Pages

Saturday, October 4, 2014

Offbeat Chhattisgarh कुटुमसर गुहा (Kutumsar, Limestone Caves in Chhattisgad)

नोव्हेंबर महिन्यातील थंड सकाळ. छत्तीसगड राज्यातील जगदालपूर पासून ४० किमीवरील कांगेर व्हॅली नॅशनल पार्कच्या गेटवर प्रवेश शुल्क भरण्यासाठी उतरलो तेंव्हा तेथे शुकशुकाट होता. तिकीट खिडकी वरील माणसाने दिलेल्या माहितीनुसार येथून २० किमीवर नक्षलवाद्यांनी आठवड्यापूर्वी बॉम्बस्फोट केल्यामुळे कुटुमसर गुहा सोडून अभयारण्यातील इतर गुहा पर्यटकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. तिकीट घेऊन साशंक मनाने गाडीत बसलो पुढचा १० किमीचा प्रवास दाट जंगलातून कच्च्या रस्त्यावरून होता. समोरचा रस्ता कच्चा असल्यामुळे गाडीचा वेग पण कमी झाला होता. १० किमीच अंतर संपता संपत नव्हत. गाडीतल्या इतर कोणाला याची कल्पना नसल्याने सर्वजण मस्त गप्पा मारत होते. मी मात्र जीव मुठीत धरून आजूबाजूच्या दाट झाडीत काही दिसतय का ते पाहात होता. 

कांगेर व्हॅली नॅशनल पार्क


आदल्या दिवशी विशाखापट्टणमहून निघून आंध्रप्रदेश, ओरीसा ही राज्य पार करून आम्ही छत्तीसगड राज्यात प्रवेश केला तेंव्हा संध्याकाळ होत आली होती. प्रवासाने आंबलेल्या शरीराला आणि मनाला एका कडक चहाची गरज होती, पण आमचा वाहान चालक थांबायला तयार नव्हता. पोलिसांचा त्रास टाळण्यासाठी त्याला जगदाळपूरमध्ये अंधार पडण्यापूर्वी पोहोचायच होत. जगदाळपूर मधे राहाण्यासाठी हॉटेल शोधण्याच्या मोहीमेत आमच्या चालकाच्या स्थानिक मित्राची आम्ही मदत घेतली. त्याने नक्षलवादी कसा ओळखावा यावर आमच बौध्दिक घेतल. तुम्ही शहरातील कुठल्याही हॉटेलात राहिलात तरी तुम्ही "अपहरणयोग्य" आहात की नाही याची माहिती खबर्‍यां मार्फत त्यांच्या पर्यंत पोहोचते हे सांगून वर "मजेत राहा" हे सांगायलाही तो विसरला नाही. त्याने सांगितलेल्या गोष्टी अतिशयोक्तीच्या आहेत अस वाटत होत, तरी पण मनावर नकळत दडपण आल होत. हॉटेलात सामान टाकून रात्री ७.३० च्या सुमारास बाहेर पडलो. बाहेर सामसूम झाले होते. लाकडावर कोरीवकाम करणारी तुरळक दुकानच उघडी होती. हॉटेलात जेवणासाठी परत आलो तर १०-१२ स्थानिक तरुणींचा ग्रुप वाढदिवस आजरा करण्यासाठी आला होता. त्यांच्या हसण्या बोलण्याने मगाशी आलेल मनावरच दडपण काहीस दूर झाल. ठिक ९.०० च्या ठोक्याला जेवण आटपून त्या तरूणी लगबगीने निघून गेल्या होत्या.



आमची जीप कच्च्या रत्यावरून संथगतीने जंगलातल्या एका आदिवासीपाड्यात पोहोचली. येथे १०-१२ तरूण एकाच रंगाचे कपडे घालून उभे होते. स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने गुहा दाखवण्यासाठी गाईड म्हणून त्यांना खास प्रशिक्षण दिले होते. आमची पावती पाहून गाडीची नोंद करून एक तरूण आमच्या बरोबर आला. त्याच्याशी गप्पा मारतांना समजल की, नक्षलवादाकडे गावातले तरूण वळू नयेत म्हणून सरकारतर्फे त्यांना गाईडचे ट्रेनिंग देण्यात आले. प्रत्येक गाडीमागे त्यांना १००/- रुपये रोजगार मिळतो. नक्षलवाद्यांच्या भितीमुळे सुट्ट्या चालू असूनही दिवसाला फारतर १० गाड्या येतात. त्यामुळे प्रयेकाला रोज रोजगार मिळतोच असे नाही , त्यामुळे त्या दिवसाचा मिळणारा रोजगार सर्व २५ जण मिळून वाटून घेतात. सरकार आणि नक्षलवाद्यांच्या भाडंणात शांतपणे जीवन जगू पाहाणार्‍या या तरूणांची नाहक फरफट होतेय. 

