Pages

Saturday, October 31, 2020

भटकंती प्राचीन सोपार्‍याची (शूर्पारकाची) (Ancient Sopara/Shurparaka)


Bramha, Chakreshwar Temple

या लेखाचे नाव नालासोपार्‍याची भटकंती असे ठेवले असते तर, किती लोकांनी हा लेख वाचायचे कष्ट घेतले असते. कारण आजचे नालासोपारा हे पश्चिम रेल्वेवरील गर्दीचे, उभ्या-आडव्या पसरलेल्या इमारती असलेले मुंबईचे उपनगर अशी ओळख आहे . पण एकेकाळी सोपारा उर्फ़ सुपारक उर्फ़ शूर्पार सुप्पारक उर्फ़ हे जगभर किर्ती मिळवलेले संपन्न बंदर, राजधानी आणि हिंदु, बौध्द आणि जैन धर्माचे गजबजलेले तिर्थक्षेत्र होते. इजिप्शियन, ग्रीक, रोमन, अरब, अफ्रीकी, इस्त्रायली व्यापारी, दर्यावदी, प्रवासी यांचा सोपारा बंदरात वावर होता . पेरिप्लस ऑफ़ दि एरिथ्रियन (Periplus of the Erythraean Sea) या इसवीसनाच्या पहिल्या शतकात एका ग्रीक खलाशाने लिहिलेल्या पुस्तकातही सोपारा बंदराचा उल्लेख आहे. सहाव्या शतकात ग्रीक व्यापारी कोसमास कल्याण जवळील "सिबोर" असा सोपार्‍याचा उल्लेख करतो. दहाव्या शतकातला अरब प्रवासी अल मसुदी ठाण्या जवळील "सुबारा" असा उल्लेख करतो.  याशिवाय चीनी प्रवासी ह्युएनत्संग (Huen Tsang), अरब अल इद्रिसी इत्यादी प्रवाशांनी सोपार्‍याला भेट दिल्याचे उल्लेख आहेत.  


गजलक्ष्मी (Gajalaxmi, Chakreshwar Temple)


सोपार्‍याची प्राचीन वस्ती उत्तरेला वैतरणा नदी आणि दक्षिणेला वसईची खाडी यामध्ये विखुरलेली होती. आजपर्यंतच्या उत्खननात मिळालेले प्राचीन अवशेष, खापरांचे तुकडे (Islamic Glazed Ware, Black and Red Ware)  या परिसरात सापडलेले आहेत. सध्याची नालासोपारा, वसई आणि परिसरातील निर्मळ, गास, नंदाखाल, नाला, रोजोडी, आगाशी इत्यादी अनेक गावे प्राचीन सोपार्‍याचा भाग होती. या भागात १३०० तलाव या परीसरात असल्याचा उल्लेख जैन पोथीत आहे. आजही या भागात असलेले तलाव आणि बुजवलेले तलाव काल्पनिक रेषेने जोडले तर साधारणपणे नालेच्या आकाराचा जलमार्ग तयार होतो. या जलमार्गाने बंदरात मोठ्या गलबतां मधून आलेला माल , छोट्या होड्यांमधून आतल्या भागापर्यंत आणता येत होता. गास गावात मिळालेल्या दगडी नांगरामुळे या जलमार्गाला पुष्टी मिळते.  या जलमार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मालाच्या वखारी (Ware houses) असण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी हा छोट्या होड्यातून आणलेला माल या वखारीं (गोदामां) मध्ये साठवला जात असावा. (मुंबईतही आजही दाणा बंदर , दारुखाना, कोळासा बंदर इत्यादी वेगवेगळ्या मालांची गोदामे असलेले भाग पाहायला मिळतात.) मागणी प्रमाणे विविध घाटमार्गांनी देशावरील  नाशिक, तेर, प्रतिष्ठाण इत्यादी शहरात, बाजारपेठेत पाठवला जात असे. या बाजरपेठांना जोडणार्‍या व्यापारी मार्गांवर लेणी खोदली गेली, या लेण्यां मध्येही सोपा‍र्‍याचा उल्लेख आढळातो.  इसवीसनाच्या पहिल्या शतकात खोदलेल्या कार्ले येथील लेण्यातील ब्राम्ही शिलालेखात "लेण्यातील विविध भागांची निर्मिती वैजयंती. धेनुकाकट, सोपारा इत्यादी नगरातील श्रेष्ठींनी केलेली आहे" असा उल्लेख आढळतो. सोपार्‍याला उतरल्यावर सर्वात जवळची लेणी म्हणजे कान्हेरीची लेणी, येथे "समिका याने/हिने पाण्याचे टाकं खोदून घेतल्याचा" शिलालेख कोरलेला आहे.नाणेघाट येथिल शिलालेखात येथिल पाण्याचे टाके बनवविण्यासाठी सोपार्‍याच्या गोविंददास याने दान दिल्याचे लिहिले आहे.  

