Pages

Thursday, January 3, 2013

Offbeat Kokan गुढरम्य कातळशिल्प (Rock art near Malvan, Dist. Sindhudurg)

"कुंभडक" 

मालवणच्या घरी गेलो की, मी घरी स्वस्थ बसत नाही. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहाण्यासारखी इतकी ठिकाण आहेत की, मला कधीच निराश व्हाव लागल नाही. काही दिवसापूर्वी लोकसत्ता मध्ये बातमी आली होती, "मालवणजवळ आदिमानव कालिन कातळशिल्प मिळाली". यापूर्वी मी मध्यप्रदेशातील भिमबेटकाच्या आदिमानवाच्या गुहा व चित्र पाहिली होती, त्यामुळे आमच्या कोकणातल्या आदिमानवांनी काढलेली कातळशिल्प पहाण्यासाठी मी उत्सुक होतो. 

 


मालवण पासून ३० किमीवर असलेले कुडोपी गाव थोड आडबाजूला आहे. डोंगराततून वहात येणार पाणी पाटाने गावात खेळवल आहे. त्यावरच गावाची शेती -बागायती व धुण - भांड्यांच्या पाण्याची गरज भागते. गावात कातळशिल्पांबद्दल चौकशी केली, पण अस काहीही आपल्या गावात नाही आहे अस गावकर्‍यांनी सांगितल. तितक्यात मला आठवल की, आमच्या गावात दगडात कोरलेली प्रचंड विहिर आहे. ही विहिर पांडवांची विहिर म्हणून ओळखली जाते. (आपल्या भारतात गावातल्याच सामान्य लोकांनी पिढ्यान पिढ्या खपून काही अचाट, प्रचंड काम केलेलं असल तर त्याला पांडवांच नाव दिले्ले आढळते.) त्यामुळे या कातळशिल्पांनाही पांडवांचा काही संदर्भ असेल, म्हणून पांडवाच्या शिल्पांबद्दल विचारल्यावर गावकर्‍यांनी होकार दिला, ते म्हणाले "पांडवाची चित्र " सड्यावर आहेत. गावातल्या तरूण पिढीला या पांडवांच्या चित्राबद्दल फारशी माहिती नव्हती. (हि खरतर आपली शोकांतीका आहे. आजवर अनेक ठिकाणी फिरतांना मला असा अनुभव आलेला आहे, आपल्या गावात पहाण्या लायक एखादी ऎतिहासिक गोष्ट आहे, हेच बर्‍याच जणांना माहित नसते.)


गावातल्या एका बुजुर्ग व्यक्तीला बरोबर घेऊन आम्ही गावाच्या मागचा डोंगर चढायला सुरुवात केली. वाटेत एका झाडावर शेणाने बनवलेल मधमाश्यांच ३ फूट उंचीच उलट्या नरसाळ्याच्या (फनेलच्या) आकाराच पोळ बघायला मिळाल. स्थानिक लोक या पोळयाला "कुंभडक" म्हणतात. शेणाने बनवलेल्या या पोळ्याच्या बाहेरच्या बाजूला हाताने जमिन सारवल्यावर जशी नक्षी येते तशीच नक्षी मधमाशांनी पायांनी तयार केलेली दिसली. डोंगराच्या माथ्यावर पोहोचल्यावर क्षितिजापर्यंत पसरलेला सडा व त्यावरच पिवळ पडलेल गवत नजरेत मावत नव्हत. पंधरा मिनिट सड्यावर चालल्यावर अचानक आदिमानवाने कातळात कोरलेली चित्र दिसायला लागली. त्यांचे आकार व गुढरम्यता पाहून आम्ही थक्क झालो. मी आणि कौस्तुभ त्या शिल्पांवरच गवत उपटून त्यांचे आकार ओळखण्याचा प्रयत्न करू लागलो. माणूस, झाडे, पशू, पक्षी, मासे इत्यादी आकार आम्ही ओळखू शकलो. यातील एका  मानवाकृतीची लांबी ३.५ मीटर भरली तर, एका वर्तूळाकृती चित्राचा परिघ ३ मीटर होता. काही चित्रांचे आकार मात्र गुढरम्य होते. त्यांचे आकार पाहून मला शामलन नाईटच्या "साईन्स (Signs)" या हॉलिवूडपटाची आठवण झाली. त्यात परग्रहवासी शेतांमध्ये मोठ मोठी वर्तूळं, चिन्ह काढून ठेवतात. पण ही चित्र मात्र आदिमानवानेच काढलेली होती. त्यात दैनंदिन जीवनात आजूबाजूला दिसणारी माणस, प्राणी, निसर्ग चितारण्याचा प्रयत्न दिसत होता. अशा चित्रप्रकाराला शास्त्रीय भाषेत "रॉक आर्ट" म्हणतात. कुडोपीच्या या कातळचित्रांचाही श्री.सतीश लळित यांनी अभ्यास करून त्यावर पेपरही प्रसिध्द केलेला आहे. एकूण ६० चित्र त्या माळावर विखुरलेली आहेत. ती शोधून त्यांचा अर्थ लावता लावता तीन तास कधी निघून गेले कळलच नाही. परतांना मनात सारखा विचार येत होता , कोकणातला धुवाधार पाऊस, सड्यावरचा ठिसूळ दगड, वारा, गवत यांच्याशी झुंज देत ही चित्र हजारो वर्ष तशीच पडली आहेत आज त्यातील बरीच चित्र नष्ट झाली आहेत, पुसट झाली आहेत. आता जर या चित्रांचे योग्य संरक्षण केल नाही तर उरलेला आपला हा राष्ट्रीय ठेवा सुध्दा नष्ट होईल.

मानवाकृती 
त्रिशूळ 


जाण्यासाठी :- मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून २२ किमीवर आचरा गाव आहे. आचर्‍याहून एक रस्ता कणकवलीला जातो. या रस्त्यावर आचर्‍यापासून २.५ किमीवर डावीकडे कुडोपी गावाकडे जाणारा फाटा फूटतो. या फाट्याने ६ किमी गेल्यावर गणपती मंदिर आहे. येथून उजव्या बाजूला एक रस्ता कुडोपी टेंब वाडीत जातो. वाडीत पोहोचल्यावर गावातून वाटाड्या घेऊन कातळशिल्प पहायला जावे.

मासे 
मानवाकृती 

कातळशिल्पाच्या परीघावर ३ जण उभे आहेत.

३.५ मीटर लाबं मानवी शिल्पाचा पाय 








7 comments:

  1. good work! bravo!!!
    we would also like to see them....ofcourse with you! :)

    pl say us WELCOME........... :) :) :)

    ReplyDelete
  2. Whao, this is awesome! We have some truly amazing (and neglected) cultural treasures in Maharashtra.

    ReplyDelete
  3. अमित मस्त आहे महिती
    काय काय आहे बघायचं म्हंटलं तर
    नशिबवान आहोत आपण

    ReplyDelete
  4. अमित,माहितीपूर्ण ब्लॉग.

    ReplyDelete
  5. अमित जी,
    अतिशय सोप्प्या भाषेत संपूर्ण माहिती दिली आहे तुम्ही. आता कातळ शिल्पाना जागतिक वारशाचा दर्जा मिळणार आहे. पण स्थानिक पातळीवर म्हणावे तितकी आस्था नसल्याने हा ठेवा काही काळातच .....

    ReplyDelete