  - Hallstatt Train Station

ट्रेनचे तिकिट माणशी ३५००/- रुपये आहे.

ब)व्हिएन्नाहून कारने हॉलस्टॅटला पोहोचायला ३.३० तास लागतात.
 

२) साल्झबर्गहून हॉलस्टॅटला जाण्यासाठी दोन बस बदलाव्या लागतात. ट्रेन पेक्षा बसने २० मिनिटे लवकर पोहोचता येते.

अ) बसचे तिकिट माणशी १,०००/- रुपये आहे.

बस क्रमांक १५० (Salzburg > Bad Ischl (Bus 150)) :- हि बस साल्झबर्ग मेन रेल्वे स्टेशन समोरच्या डेपोतून सूटते आणि ९० मिनिटांनी Bad Ischl ला पोहोचते. दर तासाला दोन बस अशी या बसची फ़्रिक्वेन्सी आहे. सकाळची पहिली बस ५.५५ वाजता आहे.

बस क्रमांक ५४२ (Bad Ischl > Hallstatt Gosaumühle (Bus 542)) :- Bad Ischl ला उतरल्यावर तेथूनच Gosausee (उच्चार :- गो-झो-झी) ला जाणारी बस पकडावी. २० मिनिटात ही बस Gosaumühle (उच्चार :- गो-झो-मुल) याठिकाणी पोहोचते. येथे बाजूलाच बस क्रमांक ५४३ उभी असते.

बस क्रमांक ५४३ (Hallstatt Gosaumühle > Hallstatt Lahn > Dachstein Ice Caves) :- या बसने १० मिनिटात हॉलस्टॅटच्या मुख्य चौकात पोहोचतो. या बसने पुढे Dachstein Ice Caves पर्यंत जाता येते.

ब) साल्झबर्गहून हॉलस्टॅटला जाण्यासाठी दोन ट्रेन बदलाव्या लागतात.
ट्रेनचे तिकिट माणशी २,३००/- रुपये आहे.

Salzburg Hbf  - Attnang-Puchheim  - Hallstatt Train Station


ऑस्ट्रीयातील आणखीन एका ऑफ़बीट ठिकाणावर लिहीलेला ब्लॉग "नयनरम्य वाचाऊ व्हॅली ( Offbeat Austria, Wachau Valley)" वाचण्याकरीता खालील लिंकवर टिचकी मारा.
Hallstatt 
Photos by :- Amit & Kaustubh Samant Copyright

#hallstat#saltminehallstat#howtogotohallstat#icecavehallstat#offbeataustria#offbeatdestinationineurope#

10 comments:

  1. Ekdam bhari vatla hya gavachi kalpanik safar karun... ice cave ha prakar tar mastach ... specially cave che kahi ajoon photos asatil tar baghayla aavdel

    ReplyDelete
  2. छान आहे गाव. आम्ही ऑस्ट्रीयात अशाच एका खेड्यात टांग्याने चांगली तासभर फेरी केली होती त्या ची आठवण झाली.
    छान लिहिले आहे.

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर लेखणी....

    ReplyDelete
  4. Nice information with beautiful photos and video .

    ReplyDelete
  5. अमित मस्त प्रवास घडवलास

    ReplyDelete
  6. छान प्रवास घडला, छान लिहिलय

    सुधीर कोकाटे

    ReplyDelete
  7. अत्यंत मनोरंजक वर्णन केले आहे आपण.यशस्वी रित्या सहल पूर्ण केली त.अभिनंदन.

    ReplyDelete
  8. छान माहिती

    ReplyDelete