Harihar, Chakreshwar Mandir

 अशा या प्राचीन सोपार्‍यात आपली भटकंती सुरु होते नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेपासून. पश्चिमेला रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या बस स्थानकवरुन चक्रेश्वर तलावाकडे जाणारी बस पकडावी. स्टेशन ते चक्रेश्वर मंदीर ३ किलोमीटरचे अंतर अर्ध्या तासात चालत गाठता येते. चक्रेश्वर या प्राचीन तलावाकाठी चक्रेश्वराचे दगडात बांधलेले मंदिर एकेकाळी अस्तित्वात होते. त्याचे मंदिराचे दगडी अधिष्ठान (पाया ) येथे पाहायला मिळतो. चक्रेश्वर तिर्थ या तलावाच्या भोवती बाग, जॉगिंग ट्रॅक आणि कुंपण घालून त्याच्या गळ्या भोवती फ़ास आवळलेला आहे. चक्रेश्वर मंदिराच्या बाजूला सध्या श्रीरामाचे मंदिर आहे.  हे मंदिर फ़ारसे जूने नाही. पण या मंदिर परिसरात असलेल्या पूरातन मुर्ती इथे नांदलेलेल्या हिंदु, जैन धर्मातील विविध पंथ, त्यांच्या पुजनीय देवता यांचे भांडार आपल्या पुढे उभे करतात. 

महाभारतातल्या शांतिपर्वात (४९, ६६-६७) विष्णूचा सहावा अवतार परशूरामाने समुद्र हटवून शूर्पारकाची निर्मिती केली असा उल्लेख आहे, " ततः शूर्पारकं देशं सागरस्तस्य निर्ममे, सहसा जामदग्नस्य सोऽपरान्तमहीतलम्।" त्यामुळे या ठिकाणाला परशूरामतीर्थ या नावानेही ओळखले जाते. महाभारताच्या वनपर्वात (१८८,८) पांडवांनी शूर्पारकची यात्रा केल्याचा उल्लेख आहे. सभापर्वात (३१,६५) सहदेवाने शूर्पार जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे. परशुरामाने १०८ तिर्थांचा उल्लेख केलेला आहे त्यातील काही तीर्थ सोपारा परिसरात आहे. अशाप्रकारे हिंदू धर्मातील महत्वाच्या तिर्थक्षेत्रार असलेल्या चक्रेश्वर मंदिरात सर्वात सुंदर मुर्ती ब्रह्मदेवाची आहे.  

ब्रह्मा हा सृष्टीचा निर्माता आहे. ब्रह्माच्या उत्त्पतीच्या अनेक कथा आहेत. कूर्म पुराणानुसार विष्णूच्या नाभीतून उगवलेल्या कमळातून ब्रह्मा प्रकट झाला. दुसऱ्या कथेनुसार जल आणि आकाश तत्वापासून वराह रुपात ब्रह्मा प्रगट झाला. नंतर त्याने स्वतःपासून प्रजापती उत्पन्न केले. या प्रजापतींनी सृष्टी निर्माण केली. ब्रह्माच्या विचारातून सप्तर्षींची उत्पत्ती झाली. या सात ऋषींपैकी एकाला कश्यप नावाचा पुत्र होता . त्याच्या पत्नींपासून देव, दानव, मनू , साप , गरुड यांची उत्पत्ती झाली  म्हणून ब्रह्मब्रह्मदेवाला ‘पितामह’ या नावाने ओळखले जाते. 

