Pages

Friday, May 20, 2016

बारा मोटांची विहिर (Bara Motachi Vihir, Satara)


मुंबई - बंगलोर महामार्गावर मुंबई पासुन १४९ किमी वर महामार्गा लगत लिंब नावाचे गाव आहे.  या गावात बारा मोटांची एक सुंदर विहिर आहे. गुजरात -राजस्थान भागात बांधल्या जाणार्‍या भव्य विहिरींसारखी या विहिरीची रचना आणि बांधणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तरी अशा प्रकारची ही एकमेव विहिर आहे.



औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर शाहु महाराजांच वास्तव्य सातार्‍या मधे होत. सातार्‍या पासून १६ किमीवर असलेल्या शेरी लिंब गावात शाहु महाराजानी देशभरातून गोळा करुन आणलेल्या ३००० जातींच्या आंब्याची आमराई तयार केली होती. या आमराईला पाणी पुरवठा करण्यासाठी त्यानी या ठिकाणी एका सुंदर आणि भव्य विहिरीची निर्मिती केली. इसवी सन १७१९ ते १७२४ अशी तब्बल पाच वर्षं या विहिरीचं बांधकाम सुरू होतं. या विहिरीवर बसवलेल्या १२ मोटानी विहिरीच्या पाण्याचा उपसा करुन ते पाणी आमराईला पाटाने पुरवले जात असे. एकाच वेळी १२ मोटा या विहिरीवर चालवण्याची सोय होती म्हणुन ही विहिर "बारा मोटांची विहिर" या नावाने प्रसिध्द आहे.





बारा मोटांची विहिर गावामध्ये भर वस्तीत आहे. प्रथम दर्शनी विहिरीचा आकार पिंडी सारखा दिसतो. विहिर तीन भागात विभागलेली आहे. पहिल्या भागात विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या, प्रवेशव्दार व 3 अतिरीक्त मोटा आहेत. दुसर्‍या भागात छोटेखानी महाल आहे. तर तिसर्‍या भागात अष्टकोनी विहिर आहे.



पायर्‍या उतरुन विहिरीकडे जाताना प्रथम एक भव्य प्रवेशव्दार लागते. या प्रवेशव्दारावर दोन शिलालेख आहेत त्यावर या विहिरीची निर्मिती ,"शके १६४१ ते १६४६ (इसवी सन १७१९ ते १७२४) याकाळात केल्याचा उल्लेख आहे. प्रवेशव्दारावर दोन बाजुला फुल कोरलेली आहेत. कमानीवर पोपट कोरलेले आहेत. प्रवेशव्दार ओलांडून पलिकडे गेल्यावर दोन कमानींच्या मधे दगडी पुल बनवलेला आहे. पुलाच्या दोन बाजुला पाणी असते. या ठिकाणी विहिरीच्या वरच्या बाजुला मोटा लावण्यासाठी 3  दगडी खोबण्या बनवण्यात आल्या आहेत. विहिर जरी बारा मोटांची विहिर म्हणुन प्रसिध्द असली तरी याठिकाणी प्रत्यक्षात १५ मोटांसाठी दगडी खोबण्या बनवण्यात आल्या आहेत. त्यातील १२ खोबण्या मुख्य विहिरीवर बसवलेल्या आहेत तर 3 खोबण्या पहिले प्रवेशव्दार व महाल या दरम्यान बसवल्या आहेत. विहिरीवरील एखादी मोट काही कारणाने (दुरुस्ती इ. ) बंद असल्यास या ३ अतिरीक्त (Stand by) मोटांचा वापर केला जात असे.