कुटुमसर गुहेच्या तोंडाकडे जाणारा निमुळता रस्ता   

कुटुमसर गुहेच तोंड   
गुहेत उतरण्याचा मार्ग   


गुहेसमोरच्या मोकळ्या पटांगणात गाडी थांबली. आसपास दाट जंगल होत. पण गुहेचा कुठे मागामुस नव्हता. फरसबंदी पायवाटेवरून आम्ही दोन उंचवट्यांमध्ये असलेल्या दरडीत पोहोचलो. त्यातील डाव्या बाजूच्या उंचवट्या खाली गुहेच प्रवेशव्दार होते. एकावेळी एकच माणूस बसून प्रवेश करू शकेल अशा दारातून आम्ही गुहेत प्रवेश केला. आत उतरण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या त्यावरूनही बसूनच उतरता येईल अशी चिंचोळी जागा होती. शेवटची पायरी उतरल्यावर चक्क उभे राहाण्या एवढी जागा होती. समोरच लवणस्तंभांमुळे तयार झालेलं प्रवेशव्दार आमच स्वागत करत होत.

लवणस्तंभांनी तयार झालेल प्रवेशव्दार

करोडो वर्षापूर्वी झालेल्या उलथापालथीत समुद्र तळाची जमिन वर आली. अशा प्रकारे तयार झालेल्या जमिनीत वेगवेगळ्या प्रकारचे थर असतात. त्यातील चूनखडीचा (calcium carbonate) थर पावसाच्या जमिनीत मुरणार्‍या पाण्यात विरघळून पाण्याबरोबर वाहात जातो. हजारो वर्षे ही प्रकीया चालू असते. त्यातूनच जमिनीखाली गुहा तयार होतात. या गुहांची निर्मिती आजही चालू आहे, पण त्याचा वेग फरच कमी असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. या गुहांची तोंड आडवी (Horizontal) किंवा उभी (Vertical) असतात. या गुहा तयार होतांना / झाल्यावरही गुहेच्या छतावरून झिरपणारे पाणी आपल्या बरोबर विरघळलेले क्षार घेऊन येत. हे क्षार छतालाच चिकटून राहातात आणि पाण्याचा थेंब खाली पडतो. त्यात असलेला क्षाराचा अंश जमिनीवर जमा होतो. अशाप्रकारे क्षाराचे थर छ्तापासून जमिनीकडे जमा होतात त्याला Stalactites म्हणतात व जमिनीकडून वरच्या दिशेला जमा होणार्‍या क्षारांना Stalagmite म्हणतात. कालांतराने ही दोन्ही टोक जोडली जाऊन लवण स्तंभ (Column) तयार होतो. अनेक वर्ष चालणारी प्रक्रीया असल्यामुळे गुहेत वेगवेगळ्या अवस्थेतील लवणस्तंभ पाहायला मिळतात. भारतात मेघालय, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यात चुनखडीच्या गुहा (Lime stone caves) आहेत. Krem Liat Prah ही मेघालयातील गुहा भारतातील सर्वात लांब गुहा असून तीची लांबी ३१ किमी आहे. इ.स. १९५८ ला डॉ. तिवारींनी शोधलेल्या कुटुमसर गुहेची लांबी ५०० मीटर आहे.



एका बाजूला वाहात पाणी 

कुटुमसर गुहेतील लवण स्तंभाच्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर गुहेची उंची एकदम २० ते २५ फूट (३ मजल्या एवढी) वाढली. पाणाच्या प्रवाहामुळे गुहेच्या भिंतीवर अनेक प्रकारची नक्षी, आकार तयार झाले होते. आमचा वाटाड्या त्यात आम्हाला विविध प्राणी, पक्षी, डायनासोर यांचे आकार दाखवत होता. काही ठिकाणी दोन्ही बाजूच्या भिंतींवर वेगवेगळ्या रंगांचे लाटांसारखे पट्टे तयार झाले होते. गुहेला अनेक फाटे फुटलेले होते. आत जाऊन कोणी हरवू नये यासाठीच गाईड्ची व्यवस्था केली होती. गुहेत फिरतांना बर्‍याच ठिकाणी पाया खालून पाण्याचा प्रवाह वाहात होता. निसर्गाचे गुहा खोदायच काम अविरतपणे चालू होतं. गुहेतील या पाण्यात दुर्मिळ "आंधळा मासा" (Albinic blind fish) पाहायला मिळतो. आपण शाळेत शिकलेला डार्विनचा उत्क्रांतीचा नियमाच हे जितजागत उदाहरण आहे. कधीकाळी बाहेरून गुहेत आलेल्या या माशाला गुहेतील मिट्ट अंधारात राहात असल्यामुळे डोळ्यांची गरज उरली नाही, त्यामुळे त्याचे डोळे विकसित न होता त्याऐवजी त्याला लांब मिशा आल्या. या संवेदनशील मिशांच्या सहाय्याने तो आपले भक्ष्य पकडू शकला आणि विपरीत नैसर्गिक परिस्थितीत टिकून राहीला. गुहेत आढळणारा दुसरा सजीव म्हणजे कोळी (crab spider or banana spider) त्याच्याही मिशा याच कारणासाठी त्याच्या आकाराच्या चौपट वाढलेल्या दिसत होत्या.