ब्रह्मदेव हे रजोगुणांचे प्रतिक आहे. निर्मिती करणे हे मुख्य कार्य असल्यामुळे ब्रह्माने युध्द केल्याच्या, कोणाचा संहार केल्याच्या कथा ऐकायला मिळत नाहीत. देव आणि असुर या दोघांनाही ब्रम्हा वंदनीय होता. ब्रह्मा निर्मिती करतो, विष्णू संरक्षण करतो आणि शिव संहार करतो यामुळे हे तीनही देव पूजनीय आहेत. विष्णू आणि शंकर यांच्या जोडीने ब्रह्माची पूजा होत होती. परंतु ब्रह्मदेवाची स्तुती करणारा विशिष्ट संप्रदाय नसणे, असुरास प्रोत्साहन, असत्य कथन, सावित्रीचा शाप, स्वत:च्या कन्येची आसक्ती  इत्यादी कारणांमुळे मध्यकाळापर्यंत ब्रम्हपूजा अस्तंगत झाली. 



पुस्तक,  यज्ञपात्र

भारतात सध्या ब्रह्मदेवाची पुष्कर (राजस्थान) आणि खेडब्रह्म (गुजरात) ही दोन प्रमुख मंदिरे आहेत. याशिवाय महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्यात ठाणे (पूर्वीचे श्रीस्थानक), सोपारा (चक्रेश्वर मंदिर), या ठिकाणी ब्रम्हदेवाच्या मुर्ती सापडलेल्या आहेत, त्यामुळे या भागात त्याकाळी ब्रह्मदेवाची मंदिरे होती हे दिसुन येते. ठाणे परिसरावर इ.स. ८०० ते १२५० अशी साधारणपणे ४५० वर्षे शिलाहार राजघराण्याची राजवट होती. श्रीस्थानक ही त्यांची राजधानी होती. शिलाहार राजघराण्याने ठाणे आणि परिसरात अनेक सुंदर मंदिरे बांधली. ठाण्यातील तलावपाळी जवळील कौपिनेश्वर मंदिर, अंबरनाथ येथील शिवमंदिर, लोणाड येथील शिवमंदिर इ. मंदिरांचे बांधकाम शिलाहारकालात झाले. नालासोपारा आणि ठाणे येथे असलेल्या ब्रह्मदेवाच्या सुंदर आणि भव्य मूर्ती आणि मंदिरे याच काळात राजाश्रयाने निर्माण झाली असावीत. या मूर्तीची नित्यनेमाने पूजा होत असावी. काळाच्या ओघात ब्रह्मदेवाची मंदिरे नष्ट झाली.


सावित्री व गायत्री / गायत्री व सरस्वती 

घट (कमंडलू), हंस 

मूर्तिशास्त्रानुसार ब्रह्माला चार हात असतात. वाहन हंस असून तो कमळावर बसलेला असतो किंवा उभा असतो. हातात पुस्तक, माळा, कमंडलू, यज्ञपात्रे, वरदअभय मुद्रा असतात. ब्रह्मा संहारकर्ता नसल्यामुळे त्याच्या हातात कोणतेही शस्त्र नसते.

वरदअभय मुद्रा

राममंदिरातील ब्रह्मदेवाची मूर्ती सुमारे ५ फुट उंच, समभंग अवस्थेत (समभंग म्हणजे दोन्ही पायावर सरळ उभी असणारी) उभी आहे. मूर्तीला दर्शनी भागात तीन डोकी असून, डोक्यावर कोरीवकाम केलेला मुकुट आहे. मूर्तीला कोरलेल्या भुवया एकमेकांना जोडलेल्या आहेत. ब्रह्मदेवाला दाढी आणि मिशी दाखवली आहे. कानात कुंडले, गळ्यात हार, यज्ञोपवीत (जानवे) आणि कटीसूत्र धारण केलेले आहे. अंगावर बाजूबंद, हातात कडं, कमरपट्टा इत्यादी वेगवेगळे अलंकार दाखवले आहेत. मूर्तीचे चारी हातात अनुक्रमे माळा व घट (कमंडलू), वेद, यज्ञपात्र आहेत, एक हात वरद मुद्रेत आहे. मुर्तीच्या पायाच्या दोन्ही बाजूला स्त्रिया दाखवल्या असून त्या सावित्री व गायत्री किंवा गायत्री व सरस्वती असाव्यात. पायाच्या डाव्या बाजूला हंस हे ब्रह्माचे वाहन कोरलेले आहे. तर उजव्या पायाजवळ ब्राम्हण कोरलेला आहे. मूर्ति शास्त्रानुसार ब्रह्माचे शरीर स्थूल आणि पोट थोडे सुटलेले असते. पण शिल्पकारांनी ही मूर्ती तयार करताना ब्रह्माला एकदम "फ़िट" दाखवलेला आहे.