विहिर बांधली त्याकाळी चामड्याच्या मोटा वापरुन बैलांच्या सहाय्याने विहिरीतील पाणी बाहेर काढले जात असे. त्यासाठी विहिरीवर बसवलेल्या खोबण्यांमधे कप्पी बसवुन त्यावरुन दोर सोडला जाई. या दोराला चामड्याची मोट बांधलेली असे. विहिरीच्या वरच्या बाजुला बैलजोडी बांधलेली असे त्यांच्या सहाय्याने मोट खेचली जाई.  बैलाना कमी श्रम व्हावेत यासाठी याठिकाणी उतार (slope) बनवलेला आहे. विहिर बनवताना किती छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आहे हे इथे पाहायला मिळते. 



 

या विहिरी संदर्भात एक दंतकथा सांगितली जाते. संभाजी महाराजांच्या हत्त्येनंतर औरंगजेबाने त्यांच्या पत्नी येसूबाई आणि पुत्र शाहू यांना कैद केलं. कैदेत असताना शाहू महाराजांचा विवाह झाला. औरंगजेबाने शाहूंच्या वधूचा चेहरा पाहाण्याची इच्छा व्यक्त केली. काही दगाफ़टका होऊ नये म्हणुन शाहुच्या पत्नी ऐवजी वीरूबाई या दासीला शाहूंची पत्नी म्हणून औरंगजेबासमोर हजर करण्यात आलं. औरंगजेबाच्या कैदेतून शाहूची सुटका झाल्यावर त्यांनी सातार्‍याहुन राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. सातार्‍य़ा जवळील शेरी लिंब गावात या वीरूबाईंसाठी शाहूंनी वाडा बांधला आणि आमराई तयार केली. राज्यकारभारातून फ़ुरसत मिळाल्यावर शाहू महाराज याठिकाणी विश्रांतीसाठी येत. वीरुबाईचा वाडा विहिरीच्या मागच्या बाजूला होता. आता तिथे उध्वस्त वाड्याचे अवशेष पाहायला मिळतात.


विहिरीच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी जी प्रवेशव्दाराची कमान आहे त्यावर महाल बांधलेला आहे. या प्रवेशव्दारावर दोन बाजुला शरभ कोरलेले आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर महालात जाण्यासाठी २ बाजुला २ जीने आहेत. महालात खाशा व्यक्तींचा वावर असल्यामुळे संरक्षणाच्या दुष्टीने जिन्यांची रचना केलेली आहे. जिने अंधारे व चिंचोळे असून एकावेळी एकच माणुस जाऊ शकेल इतकी जागा आहे. जिना काटकोनात वळलेला असून ज्याठिकाणी तो वळला आहे तेथील पायरीची उंची आणि आकार इतर पायर्‍यांपेक्षा वेगळा आहे. या रचनेमुळे शत्रुने घातपात करण्याच्या हेतूने महाला पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्यास एकावेळी एकच माणुस जिन्याने वर जाऊ शकतो. नविन माणुस जिन्याच्या अंधारामुळे बावचळुन जातो. तसेच काटकोनात वळलेला जिना आणि वेगवेगळ्या उंचीच्या पायर्‍या आणि कामगिरीच मानसिक दडपण यामुळे तो अडखळतो. महालात खाशांच्या संरक्षणासाठी असलेल्या रक्षकांना सावध होण्यासाठी एवढा आवाज पुरेसा असतो. महालाला दोनही बाजुला (विहिरीच्या व प्रवेशव्दाराच्या) तीन कमानी असलेले सज्जे आहेत. महाल चार खांबांवर तोललेला असुन त्यावर फ़ुल, गणपती, मारुती, घोडेस्वार इत्यादी शिल्प कोरलेली आहेत. हा महाल जमिनीच्या खाली विहिरीच्या पाण्याच्या सानिध्यात असल्यामुळे येथे कायम गारवा असतो. महालात पूर्वी पडदे लावले जात. पडदे लावण्यासाठी असलेल्या लोखंडी रींगा अजूनही पाहायला मिळतात. या महालात छत्रपती शाहू महाराज आणि पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या गाठी भेटी झाल्या असाव्यात.