कोळी (crab spider or banana spider) 

दुर्मिळ  आंधळा मासा (Albinic blind fish) Add caption

गुहा पाहाण्यात किती वेळ गेला हे कळलच नाही. लवण स्तंभाच्या प्रवेशव्दाराशी आल्यावर सर्वांना बाहेर पाठवून दिले. गुहेच्या भिंतीला पाठ टेकवून बसलो. हातातील टॉर्च विझवला. मिट्ट आदिम काळोख सर्वत्र पसरला होता, डोळे उघडे आहेत की बंद हेच समजत नव्हते. गुहेतून वाहाणार्‍या आणि छ्तातून ठिबकणार्‍या पाण्याचा दुरवर अस्पष्ट आवाज येत होता. चित्तवृत्ती शांत होत होत्या. त्या गुहेचाच एक भाग झाल्यासारख वाटत होता. इतक्यात माने जवळ काही तरी हुळहुळल, माझी समाधी भंग झाली. हातातील टॉर्चचा प्रकाश भिंतीवर टाकला तर एक कोळी आपल्या लांब मिशांनी माझा अंदाज घेत होता. त्याला त्रास न देता शांतपणे त्याच्या राज्याच्या बाहेर पडलो.

गुहेतील रस्त्याला फ़ुटलेले फ़ाटे.

कोणी हरवू नये म्हणुन गुहेतील काही रस्ते बंद केलेत.

जाण्यासाठी :- कुटुमसर गुहा पाहाण्यासाठी छत्तीसगड राज्यातील जगदाळपूर हे जवळचे शहर आहे.
(१) मुंबई - नागपूर - रायपूर - जगदाळपूर या मार्गे जगदाळपूरला जाता येते.
(२) मुंबईहून ट्रेन / विमानाने विशाखापट्टणम गाठावे. विशाखापट्टणमहून सकाळी जगदाळपूर साठी पॅसेंजर सुटते किंवा खाजगी वाहानाने बोरा केव्हज, त्याडा, कॉफी प्लांटेशन/ म्युझियम, अरकू व्हॅली पाहात जगदाळपूरला जाता येते.
पाहाण्यासाठी:-  जगदाळपूर जवळ कांगेर घाटी अभयारण्य, सहस्त्रधारा धबधबा, चित्रकुट धबधबा आणि जगदाळपूर मधील पॅलेस ही ठिकाणे पाहाण्यासारखी आहेत.    

झिरपणार्‍या पाण्यामुळे छतावर तयार झालेली नक्षी

झिरपणार्‍या पाण्यामुळे गुहेच्या भिंतीवर तयार झालेली नक्षी

झिरपणार्‍या पाण्यामुळे गुहेच्या भिंतीवर तयार झालेली नक्षी
     


Photos by :- Amit Samant  © Copy right



Offbeat Kenya, Suswa Mountain , निद्रिस्त ज्वालामुखीच्या विवरात, सुस्वा माउंटन , केनिया
हा लेख वाचण्या करिता खालील लिंकवर टिचकी मारा.

12 comments:

  1. Seems vry exciting.. guhaa khupach mast distey..

    Khup sundar lihilays amit da..

    ReplyDelete
  2. आरती दुगलOctober 5, 2014 at 10:22 PM

    अमितदा अप्रतिम…!

    ReplyDelete
  3. गुहा खरच खूप छान आहेत आणि प्रवास पण खूप धाडसी आहे...लैभारी...

    ReplyDelete
  4. शेखर कारेकरFebruary 22, 2019 at 8:54 AM

    अमित,उत्कंठा वाढवणारे फोटो आणि समर्पक वर्णन ! माहितीपूर्ण लेखा बद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन आणि मार्गदर्शकांचे आभार !

    ReplyDelete
  5. मी बोरा केव्हज पर्यंत जाऊन आलो आहे, हि फारच छान माहिती मिळाली, धन्यवाद

    ReplyDelete
  6. Sahhhiiiiii..... कसले भारी

    ReplyDelete
  7. Valuable addition to the list of offbeat places.

    ReplyDelete
  8. Mast offbeat place... Plan karayla harkat nai...

    ReplyDelete