Surya

महिषासूर मर्दीनी




Agni


ब्रह्मदेवाच्या मूर्ती शिवाय मंदिरात आणि मंदिर परिसरात इतर अनेक मूर्ती आहेत. त्यातील महत्वाची मूर्ती मेंढ्यावर बसलेल्या अग्निची आहे. अष्ट दिक्पालांपैकी आग्नेय दिशेचा देव अग्नी हा वेदकाळात पूजनीय होता. त्याच्या स्वाहा आणि स्वधा या दोन बायका आहेत. मूर्तीशास्त्राप्रमाणे अग्नीला दोन किंवा चार हात असतात तो मेंढ्यावर (मेषावर) बसलेला दाखवतात. त्याच्या हातात पंखा आणि तुपाचे भांडे दाखवतात. अग्नीची मुख्य खूण म्हणजे त्याच्या मागे असलेला ज्वालांचा पसारा. याशिवाय येथे सूर्याची सात घोडे असलेली मुर्ती, हरिहर , गणपती, महिषासूर मर्दीनी, उमा - महेश्वर , जैन अंबिका, गजलक्ष्मी, नंदी, सुरसुंदरी वेगवेगळ्या प्रकारचे वीरगळ/ समाधीचे दगड/ स्मृतीशिळा येथे पाहायला मिळातात.  यात साधूची आणि बौध्द दांपत्याची स्मृतीशिळा पाहायला मिळतात. 

(वीरगळींबद्दल अधिक माहिती वाचण्याकरीता "वीरगळ , सतीशिळा , गध्देगळ , धेनुगळ" हा लेख वाचा लेख वाचण्याकरिता लिंकवर टिचकी मारा  https://samantfort.blogspot.com/2019/04/blog-post_4.html) 

Stupa, Nalasopara

चक्रेश्वर मंदिरापासून अर्ध्या किलोमीटरवर सोपार्‍याचा प्रसिध्द स्तूप आहे. महाराष्ट्रात मोजकेच मैदानी आणि वीटांनी बांढलेले स्तूप आहेत, हा त्यापैकी एक आहे. या ठिकाणी रस्त्यावरच फ़ायबरचे गेट आणि बुध्दमूर्ती बसवलेली आहे. कंपाऊंडच्या आत मध्ये पूरातन बौध्द स्तुपाचे अवशेष आहेत. सोपारा हे बौध्द धर्मांचे महत्वाचे केंद्र आणि तिर्थक्षेत्र होते. गौतम बुध्दांनी त्यांच्या पूर्वजन्मात "बोधिसत्व सुप्पारक" या नावाने जन्म घेतला होता.  पूर्व जन्मात खुद्द बुध्दाचेच नाव सुप्पारक होते यावरुन त्याकाळच्या सोपारा या बंदराची भरभराट किती झाली होती आणि ते किती प्रसिध्द होते हे दिसून येते. याशिवाय बुध्द चरित्रानुसार  खुद्द गौतम बुध्द येथे बौध्द धर्माची दिक्षा देण्यासाठी येथे आले होते. त्यावेळी त्यांनी वक्काली आणि ५०० विधवांना दिक्षा देउन आपली नखे आणि केस प्रसाद म्हणुन दिले. त्यावर हा स्तूप बांधला गेला म्हणून याला "विधवांचा स्तूप" असेही म्हणतात. सम्राट अशोकाच्या काळात सोपारा हे बौध्द धर्माचे महत्वाचे केंद्र होते, येथूनच बौध्द धर्माचा प्रसार पश्चिम किनार्‍यावर झाला.