 महालातून वर (जमिनीवर) जाण्यासाठी एक जीना आहे. या जिन्याने वर गेल्यावर चार पायर्‍या असलेला प्रशस्त चौथरा आहे. या चौथर्‍यावर बसुन शाहू महाराज स्थानिकांची गार्‍हाणी ऐकत, न्यायनिवाडा करीत असावेत. 



बारामोटांची मुख्य विहिर अष्टकोनी आहे. विहिरीचा अंदाजे घेर ५० फ़ूट असून खोली ११० फूट आहे. विहिरीच्या प्रत्येक कोनाड्यात शरभ शिल्प आणि नागाच शिल्प बसवलेल आहे. विहिरीवर जनिमीच्या पातळीवर मोटा खाली सोडण्यासाठी १२ ठिकाणी खोबण्या केलेल्या आहेत. मोटांव्दारे वर आलेल पाणी वाहून नेण्यासाठी दगडाने बांधलेले पाट आहेत. पाटाच्या शेवटी छोटे (१ मीटर x  १ मीटर ) हौद बांधलेले आहेत. जेणेकरून उतारावर बांधलेल्या दगडी पाटातून येणारे पाणी हौदात आल्यावर त्याचा वेग कमी होईल व हौदातून बाहेर पडणारे पाणी पुढे असलेल्या मातीच्या पाटाचे नुकसान करणार नाही.


 शाहु महाराजांची आमराई आता राहिली नसली, तरी त्यावेळचा एक डेरेदार पिंपरी वृक्ष आजही विहिरी समोर रस्त्यापलिकडे पांथस्थांना सावली देत उभा आहे. या विहिरीच्या बांधकामातून उरलेल्या दगड चुन्यातून पिंपरी भोवती पार आणि पारवर कळस नसलेल शंभू महादेवाचं लहानसं मंदिर बांधण्यात आलेल आहे. 
महात्मा गांधींच्या हत्त्येबद्दल फाशी झालेले नारायण आपटे याच गावाचे. त्यामुळे गांधीहत्त्येनंतर या गावातील ब्राह्मण वस्तीवर हल्ले झाल्यामुळे ब्राह्मण समाज इथून परागंदा झाल्याचं सांगितलं जातं. 
लिंब गावात पाहाण्यासारख अजून एक ऐतिहासिक ठिकाण म्हणजे कृष्णा नदीच्या पात्रात असलेल्या उंचवट्यावर बांधलेले कोटेश्वर मंदिर.


जाण्यासाठी :- शेरी लिंब गाव मुंबई - बंगलोर महामार्गावर मुंबई पासुन २४० किमी अंतरावर लिंब गाव आहे. सातार्‍याच्या अलिकडचा टोल नाका ओलांडल्यावर (उजव्या बाजूला गौरीशंकर कॉलेजच्या इमारती दिसतात) पुढे साधारणपणे एक किमीवर नागेवाडीला जाणारा फ़ाटा आहे.  या फ़ाट्यावरून २ किमी आत गेल्यावर उजव्या बाजूला जाणारा रस्ता लिंब शेरी गावातील बारा मोटांच्या विहिरीकडे जातो. तर डाव्या बाजूचा रस्ता कोटेश्वर मंदिराकडे जातो. या दोनही ठिकाणी वाहानाने जाता येते. त्यामुळे एका तासात दोनही ठिकाणे पाहाता येतात.
सातारा - शेरी लिंब अंतर १६ किमी आहे.
सातार्‍याहुन सज्जनगड, बारा मोटांची विहिर आणि कोटेश्वर मंदिर एका दिवसात पाहाता येते.
किंवा
सातार्‍याहुन कासचे पठार, बारा मोटांची विहिर आणि कोटेश्वर मंदिर एका दिवसात पाहाता येते.
आजुबाजूची पाहाण्याची ठिकाणे :- सज्जनगड, कासच पठार, पाटेश्वर, कल्याणगड (नांदगिरी)

अमित सामंत

No comments:

Post a Comment