मध्ययुगात बौध्द धर्मा बरोबर हा स्तूपही विस्मृतीत गेला. या भागात असलेल्या मातीच्या टेकाडाला " बुरुड राजाचा कोट" या नावाने ओळखले जात असे. इसवीसन १८८२ मध्ये श्री. भगवानलाल इंद्राजी या ऑर्कोलॉजिस्ट्नी याठिकाणी उत्खनन केले. त्यांना या ठिकाणी विटांचा स्तूप आढळला. या स्तूपात एका दगडी पेटीत मैत्रेय बुध्दाच्या पितळेच्या ८ मूर्ती सापडल्या. या स्तूपाचा काळ इसवीसनपूर्व तिसर्‍या शतकातल्या (3rd century BCE) असल्या तरी, याठिकाणी मिळालेल्या बुध्दमुर्ती इसवीसनाच्या आठव्या शतकातील आहेत. या मुर्तींबरोबर सोन्याची फ़ुले, भिक्षापात्राचा तुकडा, गौतमीपुत्र सातकर्णी (सातवाहन) काळातील चांदेची नाणी या गोष्टी सापडल्या. या सर्व वस्तू अशियाटीक सोसायटी, मुंबई येथे आहेत.


Remains of stupa

Votive Stupa

१९३९ - ४० मध्ये सर्व्हे ऑफ़ इंडीयाच्या एम एम कुरेशी यांनी केलेल्या उत्खननात मुख्य स्तुपाच्या दक्षिणेला दोन स्तूप सापडले. त्याच प्रमाणे दगडी खांब, तुळ्या, खापरांचे तुकडे (plain glazed ware of the Muslim period) सापडले. इसवीसन १९५६ मध्ये भूईगाव येथे सम्राट अशोकाचा नववा शिलालेख सापडला. आजपर्यंत भारतात १४ ठिकाणी अशोकाचे शिलालेख सापडलेले आहेत. त्यापैकी आठवा आणि नववा शिलालेख सोपारा येथे सापडलेले आहेत. हे ब्राम्ही लिपीतील शिलालेख आपल्याला छ्त्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, मुंबई येथे पाहायला मिळतात. स्तूप परिसरात मंदिराचे छत तोलणार्‍या भारवाहकांचे, किचकांचे कोरलेले दगडी स्तंभांचे तुकडे पाहायला मिळतात. त्यावरुन याठिकाणी नंतरच्या काळात मंदिर असावे. या ठिकाणी १० वोटीव स्तुप  (पूजेचे किंवा नवसाचे स्तूप ) मिळालेले आहेत. साधाराणपणे आठव्या शतकाच्या आसपास या स्तुपांना नवस बोलण्याची प्रथा होती. याशिवाय येथे मिळालेली बुध्द मुर्ती, मंदिराचे अवशेष एकत्र करुन ठेवलेले आहेत.



स्तूपापासून २ किलोमीटर अंतरावर गास गाव आहे. या गावातील टाकी पाडा येथे मंदिराचे दगडी अधिष्ठान (पाया) पाहायला मिळतो. याशिवाय किचक, भारवाहक, दगडी खांब, तुळया, कोरीव दगडांचे अवशेष पाहायला मिळातात. या गावात जैन मंदिराचे काही अवशेष मिळाले आहेत, ते सध्या मुंबई विद्यापिठ कलिना येथे आहेत. याशिवाय चौदाव्या- पंधराव्या शतकातली सूर्य मुर्ती आणि जैन तिर्थंकरांच्या ७ पितळी मुर्ती येथे मिळालेल्या आहेत. या सध्या आगाशी जैन टेम्पल ट्रस्टच्या ताब्यात आहेत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे गास गावात दगडी नांगरही मिळालेला आहे. गास गावातील तलावा भोवती असलेल्या दगडी कठड्यावरील एका शिळेवरील मौर्यकालिन ब्राम्ही लिपीमध्ये "सतिमितस" हे नाव असलेला आलेख सर्वात प्राचिन असावा व अशोकाचा स्तूप बांधण्यात त्याने हातभार लावला असावा असे अनुमान आहे.   


Gay Vasaru Stone

हिंदू आणि बौध्द यांच्याप्रमाणे सोपारा हे जैन लोकांचेही तिर्थक्षेत्र होते. जैन पुराणांनुसार आदिनाथांचे जेष्ठ पूत्र चक्रवर्ती भारत यांनी पहिली "शत्रुंजय तलेटी"  (शत्रूंजय टेकडी)  सोपारा येथे स्थापन केली होती, तेथून ती वालभीपूरा गुजरात आणि त्यानंतर पलिताना येथे गेली. जैन रामायणानुसार लव - कुश यांनी सोपारा जिंकून घेतला होता. जैन साहित्यात इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून सोपार्‍यात अनेक यात्रा, चातुर्मास, दिक्षा पार पडल्याचे उल्लेख आहेत.


गास गावात सध्या अस्तित्वात असलेले तलाव आणि त्याच्या आजूबाजूला तयार झालेली परिसंस्था निवांतपणे पाहाण्यासारखी आहे. गास गावानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे ४ किलोमीटरवरचे सुळेश्वर मंदिर,निर्मल. याठिकाणचे मुळ मंदिर काळाच्या ओघात नष्ट झालेले आहे. सध्या सिमेंटचे बेढब मंदिर बांधलेले आहे. पण मंदिरासमोर उघड्यावर दोन मुर्ती आहेत. त्यापैकी ब्रह्माची मुर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या मुर्तीला पुढच्या बाजूला ३ आणि मागच्या बाजूला एक डोके अशी चार डोकी कोरलेली आहेत. ब्रह्मदेवाला पूर्वी पाच डोकी होती. पण ब्रह्माने शिवाचा विरोध केल्यामुळे भैरवाने त्यांचे डोके तोडले. पुढे ब्रह्मदेवाने शिवाचे स्तवन करून शिवास प्रसन्न करू घेतले. ब्रह्महत्येचे प्रायश्चित म्हणून भैरव ते कपाल घेऊन भिक्षा मागण्याकरिता निघून गेला. रुपमण्डण ग्रंथानुसार चार वेद, चार युगे आणि चार वर्ण यांचे प्रतिक म्हणजे ब्रह्माची चार मस्तके.


Bramha 3 heads
Bramha 4th head at back



Ambika
सुळेश्वर मंदिर,निर्मलहून पुढचा टप्पा म्हणजे नाला गावातील शंकर नागेश्वर मंदिर. या मंदिरात मागच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेली विष्णू मुर्ती पाहायला मिळते. प्राचीन सोपारा गावाचे हे अवशेष पाहून आपण ६ किलोमीटर वरील विरार किंवा नालासोपारा स्टेशन गाठू शकतो. 

Vishnu

आम्ही ही भटकंती भर पावसात एसटीने आणि मधले बरेचसे अंतर चालत केली. संपूर्ण दिवस तंगडतोड भटकंती झाली होती. स्वतं:चे वाहान असल्यास ही भटकंती कमी श्रमात होवू शकते. 

Harihar


संदर्भ :- ही भटकंती मी मुंबई विद्यापिठाच्या आर्कॉलॉजिच्या (Archeology) कोर्स दरम्यान अभ्यासाचा भाग म्हणून केली होती, यावेळी आम्हाला मार्गदर्शक म्हणून याच भागात राहाणारा, या भागाची खडानखडा माहिती असणारे श्री. सिध्दार्थ काळे मार्गदर्शक म्हणून होता. सिध्दार्थने या भागात अनेक नविन गोष्टी शोधल्या आहेत आणि त्यावर शोध निबंधही लिहिले आहेत. हा लेख लिहितांना त्यावेळी नोंद केलेली माहिती वापरली आहे.

भारतीय मूर्तिशास्त्र :-  डॉ. नी. पु. जोशी, 

लेणी महाराष्ट्राची :- डॉ दाऊद दळवी 

भारतीय नौकानयनाचा इतिहास :- डॉ.द.ग.केतकर 

विशेष आभार :- जॉन परेरा, नंदाखाल 

सम्राट अशोकाचा शिलालेख